18 December 2009

नर्मदा परिक्रमा स्कूटरवरुन...

नर्मदा परिक्रमा हा विषय गेल्या काही वर्षात जगन्नाथ कुंटे यांच्या नर्मदे हर या पुस्तकामुळे अनेक लोकांपर्यंत पोहोचला आङे. कुंटे यांच्यापूर्वीही या विषयावरील काही पुस्तके प्रकाशित झाली होती तसेच काही मंडळींनी नर्मदा परिक्रमाही केली होती. गो. नि. दांडेकर यांच्या कुणा एकाची भ्रमणगाथा या खूप वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकातही याविषयी सांगण्यात आले आहे. नर्मदा परिक्रमा ही पायी किंवा बसमधून केली जाते. अनेक जणांनी ती केलीही असेल तर काही जणांच्या मनात करण्याची इच्छा असेल. सातारा येथील घाडगे दाम्पत्याने (प्रकाश आणि वासंती घाडगे) स्कुटरवरुन ही नर्मदा परिक्रमा केली म्हणून त्याचे वेगळेपण. स्कुटरवरील नर्मदा परिक्रमेवरचे नर्मदातीरी हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.


वासंती प्रकाश घाडगे यांनी लिहिलेले हे पुस्तक ठाणे येथील उद्वेली बुक्स या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. पंधरा दिवसातील स्कूटरवरुन केलेल्या नर्मदा परिक्रमेचे प्रवासवर्णन यात आहे. २३ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २००९ या कालावधीत घाडगे दाम्पत्याने ही परिक्रमा केली. या दोघांनी .ापूर्वी स्कुटरवरुन भारतात अनेक ठिकाणी भ्रमंती केली आहे. त्या प्रवास करण्याच्या वेडातूनच स्कुटरवरुन नर्मदा परिक्रमा करावी, असे त्यांच्या मनात आले आणि जिद्दीने, आलेल्या संकटांना तोंड देत दोघांनी ही परिक्रमा पूर्ण केली.


या पुस्तकात त्यांनी पंधरा दिवसातील स्कूटरवरील प्रवासाचा तक्ता दिला आहे. नर्मदा परिक्रमेचा पायी मार्ग २ हजार ८५६ किलोमीटर इतका असून वाहनाने काही ठिकाणी लांबून रस्ते असल्याने हे अंतर वाढते. घाडगे दाम्पत्याने सातारा ते धुळे (४४०), धुळे ते ओंकारेश्वर (२८०), ओंकारेश्वर ते शहादा (३००), शहादा ते कटपोर (२३०), कटपोर ते मनसर (७०), मनसर ते कुक्षी (३९०), कुक्षी ते इंदूर (२३०), इंदूर ते बरेली (२३०), बरेल ते कटनी (३७०), कटनी ते अमरकंटक (३६०), अमरकटंक ते महाराजपूर (१८०), सहाराजपूरह ते होशंगाबाद (३००), ओंकारेश्वर ते धुळे (३१०) आणि धुळे ते सातारा (४४०) असे अंतर स्कूटरवरुन पार केले. (कंसातील सर्व आकडे किलोमीटरमध्ये)


घाडगे दाम्पत्याने १९९८ पासून स्टूरवरुन भ्रमण करायला सुरुवात केली. नर्मदा परिक्रमेचा प्रवास या दोघांनी केला तेव्हा प्रकाश घाडगे यांनी साठी ओलांडली होती तर वासंती या साठीकडे झुकल्या होत्या. या वयाय नर्मदा परिक्रमेला जाणे आणि तेही स्कूटरच्या प्रवासाने म्हणजे खरोखऱच जिद्दीचे आणि धाडसाचे काम. पण दोघांनीही हिंमतीने ते पूर्ण केले. त्या अनुभवावर आधारित वासंती घाडगे यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचनीय झाले आहे. प्रवासाची दैनंदिनी असे याचे स्वरुप असले तरी ओघवत्या भाषेमुळे ते वाचायला हातात घेतले की पुढे काय याची उत्सुकता निर्माण करते. यापूर्वी वासंदी घाडगे यांनी लिहिलेले कन्याकुमारी ते कैलास हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.


नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांच्या यादीत घाडगे दाम्पत्याच्या स्कूटरवरील नर्मदा परिक्रमेच्या पुस्तकाची भर पडली आहे. बाईकिंग करणाऱया धाडसी तरुणांसाठी किंवा प्रवासाची आवड असणाऱयांकरता वासंती घाडगे यांचे हे पुस्तक संग्राह्य आणि उपयुक्त असे आहे. पुस्तकाच्या शेवटी नर्मदा परिक्रमेचा आराखडा नकाशाच्या स्वरुपात देण्यात आला आहे.    

17 December 2009

चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी संमेलन

महर्षी शांडिल्य प्रतिष्ठान आणि सोलापूर येथील जोशी कुलबंधु व भगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २६ व २७ डिसेंबर रोजी सोलापूर येथे २९ वे चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. प्रकाश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. सध्याच्या काळात अशी ज्ञाती संमेलने आयोजित करावी का, असा वादाचा मुद्दा उपिस्थत होऊ शकतो. मात्र मला असे वाटते की अशी ज्ञाती संमेलने भरविण्यात काहीही चूक नाही. वेगवेगळ्या प्रांतात आणि राज्यातील विविध शहरात पसरलेले कुलबंधु या निमित्ताने दोन दिवस एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होते, परस्परांच्या ओळखी होतात, यातून काही नवीन उपक्रम हाती घेतले जाऊ शकतात.  सर्वात महत्वाचे म्हणजे दूरचित्रवाहिन्या, इंटरनेट आणि परस्परांमधील संवाद कमी होत जाण्याच्या काळात अशा संमेलनाच्या निमित्ताने अनोळखी व्यक्तीनी एकत्र येऊन नवीन ओळखी वाढवणे आणि सवंदा साधणे हे काम या संमेलनांच्या निमित्ताने होत असते. त्यामुळे अशी विविध ज्ञाती संमेलने होणे गरजेचे आहे.


चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी संमेलनाची सुरुवात १९८२ मध्ये झाली आणि आजतागायत गेली २८ वर्षे ही संमेलने आयोजित करण्यात येत आहेत. संमेलनाला ज्ञाती बांधवांची उपिस्थतीही  मोठ्या प्रमाणात असते हे विशेष. ज्येष्ठ पत्रकार आणि नाटककार विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली पहिले संमेलन २८ मार्च १९९२ मध्ये पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर पुणे, रत्नागिरी, इचलकरंजी, बडोदा, डोंबिवली, नाशिक, कोळथरे (जिल्हा-रत्नागिरी, तालुका-दापोली), ठाणे, चिपळूण, मुंबई, वरवडे विलेपार्ले, अकोला, लोणावळा, नागपूर, सातारा आदी विविध ठिकाणी ही संमेलने झाली आहेत. यंदाचे २९ वे संमेलन सोलापूर येथे होणार आहे.


सोलापूर येथील गजानन कृष्णाजी जोशी व अतुल वसंत जोशी हे संमेलनाचे प्रमुख संयोजक आहेत. उपलम मंगल कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे हे संमेलन होणार आहे. २६ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून संमेलनार्थींचे स्वागत आणि नावनोंदणी सुरु होणार आहे. संध्याकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि नऊनंतर भोजन असा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आहे. दुसऱया दिवशी सकाळी (२७ डिसेंबर) सकाळी ७ ते ९ या वेळेत कुलदैवतपूजन, आरती मंत्रपुष्प व तीर्थप्रसाद सकाळी ९ ते १० या वाळेत अल्पोपहार, १० ते १२.३० या वेळेत मुख्य समारंभ आणि दुपारी साडेबारानंतर भोजन झाल्यावर  संमेलनाची सांगता  होणार आहे. संमेलनाची वर्गणी प्रत्येकी २०० रुपये असून ती संमेलनस्थळीच स्वीकारण्यात येणार आहे. शनिवार २६ डिसेंबरची संध्याकाळ ते रविवार २७ डिसेंबर पर्यंतचा संमेलन समारोप होईपर्यंत संमेलनार्थींच्या निवास व भोजनाची सोय स्थानिक संमेलन समितीकडून केली जाणार आहे.


चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी संमलेनात जास्तीत जास्त कुलबंधु आणि भगिनी तसेच माहेरवाशीणींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. आमडेकर, उत्तुरकर, घनवटकर, घुले, घोरपडे, जोशीराव, टकले, टोकेकर, दणगे, दाणेकर, गुदल, नामजोशी, फडणीस, बावडेकर, भाटे, मटंगे, मनोळीकर, मेडदकर, मोकाशी, योगी, राजवाडे, वाडेकर, शेंडे, हरिश्चंद्रकर, हुपरीकर, ही आडनावे असणारे सर्वजण मूळचे चित्पावन शांडिल्य गोत्र जोशीच आहेत. विविध कारणांनी त्यांच्या पूर्वजानी वरील आडनावे स्वीकारलेली आहेत. या सर्व आडनावांचा समावेश १९८२ मध्ये प्रकाशित झालेल्या चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी  या कुलवृत्तान्तात करण्यात आला आहे. आपल्या परिचयातील अशा कुलबांधवानाही ही माहिती सांगून त्यानाही सोलापूर येथील संमेलनास येण्यास सांगावे, असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.


चित्पावन शांडिल्य गोत्र  जोशी यांचे श्री लक्ष्मी केशव, कोळिसरे, जिल्हा रत्नागिरी आणि श्री लक्ष्मी नृसिंह, कसबा-संगमेश्वर, जिल्हा-रत्नागिरी ही कुलदैवत आहेत. काहींचे लक्ष्मीकेशव तर काहींचे लक्ष्मीनृसिंह असे कुलदैवत आहे. लक्ष्मीकेशव, कोळीसरे येथे भार्गव मराठे हे मंदिराचे पुजारी आहेत. त्यांचा दूरध्वनी असा ०२३५७-२४३८३५ तर लक्ष्मीनृसिंह येथे जाण्यासाठी संपर्क दूरध्वनी पुढीलप्रमाणे बापू जोशी ०२३५४-२५२९६० किंवा केशव जोशी ०२३५४-२५२४४६


सोलापूर येथील २९ व्या चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी संमेलनासाठी ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांच्यासाठी अधिक माहितीकरता संपर्क दूरध्वनी पुढीलप्रमाणे
गजानन कृष्णाजी जोशी-०९९७५२५८२६०

संमेलनाला उपिस्थत राहणाऱयांनी आपली नावे आणि वय लेखी स्वरुपात डॉ. पी. के. जोशी, चर्च स्ट्रीट, शांतिसागर मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर येथे कळवावीत.       

16 December 2009

प्रांजळ आत्मकथन-रास

ज्येष्ठ कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर यांनी लिहिलेले रास हे आत्मचरित्र नुकतेच वाचनात आले. मौज प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. अत्यंत प्रांजळ असे हे आत्मकथन असून आपले आयुष्य त्यांनी जसे आहे तसे पारदर्शकतेने मांडले आहे. मराठी साहित्यातील एका ज्येष्ठ कवीची पत्नी म्हणून या आत्मकथनात कुठेही बडेजाव किंवा मीपणा दिसत नाही.


सुमा या विंदांच्या द्वितीय पत्नी. सुमा यांचाही पहिला विवाह झाला होता. दुर्दैवाने त्यांच्या पतीचे निधन झाले. तर  करंदीकर यांच्याही पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. करंदीकर यांना विनापत्य विधवेबरोबरच लग्न करायचे होते. सुमा यांचे स्थळ त्यांना सुचवल्यानंतर ते सुमा यांच्या मामांकडे येऊन त्यांना भेटले. २८ जानेवारी १९४७ रोजी मामाच्या घरी देवांसमोर सुमा या करंदीकर झाल्या. त्या मुळच्या कुसुम दामले. नंतरच्या ज्योत्स्ना साने आणि विंदा करंदीकर यांच्याशी लग्न झाल्यानंतर सुमा करंदीकर.


प्रसिद्ध व्यक्तींच्या बायकोंनी लिहिलेली आत्मचरित्रे म्हणजे काहीतरी खमंग, सनसनाटी आणि वाद होईल, असा मजकूर असे एक चित्र काही आत्मचरित्रांमधून आपल्याला दिसून य़ेते. मात्र सुमा करंदीकर यांचे रास हे आत्मचरित्र त्याला अपवाद आहे. आयुष्यात जे काही वाट्याला आले ते सहजतेने आणि कोणतीही तक्रार न करता स्वीकारणे, आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे जाणे आणि हे सर्व करतानाही त्याचा कुठेही बडेजाव किंवा मी पणा नाही हे महत्वाचे.


असे हे कंरदीकर, अरेरावी, उर्मट, भांडखोर आणि संतापी पण आतून अतिशय ऊाबडे आणि हळवे. तोंडाला येईल ते फडाफडा बोलून मन दुखावणारे, पण जीव तोडून प्रेम करणारे. वरवर अतिशय कंजुष व काटकसरी, पण प्रसंग आला तर नेसलेलेही सोडून देण्याची तयारी असणारे, असे सुमाताई सांगतात, पण त्याचबरोबर करंदीकर यांच्यासारखा प्रतिभावंत, बुद्धिवान आणि थोर विद्वान असा नवरा मिळाला हे माझे सात जन्माचे भाग्य. मी एक सामान्य बाई. एका जन्मीचे नव्हे तर आपल्या जुन्या धर्मकल्पनेप्रमाणे सात जन्मांचे माझे पूर्वसुकृत. हे सर्व अगदी खऱे. पण करंदीकरांना माझ्यासारखी शांत, समजूतदार (माझ्यामते), त्यांना समजून घेणारी आणि त्यांच्या अरेरावीने नाउमेद न होणारी, विवेकी बायको मिळाली हे करंदीकरांचेही भाग्यच. दुसरी एखादी कर्तगार, हुषार बायको मिळती तर एव्हाना चारदा घटस्फोट झाला असता, असेही त्या स्पष्टपणे सांगून टाकतात.


सुमा करंदीकर यांनीही काही कथा लिहिल्या आहेत. त्यांचा एक कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. लग्न झाल्यानंतरचे दिवस, करंदीकर यांच्या सासरची मंडळीं आणि विंदा यांच्याविषयी सुमाताईंनी सविस्तर लिहिले आहे.   बेळगाव, डोंबिवली, माहीम येथील घरे आणि सध्याचे वांद्रे येथील साहित्य सहवास हे निवासस्थान येथील आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. आपली मुले, नातवंडे आणि आयुष्यात जी जी मंडळी भेटली, त्या सर्वांविषयी त्यांनी लिहिले आहे.


साधी व सोपी भाषा आणि थोडीशी विस्कळीत पण एकेक आठवणींचा पट उलगडून सांगणारी शैली यामुळे हे आत्मकथन वाचनीय झाले आहे.          

14 December 2009

घरातल्या घरात खतनिर्मिती

आपल्या घरात तयार होणाऱया ओल्या आणि सुक्या कचऱयाचे आपण काय करतो. तर तो दररोज घरी येणाऱया कचरेवाल्याला/वालीला तो  देऊन टाकतो. घरातील कचरा बाहेर दिला की आपले काम संपते. आपल्या घरी आपण हौसेने विविध झाडे लावलेली असतात. ही झाडे चांगली वाढावीत, त्यांना भरपूर फुले यावीत असे आपल्याला नेहमी वाटते. त्यासाठी आपण नसर्रीतून महाग रासायनिक खतेही आणतो.  पण आपल्या घरातच तयार होणाऱया ओल्या कचऱयापासून उत्तम प्रकारचे खत तयार करता येते आणि ते करणेही काही अवघड नाही, हे समजले तर प्रत्येकाला घरच्या घऱी असे खत तयार करता येईल.


घरच्या घऱी खत तयार करायला खूप मोठी जागा लागेल, तो कचरा कुजल्यानंतर त्याचा घाण वास येईल, त्यावर माशा, किडे बसतील, असा समज असेल तर तो चुकीचा आहे. कारण घऱच्या घऱी खत तयार करताना अशा प्रकारची कोणतीही दुर्गंधी त्या कचऱयाला किंवा तयार झालेल्या खताला येत नाही. डोंबिवलीत राहणारी माझी चुलत बहीण अनघा जोशी हिने सध्या घरातील ओल्या व सुक्या कचऱयापासून खतनिर्मिती करण्याचा छंद जोपासला आहे. हे खत ती स्वतपुरते तयार करुन थांबली नाही तर तीने त्याचा चांगल्यापैकी प्रचार-प्रसार केला आहे. तिच्या माध्यमातून आज डोंबिवलीतील अनेक जणांनी घरच्याघरी खत तयार करणे सुरु केले आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था, बैठी घरे किंवा चाळी, महिला मंडळे, शाळा आणि महाविद्यालयातून ती घरच्याघरी खतनिर्मितीवर व्याख्याने आणि प्रात्यक्षिक देत आहे. 


