28 June 2012


गीताईची लाखांची गोष्ट

ज्येष्ठ गांधीवादी आणि भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेल्या ‘गीताई’च्या आत्तापर्यंत २६१ आवृत्या प्रकाशित झाल्या असून एकूण ४० लाख ३० हजार प्रतींची विक्री झाली आहे.
यंदा ‘गीताई’ला ८० वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘गीताई’ हे संस्कृतमधील श्रीमद्भगवद्गीतेचे केलेले सुबोध मराठी भाषांतर असून ‘गीताई’ची पहिली आवृत्ती १९३२ मध्ये प्रकाशित झाली होती. 
संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ प्रमाणेच विनोबा भावे यांनी भाषांतरित केलेल्या ‘गीताई’ला मराठी संस्कृतीत महत्त्व आहे. सर्वसामान्यांना समजेल अशा प्रकारे मराठीत गीतेचे भाषांतर कर, असे विनोबा यांच्या आईने त्यांना सांगितले होते. आईने सांगितल्यावरून विनोबांनी श्रीमद्भगवद्गीता ‘गीताई’च्या रुपाने मराठीत आणली.
‘गीताई’चे प्रकाशन विनोबा भावे यांनीच स्थापन केलेल्या ग्रामसेवा मंडळ व परमधाम प्रकाशन यांच्यातर्फे केले जाते. विनोबा भावे यांनी १९३०-३१ च्या सुमारास ‘गीताई’ लिहिली. १९३२ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘गीताई’ची किंमत फक्त एक आणा होती. शेठ जमनालाल बजाज यांनी  वैयक्तिकरित्या पहिल्यांदा ‘गीताई’ प्रकाशित केली. धुळे येथील मुद्रणालयात त्याची छपाई करण्यात आली, अशी माहिती वध्र्याच्या पवनार आश्रमाचे गौतम बजाज यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
२०११ मध्ये नवी आवृत्ती प्रकाशित झाली असल्याचे सांगून बजाज म्हणाले की, मोठा, मध्यम आणि बारीक अशा तीन प्रकारच्या टाईपमध्ये ‘गीताई’ प्रकाशित केली जाते. आजच्या काळातही त्याची किंमत अगदी अत्यल्प म्हणजे ७ आणि १५ रुपये इतकीच ठेवण्यात आली आहे. मूळ संस्कृतसह गीताई असेही आमचे प्रकाशन असून त्याची किंमत २५ रुपये आहे, असे ते म्हणाले. 
आजही ‘गीताई’ला मोठय़ा प्रमाणात मागणी असून महाराष्ट्राबाहेरही ‘गीताई’ वाचली जाते. मूळ ‘गीताई’चा अन्य भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद झालेला नसला तरी त्याचा आधार घेऊन हिंदू, गुजराथी आदी भाषांमध्ये ‘गीताई पोहोचली असल्याचेही बजाज यांनी सांगितले. 
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबईच्या मुख्य अंकात २८ जून २०१२ च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झाली आहे)
  

31 May 2012

नावात काय आहे


नावात काय आहे, असा प्रश्न कोणाला विचारला तर प्रत्येकाकडून वेगवेगळी उत्तरे येतील. कोणी म्हणेल नावात काय, काही नाही तर कोणी सांगेल नावातच सर्व काही आहे. खरय ते. जात नाही ती जात असे म्हटले जाते, तसेच आपल्या जन्मापासून शेवटपर्यंत जे आपल्याबरोबर असते आणि मृत्यूनंतरही मागे राहते ते आपले नाव. एखाद्याने काही कर्तृत्व गाजवले तर आपण अमूक अमूक यानं तमूक तमूक याचं नाव काढलं हो, असं म्हणतोच. नाव काढण्याबरोबरच नाव ठेवणं हा सुद्धा एक प्रकार आहे. नाव ठेवणं म्हणजे बारसं करणं या अर्थी मी म्हणत नाहीये. खरोखरच नाव ठेवणं असं मला म्हणायचाय. शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना आपल्या नावडत्या किंवा खडूस शिक्षकांना, मित्र-मैत्रणिंना नाव ठेवणं, हे आपण प्रत्येकानं कधी ना कधी तरी केलेलं असेलच.
नावात काय आहे, असं म्हटलं तरी नावातच सर्व काही आहे. म्हणूनच आपल्या मराठी भाषेत नाव ठेवणं किंवा नाव यावरून काही म्हणी आणि वाकप्रचारही तयार झाले आहेत. नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा, नाव मोठं लक्षण खोटं,
अनेकदा आपण प्रत्येकाने व्यवहारात हा अनुभव घेतलेला असतो. एखाद्याचे नाव वाचून किंवा ऐकून आपल्या मनात त्या व्यक्तीची एक प्रतिमा तयार होते आणि काही वेळेस ती व्यक्ती आपल्या समोर आल्यानंतर आपला चक्क भ्रमनिरास होतो. बेबी, बाळ या नावाच्या व्यक्ती कितीही म्हाताऱया झाल्या तरी शेवटपर्यंत बाळचं राहतात.
जे व्यक्तींच्या नावाचं तेच चित्रपटांच्या नावाबाबतही म्हणता येईल. काही चित्रपटांची नावे पाहिली तर केवळ विचित्र नाव आहे म्हणून आपण कदाचित नाक मुरडू आणि पाहायलाही जाणार नाही. लावू का लाथ, बाबुरावला पकडा, चल गजा करू मजा, गोंद्या मारतोय तंगडं, सालीनं केला घोटाळा, झक मारली नी बायको केली, सासू नंबरी, जावई दसनंबरी आणि आणखी कितीतरी. चित्रपटांच्या अशा नावांवरून चित्रपट सुमार दर्जाचा, कंबरेखालचे विनोद असलेला, फडतूस अभिनेते असलेला असा असेल असा कोणी समज (कदाचित गैरसमज) करून घेतला तर त्यात बिचाऱया रसिक प्रेक्षकांची काहीच चूक नाही. मुळात अशी चित्रविचित्र नावं ठेवावीत का,
नावांप्रमाणेच आपली आडनावंही अशीच मजेशीर असतात. अशा चित्रविचित्र आडनावांमुळं अनेकदा मुला-मुलींची लग्नं जमविणेही कठीण होऊन जाते. त्यामुळे आपलं आडनाव बदलून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अनेक जण तसं करतातही. महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटमध्ये तसे प्रसिद्धही करावे लागते. गावावरून आडनावं असतात, पण आपली आडनावं ही व्यवसायावरूनही ठेवली गेलेली आहेत. मी येथे मुद्दामहून अशा काही आडनावांचा उल्लेख करत नाही, पण मला काय म्हणायचं आहे, ते समजलं असेल.
नाव घेणं हा एक आणखी प्रकार. लग्न झालेल्या नवीन वधूला नाव घ्यायला सांगतात. नवी नवरीही आपल्या नवऱयाचे नाव मजेशीरपणे घेत असते. आत्ताच्या काळात ज्यांचा प्रेमविवाह झालेला आहे किंवा ज्यांचा झालेला नाही अशी जोडपी एकमेकांना नावानं हाक मारतात. पण पूर्वीच्या काळी स्त्री आपल्या नवऱयाचं नाव घेत नसे. अहो, ह्यांनी, इकडून,तिकडून अशा प्रकारे नवऱयाला संबोधलं जायचं. नवराही पत्नीला अहो किंवा मुलगा/मुलीची आई असे म्हणत असे.
टोपणनावं हा आणखी एक प्रकार, आपल्याला घरी किंवा मित्र-मैत्रीणी आपल्या नावाऐवजी अनेकदा एखाद्या टोपण नावानं हाक मारत असतात. अनेक साहित्यिकानाही लेखनासाठी टोपण नावांचा वापर केला. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज. त्र्यंबक बापुजी ठोंबरे अर्थात बालकवी आणि अनेक जण. 
आपल्या स्वतच्या नावाबरोबच अनेकदा शाळा, कॉलेज, गाव, आपण राहतो ती सोसायटी, जिल्हा, तालुका, मूलगा/मुलगी, नातवंडे, पत्नी अशा अनेकविध प्रकाराने आपण प्रत्येकजण दररोज नाव घेत असतो आणि ठेवतही असतो. त्यामुळे विख्यात इंग्रजी लेखक विल्यम शेक्सपीअर यानी नावात काय आहे, असं जरी म्हटलेलं असलं तरी सर्व काही नावातच आहे. खरं ना.
  (माझा हा लेख लोकसत्ता डॉट कॉमवर २९ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाला आहे)  30 May 2012

  माथ्यावर तळपे उन

  काय उन्हाळा चांगलाच तापलाय ना, कधी एकदा पावसाला सुरुवात होतेय, असं झालय. खरं आहे. या उन्हाळ्याबद्दल जरा पुन्हा थोडेसे. आपण गाण्याचे शौकीन असाल तर विविध मूड्समधील गाणी आपण ऐकली असतील. काय काही वेगळं लक्षात येतंय. थंडी किंवा पाऊस या विषयावर मराठीत जेवढी गाणी आहेत, त्या तुलनेत उन्हाळा/उन या विषयी गाणी कमी आहेत, असं नकोसा उन्हाळा या मागील लेखात मी म्हटलं होतं. हिवाळा किंवा पावसाळा हे दोन ऋतू आपल्याला जेवढे आवडतात त्या तुलनेत उन्हाळा हा ऋतू विशेषत्वानं कोणाला आवडत नाही. उन्हाळा म्हटला की आपण नाक मुरडतो. मग आपल्याप्रमाणेच कवी/गीतकार यांनाही उन्हाळा विशेष आवडत नसल्याने त्याचे प्रतिबिंब गाण्यातून फारसे उमटले नसावे का. पण उन/उन्हाळा हा शब्द असलेली काही गाणी आहेत आणि ती चांगली लोकप्रियही आहेत.
  गाण्यांमधून ऊन किंवा उन्हाळा हा शब्द असलेली गाणी आठवताहेत का, जरा विचार करा. एकदम सोपं असलेलं आणि प्रत्येकाला माहिती असलेलं आहे हे गाणं. पिकनिक, घरगुती गाण्यांची मैफल, भेंड्या किंवा मराठी वाद्यवृदातून हे गाणं हमखास म्हटलं जातं, त्याला वन्समोअरही मिळतो. अजून लक्षात येत नाहीये.
  सांगतो
  ही चाल तुरुतुरू, उडती केस भुरभुरू
  डाव्या डोळ्यावर बट ढळली
  कशी मावळत्या उन्हात
  केवड्याच्या बनात, नागीण सळसळली
  ज्येष्ठ गायक दिवंगत जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील आणि शांता शेळके यांनी लिहिलेले व देवदत्त साबळे यांनी संगीत दिलेले हे गाणे आजही लोकप्रिय आहे. या गाण्यात उन हा शब्द आलेला आहे.
  उन हा शब्द असलेलं आणखी एक माहितीचे आणि लोकप्रिय असलेलं गाणं म्हणजे उषा मंगेशकर यांच्या आवाजातील
  वेळ झाली धर्मासांन
  माथ्यावर तळपे उन
  नको जाऊ कोमेजून
  माझ्या प्रितीच्या फुला
  हे गाणं. ज्येष्ठ गायक-संगीतकार यशवंत देव यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून ही कविता कवी आ. रा. देशपांडे ऊर्फ अनिल यांची आहे. काही वर्षांपूर्वी आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्रावरून म्हणजे आत्ताची अस्मिता वाहिनीवरून हे गाणं बरेचदा प्रसारित होत असे. या गाण्यात उन्हाळ्यातील रखरखाट, अंगाची होणारी काहिली हे सर्व काही आलं आहे.
  कारण पुढील कडव्यातील शब्द
  तप्त दिशा झाल्या चारी
  भाजतसे सृष्टी सारी
  कसा तरी जीव धरी
  माझ्या प्रितीच्या फुला
  असे आहेत.
  या गाण्याबरोबरच मला शाळेत शिकलेले बालकवी यांची कविता आठवली. यातही उन हा शब्द आहे.
  श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
  क्षणात येत सरसर शिरवे, क्षणात फिरूनी उन पडे
  उन हा शब्द असलेलं आणखी एक लोकप्रिय गाणे सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजातील आहे.
  आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
  स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे
  हे गाणेही अधूनमधून आकाशवाणीवर लागत असते.
  आशा भोसले यांच्या आवाजातील
  तुझी नी माझी गंमत वहिनी ऐक सांगते कानात
  आपण दोघी बांधू या गं दादाचं घर उन्हात
  या गाण्यातही उन हा शब्द आलेला आहे.
  ग. दि. माडगूळकर यांचं गीत, सुधीर फडके यांचं संगीत आणि माणीक वर्मा यांच्या आवाजातील एका लावणीतही उन हा शब्द आलेला आहे. ही लावणी आजही लोकप्रिय असून मराठी वाद्यवृंद किंवा विविध वाहिन्यांवरील गाण्यांच्या स्पर्धेच्या रिअॅलिटी शो मध्ये एखादा तरी स्पर्धक ही लावणी म्हणतो आणि वन्समोअर घेतो.
  जाळीमंदी पिकली करवंद या लावणीत
  भर उन्हात बसली धरुन सावली गुरं
  न्हाई चिंता त्यांची तिन्हीसांज पातुरं
  चला दोघं मिळूनी चढू टेकडीवर
  चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद
  जाळीमंदी पिकली करवंद
  या प्रमाणेच आशा भोसले यांच्या आवाजातील
  भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं
  बाई श्रावणाचं उन मला झेपेना
  या गाण्यातही उन हा शब्द आलेला आहे.
  तर सहज आठवतील अशी उन/उन्हाळा हा शब्द असलेली ही काही गाणी. असो. गाण्यांमधल्या उन शब्दानेही अंगाची काहिली झाली असेल तर पावसाला अजून सुरुवात व्हायची आहे. तो पर्यंत थंडी आणि पाऊस असलेली गाणी आठवा. तेवढाच मनालाही गारवा...

