19 November 2011

‘शिवसेने’च्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रे!altमराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि आता महाराष्ट्रात प्रमुख राजकीय पक्ष म्हणून स्थान मिळविलेल्या ‘शिवसेना’या संघटनेच्या स्थापनेची मूळ कल्पना दिवंगत साहित्यिक, नाटककार आणि संपादक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची होती. ५२ वर्षांपूर्वी अत्रे यांनी आपल्या ‘मराठा’ या दैनिकात ‘शिवसेना’या नावाचा अग्रलेख लिहून मराठी तरुणांचे संघटन आणि या विषयीचा सविस्तर उहापोह केला होता.संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ दैनिकाने महत्वाची भूमिका बजावली. अत्रे यांच्या घणाघाती लेखणीने आंदोलनाला प्रचंड बळ मिळाले आणि त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. आचार्य अत्रे यांचे ‘मराठा’ हे दैनिक आता लवकरच  डिव्हिडीवर उपलब्ध होणार असून या डिव्हिडीमध्ये १५ नोव्हेंबर १९५६ ते १९६० च्या डिसेंबर अखेपर्यंतचे अंक असणार आहेत. आचार्य अत्रे यांचे नातू अॅड. राजेंद्र पै (आचार्य अत्रे यांच्या कन्या आणि ज्येष्ठ साहित्यिका शिरीष पै यांचे सुपुत्र) हे याविषयीची जबाबदारी सांभाळत आहेत. या निमित्ताने शिरीष पै यांनी ‘मराठा’च्या आठवणींना उजाळा देताना ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, १५ नोव्हेंबर १९५६ रोजी  ‘मराठा’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा कालखंडही याच सुमारास सुरू झाला. या डिव्हिडीत ‘मराठा’चे संपूर्ण अंक पाहायला मिळणार आहेत. ‘शिवसेना’ संघटनेची मूळ कल्पना माझ्या वडिलांची, आचार्य अत्रे यांचीच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेवादल या संघटनांप्रमाणे मराठी तरुणांची बिगर राजकीय विचारांची संघटना स्थापन करावी आणि त्यांनी एकत्र येऊन काम करावे, असे विचार अत्रे यांनी ‘मराठा’ मध्ये मांडले होते.
२५ जुलै १९५९ या दिवशी ‘मराठा’ दैनिकात ‘शिवसेना’याच नावाने अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. समाजापुढे असलेल्या समस्या सोडविण्यासाठी मराठी तरुणांनी पुढाकार घेऊन एकत्र यावे आणि त्यासाठी ‘शिवसेना’ या नावाने संघटना स्थापन करावी, असे त्यांनी सुचविले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांचे संघटन केले आणि त्यातूनच पुढे हिंदूवी स्वराज्याची निर्मिती झाली. स्वतंत्र विचारांच्या मराठी तरुणांनी या मावळ्यांप्रमाणे एकत्र येऊन संघटित व्हावे, असे अत्रे यांनी सुचविल्याचे शिरीषताई म्हणाल्या.
अत्रे यांच्या या लेखानंतर प्रबोधनकार ठाकरे यांच्या मनात हा विचार सातत्याने घोळत होता. कालांतराने त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना मराठी माणसाची संघटना स्थापन करण्याची प्रेरणा दिली. अशी संघटना स्थापन करण्याचा विचार असेल, तर ‘शिवसेना’ हेच संघटनेचे नाव ठेवा, असेही प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना सुचविले, आणि विचार पक्का होताच, संघटनेच्या स्थापनेचा नारळ फोडण्यात आला. जून १९६६ मध्ये आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील मराठी तरुणांची संघटना साकार झाली..
(माझी ही बातमी लोकसत्ताच्या मुख्य अंकात पान क्रमांक १२ वर १९ नोव्हेंबर २०११ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे)
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=194502:2011-11-18-15-11-17&catid=26:2009-07-09-02-01-2

