31 May 2010

फुलपाखरांचे उद्यान

अमरावतीपासून सात किलोमीटर अंतरावर अमरावती - मार्डी मार्गावर हे फुलपाखरु उद्यान तयार करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या महान्यूज या संकेतस्थळावरील फर्स्ट पर्सन या सदरात याविषयी माहिती देण्यात आली आहे. अनिल गडेकर यांनी हा लेख लिहिला आहे. आज महान्यूजच्या सौजन्याने त्याविषयी... 

विविध जातीची मनमोहक रंगातील फुलपाखरे स्वच्छंद विहार करीत आहेत हे दृश्य वाढत्या शहरीकरणामुळे दिसेनासे झाले आहे. या शहरीकरणाचा परिणाम म्हणजे निसगाचे पशुपक्ष्यांचे धोक्यात आलले आरोग्य आहे. ही बाब हेरून सामाजिक वनीकरण विभागाने मासोद येथे निसर्ग शिक्षण वनउद्यान केद्रात फुलपाखरू उद्यान साकारले आहे. या उद्यानाला भेट देण्याचे अनेक दिवसांपासून मनात होते पण संधी मिळत नव्हती. त्यादिवशी अगदी निश्चय केला त्यामुळेच निर्सगाच्या या अमुल्य किमयागारीची ओळख झाली.


या फुलपाखरू उद्यानात कॉमन लेपर्ड, लाईम बटरफ्लाय, टानी कोस्टर, बॅरीनेट, डॅनाईड, एगफ्लाय कॉमन सेलर, कॉमन जेईबल, पी. डब्लू, कॉमन रोझ, ब्ल्यू पॅन्सी, स्ट्राईप्ड टायगर, कॉमन इंडियन क्रो, कॉमन इव्हिनिंग ब्राऊन, कॉमन ग्रास, यलो लेमन पॅन्सी, क्रिमसन टिप या जातीची फुलपाखरे आढळतात. या उद्यानाची विशेषत: म्हणजे कारगील युध्दात शहीद झालेल्या विरांची स्मृती जपण्यासाठी कारगील स्मृतीवन साकारण्यात आले आहे.

१८ हेक्टर परिसरात निसर्ग शिक्षण व वनउद्यान केद्र साकारण्यात आले आहे. टेकडीच्या विस्तिर्ण परिसर आणि निसर्गाच्या मनमोहक छटा अशा वातावरणात येथे फुलपाखरू उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानात फुलपाखरांच्या १८ जातीची नोंद आतापर्यत करण्यात आली आहे.

उद्यानात फुलपाखरांसाठी अनुकूल असणारी फुले व झाडे या उद्यानात लावली आहेत. उद्यानात फुलपाखरांसाठी छोटा विभागच सज्ज करण्यात आला आहे. फुलपाखरांच्या संरक्षणासाठी खास जाळी लावण्यात आली आहे.

फुलपाखराच्याच आकाराच्या या उद्यानात लावण्यात आलेली विविध फळझाडे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीत. या उद्यानाला माजी राज्यपाल एस. सी. जमीर, केरळचे राज्यपाल रा.सू. गवई यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या. आणि येथे वृक्षारोपण केले. फुलपाखरू उद्यानाकडे ये-जा करण्यासाठी निसर्ग रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लक्ष वेधून घेणारी फुलझाडे लावण्यात आली आहे. फुलपाखरांसाठी हे उद्यान पर्वणी ठरत आहेत.

पर्यावरण संवर्धनासाठी विविध जातीची रोपे या उद्यानात तयार करून माफक दरात ते नर्सरी व सामाजिक संस्थांना पुरविले जाते.

मासोद येथील स्मृती उद्यान अमरावतीपासून सात किलोमीटर अंतरावर अमरावती - मार्डी मार्गावर आहे. या उद्यानात निसर्ग निर्वाचन केद्र तसार करण्यात आले असून प्रशिक्षण भवन देखील आहे. येत्या काही महिन्यात वसतिगृह बांधून सनसेट टॉवर निर्माण केला जाणार आहे. उद्यानात असलेल्या विविध पक्षी व फुलझाडांची माहिती देण्यासाठी माहिती फलक लावण्यात आले आहे.

विविध वनांची निर्मीती करण्यावर सामाजिक वनिकरणावर भर असून विविध प्रजातीचे प्लॉट तयार करण्यात आले आहे. पर्यटकांना विविध फळझाडे, फुलपाखरे व पक्ष्यांची माहिती मिळावी याकरीता या उद्यानाची उभाणी करण्यात आली आहे. मात्र वर्षभर विविधरंगी फुलपाखरांचा संचार अनुभवाचा आस्वाद पर्यटकांनी अद्याप लुटलेला नाही. पावसाळा सुरू होताच मासोदच्या स्मृती उद्यानात हिरवळीचा बहर येणार आहे. मात्र उद्यानातील फुलपाखरांना पर्यटकांची प्रतीक्षा आहे.

(महाराष्ट्र राज्य शासनाच्या महान्यूज या संकेतस्थळावरील फर्स्ट पर्सन या सदरावरून  साभार)

30 May 2010

असा मत्त पाऊस यावा

वाट पाहणे, प्रतिक्षा करणे, आस लागणे, डोळे लावून बसणे, हुरहूर लागणे या मराठीतील शब्दप्रयोगाचा अनुभव यापूर्वी आपण प्रत्येकाने वेगवेगळ्या परिस्थितीत घेतला असेलच. प्रियकराची वाट पाहणारी प्रेयसी, अनेक महिने घराबाहेर राहिलेला मुलगा घरी येणार असेल तर वाट पाहणारी आई, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने पती दौऱ्यावर गेला असेल तर वाट पाहणारी पत्नी, दहावी-बारावी किंवा तत्सम महत्त्वाच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी.. ही यादी आणखीही बरीच वाढवता येईल. सध्या सर्वजण पाऊस कधी येईल, त्याकडे डोळे लावून बसले आहेत. पण प्रत्यक्षात ‘घनघनमाला नभी दाटल्या परी कोसळती न धारा’ असा अनुभव सगळेजण घेत आहेत.


माणसाचे मन खरोखरच अनाकलनीय असते. त्याला त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येत असतो. म्हणजे बघा ना, आत्ता अंगाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे कधी एकदा पाऊस येतो आहे, असे वाटत असले तरी एकदा का पावसाळा सुरू झाला की तो नकोसा होतो. कवयित्री इंदिरा संत यांनी त्यांच्या एका कवितेत सर्वसामान्यांच्या या मनोवस्थेचे

नको नको रे पावसा


असा धिंगाणा अवेळी


घर माझे चंद्रमौळी


अन दारात सायली

असे यथार्थ वर्णन केले आहे.

गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने आता धरणातील पाणीसाठाही संपत चालला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी पाऊस वेळेवर आला नाही तर लोकांच्या तोंडचे पाणी पळणार आहे.

भारतासारख्या शेतीप्रधान देशात तर पावसाचे महत्त्व सगळ्यात जास्त आहे. शेतकरी अर्थात बळीराजाही या दिवसात आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे.

ये रे ये रे पावसा


तुला देतो पैसा


पैसा झाला खोटा


पाऊस आला मोठा

हे आपल्याकडील पावसाची प्रतिक्षा करायला लावणारे पारंपरिक गाणे. गेली अनेक वर्षे लहान मुले याच गाण्याने पावसाची आळवणी करत आहेत.

दिवंगत ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांनीही

येरे येरे पावसा


तुला देतो पैसा


पैशाचा घे खाऊ


दूर नको जाऊ

अशा शब्दांत त्याला आवाहन केले आहे.

तर ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी

सांग सांग भोलानाथ


पाऊस पडेल काय


शाळेभोवती तळे साचून


सुट्टी मिळेल काय

अशा शब्दांत लहान मुलांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते साहित्यिक, कवी आणि नाटककार वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनीही ‘मेघास’ या आपल्या कवितेत,

थांब थांब परतु नको रे घना कृपाळा


अजुनी जाळतोच जगा तीव्र उन्हाळा


अजुनी पायी भासतात पसरलेले निखारे


उसळतात अजुनी गगनी पेटलेले वारे


मरूनी पडतात तरूवरूनी पाखरे

असे म्हटले आहे.

या कवितेच्या शेवटी पावसाला आवाहन करताना ते म्हणतात,

गर्जत ये, ओढित ये, आसूड तडीतेचा


गवरेन्मत्त माथा तो नमव भास्कराचा


लोकाग्रणी नमवी जरा मातल्या नृपाळा

‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो त्या ‘गदिमा’ यांनी ‘आज कुणीतरी यावे’ या गीतात प्रेयसी प्रियकराची कशी आतुरतेने वाट पाहत आहे, त्याचे वर्णन केले आहे. त्या गाण्यातील एका कडव्यात

जशी अचानक या धरणीवर


गर्जत यावी वळवाची सर


तसे तयाने यावे


आज कुणीतरी यावे

असे म्हटले आहे. हे वर्णन पावसाकडे डोळे लावून बसलेल्या सर्वसामान्य माणसांबरोबरच शेतक ऱ्यालाही तंतोतंत लागू पडते. गदिमांनीच लिहिलेल्या एका धनगरी गीतात त्यांनी पाऊस येऊ दे अशी विनवणी केली आहे. ते म्हणतात,

आसुसली माती


पिकवाया मोती


आभाळाच्या हत्ती


आता पाऊस पाड गा


पाऊस पाड..

मराठवाडय़ातील प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर यांनीही आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या आणि पावसाची प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्याचे मनोगत

भरू दे यंदा मृगाचं आभाळ


नावाचा तुझ्या यळकोट करीन


पीकू दे यंदा धनधान्याची रास


नावाचा तुझ्या येळकोट करीन


अंगावर चढू दे मुठभर मास


नावाचा तुझ्या येळकोट करेन

अशा शब्दांत व्यक्त केले आहे.

