28 February 2010

धुळवड-मराठी संस्कृतीची आणि अस्मितेची

गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषा, अस्मिता आणि संस्कृतीचा मुद्दा प्रत्येक राजकीय पक्षाचा त्यातही विशेषत: आधी शिवसेना आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कळीचा मुद्दा ठरला आहे. हे दोन्ही पक्ष मराठीच्या मुद्यावरून कायमच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत आदळणारे प्ररप्रांतीयांचे जास्त करुन उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातून आदळणारे लोंढे, त्यामुळे मुंबईची लागलेली वाट, मराठी भाषा व संस्कृतीवर झालेले हिंदूीचे अतिक्रमण या सारखे विषय नेहमीच चर्चेला असतात. मात्र यात होळीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या धुळवडीच्या सणाकडे अद्याप शिवसेना किंवा मनसेचे लक्ष गेलेले दिसत नाही.


खरे तर धुळवड हा आपल्या मराठी संस्कृतीमधील सण नाही. रंगाची उधळण करणारा ‘रंगपंचमी’ हा मराठी संस्कृतीचा सण. पण गेल्या काही वर्षांपासून मुंबईत आपण होळीचा दुसरा दिवस रंगांची धुळवड करुन साजरा करत आहोत. ही धुळवड म्हणजे एकप्रकारे मराठी संस्कृती आणि उत्सवावर उत्तर भारतीयांचे झालेले अतिक्रमणच आहे. उत्तर प्रदेश, बिहार येथून तो सण आपल्याकडे आला आणि आपण आपली रंगपंचमी विसरुन गेलो.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने प्रकाशित केलेल्या विश्वकोशातील नोंदीनुसार रंगपंचमी म्हणजे, ‘फाल्गुन कृष्ण पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदोत्सव साजरा करतात. त्यामुळे याला रंगपंचमी असे नाव प्राप्त झाले. विविध रंगांची चूर्णे पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यांमधून एकमेकांच्या अंगावर उडविले जाते. रंग उडविण्याचा हा उत्सव महाराष्ट्रात फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जात असला तरी उत्तर भारतात अनेक ठिकाणी तो होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.’ तर धुळवड या सणाविषयी विश्वकोशातीलच नोंदीनुसार, ‘एक भारतीय लोकोत्सव. फाल्गुनातील पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा किंवा होलिकोत्सवाचा एक भाग म्हणून फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुळवड साजरी करतात. या दिवसापासून नवे वर्ष सुरु होते असे उत्तर भारतात (पूर्णिमान्त मास)म्हणतात. समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा हा दिवस आहे. उत्तर भारतात या दिवशी सर्व थरातील लोक एकमेकांवर रंग उडवितात. महाराष्ट्रात या दिवशी चिखल फेकण्याची पद्धत होती. होळीचे भस्म अंगाला लावणे यातून ही प्रथा आली असावी. परंतु कालांतराने अश्लील शब्द उच्चारून शंखध्वनी करणे या सारख्या विकृत गोष्टीही या उत्सवात शिरल्या. शिमगा किंवा होळी सणातच धुळवडीचा अंतर्भाव होतो. होळी पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत होळीचा सण मानला जातो.’


रंगपंचमी ही होळीनंतर पाच दिवसांनी येते. पण बॉलिवूडचे सेलिब्रेटिज् आणि आता गेल्या काही वर्षांत दूरचित्रवाहिन्यांनी ‘धुळवड’ उत्सवही आपल्याकडे खेचून घेतला असून त्याचाही या मंडळींनी इव्हेन्ट केला आहे. त्यामुळे आपणही आपला रंगपंचमी हा मूळ उत्सव किंवा परंपरा सोडून होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करायला लागलो आहोत आणि ती सुद्धा अत्यंत विकृत पद्धतीने. आपल्या पंचांगातही फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी असे म्हटले आहे. होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते ते धुलीवंदन. पूर्वी होळीचा अग्नी घरी आणून त्यावर पाणी तापवून त्या पाण्याने आंघोळ करण्याचीही प्रथा आपल्याकडे होती. आता अपवाद वगळता तीही आपल्याकडून कमी होत चालली आहे.


मराठी संस्कृती, सण उत्सव आणि परंपरेवर पाश्चात्यांच्या आक्रमणाबरोबरच काही प्रमाणात देशाच्या अन्य राज्यातील काही सणांचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे आपण आपले उत्सव आणि संस्कृती विसरत चाललो आहोत. हे कुठेतरी थांबून आपण आपली रंगपंचमी कधीपासून साजरी करणार?

27 February 2010

आम्ही मराठी बोलू कवतिके

आकाशवाणी आणि दूरचित्रवाहिन्यांवरील निवेदक आणि वृत्तनिवेदकांकडून मराठी भाषेची केली जाणारी तोडमोड आणि केले जाणारे शब्दांचे उच्चार यांचे ‘कवतिक’ न संपणारे आहे. मात्र ज्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो, त्यांच्याबद्दल आकाशवाणीच्या निवेदकाचा हा किस्सा भन्नाटच आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने घडलेला हा प्रसंग खूप काही सांगून जाणारा.