http://epaper.loksatta.com/17108/indian-express/19-11-2011#page/12/1

09 November 2011

शोध हरवलेल्या मुंबईचा

दिवसेंदिवस मुंबईत येणारे लोंढे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मुंबईची जुनी ओळख हरवली जात आहे. अरुण पुराणिक यांनी याच हरवलेल्या मुंबईचा शोध ‘हरवलेली मुंबई’ या पुस्तकात घेतला आहे. मॅजेस्टिक पब्लिकेशन नुकतेच हे पुस्तक प्रकाशित केले आहे. शाहीर पठ्ठे बापुराव यांनी ‘मुंबई नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका’ अशा शब्दात मुंबईवर लावणी लिहिली तर शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ‘या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची’ असे मुंबईचे वर्णनकेले. काळ बदलतो, सामाजिक गरजा बदलतात, वस्ती बदलते तशीच तेथील स्थानिक संस्कृतीही बदलते. म्हणूनच तिथे राहिलेल्या वयोवृद्ध मंडळींना मुंबई आता परकी वाटते. अशा या मुंबईच्या हरविलेल्या पैलूंवर पुराणिक यांनी प्रकाश टाकला असून पुस्तकातील काही लेख यापूर्वी ‘लोकसत्ता’, ‘साप्ताहिक लोकप्रभा’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. पुराणिक यांनी आपले हरविलेले बालपण परत जोपासण्यासाठी आणि जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्याकरिता अनेक ठिकाणी भेटी दिल्या, वयोवृद्धांच्या मुलाखती घेतल्या, संदर्भपत्रे, कागदपत्रे पाहिले. मुंबईची दुर्मिळ छायाचित्रे मिळवली आणि यातून ‘हरवलेली मुंबई’ हे पुस्तक साकार झाले आहे. पुराणिक यांचे मुंबईवरील विविध लेख वाचून ‘मॅजेस्टिक पब्लिकेशन’चे अनिल कोठावळे स्वत: त्यांना भेटायला गेले आणि यातून हे पुस्तक तयार झाले. स्मरणरंजनात घेऊन जाणारी मोठी कृष्णधवल छायाचित्रे हे या पुस्तकाचे खास वैशिष्टय़ आहे. चाळ संस्कृती, गिरगाव चौपाटी, पानसुपारी, नाक्यावरचे इराणी, चोरबाजार, पानवाले, क्षुधाशांती गृहे, मुंबईतील गणेशोत्सव, सार्वजनिक शौचालये, रामागडी, मुंबईतील वारांगना आणि अन्य विषयातून पुराणिक यांनी हरवलेल्या मुंबईचा शोध घेतला आहे. मॅजेस्टिक पब्लिकेशन- संपर्क (०२२२४३०५९१४)
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त ८ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झालेली बातमी)