तर कवी राम मोरे यांनी

पवन अती दाहक हा


छळी मजला तूच पाहा


रात रात लोचनात नीज येईना


बरस रे घना, बरस रे घना

अशी आर्त हाक पावसाला घातली आहे.

‘आठवणीतील गाणी’ या प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातही पावसाची प्रतिक्षा करणाऱ्या दोन कविता असून त्याचे कवी अज्ञात आहेत. यातील ‘सृष्टीचे चमत्कार’ या कवितेत कवीने

वैशाखमासी प्रतिवर्षी येती


आकाशमार्गे नव मेघपंक्ती


नेमेची येतो मग पावसाळा


हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

असे सांगितले आहे.

तर अन्य एका कवीने ‘शेतकरी व भाताचे पीक’ या कवितेत

किती ऊन कडकडीत पडले पाहा


सुकली की सर्वाची तोंडे अहा


कधी कोसळेल समजेना मेघ हा

अशी संवेदना व्यक्त केली आहे. कवी वसंत सावंत यांनी

असा मत्त पाऊस यावा मृगाचा


उरींचे उन्हाळेच जावे लया


अशी वीज झाडातूनी कोसळावी


झळातून जन्मास यावे पुन्हा

असे वर्णन केले आहे.


शांताबाई शेळके यासुद्धा पावसाला ये अशी प्रेमाने विनंती करताना म्हणतात,


ये रे ये रे पावसा


नको दूर राहू


कवळाया तुला


पसरले बाहू


कधीची उभी मी


पदर कसून


नको रे लाडक्या


जाऊ तू रूसून..

कवी आरती प्रभू यांनीही

ये रे घना ये रे घना


न्हाऊ घाल माझ्या मना..

अशी पावसाला साद घातली आहे.

आशा भोसले यांच्या आवाजातील हे गाणे अजरामर झाले आहे.

सर्वसामान्यांप्रमाणेच शेतकरीवर्गही पावसाकडे डोळे लावून बसलेला असतो. आपल्याकडे असा एक समज आहे की, ‘पावशा’ पक्षी दिसला की पाऊस येतो. जणू काही या पक्षाला पावसाची चाहूल लागलेली असते. हा पक्षी ओरडायला लागला की, शेतकरी शेतीची अवजारे काढून पेरणीसाठी सज्ज होतो. बहिणाबाई चौधरी यांनीही ‘पेरनी’ या कवितेत शेतकऱ्यांच्या भावना समर्पक शब्दांत व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणतात,

पेरनी पेरनी


आले पावसाचे वारे


बोलला पोपया


पेरते व्हा रे


पेरते व्हा रे


पेरनी पेरनी


आले आभाळात ढग


ढगात वाकडी


ईज करे झगमगाट

काही वेळेस आकाशात नुसतेच ढग येतात, सोसाटय़ाचा वारा सुटतो आणि हे सर्व ढग दूर कुठेतरी निघून जातात. त्याबाबत बहिणाबाई सांगतात,

पेरनी पेरनी


आभाळात गडबड


बरस बरस


माझ्या उरी धडधड

यंदाच्या वर्षी हवामान खात्याने पाऊस लवकर येणार असल्याचे जाहीर केले आहे. नैऋत्य मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखलही झाला असून ३० मेपर्यंत हा पाऊस केरळमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर सात दिवसात म्हणजे ७ जूनला तो मुंबई-कोकणात येईल, असा अंदाज आहे. यंदाच्या वर्षी तरी हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरो, अशी प्रार्थना प्रत्येकजण देवाजवळ करत आहे. आता जो पाऊस सुरू होईल तो धो धो पडावा अशीच भावना सर्वाची आहे. पाहू या काय होते ते..

(माझा हा लेख लोकसत्ता, रविवार वृत्तान्तमध्ये ३० मे २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे)

29 May 2010

मराठी झाली ग्लोबल

‘मराठी लोकांचे, मराठी लोकांसाठी आणि मराठी लोकांनी चालवलेले विश्वपीठ’ असे घोषवाक्य घेऊन सुरू करण्यात आलेल्या ग्लोबलमराठी डॉट ओआरजी या संकेतस्थळामुळे मराठी भाषा आणि संस्कृती खरोखरच ‘ग्लोबल’ झाली आहे. घरबसल्या केवळ एका क्लिकवर मराठी भाषा, साहित्य, संगीत, संस्कृती, सण-उत्सव, खाद्यपदार्थ आणि मराठीबाबत सर्व काही या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.


जगभरातील मराठी लोकांना आणि मंडळांना एकत्र आणण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने globalmarathi.org हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. विश्वकोशाच्या माध्यमातून मराठी परंपरा, इतिहास, संस्कृतीचा वारसा काळानुरूप अद्ययावत करणे, जगभरातील विविध मराठी संस्थांचे कार्य आणि त्यांच्या उपक्रमांची माहिती, मराठी पुस्तके, प्रकाशक यांची माहिती देणे आणि नेटवर्किंगच्या अत्याधुनिक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे संकेतस्थळ काम करणार आहे.

विविध क्षेत्रांतील बातम्या आणि मराठीतील ब्लॉग येथे असून या संकेतस्थळावर जगभरातील विविध क्षेत्रातील लोकांचे विचार येथे वाचता येणार आहेत.

आपल्या मनात सुरू असलेल्या अनेक विषयांवर येथे वाचकांनाही आपले मत मांडता येणार आहे. तसेच मराठी भाषा शिकणाऱ्या अनेक अमराठी लोकांसाठीही येथे स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मराठीच्या या जागतिकीकरणासाठी www.myvishwa.com या संकेतस्थळाची आणि तेथे काम करणाऱ्या सर्वाची मदत झाली आहे. संकेतस्थळावरील ‘होम’ या सदरात अमेरिका, युरोप, सिंगापूर आणि आपल्या देशासह मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा इत्यादी प्रदेशांतील विविध घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या वाचायला मिळतात. तर ‘एन्टरटेंटमेंट’ या सदरात मनोरंजन या विषयाशी संबंधित बातम्या असून ‘संगीत’ या गटात मराठी, हिंदी, संस्कृत भाषेतील गाणी, श्लोक, स्तोत्रे तसेच भारतीय शास्त्रीय संगीत उपलब्ध आहे. संकेतस्थळावरील गाणी, गायक, गीतकार, संगीतकार यांच्या यादीसह दिली आहे. ‘अंताक्षरी’ मध्ये आपल्याला हवे असलेले गाणे ऐकण्याची सोय आहेच पण ते लिहून घेण्यासाठी गाण्याचे शब्दही येथे दिले आहेत.

‘स्पोर्ट्स’, ‘बिझनेस’ अशीही सदरे असून येथे क्लिक केल्यास त्या विषयाशी संबंधित लेख, बातम्या वाचता येऊ शकतात. महिलांसाठी खास ‘स्वामिनी’ असा विभाग असून त्यात आरोग्य, सौंदर्य, पाककला, कलाकुसर, कट्टा, यशस्विनी असे उपविभाग आहेत. आरोग्य सदरात योगासने, ध्यान, व्यायाम, प्राणायाम, घरचा वैद्य अशी विविध माहिती आहे. ‘लिटरेचर’ या गटात विविध मराठी पुस्तके, कथा, कविता, चारोळ्या, लेखक, प्रकाशक यांची माहिती आहे. लेखकाच्या नावावरून किंवा पुस्तकाच्या नावावरून त्यांचा शोध घेण्याची सोयही येथे आहे.

‘फन’ या गटात व्यंगचित्रे, ग्राफिटी, सुडोकू, शब्दकोडे, विनोद, पुणेरी पाटय़ा आहेत. पर्यटनासाठी कुठे बाहेर जायचे असेल तर महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळे, गड व किल्ले, ट्रॅव्हल एजंट, हॉटेल्स यांची माहिती आहे. ‘लोकल’ या सदरात महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि जगभरातील काही देशांची माहिती आहे. ‘थिंक्स’ या गटात विविध मराठी ब्लॉग, काही मान्यवरांनी केलेले स्तंभलेखन, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था, मराठी मंडळे आणि एखादा विषय देऊन त्यावर वाचकांकडून मागविलेली मते यांचा समावेश आहे. ‘स्पिरीच्युअल’ या गटात भविष्य, आध्यात्मिक लेख, अभंगवाणी, श्लोक, आपेल सण आणि उत्सव, आरत्या याविषयीची माहिती देण्यात आल्या आहेत.

संकेतस्थळावरील ‘विश्वकोश’ हा विभाग सर्वाच्या उपयोगाचा आहे. अनेकदा आपल्याला एखाद्या विषयावरील किंवा एखाद्या व्यक्तीबाबत माहिती हवी असते. ती येथे एका क्लिकवर मिळू शकते. उदाहरणार्थ आपल्याला केशवसूत, औरंगाबाद किंवा ओनियन उथप्पा किंवा अन्य काही माहिती हवी असेल तर त्या शब्दावर क्लिक केले की क्षणभरात आपल्याला हवी ती माहिती येथे मिळू शकते.

अधिक माहिती आणि संपर्कासाठी मंदार जोगळेकर mandar.joglekar@myvishwa.com
धनंजय दातार  dhananjaydatar@myvishwa.com
सुभाष इनामदार subhash.inamdar@myvishwa.com
 
यांच्याशी संपर्क साधावा.
 
(माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २९ मे २०१० च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाला आहे)

28 May 2010

पावसाचे संकेत

अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्याने सर्वजण त्रस्त झाले असून सर्वांचे डोळे आता पावसाकडे लागले आहेत. आकाशात नुसते ढग दाटून येत असले तरी पाऊस अद्याप सुरू झालेला नाही. हवामान खात्याने यंदाच्या वर्षी चांगला पाऊस होईल, असे सांगून लोकांना दिलासा दिला आहे. हवामान तज्ज्ञ निष्कर्ष आणि अभ्यासाच्या माध्यमातून पावसाविषयीचे अंदाज वर्तवत असतात. निसर्ग, निसर्गातील प्राणी आणि पक्षीही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पावसाविषयीचे अंदाज देत असतात.