आपल्या घरातील कचऱयाचा डबा ठेवायला जेवढी जागा लागते, तेवढीच जागा कचऱयापासून खत तयार करणाऱया बास्केटला किंवा बादलीला लागते. घरी दररोज केल्या जाणाऱया भाज्यांची देठे, पाने,  किडलेली पाने, फळे किंवा भाज्यांची साले, घरातील झाडांच्या कुड्यांमधील वाळलेली पाने, कांदे-बटाटे यांची साले, फळांची टरफले, देवांचे निर्माल्य आदी साहित्यापासून आपल्याला घरच्या घऱी खतनिर्मिती करता येऊ शकते. खत तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली की तीन ते चार महिन्यात उत्तम दर्जाचे आणि त्यात कोणतेही रासायनिक घटक नसलेले खत तयार होते. इतकेच नव्हे तर झाडे लावताना कुंडीमध्ये माती न घालता केवळ हे खत घातले तरी त्यात फळझाडे किंवा फुलझाडे चांगल्या प्रकारे वाढू शकतात.


अनघाने ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंच या पर्यावरणविषयक काम करणाऱया स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थेत काम करताना घऱच्या घऱी खतनिर्मिती कशी करायची हे तंत्र शिकून घेतले. सध्या  किमान शंभर ठिकाणी तिने तयार करुन दिलेल्या कचऱयापासून खतनिर्मितीच्या बास्केट वापरल्या जात आहेत. ही बास्केट रेडिमेडही मिळते किंवा मार्गदर्शन घेऊन आपल्यालाही घरी तयार करता येऊ शकते. याचा सुरुवातीचा खर्च अवघा चारशे रुपये इतका आहे. यात बास्केट, खतनिर्मिती तयार करण्यासाठी लागणारे बायोकल्चर आणि काही अन्य बाबींचा समावेश आहे. एकदा का खत तयार झाले की नवीन बास्केट तयार करताना आपल्याला त्यात बायोकल्चरही टाकावे लागत नाही. तयार झालेले खत त्यात टाकले तरी खत तयार करता येऊ शकते. म्हणजे चारशे रुपये ही एकदाच करायची गुंतवणूक आहे. खतनिर्मितीसाठी उपयोगाता आणली जाणारी बास्केट/बादली तीन ते चार वर्षे चांगल्या प्रकारे टिकू शकते.


अनघाप्रमाणेच महाराष्ट्रात आणि मुंबईतही काही मंडळी ओल्या व सुक्या कचऱयापासून अशा प्रकारची खत निर्मिती करत आहेत. अन्य लोकांना त्याबाबत मार्गदर्शन करत आहेत. खरे म्हणजे आपण प्रत्येकाने आपल्या घरात तयार होणाऱया ओल्या व सुक्या कचऱयापासून अशा प्रकारे खत तयार करण्याचे ठरवले तर कचऱयाची समस्याच निर्माण होणार नाही. राज्यातील बृहन्मुंबई महापालिकेसह अन्य महापालिका आणि नगरपालिका प्रशासनाला दिवसेंदिवस वाढणाऱया कचऱयाची विल्हेवाट कशी लावायची ही मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. प्रत्येकाने आपल्या घरातील कचऱयापासून अशा प्रकारचे खत तयार करण्याचे ठरवले तरीही कचऱयाची विल्हेवाट लावण्याची  समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकेल.


शहरातील मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले, निवासी वसाहती, महापालिका किंवा नगरपालिका क्षेत्रातील एखादा प्रभाग आणि तेथील नागरिकांनी आपल्या येथे तयार होणाऱया ओल्या व सुक्या कचऱयापासून असे खत तयार करण्याचे ठरवले तर आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर राहू शकेल. कचऱयाची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्न निर्माण होणार नाही. भविष्यात या कचऱयापासून केवळ खतनिर्मितीवरच मर्यादित न राहता, त्यापासून वीजनिर्मिती करण्याचाही प्रकल्प हाती घेता येऊ शकेल. सध्याच्या भारनियमनाच्या काळात त्याची नक्कीच आवश्यकता आहे. अर्थात हे सर्व करण्यासाठी राज्य शासन, स्थानिक महापालिका, नगरपालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांनीही यात विशेष रुची दाखवली पाहिजे. नागरिकांना अशा प्रकारचे प्रकल्प उभाऱण्यासाठी सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. किमान आपल्या घरापासून तरी याची सुरुवात झाली पाहिजे.


ओल्या आणि सुक्या कचऱयापासून घरच्या घरी खतनिर्मिती, रेडिमेड बास्केट, बायोकल्चर आणि या संदर्भातील अधिक माहितीसाठी अनघा जोशी यांच्याशी खालील ई मेल आय़डीवर

anagha75@rediffmail.com  किंवा swami1075@gmail.com   तसेच ०९८३३६२१८२२ या भ्रमणध्वनीवरही संपर्क साधता येईल.

लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त (२५ ऑक्टोबर २००९) पुरवणीत अनघाच्या या उपक्रमाविषयीचा लेख प्रकाशित झाला आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=18046:2009-10-24-15-20-20&catid=42:2009-07-15-04-00-30&Itemid=53
  
 
          

13 December 2009

द्वारकेत भागवत सप्ताह...

हिंदू धर्मामध्ये चार वेद आणि अठरा पुराणांना खूप महत्व आहे. जी अठरा पुराण आहेत, त्यात भागवत या पुराणाचा समावेश होतो. भागवत आणि भगवदगीता यांचा काहीही संबंध नाही. भगवदगीता म्हणजे कृष्णाने अर्जूनाला केलेला उपदेश आहे. तर भागवतपुराणाचा मुख्य विषय भक्तीयोग हा आहे. महर्षी व्यास यांनी रचलेल्या या भागवतपुराणात भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी सांगण्यात आले आहे. भागवतपुराणातील कृष्णकथा, कृष्णनिती आणि कृष्णविचारांचा प्रचार होण्यासाठी विविध ठिकाणी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. भागवत पुराण हे बारा भागांमध्ये
पहिल्या भागात विष्णूच्या सर्व अवतारांविषयी माहिती देण्यात आली आहे. भागवतपुराणात एकूण १८ हजार श्लोक आहेत.


वैष्णव पंथीयांसाठी भागवतपुराण हा ग्रंथ महत्वाचा मानण्यात येतो. वेद आणि उपनिषदे यांचे सार या पुराणात सांगण्यात आले आहे. सकाम कर्म, निष्काम कर्म, ज्ञान साधना, सिद्धि साधना, भक्ति, अनुग्रह,  द्वैत-अद्वैत, द्वैताद्वैत, निर्गुण-सगुण  आदींबाबत यात मार्गदर्शन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आणि भारतात विविध ठिकाणी भागवतपुराणाचे कायर्क्रम आयोजित करण्यात येत असतात. त्यालाच भागवत सप्ताह म्हणून ओळखले जाते.


गेल्या काही वर्षांपासून विवेक घळसासी हे नाव मराठी लोकांना वक्ता, प्रवचनकार आणि भागवतपुराण निरुपणकार म्हणून परिचित झाले आहे. घळसासी यांनी काही वर्षे तरुण भारत या दैनिकाचे मुख्य संपादक म्हणूनही काम पाहिले आहे.  डोंबिवलीतील स्मिता केसकर, सुखदा वेलणकर यांनी पुढील वर्षी एप्रिल महिन्यात घळसासी यांच्या भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे हा कार्यक्रम द्वारका येथे होणार आहे. घळसासी यांचा भागवत सप्ताह यापूर्वी नुकताच द्वारका येथे आयोजित करण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे पुढील वर्षी येणाऱया अधिक मासाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.


दर तीन वर्षांनी अधिक महिना येत असतो. या अधिक महिन्यांत विविध व्रतवैकल्ये केली जातात. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन कीर्तन, प्रवचन श्रवण करणे, तीर्थयात्रा करणे आदी केले जाते. पुढील वर्षी १५ ते २१  एप्रिल या कालावधीत द्वारका येथे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ एप्रिल २०१० रोजी मुंबई सेंट्रलहून पोरबंदरकडे प्रयाण करायचे असून सुदामनगरी, किर्तीमंदिर, सोमनाथ, सोमनाथशहर दर्शन केले जाणार आहे. १४ तारखेला संध्याकाळी द्वारकेत आगमन होणार असून १५ तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून भागवत कथा/सप्ताहास सुरुवात होणार आहे. २१ एप्रिल रोजी भागवत सप्ताहाची समाप्ती होणार असून दुसऱया दिवशी दुपारी एक वाजता परतीच्या प्रवासाला निघायचे आहे.