08 November 2011

पुलकित गाणी

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच पु. ल. देशपांडे यांचा परिसस्पर्श ज्याला झाला, त्याचे सोने झाले. पुलंनी लिहिलेली नाटक, कथाकथन, चित्रपट पटकथा-संवाद, चित्रपटातील अभिनय किंवा एकपात्री अभिनय असो. पुलंनी या सर्वावर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. त्यांनी ‘पुल’कित केलेल्या गाण्यांबद्दलही असेच म्हणता  येईल. पुलंनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही तितकीच टवटवीत आणि गुणगुणावी वाटतात, यातच सर्व काही आले. पुलं म्हटले की सगळ्यांच्या ओठावर असलेले आणि मराठी वाद्यवृंदात सादर केल्या जाणाऱ्या गाण्यांमधील हमखास वन्समोअर घेणारे गाणे म्हणजे ‘नाच रे मोरा’. ‘देवबाप्पा’या चित्रपटातील हे गीत ग.
दि.मा. यांचे असून स्वर आशा भोसले यांचा आहे. आज ५८ वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. ‘पुलं’नी संगीतबद्ध केलेला आणि ज्या
चित्रपटातील सर्व गाणी लोकप्रिय झाली असा ‘सबकुछ’ चित्रपट म्हणजे ‘गुळाचा गणपती’. या चित्रपटातील ‘ही कुणी छेडिली तार’ (आशा भोसले, पं. वसंतराव देशपांडे), श्रीहरी विदुराघरी पाहुणा (माणिक वर्मा), इथेच टाका तंबू (आशा भोसले, पं. वसंतराव देशपांडे), केतकीच्या बनात, उतरत्या उन्हात (आशा भोसले) या गाण्यांचा उल्लेख करता येईल. याच चित्रपटातील पं. भीमसेन जोशी यांनी गायलेले ‘इंद्रायणी काठी’ हे गाणेही न विसरता येणारे. शाळेत असताना पाठ केलेली
‘इवल्या इवल्याश्या, टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी’ही कविता आपल्या आठवणीत आहे. ‘देवबाप्पा’ या चित्रपटातील हे गाणे आशा भोसले यांनी गायलेले आहे. पुलंकडे माणिक वर्मा यांनी गायलेली ‘कबिराचे विणतो शेले’, (देवपावला) ‘कुणी म्हणेल वेडा तुला कुणी म्हणेल वेडी मला’ (देवपावला) ‘जा मुली
शकुंतले सासरी’ (देवपावला), ‘तुझ्या मनात कुणीतरी लपलं गं’, ‘हसले मनी चांदणे’ ही गाणीही रसिकांना माहितीची आहेत. मंगेश पाडगावकर यांचे शब्द आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचा स्वर लाभलेली पुलंची आणखी दोन लोकप्रिय गाणी ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ आणि ‘माझे जीवन गाणे’. या गाण्यांची गोडी अविट आहे. ‘माझिया माहेरा जा रे पाखरा’ (ज्योत्स्ना भोळे) हे गाणेही रसिकांना माहिती आहे. या सह ‘दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया’ (आशा भोसले), ‘माझ्या कोंबडय़ाची शान’ (पं. वसंतराव देशपांडे) आणि अन्य ‘पुल’कित गाणीही आहेत. साहित्यिक, नाटककार, एकपात्री प्रयोगकर्ते आणि कथाकथनकार पुल अशी त्यांची प्रामुख्याने ओळख असली तरीही गायक, हार्मोनिअम वादक आणि संगीतकार पुल अशी असलेली त्यांची ओळख या गाण्यांच्या माध्यमातून मांडण्याचा हा प्रयत्न. 

(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त ८ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान एकवर माझी ही बातमी प्रसिद्ध झाली आहे)
http://epaper.loksatta.com/16135/indian-express/08-11-2011#p=page:n=15:z=1