  (माझा हा लेख लोकसत्ता डॉट कॉमवरील ब्लॉगमध्ये २८ मे २०१२ या दिवशी प्रसिद्ध झाला आहे)

  25 May 2012

  नकोसा उन्हाळा
  तुमचा सर्वात आवडता ऋतू कोणता, असा प्रश्न विचारला तर वेगवेगळी उत्तरे येतील हे खरे असले तरी बहुतांश मंडळी हिवाळा आणि पावसाळा हेच उत्तर देतील. अगदी नक्की. आम्हाला उन्हाळा आवडतो, असे सांगणारी अगदी कमी मंडळी असतील. अंगाची काहिली करणारा, घामाच्या धारा काढणारा, जीवाची तगमग करणारा, सगळीकडे रखरखीतपणा आणणारा हा उन्हाळा अगदी नकोसा होतो.
  उन्हाळा संपून कधी एकदा पावसाळा सुरू होतो, याचे वेध आपल्याला एप्रिल महिन्यापासूनच लागतात. पावसाला सुरुवात झाली की रखरखीत झालेल्या वातावरणात एकदम बदल होतो. तप्त झालेल्या जमिनीवर पहिला पाऊस पडतो, तेव्हा येणारा मातीचा सुगंध मन धुंद करून टाकतो. असं वाटतं की हा वास आपल्या श्वासात भरून घ्यावा किंवा कोणीतरी संशोधन करून पहिल्या पावसानंतर येणाऱया सुगंधाचं परफ्युम/अत्तर तयार करावे.
  मे महिन्याच्या शेवटापासून पावसाचे वेध लागायला सुरुवात होते. आकाशात मळभ दाटून आलेले असते. उन-सावलीचा खेळ सुरू झालेला असतो आणि एकदाचा पाऊस सुरू होतो.
  बघता बघता पावसाळा संपतो आणि थंडीचे दिवस सुरू होतात. पावसाळा संपून थंडी सुरू होण्यापूर्वीही वातावरणात आल्हाददायक बदल होतो. मोकळी शेते किंवा जमीन असेल तर वाऱयाच्या लहरींबरोबर एक वेगळा सुगंध आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. ही थंडी सुरू होण्याची चाहूल असते. थंडी हा ऋतू खरोखरच एकदम मस्त आहे. वातावरणात सुखद बदल झालेला असतो. बघा ना, उन्हाळ्यात आपल्याला कधी कधी एकदम गळून गेल्यासारखे वाटते, काम करण्याचा उत्साह नसतो, तसे थंडीचे नाही. झक्कास वातावरण असते. थंडी सुरू झाली की ती संपूच नये असे वाटते.
  पण फेब्रुवारीच्या मध्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होते. आता पावसाला सुरुवात होईपर्यंत अशाच घामाच्या धारा आणि अंगाची काहिली होत राहणार, याची आपण मनाशी खुणगाठ बांधतो. गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्याच्या दिवसातील तापमान वाढता वाढता वाढे असेच होत चालले असून अमूक ठिकामी तापामापकाने ४९ अंशाचा तर तमूक ठिकाणी पन्नाशी गाठली अशा बातम्या वाचायला मिळतात. ज्या ठिकाणी इतके तापमान जात असेल, तेथील लोकांचे काय हाल होत असतील, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यांना आगीच्या ज्वाळांत वेढलो गेलोय, अशा पद्धतीने हा उन्हाळा भाजून काढत असतो.
  गंमत म्हणजे उन्हाळा संपून आपण पावसाळा कधी सुरू होतोय त्याची तसेच पावसाळा संपून हिवाळा कधी सुरू होतोय, त्याची आतुरतेने वाट पाहात असतो. पण हिवाळा संपून कधी एकदाचा उन्हाळा सुरू होतोय, असे आपण चुकुनही म्हणत नाही.
  एकूणच आपल्या सर्वांचा उन्हाळा हा नावडता आहे, तसाच तो कवी, गीतकार, लेखक यांचाही आहे. जरा आठवून पाहा. पाऊस, थंडी, वारा, चंद्र, चांदणे, गारवा, ढग याविषयी मराठी किंवा हिंदीत जेवढी गाणी आहेत, त्या तुलनेत उन्हाळा किंवा उन या विषयी खूपच कमी आहेत. कविता किंवा लेखनातून उन्हाळ्यामुळे सगळीकडे झालेला रखरखीतपणा, सुकून गेलेली झाडे व धरती, शेतात पेरणी करण्यासाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी याचे वर्णन आलेले आहे. पण थंडी किंवा पाऊस जसा गुलाबीपणे रंगवलेला आहे तसे उन्हाळ्याबाबत झालेले नाही. असो.
  पण असे असले तरी माणसाचे मन कसे असते पाहा. अंगाची काहिली करणारा उन्हाळा नकोसा होतो, आणि पावसाला कधी एकदा सुरुवात होते, असे वाटते. धो-धो पाऊस पडायला सुरुवात झाली की सगळीकडे होणारा चिखल, ओलेपण, सूर्याचे न घडणारे दर्शन यामुळे कधी कधी कधी एकदाचा पाऊस संपतोय, असेही मनाला वाटून जाते. थंडी मात्र हवीहवीशी आणि संपूच नये असे वाटते.
  त्यामुळे उन्हाळा हा नकोसा वाटत असला आणि फक्त थंडी व पावसाळा हेच दोन ऋतू असावेत, असे वाटत असले तरी निसर्गचक्रानुसार हा प्रत्येक ऋतू वेळेवर सुरू होणे व संपणे गरजेचे असते. कारण निसर्गाने तशी योजना केलेली आहे. अर्थात गेल्या काही वर्षांपासून हे ऋतूचक्र पार बदलून गेले आहे. त्याला आपण माणसेच कारणीभूत आहोत. निसर्गाचा विनाश आणि पर्यावरणाची पार वाट लावल्यामुळे पाऊस ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंतही राहतो आणि थंडी मार्चपर्यंत पडते. तर जून संपून जुलै उजाडला तरी पाऊस सुरू होत नाही. अत्याधुनिक जीवनशैली, प्रगती आणि विकासाच्या नावाखाली पर्यावरण पर्यायाने निसर्गाचा केलेला विनाश, नष्ट केलेली झाडे, डोंगर, प्रदुषित केलेल्या नद्या, तलाव, समुद्र यामुळे कोणकोणत्या समस्या समोर उभ्या ठाकल्या आहेत आणि भविष्यात भेडसावणार आहेत हे आपण पाहतोय, आपल्याला सर्व काही कळतय पण वळत मात्र नाही हे आपले आणि भावी पिढीचेही दुर्देव...
  (माझा हा मजकूर लोकसत्ता ब्लॉगवर २४ मे २०१२ या दिवशी प्रसिद्ध झाला आहे)
  http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=228556:2012-05-24-12-57-03&catid=235:2009-09-14-09-37-24&Itemid=235

  16 May 2012

  मंडळी सध्या उन्हाळा सुरू असून उकाड्याच्या काहिलीने आणि वैशाख वणव्याने अंग भाजून निघत आहे. मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे त्यांचाही धुडगूस सुरू आहे. एवढी प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे या दिवसात आणखी एका गोष्टीला खूप महत्व असते. वसंतपेय म्हणून ओळखले जाणारे कैरीचे पन्हे हे असतेच. पण त्याजोडीला आणखीही काही खास असते. सुरुवातीला ही गोष्ट सर्वसामान्यांच्या  आवाक्याबाहेरची असते. पण जसजसे दिवस सरतात, तसतशी ती आवाक्यात येऊ लागते. उन्हाळा आणि ही वस्तू खाल्ली नाही, असे होऊच शकत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने जसा जमेल तसा त्याचा आस्वाद घेतच असतो. त्याचे विविध प्रकारही आपण चाखत असतो. काय लक्षात येतय का,  अगदी बरोब्बर. आंबा
  उन्हाळा आणि आंबा हे जणू समीकरणच आहे. आंब्याचा रस अर्थात आमरस हा या दिवसात रोजच्या जेवणातील अविभाज्य भाग बनलेला असतो. आमरसाबरोबरच पन्हे, कैरीचे लोणचे, आंबापोळी, आंबावडी, मॅंगोपल्प, आम्रखंड, मॅंगो मिल्कशेक, आंबा आईस्क्रिम, कॅण्डी अशा विविध प्रकारे आपण या आंब्याचा आस्वाद घेत असतो.
  हे आंबापुराण एवढ्यावरच थांबत नाही तर तो मराठीतील काही गाण्यांचाही एक भाग झालेला आहे. मराठीतील अनेक गाण्यांमध्येही आंब्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यात अगदी सहज ओठावर येणारे गाणे म्हणजे
  नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच
  सबकुछ पुल असलेल्या देवबाप्पा या चित्रपटातील हे गाणे ग. दि. माडगूळकर यांचे असून त्याचे संगीत पुलंचेच आहे. आशा भोसले यांच्या आवाजातील या गाण्याची लोकप्रियता आज इतक्या वर्षांनंतरही कमी झालेली नाही. मराठी वाद्यवृंदातून आजही हे गाणे हमखास म्हटले जाते आणि या गाण्याला वन्समोअरही घेतला जातो. गाण्याचे सहजसोपे शब्द आणि मनात गुंजणारे संगीत यामुळे हे गाणे अजरामर झाले आहे.
  गीतकार शांताराम आठवले यांनी शेजारी या चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गाण्यातही आंबा हा शब्द आलेला आहे.
  हासत वसंत ये वनी अलबेला हा
  प्रियकर पसंत हा मनी, धरणीला हा
  या गाण्याच्या पुढील कडव्यात
  घनवनराई बहरून येई,
  कोमल मंजुळ कोमल गाई
  आंबा पाही फुलला हा
  चाफा झाला पिवळा हा
  जाई जुई चमेलीला, भर आला शेवंतीला
  घमघमला हा
  अर्थात आता ऐकायला हे गाणे तसे दुर्मीळ आहे.
  आंबा हा शब्द असलेले आणखी एक लोकप्रिय गाणे म्हणजे सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातील
  पाडाला पिकलाय आंबा ही लावणी.
  आला गं बाई आला गं, आला गं,
  आला आला आला,आला
  पाडाला पिकलाय आंबा
  तुकाराम शिंदे यांचे गीत आणि संगीत असलेली ही लावणी सुलोचना चव्हाण यांनी अशा काही ठसक्यात सादर केली आहे की आजही ती रसिकांच्या ओठावर आहे. विविध वाहिन्यांवर गाण्यांच्या कार्यक्रमाचे होणारे रिअॅलिटी शो, नृत्याचे कार्यक्रम यातून हे गाणे आजही सादर झाले की वन्समोअर मिळतोच मिळतो.
  लहान मुलांच्या तोंडी असलेले आणि पारंपरिक गीत असलेले
  आंबा पिकतो, रस  गळतो
  कोकणचा राजा झिम्मा खेळतो
  या गाण्यातही आंबा हा शब्द आहे.
  कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ बी  यांनी लिहिलेले, वसंत प्रभू यांचे संगीत असलेले आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील लोकप्रिय
  चाफा बोलेना, चाफा चालेना
  चाफा खंत करी काही केल्या उमलेना
  या गाण्यातही आंबा हा शब्द आहे.
  गेले आंब्याच्या वनी,
  म्हटली मैनेसवे गाणी
  आम्ही गळ्यात गळे मिळवूनी रे
  असे कवीने पुढील कडव्यात म्हटले आहे.
  गीत, संगीत आणि गायक अशा भूमिकेतील संदीप खरे यांच्या
  मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
  मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही
  या गाण्यातही आंबा आलेला आहे.
  गाण्याच्या शेवटच्या कडव्यात संदीप खरे यांनी
  मज जन्म फळाचा मिळता मिळता मी केळे झालो असतो
  मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो
  मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही
  मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही
  असे म्हटले आहे.
  काही वर्षांपूर्वी प्रदशिर्त झालेल्या जोगवा या चित्रपटातील संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिलेल्या
  मन रानात गेलं गं, पानापानात गेलं गं
  मन चिंचेच्या झाडात, आंब्याच्या पाडात गेलं गं
  या गाण्यातही आंबा या शब्दाचा वापर केलेला आहे. याचे संगीत अजय-अतुल यांचे आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्यावर हे गाणे चित्रित झाले असून ते श्रेया घोषाल यांनी गायलेले आहे.
  आंबा हा शब्द असलेले आणखी एक लोकप्रिय गाण्याने या आंबा पुराणाची सांगता करतो.
  बालकराम वरळीकर यांनी गायलेल्या
  गंगा जमना दोगी बयनी गो पानी झुलझुलू व्हाय
  दर्या किनारी एक बंगला गो पानी जाई जुई जाय
  या गाण्याच्या शेवटच्या कडव्यात आंब्याचा उल्लेख असून
  आंब्याच्या डांगलीवर बसलाय मोर
  पोरीचा  बापूस कवठं चोर
  करवल्या खुडतांना आंब्याच्या डांगल्या
  म्हायेरा जावा सांजवल
  आंब्याची डांगली हलविली
  नवऱयाने नवरीला पलविली
  असे यातील शब्द आहेत
  तर आंबा हा शब्द असलेली अशी ही विविध गाणी. दुधाची तहान ताकावर या उक्तीप्रमाणे आज न परवडणारा आंबा या गाण्यांच्या माध्यमातून आपल्याला चाखायला मिळतो हेही काही कमी नाही.