घळसासी यांच्या भागवत सप्ताहात सामाजिक व राजकीय सद्यस्थिती,  त्या परिस्थितीला अनुरुप ठरणारे भगवान श्रीकृष्ण यांचे विचार, कृष्णनिती यांचा उहापोह केला जातो. गेल्या काही वर्षात ठिकठिकाणी घळसासी यांचे भागवत सप्ताहाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मात्र खुद्द द्वारकेमध्ये आयोजित या भागवत सप्ताहाला विशेष असे महत्व आहे.या संदर्भात अधिक माहिती आणि ज्यांना या भागवत सप्ताहासाठी जाण्याची इच्छा आहे, त्यांनी स्मिता केसकर  यांच्याशी ९९२०८५८८१४/०२५१-२४८८९८० किंवा सुखदा वेलणकर यांच्याशी ९९२०६५९३७९/०२५१-२४८०५०३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.             

10 December 2009

ने मजसी ने परत मातृभूमीला...स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या कवितेला आज शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या या कवितेला ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले आणि ही कविता सर्वसामान्यांच्या ओठावर आली. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर आणि स्वत हृदयनाथ या पाच भावंडांनी ही कविता गायली.


ज्येष्ठ संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात ही कविता घेतली असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरच ती चित्रित करण्यात आली आहे. आपल्याला ही कविता/गाणे लता मंगेशकर यांच्या आवाजात परिचित झालेली आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी या कवितेला दिलेली चाल आपल्या स्मरणात आहे. मात्र सुधीर फडके यांनीही त्याला वेगळी पण चांगली चाल लावली आहे.


स्वातंत्र्यवीर विनायक  दामोदर सावरकर यांना क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणून ओळखले जाते. अशा या थोर क्रांतिकारक योध्याची स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण म्हणजे केंद्र शासनाने उपेक्षाच केली. सावरकर हे कट्टर हिंदुत्वनीष्ठ असल्यामुळेच कॉंग्रेसी सरकारने त्यांचे महत्व वाढू दिले नाही. खरे तर सावरकर हे द्रष्टे राजकारणी आणि नेते होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी जे जे सांगितले तिकडे आपण वेळीच लक्ष दिले असते आणि गांधीनिती ऐवजी सावरकरनितीने वागलो असतो तर देशापुढे आज जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत, ते झाले नसते. केंद्रातील कॉंग्रेस शासनाचा सावरकर द्वेष इतका पराकोटीचा होता की आकाशवाणी केंद्रावरुन सावरकर यांनी लिहिलेल्या कविता/गाणी यांच्या ध्वनिमुद्रीका वाजवायलाही बंदी घालण्यात आली होती. मात्र नंतर सावरकर यांची गाणी आकाशवाणीवरुन वाजवायला सुरुवात झाली.


देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सावरकर यांनी जे काही सोसले त्याच्या नखाचीही सर आजच्या राजकारणी नेत्यांना नाही. सुधीर फडके यांनी निर्माण केलेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहताना सावरकर आणि आजच्या राजकारणी नेत्यांची तुलना मनात येते. आजचे भ्रष्टाचारी, स्वार्थी, निर्लज्ज, गेंड्याची कातडी असलेले सर्वपक्षीय राजकारणी नेते आणि त्यांच्या भानगडी वाचल्या की या सर्व मंडळींना सावरकर यांनी ज्या अंदमान कोठडीत मरणयातना भोगल्या तेथे आजच्या राजकारणी नेत्यांनाही शिक्षा म्हणून किमान काही दिवस तरी पाठवावे, असे मनात येते.


सावरकर यांनी लिहिलेल्या ने मजसी ने परत मातृभूमीला या गाण्याच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यानीच लिहिलेली ही कविता आज सर्वांच्या माहितीसाठी देत आहे.


ने मजसी ने परत मातृभूमीला

सागरा प्राण तळमळलाभूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता

मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू

तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले

मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन

विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी

तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला

सागरा, प्राण तळमळला ... ॥१॥शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी

भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती

गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे

जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा

ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे

तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला

सागरा, प्राण तळमळला ...नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा

प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी

तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा

भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे

तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला

सागरा, प्राण तळमळला ...या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा ?

त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्लभूमीते

मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देती

तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे

कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला

सागरा, प्राण तळमळला ...


सनातन प्रभात या दैनिकाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर एक विशेषांक प्रकाशित केला आहे.
त्याची लिंकही खाली देत आहे.

http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/veersavarkar/index.htm


सुधीर फडके यांनी निर्माण केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटातील या गाण्याचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा


http://www.video4viet.com/watchvideo.html?id=8cA4BPFHi7M&title=सागरा%20प्राण%20तळमळला

         

09 December 2009

रुद्राध्याय आता मायबोलीत

श्री रुद्र हे प्रमुख देव असून रुद्राध्यायाचे पठण सर्व वेदांमध्ये प्रचलित हे. भगवान शिव किंवा त्यांच्या अवतार स्वरुपाच्या कोणत्याही पूजेत श्री रुद्र म्हणून अभिषेक केला जातो. रुद्र हे यजुर्वेदातील मंत्र असून वाजसनेयी संहितेतील (अध्याय १६ व १८)  तैत्तरीय संहितेतील (४.५ मधील ११ अनुवाक व ४.७ मधील ११ अनुवाक) यातून ते संकलित केले आहेत. ते सर्व रुद्राध्याय म्हणून प्रसिद्ध आहेत. संस्कृत भाषेत असलेला हा रुद्राध्याय आता मायबोली मराठी भाषेत जिज्ञासू आणि अभ्यासकांसाठी प्रभाकर गोखले यांनी उपलब्ध करुन दिला आहे.गोखले यांनी रुद्राध्यायाचे केवळ मराठी भाषांतर केलेले नाही तर ते संगीतमय पद्यांतर आहे. यात महामृत्यूंजय मंत्र, शिवस्तुती आणि मंत्र पुष्पांजलीचे मराठी भाषांतरही देण्यात आले आहे. वृंदावनी सारंग रागात हे मराठी पद्यांतर बांधण्यात आले आहे. श्री रुद्र हे तीन भागात आहेत.  पहिल्या भागात शांतीपाठ असून दुसऱया भागात श्री रुद्राच्या सर्व स्वरुपाचे वर्णन करण्यात आले आहे. त्यास नमक असे म्हटले जाते. तर तिसऱया भागात मानवाने आपल्यासाठी सर्व सुखाची मागणी केलेली असल्याने त्याला चमक असे म्हणतात. श्री रुद्राचे पठण करत असताना पहिल्यांदा शांतीपाठ, नंतर नमकचे ११ अनुवाक, महामृत्यूंजय मंत्र  आणि  शेवटी चमक ११ अनुवाक आणि शेवटी पुन्हा शांतीपाठ म्हणण्याची पद्धत आहे.


रुद्राध्याय हा संस्कृतमधील असल्याने अनेक जणांना त्याचे पठण करण्याची इच्छा असूनही तो करता येत नाही. त्यासाठीच गोखले यांनी हे मराठी रुपांतर केले आहे. डाव्या पानावर मूळ संस्कृत रुद्राध्यायचे अनुवाक आणि उजवीकडे प्रत्येक अनुवाकचे मराठी रुपांतर देण्यात आले आहे. गोखले यांनी रुद्राध्यायाच्या मराठी रुपांतराबरोबरच श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री श्रीसूक्त, श्री पुरुषसुक्त, श्री रुद्राभिषेक माहात्म्य, श्री महिम्न स्तोत्र, श्री देवी अथर्वशीर्ष, ललिता पंचक, भवान्याष्टक, कनकधारा स्तोत्र,  अन्नपूर्णा स्तोत्र, देवी आराधाना, श्रीमद्भभगवतगीता अध्याय १२ व १५, उपनिषद शांतीपाठ, त्रिसुपर्ण, संकल्प, विष्णूध्यान, गंगालहरी-स्वल्प, सत्यनारायण कथा आदींचेही मराठी रुपांतर केले आहे. विशेष म्हणजे या सर्व स्तोत्रांचे मराठी रुपांतर करताना ती वेगवेगळ्या रागात गाता येतील, अशा प्रकारे त्यांची रचना करण्यात आली आहे.