07 November 2011

दुर्मिळ पुस्तकांचा खजिना

ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तकांचा संग्रह नव्हे तर साहित्य आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचे ते एक महत्त्वाचे केंद्र आहे. विविध साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांबरोबरच वाचन संस्कृती जोपासण्याचे आणि ती वृद्धिंगत करण्याचे काम ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’ ही संस्था गेली ११३ वर्षे करत आहे.
वाचन आणि साहित्यप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन १ ऑगस्ट १८९८ मध्ये गिरगाव येथील ठाकुरद्वार येथे संग्रहालय स्थापन केले. या संस्थापक मंडळींमध्ये गुर्जर, पीटकर, शेजवलकर, पागे, जोशी, बाक्रे, पुणतांबेकर, मोडक, गद्रे आदींचा समावेश होता. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते संग्रहालयाच्या ठाकुरद्वार शाखेचे उद्घाटन तर संग्रहालयाच्या दादर येथील वास्तूचे उद्घाटन पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. संस्थेच्या आज एकूण ४४ शाखा आहेत.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्यालय अधीक्षक सुनील कुबल यांनी ‘वृत्तान्त’ला अधिक माहिती देताना सांगितले, की संग्रहालयाच्या सर्व शाखा मिळून १२ हजार ८०० सर्वसाधारण तर सुमारे साडेचार हजार आजीव सभासद आहेत. संस्थेकडे सुमारे पावणेतीन लाख पुस्तकांचा संग्रह असून नऊशेहून अधिक दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आहे. आचार्य अत्रे यांचे ‘मराठा’चे अंकही संग्रहालयाकडे जतन करून ठेवण्यात आले आहेत. संग्रहालयाकडून ग्रंथालयाबरोबरच अन्य विविध उपक्रम राबविले जातात. मराठी संशोधन मंडळ, इतिहास संशोधन मंडळ, साने गुरुजी बाल विकास विभाग आदी संग्रहालयाचे उपविभाग आहेत. या उपविभागांतर्फे व्याख्याने, स्पर्धा, साहित्यिकांची जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रम, अन्य सांस्कृतिक आणि साहित्यविषयक उपक्रम आयोजित केले जातात.
संग्रहालयातर्फे संदर्भ विभाग चालविला जातो. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अभ्यासक आणि नागरिकही याचा मोठय़ा प्रमाणात लाभ घेत आहेत. संग्रहालयाकडे असलेल्या काही दुर्मिळ पुस्तकांचे मायक्रोफिल्मिंग करण्यात आले असून यासाठी सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिराकडून आर्थिक मदत मिळाली होती. संग्रहालयाकडे १८६० पासूनची काही दुर्मिळ पुस्तके असून साधारणपणे १९५० पर्यंतची पुस्तके संगणकावर स्कॅन करून जतन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनोहर जोशी या उपक्रमासाठी निधी देणार असून अन्य खासदारांकडूनही मदत मिळविण्याचे आमचे प्रयत्न आहेत, अशी माहितीही कुबल यांनी दिली. वैजनाथ शर्मा लिखित ‘सिंहासन बत्तीशी’ (१८१४), ग्रॅट डफ यांची ‘मराठय़ांची बखर’ (१८२९), दादोबा पांडुरंग यांचे ‘मराठी नकाशांचे पुस्तक’ (१८३९), सदाशिव छत्रे यांचे ‘इसापनीती कथा’ (१८५१) यासह अनेक जुनी दुर्मिळ पुस्तके संग्रहालयाच्या दादर येथील संदर्भ विभागाकडे आहेत.  मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (दादर-पूर्व) ०२२-२४१३४२११/२४१२१९०१ संदर्भ विभाग- (०२२-२४१८५९६०)  संग्रहालयाचे संकेतस्थळ  www.mumbaimgs.org 

(हा लेख लोकसत्ता-रविवार वृत्तान्त, ६ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झाला आहे)