आपल्या भारतीय संस्कृतीत पावसाचे हे संकेत गेल्या अनेक वर्षांपासून रूढ झालेले आहेत. शेतकरी आणि जुन्या पिढीतील माणसे याबाबत दाखले देत असतात. पावशा पक्षाचे आगमन झाले की पाऊस येणारच असा एक संकेत आपल्याकडे आहे. शेतकरीही पावशा पक्षाकडे लक्ष ठेवून असतो. पावशा पक्षी दिसला की शेतकरीही शेतीची कामे करण्याच्या तयारीला लागतो.

असे म्हणतात की प्राणी व पक्ष्यांना निसर्गाचे हे संकेत मिळत असतात.सुनामी
येण्यापूर्वी अंदमान-निकोबार मधील काही प्राणी व पक्ष्यांनी स्थलांतर केले होते, असे त्यानंतर अनेक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. पूर, भूकंप, पाऊस किंवा अन्य नैसर्गिक आपत्तींची सूचना प्राणी व पक्ष्यांना अगोदर कळत असते, असे काही घटनांवरून दिसून आले आहे.

कावळा, चिमण्या किंवा अन्य पक्षी झाडांवर किती उंचीवर घरटी बांधतात, त्यावरूनही पाऊस जास्त की कमी पडेल त्याचा अंदाज करता येतो. मुंग्यांनी वारुळ करायला सुरुवात केली की पावसाळा जवळ आला असे मानले जाते. कारण पावसाळ्यापूर्वी तयारी करण्याची प्रेरणा त्यांना निसर्गाने दिलेली असते. काही विशिष्ट वनस्पती/झाडांनाही याच सुमारास पालवी फुटते. ही झाडे पावसाळ्यातच वाढतात आणि नंतर मरून जातात. विशिष्ट झाडाचा कंद पावसाळा सुरू होण्यापूर्वी रुजतो, त्याला अंकुर फुटतो आणि झाड वाढते. पावसाळ्यानंतर ते झाड पूर्ण सुकून जाते.

पावसाचे संकेत देणारे हे आडाखे पारंपिरक असले तरी त्यावर संशोधन होण्याची गरज आहे. त्यातून काही ठोकताळे आणि शास्त्रीय निष्कर्ष तयार होऊ शकतील.

25 May 2010

मरावे परी....

धार्मिक समजुती किंवा अन्य काही कारणांमुळे देहदानाकडे अद्याप समाज मोठय़ा संख्येत वळलेला नाही. खरेतर भारतीय संस्कृतीत ‘दान’ हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे मृत्यूनंतर आपल्या देहाचा आणि अवयवांचा जर वैद्यकीय विद्यार्थी किंवा अन्य गरजूंना उपयोग झाला तर त्यासारखे दुसरे पुण्य असूच शकणार नाही. अंधाला डोळे मिळाले तर तो हे जग पाहू शकतो तर संपूर्ण देह वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयोगी पडू शकतो. दान केलेली त्वचा ही भाजलेल्या व्यक्तीच्या अंगावर शस्त्रक्रियेने लावता येऊ शकते. डोंबिवलीतील ‘दधिची देहदान मंडळ’ हे गेली २२ वर्षे मरणोत्तर देहदान या विषयाबाबत समाजात जनजागृतीचे काम करत आहे.


पुण्याचे दिवंगत ग. म. सोहनी यांनी मरणोत्तर देहदानाचा प्रचार आपल्या हयातीत केला होता. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन डोंबिवलीतील गुरुदास तांबे यांनी मरणोत्तर देहदानाबाबत प्रचार-प्रसार करण्याचा वसा घेतला. ‘जीपीओ’मधून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी या कामाला सुरुवात केली. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे त्यांनी स्वत:चा देहदानाचा अर्ज भरून दिला. पुढे या विषयाचा अधिक जोमाने प्रचार करण्यासाठी १९८८ मध्ये दधिची देहदान मंडळाची स्थापना केली. मंडळाचे आज पंधराशे सभासद असून मंडळाकडून आत्तापर्यंत ३०० जणांचे मरणोत्तर देहदान करवून घेण्यात आले आहे. मंडळाचे सभासद डोंबिवली, कल्याण, ठाणे, कळवा, अंबरनाथ, बदलापूर, मुंबई, पुणे, नाशिक आदी विविध ठिकाणी राहणार आहेत. पौराणिक काळातील दधिची ऋषींचे नाव सर्वाना परिचित आहेच. देहदान करणारी जगातील पहिली व्यक्ती म्हणून दधिची ऋषींचे नाव घेतले जाते. इंद्र आणि अन्य देवांच्या सांगण्यावरुन दधिची ऋषींनी प्राणत्याग करून आपला देह देवाना दिला. या ऋषींच्या अस्थींपासून देवांनी ‘वज्र’ नावाचे शस्त्र तयार केले आणि त्याने वृत्रासूराचा वध केला. त्यांचेच नाव मंडळाला देण्यात आले.

हळूहळू का होईना पण मरणोत्तर देहदानाबाबत समाजात जागरूकता निर्माण होत असून ती चांगली गोष्ट आहे. नुकतेच दिवंगत झालेले ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यानीही मरणोत्तर देहदान केले. त्यापूर्वी उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, ज्येष्ठ समाजवादी नेते मधु दंडवते, पश्चिम बंगालचे दिवंगत मुख्यमंत्री ज्योती बसू यांनीही देहदान करून एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे. मृत्यूनंतर नेत्रदान व त्वचादान करता येते. विशिष्ट वयातील देहदान झालेल्या व्यक्तीची हाडेही दुसऱ्या व्यक्तींना उपयोगी पडतात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात किंवा घरी झालेला असला आणि त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृत व्यक्तीच्या त्वचादानास परवानगी दिली तर त्या मृत व्यक्तीच्या मांडी किंवा पाठीवरील त्वचा काढून घेता येऊ शकते. मुंबईत शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात डॉ. माधुरी गोरे यांच्या प्रयत्नातून २० एप्रिल २००० पासून ‘त्वचापेटी’ सुरूकरण्यात आली आहे. मरणोत्तर त्वचादान करण्याची सोय या रुग्णालयात आहे.

मरणोत्तर देहदानाबरोबरच मंडळातर्फे नेत्रदान, त्वचादान आणि अवयवदान याबाबतही प्रचार-प्रसार केला जात आहे. मंडळाकडून ‘महर्षी दधिची देहदान पत्रिका’ हे त्रमासिकही गेली सात वर्षे प्रकाशित करण्यात येत आहे. देहदानाबाबत शंका समाधान, देहदानाबाबतची माहिती, देहदान केलेल्यांचा परिचय, मंडळाचे सभासद झालेल्या व्यक्तींची नावे आणि या विषयासंदर्भातील विविध लेख यात देण्यात येतात. मरणोत्तर देहदानासाठी आवश्यक तो अर्ज भरलेला नसला तरीही नातेवाईकांची इच्छा असेल तर एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या देहाचे दान करता येऊ शकते. तसेच एखाद्या व्यक्तीचे बाहेरगावी निधन झाले तरीही तेथील जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे त्या व्यक्तीचा मृतदेह दान करता येऊ शकतो.

दधिची देहदान मंडळाने या विषयावर ‘देहदान शंका आणि समाधान’ हे पुस्तकही प्रकाशित केले आहे. या पुस्तकात मंडळाचे कार्य, मरणोत्तर देहदान-गरज कायद्याची, नेत्रदान, महाराष्ट्रातील नेत्रपेढय़ा, देहदात्यांच्या वारसांकडून मंडळाची अपेक्षा, मरणोत्तर देहदानाबबात सर्वसामान्य लोकांच्या मनात असलेल्या विविध शंका, प्रश्न आणि त्यांची उत्तरे, अवयव दानाबाबत असलेले समज व गैरसमज, अवयवदान कायदा, मरणोत्तर देहदान चळवळ, या संदर्भातील आवश्यक ते अर्ज, महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालये, त्यांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक आदी माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

देहदान या विषयाबाबत अधिक माहितीसाठी दधिची देहदान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे संपर्क दूरध्वनी पुढीलप्रमाणे-

गुरुदास तांबे ०२५१-२४९०७४०/ विनायक जोशी ९३२४३२४१५७/ सुरेश तांबे ०२५१-२४५३२६६
देहदानासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयांचे दूरध्वनी
१) ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालय-मुंबई, शरीररचना शास्त्र विभाग

०२२-२३७३५५५५ (विस्तारित क्रमांक २३०२)

वेळ सायंकाळी ५ ते सकाळी ८ (निवासी डॉक्टर)

२) राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, कळवा

०२२-२५३४७७८४/८५/८६

शरीररचना शास्त्र विभाग (विस्तारित क्रमांक-३००, ३०१, ३०२, ३०४)

वेळ सायंकाळी ५ ते सकाळी ८ (निवासी डॉक्टर)

३) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्क, कोल्हापूर

४) पद्मश्री डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर

दूरध्वनी ०२३१-२६०१२३५/२६०१२३६.
 
(या विषयावर मी पूर्वी लिहिले होते की नाही ते आठवत नाही. त्यामुळे लेख देत आहे. लेखनाची द्विरुक्ती झाली असल्यास क्षमस्व)

24 May 2010

एका लग्नाची गोष्ट

आमच्या कार्यालयातील सुनील डिंगणकर आणि नमिता देशपांडे यांचा विवाह नुकताच (९ मे) पार पडला. परंपरागत पुरोहित, भटजी यांनी लग्न लावले नाही तर ज्ञान प्रबोधिनीच्या महिला कार्यकर्तीने लग्नाचे सोपस्कार पार पाडले. अनेकदा असे दिसते की लग्नाच्या  विधितील सर्व मंत्र हे संस्कृत भाषेतील असल्याने आणि पौरोहित्य करणारे गुरुजी योग्य प्रकारे सांगणारे नसतील तर त्यांचे मंत्र म्हणणे आणि सर्व विधि हे केवळ नुसती बडबड ठरते. वधू किंवा वर आणि त्यांच्या नातेवाईकांचे त्या विधिंकडे आणि गुरुजींच्या सांगण्याकडे लक्ष नसते. अर्थात याला सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत. पण हे अपवाद सोडले तर चित्र सारखेच असते. डिंगणकर-देशपांडे यांच्या लग्नात ज्ञानप्रबोधिनीच्या महिला पुरोहितानी सर्व विधि त्यामागील अर्थ  मराठीतूनच सांगितले.