गोखले यांनी संस्कृत स्तोत्रे मराठीत आणून खूप मोठे काम केले आहे. गोखले हे मुळचे वाराणसीचे. त्यांचे शिक्षण अलाहाबाद येथे झाले. पुढे काशी हिंदू विद्यापीठात त्यांनी स्टेनोग्राफर म्हणून नोकरी केली. तर पुढे अनेक वर्षे विद्यापीठाच्या कुलगुरुंचे सचिव म्हणून काम पाहिले व त्याच पदावरून निवृत्त झाले. अनेक जणांना संस्कृतमधील ही स्तोत्रे म्हणायची असतात, पाठ करायची असतात, पण योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा म्हणायला कठीण गेल्यामुळे ते म्हणणे अर्धवट सोडून देतात. हीच अडचण लक्षात घेऊन गोखले यांनी हे काम केले आहे.


गोखले यांचा संपर्क भ्रमणध्वनी आणि ईमेल आयडी पुढीलप्रमाणे

०९८२४३३८९४३

gokhalepg@yahoo.co.in


 
      

06 December 2009

पहाटवारा

सध्या आपल्याकडेही मस्त थंडी पडायला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी आपल्याकडे अजिबातच थंडी पडली नाही आणि त्याच्या गेल्यावर्षी मुंबई, ठाणे परिसरात वाढत्या थंडीने उच्चांक गाठला होता. मला स्वतला थंडीचा हा ऋतू खूप आवडतो. सगळीकडे आल्हाददायक वातावरण असते. सकाळी  विशेषत पहाटेच्या वेळेस तर खूपच छान वाटते. थंडीच्या दिवसातील हा पहाटवारा प्रत्येकाने तरी अनुभवावा असाच असतो.


खरे तर पावसाळ्याचे दोन-तीन महिने सोडले तर मी पहाटे फिरायला जात नाही. पावसाळा संपला की दरवर्षी ऑक्टोबरपासून  मी पहाटेचे फिरणे सुरु करतो. पावसाळा सुरु होईपर्यंत जून अखेरपर्यंत माझे पहाटेचे फिरणे सुरु असते.  पण यावर्षी मी ऑक्टोबरऐवजी १ डिसेंबरपासून पहाटे फिरायला सुरुवात केली. सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जाण्याचा अनुभव छान असतो. रस्त्यावर फारशी वर्दळ वाहने आणि माणसांचीही नसते. रस्ते जणू काही आपल्यासाठीच आहेत, असे ते मोकळे असतात. या मोकळ्या रस्त्यांवरुन चालायला आणि फिरायला मला खूप आवडते.


थंडी सुरु झाली की त्या ठराविक काळापुरती बाहेर फिरायला जाणारीही मंडळी असतात. मुंबईत फारशी थंडी नसली तरी कानटोपी, मफलर, हात व पायमोजे, शाली, स्वेटर बहुतेक जणांच्या अंगावर दिसायला लागतात. मोकळी मैदाने, समुद्र किनारे, खाडी किनारा, बागा, जॉगिंग पार्क आदी ठिकाणी पहाटे पाच-साडेपाच वाजल्यापासून माणसे दिसायला लागतात. या प्रत्येक व्यक्तीची फिरण्याची, फेऱया मारण्याची किंवा जॉगिंग करण्याची स्वताची अशी खास पद्धत असते. काही जण वॉकमन, एमपी थ्री प्लेअर किंवा मोबाईलवरची गाणी ऐकत फेऱया मारतात. सकाळी फिरायला आलेल्या मंडळींमध्ये लहान मुलांपासून ते आजोबा-आजींपर्यंत सर्व वयोगटातील माणसे असतात. काही ठिकाणी योग वर्ग, हास्यक्लब सुरु असतात. मैदाने, क्लबच्या बाहेर कारले, आवळा आणि अन्य फळे किंवा पालेभाज्यांचे रस विकणारी मंडळी बसलेली असतात.


पहाटेच्या वेळेस किंवा सकाळी वातावरणात झाडे, पाने आणि फुलांचा एक धुंद करणारा सुगंध पसरलेला असतो. सोसायटी, बंगला किंवा मोकळ्या मैदानात असलेल्या अनंत, पारिजातक आणि अन्य काही फुलांचा सुगंध मनाला प्रफुल्लीत आणि उल्हसित करत असतो. दीर्घ श्वास घेऊन ही मोकळी हवा, पहाटवारा आणि सुगंध भरुन घेतला की तो दिवस एकदम मजेत, आनंदात आणि उत्साहातच जातो. सकाळी फिरून आल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. मला वाटते की ही सारी निसर्गाची किमया आहे. प्रत्येक ऋतू बदलताना असे वेगळे वातावरण निसर्ग तयार करत असतो. थंडीनंतर उन्हाळा आणि नंतर पावसाळा सुरु होतो. बदलणारा हा प्रत्येक ऋतू नवा रंग, नवा गंध घेऊन येत असतो.


हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तीनही ऋतूंमध्ये मला हिवाळा खूप आवडतो. माझ्याप्रमाणेच इतरांचेही तसेच मत असेल. अनेक जण थंडी सुरू झाली की पहाटे लवकर उठून फिरायला जाण्याचा मनाशी निश्चय करतात. लवकर उठण्यासाठी गजर लावतात. पण गुलाबी थंडीत गजर झाल्यावर जाऊ दे,  असे म्हणून पुन्हा पांघरुणात गुरफटून झोपी जातात. तो एक क्षण असा असतो की आळस झटकून आपण उठायचे मनाशी एकदा नक्की केले की पहाटेच्या वेळेस बाहेर फिरण्यातला आणि पहाटवारा अंगावर घेण्याचा आनंद काय असतो, ते कळेल. फर्त त्यासाठी मनाची निर्दार पक्का केला पाहिजे.


मग काय उद्यापासून पहाटे लवकर उठून फिरायला सुरुवात करताय ना...         

05 December 2009

आल्बम आठवणींचा...

छायाचित्रण अर्थातच फोटोग्राफी ही एक कला असून त्याचा वापर किंवा उपयोग म्हटले तर स्वताच्या आनंदासाठी आणि पैसे मिळविण्यासाठीही करता येऊ शकतो. प्रसारमाध्यमात किंवा एखादा विषय घेऊन त्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे अनेक छायाचित्रकार आहेत. वृत्तपत्रातील छायाचित्राबाबत असे म्हणतात की एखादी बातमी किंवा अग्रलेख जे शब्दात सांगू शकणार नाही ते  एखादे छायाचित्र सांगू शकते. छायाचित्र हे खूप बोलके असते. त्यामुळे छायाचित्र एखादे जळजळीत वास्तव किंवा सामाजिक प्रश्न जितक्या ताकदीने मांडू शकते तितक्याच ताकदीने व्यक्तीविषयक किंवा अन्य प्रसंग चपखलपणे टिपू शकते. आज हे सांगायचे कारण म्हणजे केवळ छायाचित्र या विषयाला वाहिलेला एक ब्लॉग.


मराठीमध्ये आज विविध विषयांवर लेखन करणारे ब्लॉगर्स तयार झाले आहेत. ते नियिमतपणे ब्लॉगवर लेखन करत असतात. विलास आंबेकर यांनी मात्र आपल्या अभिव्यक्तीसाठी लेखनाऐवजी छायाचित्रांचे माध्यम निवडले आणि  त्यांनी फक्त छायाचित्रे असलेला आपला ब्लॉग सुरु केला. आंबेकर हे एअर इंडियामध्ये इंजिनीअरिंग डिपार्टमेंटला व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. नोकरी सांभाळून त्यांनी आपला छायाचित्रणकलेचा छंद जोपासला आहे. हजारो विविध छायाचित्रे आज त्यांच्या संग्रहात आहेत. आपल्याकडे असलेल्या या छायाचित्रांचा खजिना त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून सर्वांसाठी खुला केला आहे. एक्स्प्रेस डॉट ए मायनस थ्री डॉट कॉम या संकेतस्थळावर त्यांनी आपला ब्लॉग सुरु केला. जागतिक पातळीवर कोणीही या संकेतस्थळावर आपण काढलेली छायाचित्रे अपलोड करु शकतो. याहू किंवा गुगलप्रमाणे या संकेतस्थळाने जागा उपलब्ध करुन दिली आहे.  हे संकेतस्थळ केवळ छायाचित्रांसाठीचे असून अन्य ब्लॉगप्रमाणे येथे कोणालाही छायाचित्रांसाठीचा आपला ब्लॉग सुरु करता येऊ शकतो.