06 November 2011

ज्ञान भांडार

गेल्या दोनशे वर्षांच्या प्राच्यविद्या, भारतीय विद्या आणि सांस्कृतिक इतिहासाची मूक साक्षीदार असलेली मुंबईतील ‘एशियाटिक सोसायटी’ ही संस्था शब्दश: ज्ञानाचे भांडार आहे. दुर्मिळ हस्तलिखिते, पोथ्या, ग्रंथ, विविध भाषांमधील पुस्तके, नियतकालिके, वृत्तपत्रे, दुर्मिळ वस्तू, संशोधन विभाग यामुळे संस्थेने वाचक, अभ्यासक, संशोधक यांनाही अनुभव आणि ज्ञानसमृद्ध केले आहे. २६ नोव्हेंबर १८०४ मध्ये संस्थेची स्थापना करण्यात आली. altतेव्हा ही संस्था ‘लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे’ म्हणून ओळखली जात होती. १९३० मध्ये तिचे नामकरण ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ असे झाले आणि १९४७ नंतर आता ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ या नावाने ती ओळखली जाते. ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत डॉ. अरुण टिकेकर हे गेल्या पाच वर्षांपासून एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
altपरळ येथे ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित १६ ब्रिटिश विद्वानांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली. न्यायमूर्ती जेम्स मॉकिन्टॉस यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली ही संस्था पश्चिम भारतातील संशोधनात्मक कार्य करणारी पहिली-वहिली संस्था होती. स्थापना झाल्यानंतर मॉकिन्टॉस यांचीच अध्यक्ष आणि विल्यम आस्किर्न यांची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली. १८३० मध्ये परळ येथून संस्थेची वास्तू दक्षिण मुंबईत टाऊन हॉल येथे स्थलांतरित झाली. न्यायमूर्ती काशिनाथ त्र्यंबक तेलंग, भगवानलाल इंद्रजी, डॉ. भाऊ दाजी लाड, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर आदी दिग्गजांनी संस्थेची धुरा यापूर्वी सांभाळली आहे. महामहोपाध्याय पां. वा. काणे यांनी एशियाटिक सोसायटीच्या संशोधन कक्षात बसून ‘हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र’ चे खंड लिहिले. पुढे याच कामासाठी त्यांना ‘भारतरत्न’हा बहुमान मिळाला. ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिका दुर्गाबाई भागवत आणि अन्य अनेक मान्यवरांनी आपल्या सहभागाने ही संस्था मोठी केली आहे.
संस्थेकडे आज तीन लाखांहून अधिक पुस्तकांचा संग्रह असून यात मराठीसह गुजराथी, हिंदूी, संस्कृत, इंग्रजी, पर्शियन, उर्दू, फ्रेंच, इटालियन भाषेतील ग्रंथसंपदा आहे. संस्कृत भाषेतील सुमारे तीन हजारांहून अधिक दुर्मिळ हस्तलिखिते, पोथ्या आहेत. ‘लंडन टाइम्स’, ‘इंदूप्रकाश’, ‘बॉम्बे गॅझेट’ अशी जुनी वर्तमानपत्रेही येथे संग्रहित करण्यात आली आहेत. संस्थेकडे १५० वर्षांहून जुनी आणि दुर्मिळ अशी सुमारे दीड लाख पुस्तके असून ती डिजिटल स्वरूपात जतन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. संस्थेच्या संग्रहात मौर्यकालीन आणि ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील सुमारे १२ हजार नाणीही आहेत. नालासोपारा येथे काही वर्षांपूर्वी केलेल्या उत्खननात बौद्ध स्तुपाचे अवशेष मिळाले होते. एका मोठय़ा मातीच्या भांडय़ात सोने, चांदी, तांबे यांची छोटी भांडी सापडली होती. या सर्व वस्तूही जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.
सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण टिकेकर या संस्थेच्या कामकाजाबाबत बोलताना म्हणाले, की संग्रहात असणाऱ्या दुर्मिळ पुस्तकांचे जतन, बायडिंग, मायक्रोफिल्मिंग, डिजिटलकरण आदी सर्व कामे संस्थेच्या वास्तूतच केली जातात. एकही पुस्तक बाहेर नेऊ दिले जात नाही. पुस्तकांचे जतन करण्यासाठी ग्रंथ दत्तक योजनाही कार्यान्वित आहे. संस्थेतर्फे जे संशोधनात्मक प्रकल्प हाती घेण्यात येतात, त्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय आणि उद्योग जगताकडून देणगी मिळते. यातून असे उपक्रम आणि पुस्तक प्रकाशनाचे कामही केले जाते.
सोसायटीतर्फे सर्वसाधारण ग्रंथालय (वाचकांसाठी) आणि संशोधनात्मक चळवळ असे उपक्रम चालवले जातात. एशियाटिक सोसायटीतर्फे दरवर्षी १२ हून अधिक स्मृती व्याख्याने तसेच अन्य साहित्य-सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. संस्थेकडे असलेल्या विविध दुर्मिळ वस्तूंची मालकी संस्थेकडेच अबाधित ठेवून या वस्तू छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या असून त्या लोकांना पाहण्यासाठी संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. परदेशी आणि परप्रांतीय संशोधक अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी एशियाटिक सोसायटीत मोठय़ा प्रमाणात येत असल्याचेही डॉ. टिकेकर यांनी सांगितले.
१९९४ मध्ये एशियाटिक सोसायटी आणि मध्यवर्ती ग्रंथालय यांचे विभाजन झाले.  संस्थेकडे असलेल्या ग्रंथसंपदेत कला, इतिहास, हस्तलिखिते, पोथ्या, आत्मचरित्र, इतिहास, तत्त्वज्ञान आदी विविध विषयांवरील पुस्तके आहेत. पाश्चात्त्य लेखक डान्टे यांच्या ‘डिव्हाइन कॉमेडी’ या मूळ इटालियन हस्तलिखितासह अनेक दुर्मिळ ग्रंथ संस्थेच्या संग्रहात आहेत. जणू ज्ञानाचे हे भांडारच!
एशियाटिक सोसायटी संपर्क ०२२-२२६६०९५६/२२६६५५६०
ई-मेल - asml@mtnl.net.in
संकेतस्थळ- www.asiaticsocietymumbai.org 