तसेच लग्नात वधू-वर यांच्यावर उपिस्थतांकडून अक्षता टाकल्या जातात. हॉलमध्ये इतकी प्रचंड गर्दी असते की कोणाच्याच अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर पोहोचत नाही. त्या खाली पडून पायदळीच तुडवल्या जातात. सुनील आणि नमिताच्या लग्नात ते टाळले गेले. महिला पुरोहितानी सांगितले की आत्ता अक्षता कोणालाच देणार नाही. लग्न लागल्यानंतर वधू-वरांना भेटायला जेव्हा तुम्ही व्यासपीठावर याल तेव्हा तबकात फुलांच्या पाकळ्या व अक्षत ठेवलेल्या असतील. त्या वधू-वरांच्या डोक्यावर टाकून त्यांना आशीर्वाद द्या. ही पद्धतही आज अनेक लग्नात दिसून येत आहे.

सुनील आणि नमिता यांचा प्रेमविवाह. दोघेही आमच्याच कार्यालयात काम करतात. त्यांनी एकमेकांना प्रपोज केले ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱया लोकल गाडीतून प्रवास करताना. ही गोष्ट ९ डिसेंबर २००९ ची. अंबरनाथहून सीएसटीला जाणाऱया १२.२२ च्या लोकलमधील. त्यामुळे दोघांनीही विचार करुन लग्नाची तारीख आणि मुहूर्तही त्याच वेळचा ठरवला. आम्ही त्यांना गमतीने म्हटलेही अरे मग लग्न एखाद्या हॉलमध्ये करण्याऐवजी लोकलगाडीत का नाही केले.

या दोघांच्या लग्नाची पत्रिकाही वेगळ्या प्रकारची आणि हटके होती. सर्वसामान्यपणे कोणत्याही लग्नाच्या पत्रिकेवर श्री गजानन प्रसन्न किंवा कुलदेवतेचे नाव असते. आमच्या येथे आमचा नातू, पुतण्या किंवा मुलगा अशी सुरुवात करून (घरातील मोठ्या व्यक्तीच्या नावे ) पुढील मजकूर लिहिलेला असतो. सुनील आणि नमिताच्या पत्रिकेत हे काहीही नव्हते. ही पत्रिका ज्या पाकिटात घालून देण्यात आली त्या पाकिटावर मात्र कुलस्वामिनी अंबाबाई प्रसन्न असे आवर्जून लिहिलेले आहे. त्या पाकिटावरही एका लग्नाची गोष्ट असे लिहून शेजारी दोन स्वस्तीके आहेत.  वृत्तपत्रातील बायलाईनची  (म्हणजे त्या रिपोर्टरच्या नावाने) बातमी जशी असते,  त्या बातमीची ज्या प्रकारे मांडणी केलेली असते, तशी या पत्रिकेची मांडणी करण्यात आली आहे. पत्रिकेच्या सगळ्यात वरती लालबागचा राजा, टू स्टेट्स, लव्ह बर्डस आणि १२.२२ ची सीएसटी लोकल प्रसन्न असे लिहिलेले आहे.

१२.२२ च्या त्या लोकल प्रवासात माझ्या आणि नमिताच्या आय़ुष्याची गाडी एका वेगळ्या ट्रॅकवर जाणार आहे किंवा आमच्या दोघांची गाडी एकाच ट्रॅकवरून जाईल हे कोणाच्या गावीही नव्हते. त्याच गाडीत मुलुंड ते कांजुरमार्ग या स्थानकांदरम्यान स्टॅण्डिंग स्थितीत सर्वांसमक्ष नमिताशी झालेला छोटेखानी संवाद लवकरच भव्य विवाहसोहळ्याच्या स्वरुपात साजरा होणार आहे. तारीख आणि वेळ तीच आहे, फक्त महिना आणि आपल्या सर्वाच्या सोयीसाठी स्थळ बदलले आहे, अशी या पत्रिकेची सुरुवात आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी दोघांनी लालबागच्या राजाची एकत्र पाहिलेली मिरवणूक,  चार दिवस घऱी पाहुणचारासाठी आलेले लव्हबर्ड हे पक्षी, या विषयावर पाच महिने एकमेकांशी सुरु असलेली चर्चा, टु स्टेटस हे पुस्तक याचेही काय महत्व आहे, ते पत्रिकेत पुढे सांगितले आहे. पत्रिकेच्या शेवटीही सर्व नातेवाईकांची नावे न देता येथे आम्ही (सुनील डिंगणकर, नमिता देशपांडे, वसुधा डिंगणकर, निलिमा देशपांडे, प्रदीप देशपांडे, तन्मय देशपांडे) आपली वाट पाहात आहोत, असे सांगून अधिक माहितीसाठी घरचा पत्ता व दूरध्वनी दिला आहे. पत्रिकेत इंडिकेटर, पुस्तक, लव्ह बर्ड आणि लालबागचा राजा यांचीही छायाचित्रे देण्यात आली आहेत.

आपण नेहमी पाहात असलेल्या लग्नाच्या पत्रिकांमध्ये या पत्रिकेचे जाणवलेले हे वेगळेपण. आता काहीतरी हटके करायचे किंवा पारंपरिक पद्धतीची पत्रिका नको, म्हणून हे केले का, लग्नाच्या पत्रिकेवर सुरुवातीला श्री गजाजन प्रसन्न असे न लिहिणे योग्य की अयोग्य असे आणि इतरही काही प्रश्न अनेकांच्या मनात येतील. काही जणांना हा नवीन प्रकार आवडेल तर काही नाक मुरडतील. असो. ते चालायचेच.

लग्नाच्या नेहमीच्या पारंपरिक पत्रिकेपेक्षा ही पत्रिका आगळी आणि वेगळी वाटली म्हणूनच ही एका लग्नाची गोष्ट...    
        

23 May 2010

नियती आणि प्रारब्ध

काही वेळेस अशा काही घटना घडतात की माणूस पुन्हा एकदा नियती, प्रारब्ध यावर विचार करायला सुरुवात करतो. मृ्त्यू टाळता येत नाही, माणसाला तो आपल्याकडे खेचून घेतो असे म्हटले जाते. किंवा एखाद्याच्या आयुष्याची दोरीच बळकट असेल तर मृत्यूच्या तावडीतून तो सहीसलामत सुटतो, असेही दिसून येते. मंगलोर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला जो अपघात झाला, त्या निमित्ताने पुन्हा एकदा हे सर्व विचार मनात आले.

या भीषण अपघातामध्ये विमानातील १५८ प्रवासी ठार झाले. हे जे प्रवासी ठार झाले, त्यांच्या पत्रिकेत एकाच दिवशी मृत्यूयोग लिहिलेला होता का, तसेच जे प्रवासी याच विमानातून प्रवास करत होते, पण नशीब बलवत्तर म्हणून वाचले, त्यांच्या पत्रिकेत मृत्यूयोग नव्हता का, त्यांच्या बाबतीत देव तारी त्याला कोण मारी असे म्हणता येईल का, किंवा वृत्तपत्रातील बातम्यांवरुन असेही वाचायला मिळाले की काही प्रवासी याच वि्मानातून प्रवास करणार होते, पण काही कारणाने ते यात बसू शकले नाहीत आणि म्हणून ते वाचले. म्हणजे त्यांचे मरण आत्ता नव्हते म्हणून नियतीने, प्रारब्धाने किंवा देवाने त्यांचा या विमानातील प्रवास चुकवला का,

विमानाचा अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाले, ती तांत्रिक की वैमानीकाची चूक होती, अशा प्रकारच्या टेबलटॉप विमानतळांवर विमान उतरवताना जी खबरदारी घेणे आवश्यक असते, ती घेण्यात आली होती का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तपासाअंती मिळतील किंवा मिळणार नाहीत.

पाप-पुण्य, नशीब, दैव, प्रारब्ध अशा विषयांशी निगडीत एक गोष्ट आठवते. मला वाटते त्याच कथाबीजावर सुहास शिरवळकर यांनी एक कादंबरीही लिहिली होती. एका अरण्यातील एक शिवमंदिर. रात्रीची वेळ आणि बाहेर प्रचंड पाऊस कोसळत असतो. वीजांचा कडकडाटही सुरु. अशा वेळी त्या मंदिरात चार/पाच प्रवासी अडकलेले असतात. वीजा तर मोठ्या प्रमाणात चमकत असतात की कोणत्याही क्षणी या मंदिरावर वीज पडेल आणि आपल्या सर्वांचा मृत्यू त्यात ओढवेल, असे त्यांना वाटत असते. चर्चा करताना असे ठरते की आपल्यापैकी प्रत्येकाने या भर पावसात मंदिरातून बाहेर पडायचे आणि समोरील एका झाडाला हात लावून पुन्हा मंदिरात यायचे. आपल्यापैकी जो कोणी पापी असेल, तो बाहेर पडला की त्याच्या अंगावर वीज कोसळेल तो मरेल आणि आपण इतर सर्व वाचू. एकेक जण बाहेर जाऊन झाडाला हात लावून पुन्हा देवळात येतो. काहीच होत नाही. आता शेवटचा माणूस राहिलेला असतो. तो त्या मंदिरातून बाहेर पडतो  आणि त्याच क्षणी प्रचंड आवाज करत वीज देवळावर पडते.