१९७७ मध्ये आंबेकर एअर इंडियात एअरक्राफ्ट टेक्निशियन म्हणून नोकरीला लागले. एअर इंडियात नोकरीला लागल्यानंतरच त्यांच्या छायाचित्रण कलेला व छंदाला चांगला वाव मिळाला. एअर इंडियात असल्यामुळे परदेशातही त्यांना जाता आले. तेथेही त्यांनी भरपूर छायाचित्रे काढली. आंबेकर यांना मूळात हायकिंग व ट्रेकिंगची आवड होती. या आवडीच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि भारतात विविध ठिकाणी त्यांचे जाणे झाले होतेच. या सर्व ठिकाणीही त्यांनी निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेला खजिना आपल्या कॅमेरात बंदिस्त केला. हायकिंग व ट्रेकिंगनंतर त्यांना बायकिंगही  केले. मित्रांसमवेत मोटारबाईकवरुन त्यांनी मुंबई ते मध्यप्रदेश, ओरिसा, राजस्थान, उत्तरपूर्व भारत पालथा घातला. नुकताच त्यांनी कुटुंबीयांसमवेत लेह-लडाखचाही दौरा केला. या सर्व प्रवासात त्यांना खूप चांगली छायाचित्रे मिळाली. मित्र, परिचित, नातेवाईक यांच्याकडून त्यांच्या छायाचित्रांचेही कौतुक झाले. तुमच्याकडे असलेली ही सर्व छायाचित्रे लोकांना पाहण्यासाठी काहीतरी करा, अशी सूचना त्यांना अनेकांनी केली आणि त्यातूनच आंबेकर यांचा हा ब्लॉग तयार झाला आहे. आंबेकर यांच्याकडे सध्या डीएसएलआर ४०० डी हा कॅनन कंपनीचा कॅमेरा आहे. त्यांच्याकडे असलेली हजारो छायाचित्रे त्यांनी कॉम्प्युटरवर टाकली असून काही फोटोंच्या सीडीही तयार केल्या आहेत. २६ जुलै २००५ ला मुंबईत आलेल्या अस्मानी संकटात त्यांच्या घरातही पाणी गेले आणि त्यात त्यांच्याकडील छायाचित्रांचा संग्रह, अनेक फोटो शब्दश पाण्यात गेला. 


ऑक्टोबर महिन्यात आंबेकर यांनी ब्लॉग सुरु केला असून त्यावर दररोज एक नवीन छायाचित्र ब्लॉगला भेट देणाऱयांना पाहायला मिळते. निसर्ग, पर्यावरण, फुले, वाहतूक अशा विविध गटातील छायाचित्रे आंबेकर यांच्या ब्लॉगवर पाहायला मिळतात. छायाचित्राबाबतची थोडक्यात माहितीही ते कधी देतात. प्रत्येक फोटो काढताना आपण नेहमीच काहीतरी वेगळे टिपण्याचा प्रयत्न करतो.  सुर्योदय किंवा  सूर्यास्ताचे फोटो सगळेच काढतात पण त्यातही काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर फोटो अधिक चांगला होऊ शकतो. आंबेकर हे नुकतेच दिवेआगर, हरिहरेश्वर येथे गेले होते. समुद्रात मासेमारी करणाऱया कोळ्यांनी लावलेल्या जाळीला एका ठिकाणी काठी होती. त्यांनी ती काठी आणि सूर्य यांचा एकत्र आणले त्यामुळे काठीवर दिवा लावावा, असा सूर्य त्यांना टिपता आला. काही वर्षांपूर्वी ते माथेरान येथे गेले होते. तेथे पहाटेच्या वेळेस त्यांना आकाशात एकाच दिशेला चंद्र आणि सूर्य टिपता आले. कोणतेही छायाचित्र काढण्यासाठी आपल्याकडे संयम असला पाहिजे. तरच ते छायाचित्र उत्कृष्ट निघू शकते. तसेच हातात कॅमेरा आहे म्हणून वाटेल तसे फोटो न काढता त्यात वेगळेपण कसे येईल, ते पाहावे, व्यक्तींचे फोटो काढताना ते पोझ देऊन काढण्यापेक्षा त्यांच्या सहज आविर्भावात काढले तर जास्त चांगले येतात, असे आंबेकर यांचे म्हणणे आहे. आंबेकर यांनी छायाचित्रण कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले नाही. हौस आणि छंदातून व  नवनवीन अनुभव घेत, कधी चुका करत, त्यातून शिकत  आपली छायाचित्रण कला समृद्ध केली आहे.    

आंबेकर यांच्या फोटोंच्या ब्लॉगची लींक अशी

http://ekspressions.aminus3.com/

आंबेकर यांच्याशी संपर्कासाठी त्यांचा ई-मेल असा

spmangomaker@yahoo.com


     

    

04 December 2009

पाणीसंकट

यंदाच्या वर्षी कमी पडलेला पाऊस आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावातील कमी होत चाललेला पाणीसाठा यामुळे मुंबईत पाणीप्रश्न येत्या काही दिवसात गंभीर होत जाणार आहे. याची प्रचिती स्वाभीमान संघटनेने काल महापालिका मुख्यालयावर काढलेल्या मोर्चाने आली. पुढील वर्षीच्या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सध्या आहे तो पाणीसाठा पुरेल, असा दावा प्रशासन करत असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने मुंबईत १५ टक्के पाणीकपात सुरु केली आहे. मात्र कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अजिबातच पाणी न येणे, पाण्याचे असमान वितरण यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत जाणार आहे. भविष्यात कदाचित पाण्याच्या प्रश्नावरुन नागरिकच एकमेकांची डोकीही फोडू शकतील.


हा प्रश्न केवळ मुंबई शहर आणि उपनगरापुरता मर्यादित नाही. उद्या याचे लोण मुंबई परिसरातील ठाणे, कल्याण किंवा राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रातही पसरु शकते. मुळात वाढते प्रदूषण, ढासळते पर्यावरण, उघडे-बोडके केलेले डोंगर, अमर्याद केलेली वृक्षतोड, बदलती जीवनशैली, नदी, नाले, विहीरी आणि समुद्रही बुजवून केलेली बांधकामे, जमिनीत पाणी मुरण्यासाठी इंचभरही शिल्लक न ठेवलेली जागा या आणि अशा काही कारणांमुळे अगोदरच पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पडणाऱया पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जितक्या मोठ्या प्रमाणात योजना हाती घेणे आवश्यक होते, तितक्या प्रमाणात त्या न राबवल्यामुळे हजारो नव्हे लाखो लिटर्स पाणी वाया जात आहे. धरणे किंवा तलाव भरले की पाणी सोडून देऊन वाया घालवावे लागत आहे. हे पाणी साठविण्याचे काही प्रयत्न नक्की होत आहेत, मात्र ते तोकडे पडत आहेत.


पाण्याचे नवीन स्त्रोतही आपण निर्माण करु शकलो नाहीत. त्यामुळे इंग्रजांच्या काळापासून ज्या तलावातून मुंबईला पाणीपुरवठा होत आहे, त्यातील पाणी आजही आपण वापरत आहोत. नवीन धरणे आपण बांधलीच नाहीत असे नाही. पण निसर्गाची वाट आपण माणसांनी जितक्या प्रमाणात लावली त्या तुलनेत नवीन पर्याय निर्माण झाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. बृहन्मुंबई महापालिका दररोज सुमारे साडेतीन हजार दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा करते. मात्र त्यातील ६०० ते ७०० दशलक्ष लीटर्स पाणी हे गळती किंवा चोरीच्या माध्यमातून वाया जात आहे. राज्यातील एखाद्या छोट्याश्या गावाची तहान हे पाणी भागवू शकते.


