मराठी रंगभूमीवरील अनभिषिक्त नटसम्राट बालगंधर्व यांचा २६ जून हा जन्मदिन! (जन्म २६ जून १८८८. महानिर्वाण १५ जुलै १९६७). आपल्या स्वर्गीय संगीताने, अभिनयाने त्यांनी रंगभूमीवर ‘गंधर्वयुग’ निर्माण केले. श्रीराम रानडे यांनी लिहिलेला हा लेख लोकसत्ता पुणे वृत्तान्तमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
‘‘आपल्या सखीगणांसह शकुंतलेने रंगभूमीवर प्रवेश करताच आपल्या नेत्रांचे सार्थक झाले, असे प्रेक्षकांना वाटले. कण्वमुनींच्या तापसी आश्रमास शोभेल असा साधा वेष तिने परिधान केला होता. ‘जातीच्या सुंदराला काहीही शोभते’, या दुष्यंताच्या उक्तीची सार्थकता पटत होती. ‘वृक्ष वेल या दोहींची जोडी शोभते’, हे पद जेव्हा ती गाऊ लागली त्या वेळी जणू काय स्वर्गीय संगीत ऐकल्याचा भास प्रेक्षकांना झाला आणि पहिल्या प्रवेशाच्या अखेरीस ‘सखये अनुसये, थांब की गं बाई’, हे पद म्हणत पायात रुतलेल्या दर्भाकुराच्या किंवा कोरांटीस अडकलेली साडी सोडविण्याच्या निमित्ताने दुष्यंताकडे नेत्रकटाक्ष टाकीत, लयबद्ध पावले टाकीत, तिच्या सख्यांच्या मागोमाग जाऊ लागली त्या वेळी तिच्या भावपूर्ण चेहऱ्यावर दुष्यंताप्रमाणे प्रेक्षकही अनुरक्त झाले..’’
शनिवार, ५ जानेवारी आणि रविवार, ६ जानेवारी १९०६. मिरजेतील सरकारी थिएटरात हा जणू चमत्कारच घडला. वरील दोन्ही दिवशी सरकारी नाटय़गृहात प्रेक्षकांची एकच गर्दी उसळलेली होती. सांगली, मिरज, बुधगाव येथील प्रेक्षक होतेच, पण पुणे, कोल्हापूर, बेळगाव येथील रसिक प्रेक्षक आवर्जून ‘शाकुंतल’ नाटकाला उपस्थित होते. कोल्हापूरहून आलेल्या प्रेक्षकांचे नेतृत्व छत्रपती शाहूमहाराजांकडे होते. त्यापूर्वीच्या चार-पाच वर्षांत किलरेस्कर नाटक मंडळींच्या नाटकाला अशी गर्दी उसळली नव्हती. १३ फेब्रुवारी १९०१ रोजी किलरेस्कर मंडळीत नायिकेची भूमिका करणारे भाऊराव कोल्हटकर (भावडय़ा) मृत्यू पावले आणि किलरेस्कर मंडळीचे सौभाग्यच हरवले, पण मिरज मुक्कामी झालेल्या ‘शाकुंतल’च्या प्रयोगानंतर किर्लोस्कर मंडळींचेच नव्हे तर अवघ्या मराठी रंगभूमीचे सौभाग्य आपल्या पायांनी पुन्हा चालत आले होते. ज्या व्यक्तीच्या पावलांनी हे सौभाग्य परत आले होते, त्या व्यक्तीचे नाव- नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व!
पुण्यातील शुक्रवार पेठेतील मोरगावकरांच्या वाडय़ानजीकच्या एका घरात २६ जून १८८८ रोजी सायंकाळी ६ वाजून २ मिनिटांनी नारायणाचा जन्म झाला. नारायणचे बालपण शब्दसुरांच्या संगतीतच गेले. शालेय शिक्षणाकडे मात्र या मुलाचा ओढा कमीच होता. जळगाव येथे मेहबूबखान यांच्याकडे नारायण शास्त्रशुद्ध गाणे शिकू लागला. पुण्यात लोकमान्यांनी नारायणाचे गाणे ऐकले आणि त्यांच्या तोंडून सहजोद्गार निघाले, ‘हा बालगंधर्व फार सुरेख गातो’ आणि तेव्हापासून ‘बालगंधर्व’ या नावानेच नारायण ओळखला जाऊ लागला.
मिरज मुक्कामी देवल मास्तर, चिंतोबा गुरव, दादा लाड, गणपतराव बोडस, शंकरराव मुजुमदार, नानासाहेब जोगळेकर, पांडोबा क्षीरसागर अशा जाणत्यांसमोर नारायणाने आपल्या आवडीच्या काही चिजा म्हटल्या व अखेरीस अण्णासाहेब किलरेस्करांच्या ‘रामराज्य वियोग’ नाटकातील ‘धन्य जाहला, तुम्ही माझा राम पाहिला’ हे गीत म्हटले. त्याचे गाणे सर्वाना आवडले. ‘नारायणा, तू स्त्री पार्टी करशील काय,’ असे देवलमास्तरांनी विचारले आणि त्यावर ‘शिकवल्यास करीन,’ असे १७ वर्षांच्या नारायणाने उत्तर दिले. नारायणाचा- बालगंधर्वाचा किलरेस्कर मंडळीत गुरुद्वादशीच्या सुमुहूर्तावर ऑक्टोबर-१९०५ला मिरज मुक्कामी प्रवेश झाला. सुरुवातीला ‘शारदा’ नाटकातील नटी- सूत्रधाराच्या प्रवेशाची रंगीत तालीम झाली. ‘नटीची भूमिका’ आणि ‘नाटक झाले जन्माचे’ हे तिच्या तोंडी असलेले पद म्हणून बालगंधर्वानी मोजक्याच, पण रसिक प्रेक्षकांकडून पसंतीची टाळी मिळविली आणि हा शकुंतलेची भूमिका करण्यास सर्वथैव योग्य अशी किलरेस्कर मंडळींच्या सर्वाचीच खात्री पटली. काही वर्षांपूर्वी ‘फुटक्या काठाचं मडकं’ म्हणत ज्याची संभावना केली तोच हा मुलगा, गायनाचा, अभिनयाचा सुवर्णकलश मिरवत कंपनीत आला आणि पुढील काळात त्याने आपल्या नावाची सुवर्णमुद्राच रंगभूमीवर उमटवली.
१९०५ ते १९१३च्या जुलै महिन्यापर्यंत बालगंधर्व किलरेस्कर मंडळीत होते. आपल्या मधुर आवाजाने आणि अप्रतिम लावण्यसंपदेने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. शकुंतला (शाकुंतल), नटी (शारदा), विषया (चंद्रहास), सरोजिनी (मूकनायक), सुभद्रा (सौभद्र) या भूमिका करून त्यांनी स्वत:ची अभिनयातली आणि गायनातली प्रगती उंचावलीच, त्याचबरोबर किर्लोस्कर मंडळीलाही अपार यश मिळवून दिले.
नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे किर्लोस्कर संगीत मंडळीच्या रंगभूमीवर आलेले पहिले संगीत नाटक ‘मानापमान!’ ‘मानापमान’चा पहिला प्रयोग १२ मार्च १९११ रोजी मुंबईत झाला. (‘मानापमान’ नाटकाच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे). प्रयोग दुपारचा होता. नानासाहेब जोगळेकर (धैर्यधर), गणपतराव बोडस (लक्ष्मीधर) आणि बालगंधर्व (भामिनी) असा त्रिवेणीसंगम! गोविंदराव टेंबे यांचे संगीत, पण दुर्दैवाने त्याच दिवशी सकाळी बालगंधर्वाची लाडकी मुलगी वारली. नियोजित प्रयोग रद्द करण्याचे ठरत होते, पण बालगंधर्वानी त्याला ठाम नकार दिला. खेळ झाला. ‘टकमक पाही’ या ‘मानापमाना’तल्या पहिल्या गाण्यापासूनच बालगंधर्वाना वन्समोअर मिळू लागला. त्यांची ‘भामिनी’ रंगतच गेली. स्वत:चे दु:ख बाजूला सारून संस्थेची, स्नेहय़ांची आणि रंगभूमीची काळजी वाहणारा श्रद्धाळू कलावंत म्हणून बालगंधर्वाची प्रतिमा रसिकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाली. किलरेस्कर नाटक मंडळीतून बाहेर पडून बालगंधर्व, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे यांनी स्वत:ची स्वतंत्र नाटय़कंपनी काढण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या बुधवार पेठेतील ढमढेऱ्यांच्या बोळातील माळय़ाची धर्मशाळा भाडय़ाने घेतली. ५ जुलै १९१३ रोजी पुष्य नक्षत्रावर सायंकाळी साडेपाच वाजता नव्या नाटय़संस्थेचा नारळ फोडला. नाटय़संस्थेला ‘न्यू किर्लोस्कर नाटक मंडळी,’ असे परंपरादर्शक नाव द्यावे, असे घाटत होते. परंतु काकासाहेब खाडिलकरांनी सुचवलेले नाव तात्यासाहेब केळकरांनाही पसंत पडले आणि कंपनीचे नामकरण झाले, ‘गंधर्व नाटक मंडळी.’ राम गणेश गडकऱ्यांना मात्र किर्लोस्कर नाटक मंडळीमधून फुटून नवीन नाटय़संस्था काढण्याचे मुळीच मान्य नव्हते. त्यांना विलक्षण संताप आलेला होता. ‘आमच्या नवीन कंपनीचा नारळ फुटला बरं का,’ असं गणपतराव बोडसांनी त्यांना सांगताच, ‘नारळ फुटला, आता कंपनी कधी फुटणार?’ असा संतप्त सवाल त्यांनी केला होता.
‘गंधर्व नाटक मंडळी’चा दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. ‘मूकनायक’ नाटक प्रथम रंगमंचावर आणले. ‘शाकुंतल’, ‘रामराज्यवियोग’ असे नाटकांचे प्रयोग सुरू झाले. ‘मानापमान’ आणि ‘सौभद्र’ नाटकांच्या प्रयोगांचे हक्क मिळविण्यास थोडा विलंब लागला, त्यामुळे उत्पन्नाचे वारू धाव घेईना, पण या कालखंडातील महत्त्वाची घटना म्हणजे अव्वल दर्जाचे नाटय़शिक्षक, नाटककार गो. ब. देवल पुन्हा नाटय़क्षेत्रात आले. गंधर्व मंडळीच्या तालमी घेऊ लागले. आपल्या ‘मृच्छकटिक’ आणि ‘गद्य फाल्गुनरावा’चे ‘संगीत संशयकल्लोळ’मध्ये रूपांतर करून त्यांनी तालमी सुरू केल्या. कंपनीच्या उत्कर्षांची सुचिन्हे दिसू लागली. तो पावेतो ‘मानापमान’, ‘सौभद्र’ नाटकांचे प्रयोगहक्क मिळाले. गंधर्व नाटक कंपनीच्या वैभवाचे दिवस सुरू झाले. राम गणेश गडकऱ्यांनी ज्या गंधर्व नाटक मंडळीच्या स्थापनेबद्दल राग व्यक्त केला होता, त्यांचेच ‘एकच प्याला’ नाटक गंधर्व नाटक मंडळीने २० फेब्रुवारी १९१९ रोजी बडोदा येथे रंगमंचावर आणले. त्या नाटकाने गंधर्व नाटक मंडळी, बालगंधर्व, गणपतराव बोडस यांना उदंड यश, कीर्ती, धनसंपदा मिळवून दिली. पण आपल्या नाटकाचे यश पाहण्याचे भाग्य गडकऱ्यांच्या नशिबी नव्हते. नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वीच २३ जानेवारी १९१९ रोजी गडकरी या जगाच्या रंगभूमीवरून कायमचे निघून गेले होते.
‘एकच प्याला’मधील ‘सिंधू’ ही बालगंधर्वाच्या इतर सर्व भूमिकांपेक्षा सर्वस्वी निराळी भूमिका! बालगंधर्वाना भरजरी पोशाखातून फाटक्या वस्त्रांकडे, शृंगार रसातून करुण रसात नेणारी आव्हानात्मक भूमिका! बालगंधर्वानी हे आव्हान पेललं. याबाबतची एक घटनाच या गोष्टीवर प्रकाश टाकणारी आहे. ‘रत्नाकर’ मासिकाने १९३१ जुलैचा अंक ‘बालगंधर्व विशेषांक’ म्हणून काढला. त्यानिमित्त ‘बालगंधर्वाची सवरेत्कृष्ट भूमिका कोणती,’ असा प्रश्न संपादकांनी रसिकांना विचारला. ३३५३ रसिकांकडून उत्तरे आली. त्यापैकी २०५२ जणांनी बालगंधर्वाची सवरेत्कृष्ट भूमिका राम गणेशांच्या ‘एकच प्याला’मधील ‘सिंधू’ची असा निर्वाळा दिला. या तत्कालीन जनमताच्या कौलास मान देऊन आम्ही ‘रत्नाकर’च्या मुखपृष्ठावर सिंधूचे रंगीत चित्र देत आहोत, अशी टीप ‘रत्नाकर’च्या संपादकांनी आवर्जून दिली.
‘गंधर्व नाटक मंडळी’ म्हणजे नाटय़क्षेत्रातले वैभव. अस्सल भरजरी कपडे, शालू, शेले, पैठण्या, खरे दागिने, सोन्या-चांदीचे मुकुट, वैभवशाली पडदे, सुदृढ कलाकार, कंपनीत बडदास्त इतमामाची, जेवण जेवावे तर गंधर्व कंपनीतले, ‘इथे नांदते वैभव सारे’, अशी सुस्थिती! निर्भेळ दूध आणि साजूक तूप असा सर्व मामला! तिरखवाँ, राजण्णासारखे तबलजी, कादरबक्ष महंमद हुसेनसारखे सारंगीवाले, ऑर्गनवर कांबळे, हरिभाऊ देशपांडे, नाटके रंगत होती, पण जमा-खर्चाचा ताळमेळ जमत नव्हता. गोविंदराव टेंबे, गणपतराव बोडस भागीदारीतून बाजूला झाले, कारण खर्चविषयक मतभेद हे प्रमुख कारण. अखेर बालगंधर्व एकटेच कंपनीचे मालक झाले. अर्थकारण चुकले. कर्जाचा डोंगर उभा राहिला आणि अखेर ३१ डिसेंबर १९३४ रोजी गंधर्व कंपनी बंद करण्याचा कटू निर्णय घेण्यात आला.
अडीच तपांचा संगीतमय, प्रकाशमय, आनंदमय, रसिकप्रिय नाटय़प्रवास थांबत होता. नियतीने खेळ मांडला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या आगेमागे जन्मलेल्या आमच्या पिढीने बालगंधर्व पाहिले, पण ते, ते बालगंधर्व नव्हते. आम्ही पाहिले बालगंधर्वाचे उतरतीला लागलेले रूप. भग्न अवशेष. भिंत खचली, कलथून खांब गेले, अशी अवस्था! दोघा-चौघांनी उचलून आणून गादीवर बसवलेले आणि अभंग, भजने गाणारे बालगंधर्व. पण त्यांना आणताना अनेकांचे डबडबलेले डोळे, गळय़ात दाटलेले हुंदके आम्ही बघितले आहेत आणि अरेरे! चे दर्दभरे उद्गार ऐकलेले आहेत. रंगभूमीच्या या अनभिषिक्त सम्राटाविषयी आमच्या पिढीने भरपूर ऐकले आहे, भरपूर वाचले आहे. त्यातील किती आठवावे आणि किती जतन करावे, याला मर्यादाच नाही.
‘नारायणराव (बालगंधर्व) म्हणजे रंगभूमीवरील एक अपूर्व घटना! फूटलाईटच्या प्रकाशात उगवलेले इंद्रधनुष्य! सुगंध असलेला स्वर आणि स्वर असलेले चांदणे!’ (कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर).
‘नारायणराव केवळ गळय़ाने जगले नाहीत. उद्या जर त्यांच्या पायाच्या अंगठय़ाला स्वर फुटला तर तेथूनही तेच गाणे स्रवेल. उसाचे कांडे जसे सर्वत्र गोड, तसे त्या गाण्याचे, गाण्याच्याच नव्हे तर गद्य वाक्यांच्या लयीचादेखील त्यांना झालेला साक्षात्कार तसाच.’ (पु. ल. देशपांडे).
बालगंधर्वाची अमाप स्तुती करणारी जशी रसिक मंडळी होती, आहेत आणि असतील, त्याचप्रमाणे त्यांच्यावर टीका करणारेही आहेत. याचे उदाहरण म्हणजे अहिताग्नी राजवाडे. त्यांनी आपल्या आत्मकथनात्मक पुस्तकात ‘ ‘स्वयंवर’ नाटकाचा आजचा प्रयोग काव्य, गायन, अभिनय, नाटय़ या सर्व बाबतीत हीन’ अशी नोंद आपल्या त्या दिवशीच्या डायरीत केली आहे. पु. शं. पतके हे बालगंधर्वाचे चाहते. त्यांनी आठवण लिहिली आहे- ‘संगीत नाटक अॅकॅडमीतर्फे त्यांचा (बालगंधर्वाचा) सवरेत्कृष्ट नट म्हणून गौरव होणार होता, त्या वर्षीच्या अॅकॅडमीच्या कौन्सिलवर मी आणि (कै.) मामा वरेरकर असे दोनच महाराष्ट्रीयन प्रतिनिधी होतो. मामांनी ‘गंधर्वाना अभिनय व संगीतातले श्रीगणेशासुद्धा समजत नाही’, असे विधान करताच कै. पृथ्वीराज कपूर, देविकाराणी व कमलादेवी चटोपाध्याय यांनी ‘बुढ्ढे, तुम चूप बैठो’ म्हणून मामांवर हल्ला केला होता.’
१९५६-५७च्या दरम्यानची गोष्ट आहे. बालगंधर्वानी आत्मचरित्र लिहावे, असा आचार्य अत्रे यांचा आग्रह होता. मिरजेच्या वसंतराव आगाशे यांनी ‘बालगंधर्वाचे असफल आत्मवृत्त’ या आपल्या लेखात यासंबंधीचे सविस्तर वर्णन केले आहे. जिज्ञासूंनी तो लेख जरूर वाचावा किंवा वसंतराव आगाशे यांच्याशी संपर्क साधावा. (मिरज- दूरध्वनी ०२३०-२२२५४४७). जर ते आत्मवृत्त प्रसिद्ध झाले असते तर बालगंधर्वाच्या अनेक अज्ञात गुणांवरही प्रकाश पडला असता. पण जर-तर या गोष्टींना काहीच अर्थ नसतो. आपण फक्त, ‘असा बालगंधर्व आता न होणे’ म्हणत या महान कलाकाराला वंदन करायचे.
(लोकसत्ता-पुणे वृत्तान्तवरून साभार)
No comments:
Post a Comment