  (माझा हा लेख लोकसत्ता डॉट कॉमवरील ब्लॉगमध्ये १५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाला आहे)
  त्याची लिंक अशी-
  मंडळी सध्या उhttp://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=226847:2012-05-15-14-10-06&catid=235:2009-09-14-09-37-24&Itemid=235

  13 April 2012

  तरंगते अभंग संत तुकाराम यांच्या भिजक्या वहीतील

  संत तुकाराम यांच्या हस्ताक्षरातील ‘भिजक्या वहीचे अभंग’ हे पुस्तक ६२ वर्षांनंतर पुनर्मुद्रित करण्यात आले आहे. पुनर्मुद्रित पुस्तकाची विशेष बाब म्हणजे या पुस्तकासोबत तुकाराम यांच्या हस्ताक्षरातील (मोडी लिपीतील) पाच अभंग असलेले आणि विशिष्ट रासायनिक प्रक्रिया केलेले एक पान पाण्यावर तरंगणारे आहे. 
  alt


  तुकाराम महाराजांच्या वंशजांकडे १९३० पर्यंत असलेले तुकाराम यांच्या हस्ताक्षरातील अभंग हे ‘भिजक्या वहीतील अभंग’ म्हणून ओळखले जात होते. बॅ. बाबाजी परांजपे यांनी देहू येथे जाऊन या वहीतील अभंग उतरवून घेतले आणि १९५० मध्ये या अभंगांचे पुस्तक काढले. बाबामहाराज सातारकर यांच्या वडिलांनी निरुपण केलेल्या या अभंगांचे पुस्तक धनंजयराव गाडगीळ यांनी प्रकाशित केले होते.


   अत्यंत दुर्मिळ असलेल्या या पुस्तकाच्या फक्त तीन प्रती उपलब्ध होत्या. अभ्यासक आणि तुकाराम महाराज यांच्या भक्तांसाठी ‘वरदा प्रकाशन’ या संस्थेने हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे.  बॅ. बाबाजी परांजपे यांच्या मूळ पुस्तकाच्या तीन प्रती पुणे विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय, तुकाराम महाराज पादुका मंदिर आणि तुकाराम डॉट कॉम या संकेतस्थळाचे दिलीप धोंडे यांच्याकडे होत्या. धोंडे यांनी त्यांच्याकडील प्रत आम्हाला दिली आणि आम्ही त्या मूळ पुस्तकावरून हे पुस्तक पुनर्प्रकाशित केल्याचे वरदा प्रकाशनाचे ह. अ. भावे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. 


  मासिकाच्या आकारातील सुमारे ३९२ पानाच्या या पुस्तकात पाच अभंगांचे स्वतंत्र पान देण्यात आले आहे. पाच अभंगांचे एक पान फ्रेम करून घेण्यासाठी तर एक पान वेगळ्या प्रकारे उपलब्ध करून दिले आहे. रासायनिक अभियंता असलेले आमचे मित्र शरद हर्डिकर यांनी तयार केलेले विशिष्ट रसायन या पानासाठी वापरण्यात आले असून त्यामुळे हे पान पाण्यात बुडत नाही किंवा बुडवले तरी खराब न होता तरंगणारे असल्याची माहितीही भावे यांनी दिली.

  संत तुकाराम यांच्या मूळ अभंगगाथेत सुमारे साडेचार हजार अभंग असून त्यात या भिजक्या वहीतील साडेसातशे अभंगांचाही समावेश आहे. आम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकात हे साडेसातशे अभंग  आहेत. मूळ वहीतील ३६० ते ३६४ या क्रमांकांचे पाच अभंग आम्ही वेगळ्या पानावर दिले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही हे तरंगणारे पान तयार केले असून त्यामागे तुकाराम महाराज यांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही. मूळ पुस्तक पुर्नमुद्रित करताना काहीतरी वेगळे करावे, हाच उद्देश यामागे असल्याचेही भावे यांनी स्पष्ट केले.
  (माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबईच्या मुख्य अंकात (१३ एप्रिल २०१२) पान क्रमांक ७ वर प्रसिद्ध झाली आहे)

  12 April 2012

  तुकाराम महाराज यांचे चरित्र आता कोंकणीत

  आपल्या विविध अभंगांमधून सामाजिक समरसतेचा संदेश देणारे तसेच समाजातील अनिष्ट रुढी-परंपरा, अंधश्रद्धा यावर कोरडे ओढणारे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील महत्वाचे संत तुकाराम यांचे चरित्र आता लवकरच कोंकणी भाषेत उपलब्ध होणार आहे. या पुस्तकात तुकाराम महाराजांच्या काही अभंगांचाही कोंकणी अनुवाद असणार आहे. 


  गोवा राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे माजी अध्यक्ष, गोवा साक्षरता अभियानाचे संचालक आणि गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणारे पद्मश्री सुरेश आमोणकर हे तुकाराम यांचे चरित्र कोंकणीत अनुवादित करत आहेत. आमोणकर यांच्या ‘गीता प्रसार’ या संस्थेतर्फेच हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.


   संत तुकाराम यांच्यावरील ‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळावर ह.भ.प. श्रीधर महाराज मोरे-देहुकर यांनी लिहिलेल्या तुकाराम महाराज यांच्या संक्षिप्त चरित्राचा आणि काही अभंगांचा कोंकणी भाषेत अनुवाद आमोणकर यांनीच केलेला आहे.

  यासंदर्भात ‘लोकसत्ता’ला अधिक माहिती देताना आमोणकर म्हणाले की, तुकाराम महाराज यांनी समाजातील सर्व प्रकारच्या वैयक्तिक आणि सामाजिक ढोंगांवर कोरडे ओढले आहेत. त्यांनी  आपले अभंग आणि कृतीतून साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वी सामाजिक समतेचा जो संदेश दिला, त्याचीच समाजाला सध्या गरज आहे. संत तुकाराम यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग आणि घटना यांचा यात समावेश असेल.    
  (माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबईच्या मुख्य अंकात ( १२ एप्रिल २०१२) पान क्रमांक दहावर प्रसिद्ध झाली आहे) 

  11 April 2012

  मराठी साहित्याला लाभले चित्रपटांचे कोंदण

  मराठी वाचन संस्कृती कमी होत चालली असल्याची ओरड होत असतानाच मराठी साहित्यावर आधारित मराठी चित्रपटांना मात्र चांगले दिवस आले आहेत. मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सकस आणि सशक्त अशा उत्तमोत्तम कथा, कादंबरी यावर चित्रपट निर्मिती करत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला ‘शाळा’ हा मराठी चित्रपट त्याचे ताजे उदाहरण ठरावे. 


  मराठी साहित्य समृद्ध असून त्यात मराठी न समजणाऱ्या व्यक्तींच्याही काळजाला भिडण्याची ताकद आहे. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर याच नावाचा चित्रपट तयार केला आणि भाषाभेदांच्या िभती ओलांडून या चित्रपटाने मराठीला राष्ट्रीयस्तरावर पहिले सुवणपदक मिळवून दिले. ज्येष्ठ साहित्यिक य. गो. जोशी, गो. नी. दांडेकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, वसंत सबनीस आदींच्याही कथा/कादंबऱ्यांवर चित्रपट झाले. मराठी साहित्यावर आधारित चित्रपट तयार करण्याचा हा प्रवास त्यानंतरही असाच पुढे सुरू राहिला.  मराठीतील पहिला राजकीय आणि ‘मल्टिस्टारकास्ट’ म्हणता येईल, असा ‘सिंहासन’ हा चित्रपट अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या दोन कादंबऱ्यांवर आधारित होता. श्री. ना. पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीवरील याच नावाचा चित्रपट, रत्नाकर मतकरी यांच्या ‘जौळ’ कादंबरीवर आधारित ‘माझं घर माझा संसार’, बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘शेलारखिंड’ या कादंबरीवर आधारित ‘सर्जा’, जयवंत दळवी यांच्या ‘महानंदा’ कादंबरीवरील याच नावाचा चित्रपट ही काही निवडक उदाहरणे. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित ‘गोळाबेरीज’ आणि मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवरील याच नावाच्या चित्रपट हे साहित्यावर आधारित चित्रपटांचे अगदी अलीकडचे प्रयत्न म्हणता येतील.  या निमित्ताने मराठीतील उत्तमोत्तम साहित्य चित्रपटांच्या माध्यमातून लोकांपुढे येत असून साहित्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वाचकांकडूनही त्या पुस्तकाला चांगली मागणी येत आहे. काही वाचक त्या पुस्तकाकडे वळत आहेत. मराठी साहित्यासाठी ही चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया साहित्यप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.  दरम्यान, उत्तम बंडू तुपे यांच्या ‘भस्म’ आणि रमेश उद्राटकर यांच्या ‘निशाणी डावा अंगठा’ या कादंबऱ्यांवर निर्माण झालेल्या याच नावाच्या चित्रपटांचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, गेल्या काही वर्षांत मराठी साहित्यावर आधारित चित्रपट तयार होत असले तरी मराठी साहित्यावर आधारित चित्रपटांची आता लाट येईल, असे मला वाटत नाही. एक मात्र नक्की की मराठी साहित्याची आवड आणि आस्था असलेले निर्माते-दिग्दर्शक अशा प्रकारचे चित्रपट तयार करण्याचे धाडस करताहेत, तसेच आजच्या पिढीतील तरुण निर्माते-दिग्दर्शक अशा ‘सिनेमॅटिक’ मराठी साहित्याचा शोध घेत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे.  साहित्यावर आधारित चित्रपट/मराठी कादंबरी
  श्वास- कथालेखिका माधवी घारपुरे यांच्या कथेवर आधारित
  नटरंग- डॉ. आनंद यादव यांच्या ‘नटरंग’वर आधारित
  घर गंगेच्या काठी- ज्योत्स्ना देवधर यांची कादंबरी
  बनगरवाडी- व्यंकटेश माडगूळकर यांच्या पुस्तकावर आधारित
  पांगिरा- विश्वास पाटील यांच्या ‘पांगिरा’वर आधारित  आगामी
  व. पु. काळे यांच्या ‘पार्टनर’वर आधारित श्री पार्टनर
  डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकावर आधारित चरित्रपट
  योगीराज बागुल लिखित पुस्तकावर आधारित विठाभाऊ नारायणगावकर यांच्यावरील चित्रपट ‘विठा’

  (माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १० एप्रिल २०१२ च्या अंकात पान क्रमांक चार वर प्रसिद्ध झाली आहे) 

  09 April 2012

  अनुवाद अकादमीला साडेसाती

  मुंबईत रंगभवन येथे मराठी भाषा भवन उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच विधिमंडळात केली. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले. मात्र ही घोषणा मराठी साहित्य अनुवाद अकादमीच्या घोषणेप्रमाणे ‘बोलाची कढी आणि बोलाचाच भात न राहो’, अशी अपेक्षा साहित्य वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.


  ठाणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य अन्य भारतीय भाषांमध्ये पोहोचविण्यासाठी साहित्यविषयक संस्थांनी योजना सादर केली तर त्याला राज्य शासनाकडून जरुर मदत केली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र त्या वेळी चव्हाण यांना त्यांचेच एक ‘आदर्श’सहकारी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याच विषयी केलेल्या घोषणेचा आणि त्याच्या पूर्ततेचा विसर पडला असल्याची प्रतिक्रिया त्या वेळी साहित्य रसिकांमध्ये उमटली होती. 

  मार्च २००५ मध्ये मुंबईत झालेल्या राज्य ग्रंथ पुरस्कार वितरण सोहळ्यात तत्कालिन सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मराठी साहित्य अनुवाद अकादमी स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर चव्हाण हे मुख्यमंत्रीही झाले. पण मराठी साहित्य अनुवाद अकादमी अद्याप स्थापन झालेली नाही. महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनीही काही वर्षांपूर्वी राज्य शासनाला मराठीतील उत्तमोत्तम पुस्तके भारतातील अन्य प्रादेशिक भाषेत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यावरही अद्याप अनुवाद अकादमी स्थापनेच्या स्वरूपात   कार्यवाही झालेली नाही.

  दरम्यान या संदर्भात मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, केवळ मराठीतील कथा, कादंबरी नव्हे तर विविध क्षेत्रात (माहिती-तंत्रज्ञान, विज्ञान वगैरे) जे लेखन होते ते मराठीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून मराठीत अनुवाद करण्याची प्रक्रिया सुरू करा, असे निवेदन आम्ही तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सादर केले होते. त्यावरही पुढे काही झालेले नाही. राज्य मराठी विकास संस्था आणि राज्य साहित्य-संस्कृती महामंडळ यांचे काम एकच आहे, असे गृहीत धरून त्यांचे विलिनीकरण करणाऱ्या राज्य शासनाकडून मराठी साहित्य अनुवाद अकादमी स्थापन न होणे हे मराठी भाषा-संस्कृतीविषयी असलेल्या शासकीय अनास्थेला सुसंगत असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.

  (माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई च्या मुख्य अंकात (९ एप्रिल २०१२)च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झाली आहे)

  08 April 2012

  व्यवस्थापनाचे विद्यार्थीही गांधी मार्गावर

  महात्मा गांधी यांच्या विचारांबाबत दुमत आणि वाद असला तरी आजही महात्मा गांधी यांचे विचार तरुणांना आकर्षित करत असल्याचे पाहायला मिळत आहे. चेतना मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमधील ‘व्यवस्थापन’ या विषयाच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांचे ‘सत्याचे प्रयोग’ हे आत्मचरित्र आणि गांधी विचारांच्या अन्य पुस्तकांच्यादहा हजारांहून अधिक प्रतींची विक्री केली आहे. याची किंमत सुमारे सव्वा पाच लाख रुपये इतकी आहे.   


  ‘व्यवस्थापन’च्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ‘जागृती’ या उपक्रमात ३६० विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी  मुंबईतील विविध शॉपिंग मॉल्स, कॉर्पोरेट ऑफिसेस् आणि वांद्रे येथील महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी, आयकर भवन, कॅनरा बॅंक, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अ‍ॅक्सिस बॅंक आणि अन्य महत्वाच्या ठिकाणी पुस्तकांच्या विक्रीसाठी स्टॉल उभारले आणि ही पुस्तके विकली.  प्रा. अपर्णा राव, डॉ. प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हा आगळा उपक्रम पार पडला. मुंबई सवरेदय मंडळ आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग यांचेही विशेष सहकार्य या उपक्रमास लाभले होते.

  ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत झालेल्या या उपक्रमाची आखणी, प्रायोजकत्व, व्यवस्थापन, विपणन, विक्री आदी सर्व बाजू विद्यार्थ्यांनीच सांभाळल्या होत्या. व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना विक्री, व्यवस्थापन आणि विपणन यांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठीसह हिंदूी, इंग्रजी, गुजराती भाषेतील महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र (सत्याचे प्रयोग) ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी लिहिलेले ‘टाईमलेस इन्स्पिरेटर-रिलिव्हिंग गांधी’, राम प्रताप लिखित ‘गांधीयन मॅनेजमेंट’ पुस्तकांची विक्री या विद्यार्थ्यांनी केली.

  महात्मा गांधी हे ‘भारतीय व्यवस्थापन गुरू’म्हणून ओळखले जातात. हॉवर्ड विद्यापीठात ‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांना महात्मा गांधी विचारांचा, त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो. गांधी विचार नेमका काय आहे, हे आपल्याही विद्यार्थ्यांना कळावे तसेच आपले शिक्षण हे नुसते पुस्तकी असता कामा नये तर ते विचार, मन आणि कृतीतून झाले पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे उपक्रमाच्या समन्वयक प्रा. अपर्णा राव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

  दरम्यान उपक्रमाच्या समारोपा निमित्त येत्या १० एप्रिल रोजी शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व) येथील चेतना मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट मध्ये सकाळी ११ वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ गांधीवादी आणि निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.    
  (माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबईच्या मुख्य अंकात पान क्रमांक २ वर ८ एप्रिल २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे)

  30 March 2012

  नाराज खेळी

  शिवसेना आणि मनसे यांच्यातील वाद, शितयुद्ध सुरू असून नाराज ठाकरे यांनी आता एक नवी खेळी खेळली आहे. ठाणे महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेने आपला पाठिंबा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला जाहीर केला आहे. राज यांच्या या भूमिकेचा थेट फटका शिवसेनेला बसणार आहे. राज यांच्या पाठिंब्यामुळे स्थायी समितीत शिवसेना-भाजप-रिपाई महायुती आणि कॉंग्रेस आघाडी व मनसे यांचे संख्याबळ समसमान झाल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली तर चिठ्ठी टाकून अध्यक्षाची निवड करावी लागणार आहे. अर्थात हा धोका न पत्करता कॉंग्रेस आघाडी महायुतीचे सदस्य फोडून किंवा त्यांना गैरहजर राहायला लावून महापालिका तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडून हस्तगत करण्याचा नक्की प्रयत्न करेल.

  ठाणे महापालिका महापौर-उपमहापौर निवडणुकीत राज ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा व्यक्त केला होता. साहजिकच नाशिक महापालिकेत आपल्या म्हणजे मनसेच्या उमेदवाराला शिवसेनेकडूनही तसाच पाठिंबा मिळावा, अशी राज यांची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. मनसेचा महापौर होऊ नये म्हणून शिवसेना रडीचा डाव खेळली. मात्र तेथे भाजपने मनसेबरोबर जाऊन मनसेचा महापौर केला.शिवसेनेवरील त्या रागाचा वचपा आता राज ठाकरे काढत आहेत.

  मी कोत्या मनाचा नाही, नाशिक महापालिकेत शिवसेनेने मनसेला पाठिंबा न दिल्यामुळे ठाण्यात स्थायी समितीच्या निवडणुकीत मी शिवसेनेला पाठिंबा देत  नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. शिवसेनेने बसपाच्या नगरसेवकाला उमेदवारी दिल्याने आपला पाठिंबा शिवसेनेला नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. बसपाचे कारण देत राज यांनी त्यापेक्षा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार बरा व त्यासाठी मनसेचा पाठिंबा कॉंग्रेस आघाडीला असल्याचा मुलामा राज यांनी या सर्व प्रकाराला दिला आहे. त्याआधी कोकण विभागीय आयुक्तांकडेही राज यांनी ठाणे महापालिकेत मनसे कॉंग्रेस आघाडीबरोबर असेल, असे पत्र दिले आहे.

  यामध्ये राज यांचा राजकीय फायदा किंवा काही दूरगामी विचार असला तरी त्यांनी असे करायला नको होते. मुळात दोन्ही कॉंग्रेसशी राज यांच्या पक्षाची वैचारिक नाळ जुळणारी नाही. ती शिवसेना किंवा भाजपशी जवळची आहे. त्यामुळे तात्कालिक फायदा न पाहता किंवा शिवसेनेला धडा शिकवायचा म्हणून राज यांनी कॉंग्रेसच्या जवळ जायला नको होते. महापौर निवडणुकीत मनसेने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. अनेकांना राज यांची भूमिका आवडली. अपक्षांच्या मदतीने होणारा घोडेबाजार आणि नको त्या सौदेबाजीला त्यामुळे नक्कीच पायबंद बसला.

  त्यामुळे राज यांनी ठाणे महापालिकेत आपले स्वतंत्र अस्तीत्वच ठेवायला हवे होते. महापौर निवडणुकीत पाठिंबा दिला असला तरी स्थायी समितीच्या निवडणुकीत तो मिळणार नाही, असे िशवसेनेला सांगून या निवडणुकीत मनसेने तटस्थ राहायला हवे होते. मग त्यातून शिवसेनेला फायदा झाला असता तरी चालले असते. कारण त्यामुळे सर्वसामान्य मतदारांच्या मनात राज आणि मनसेविषयी जी चांगला प्रतिमा निर्माण झाली होती, ती तशीच राहिली असती. आता अन्य राजकीय नेते आणि पक्षांप्रमाणे राज यांनी सौदेबाजी केली असेच मतदारांना वाटत राहील. कोकण विभागीय आयुक्तांकडे मनसेने आपण कॉंग्रेस आघाडीबरोबर असल्याचे पत्र दिल्याने राज यांना आता कायम कॉंग्रेस बरोबर फरफटत जावे लागणार आहे. महापालिकेत कॉंग्रेस आघाडीचा जो आदेश असेल तो मनसेच्या नगरसेवकानाही पाळावा लागेल.

  कल्याण-डोंबिवली महापालिकेतही राज यांना कॉंग्रेस आघाडीबरोबर जाऊन सत्ता स्थापन करण्याची किंवा सौदेबाजी करून अन्य पदे मिळविता आली असती. पण येथे मनसेने विरोधी पक्षात बसणे पसंत केले. राज यांच्या या भूमिकेला सर्वसामान्य मतदार व समाजातील विविध क्षेत्रातील लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यामुळे मतदारांसमोर मनसे व राज यांच्याविषयी वेगळी प्रतिमा निर्माण झाली. आता नशिकमधील प्रकरणाचा वचपा त्यांनी ठाण्यात काढला आहे. तसेच त्यांनी कल्याण-डोंबिवलीत केले तर मनसेला सत्ता चाखायला मिळेल, पण विरोधात राहून आणि कॉंग्रेसबरोबर न जाता त्यांनी जे काही मिळवले होते, ते मात्र धुळीला मिळेल.

  जाता जाता उद्धव यांच्याबद्दल. ठाण्यात मनसेने जाहीर पाठिंबा दिल्यानंतर तुम्ही नाशिकमध्ये मनसेचा उमेदवार महापौर म्हणून निवडून आणायला हवा होता. त्यासाठी रडीचा डाव खेळण्याची गरज नव्हती. कारण कल्याण-डोंबिवली महापालिका, अंबरनाथ नगरपालिका, ठाणे महापालिकेत आपल्याला निर्विवाद बहुमत नाही आणि नाशिक प्रकरणाचा फटका या ठिकाणी बसू शकतो, हे त्यांना समजले नाही की केवळ राज आणि मनसेच्या आकसापोटी त्यांनी आपल्याही पायावर धोंडा पाडून घेतला, हे येणारा काळ ठरवेल.

