10 April 2010

पन्नाशीतील दीन महाराष्ट्र

जानेवारी महिना संपला की घामाच्या धारा वाहायला सुरुवात होते आणि अंगाची काहिली करणारा उन्हाळा सुरु होतो. गेल्या वर्षी पक्षा यंदा जास्त उन्हाळा आहे, असे आपण दरवर्षी म्हणत असतो. मुंबईकर राज्यातील अन्य मंडळींच्या तुलनेत खूप सुखी. कारण अजून तरी येथील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेले नाही. नाशिक, जळगाव, धुळे, भुसावळ, नागपूर आणि राज्याच्या अन्य भागात एप्रिल महिन्यातच तापमापकाने ४० चा पारा पार केला आहे. भुसावळ येथे तर ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. आत्ता ही अवस्था तर ऐन मे महिन्यात काय होईल


ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणाचा नाश, झाडांची कत्तल, डोंगर, टेकड्या यांना भुईसपाट करुन टाकणे, सर्वत्र उभे राहिलेले सिमेंट-क्रॉंक्रिटचे जंगल, डांबरी किंवा सिमेंट-क्रॉंक्रिटचे रस्ते, पेव्हर ब्लॉक या आणि अशा अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आजही एखाद्या खेडेगावात गेल्यानंतर दाट झाडांखाली आपण बसलो तर भर दुपारही सुसह्य होते याचा अनुभव आपण सर्वानानीच कधी ना कधी घेतला असेल. वड, पिपंळ, आंबा या सारखे जुने वृक्ष आपल्याला सावली आणि गारवा दोन्हीही  देत असतात. पण शहरात मात्र  ही सावली आणि गारवा आपल्याला अपवादानेच मिळतो.


अद्याप संपूर्ण मे  महिना शिल्लक असून जून अर्धा किंवा संपूर्ण कोरडाच जाणार आहे. हल्ली सात जूनला पाऊस येतच नाही. आणि आला तरी हजेरी लावून गायब होतो. त्यामुळे पुन्हा अंगाची काहिली करणारा उन्हाळ्याला सामोरे जावे लागते. यंदा तर बदललेल्या हवामानामुळे  ऐन चैत्र महिन्यांत राज्याच्या काही भागात अवेळी पाऊस झाला.  काही वर्षांपूर्वी किमान निसर्गाचे ऋतूचक्र तरी व्यवस्थित होते. आता तेही बिघडले आहे. माणसानेच ताळतंत्र सोडून वागायचे ठरवल्यावर निसर्गाने तरी का आपले वेळापत्रक पाळायचे. तो ही लहरीपणा करत असतो.


गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे अगोदरच पाण्याची टंचाई असून यंदाच्या वर्षी पाऊस वेळेवर आला नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. प्रसंगी पाण्यावरुन माऱयामाऱया, दंगली होतील की काय असे वाटते. पाणीटंचाईच्या काळात सर्वानी पाणी जपून वापरावे, याचेही भान अनेकांना नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असतोच. शहरात काही टक्के पाणीकपात केली तर आपण शहरातील माणसे लगेच आरडाओरड करतो. पण खेडेगावातून, ज्या ठिकाणी पाण्याचे नळ थेट घरात आलेले नाहीत, तेथील लोकांचा विचार आपण कधी करतो का, तीच परिस्थिती वीजेच्या बाबतीत. शहरात वीज भारनियमन काही तासांचे आहे. पण ग्रामीण भागात ते बारा ते पंधरा तास आहे. तेथील लोकांचे काय हाल होत असतील.


पुढील मे महिन्यात आपण महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहोत. राज्यातील सत्ताधारी, राजकीय पक्ष, संघटना उत्साहात तो साजरा करतील. पण सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्रात आपण खरोखरच सुखी आहोत का, शेतकरी आत्महत्या, वीज भारनियमन, तीव्र पाणी टंचाई, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आणि समस्या तशाच आहेत. नव्हे काही समस्यांचा तर भस्मासूर झाला आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक, राजकीय नेते व राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या पूर्णपणे सुटलेल्या नाहीत.


राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात तरी तळागाळातील आणि हातावर पोट घेऊन जगणाऱया सर्वसामान्यांच्या किमान गरजा तरी पूर्ण होतील का, येत्या १ मे रोजी आपण महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करु पण तो दिन की दीन असेल, याचा आपण विचार करणार आहोत की नाही...     
        