बाहेर पडलेला माणूस वाचतो आणि आत असलेले सर्वजण मृत्यूमुखी पडतात. म्हणजे शेवटचा बाहेर पडलेला माणूस जो पर्यंत आत होता तोपर्यंत वीज मंदिरावर पडली नाही. सर्व जण सुरक्षित राहिले.  मग ती त्यांची पूण्याई. नशीब, दैव, प्रारब्ध किंवा आणखी काही. पण ज्या क्षणी शेवटचा माणूस मंदिरातून बाहेर पडला तेव्हाच वीज त्या मंदिरावर पडते. ही कथा आहे. पण प्रत्यक्षातही असे काही अनुभव अनेकांना आले असतील.

ज्योतिष, जन्मपत्रिका, मृत्यूयोग, प्रारब्ध, नियती यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जेव्हा असे अपघात घडून मोठ्या प्रमाणात सामुहीक मृत्यू घडतात, त्याला विज्ञानाच्या भाषेत काय उत्तर आहे, अशा प्रकारे अपघाती मृत्यू झालेल्या माणसांच्या पत्रिका मिळवून त्यावर काही संशोधन झाले आहे का, ज्योतिष्यांनी असा प्रयत्न केला आहे का,  ज्योतिष शास्त्र आहे की नाही अशी त्यावर टीका केली जाते. अशा प्रसंगातून मृत्युमुखी पडलेल्या आणि वाचलेल्या लोकांच्या पत्रिकांचा अभ्यास करून काही ठोकताळे, निष्कर्ष मांडता येतील का, त्याचा अभ्यास सगळ्यांसाठी जाहीर होईल का, 

ज्योतिषी किंवा अंधश्रद्धानिर्मूलनवाले यापैकी कोणाही एकाची बाजू घेण्याचा माझा प्रयत्न नाही. जे मनात आले ते लिहिले आहे. विमान, रेल्वे किंवा रस्ता अपघात हे काही सांगून होत नाही. योग्य ती काळजी आणि खबरदारी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. पण हे सर्व करुनही जेव्हा अशा घटना घडतात आणि मृत्यू होतात, तेव्हा काय म्हणायचे. नियती, दैव, प्रारब्ध हे खरे मानायचे का...  
         

22 May 2010

शाळा शब्दभ्रमकलेची

शब्दभ्रमकला अर्थातच बोलक्या बाहुल्या म्हटले की आपल्या सर्वाच्या डोळ्यासमोर पहिले नाव येते ते रामदास पाध्ये आणि त्यांच्या बोलक्या बाहुल्यांचे! दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून पाध्ये यांनी ‘अर्धवटराव आणि आवडाबाई’ या बाहुल्यांना घेऊन सादर केलेले कार्यक्रम रसिकांच्या अद्यापही स्मरणात आहेत. रामदास पाध्ये यांच्या पत्नी अपर्णाही त्यांना कार्यक्रमात साथ देत असतात. काळानुरूप पाध्ये यांनी आपल्या कार्यक्रमात आणि सादरीकरणातही बदल केले असून त्यांच्या बाहुल्या आजच्या पिढीलाही माहीत झाल्या आहेत.


‘टाटा स्काय’ने आमिर खानला घेऊन जी जाहिरात केली होती त्यात आमिर खानला रामदास पाध्ये यांचाच गेटअप देण्यात आला होता. हा रामदास पाध्ये यांच्या कलेचा गौरव आहे. अनेक जाहिरातीमधूनही रामदास पाध्ये आणि त्यांच्या बोलक्या बाहुल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. महेश कोठारे यांच्या ‘झपाटलेला’ चित्रपटातील ‘तात्या विंचू’ ही बाहुली रामदास पाध्ये यांचीच होती. ‘शब्दभ्रम’ या कलेचा वारसा रामदास पाध्ये यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. रामदास पाध्ये यांचा मुलगा सत्यजीत याच्या रूपाने आता तिसरी पिढीही आपली कला लोकांपुढे सादर करत आहे. शब्दभ्रमकला सादर करणारी जी काही मोजकी मंडळी भारतात आहेत, त्यात रामदास पाध्ये यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागले. प्रचंड अभ्यास, मेहनत आणि अनुभवातून पाध्ये यांनी आज या क्षेत्रात आपले स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

शब्दभ्रमकला आणि या बोलक्या बाहुल्यांचा भारतात जास्तीत जास्त प्रचार व्हावा आणि ही कला सादर करणारे नवीन कलाकार तयार व्हावेत, या उद्देशाने रामदास पाध्ये फाऊण्डेशनतर्फे ‘शब्दभ्रमकला आणि बाहुली नाटय़’ याचे प्रशिक्षण देणारी एक संस्था मुंबईत राधिका रेसिडेन्सी, ए - ३०१, लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ, म. फुले नगर, चेंबूर येथे सुरू होत आहे. या संस्थेचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या हस्ते आणि नाना पाटेकर यांच्या विशेष उपस्थितीत शनिवारी होत आहे.

या निमित्ताने ‘मुंबई वृत्तान्त’शी बोलताना रामदास पाध्ये यांनी सांगितले की, शब्दभ्रमकला आणि बोलक्या बाहुल्या यांना सध्याच्या काळात जगभरातून खूप मागणी आहे. आपल्याकडे या कलेचा म्हणावा तसा प्रसार झालेला नाही. या कलेची जाण असणारे आणि प्रत्यक्ष कार्यक्रम करणारे आपल्याकडे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच कलाकार आहेत. जोपर्यंत नवीन कलाकार या क्षेत्रात येत नाहीत, तोपर्यंत ही कला वाढू शकणार नाही. आमच्या फाऊण्डेशनतर्फे आम्ही शब्दभ्रमकलेबाबत शिक्षण देणाऱ्या कार्यशाळा ठिकठिकाणी आयोजित करत असतो. त्यातून या कलेची प्राथमिक माहिती शिकवली जाते. मात्र ते प्रयत्न अपुरे आहेत.

अमेरिका, जपान, इंग्लंड इत्यादी देशांत या कलेचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. मात्र आपल्या देशात अशा प्रकारे प्रशिक्षण देणारी एकही संस्था नाही. त्यामुळे या कलेचे प्रशिक्षण देणारी एखादी कायमस्वरूपी संस्था असावी आणि नवीन कलाकार तयार व्हावेत या उद्देशाने आपण ही संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला.

आमच्या या संस्थेत शब्दभ्रमकलेचे शिक्षण देणारा एक वर्षांचा अभ्यासक्रम असेल. तीन पातळ्यांवर हा अभ्यासक्रम असेल. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा कोणत्याही भाषेतून त्याचे शिक्षण घेता येईल.

या अभ्यासक्रमाला आपण क्लासचे स्वरूप देणार नाही. त्यामुळे अभ्यासक्रमासाठी एका वेळेस फक्त दहा विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल. कमी विद्यार्थी असल्याने आम्हाला प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देता येईल. मी आणि माझी पत्नी अपर्णा दोघेजण येथे शिकवणार असल्याचेही पाध्ये म्हणाले.

शब्दभ्रमकला किंवा बोलक्या बाहुल्या ही मुळात भारतीय कला आहे. आपल्याकडूनच ती परदेशात गेली. ही कला शिकण्यासाठी कठीण आहे. ज्याला शिकायची इच्छा आहे, त्याने यावर प्रचंड मेहनत आणि अभ्यास करणे आवश्यक आहे. आज परदेशातूनही त्याला मागणी आहे. मी बोलक्या बाहुल्यांचे परदेशातही अनेक कार्यक्रम केले आहेत. जगभरातील अनेक देशांकडूनही आपल्याकडे बोलक्या बाहुल्या बनविण्यासाठी विचारणा केली जाते. जगभरात या कलेला खूप मागणी असल्याचा माझा अनुभव आहे. मनोरंजनातून प्रबोधन करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. शब्दभ्रमकला आणि बोलक्या बाहुल्या यात काळानुरूप बदल करणे गरजेचे आहे. विद्यार्थी आणि तरुणांनी या कलेकडे मोठय़ा संख्येत वळले पाहिजे. हा नफा मिळवून देणारा व्यवसाय होऊ शकतो, याची जाणीव तरुणांमध्ये निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचेही पाध्ये यांनी सांगितले.
 
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (२२ मे २०१०) मध्ये पान एकवर प्रसिद्ध झाली आहे)

21 May 2010

वीजेचे संकट

सध्या महाराष्ट्र उन्हाने आणि वीजेच्या प्रश्नावरून तापला आहे. कडाक्याच्या उन्हाळ्याला अप्रत्यक्षपणे आणि वीजेच्या संकटालाही आपणच प्रत्यक्ष जबाबदार आहोत. महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक या दोघानीही गेल्या पन्नास वर्षांत भविष्यातील वीजेची गरज लक्षात घेऊन काहीच उपाययोजना केली नाही. त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत.

पर्यावरणाचा नाश, झाडांची बेसुमार कत्तल, पोखरलेले डोंगर, जागोजागी उभे केलेले सिमेंट-क्रॉंक्रीटचे जंगल, डांबरी रस्ते, जीथे तिथे लावलेले पेव्हर ब्लॉग आणि ग्लोबल वॉर्मिंग यामुळे गेल्या काही वर्षांपासून उन्हाचा तडाखा वाढत आहे. वर्धा येथे तर ४८ अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे.  पुढील वर्षी तापमापकाचा पारा पन्नासचाही आकडा पार करेल.

पावसाळ्याचे दोन महिने सोडले तर आपल्याकडे जवळपास दहा महिने कडाक्याचे उन असते. निसर्ग आपल्याला अनंत हस्ताने सर्व काही देत असतो. पण आपणच करंटे त्याचा पाहिजे तितका आणि म्हणावा तसा उपयोग करून घेत नाही. उन्हाप्रमाणेच पावसाचे पाणीही किती वाया जाते, त्याचाही हिशोब नाही. अपवाद वगळता उन आणि या वाहून जाणाऱया पाण्याचा आपण उपयोग करून घेत नाही.

