03 January 2010

गोंदवलेकर महाराजांचे गोंदवले


आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. या सर्व संतांनी लोकांमध्ये भक्तीभाव निर्माण करण्याबरोबरच सामाजिक समरसतेचे मोठे काम केले. याच संतपरंपरेतील एक नाव म्हणजे गोंदवले येथील गोंदवलेकर महाराज. गोंदवलेकर महाराज हे रामाचे निस्सीम उपासक. त्यांनी सर्व समाजाला नामाची गोडी लावली. आजच्या काळात सर्वश्रेष्ठ असे जर काही असेल तर ते नाम आहे. प्रत्येकाने सतत नाम घेत राहावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक येथे गोंदवलेकर महाराज यांची समाधी आहे. नुकताच गोंदवले येथे जाण्याचा योग आला आणि मी तेथे जाऊन आलो.


वसई येथे राहणारे माझे चुलत मेव्हणे अशोक ऊर्फ बापू अभ्यंकर हे गोंदवलेकर महाराज यांचे भक्त. त्यांचे गोंदवले येथे जाणे असतेच. मला कधीपासून गोंदवल्याला जायचे होते. तो योग नुकताच आला. अशोक अभ्यंकर हे गोंदवले येथे जाणार होते. त्यांनी मला विचारले आणि मी हो म्हटले. गोंदवले येथील गोंदवलेकर महाराज यांचे समाधी मंदिर, मंदिराचा सर्व परिसर, गोशाळा, भव्य महाप्रसाद गृह आणि गोंदवले येथे येणाऱया भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाच्या इमारती आणि येथे निस्वार्थी वृत्तीने काम करणारे साधक सर्व काही विलक्षण आहे. प्रत्येकाने किमान एकदातरी  गोंदवले येथे गेले पाहिजे. तुम्ही भाविक/श्रद्धाळू असाल तर भक्तीभाव म्हणून आणि तसे नसाल तर तेथे सुरु असलेले काम पाहण्यासाठी तरी तेथे भेट दिलीच पाहिजे.


गोंदवले येथील सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तेथील भक्त निवासात आपल्याला मुक्काम करायचा असेल तर त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. खोली उपलब्ध असेल तर ती निशुल्क मिळते. तसेच दररोज दुपारी आणि रात्री महाप्रसाद असतो. एका वेळेस जेवणासाठी किमान पाच हजार भाविक (उत्सव किंवा गोंदवले येथे कोणताही विशेष कार्यक्रम नसताना) उपस्थित असतात. परंतु कुठेही गडबड, गोंधळ न होता सर्वांचे जेवण व्यवस्थित होते. महाप्रसादासाठी सर्वाना रांगेतून शिस्तीत आत सोडले जाते. जेवणात भात, गोड शिरा, कढी, ताक, एखादी रसभाजी. मसालेभात, मुगाची खिचडी असे पदार्थ असतात. दररोज हजारो माणसांचा स्वयंपाक येथे होत असतो. तसेच दररोज सकाळी व दुपारी सर्वाना चहा आणि सकाळी नाश्ताही कोणतेही शुल्क न घेता देण्यात येतो.


इतक्या मोठ्या प्रमाणात स्वयंपाक, चहा आणि नाश्ता करण्यासाठी पहाटेपासूनच तयारी सुरु असते. प्रत्येकजण आपल्याला जमेल तशी येथे मदत करत असतो. काही मंडळी तर येथे मुद्दामहून सेवा म्हणून काम करण्यासाठी येत असतात. यातील अनेक जण सुशिक्षित, शहरात राहणारे आणि वेगवेगळ्या व्यवसायात काम करणारेही असतात. गोंदवलेकर महाराज यांच्यावरील श्रद्धेपोटी ही सर्व मंडळी आपले नाव आणि हुद्दा विसरुन येथे सेवा म्हणून काम करतात. दररोज दोन्ही वेळा हजारो माणसांचे जेवण, नाश्ता आणि चहा ही कामे बिनबोभाट होत असतात.


समाधी मंदिरातही पहाटेपासून काकडआरती, प्रवचन, किर्तन असे कार्यक्रम होत असतात. येथे आले आणि गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले की मन शांत होते. समाधी मंदिराचे आवार खूप मोठे आहे. मात्र स्रर्वत्र टापटीप आणि स्वच्छता असते. समाधी मंदिराचा गाभाराही स्वच्छ आहे. मंदिर परिसरातच संस्थेचे कार्यालय असून तेथे गोंदवलेकर महाराजांविषयी पुस्तके, छायाचित्रे. जपमाळ आणि अन्य साहित्य मिळते. अभिषेक, देणगीही .येथे स्वीकारली जाते. अन्य देवस्थानातील बडवे किंवा पुजाऱयांप्रमाणे गोंदवले येथील पुजारी किंवा अन्य कोणीही देणगी किंवा अन्य कामासाठी तुमच्या मागे लागत नाहीत. महाराजांच्या समाधी दर्शनासाठी इतकी दक्षिणा दिली तर अमूक रांग, तितके पैसे दिले तर तमूक रांग असाही प्रकार नाही.  सर्वाना एकच न्याय. उगाचच गडबड, गोंधळही नसल्याने येथे मनाला खरोखरच शांत आणि प्रसन्न वाटते.


साध्या आणि सोप्या भाषेत, आपल्याच सभोवताली घडणारी उदहरणे देत गोंदवलेकर महाराज यांनी नाम आणि अध्यात्म खूप सोपे करुन सांगितले आहे. त्याचे चरित्र आणि त्यांनी केलेले रचना वाचल्यानंतर आपल्याही ते लक्षात येते. खरेच प्रत्येकाने किमान एकदा तरी गोंदवले येथे जाऊन हे सर्व काम प्रत्यक्ष पाहावे आणि अनुभवावे.               
समाधीमंदिर                                                                                                                                                                          

8 comments:

 1. अतिशय उत्तम वर्णन. आमच्या घरचे सर्वजण महाराजांचे भक्त आहेत. मी पण गेलो आहे १-२ वेळा. फारच प्रसन्न वाटतं तिथे.

  ReplyDelete
 2. हेरंभ
  नमस्कार
  प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete
 3. ओळखलंत का मला? मी स्वामी विवेकानंद शाळेच्या माजी विद्यार्थी संघातला. आमच्या बऱ्याच कार्यक्रमांना तुम्हाला निमंत्रण असायचं. तेव्हा आपली भेट झालेली आहे. ७-८ वर्षं होऊन गेली म्हणा या गोष्टीला.

  ReplyDelete
 4. हेरंभ
  नमस्कार आणि सुप्रभात
  हो लक्षात आहे तर. त्यावेळी आपल्या बऱयाच कार्यक्रमांना आलो होतो. मी आता लोकसत्तामध्ये आहे. लोकसत्ताच्या मुंबई कार्यालयात मी रिपोर्टर म्हणून काम करतो.त्यामुळे डोंबिवलीतील कार्यक्रम कव्हर करायला मी नसतो. राणा प्रतापच्या माजी विद्यार्थी संघाच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती असते. डोके बाईंचाही अधूनमधून फोन असतो. नुकताच त्यांचा ब्लड डोनेशन कॅम्प झाला.
  तुझ्याबद्दल तुझे सासरे कुलकर्णी यांच्याकडून कळत असते. मी लोकसत्ताच्या अगोदर मुंबई सकाळमध्ये होतो.कुलकर्णी तिथे होते. आमची अधूनमधून भेट कधी प्रत्यक्ष तर कधी फोनवर होत असते. नवीन काय सुरु आहे. तुझाही ब्लॉग पाहिला आणि वाचला. चांगला आहे. ऑर्कूटवर फोटोही पाहिले. मध्यंतरी बाळंतपणासाठी तुझी बायको डोंबिवलीतच होती, हे कुलकर्णींकडून कळले होते.
  शेखर

  ReplyDelete
 5. How to reach gondawale by road or railway.

  Datta Joshi
  joshidbjoshi@in.com

  ReplyDelete
 6. किरण १२३
  आपण दिलेल्या मेलवर मी गोंदवले विषयक माहिती मेल केली. मात्र मेल बाऊन्स झाला. गोंदवलेविषयक माहितीची लिंक मी येथे देत आहे. आपल्याला त्याचा उपयोग होईल असे वाटते.
  शेखर जोशी
  लिंक्स अशा
  १)http://gondavalekar.org/gondavale
  २)

  ReplyDelete
 7. shekhar joshi yas saprem namskar,

  aapan dombivlit rahata ka ? rahat aslyas amhi ata dar ravivari sandhyakali 6 te 8 don taas naam jap karato temva aapli upasthiti apekshit ahe.
  address : Shri Mukund R. Chikodi, above shri hari mangal karyalya pandurang wadi, dombivli east
  mob no. 8108500557

  ReplyDelete
 8. नमस्कार
  आपल्या प्रतिक्रियेबाबत आभार. हो, मी डोंबिवलीत पश्चिमेला राहतो. जमेल त्या रविवारी मी येण्याचा प्रयत्न करेन.
  शेखर

  ReplyDelete