  29 March 2012

  ही तर पैशांची उधळपट्टी

  राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या आत्तापर्यंत झालेल्या  परदेश दौऱयावर २०५ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती उघड झाली आहे. भारतासारख्या गरीब आणि डोक्यावर हजारो कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या देशाच्या राष्ट्रपतींनी इतके दौरे करण्याची गरज होती. या पररदेश दौऱयावर झालेला खर्च म्हणजे केवळ उधळपट्टी आणि सरकारी पर्यायाने करदात्या नागरिकांच्या पैशांवर केलेली सहल असल्याचेच म्हणावे लागेल. या दौऱयातून नेमके काय साधले गेले, देशाचा खरोखरच काही फायदा झाला का, याची उत्तर देशाच्या नागरिकांना मिळायला पाहिजेत.

  राष्ट्रपती हे आपल्या देशाचे सर्वोच्च पद असले आणि उपचार म्हणून असे दौरे करावे लागत असले तरी दौऱयावर खर्च झालेली एकूण रक्कम पाहता हे दौरे करणे खरोखऱच आवश्यक होते का, असा प्रश्न निर्माण होतो. जुलै २००७ मध्ये प्रतिभा पाटील यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली. आजपर्यंत त्यांनी १२ परदेश दौऱयांमध्ये बारा देशांना भेट दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपतींसाठी चार्टर्ड फ्लाईट म्हणून घेतलेल्या बोईंग ७४७-४०० या विमानाचे भाडे १६९ कोटी रुपये झाले असून त्यापैकी १६ कोटी रुपये अद्याप चुकते करायचे आहेत. परदेशातील वास्तव्य, स्थानिक प्रवास, दैनंदिन भत्ता व अन्य खर्चासाठी ३६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

  लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो, संसद/राज्यसभा किंवा राज्याची विधानसभा/ विधानपरिषद यावर निवडून गेल्यानंतर ही मंडळी खासदार आणि आमदार म्हणून ओळखली जातात, या मंडळींना मिळणारे मासिक वेतन, अधिवेशन सुरू असताना मिळणारा भत्ता, खासदार-आमदार म्हणून मिळणाऱया सोयी, सवलती हे सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. निवडून आलेला आमदार/खासदार मंत्री झाला की सरकारी खर्चाने त्याचेही विविध दौरे सुरू होतात. त्यांना मिळालेले दालन आणि बंगला कितीही चांगला असला तरी सुशोभीकरण व डागडुजीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये त्यासाठी खर्च केले जातात. हे सर्व सरकारी पर्यायाने करदात्या नागरिकांच्या खिशातूनच केले जाते.

  देशातील/राज्यातील काही टक्के लोकांना दोन वेळा जेवायला मिळत नाही, अंगभर कपडे घेता येऊ शकत नाहीत. अनेक गावांमधून पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, वैद्यकीय सोयी-सुविधा यांची वानवा असताना ही मंडळी मात्र निर्लज्जपणे आपल्या स्वतसाठी पैसा उधळत असतात. आपण काही चुकीचे वागतोय, असे त्यांना अजिबात वाटत नाही. किमान जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा ना, स्वतचे वेतन आणि भत्ते वाढवून घेण्यासाठी एरवी एकमेकांना पाण्यात पाहणारे सर्वपक्षीय सदस्य येथे मात्र एक होतात. कोणतीही चर्चा न करता काही मिनिटात या संदर्भातील विधेयक मंजूर करून घेतात, हे आजवर अनेकदा घडले आहे. जितके ओरबाडता येईल, तितके ओरबाडून घेऊ या, अशीच बहुतांश जणांची (काही अपवाद वगळता) वृत्ती असते.

  अनेकदा राज्य किंवा केंद्रातील अनेक मंत्रीही अभ्यासदौऱयाच्या नावावर परदेशात जाऊन  मजा करून येतात. मंत्री कशाला स्थानिक नगरपालिका/महापालिका पातळीवरही याचे लोण पसरले आहे. नगरसेवकांचेही असेच दौरे काढले जातात. मुळात अशा दौऱयांची खरोखरच गरज आहे का, दौरे आखले जातानाच ज्या ठिकाणी ही मंडळी जाणार आहेत, तेथील शासन किंवा संबंधितांना त्यांचा सर्व खर्च करण्यास सांगितले गेले पाहिजे. असा दौरा असेल तरच तो केला जावा. आपल्या देशाच्या तिजोरीवर आणि करदात्या नागरिकांच्या खिशावर आर्थिक बोजा न टाकता किंवा आपल्या पैशांवर या मंडळींनी पाहिजे तितके दौरे खुशाल करावेत, अशी अट टाकली गेली पाहिजे. त्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातून दबाव आला पाहिजे.

  आत्ता माहितीच्या अधिकाराखाली राष्ट्रपतींच्या परदेश दौऱयाबाबतची माहिती समोर आली. त्यांच्याबरोबरच पंतप्रधान, उपराष्ट्रपती, केंद्रातील सर्व मंत्री, खासदार, राज्यांचे मुख्यमंत्री, येथील मंत्री यांच्या आजवर झालेल्या परदेश दौऱयांचीही माहिती समोर आली पाहिजे. तसेच ही मंडळी परदेशात अभ्यास दौऱयाच्या नावावर जाऊन काय दिवे लावतात, तेथे कोणता अभ्यास करतात, या दौऱयातून देशाला /राज्याला खरोखऱच काही फायदा होता को, त्याची सविस्तर माहिती त्यांनी नागरिकांना दिली पाहिजे. निवडणूक सुधारणांमध्ये किंवा संसदेत/विधिमंडळात तसा कायदा झाला पाहिजे. तो करण्यासाठी सामाजिक संस्था, जागरूक मतदार, प्रसारमाध्यमे आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येण्याची गरज आहे. अन्यथा अभ्यासदौऱयांच्या नावाखाली करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी अशीच सुरू राहील.

     28 March 2012

  तुझ्या गळा माझ्या गळा

  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱयांच्या विरोधात लोकसभेतील सर्वपक्षीय खासदार एकत्र आल्याचे दिसून आले. राजकीय हेवेदावे, मारामाऱया आणि अन्य वेळी एकमेकांना पाण्यात पाहणाऱया या सर्व मंडळींनी अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱयांच्या विरोधात मात्र तुझ्या गळा माझ्या गळा असे धोरण अवलंबिले आहे. आता निमित्त आहे ते अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याचे. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर केजरीवाल काही चुकीचे बोलले आहेत, असे वाटत नाही. उलट ते सत्य बोलले असून सत्य हे नेहमीच कडवट असते.

  संसदेमध्ये निवडून आलेल्या खासदारांमध्ये अनेक सदस्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले असल्याचे वक्तव्य केजरीवाल यांनी केले होते. त्यापुढे जाऊन संसद सदस्यांमध्ये चोर, दरोडेखोर अशांचा भरणा असल्याचेही ते म्हणाले होते. अशा सदस्यांची नावेही त्यांनी दिली होती. केजरीवाल यांच्या वक्तव्यावरून संसदेतील सर्वपक्षीय खासदार चिडले असून त्यांनी अण्णा आणि त्यांच्या सहकाऱयांना समज दिली आहे. +केजरीवाल यांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खासदारांची यादी तयार करून ती सर्व प्रसारमाध्यमांकडे पाठवावी आणि प्रसारमाध्यमानीही ही नावे सर्व लोकांपुढे आणावित.  

  संसदेतील खासदार हे आपल्या लोकशाहीतील सर्वोच्च पद आहे, येथे निवडून जाणारी व्यक्ती किमान पदवीधर, सुशिक्षित, अभ्यासू आणि स्वच्छ चारित्र्याची असावी, अशी अपेक्षा मतदारांनी ठेवली तर त्यात काही चूक आहे, असे वाटत नाही.पण प्रत्यक्षात तसे घडते का, काही अपवाद वगळता केवळ पैसा आणि बाहूबल असलेल्या उमेदवारांनाच राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते. प्रामाणिक कार्यकर्ता मागे राहतो. निवडून येऊ शकणारा आणि हवे तितके पैसे फेकणारा असा निकष उमेदवारी देताना लावला जातो. असाच प्रकार ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळेसही होतो.

  नगरसेवक /आमदारकीच्या निवडणुकीत अशा गुन्हेगार मंडळींना उमेदवारी दिली जाते आणि ते निवडूनही येतात. स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांवर मात्र अन्याय होतो. गुंड, गुन्हेगार प्रवृत्ती असलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली आणि त्याविरोधात कोणी ओऱड केली तर त्यांच्यावरील गुन्हे सिद्ध व्हायचे आहेत, जो पर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तो पर्यंत त्यांना गुन्हेगार कसे म्हणता येईल, असा युक्तीवाद राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून केला जातो. काही वेळेस विरोध मोडून काढून, साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्याच माणसाला उमेदवारी दिली जाते. मतदार, प्रसारमाध्यमे काही दिवस ओरड करतील आणि नंतर सर्व काही शांत होईल, मतदार विसरून जातील, याची पक्की खात्री या राजकीय नेत्यांना असते आणि तसेच घडते.

  निर्लज्ज आणि कोडगे झालेले राजकीय पक्ष, त्यांचे नेते सर्वसामान्य मतदारांना गृहीत धरतात आणि आपणही जाऊ दे, आपल्याला काय त्याचे असे म्हणून सोडून देतो. सुशिक्षित समाज तर मतदानासाठीही घराबाहेर पडत नाही. सुट्टी मिळाली की मजा करायला बाहेर जातो. मतदान हे आपले कर्तव्य आणि अधिकार आहे. त्या माध्यमातून आपण प्रामाणिक, सुशिक्षित आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार निवडून दिले पाहिजेत. एका निवडणुकीतून हा बदल घडणार नाही. त्यात सातत्य ठेवावे लागेल. अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी नकारात्मक मतदानासाठी प्रयत्न करत आहेत. दिलेल्या उमेदवारांपैकी आम्हाला कोणीही पसंत नाही. असा एक पर्याय मतदान यंत्रावर असलाच पाहिजे आणि त्यासाठी जे मतदान होईल, त्याचीही नोंद घेतली जाणे आवश्यक आहे.

  अर्थात निवडणूक प्रक्रियेत अशा सुधारणा करणे हे संसदेच्या पर्यायाने सर्वपक्षीय खासदारांच्याच हातात आहे. आणि अशा चांगल्या गोष्टींना ते कधीही तयार होणार नाहीत. त्यासाठी जागरूक मतदारांचाही दबावगट तयार झाला पाहिजे. निवडणूक प्रक्रियेत सुधारणा आणि चांगले बदल घडवून आणण्यासाठी जी मंडळी किंवा संस्था/संघटना प्रयत्न करत आहेत, त्यांची चेष्टा न करता, किंवा असे करून काही होणार आहे का, असा नकारात्मक विचार न करता, अशा प्रयत्नांना आपणही पाठिंबा दिला पाहिजे.  