पाणीचोरी, अनधिकृत पाणीजोडण्या ही सुद्धा मुख्य समस्या आहे. महापालिकेचे अधिकारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, झोपडपट्टी दादा, पोलीस आणि शासकीय अधिकारी यांच्या अर्थपूर्ण व्यवहारातून अनेक ठिकाणी  अनधिकृत नळजोडण्या दिल्या जातात. फक्त मुंबईतच नव्हे तर राज्यातील कोणत्याही महापालिकेत किंवा नगरपालिका, ग्रामपंचायत येथेही तीच परिस्थिती आहे. राजकारणी मंडळींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्यामुळे पाणीप्रश्न किंवा समस्येवर सभागृहात आरडाओरड करणे, मोर्चे काढणे, आंदोलने व उपोषण करणे, अधिकाऱयांना घेराव घालणे असा देखावा केला जातो. मात्र या सर्वाच्या मूळाशी जाऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी अपवाद वगळता कोणीही राजकीय पक्ष पुढाकार घेत नाहीत. आपल्याकडे सर्वच राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना प्रत्येक प्रश्नाचे भांडवल करण्याची आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी राजकारण करण्याची सवय झाली आहे. त्यातून तात्कालिक फायदा होत असेलही पण प्रश्न सुटण्यास त्यामुळे काहीच मदत होत नाही.


जगातील तिसरे महायुद्ध हे पिण्याच्या पाणी प्रश्नावरुन होणार असे म्हटले जाते. मुंबईत काल घडलेला प्रकार पाहता तो दिवस दूर नाही, असे म्हणावे लागेल. राज्यकर्ते आणि विरोधीपक्ष यांनीही पुढील पन्नास ते साठ वर्षांचा विचार करुन नवीन योजना राबवणे, नवे प्रकल्प उभे करणे गरजेचे असते. बृहन्मुंबई किंवा राज्यातील अन्य भागात काही प्रयत्न झालेही. मात्र वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी आणि असलेला पाणीसाठा यांचे गणित काही जुळत नाही. पाणी या विषयावर कोणतेही राजकारण न करता सर्वपक्षीय नेते, स्वयंसेवी संस्था आणि मुख्य म्हणजे नागरिकांनीही गंभीर विचार केला पाहिजे. पाणी साठवा आणि पाणी वाचवा ही नुसती घोषणा न राहता ती प्रत्येकाने कृतीत उतरवली पाहिजे.                  

03 December 2009

पंचाहत्तर लाखांचे पुस्तक

सचिन तेंडुलकर.  तमाम मराठी माणसांसाठी असलेले अभिमानाचे आणि गौरवाचे नाव. सचिनने मोठ्या मेहनतीने  आज स्वताचे आणि महाराष्ट्राचेही नाव मोठे केले आहे. सचिन नावाभोवतीच एक वलय निर्माण झाले आहे. सचिन हे एक चलनी नाणे झाले असून गोष्टीतील मिडास राजाप्रमाणे सचिन तेंडुलकर ही मुद्रा ज्या ज्या वस्तू किंवा उत्पादन कंपनीवर उमटली की सोन्यापेक्षाही जास्त किंमत आणि महत्व त्याला प्राप्त होते. आजच बहुतेक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या सचिनबाबतच्या बातम्या वाचल्या तर मी काय म्हणतो ते लक्षात येईल. आता सचिन तेंडुलकर या विषयावर लवकरच  एक पुस्तक प्रकाशित होणार असून त्याची किंमत ७५ लाख रुपये असणार आहे.


आजवर प्रकाशित झालेल्या पुस्तकांमध्ये हे पुस्तक केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील सर्वात महागडे पुस्तक ठरणार आहे. या पुस्तकाचे वजनच ३० किलो राहणार असून पुस्तकाच्या पानांची संख्या ८०० असेल. भारतात किंवा जगभरातही आत्तापर्यंत अनेक  क्रिकेटपटूंवर मराठीसह इंग्रजी आणि अन्य भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मात्र सचिनला जे भाग्य लाभले आहे ते आजवर कोणत्याच क्रिकेटपटूला मिळाले नाही. सचिनने या बाबतीतही सर्व विक्रम मोडून स्वताचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. क्रिकेटमध्ये सचिनने केलेले  धावांचे विक्रम भविष्यात मोडलेही जातील पण या विक्रमी किंमतीच्या पुस्तकाचा विक्रम न भुतो न भविष्यती असाच राहण्याची शक्यता आहे, असे वाटते.


तेंडुलकर ओपस असे या पुस्तकाचे नाव असून लंडन येथील क्रॅकन ओपस या प्रकाशन संस्थेतर्फे ते प्रकाशित केले जाणार आहे. सचिनविषयी सर्व काही असे या पुस्तकाचे स्वरुप राहणार असून सचिनची आजवर कुठेही प्रकाशित न झालेली दुर्मिळ छायाचित्रेही यात असतील, असा दावा प्रकाशकांकडून करण्यात आला आहे. या पुस्तकाची खरेदी करणाऱया पहिल्या दहा ग्राहकांना पुस्तकाबरोबर सचिनच्या रक्ताचा थेंबही मिळणार असल्याचे या बातम्यांमध्ये म्हटले  आहे. जाहिरातदार कंपन्यांकडूनही आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी सचिनलाच अग्रक्रम दिला जातो. त्यासाठी सचिनला कोट्यवधी रुपयांचे मानधनही देण्याची त्यांची तयारी असते. आता वस्तू आणि  अन्य उत्पादनांबरोबरच सचिनने पुस्तकांचे क्षेत्रही काबीज केले आहे. पुस्तक खरेदी, विक्री आणि प्रकाशन क्षेत्रातही सचिन तेंडुलकर हा मोहोर उमटवली आहे. सर्वसामान्य माणूस आणि सचिनप्रेमी चाहते तर हे पुस्तक विकत घेऊन वाचू शकणार नाहीत. भारतातील बडे उद्योगपती, राजकारणीच हे पुस्तक विकत घेऊ शकतील. त्यांना केवळ प्रसारमाध्यमातून या पुस्तकाविषयी आलेल्या बातम्या वाचूनच समाधान मानावे लागणार आहे.


     

02 December 2009

विजय नव्हे तर अप्रत्यक्ष पराजय

बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शिवसनेच्या श्रद्धा जाधव निवडून आल्या म्हणून शिवसेनेत जल्लोष केला जात आहे. शिवसेनेचे कार्यकारी अध्य़क्ष तर थेट सहकुटुंब महापालिका मुख्यालयात आले. नुसत येऊन थांबले नाहीत तर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी चक्क बोलले. हा निष्ठावान शिवसैनिक व नगरसेवकांचा विजय असून शिवसेना आणि मुंबईवरील प्रेमाला तडा गेलेला नसल्याचे यातून दिसून येत असल्याची प्रतिक्रियाही ठाकरे यांनी दिली. विजय हा विजय असतो, असेही त्यांनी सांगितले. अगदी मान्य. पण हे यश खरोखरच निर्भेळ आहे का, याचा मनाशी प्रामाणिकपणे विचार करा. असे कळेल की या यशात कार्यकारी अध्यक्ष म्हणून आपला काहीही वाटा नाही. हा विजय नव्हे तर अप्रत्यक्ष पराजयच आहे.


समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी निवडणुकीच्या आदल्या दिवशी आम्ही तटस्थ राहणार असे जाहीर केले आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी सुटकेचा निश्वास टाकला. जर सपाने हे जाहीरच केले नसते तर शिवसेना शेवटपर्यंत गॅसवर राहीली असती. मनसेचे नगरसेवक सभागृहातच उपिस्थत राहिले नाहीत. आणि शिवसेनेतील ज्या दोन नगरसेविका हरवल्या होत्या त्या शिवसेनेच्या मदतीला आल्या. नशीब शिवसेनेतील अन्य नाराज नगरसेवक फुटले नाहीत. तसेच अखिल भारतीय सेनेच्या दोन नगरसविकाही शिवसनेच्या बाजूने राहिल्या. या सगळ्यामुळे कॉंग्रेसने केलेला चमत्काराचा बार अखेर फुसका ठरला.


