28 June 2012


गीताईची लाखांची गोष्ट

ज्येष्ठ गांधीवादी आणि भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेल्या ‘गीताई’च्या आत्तापर्यंत २६१ आवृत्या प्रकाशित झाल्या असून एकूण ४० लाख ३० हजार प्रतींची विक्री झाली आहे.
यंदा ‘गीताई’ला ८० वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘गीताई’ हे संस्कृतमधील श्रीमद्भगवद्गीतेचे केलेले सुबोध मराठी भाषांतर असून ‘गीताई’ची पहिली आवृत्ती १९३२ मध्ये प्रकाशित झाली होती. 
संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ प्रमाणेच विनोबा भावे यांनी भाषांतरित केलेल्या ‘गीताई’ला मराठी संस्कृतीत महत्त्व आहे. सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारे मराठीत गीतेचे भाषांतर कर, असे विनोबा यांच्या आईने त्यांना सांगितले होते. आईने सांगितल्यावरून विनोबांनी श्रीमद्भगवद्गीता ‘गीताई’च्या रुपाने मराठीत आणली.
‘गीताई’चे प्रकाशन विनोबा भावे यांनीच स्थापन केलेल्या ग्रामसेवा मंडळ व परमधाम प्रकाशन यांच्यातर्फे केले जाते. विनोबा भावे यांनी १९३०-३१ च्या सुमारास ‘गीताई’ लिहिली. १९३२ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘गीताई’ची किंमत फक्त एक आणा होती. शेठ जमनालाल बजाज यांनी  वैयक्तिकरित्या पहिल्यांदा ‘गीताई’ प्रकाशित केली. धुळे येथील मुद्रणालयात त्याची छपाई करण्यात आली, अशी माहिती वध्र्याच्या पवनार आश्रमाचे गौतम बजाज यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
२०११ मध्ये नवी आवृत्ती प्रकाशित झाली असल्याचे सांगून बजाज म्हणाले की, मोठा, मध्यम आणि बारीक अशा तीन प्रकारच्या टाईपमध्ये ‘गीताई’ प्रकाशित केली जाते. आजच्या काळातही त्याची किंमत अगदी अत्यल्प म्हणजे ७ आणि १५ रुपये इतकीच ठेवण्यात आली आहे. मूळ संस्कृतसह गीताई असेही आमचे प्रकाशन असून त्याची किंमत २५ रुपये आहे, असे ते म्हणाले. 
आजही ‘गीताई’ला मोठय़ा प्रमाणात मागणी असून महाराष्ट्राबाहेरही ‘गीताई’ वाचली जाते. मूळ ‘गीताई’चा अन्य भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद झालेला नसला तरी त्याचा आधार घेऊन हिंदू, गुजराथी आदी भाषांमध्ये ‘गीताई पोहोचली असल्याचेही बजाज यांनी सांगितले. 
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबईच्या मुख्य अंकात २८ जून २०१२ च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झाली आहे)