  27 March 2012

  कवी ग्रेस आणि आकाशवाणी


  कविता आणि ललित लेखनाने मराठी साहित्यात स्वतंत्र ठसा उमटवलेले साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी ग्रेस यांच्या निधनाच्या बातमीला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या ‘अस्मिता’ वाहिनीवरील दुपारच्या प्रादेशिक बातम्यांमध्ये अखेरचे स्थान मिळाले. कवी ग्रेस यांची कविता सर्वसामान्यांना समजण्यास कठीण असली तरी त्यांच्या काही कवितांना गाण्याचे कोंदण लाभल्यामुळे त्या कवितांची गाणी लोकप्रिय झाली. ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’, ‘भय इथले संपत नाही’, ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’ ही त्याचीच काही उदाहरणे.
   ‘प्रादेशिक बातम्या’ या शब्दातूनच या बातमीपत्रात महाराष्ट्र, मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींना प्राधान्याने स्थान असावे, अशी अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या ‘अस्मिता’ वाहिनीवरून दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी प्रसारित करण्यात येतात व त्याला मोठा श्रोतृवर्ग आहे. 
  ग्रेस यांच्या निधनाच्या वृत्तानंतर खासगी मराठी वृत्तवाहिन्यांनी ‘ब्रेकिंग न्यूज’ किंवा ‘महत्त्वाचे’ म्हणून ग्रेस यांच्या निधनाची बातमी चालविणे सुरू केले. ग्रेस यांच्या कविता, कवितांची झालेली गाणी, ग्रेस यांच्याविषयी मान्यवरांची श्रद्धांजली असे त्याचे स्वरूप होते. खासगी वृत्तवाहिन्या किंवा वृत्तपत्रांच्या ई-आवृत्त्यांमधून ही महत्त्वाची बातमी ठरल्याने अनेकांपर्यंत ती पोहोचलीही होती. त्यामुळे दुपारच्या प्रादेशिक बातम्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना ग्रेस यांच्या निधनाची बातमी ठळकपणे सांगितली जाईल, अशी अपेक्षा होती. 
  पण सर्वप्रथम पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा कोरिया दौरा, राज्याचा अर्थसंकल्प, नाशिकमध्ये घरात घुसलेला बिबटय़ा आणि अन्य काही बातम्या व त्यानंतर ग्रेस यांच्याबाबतची शेवटची बातमी होती. त्यामुळे आकाशवाणीने ‘चटावरले श्राद्ध’ उरकल्याची प्रतिक्रिया श्रोते आणि ग्रेसप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
  (माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २७ मार्च २०१२ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे) 

  24 March 2012

  कडवा धर्माभिमान

  कडवा धर्माभिमान असावा की नसावा हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण आपल्या हिंदू धर्मियांच्या तुलनेत मुसलमान आणि ख्रिश्चन हे कितीतरी पटीने अधिक कडवे आहेत. आपण हिंदू धर्म, देव-देवता, हिंदू संस्कृतीचे मानबिंदू याबाबत जितके उदासिन असतो (काही कट्टर हिंदू धर्मियांचा अपवाद) तितके किंबहुना आपल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मिय धर्माबाबत कडवट असतात.

  मुंब्रा येथे एका विवाह सोहोळ्यात फटाके फोडल्यानंतर त्यात कुराणांतील आयते लिहिलेला कागद वापरलेला दिसून आल्याने मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांचा उद्रेक झाला. वातावरण तंग बनले. रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्यात आली, काही काळ रेल्वे वाहतूकही ठप्प झाली. मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जाण्यासाठी हे एक निमित्त ठरले, असे आपण क्षणभर गृहीत धर या. पण अन्य वेळीही मुस्लिम धर्मिय पराचा कावळा करत भावना दुखावल्याचा कांगावा करतात आणि मुस्लिमांचे लांगूनचालन करणारे राजकीय नेते, पोलीस आणि राज्यकर्ते अशा वेळी सोयीस्कर मौन बाळगतात.

  शांतता क्षेत्राचा किंवा वेळेची मर्यादा न पाळता मशिदीवर ध्वनिवर्धकावरून देण्यात येणारी बांग, रस्ता अडवून आणि वाहतुकीची कोंडी करून रस्त्यावर पढण्यात येणारा नमाज, मुसलमानांच्या भावना दुखावतात म्हणू गणेशोत्सव,शिवजयंती किंवा अन्य हिंदू सणांच्या वेळेस बदलण्यात येणारा मिरवणुकीचा मार्ग, मशिदीवरून मिरवणूक नेताना वाद्य, ढोल-ताशे वाजविण्यात घालण्यात आलेली बंदी हे कशाचे द्योतक आहे. इतक्या सवलती मुस्लिम राष्ट्रात राहणाऱया तेथील अल्पसंख्यांकाना म्हणजे हिंदून मिळतात का, तसेच तेथे राहणाऱया मुसलमानांसाठीही अशा प्रकारे कायदे धाब्यावर बसवले जातात का.

  मुसलमान किंवा ख्रिश्चन जेवढे कडवट धर्माभिमानी आहेत, त्यांच्या भावना दुखावल्यानंतर तो सर्व समाज, त्यांचे पुढारी, धार्मिक नेते जसे एकत्र येतात, तसे आपण हिंदी कधी येतो का, नाटक, दूरदर्शन आणि चित्रपटांमधून आपणच आपल्या धर्माची, देव-देवतांची टिंगल करत असतो, हिंदू धर्माभिमान्यांनी अशा गोष्टींना विरोध केला तर तेथे व्यक्तिस्वातंत्र्यांचा कंठशोष केला जातो. दिवंगत चित्रकार हुसेन यांनी आपल्या देवदेवतांची नग्न चित्रे काढली आणि त्यास हिंदू संघटना/धर्माभिमान्यांनी प्रखर विरोध केला तर त्याला काही अपवाद सोडले तर किती राजकीय पक्ष आणि नेत्यांनी उघडपणे पाठिंबा दिला, हुसेन यांचा जाहीर निषेध केला,  उत्तर नाही असेच आहे.

  महाराष्ट्र शासन अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत (जादूटोणा विरोधी विधेयक) एक कायदा आणत आहे. संत, वारकरी, हिंदुत्ववादी संघटना  यांनी त्याला प्रखर विरोध केला आहे. अंधश्रद्धा फक्त हिंदू धर्मात नाहीत त्या मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातही आहेत. पण झोडपायचे आणि उपदेशाचे डोस पाजायचे ते फक्त हिंदूना. हिंदू सोडून अन्य धर्मियांच्या बाबतीत असे काही करायला गेले तर ते चवताळून उठतात. दिवाळीत आपण फटाके फोडतो, त्यावर सर्रास हिंदू धर्मातील देव-देवतांची चित्रे असतात, पाश्चिमात्य देशात तर चपला, प्रसाधनगृहे आदी ठिकाणी हिंदू देव-देवतांची विटंबना केली जाते. काही उत्पादनेही आपल्या जाहिरातीत देव-देवतांना विकृत स्वरूपात सादर करतात, त्यांची टिंगल करतात. पणआपण किती जण चवताळून उठतो, दुर्देवाने खूप कमी.

  हिंदू धर्मातही ज्या अनिष्ट रुढी-परंपरा होत्या त्या दूर करण्यासाठी आपल्याच धर्मातील मंडळी पुढे आली. सती, केशवपन, अशा अनिष्ट रुढी आपणच दूर केल्या. विधवा पुर्नविवाह, हुंडा बंदी, स्त्री शिक्षण, अनेकांनी समाजात रुजवले. अद्यापही जात-पात असली आणि काही जणांकडून त्याचा अतिरेक केला जात असला तरी बरयाच प्रमाणात सुशिक्षित समाजात त्याची बंधने शिथिल होऊ लागली आहेत. आंतरजातीय विवाह होऊ लागले आहेत. हे हिंदूधर्मिय सहिष्णू आणि धर्मातील अनिष्ट रुढी-परंपरेच्या विरोधात असल्याचे द्योतक आहे. आपण हळूहळू नक्की बदलतोय.

  अन्य धर्मियांच्या विशेषत मुसलमान आणि ख्रिश्चन धर्मियांच्या मानाने आपण खूप सहिष्णू आहोत. पण म्हणून अन्य धर्मीय त्याचा गैरफायदा घेत असतील आणि आपल्याच हिंदूबहुल देशात आपल्याला दुय्यम वागणूक मिळत असेल, अल्पसंख्यांक म्हणून मुसलमानांचे लांगूनचालन होणार असेल, कोणीही येऊन हिंदू धर्म आणि आपल्या मानबिंदुंची येथेच्छ टिंगल आणि बदनामी करत असेल तर आपण हिंदू धर्मियानाही सहिष्णुता, बोटचेपेपणा, जाऊ दे मला काय त्याचे, अशी वृत्ती सोडून काही प्रमाणात तरी कडवट होणे गरजेचे आहे, असे मला वाटते.                       

  23 March 2012

  गुढीपाडवा लघुसंदेश

  गेल्या काही वर्षात मोबाईलचे अर्थात भ्रमणध्वनी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे महत्व खूप वाढले असून नवी पिढीसाठी या वस्तू जिव्हाळ्याच्या ठरल्या आहेत. भ्रमणध्वनीवरील लघुसंदेशातून (एसएमएस) एक नवी भाषा तयार झाली आहे. थोडक्यात आणि मोजक्या शब्दांत आपले म्हणणे मांडणे व आपला निरोप दुसऱयांपर्यंत सहजतेने पाठवणे भ्रमणध्वनीमुळे शक्य झाले आहे.


  नेहमीच्या एसएमएस बरोबरच भारतीय सण, उत्सवाच्या निमित्तानेही या लघुसंदेशांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण केली जाते. यातून मोबाईल कंपन्यांचा गल्ला चांगला भरतो. हे सर्व लघुसंदेश म्हणजे छोट्या स्वरुपाच्या कविता किंवा चारोळ्या असतात. आपल्याला आलेला असा एखादा चांगला लघुसंदेश आपण आपले मित्र, नातेवाईक यांना पाठवतो. ती मंडळी त्यांच्या परिचितांना पाठवतात आणि असा एखादा लघुसंदेश वेगाने सर्वत्र पाठवला जातो.


  आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, अर्थात गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मराठी तील काही लघुसंदेशांचे संकलन येथे केले आहे. आपल्याकडेही असे काही नवे शुभेच्छा लघुसंदेश असतील, आपणते पाठवलेही असतील.   आनंदाची उधळण करत
  चैत्र पंचमी दारी येता      
  नव्या ऋतूत उत्साहाची पालवी फुलावी
  पानाफुलांचे तोरण बांधून दारी
  इच्छा आकांक्षांची गुढी उभारू
  आपुल्या दारी  शांत निवांत शिशिर सरला
  सळसळता हिरवा वसंत आला
  कोकिळेच्या सुरावटीसोबत 
  चैत्र पाडवा दारी आला


  आयुष्य एक वीणा अन सुर भावनांचे
  गा घुंद होऊन तू संगीत नववर्षांचे


  नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी
  विसरून जाऊ जुने दुख
  अन पाहू नवे सुख
  करू नवा संकल्प मनाशी 
  स्वताला आणि समाजालाही समृद्ध करायचा


  सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे
  सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
  सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा 
  गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 


  रेशमी गुढी, कडुनिंबाचे पान
  नववर्ष सुखाचे जावो छान


  चैत्राची सोनेरी पहाट
  नव्या स्वप्नांची नवी लाट
  नवा आरंभ नवा विश्वास
  नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात


  उभारा गुढी सुखसमृद्धीची
  सुरुवात करू या नववर्षाची
  विसरू ती स्वप्ने भूतकाळाची
  वाटचाल करू या नव आशेची


   तूर्तास येथेच थांबतो. आपल्या सर्वानाही गुढीपाडव्याच्या अर्थातच हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  14 March 2012

  जपानच्या जिद्दीला सलाम


  जपानमधील प्रलयंकारी सुनामीला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. ही दूर्घटना जेव्हा घडली त्यावेळी सर्व दूरचित्रवाहिन्यांवरून त्याची दृश्ये दाखवली जात होती. ही दृश्ये पाहून जपानमध्ये झालेला हाहाकार आणि वाताहत पाहून अंगावर शहारे आले होते. न भूतो असा तो प्रकार होता. जे झाले ते झाले, पण त्यातून जपान देश सावरला आणि पुन्हा जोमाने उभा राहिला. होत्याचे जे नव्हते झाले ते जपानने पुन्हा उभे केले. अर्थात हे सर्व करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती व धाडस, तातडीने घेतलेले निर्णय आणि जपानी लोकांची मानसिकता, संकटावर मात करून जिद्दीने उभे राहण्याची इच्छा आणि त्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न याला विसरून चालणार नाही.

   या संदर्भातील एक मेल मला माझे ज्येष्ठ मित्र दिलीप प्रधान यांच्याकडून पाठविण्यात आला होता. त्यात जपानमध्ये घडलेल्या प्रलयंकारी सुनामी व भुकंपाची २७ छायाचित्रे आहेत. यातील २ ते २७ या छायाचित्रांचे विशेष म्हणजे यापैकी एकेक छायाचित्रावर टिचकी मारकी की वर्षभरापूर्वी या दूर्घटनेच्या वेळी त्या त्या ठिकाणी काय परिस्थिती होती, त्याचे छायाचित्र आपल्या समोर येते. पहिल्या छायाचित्रात डावीकडे सुनामी आली तेव्हाचे आणि उजवीकडील छायाचित्रात सुरळीत झालेले जनजीवन पाहायला मिळते. तर बाकीच्या छायाचित्रात वर्षभरानंतर जपान शासनाने सुनामीचा फटका ज्या ज्या ठिकाणी बसला तेथील  जनजीवन कसे पूर्वपदावर आणले त्याची छायाचित्रे आहेत. पण यापैकी प्रत्येक छायाचित्रावर क्लिक केल्यानंतर सुनामीच्या प्रसंगीचे भीषण आणि भयानक वास्तव समोर उलगडते.

  हे वास्तव आणि जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी जपानने केलेले प्रयत्न आणि त्याचे प्रत्यक्ष दिसणारे दर्शन पाहिल्यानंतर मनात फक्त एकच प्रतिक्रिया उमटते, 

   सलाम, सलाम आणि त्रिवार सलाम

  आपल्याला ही सर्व छायाचित्रे आणि याविषयीची अधिक माहिती खालील संकेतस्थळावर पाहता येईल. 
    
  http://www.boston.com/bigpicture/2012/03/japan_tsunami_pictures_before.html

  13 March 2012

  कहाणी हेमलकसाची

  कुष्ठरुणांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेले दिवंगत बाबा आमटे यांचे सुपुत्र आणि आपल्या वडिलांच्या सामाजिक सेवेचा वारसा ताकदीने पुढे नेणारे व सामाजिक कार्यासाठी आपले आयुष्य झोकून दिलेले डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदा हे महाराष्ट्राला परिचित आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांचे नाव व काम पोहोचले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प आणि त्यांनी या भागात आदिवासींसाठी केलेले काम ही त्यांची मुख्य ओळख आहे. हेमलकसाची ही कहाणी आता लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. विधिज्ञ समृद्धी पोरे यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन पोरे यांचे आहे.

  धाडसी निर्णय एवढ्यासाठीच म्हटले की अशा विषयावर चित्रपट तयार करणे, बॉक्स ऑफिसवरील आणि अन्य व्यावसायिक गणिते जुळविणे यात कदाचित हा सर्व व्यवहार आतबट्ट्याचाही ठरू शकेल. पण समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून देणाऱया अशा माणसांचे कार्य आणि कर्तृत्व समाजापुढे येणे खरोखऱच आवश्यक आहे. सध्याच्या मी आणि माझे एवढ्यापुरतेच पाहण्याची वृत्ती वाढीस लागलेल्या समाजासाठी असे काम करणारी मंडळी दीपस्तंभ आहेत. समृद्धी पोरे यांनी चित्रपटाच्या माध्यमातून ते समाजापुढे आणण्याचे ठरवले याबद्दल त्यांचे अभिनंदन.

  हेमलकसा आणि लोकबिरादरीच्या कामाची माहिती देणारे डॉ. प्रकाश आमटे यांनी लिहिलेले प्रकाशवाटा हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचा आधार चित्रपटसाठी घेतला जाणार आहे. १९७१ मध्ये या भागात वीज, पाणी, आरोग्यविषयक सुविधा अजिबात नव्हत्या.घनदाट आणि रौद्र जंगल, अत्यंत विषम हवामान, राहायला घर नव्हे तर झोपडी किंवा सपाट जमीन नाही, अशी प्रतिकूल परिस्थिती येथे होती. भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडलेल्या आदिवासींमध्ये विश्वास निर्माण करून आपले काम त्यांच्यात रुजविणे, हे खरोखरच आव्हानात्मक काम होते.  डॉ. प्रकाश व मंदा आणि त्यांच्या सहकाऱयांनी येथे अक्षरश शून्यातून सगळे काही उभे केले. आज या आदिवासी भागात उत्तम प्रकारची शाळा, दवाखाने, रुग्णालय, पाळणाघर, वीज, रस्ते, पाणी आदी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

  डॉ. प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा पुस्तकातील एक प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे. ते लिहितात
  अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेला एक माडिया उपचारांसाठी आला. त्याच्या चेहर्‍याचा ओठांपासूनचा टाळूपर्यंतचा भाग अस्वलाने एखादे फळ सोलावे, तसा सोलून काढला होता. (त्या चेहर्‍याचा फोटो तर डोळ्यांसमोरुन जाता जात नाही). डोळे फुटलेले, संपूर्ण आंधळा झालेला तो माणूस शुद्धीवर होता, आपल्यावर हल्ला कसा झाला ते सांगत होता. जखमेत माती, पालापाचोळा गेलेला. ती जखम बघून एक शिकाऊ डॉक्टरला तर चक्करच आली.मी हळूहळू ती जखम स्चच्छ केली. जखम शिवायची म्हटले तर भूल कुठेकुठे म्हणून द्यायची, म्हणून भूल न देताच त्याचा फाटलेला चेहरा शिवायला सुरवात केली. जखमेवर घातलेले दीडशे टाके पूर्ण होईतो तो माडिया शांतपणे सहन करत बसला होता. चार-पाच दिवसांत तो बरा होऊन चालत आपल्या घरी गेला. 

  असे अनेक प्रसंग, आठवणी डॉ. आमटे यांनी यात सांगितल्या आहेत. असो. तर अशा ध्येयवेड्या आणि समाजासाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिलेल्या दाम्पत्याची कहाणी आणि प्रकल्पाची ओळख या चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे. खरे तर समाजात अशा प्रकारचे काम करणाऱया मंडळींची आणि त्यांच्या कामाची ओळख दूरचित्रवाहिनी  मालिका, चित्रपट, नाटक अशा दृकश्राव्य माध्यमातून अधिक प्रमाणात झाली पाहिजे. लेख, कादंबरी अशा माध्यमातून हे कार्य लोकांपुढे येत असतेच. पण छापील शब्दांपेक्षा दृकश्राव्य माध्यमाचा परिणाम मोठा असतो. प्रेक्षकांच्या मनाचा तो जास्त प्रमाणात ठाव घेतो. समाजातील तरुणांना त्यापासून प्रेरणा मिळण्यासाठी ते परिणामकारक ठरू शकते.

  अर्थात असे चित्रपट आणि नाटक तयार झाले म्हणजे संपूर्ण समाज एका रात्रीत बदलेल असा भावडा विश्वास नाही. पण चित्रपट/नाटक पाहून त्यापैकी काही टक्के लोकांनी तरी प्रेरणा घेतली आणि त्यांच्या मनोवृत्तीत बदल झाला तरी ते यश आहे, असे नक्की म्हणता येईल.
   
  डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा-लोकबिरादरी प्रकल्पाबाबत http://lokbiradariprakalp.org/ या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळू शकेल. जिज्ञासूंनी येथे जरुर भेट द्यावी.


  12 March 2012

  ऐशा नरा मोजूनी...

  वारा येईल तशी पाठ फिरविणारे, गेंड्याची कातडी असलेले, सरड्यालाही लाजवेल अशा प्रकारे रंग बदलणारे  पक्षबदलू सम्राट सुरेश जैन यांचे शंभर अपराध भरल्याने अखेर त्यांना पोलीस कोठडीत दाखल व्हावे लागले. अर्थात असे असले तरी सुरेश जैन यांच्या सारख्या मुरलेल्या राजकारण्याला गुन्हा सिद्ध होऊन खरोखरच शिक्षा होईल आणि खडी फोडायला तुरुगांत जावे लागेल की नाही याबद्दल मात्र शंका आहे. आजवरच्या अनुभवाप्रमाणे यातून ते सहीसलामत सुटतील, याची त्यांच्याप्रमाणेच सर्वसमान्यांनाही खात्री आहे.

  काही दिवसांपूर्वी आदर्श सोसायटी गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयच्या वकीलाला लाच देताना जैन यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळेस वृत्तवाहिन्यांवर ही दृश्ये पाहतांना राजकारण्यांची कातडी गेंड्याची कशी आहे आणि ते किती कोडगे झाले आहेत, त्याचे प्रत्यंतर आले होते. आपण काही चुकीचे वागलोय, याचा पश्चात्तापही या दोघांच्या चेहऱयावर नव्हता. उलट निर्लज्जपणे हसत-हसत ते गाडीतून जातांना पाहायला मिळाले.
  त्याचवेळेस संत तुकाराम यांचे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा हे वचन आठवले.

  तत्कालिन जळगाव नगरपालिकेतील २९ कोटी रुपयांच्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांना रविवारी जिल्हा न्यायालयाने येत्या १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जळगाव नगरपालिकेतील तेव्हाच्या सत्ताधाऱयांनी शासकीय आणि खासगी जमिनी आपल्या मालकीच्या असल्याचे दाखवत हुडकोची फसवणूक केली आणि ११ हजार ४२४ घरकुलांच्या योजनेसाठी कर्जस्वरुपात मोठी रक्कम मंजूर करून घेतली. त्यांनी आपल्या मर्जीताल ठेकेदारांना घरकुलाचे कंत्राट देऊन मोठ्या प्रमाणात लाभ मिळवला, असा आरोप आहे. फेब्रुवारी २००६ मध्ये या योजनेत २९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

  म्हणजे तब्बल सहा वर्षांनंतर जैन यांना अटक करण्याची प्रत्यक्ष कारवाई झाली. सत्ता मिळाली की जेवढे ओरबाडून खाता येईल, तेवढे खायचे. कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा करायची. सत्तेची पदे आणि अन्य फायदे हे आपल्याला किंवा आपल्या कुटुंबीयानाच कसे मिळतील, याकडे डोळा ठेवायचा. आज सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची हीच अवस्था झाली आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्य लोकांच्या मनात राजकीय नेते आणि राजकीय पक्षांविषयी कमालीचा तिरस्कार व चीड निर्माण झाली आहे.

  काही दिवसांपूर्वी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांना एका तरुणांने श्रीमुखात भडकावली. त्यावेळेस पवार यांच्या सारख्या नेत्यावर असा हल्ला होणे, कसे चुकीचे आहे, असे सर्व राजकीय पक्षांचे नेते कंठशोष करून सांगत होते. पण राजकीय नेत्यांनी आपल्या स्वताच्या वर्तनाने ही वेळ आणली आहे, आपल्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात इतकी चीड का निर्माण झाली आहे, त्याचे आत्मपरीक्षण एकाही राजकीय नेत्यांने केले नाही. राजकारण्यांविषयी मनात खदखदत असलेल्या संतापाचा हा उद्रेक होता, असे मला वाटते. सहनशक्तीलाही शेवटी एक मर्यादा असते. ती संपली की सर्वसामान्यांचा असा तोल सुटतो आणि असे व्हायला हे निर्लज्ज व कोडगे राजकारणीचे कारणीभूत आहेत, हे विसरून चालणार नाही.

  आपल्या राजकीय आणि वैयक्तिक फायद्यासाठी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱया
  सुरेश जैन यांच्या सारख्या निर्लज्ज राजकारण्यांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याबाबत
  कठोरात कठोर शिक्षा होईल तो सुदिन. कदाचित कायद्यातील पळवाटांमुळे ते सहीसलामत सुटतीलही. पण त्यामुळे अशा निर्लज्ज आणि कोडग्या राजकारण्यांसाठी तुकाराम महाराज यांनी  सांगितल्याप्रमाणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, असे करणारा एखादा कोणी निघाला तर आश्चर्य वाटायला नको. राजकारणी असाच भ्रष्टाचार करत व स्वताच्या तुंबड्या भरत राहिले तर तोही दिवस दूर नाही. 

  11 March 2012

  सर्वोत्कृष्ट अभिनेता सुबोध भावे

  नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून देऊळ या चित्रपटासाठी त्यातील मुख्य भूमिकेत असणाऱया गिरशी कुलकर्णी या अभिनेत्याला गौरविण्यात आले. मला ही निवड चुकीची वाटते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान बालगंधर्व चित्रपटातील बालगंधर्व यांच्या भूमिकेसाठी अभिनेता सुबोध भावे याला मिळायला पाहिजे होता, असे मला वाटते.