बृहन्मुंबई महापालिकेच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेने सात जागा जिंकून भविष्यातील आपल्या वाटचालीची चुणुक दाखवली होती. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षात गेल्या काही वर्षांपासून तीव्र नाराजी आहे. उमेदवार निवड करण्यात अर्थपूर्ण व्यवहार केले जात असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे हे सर्वसामान्य शिवसैनिक, निष्ठावान पदाधिकारी आणि  अगदी शिवसेना नेत्यानाही त्यांच्यापर्यंत पोहोचणे अवघड जाते, त्यांच्या भोवताली असलेल्या चौकडीकडून जे निर्णय घेतले जातात, त्याला उद्धव केवळ मम म्हणतात, निष्ठावान शिवसैनिक, कार्यकर्ते यांची नेहमीच उपेक्षा केली जाते, असे शिवसेनेत सर्रास बोलले जाते. या सगळ्या गोष्टी एका रात्रीत घडून येत नाहीत. त्या आजवर साचत साचत गेल्या आहेत. त्यातूनच आपले महत्व वाढावे म्हणून पक्षातील अन्य नेत्यांचे पंख कापण्याचे धोरण उद्धव यांच्या सल्लागारांनी त्यांना दिल्यामुळे नारायण राणे, राज ठाकरे या सारखे मासलिडर पक्षातून अखेर बाहेर पडले. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेला मनसेच्या वाढत्या प्रभावाचा फटका बसला. शिवसेनेची उधोगती सुरु झाली. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेतील विजय हा खरे तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हवा होता.


राज ठाकरे यांनी भविष्याचा तसेच महापालिकेच्या दोन वर्षात होणाऱया सार्वत्रिक निवडणुकीचा विचार करुन कॉंग्रेसला मदत न करण्याचा योग्य निर्णय घेतला. ते जर कॉंग्रेसबरोबर गेले असते तर मतदारांच्या मनातील मनसेविषयीची सहानुभुती कदाचित कमी झाली असती. लोकांची नस उच्च पदावरील नेत्यांना ओळखता यायला हवी आणि थेट लोकांशी,  सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधायला हवा. संवाद नसला की मनामध्ये कटुता येते आणि त्याचा परिणाम पक्ष संघटनेवर होतो. कदाचित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी नगरसेवकांना केलेल्या मार्गदर्शनामुळेही शिवसेनेतील नाराज नगरसेवकांनी जाऊ दे, महापौर निवडणुकीत तरी आपली नाराजी बाजूला ठेवु या, असा व विचार केला असण्याची शक्यता आहे.


विधान परिषदेच्या दोन जागांसाठी बृहन्मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना मतदान करायचे आहे. -तसेच दोन-सव्वादोन वर्षांनी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेसाठी गुप्त मतदान असल्याने त्यावेळी शिवसेनेतील नाराजी बाहेर पडू शकते. किंवा महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून काही नाराज शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार शिवसेनेतून बाहेर पडू शकतात. ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे काही निष्ठावान नगरसेवक नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे हे दोन दिवस गायब झाले होते आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलून त्यांनी आपले मौन सौडले होते. पुन्हा मराठी माणसांनीच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, असे सांगून तमाम मराठी माणसांचा अपमान केला होता.


खरे सांगायचे तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सल्लागारांनी केलेली प्रत्येक खेळी चुकत गेली. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या श्रद्धा जाधव निवडून येणे यात उद्धव ठाकरे यांचे काहीही कर्तृत्व नाही. बाय लक त्यांना ते यश मिळाले आहे. आपल्या स्वताच्या ताकदीवर शिवसेनेतील नाराजी दूर करता येत नाही म्हणून शिवसेनाप्रमुखांना मैदानात उतरवून त्यांनी आपली लंगडी बाजू सावरली आहे. आताही शिवसेनाप्रमुख दर पंधरा दिवसांनी शिवसेनाभवनात कार्यकर्ते, पदाधिकारी यांना भेटतील, असे जाहीर केले आहे. म्हणजे आपल्या चेहऱयाऐवजी ते पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांचाच चेहरा पुढे णात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईवरच त्यांचे नेतृत्व पुढे येत आहे. राज ठाकरे यांनी आपल्या स्वताच्या ताकदीवर आणि हिंमतीवर तीन वर्षात सर्वसामान्य मराठी मनावर अधिराज्य निर्माण केले आहे. आपल्या पक्षाची ताकद दाखवून दिली आहे.


तेव्हा महापौर निवडणुकीतील विजयाच्या आनंदात मश्गुल न राहता उद्घव यांनी जमिनीवर उतरून आत्मपरीक्षण करावे. तसे केले तर हा विजय नसून अप्रत्यक्ष पराजयच असल्याचे त्यांच्या लक्षात येईल.          

01 December 2009

हात उंचावून मतदान

बृहन्मुंबई महापालिकेसह राज्यातील अन्य काही महापालिकांच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक होत आहे. या सर्व महापालिकांमध्ये हे मतदान हात उंचावून आणि आवाजी पद्धतीने होणार आहे. या महापालिकांमध्ये अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूकही गुप्त मतदान पद्धतीने न होता हात उंचावून पद्धतीनेच झाली होती. त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी गुप्त मतदान पद्धतीत बदल करुन ही नवी पद्धत आणण्याचा अध्यादेश जारी केला होता. महापौर-उपमहापौर निवडणुकीसह विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी तसेच या समित्यांवरील सदस्यांची निवडही हात उंचावून  पद्धतीने करण्यात आली होती. निवडणुकीतील घोडेबाजार आणि अर्थपूर्ण व्यवहार टाळण्यासाठी देशमुख यांनी एक चांगला पायंडा सुरु केला आहे.


कोणतीही निवडणूक म्हटली की त्यात कोटीच्या कोटी उड्डाणे होत असतात. त्यामुळेच नगरसेवक ते खासदार पदापर्यंतची निवडणूक लढणे हे सर्वसामान्यांसाठी  अत्यंत कठीण जाते. जो पैसेवाला आणि पैसे खर्च करु शकणारा आहे, तोच यात बाजी मारतो हा समज त्याममुळेच अधिक दृढ झाला आहे. या निवडणुकींप्रमाणेच नंतर होणाऱया विविध निवडणुकांमध्येही घोडेबाजार हा ठरलेला असायचा. गुप्त मतदान असल्याने आपले मत फुटले तरी ते कोणाला कळण्याची भीती नसल्याने ही फोडाफोडी सहज के्ली जायची. त्यासाठी लाखो, कोट्यवधी रुपयांची उधळण होत असे. किंवा कोणाला काही वेगळी आमीषेही दाखवली जात असत. मात्र गुप्त मतदानाऐवजी हात उंचावून मतदान करण्याची पद्धत सुरु केल्यामुळे या घोडेबाजाराला नाही म्हटले तरी आळा बसला आहे. कारण उघडपणे मतदान होत असल्याने शक्यतो पक्षाचा आदेश झुगारुन व पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान करण्यास आता कोणीही सहजासहजी तयार होणार नाही. असे केले तर त्याचा थेट परिणाम म्हणजे पक्षविरोधी मतदान केल्यामुळे तो नगरसेवक म्हणून अपात्र ठरू शकतो.


महापौर-उपमहापौर किंवा विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी  प्रत्येक नगरसेवक माझे मत मी अमूक उमेदवाराला देत आहे, असे उभे राहून जाहीर करतो. याची नोंद तसेच चित्रिकरण पालिका प्रशासनाकडून करण्यात येत असते. तसेच त्यानंतर प्रत्यक्ष मतदान घेताना अमूक एका उमेदवाराला कोणाचे मत आहे, अशी विचारणा केल्यानंतर त्याला मत देणाऱयांनी आपला हात उंच करुन मत नोंदवायचे असते. त्याचीही नोंद ठेवली जाते. या पद्धतीमुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आली. अत्यंत चांगला अशी पद्धत विलासराव देशमुख यांनी सुरु केली. तसेच दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली तर पूर्वीच्या पद्धतीनुसार कास्टींग व्होटचा अधिकार महापौरांना असायचा. ते आपले मत ज्याच्या पारड्यात टाकतील त्या उमेदवाराला विजयी घोषीत केले जायचे. त्यातही बदल करण्यात येऊन समसमान मते पडली तर चक्क दोन्ही उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी टाकून उमेदवाराला विजयी करण्याची नवी पद्धतही अंमलात आणली गेली.


महापौर-उपमहापौर निवडणूक पद्धतीत ज्या प्रमाणे हात उंचावून मतदान करण्याची पद्धत आणली गेली तशीच ती विधानपरिषदेवरील आमदारांची निवड करण्यासाठीही लागू केली जावी. म्हणजे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही जो घोडेबाजार चालतो, त्यालाही आळा बसू शकेल.  विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत निर्णय घेऊन एक नवा पायंडा सुरु करावा आणि विधानपरिषद निवडणुकीतील घोडेबाजारालाही लगाम घालावा.