हे सर्व करण्यासाठी राज्य शासनाने युध्द पातळीवर पुढाकार घेतला पाहिजे. गेल्या पन्नास वर्षात शिवसेना-भाजप युतीची पाच वर्षांची सत्ता सोडली तर येथे कॉंग्रेसचेच राज्य राहिले आहे. त्यामुळे आजच्या या वीज संकटाला कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेस नेतेच जबाबदार आहेत. अर्थात अर्धा दोष विरोधकांकडेही जातो. राज्य शासनाकडून वीजेच्या बाबतीत ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर विरोधकानीही त्यांना या प्रश्नाकडे लक्ष देण्यास भाग का नाही पाडले. आपले भत्ते, निधी आणि इतर सोयी-सुविधा मिळविण्यासाठी राजकीय मतभेद विसरून एकत्र येणारे राजकीय पक्ष व त्यांचे नेते या प्रश्नासाठी एकत्र का आले नाहीत.

याचे खरे कारण राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना याची झळ बसत नाही. उन्हाचे आणि वीजेचे चटके राज्यातील सर्वसामान्य जनतेला सहन करावे लागत आहेत. मलबाह हिल किंवा मत्र्यांच्या बंगल्यांना वीज भारनियमनाचा फटका बसलेला नाही. ही मंडळी येथील जनता उन्हाळ्याने आणि वीजेच्या भारनियमनाने होरपळत असताना परदेशी थंड हवेच्या ठिकाणी जाऊन मजा करत आहे.

प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते फक्त स्वहितामध्ये मश्गुल झाले असून त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी काहीही देणे-घेणे राहिलेले नाही. खरे तर या बोलघेवड्या आणि पोपटपंची करणाऱया नेत्यांना राज्यातील कोणत्यातरी दुर्गम खेड्यात नेऊन तेथील घरात नेऊन डांबले पाहिजे. एन उन्हाळ्यात लोकांचे पिण्याचे पाणी आणि वीज नसल्याने कसे हाल होतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना आला पहिजे. तसे झाले तरच या मंडळींचे डोळे उघडतील...             

20 May 2010

साकारतोय चित्पावन चरित्र कोश

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले, स्त्री शिक्षणाचा पाया घालणारे महर्षी धोंडो केशव कर्वे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आदी विविध मान्यवरांमध्ये काय साम्य आहे, तर ही सर्व मंडळी चित्पावन ब्राह्मण आहेत.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील विविध क्षेत्रातील अशा चित्पावन ब्राह्मण मंडळींच्या योगदानाची माहिती देणारा ‘चित्पावन ब्राह्मण चरित्र कोश’ तयार होतोय. अखिल भारतीय चित्पावन ब्राह्मण महासंघाने हे काम हाती घेतले आहे.


स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात चित्पावन ब्राह्मण समाजातील अनेक मंडळींनी राजकारण, शिक्षण, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग आणि अन्य क्षेत्रात आपले मोलाचे योगदान दिले.

या सर्व मंडळींनी राष्ट्रीय भावना जोपासत आणि मनात कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता आपले काम प्रामाणिकपणे केले. अशा सर्व चित्पावन मंडळींच्या या योगदानाची माहिती सर्व समाजाला व्हावी, या उद्देशाने या चरित्र कोशाचे काम महासंघाच्या विद्यमान कार्यकारिणीने हाती घेतले आहे. वेदाचार्य मोरेश्वरशास्त्री घैसास हे महासंघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

चित्पावन मंडळींच्या समग्र माहितीचे संकलन करुन कोश तयार करण्याचे काम आव्हानात्मक असून महासंघाकडून विविध क्षेत्रातील चित्पावन मंडळींची माहिती संकलित करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या कोशाची एक झलक म्हणून महासंघाने छोटेखानी परिचय पुस्तिका तयार केली आहे.
 
या मध्ये पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ, दुसरे पेशवे बाजीराव बाळाजी, भारतीय सर्कसचे जनक विष्णूपंत छत्रे, साहित्यिक गो. नी. दांडेकर, जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, संगीत, वेद, खगोलशास्त्र, गणित आदी विविध क्षेत्रातील चित्पावनांचा परिचय करुन देण्यात आला आहे.
 
या संदर्भात अधिक माहिती आणि मदत करु इच्छिणाऱ्यांनी महासंघाचे अध्यक्ष मोरेश्वरशास्त्री घैसास (९४२३५६८०२१) किंवा माहितीचे संकलन व संपर्कासाठी माधव घुले (९९२०३०५२१२) यांच्याशी संपर्क साधावा.
 
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई आवृत्ती, मुख्य अंक, पान क्रमांक १० (१९ मे २०१०) प्रसिद्ध झाली आहे)

19 May 2010

निवडक न्यायालयीन निवाडे आता मराठीत

मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील काही निवडक न्यायनिवाडय़ांचे मराठी भाषांतर आता विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि कायद्याच्या अभ्यासकांसाठी उपलब्ध झाले आहे. ‘महाराष्ट्र विधि निर्णय’ असे याचे नाव असून जानेवारी महिन्यापासून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाला वकील व्यावसायिक, कायद्याचे पदवीधर यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 न्यायालयीन लढाईत या न्यायनिर्णयांना अनन्य साधारण महत्व असते. या निर्णयांचा मराठी भाषेत अचूक अनुवाद झाला तर न्यायालयातील वकील वर्ग, न्यायाधीश आणि सर्वसामान्य जनतेला त्याचा उपयोग होईल, या उद्देशाने ‘महाराष्ट्र विधि निर्णय’ सुरु करण्यात आले आहे.


अधिवक्ते सुचिता अंजनकर-वाघ, अभय चांदुरकर यांच्यासह न्यायालयात मराठीचा वापर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे ‘मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ अधिवक्ता शांताराम दातार याचे संपादक आहेत.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर राज्य शासन व्यवहार आणि विधि मंडळाचे कामकाज मराठी भाषेतून सुरु झाले. पण मराठी भाषेला ‘ज्ञानभाषा’ करण्याचे प्रयत्न मात्र आपण केले नाहीत. चीन, जपान आदी आज प्रबळ असलेल्या राष्ट्रानीही विविध विद्या शाखेतील शिक्षण आपापल्या मातृभाषेत उपलब्ध करुन दिले. म्हणजे त्या देशांनी आपल्या मातृभाषेला ‘ज्ञानभाषा’ बनवले आणि आपण मात्र ज्ञानासाठी इंग्रजी भाषेचे गुलाम झालो, अशी खंत ‘महाराष्ट्र विधि निर्णय’चे संपादक शांताराम दातार यांनी व्यक्त केली.

विधि, विज्ञान, वैद्यकीय शास्त्र किंवा माहिती-तंत्रज्ञान या विषयातील सर्व ज्ञान आज केवळ इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. हे ज्ञान मराठी भाषेत आणण्याचा, या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्नच केला नाही. मराठी भाषेला आपण ‘ज्ञानभाषा’ केले तरच ती भविष्यात टिकेल अन्यथा ती शासन व्यवहारापुरतीच मर्यादित राहील. याची सुरुवात म्हणून ‘महाराष्ट्र लॉ जर्नल’चे मराठी भाषांतर करण्यास प्रारंभ केला आहे.

इंग्रजी आणि मराठीत अशा दोन्ही भाषेत यात निवडक न्यायालयीन निर्णय आम्ही देत आहोत. या कामासाठी जास्तीत जास्त वकील, न्यायाधीश, तज्ज्ञ अनुवादक यांनी पुढे आले पाहिजे. केवळ विधि विषयाचे नव्हे तर अन्य विषयातील ज्ञानही मराठी भाषेत आणण्याासाठी मराठीप्रेमी, साहित्यिक, मराठी संस्था आणि सत्ताधारी राज्यकर्ते, विरोधक व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनही या विषयाकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहनही दातार यांनी केले आहे.

अधिक माहिती आणि मदत करण्याची इच्छा असलेल्यांनी शांताराम दातार यांच्याशी ९८२०९२६६९५ या क्रमांकावर किंवा shantaramdatar@yahoo.com संपर्क साधावा.
 
(सौजन्य-लोकसत्ता, १९ मे २०१०, पान क्रमांक-५ मुंबई आवृत्ती)

18 May 2010

पुन्हा एकदा दंतेवाडा

नक्षलवाद्यांनी छत्तीसगड जिल्ह्यातील दंतेवाडा येथे  पुन्हा एकदा हल्ला करुन पन्नास जणांचे बळी घेतले.

वृत्तपत्रातून आणि वृत्तवाहिन्यांवरुन पुन्हा एकदा या रक्तलांछीत कृत्याच्या बातम्या आणि दृश्ये दाखवली गेली.

नेहमीप्रमाणे केंद्र शासन, राज्य शासन आणि राजकीय नेत्यांनी पोपटपंची करून नक्षलवाद्यांचे आव्हान मोडून काढू, पुन्हा असे घडू देणार नाही, असे सांगितले.

सत्ताधारी, विरोधक, हा पक्ष आणि तो पक्ष यांनी एकमेकांवर तोंडसुख घेतले. नक्षलवाद आणि नक्षलवाद्यांचा पूर्णपणे बिमो़ड करण्याच्या बाता मारल्या.

यापूर्वीही दंतेवाड्यात असाच हल्ला झाला होता, १२ मार्च १९९३ मध्ये दहशतवाद्यांकडून मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले होते, त्यानंतरही मुंबई आणि देशभरात दहशतवाद्यांचे हल्ले झाले आणि त्यात निरपराध नागरिकांचे बळी गेले होते.

रेल्वेतीस बॉम्बस्फोट, २६/११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला, त्यापूर्वी संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला, इंदिरा गांधी, जनरल अरुणकुमार वैद्य, राजीव गांधी यांच्या हत्या झाल्या.

 तिकडे काश्मीरमध्ये आपल्या जवानांवर हल्ले होतच आहेत, त्यात आपलेच जवान मृत्युमुखी पडताहेत, कारगीलही झाले पण तरीही आपण शहाणे झालो नाही की त्यातून काही शिकलो नाही.

कंदहार झाले, पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांना आपण सोडून दिले. तरीही आपण काहीच करत नाही.

अरे काहीच कसे करत नाही, शब्दांचे बुडबुडे फोडतो ना, पाकिस्तानला पोकळ इशारे देतो ना, दहशतवाद मोडून काढण्याच्या गप्पा करतोच ना, दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना लाखो रुपयांची मदत करतो ना,

कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले जवान आणि पोलीस अधिकारी यांना मरणोत्तर पुरस्कार देतो ना, वर्षातून एक दिवस त्यांना श्रद्धांजली वाहतो ना, त्याचाही इव्हेंट साजरा करतो ना,

जो पर्यंत आपल्या देशात मुर्दाड, शिखंडी आणि कोणतीही ठोस कृती न करणारे सत्ताधारी आणि विरोधक आहेत, पोशाखी व निव्वळ पोपटपंची करणारे बोलघेवडे नेते आहेत, तोपर्यंत हे असेच होत राहणार, दंतेवाडाही घडणार आणि २६/११ ही होणार...

यात बदल घडणार नाही का, आपल्या देवांच्या हातात असलेली शस्त्रे देवानीही शोभेसाठी हातात धरलेली नाही, वेळ आल्यावर त्याचा वापर केलाच ना,

 शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलाच ना, श्रीकृष्णाने आपल्या मामाचा कंसाचा वध केलाच ना, रामाने रावणाला मारलेच ना, देवीने महिषासूर आणि अन्य राक्षसांना मारलेच ना...

मग आपणच इतके सर्व घडूनही गप्प का, आपल्यातील शौर्य संपले आहे की भारतातील लोकसंख्या या निमित्ताने आपोआपच कमी होत आहे, म्हणून सत्ताधारी आणि विरोधकही खुष आहेत,

सहिष्णू, सहिष्णू म्हणून किती काळ आपण आपलेच कौतूक करत राहणार, केलेल्या गुन्ह्यासाठी गुन्हेगाराला जोपर्यंत जरब बसेल अशी शिक्षा होत नाही, गुन्हेगाराला आपण केलेल्या कृत्यासाठी कठोर शासन भारतात होते, याची प्रचिती येत नाही, तोपर्यंत असेच होत राहणार...

 अफजल गुरू झाला आता कसाबलाही आपण पोसत राहणार आणि तरीही म्हणणार मेरा भारत महान...

    
  

17 May 2010

झाकली मुठ...

लग्नसोहळ्यात खरे तर वधू आणि वर या दोघानाच महत्व असले तरी सध्याच्या काळात त्यांच्या बरोबरीने फोटोग्राफर, हॉल व्यावसायिक, व्हिडिओग्राफर, मेकअपमन, बॅण्डवाले, पौहोहित्य करणारे गुरुजी, पोशाख, स्टेज सजावटकार, हारतुरे-फुलवाले, मिठाई व्यावसायिक, कॅटर्स, बॅण्डवाले, वाजंत्री, ढोल-ताशा, वरातीसाठीचे घोडे, विद्युत रोषणाई, सोने-चांदीचे व्यापारी, साडय़ा आणि अन्य वस्त्र प्रावरणांचे दुकानदार, भेटवस्तूंचे दुकानदार, शीतपेये, पगडी, उपरणी, फेटे भाडय़ाने देणारे व्यावसायिक आदी विविध व्यावसायिकांचाही त्यात समावेश होतो.

 त्यामुळे एका लग्नात लाखो ते कोटय़वधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातील लग्न म्हटले तरी त्यात वरील सर्व घटकांचा कमी अधिक प्रमाणात समावेश होतो. यात सर्वात जास्त खर्च लग्नाचा हॉल, सजावट, जेवण, आहेर देणेघेणे आणि फोटो यावर होत असतो.

त्यामुळे मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील एका लग्नात उपरोक्त सर्व घटकांचा समावेश केला गेला तरीही हा खर्च किमान पाच ते दहा लाख इतका होतो. उच्च मध्यमवर्गीयांच्या खर्चात आणखी काही लाखांची भर पडते. तर उद्योगपती, राजकारणी, चित्रपट अभिनेते यांच्याकडे होणाऱ्या एका लग्नाचा खर्च तर कोटींच्या घरात जातो. १६ मे रोजी अक्षय्य तृतीया असल्याने या दिवशी मुंबईसह राज्यात सर्व शहरात आणि खेडय़ापाडय़ातही अक्षरश: हजारो लग्न लागली


. मुंबई आणि उपनगरातच सुमारे साडेतीनशे हॉल असून ते सर्व हॉल्स फुल्ल झाले आहेत. त्याखेरीज शाळांचे हॉल्स, मैदाने येथेही विवाह होणार आहेत. त्यामुळे केवळ मुंबईतील होणाऱ्या विवाह सोहळ्यात सुमारे दिडेकशे कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होणार असल्याचा अंदाज आहे.


 हे केवळ मुंबईपुरते असून त्याच दिवशी राज्यात अनेक ठिकाणीही विवाह सोहळे होणार असून त्याचा विचार केला तर ही उलाढाल हजार कोटींपर्यंत जाऊ शकते. अर्थात हा अंदाज आहे. लग्नात खरोखरच किती खर्च झाला, त्याची नेमकी आकडेवारी कधीच कोणी सांगत नाही. कारण हा सर्वच मामला ‘झाकली मूठ..’ या प्रकारातील असतो.

(या संदर्भातील माझा सविस्तर लेख लोकसत्ता १६ मे २०१० च्या अक्षय्य तृतीया पुरवणीत पान क्रमांक १ वर प्रसिद्ध झाला आहे.)

16 May 2010

लढाईपूर्वीच तलवार म्यान

विधानपरिषदेच्या ठाणे मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे हे बिनिवरोध निवडून आले. मतांच्या आकडेवारीनुसार निवडणूक झाली तर डावखरे निवडून आले असते. मात्र शिवसेनेने आपल्या उमेदवारांची उमेदवारी मागे घेऊन लढाईपूर्वीच तलवार म्यान केली आणि पुन्हा एकदा राजकारणात सर्व काही अगदी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले तरी चालते, कारण मतदार हे विसरभोळे असतात किंवा त्यांना गृहीत धरले तरी चालते, हे दाखवून दिले आहे. त्याच वेळी डावखरे यांच्या विरोधात निवडणुक लढविण्यासाठी घोड्यावर मारुनमुटकून बसवलेल्या रमेश जाधव यांचाही बळीचा बकरा केला आहे.


मुळात जाधव हे काही डावखरे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार नव्हते. जे तुल्यबळ उमेदवार होते, त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली नाही. निवडणुकीसाठी अर्ज भरताना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून रमेश जाधव यांना पक्षाचा एबी फॉर्मही दिला गेला नाही. त्यामुळे जाधव हे अपक्ष उमेदवार ठरले. ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य विधानपरिषदेसाठी मतदान करणार होते. शिवसेना-भाजप यांच्या तुलनेत कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे मतदार जास्त होते. त्यामुळे डावखरे निवडून आले असतेच. पण निवडणूक लढवून ते जिंकले अशते तर त्यात खरी गंमत आली असती. पण शिवसेनेने लाढाईपूर्वीच रणांगणातून पळ काढला आणि आपली तलवार म्यान करुन टाकली.


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या एका प्रचार सभेत डावखरे यांच्या विरोधातील सीडी दाखविण्यात आली होती. त्यात डावखरे हे निवडणुक जिंकण्यासाठी मारा, झोडा काहीही करा, असे सांगत होते. शिवसेनेने या सीडीचे खूप भांडवल केले आणि  डावखरे यांच्या विरोधात रान उठवले. मात्र हे सगळे इतक्या लवकर कसे विसरले गेले की कोणा दादा आणि बंटीचा ठाणे जिल्ह्यातील प्रभाव रोखण्यासाठी आणि आपलेही बस्तान बसविण्यासाठी डावखरे मदतीला असलेले बरे, या उद्देशाने तलवार म्यान केली गेली, अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे.


राजकारणी आणि राजकीय पक्ष हे गेंड्यांच्या कातडीचे आणि कोडगे असतात. जनाची नव्हेच पण मनाचीही त्यांना लाज नसते. आपल्या फायद्यासाठी ते कमरेचे सोडून डोक्यालाही गुंडाळतात आणि वर निर्लज्जपणे त्याचे समर्थनही करतात, असे सर्वसामान्य नागरिक आणि मतदार नेहमीच पाहत असतात. डावखरे यांना बिनविरोध निवडून देऊन शिवसेनेच्या नेत्यांनी तेच सिद्ध केले आहे.      

15 May 2010

रुचीने उलगडले वास्तव

मराठी भाषा आणि संस्कृतीचे भवितव्य, मातृभाषेतून शिक्षण, मराठी साहित्याचा खालावलेला दर्जा, भाषाशुद्धीची चळवळ याबाबतचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून जसेच्या तसेच आहेत. त्यात काहीही बदल झालेला नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या निवडक अध्यक्षांच्या भाषणातील काही उताऱ्यांचे संकलन ग्रंथाली वाचक चळवळीच्या ‘रुची’ या मासिकाने आपल्या मार्च महिन्याच्या अंकात केले असून त्यातून हे वास्तव प्रकर्षांने समोर आले आहे.पुण्यात १८७८ मध्ये ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले होते. त्याच संमेलनातून पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. संमेलनाध्यक्षांच्या भाषणातील ते उतारे वाचल्यानंतर इतक्या वर्षांनंतरही मराठी भाषा, साहित्य याबाबतचे प्रश्न जसेच्या तसेच असल्याचे वास्तव दिसून येत आहे.


या अंकात माधवराव किबे, दत्तो वामन पोतदार, शिवराम महादेव परांजपे, नारायण गोविंद चापेकर, भवानराव पंतप्रतिनिधी, माधव त्र्यंबक पटवर्धन, दत्तो वामन पोतदार, ना. सि. फडके, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आदी संमेलनाध्यक्षांचे विचार देण्यात आले आहेत. किबे यांनी १९३६ मध्ये सांगितले होते की, ‘सध्या मराठी भाषेत जी बजबजपुरी माजली आहे, तिला आळा घालणे जरुरीचे आहे’. तर परांजपे १९२९ मध्ये म्हणाले होते की, ‘श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या गीतेवरील भावार्थ दीपीकेपासून ते लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य या पर्यंत ज्या मराठीमध्ये आत्तापर्यंत अनेक ओजस्वी ग्रंथ निर्माण झाले आहेत, ती भाषा मरण्याकरता जन्माला आलेली नाही. पराजंपे यांनी १९३४ मध्ये ‘वाङ्मय समाजाची नाडी असून कोणत्याही समाजाच्या वाङ्मयीन स्वरुपावरून तो समाज संस्कृतीच्या कोणत्या पायरीवर आहे ते समजते’ असे सांगितले होते. तर ‘मूलगामी अभिमानाच्या अभावी मराठी भाषेची उपेक्षा होत आहे, यात तिळमात्र संदेह नसल्याचे’ परखड मत पटवर्धन यांनी १९३६ मध्ये व्यक्त केले होते.


दत्तो वामन पोतदार यांनी १९३९ मध्ये ‘आमच्या शिक्षणात मराठी शिक्षणाचा पाया उत्कृष्ट आणि भक्कम घातला गेला पाहिजे. माझ्या मते हिंदुस्थानात आपण बहुभाषिक झाले पाहिजे पण सर्वात प्रधान स्थान जन्मभाषेचे. तो पाया कच्चा ठेवून कोणतीच इतर भाषा शिकली आणि शिकवली जाता कामा नये’ असे परखडपणे सांगितले होते. तर आचार्य अत्रे यांनी १९४२ मध्ये सांगितले होते की, ‘अद्यापही साहित्य हा महाराष्ट्रातील साहित्यिकांचा उपजिविकेचा धंदा झालेला नसून तो हौसेचाच व्यवसाय आहे. लेखन हा मराठी लेखकांचा जोडधंदा आहे. साहित्यलेखन हा राज्यातील बुद्धीमान माणसांचा एकमेव व्यवसाय झाला पाहिजे. तरच मराठी भाषेचे आणि साहित्याचे त्यात कल्याण आहे.’


निवडक साहित्य संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षीय भाषणातील हे विचार बोलके असून त्यावर वेगळे काही भाष्य करण्याची गरज नाही. इतक्या वर्षांनंतरही आपण मराठी भाषा, संस्कृती, मराठी भाषेचे अस्तित्व यावर फक्त चर्चाच करत राहतो, हे आपले दुर्दैव.

14 May 2010

पुस्तकांची दुर्दशा

ग्रंथालय’ म्हणजे पुस्तकांचे माहेरघर. ग्रंथालयात आलेल्या पुस्तकांची योग्य प्रकारे काळजी आणि निगा राखली जावी, त्यांचे योग्य प्रकारे जतन आणि संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा साहित्यप्रेमींची असते. मात्र ग्रंथालयाकडूनच पुस्तकांची योग्य काळजी घेतली जात नसेल तर तेथील पुस्तकांना वाळवी लागून ती कुजायला आणि नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. मुंबईतील राज्य मध्यवर्ती ग्रंथसंग्रहालयाकडे आलेल्या लाखो पुस्तकांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्याने त्यांची अक्षरश: दूरवस्था झाली आहे. या पुस्तकांची अवस्था पाहिल्यानंतर साहित्यप्रेमी वाचकांच्या मनाला नक्कीच यातना होतील.


डेलिव्हरी बुक्स अ‍ॅक्ट १९५४ आणि प्रेस अ‍ॅण्ड रजिस्टेशन अ‍ॅक्ट १८६५ नुसार भारतात कोणत्याही भाषेत प्रकाशित झालेले वर्तमानपत्र, पुस्तक किंवा कोणतेही नियतकालिक भारतातील चार प्रमुख ग्रंथालयांना पाठवावे लागते. भारतात दिल्ली येथील सार्वजनिक वाचनालय, कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, चेन्नई येथील कॉनेमेरा लायब्ररी आणि मुंबईतील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय यांचा समावेश आहे. या चार ग्रंथालयांत पुस्तके, वर्तमानपत्रे दाखल केल्यानंतर त्यांचे जतन आणि संवर्धन केले गेले पाहिजे. मात्र राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात जतन आणि संवर्धनाऐवजी पुस्तकांची वाट कशी लागेल, ती नष्ट कशी होतील, त्याकडेच लक्ष दिले जात असल्याचे तेथील सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाकडे आलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके मुंबादेवी येथील महापालिका शाळेच्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आली आहेत. गेल्या दहा वर्षांपासून या शाळेत ग्रंथालयाकडे आलेली पुस्तके ठेवली जात आहेत. मात्र ही पुस्तके येथे ठेवली की टाकली जात आहेत, त्याची कल्पना बातमीतील छायाचित्रांवरुन कोणाही सुबुद्ध नागरिकांना येऊ शकेल.

पुस्तकांसाठी येथे रॅक आहेत, ठराविक काळानंतर जंतुनाशक फवारणीही येथे केली जाते. मात्र तरीही पुस्तकांची योग्य प्रकारे निगा राखली जात नाही. तसेच त्यांचे जतन आणि संवर्धनही काळजीपूर्वक केले जात नाही. त्यामुळे अनेक पुस्तके कुजली असून धूळ, कबुतरांची विष्ठा आणि अन्य काही कारणांमुळे वाया गेली आहेत. तर अनेक पुस्तके रॅकऐवजी जमिनीवर वाटेल तशी धूळ खात पडली आहेत. या ठिकाणी पुस्तकांची साफसफाई आणि देखभाल करण्यासाठी अवघे दोन-चार कर्मचारी आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांच्या संख्येत वाढ करण्यात आलेली नाही. पुस्तके खराब झाली, त्यांना वाळवी लागली की ती रद्दीच्या भावात विकली जातात, असेही ग्रंथालय सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात देशभरातून २२ भाषांमधील पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे येत असतात. मात्र या पुस्तकांची योग्य प्रकारे दखल न घेतल्याने हे साहित्य वैभव वाया चालले आहे.

मुंबादेवी प्रमाणेच मुलुंड (पश्चिम) येथे फिरोजशहा मेहता बिल्डिंग आणि जे. जे. रुग्णालयाच्या आवारातील महापालिका शाळेत अशीच हजारो पुस्तके पडून असून त्यांचीही दुरवस्था झाली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, यासंदर्भात राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचे प्रभारी संचालक सनान्से यांच्याकडे विचारणा केली असता ‘मी आता दुसऱ्या दूरध्वनीवर बोलत आहे. मी तुमच्याशी थोडय़ा वेळाने संपर्क साधतो’ असे उत्तर त्यांनी दिले. मात्र त्यांनी संपर्क साधला नाही.
 
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त, पान क्रमांक १ वर १४ मे २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.) 

13 May 2010

आता चातुर्मासातही विवाह मूहूर्त

आषाढ महिन्यापासून सुरू झालेल्या चातुर्मासाची समाप्ती झाली आणि कार्तिक महिन्यात तुळशी विवाहाला सुरुवात झाली की लग्नाच्या हंगामाला सुरुवात होते. चातुर्मासात विवाहाचे मुहूर्त नसल्याने हे संपूर्ण चार महिने लग्नासाठी वज्र्य असतात. त्यामुळे चातुर्मास सुरू होण्यापूर्वी लग्न उरकून घेतले जाते किंवा तो संपल्यानंतरचे मुहूर्त काढले जातात. मात्र काळानुरुप आता त्यात काही बदल करता येईल का, चातुर्मासातही विवाहाचे मुहूर्त देता येतील का, यावर आता विचार सुरू झाला आहे.


करवीर पीठाच्या शंकराचार्यानी येत्या २५ व २६ मे रोजी कोल्हापूर येथे महाराष्ट्रासह पंजाब, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील पंचांगकर्त्यांची बैठक बोलावली आहे. त्यात या विषयावर चर्चा होणार असून काही सकारात्मक निर्णय झाला तर पुढील वर्षांपासून पंचांगात चातुर्मासातही विवाहाचे मुहूर्त देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण हे बैठकीस उपस्थित राहणार आहेत. सोमण यांनीच ‘लोकसत्ता’शी बोलताना ही माहिती दिली. आतापर्यंत आपल्याकडे कधीही चातुर्मासात विवाह झालेले नाहीत. कारण पंचांगात या काळात विवाहाचे मुहूर्तच देण्यात आलेले नसतात. पूर्वीच्या काळी या दिवसात शेतीची कामे असायची, मोठय़ा प्रमाणात पाऊस पडायचा आणि आताएवढी वाहतुकीची साधने तेव्हा नव्हती. त्यामुळे साहजिकच प्रवास करणे आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यावरही बंधने व अडचणी होत्या. त्यामुळेच चातुर्मासाच्या काळात विवाह न करण्याची प्रथा किंवा पद्धत रूढ झाली असावी असे सांगून सोमण म्हणाले की, मात्र आता काळानुरुप त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. काळानुरुप आता शास्त्रात काही बदल करता येईल का, विवाह मुहूर्तासाठी कोणता धर्मग्रंथ प्रमाण मानावा त्याचीही चर्चा या बैठकीत होणार आहे. आपल्या मराठी संस्कृतीत आपण शक्यतो सकाळच्या वेळेतीलच मुहूर्त काढतो परंतु गोरज मुहूर्तावरही विवाह केले जातात. आजकाल गुजराती समाजात रात्रीचेही विवाह मुहूर्त असतात. नोकरी आणि व्यवसाय करुन आपली सर्व कामे पार पाडल्यानंतर ती मंडळी विवाहासाठी एकत्र येतात, असेही सोमण म्हणाले.
 
(माझी ही बातमी लोकसत्ता १२ मे २०१० च्या मुख्य अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे)