04 January 2010

नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा

आज पुन्हा एकदा नर्मदे परिक्रमेविषयी. सुहास लिमये लिखित नर्मदे हर हर नर्मदे हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. गेल्या काही महिन्यात नर्मदा परिक्रमेवरील जी जी पुस्तके मिळाली ती मी वाचून काढली आहेत. बॅंकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर लिमये यांच्या मनात नर्मदा परिक्रमेचा विचार आला आणि तो त्यांनी जिद्दीने तडीसही नेला. लिमये हे पुण्याचे असून ते आणि त्यांच्या काही सहकाऱयांनी नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली. परिक्रमा पायीच फिरून पूर्ण करायची असा लिमये यांचा आग्रह होता. प्रवासात काही ना काही कारणाने एकेक करत त्यांचे सहकारी परिक्रमेतून अर्ध्यावरुनच परतले. फक्त लिमये यांची परिक्रमा जशी ठरवली होती तशी पायी पूर्ण झाली. परिक्रमेतील सर्व प्रवासाचे हे वर्णन अत्यंत प्रांजळ झाले आहे. लिखाणात कुठेही प्रौढी किंवा बडेजाव नाही. नर्मदा परिक्रमा या विषयाची आवड असणाऱयांनी हे पुस्तक जरुर वाचावे.


लिमये यांची ही परिक्रमा १४ डिसेंबर २००१ ते १५ एप्रिल २००२ अशा एकूण १२३ दिवसात पूर्ण झाली. नर्मदामाईच्या कृपेने तिने माझ्याकडून परिक्रमा करवून घेतली, असे लिमये प्रांजळपणे नमूद करतात. परिक्रमेच्या दरम्यान आलेले बिकट प्रसंग, त्यातून नर्मदामाईच्या कृपेने झालेली सुटका, परिक्रमेच्या अखेरच्या टप्प्यात अश्वथ्थामाचे झालेले दर्शन, जागोजागी नर्मदामाता परिक्रमावासीयांची कशी काळजी घेत असते त्याचे आलेले अनुभव हे सर्व मुळातून वाचण्यासारखे आहे. लिमये यांचे हे पुस्तक लिमये कुल विश्वस्त निधीने प्रकाशित केले आहे. निधीचे प्रमुख विश्वस्त वामन गणेश खासगीवाले यांचेही मनोगत पुस्तकाच्या प्रारंभी देण्यात आले आहे.


नर्मदा परिक्रमा म्हणजे आजच्या काळात भारतीय संस्कृतीची आदर्श मूल्ये जोपासणारा अमूल्य ठेवा आहे. तो हस्तगत करण्यासाठी फार काही नको. फक्त मनुष्य देह पुरेसा आहे. परमेश्वरी योजनेनुसार त्यात श्रद्धा आहेच. ती जपली की बळ प्राप्त होते आणि या दोन्हींच्या संयोगाने सुयश प्राप्ती खेरीज अन्य काही घडणेच संभवत नाही. थोडक्यात चांगला माणूस बनण्यासाठी मानवी जीवनाचा प्रवास नर्मदे हर कडून हर नर्मदे कडे व्हावा. नर्मदे हर म्हणजे नर्मदामाईस विनवणी की माझ्या दोषांचे निर्मूलन कर अर्थात सदगुणांचा अभ्युदय कर. आणि हर नर्मदे म्हणजे नर्मदामाईस अनन्यभावे शरण जाणे, या परते दुसरे भाग्य कोणी मागेल काय, असे लिमये यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे.


पुस्तकातील नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा या लेखात लिमये यांनी आपल्या मनात ही परिक्रमा करण्याचा विचार कसा आला, त्याची तयारी कशी केली, घरच्यांची साथ कशी मिळाली, परिक्रमेहून परत आल्यानंतर पुस्तकाची तयारी कशी झाली, परिक्रमेदरम्यान लिमये यांनी दररोज दैनंदिनी लिहिण्याची सवय ठेवली होती. त्याचा फायदा या पुस्तकासाठी कसा झाला, पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी किर्लोस्कर मासिकात नर्मदा परिक्रमेविषयी प्रसिद्ध झालेली लेखमाला आदींचा सांगोपांग आढावा घेतला आहे. पुस्तकात लिमये यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमेचा मार्ग, नर्मदा मातेचे रंगीत छायाचित्र, परिक्रमेतील रंगीत छायाचित्रे,  श्री नर्मदा यंत्र, नर्मदा देवीची आरती, नर्मदाष्टकम, नर्मदा नित्यपाठ तसेच नर्मदा परिक्रमेसाठी उपयुक्त अशी माहिती दिली आहे. एक उल्लेख आवर्जू केला पाहिजे. तो या पुस्तकात देखील आहे.  नर्मदा परिक्रमेविषयी जगन्नाथ कुंटे लिखित नर्मदे हर या पुस्तकात जी काही छायाचित्रे देण्यात आली आहेत, ती लिमये यांनीच काढलेली आहेत.


एकंदरीत हे पुस्तक म्हणजे नर्मदा परिक्रमेविषयीचा एक संदर्भ ग्रंथ झाला आहे. जिज्ञासू आणि नर्मदा परिक्रमा करणाऱयांना त्याचा नक्कीच उपयोग होईल.  


लिमये यांचा संपर्क
०२०-२४४७३४८२

ई-मेल
  sblimaye2000@yahoo.com किंवा  sasuli@vsnl.com
   

5 comments:

 1. > परिक्रमेच्या अखेरच्या टप्प्यात अश्वथ्थामाचे झालेले दर्शन
  >----

  एकूण वर्णन अंधश्रद्‌धेकडे झुकणारं वाटतंय. त्यातही ही 'अश्वथ्थामादर्शनाची' काय गोष्ट आहे?