(लोकसत्ता-रविवार वृत्तान्तमध्ये ६ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान एकवर माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे)
http://epaper.loksatta.com/15963/indian-express/06-11-2011?show=clip#page=21:w=757:h=1344:l=25:t=247
या लिकवर ई-पेपरवरही हा लेख वाचता येईल

04 November 2011

आवाजाची ग्राफिक स्टोरी

दिवाळी अंकामध्ये ‘खिडकी चित्रे’ देण्याची सुरुवात करणाऱ्या ‘आवाज’ने पुढील वर्षीच्या ‘आवाज’च्या दिवाळी अंकात ‘ग्राफिक स्टोरी’ (चित्ररूप कथा) देण्याचा नवा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. दिवाळी अंकासाठी असा प्रयोग पहिलाच ठरणार असल्याचा दावा ‘आवाज’चे संपादक भारतभूषण पाटकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
दिवंगत मधुकर पाटकर यांनी सुरू केलेल्या ‘आवाज’ची यंदा एकसष्टी होती. केवळ ‘विनोद’ विषयालाच वाहिलेल्या या मासिकाची धुरा आता पाटकर यांचे सुपुत्र भारतभूषण पाटकर पाहात आहेत. यंदाच्या वर्षी ‘आवाज’ दिवाळी अंकाच्या ३५ हजार प्रतींची विक्री झाली आहे.
आमच्या वडिलांनी ‘आवाज’ची घडी बसवून दिली. आम्ही तीच परंपरा पुढे सुरू ठेवली असून काळानुरूप अंकात काही बदल करत गेलो आहोत. मराठीतील तरुण वाचक (जो विशीच्या पुढे आहे) ‘आवाज’कडे वळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षीच्या दिवाळी अंकात आम्ही ‘ग्राफिक स्टोरी’ देणार असल्याचे सांगून पाटकर म्हणाले की, ‘चित्ररूप कथा’ असे त्याचे स्वरूप असेल. ही कथा किमान आठ पानांची आणि जास्तीत जास्त सोळा किंवा त्यापेक्षा अधिक पानांची असेल. आजच्या तरुणांना आवडेल असा कथेचा विषय असेल. या नव्या प्रयोगाविषयी सध्या आमची ‘आवाज’च्या परिवारातील विनय ब्राह्मणीया, गजू तायडे यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. आपल्याकडे लहान मुलांसाठी ‘कॉमिक्स’ पुस्तके आता बऱ्यापैकी लोकप्रिय झालेली आहेत, पण मोठय़ांसाठी मात्र अशा प्रकारची पुस्तके/कथा नाहीत. ‘आवाज’ दिवाळी अंकाच्या माध्यमातून आम्ही हा प्रयोग करत आहोत.
आमची नक्कल करणारे काहीजण नामसाधम्र्यासह बाजारात आपले अंक विक्रीस आणत आहेत. मात्र असे असले तरी ६१ व्या वर्षांतही ‘आवाज’ची लोकप्रियता कायम आहे हे यंदाच्या वर्षी जी विक्री झाली त्यावरून दिसून येत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई या शहरी भागांबरोबरच राज्यभरातील ग्रामीण भागांत आणि गावांमध्ये ‘आवाज’ला मागणी आहे. ग्रंथालयांबरोबरच वैयक्तिकपणे ‘आवाज’ विकत घेणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे पाटकर म्हणाले.