  मी देऊळ आणि बालगंधर्व हे दोन्ही चित्रपट पाहिले आहेत आणि म्हणूनच मला हे मत मांडावेसे वाटते. देऊळ चित्रपटात गिरीश कुलकर्णी यांनी ग्रामीण भागातील भोळाभाबडा नायक रंगवला आहे. औंदुंबराच्या झाडापाशी त्याला भगवान दत्तात्रय यांचा दृष्टांत होतो आणि आणि त्यातून चित्रपट पुढे सरकतो. मग देवाच्या नावाखाली मांडला जाणारा बाजार, त्यातून नायकाची होणारी तगमग, मनाची घालमेल, गावातील राजकारण,  देवाचा नावावर होणारा धंदा इत्यादी सर्व या चित्रपटात आहे. वेशभूषा आणि बदललेली बोलण्याची ढब/भाषा यातून कोणीही सक्षम कलाकार ग्रामीण व्यक्तिरेखा चांगली वठवू शकतो, असे मला वाटते. कलाकाराला ते फारसे अवघड नाही.

  पण बालगंधर्व मध्ये सगळेच आव्हानात्मक होते. हिंदी किंवा मराठी चित्रपटात जे अभिनेते स्त्री भूमिका करतात ते  (काही अपवाद अर्थात अशी ही बनवा बनवी मधील अभिनेता सचिन ची भूमिका) किती हिडीस आणि ओंगळ दिसतात ते आपण पाहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील बहुतांश वेळ बालगंधर्वांच्या भूमिकेत स्त्री वेशात वावरणे नव्हे तर अभिनय करणे किती कठीण आणि आव्हानात्मक आहे, ते लक्षात येईल.

  बालगंधर्व चित्रपटात बालगंधर्व साकारताना सुबोध भावे कुठेही हिडीस किंवा ओंगळवाणा दिसलेला नाही. ही भूमिका तो जगला आहे, बारीक सारीक सर्व बायकी लकबी त्यांने खुबीने दाखवल्या आहेत. भरजरी शालू, अंगावर दागिने घालून स्त्री वेषात तो कुठेही अवघडलेला वाटला नाही. उलट या रुपात तो राजस आणि खरोखरचा बालगंधर्व म्हणून दिसला आहे. जुन्या पिढीतील बालगंधर्वप्रेमी आणि आजच्या जमान्यातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनीही या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद दिला, हा चित्रपट उत्तम चालला, आणि मुख्य म्हणजे स्त्री वेशात सुबोध भावे हा प्रेक्षकांना भावला हीच खरे तर सुबोध भावेच्या अभिनयाला मिळालेली खरी पावती व दाद आहे, असे मला वाटते.

  अभिनयातील सहजता, बोलका चेहरा आणि डोळे, स्त्री वेषातील सहज वावर चित्रपटात दिसून येतो. कल्पनेतील ग्रामीण युवक रंगविण्यापेक्षा जी व्यक्ती महाराष्ट्रात प्रत्यक्ष
   होऊन गेली, ज्यांनी त्यांचे गाणे आणि अभिनय प्रत्यक्ष पाहिला, विविध छायाचित्रांच्या माध्यमातून जे आजही आपल्यासमोर आहेत, त्यांची भूमिका साकार करणे हे खरे आव्हानात्मक आहे आणि त्यात सुबोध भावे याला शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत. त्यामुळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार बालगंधर्वसाठी सुबोध भावे यालाच मिळायला हवा होता, असे मनापासून वाटते.
     
  अर्थात जाहीर झालेल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या पुरस्कारासाठी अभिनेता गिरीश कुलकर्णी यांचे अभिनंदन.
       

    

  10 March 2012

  राज्य कोणाचे मोंगलांचे की...

  पुणे जिल्ह्यातील भेलकेनगर येथे शिवजयंतीच्या निमित्ताने लावण्यात आलेले एका चित्र काही जणांच्या भावना दुखावतात म्हणून काढून टाकण्याचे आदेश पोलिसांनी स्थानिक हिंदू युवकांना दिले. शाहिस्तेखान हा पुण्यातील लाल महालातून पळून जात असताना शिवाजी महाराज यांनी तलवारीने त्याच्या एका हाताची बोटे कापली असे ते चित्र होते. हे चित्र लावू नये असे पोलिसांनी सांगितल्याने महाराष्टा्रात राज्य मोंगलांचे आहे का असा प्रश्न समोर आला आहे.

  हा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही. यापूर्वीही भारतात-महाराष्ट्रात राहणाऱया पण  पाकिस्तानाशी इमान राखणाऱया देशद्रोही आणि धर्मांध मुसलमानांसाठी कॉंग्रेस आघाडीने वेळोवेळी असेच लांगुनचालन केले आहे. दोन्ही कॉंग्रेसमधील मराठा नेते धर्मांध मुसलमानांचे लांगुनचालन आणि ब्राह्मण द्वेषाचेच राजकारण करत आहेत, असे दिसून येत आहे.

   महाराष्ट्रातील पळपुट्या आणि मुस्लिमांचे लांगूनचालन करणाऱया कॉंग्रेस आघाडी शासनाने (ज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन्ही येतात) इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मुसलमानांच्या भावना दुखावतात म्हणून अफजल खान वधाचे छायाचित्र काढून टाकण्याचा महापराक्रम केला होता. शिवजयंती किंवा गणेशोत्सवाच्या निमित्ताने ज्या काही मंडळांनी अफजलखान वधाचा देखावा तयार करून सजावटीमध्ये दाखवला होता, तो त्यांना काढायला लावण्याचे श्रेयही दोन्ही कॉंग्रेसच्या मराठा नेत्यांकडेच जाते. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांची सर्वात्मका सर्वेश्वरा ही कविताही मुसलमानांच्या भावना दुखावतात म्हणून म्हणायची नाही, असा फतवा काढला होता.

  राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील हे नुसते बोलका बाहुला आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील एक घटनाही हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणारी होती. लाल महालात असलेले एक शिल्प रातोरात उखडून हलविण्यात आले. कारण या शिल्पात दादोजी कोंडदेव हे होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आपण मराठा असल्याबद्दल अभिमान बाळगतात. फुले, शाहू आणि आंबेडकर यांचे उठसुट नाव घेतात. तुम्हाला मुसलमानांचे लांगुनचालन आणि ब्राह्मणांचा द्वेष करून खरा इतिहास पुसून टाकायचा असेल तर आपण शिवाजी महाराज यांच्या वंशातील आहोत, शिवाजी महाराज हे आमच्या मराठा ज्ञातीतील आहेत, असा खोटा आणि तोंडदेखला अभिमान तरी का बाळगता.

  शिवाजी महाराज यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील सर्वात जास्त संख्या ब्राह्मणांची होती. शिवाजी महाराज यांनी अनेकांना अनेक प्रकारचे दान दिले, पण फक्त समर्थ  रामदास स्वामी यांनाच सज्जनगड हा किल्ला भेट म्हणून दिला. समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराज यांना मार्गदर्शन केले असा इतिहास आहे, तर तो का नाकारता, केवळ रामदास स्वामी हे ब्राह्मण होते म्हणून. काही ब्राह्मणद्वेष्ट्या मराठा संघटना तसे म्हणतात म्हणून की तुम्हालाही ते मान्य आहे, फक्त उघड बोलण्याची हिंमत नसल्याने या संघटनांना पुढे करून तुम्ही तुमची पोळी भाजून घेत आहात का,  मराठा जातीतीलच अनेक सरदार आणि दस्तुरखुद्द शिवाजी महाराज यांचे जवळचे नातेवाईक औंरंगजेबाला मिळालेले होते, शिवाजी महाराज यांच्याशी त्यांनी सदैव फितुरी आणि दगाबाजी केली हे दोन्ही कॉंग्रेसचे मराठा नेते सोयीस्कर का  विसरतात. ते अडचणीचे आहे म्हणून का, असो.

  आमच्या भावना दुखावतात म्हणून खरा इतिहास दाबून टाकण्याचा हा प्रकार आणि त्याला राज्यकर्त्यांनी दिलेले प्रोत्साहन आणखीन धोकादयक आहे. भावना दुखाविण्याच्या नावाखाली हिंदू द्वेषाची आणि या देशाचे जे मानबिंदू आहेत, त्यांची अवहेलना आणखी कितीकाळ सुरू राहणार आहे. शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून अशी देशद्रोही विषवल्ली कठोर भूमिका घेऊन वेळीच ठेचून काढणे आवश्यक आहे. तेवढे धाडस गृहमंत्री आर. आर. पाटील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा नेते कधी दाखवणार

  09 March 2012

  हा तर रडीचा डाव

  नाशिक महापालिका महापौरपदासाठी शिवसेनेने आपला उमेदवार उभा करून मनसेला कात्रजचा घाट दाखवला असल्याची आणि त्याच वेळी आपण कोणाचीही मनधरणी करणार नसल्याचे राज यांनी सांगितले असल्याच्या बातम्या आजच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. या मध्ये जर सत्य असेल तर तो शिवसेनेचा रडीचा डाव ठरेल.

  कल्याण-डोंबिवली महापालिकेतही मनसेमुळेच शिवसेना-भाजप यांचा सत्तेवर येण्याचा मार्ग सुकर झाला. अंबरनाथ नगरपालिकेतही मनसेने शिवसेनेला उघड पाठिंबा दिल्याने तेथेही शिवसेना सत्तेवर येऊ शकली. हे लक्षात घेऊन नाशिक महापालिकेसाठी शिवसेनेने मनसेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा या पूर्वीच जाहीर करणे आवश्यक होते. पण तेथे शिवसेनेने रडीचा डाव खेळत मनसेला सत्तेपासून दूर राखण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस आणि अन्य पक्षांशी युती करून सत्तेवर येण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. दरम्यान ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजप युतीला राज ठाकरे यांनी उघड पाठिंबा दिल्याने त्यानंतर तोंडदेखले का होईना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मनसेने नाशिक येथे मदत मागितली तर आपण विचार करू अशी भूमिका जाहीर करावी लागली.

  वास्तविक ठाणे येथील मदतीची परतफेड म्हणून शिवसेनेने त्याचवेळी नाशिकसाठी राज यांना जाहीर पाठिंबा देऊ, असे ठामपणे सांगायला हवे होते. तसे केले असते तर उद्धव यांची प्रतिमा अधिक उजळली असती. तसे न झाल्यामुळे जनमानसात राज हिरो ठरले तर उद्धव हे रडीचा डाव खेळत असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.

  उद्धव यांनी घेतलेल्या भूमिकेला कोणी चाणक्यनिती म्हणेल, कदाचित नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी शिवसेना आपला उमेदवार मागे घेऊन मनसेला पाठिंबा देईल, मनसेला झुलवत ठेवण्याची खेळी उद्धव यांना खेळायची असेलही. पण त्यातून उद्धव यांची असहाय्यता दिसून येत आहे. प्रत्येक वेळी (मराठी पाट्यांचा मुद्दा, पेडर रोड उड्डाण पूल, रेल्वेची लेखी परीक्षा आदी )राज हे शिवसेनेवर पर्यायाने उद्धव यांच्यावर कुरघोडी करत असल्याचे दिसून येत आहे.

  दादर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या सातही उमेदवारांना धूळ चारत मनसेने विजय मिळवला,त्याचे आत्मपरिक्षण उद्धव करणार आहेत की नाही.  विरोधाला विरोध किती काळ करत राहणार. भाजपला हे कळून चुकले असून म्हणूनच मतविभाजन होऊ नये म्हणून शिवसेना-भाजप युतीत मनसेला घ्यावे, असे भाजपचे म्हणणे आहे आणि ते चुकीचे नाही. नाशिक महापालिकेत मनसेला सर्वाधिक म्हणजे चाळीस जागा मिळाल्याने तेथील जनतेने मनसेला जनादेश दिला आहे. त्यामुळे शिवसेनेने रडीचा डाव न खेळता उघडपणे मनसेला पाठिंबा द्यावा आणि खुल्या मनाने मनसेचा महापौर निवडून द्यावा.

  केवळ राज यांना विरोध आणि त्यांचा महापौर होऊ नये म्हणून शिवसेनेने सत्तेसाठी ज्या पक्षांशी आपली वैचारिक नाळ जुळणारी नाही, त्यांच्या बरोबर युती केली  किंवा घोडेबाजार करून अपक्षांची दाढी कुरवाळली तरी त्या सत्तेला काहीही अर्थ असणार नाही.  नाशिकमधील मतदारांचाही तो अपमान तसेच शिवसेनेचा कृतघ्नपणा व रडीचा डाव ठरेल.