  ReplyDelete
 2. श्री.नानीवडेकर
  नमस्कार
  नर्मदा परिक्रमा करणाऱयांच्या मनात तसेच त्या परिसरात राहणाऱया अनेक गावकऱयांच्या मनात अशी श्रद्धा आहे की अश्वथ्थामा त्या परिसरात अद्यापही आहे. तो कोणत्याही रुपात कधीही दर्शन देतो. परिक्रमा करणाऱयांना तसेच तेथील नागरिकांना तशी प्रचिती आलेली आहे. लिमये यांनाही तशी प्रचिती आल्याने त्यांनी त्याचा उल्लेख आपल्या पुस्तकात केला आहे. आता हे खरे मानायचे की नाही, त्यावर विश्वास ठेवायचा की त्याला अंधश्रद्धा म्हणायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लिमये यांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आल्याने मी ते लिहिले आहे. असो. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार
  शेखऱ

  ReplyDelete
 3. > परिक्रमा करणाऱयांना तसेच तेथील नागरिकांना तशी प्रचिती आलेली आहे.
  >----

  श्री शेखर ज़ोशी : (आंध्रवाल्या केसाळ) साईबाबांच्या अनेक भक्तांनाही अनेक गोष्टींची प्रचिती आली असते. त्यातल्या काही गोष्टींवर माझा थोडा तरी विश्वास बसू शकतो. उदा. एका इंग्लिश माणसाला अपघात होऊन गाडी उलटल्यावर जिवाची भीती असताना बाज़ूला साईबाबा 'दिसले', आणि म्हणाले : सर्व ठीक होईल. पुढे या माणसाच्या मुलाशी म्हणे त्यांनी अश्लील चाळे केले. या वर लंडन डेली टेलिग्राफ मधे मोठी बातमी होती. बाबांवर खटला टाकूनही त्या अपघाताची प्रचिती मात्र त्या गोर्‍याची कायम होती, म्हणून मी विश्वास ठेवायला तयार आहे. त्याला त्यापूर्वी बाबांविषयी कल्पनाही नव्हती. मला वाटतं की इथे विज्ञानाज़वळ त्याचं उत्तर नाही. पण अमुक चेहरा 'दिसणं' (भास) वेगळं, आणि ती प्रत्यक्ष व्यक्ती जादूनी हज़र होणं किंवा हवेतून अंगठी काढणं वेगळं.

  भाकडकथा ती भाकडकथा. मग ती श्री लिमये सांगोत किंवा रजनीशांचे भक्त किंवा विवेकानन्द. याचा अर्थ लिमयांचं मूल्यमापन मी या एकाच गोष्टीवरून करणार नाही. माणूस चांगला असेल, आणि/किंवा लिहीत चांगला असेल. पण अश्वत्थामा कोणालाही दिसू शकत नाही. महाभारतकालीन व्यक्ती आज़ जिवन्त असणं शक्य नाही.

  - नानिवडेकर

  ReplyDelete
 4. श्री. नानीवडेकर
  नमस्कार
  हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज यांच्या भक्ताना आजही स्वामी किंवा गजानन महाराज कोणत्या ना कोणत्या रुपात दर्शन देतात असे वाटते. तसे अनुभल काही जणांना आले आहेत.
  लिमये यांनी पुस्तकात जे दिले आहे, त्याचा मी केवळ उल्लेख केला. कोणाचा त्यावर विश्वास नसेल तर तेवढा भाग सोडून द्यावा. लिमये यांनी सेवानिवृत्तीनंतर अत्यंत खडतर अशी समजली जाणारी नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केली हे महत्वाचे आहे आणि तेवढेच आपण घ्यावे असे वाटते. असो. प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार.
  शेखर जोशी

  ReplyDelete
 5. > अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज यांच्या भक्ताना आजही स्वामी किंवा गजानन महाराज कोणत्या ना कोणत्या रुपात दर्शन देतात असे वाटते. तसे अनुभल काही जणांना आले आहेत.
  >----

  मी एक दावा करतो : 'संजय गांधी आणि राजीव गांधी १९७५ ते १९९० मधे युवक कॉंग्रेससाठी काम केलेल्या लोकांना आज़ही दर्शन देतात. हेडगेवार राम मन्दिर समितीवाल्यांना आणि बाबर मशीदवाल्यांना दर्शन देतात. तसे अनुभव काहींना आले आहेत.' पण यावर तुमचा विश्वास आहे का?

  मी स्वत: अशा काही *चांगल्या* पुस्तकांतून माहिती दिलेली आहे (आणि पुढे देईन) ज्यातला सर्वच मज़कूर विश्वासार्ह नाही. ज़र थोडासाच मज़कूर भंकस असेल, तर दुर्लक्ष करता येतं. ज़र खूप मज़कूर बेकार असेल, तर त्या पुस्तकाच्या समीक्षेत तसा उल्लेख करावा लागतो. पण लेखकाची अंधश्रद्‌धा समीक्षकानी कौतुकानी सांगितली, तर तो अंधश्रद्‌धेचा आरोप समीक्षकालाही लागू पडतो.

  वयाच्या पन्नाशीत किंवा साठीत नर्मदा परिक्रमा करण्याविषयी तुम्ही केलेली तारीफ हा एक भाग झाला. थोडीफार अंधश्रद्‌धाही डोळ्यांआड करता येते. पण हा अश्वत्थामाविषयक दावा पुस्तकाला अशोभनीय आहे.

  - डी एन

  ReplyDelete