(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त ४ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे)
http://epaper.loksatta.com/15791/indian-express/04-11-2011#p=page:n=17:z=1

03 November 2011

आठवणीतील कविता-बालभारतीच्या

शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातील कविता आपण अभ्यासाकरिता पाठ करत असतो. शाळा आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कधी तरी आपल्याला शाळेच्या दिवसांतील एखादी कविता किंवा त्यातील ओळ आठवते आणि आपण स्मरणरंजनात जातो. ‘बालभारती’मधील स्मरणरंजनात घेऊन जाणाऱ्या आठवणींच्या कवितांचा हा खजिना आता ई-पुस्तक स्वरूपात रसिकांसाठी उपलब्ध झाला आहे. ई-साहित्य प्रतिष्ठानने या कवितांचे ई-पुस्तक प्रकाशित केले असून त्याची संकल्पना आणि संकलन सुरेश शिरोडकर यांचे आहे.
स्मरणरंजनाचा आनंद देणाऱ्या या कविता ‘बालभारती- आठवणीतल्या कविता’ या ई-पुस्तकात एकत्र करण्यात आल्या आहेत. ग. ह. पाटील यांच्या ‘छान किती दिसते फुलपाखरू’ या कवितेने आपण कवितांच्या खजिन्यात पाऊल टाकतो. इंदिरा संत यांची ‘गवतफुला’, ग. ह. पाटील यांचीच ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’, कुसुमाग्रज यांची ‘उठा उठा चिऊताई’, मंगेश पाडगावकर यांची ‘टप टप पडती अंगावरती’, नारायण गोविंद शुक्ल यांची ‘लाल टांगा घेऊनी आला लाल टांगेवाला’, वा. भा. पाठक यांची ‘खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे’, केशवकुमार यांची ‘आजीचे घडय़ाळ’ यासह इतर अनेक कविता येथे आहेत.
या कवींबरोबरच ना. धों. महानोर, वसंत बापट, प्रा. शंकर वैद्य, बा. भ. बोरकर, पद्मा गोळे, बालकवी, कवी ग्रेस, वामन पंडित, यशवंत, ना. घ. देशपांडे, ना. वा. टिळक, माधव ज्युलियन, केशवसुत, मोरोपंत, साने गुरुजी, भा. रा. तांबे आदींच्याही कविता या पुस्तकात असून कोणतीही कविता उघडून वाचायला सुरुवात केल्यानंतर वाचक नक्कीच शाळेच्या आठवणीत पोहोचतील.
या संदर्भात ‘वृत्तान्त’शी बोलताना शिरोडकर म्हणाले की, बालभारतीमधील आठवणीतल्या कवितांचा माझा ब्लॉग असून त्यावरही या कविता संकलित केल्या असून या सर्व कविता ई-साहित्य प्रतिष्ठानने पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत. पहिल्या भागात १५० कवितांचा समावेश करण्यात आला आहे. अन्य कविता पुढील भागात देण्यात येतील. तसेच पहिला भाग वाचून रसिक वाचकांनी ज्या सूचना केल्या आहेत त्याची दखल घेऊन या सर्व कविता सुधारित स्वरूपात देण्याचा आमचा प्रयत्न आहे, तर ई-साहित्य प्रतिष्ठानचे वितरक सुनील सामंत यांनी सांगितले की, आजवर आम्ही १६० ई-पुस्तके प्रकाशित केली आहेत.
‘बालभारती- आठवणीतल्या कविता’ या उपक्रमात रसिक वाचकांनाही सहभागी होता येईल. उपक्रमास मदत करणाऱ्या वाचकाला ई-साहित्य प्रतिष्ठानच्या १५० ई-पुस्तकांचा समावेश असलेली सीडी भेट म्हणून देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क
ई-साहित्य प्रतिष्ठान -esahity@gmail.com
सुरेश शिरोडकर -skarsuresh@gmail.com 

