04 September 2011

श्लोक गणेश-४ मोरया मोरया मी बाळ तान्हे

गणपतीचे अनेक श्लोक आणि स्तोत्रे प्रसिद्ध असून त्यापैकी ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे’हा श्लोक आपल्या सर्वाच्या माहितीचा आहे. शाळेत प्रार्थना झाल्यानंतर रोजच्या परिपाठात किंवा आपल्या घरी एखादी पूजा / आरती झाल्यानंतर हा श्लोक म्हटला जातो.
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोटय़ानकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
सर्वसाधारणपणे आपण इतकाच श्लोक म्हणतो. मात्र त्यापुढेही
कऱ्हेचे तिरी एकसे मोरगावू
तिथे नांदतो मोरया जाण पाहू
चला जाऊ यात्रे महापुण्य आहे
मनी इच्छिले मोरया देत आहे
असा आणखी एक श्लोक आहे.
अष्टविनायकातील मोरगावचा मयुरेश्वर एक गणपती असून हे स्थान पुणे जिल्ह्य़ात आहे. गाणपत्य / गणपती संप्रदायाचे हे आद्यपीठ मानले जाते. गणेशपुराणात या स्थानाविषयी माहिती आहे. पूर्वी या गावात मोर मोठय़ा प्रमाणात होते. म्हणून या गावाला मोरगाव हे नाव पडले. मोरालाच मयूर असेही म्हटले जाते. मोरगावचा हा गणपती म्हणूनच मयुरेश्वर या नावाने ओळखला जातो.
मोरया गोसावी हे गणपतीचे मोठे भक्त होते. त्यांचा जन्म याच ठिकाणी झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची स्थापना केली. मयुरेश्वराबाबत एक पौराणिक कथा सांगण्यात येते.
चक्रपाणी राजाला सिंधू नावाचा एक पुत्र होता. उग्र तपश्चर्या करून त्याने सूर्याला प्रसन्न करून घेतले आणि अमरत्वाचे वरदान प्राप्त करून घेतले. पुढे उन्मत्त झालेल्या सिंधूने देवांना जिंकून घेऊन त्यांचा छळ करायला सुरुवात केली. सर्व देव भगवान विष्णूंना शरण गेले. त्यांनी सिंधूशी युद्ध केले, पण त्यांचाही पराभव झाला. अखेरीस सर्व देव गणपतीला शरण गेले. श्रीगणेशांनी पार्वतीच्या पोटी अवतार घेतला. पुढे सिंधूशी युद्ध करून त्याला पराभूत केले. तेव्हापासून मोरगावच्या गणपतीला मोरेश्वर / मयुरेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले.
आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारा आणि आपल्याला जे हवे आहे ते देणारा हा गणपती असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे. हे देवा गणेशा, मी अज्ञ आहे. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा मी चुकीचे वागलो असेन, तर मला उदार अंत:करणाने क्षमा कर आणि माझ्या चुका व अपराध पोटात घाल, अशी विनवणी गणपतीला करण्यात आली आहे. ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे’ हा श्लोक काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘उलाढाल’ या चित्रपटातील ‘देवा तुझ्या दारी आलो..’ या लोकप्रिय गाण्याच्या अखेरीस घेण्यात आला आहे. जगदीश खेबूडकर यांच्या या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. गाण्याची सांगता याच पारंपरिक श्लोकानेच करण्यात आली आहे.

(हा भाग लोकसत्ता-रविवार वृत्तान्त (४ सप्टेंबर २०११)मध्ये पान तीनवर प्रसिद्ध झाला आहे). त्याची लिंक अशी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=180118:2011-09-03-16-30-53&catid=166:2009-08-11-13-00-15&It

No comments:

Post a Comment