कल्याण-डोंबिवलीतील मुजोर रिक्षाचालक आणि रिक्षाचालक-मालक संघटनांच्या दादागिरीपुढे येथील सर्वच राजकीय पक्ष, नेते, आरटीओ आणि वाहतूक पोलीस अधिकारी आणि राज्यस्तरावरील सर्वपक्षीय नेत्यांनी शेपूट घातले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथे रिक्षांचे मीटर डाऊन झालेले नाही. मुठभर रिक्षाचालक हजारो प्रवाशांना वेठीस धरत आहेत. राज्य शासनानेही या प्रश्नात तातडीने लक्ष घातले नाही तर कल्याण-डोंबिवलीकर प्रवाशांच्या सहनशीलतेचा कधीही स्फोट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्यासाठी प्रवासी संघटनेचे नागराज शास्त्री सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मध्यंतरी शिवसेनेने कल्याणमध्ये प्रवाशांकडून अर्ज भरून त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याचे नाटक केले. मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात हजारो तक्रारी शिवसेनेकडे दाखल झाल्या. मीटर पद्धत असावी, अशी हजारो प्रवाशांची मागणी होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जिल्हा नेतृत्वाने मीटर डाऊन करण्यासाठी पुन्हा ‘आरटीओ’ कार्यालयावर धडकण्याचा प्रयोग केला. पण ‘पहिले पाढे पंचावन्न’ पुढे काही झालेच नाही.
पनवेलमध्ये तेथील स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर रिक्षाचे मीटर डाऊन करण्यासाठी प्रवाशांच्या बाजूने रस्त्यावर उतरू शकतात, तर कल्याण व डोंबिवलीतील ‘फलकबाजी’ करणारे आमदार, कल्याण-डोंबिवलीकरांच्या मतांवर निवडून आलेले खासदार आणि सर्वपक्षीय नेते प्रवाशांच्या बाजूने का उभे राहात नाहीत, प्रवाशांसाठी कधी रस्त्यावर का उतरत नाहीत, असे सवाल प्रवाशांकडून विचारण्यात येत आहेत. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ वगळता कल्याण-डोंबिवलीतील विविधरिक्षाचालक-मालक संघटना या सर्वच राजकीय पक्षांच्या आहेत. त्याच पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी त्या संघटनांचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना प्रवाशांच्या हितापेक्षा मुठभर रिक्षाचालकांची बाजू घेणे ‘अर्थ’पूर्ण वाटत असावे. पण ‘मनसे’चे तसे नाही. या पक्षाकडे अद्याप एकही रिक्षाचालक-मालक संघटना नाही. त्यामुळे ‘मनसे’ तरी या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरेल, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. पण त्यांनीही प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
गेल्या वर्षी याच सुमारास कल्याण-डोंबिवलीत मीटरनुसार रिक्षा धावू लागतील, असे चित्र निर्माण झाले होते. पण राजकीय नेते, राजकीय पक्ष, ‘आरटीओ’ आणि वाहतूक पोलिसानीही मुजोर रिक्षाचालक आणि त्यांच्या नेत्यांसमोर शेपूट घातल्याने मीटर डाऊन झालेच नाही.
गणेशोत्सवानंतर अंमलबजावणी करू, असे सांगणाऱ्या ‘आरटीओ’ आणि वाहतूक पोलिसांनी नंतर राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा बागुलबुवा करून पुन्हा एकदा रिक्षाचालकांपुढे शरणागती पत्करली. शहरातील प्रमुख रिक्षातळांवर (काही ठराविक व महत्त्वाची ठिकाणे) मीटर पद्धत आणि शेअर पद्धतीने होणाऱ्या भाडय़ाचे मोठे फलक ‘आरटीओ’ आणि वाहतूक पोलिसांकडून गेल्या वर्षी लावण्यात येणार होते. मात्र त्यालाही अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणाऱ्या रिक्षाचालकांना आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने भाडेवाढ हवी आहे. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी नकार देणे, प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळणे, अधिकृत रिक्षातळावर रिक्षा उभी न करता रेल्वे स्थानक परिसरात बेशिस्तीने वाटेल तशा रिक्षा उभ्या करून पादचारी आणि प्रवाशांना मनस्ताप देणे, पश्चिमेकडून पूर्वेला आणि पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी उड्डाणपूलावरून जावे लागते म्हणून वीस रुपयांपासून पुढे कितीही पैसे उकळणे (मीटरप्रमाणे या अंतरासाठी फक्त १२ ते १५ रुपये लागतील), प्रवाशांनाच मीटर पद्धती नको आहे, कोणीही आले तरी येथे मीटर डाऊन होणारच नाही, अशा उद्दाम शब्दात प्रवाशांना बोलणे अशी मुजोरी रिक्षाचालकांकडून येथे सर्रास सुरू आहे. पण एकाही राजकीय पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष द्यावेसे वाटले नाही, हे येथील मतदारांचेही दुर्देव.
कल्याण येथे रेल्वे स्थानकाजवळ मीटरप्रमाणे एक रिक्षातळ सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. फक्त एकाच ठिकाणी असा तळ का?, म्हणजे ज्यांना मीटर पद्धतीने प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी हा रिक्षातळ आहे, त्यांनी त्या ठिकाणी यावे, असे आरटीओ, वाहतूक पोलीस आणि रिक्षाचालक-मालक संघटनांच्या नेत्यांना अपेक्षित आहे का? संपूर्ण कल्याण-डोंबिवलीत मीटर पद्धती का नाही, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. मीटरप्रमाणे रिक्षा न चालवणाऱ्या आणि कायदा धाब्यावर बसविणाऱ्या रिक्षाचालकांबरोबरच स्थानिक ‘आरटीओ’ अधिकारी आणि वाहतूक पोलिसांच्या विरोधात राज्याचे परिवहन मंत्री, परिवहन सचिव, गृहमंत्री कठोर कारवाईचा बडगा कधी उगारणार, त्याकडेही कल्याण-डोंबिवलीकर प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
मीटर आणि शेअर पद्धत दोन्हीही सुरू ठेवता येऊ शकते. एखाद्या प्रवाशाला मीटर पद्धतीने जायचे असेल तर रिक्षाचालकाने मीटर डाऊन करूनच गेले पाहिजे आणि ज्याला शेअर पद्धतीने जायचे आहे, तेव्हा रिक्षाचालकाने त्याप्रमाणे जावे. मीटर पद्धती लागू केली तर प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागतील, असे रिक्षाचालकांकडून सांगण्यात येत असले तरी त्यात रिक्षाचालकांचेच नुकसान होणार असल्याने त्यांनाच मीटर पद्धती नको आहे. कारण सध्या एका रिक्षात पाच ते सहा प्रवासी बसवून (येथेही आरटीओ आणि वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष) आणि प्रत्येक प्रवाशाकडून सहा रुपये याप्रमाणे एका फेरीत छत्तीस ते चाळीस रुपये मिळविणाऱ्या रिक्षाचालकांना मीटर पद्धत लागू केली तर किमान भाडे मिळणार असल्यानेच त्यांचा मीटरपद्धतीला विरोध आहे.
ताजा कलम : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांचे माहेर डोंबिवलीत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतही शिवसेनेचीच सत्ता आहे. त्यामुळे उद्धव आणि रश्मी यांनी या प्रश्नात लक्ष घालावे व हा प्रश्न कायमचा मिटवावा आणि कल्याण-डोंबिवलीत लवकरात लवकर रिक्षांचे मीटर डाऊन करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (केवळ वरवर नाही तर रिक्षांचे मीटर डाऊन होईपर्यंत. कारण यापूर्वीही वृत्तपत्रातील बातम्या वाचून भाषाप्रभू पु. भा. भावे यांचे डोंबिवलीत यथोचित स्मारक उभारण्यासाठी उद्धव व रश्मी ठाकरे यांनी लक्ष घातले होते. पण त्याबाबतीत अद्याप काहीही झालेले नाही)
(ही बातमी लोकसत्ता, मुंबई वृत्तान्त आणि ठाणे वृत्तान्तमध्ये १५ जून २०१० च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे)
Mumbai or Pune ths auto drivers are rude. best way to oppose this Do not use Auto.
ReplyDelete