07 April 2010

पेपरलेस हॉस्पिटल

भारतातील आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी यांच्या प्रेरणेतून कोचीन येथे सुरू झालेले ‘अमृता इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि रिसर्च सेंटर’ हे केरळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात रुग्णसेवा आणि वैद्यकीय शिक्षणातील मानबिंदू ठरले आहे. या संकुलात १३०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय, रुग्णांसमवेत येणाऱ्या नातेवाईकांसाठी १६ मजल्यांची स्वतंत्र इमारत, वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय इत्यादींचा समावेश आहे. या अद्ययावत रुग्णालयाचा सर्व कारभार ‘पेपरलेस’ असून बाह्य रुग्ण विभागात दररोज सुमारे दोन हजार पाचशे रुग्ण येत असतात. रुग्णांना कमीतकमी त्रास व्हावा यासाठी येथे विशेष प्रयत्न केले जातात.

माता अमृतानंदमयी मठातर्फे नुकतेच कोचीन येथे एका दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हे संपूर्ण अद्ययावत रुग्णालय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात आले. या वेळी रुग्णालयाचे पर्यवेक्षक डॉ. संजीव सिंह, अमृतानंदमयी मठाचे सहनिमंत्रक अनुप चव्हाण, डॉ. ओम प्रकाश आदी उपस्थित होते.

या रुग्णालयाची संपूर्ण इमारत वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आली आहे. संपूर्ण इमारतीत इतकी स्वच्छता आणि टापटीपपणा आहे की आपण एखाद्या रुग्णालयात फिरत आहोत, असे वाटतच नाही. रुग्णालयाचा संपूर्ण पेपरलेस कारभार हे रुग्णालयाचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणता येईल. येथे दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला बारकोड असलेले एक कार्ड दिले जाते. त्या कार्डावर त्याचे नाव, पत्ता, आजार, सध्या सुरू असलेले उपचार, रुग्णाचा इतिहास याची माहिती नोंदविण्यात येते. ही सर्व माहिती संगणकावर संकलित करून साठवून ठेवण्यात येते. त्यामुळे पुन्हा कधी रुग्ण परत आला तर त्याचे केसपेपर तयार करा, सर्व माहिती घ्या, असे सोपस्कार करावे लागत नाहीत. तसेच रुग्णाचे रक्त, लघवी, थुंकी, मूत्र याचे नमुने घेतल्यानंतरही त्याची तपासणी करताना त्यावर बारकोड दिला जातो. तपासणीचा अहवाल हा रुग्णालयातील संबंधित डॉक्टर ऑनलाईन पाहू शकतात. त्यामुळे अन्य रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा रुग्णाला इकडेतिकडे जसे धावावे लागते तो त्रास येथे वाचतो. रुग्णाचे एक्स-रे काढण्यासाठीही फिल्मचा वापर केला जात नाही तर त्याचा डिजिटल रिपोर्ट तयार केला जातो. रुग्णाचा एक्सरे संबंधित डॉक्टर ऑनलाईन पाहू शकतात तसेच सीडीमधून आपला एक्स-रे रुग्ण घेऊन जाऊ शकतो.

रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसाठी सोयीचे असलेले या रुग्णालयाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथे हृदय, मधुमेह, नाक-कान आणि घसा आणि अन्य आजारांसंबंधीच्या सर्व तपासण्या या एकाच ठिकाणी होतात. म्हणजे रुग्णाच्या ज्या काही तपासण्या आणि उपचार करायचे असतील ते एकाच मजल्यावर केले जातात. त्यामुळे रुग्णाला इकडूनतिकडे जावे लागत नाही. रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी येथे समुपदेशक, आहारतज्ज्ञ यांचीही नेमणूक केलेली आहे. याच ठिकाणी संशोधन विभागही असून येथे विविध आजार, त्यावरील औषधोपचार याबाबत संशोधन सुरू आहे. बायोटेक्नोलॉजी, नॅनो टेक्नोलॉजी यासंबंधीही येथे प्रयोग सुरू आहेत. मधुमेही रुग्णांसाठी इन्सुलिन पंप विकसित करण्यात आला असून तो २५ हजार रुपये इतक्या शुल्कात रुग्णांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. बाजारात सध्या याची किंमत काही लाख रुपये इतकी आहे.

येथे दाखल होणाऱ्या रुग्णांवर खासगी रुग्णालयातील दरांच्या तुलनेत अल्प दरात उपचार केले जातात. एखाद्या रुग्णाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असेल तर त्याच्यावर मोफतही उपचार केले जातात. या रुग्णालयात उपचार करण्यासाठी देशभर तसेच परदेशांतूनही रुग्ण येत असतात. मुंबईत बदलापूर येथे अमृतांदमयी मठातर्फे ३० खाटांचे एक छोटे रुग्णालय चालविण्यात येत आहे.

अमृता इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटरबाबत http://www.aimshospital.org या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळू शकेल.

( माझा ही बातमी लोकसत्ता- मुंबई वृत्तान्तमध्ये ७ एप्रिल २०१०च्या अंकात पान १ वर प्रसिद्ध झाली आहे)