(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त-३ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे)

02 November 2011

प्रयोग ध्वनिचित्रमुद्रित मासिकाचा

संगणक, लॅपटॉप आणि सोशल नेटवर्किंग साईट्स ही आजच्या तरुणाईची ओळख झाली आहे. अनेक तरुण, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी या गोष्टींचा सहज वापर करत आहेत. या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत आणि मराठी साहित्यात एक वेगळा प्रयोग ठरेल असे ध्वनिचित्रमुद्रित ‘तुतारी’ हे मासिक येत्या डिसेंबर महिन्यापासून सुरू होत आहे. या प्रयोगाची सुरुवात ‘तुतारी’च्या ध्वनिचित्रमुद्रित दिवाळी अंकापासून झाली आहे.
या अनोख्या ध्वनिचित्रमुद्रित मासिकाची संकल्पना आणि संपादन शिवा घुगे यांचे आहे.
प्रभात प्रकाशनातर्फे वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके प्रकाशित करणारे तरुण प्रकाशक म्हणून घुगे यांची मराठी साहित्यविश्वाला ओळख आहे. ‘समकालीन संस्कृती’ हे मासिकही त्यांनी काही काळ चालवले. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या ‘कागदी बाण’ या पुस्तकाने त्यांनी प्रकाशनास सुरुवात केली. नवीन काही तरी करावे या एकमात्र उद्देशाने आपण ध्वनिचित्रमुद्रित मासिकाचा प्रयोग करण्याचे ठरवले असल्याचे घुगे यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.
‘तुतारी’च्या दिवाळी अंकात ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांनी ‘पोवाडा आणि लावणी’ याविषयी केलेले विवेचन, कुमार सप्तर्षी यांनी ‘जागतिक क्रांती आणि देशातील आंदोलने’ या विषयावर व्यक्त केलेले मनोगत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सकपाळ यांनी कवितांचे केलेले निरूपण, शाहीर लीलाधर हेगडे यांनी सादर केलेला ‘गांधी हत्या’ आणि स्वातंत्र्यावरील पोवाडा, बाल्या नृत्य, व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या जाहीर कार्यक्रमातील काही अंश आदी साहित्य असल्याचे सांगून घुगे म्हणाले की, अंकातील सहभागी मान्यवरांनी कोणतेही मानधन न घेता आपला सहभाग दिला आहे.
दर महिन्याला एक विषय घेऊन ‘तुतारी’ हे ध्वनिचित्रमुद्रित मासिक प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. डिसेंबर महिन्यातील अंक ‘निवडणूक’ विशेष तर जानेवारी महिन्यातील अंक ‘कविता’ या विषयावरील असेल.  मासिकासाठी एक हजार सभासदांकडून शंभर रुपये घेऊन ‘तुतारी’चे अंक डीव्हीडी स्वरूपात देण्याचा विचार आहे. तसेच या उपक्रमास कोणा प्रायोजकाकडून आर्थिक मदत मिळाली तर ‘तुतारी’चा दिवाळी अंक आणि प्रकाशित होणारे पुढील अंक ‘फेसबुक’वर टाकण्याचा प्रयत्न असल्याचेही घुगे यांनी सांगितले.
कवी केशवसुत यांनी आपल्या ‘तुतारी’ या कवितेत ‘एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी जी स्वप्राणाने’ असे म्हटले होते. अपघातामुळे डाव्या पायाला झालेले फ्रॅक्चर आणि त्यामुळे पायाला आलेले अपंगत्व, फीट येणे अशा शारीरिक व्याधींवर मात करून जिद्दीने घुगे यांनी ध्वनिचित्रमुद्रित मासिकाच्या अनोख्या मासिकाची ‘तुतारी’ तर फुंकली आहे.. घुगे यांचा संपर्क- ८१०८२६१५२५/ ८६५५५२३४३०

(ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे)