शनिवार वाडा म्हटला की आपल्याला पुण्यातील शनिवार वाडा आणि पेशवे आठवतात. पण आता प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी हा शनिवार वाडा पुन्हा नव्याने उभा केला आहे. म्हणजे त्याची प्रतिकृती तयार केली आहे.
देसाई हे भव्य आणि दिव्य सेट्सबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मालिकेत ते अशा ऐतिहासिक स्थळाची प्रतिकृती उभी करण्यात कधीही काटकसर करत नाहीत. त्याची प्रचिती प्रेक्षकांनी वेळोवेळी विविध मालिकांमधून घेतली आहे. त्यात आता ई-टीव्ही मराठी वरील ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेची भर पडली आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी देसाई यांनी कर्जत येथील आपल्या एन. डी. स्टुडिओत चक्क शनिवारवाडा उभा केला आहे.
सुमारे २८० वर्षांपूर्वी थोरले बाजीराव पेशवे यांनी त्यावेळच्या बारा हजार रुपयांत शनिवारवाडा बांधला होता. देसाई उभारत असलेली शनिवार वाडय़ाची प्रतिकृती दोन लाख पन्नास हजार चौरस फुट क्षेत्रफळात विस्तारणारी असून याचा खर्च सुमारे दोन कोटी चाळीस लाख रुपये इतका आहे. येत्या सप्टेंबरमध्ये ही प्रतिकृती पूर्णपणे तयार होणार आहे.
मुळ शनिवारवाडय़ाचे रेखाचित्र आणि स्थापत्य शिवरामपंत काझीवाले यांनी केले होते. १० जून १७३० ला पायाभरणी झाली होती. १० जून १७३१ ला प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होऊन २२ जानेवारी १७३२, म्हणजे सुमारे दीड वर्षांत हा भलामोठा शनिवारवाडा बांधून तयार झाला.
शनिवारवाड्याची प्रतिकृती ४० फूट उंच असणार असून त्यासाठी लाखो किलो फायबरचा वापर केला जाणार आहे. मुख्य दरवाजा, दिल्ली दरवाजा, पुष्करिणी, तलाव, चमन बाग, दरबार, गणेश मंदिर, रक्षक खोल्या, बुरूज आदी सर्व या शनिवार वाड्याच्या प्रतिकृतीततही असणार आहे.
महाराष्ट्राचा, शिवाजी महाराजांचा आणि पेशव्यांचा संपन्न इतिहास अख्ख्या जगासमोर प्रभावीपणे येणे आवश्यक असून पुरातन वास्तुशास्त्र जपण्यासाठी या प्रतिकृती टिकवून ठेवल्या जाणार आहेत. या प्रतिकृती करताना मूळ बांधकामाचा विचार केला आहे.
(ही मूळ बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त मध्ये १९ जून २०१० च्या अंकात कर्जतमध्ये शनिवार वाडा या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाली आहे. ही बातमी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=78992:2010-06-18-14-45-21&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81
येथे वाचता येईल.
No comments:
Post a Comment