निवेदक किंवा वृत्तनिवेदक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला मराठी भाषा, संस्कृती, साहित्य यांची किमान जुजबी ओळख असलीच पाहिजे अशी अपेक्षा काही चुकीची नाही. आकाशवाणीच्या या निवेदकाचा वि. वा. शिरवाडकर आणि कुसुमाग्रज या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असल्याचा समज झाला होता. सुदैवाने कार्यक्रम प्रसारित होण्यापूर्वी ही बाब लक्षात आली आणि आकाशवाणीचे व त्या निवेदकाचेही वस्त्रहरण होता होता टळले. अशा या गमती आकाशवाणी, दूरदर्शन आणि दूरचित्रवाहिन्यांवरील निवेदक व वृत्तनिवेदकांकडून नेहमीच घडत असतात. ही दोन्ही प्रसारमाध्यमे एका वेळी लाखो प्रेक्षक आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचत असतात. त्यामुळे खरे तर येथे काम करणाऱ्या निवेदक-वृत्तनिवेदक मंडळींनी नेहमीच योग्य पद्धतीने आणि थोडीशीही चुक होणार नाही, ही काळजी घेऊन बोलले पाहिजे.

खासगी एफ एम रेडिओ आणि दूरचित्रवाहिन्या व वृत्तवाहिन्यांवरुन तर अधूनमधून मराठीची अशीच वाट लावली जात असते. मराठी भाषेत समर्पक शब्द असतानाही बोलताना हिंदी किंवा इंग्रजी शब्दांचा वापर करणे, कार्यक्रम आणि मालिकांना ना धड मराठी ना धड इंग्रजी अशी नावे देणे तर सर्रास चालते. वृत्तवाहिन्यांवर हातात ‘दंडुका’घेऊन जे वार्ताहर (ज्यांना त्या प्रसारमाध्यमाच्या भाषेत ‘पीटुसी’ म्हणून ओळखले जाते) बातमी सांगत असतात, त्यापैकी अनेकजण मराठी असले तरी बोलताना सर्रास इंग्रजी शब्द वापरत असतात. इव्हेंट, पोलीस कस्टडी, मेगा फायनल, फोन कट झाला आहे, आपली रिअ‍ॅक्शन काय, खूप क्राऊड जमा झाला आहे, रेस्क्यू ऑपरेशन, टेररिस्ट, फायर ब्रिगेड, सस्पेंण्ड, ट्रान्सफर, लोडशेडींग आणि अशा अनेक शब्दांचा त्यात समावेश असतो. एखाद्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ, मोठा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर सर्रास पुस्तकाचे ‘विमोचन’ यांच्या हस्ते करण्यात आले, हा कार्यक्रम ‘संपन्न’ झाला अशी वाक्यरचना केली जाते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठीच्या विकासासासाठी खास मराठी राजव्यवहार कोश तयार करवून घेतला होता. तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मराठी भाषेत घुसलेल्या इंग्रजी, हिंदी, अरबी, फारसी अशा शब्दांना अत्यंत समर्पक असे पर्यायी मराठी शब्द दिले आहेत. ते आज प्रचलितही आहेत. महापालिका, महापौर, महापालिका आयुक्त, नगरसेवक आणि या सारखे आणखी कितीतरी शब्द ही सावरकर यांनी मराठी भाषेला दिलेली देणगी आहे. पण असे समर्पक मराठी शब्द वापरणे हे निवेदक आणि वृत्तनिवेदकांना मागासलेपणाचे लक्षण वाटत असावे. त्यामुळे मग सर्रास कोणतेही शब्द वापरले जातात.

काही जणांचे म्हणणे असे की दुबरेध शासकीय मराठी शब्दांऐवजी किंवा संस्कृत शब्दांना पर्याय म्हणून इंग्रजी शब्द वापरले तर काय बिघडते. त्यातून मराठी भाषा बुडणार आहे का, येथे काही बिघडण्याचा प्रश्न नाही. पण इंग्रजी किंवा अन्य भाषेतील शब्दांना समर्पक व पर्यायी मराठी शब्द असताना ते न वापरता परकीय शब्दांचा आधार घेण्यात काय भूषण आहे, आपल्या भाषेचा आभिमान आणि अस्मिता आपणच जपायची असते. प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या मंडळींनी तर त्याची गंभीरतेने काळजी घेतली पाहिजे. कारण आत्ताच्या पिढीतील काही अपवाद वगळता अनेकजण वृत्तपत्र किंवा पुस्तके वाचण्याऐवजीएफएम रेडिओ ऐकणे किंवा दूरचित्रवाहिन्या पाहणे अधिक पसंत करत आहेत. आकाशवाणी आणि दूरचित्रवाहिन्यांवरुन अनेकदा निधनाच्या बातमीत हमखास चुकीची वाक्यरचना केली जाते. बरेचदा ‘या व्यक्तीच्या पार्थिव शरीरावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले’ किंवा ‘ अमूक अमूक यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आता पार्थिव म्हणजेच मृत व्यक्ती. मग ‘पार्थिव शरीर’ असा शब्दप्रयोगही चुकीचा झाला. त्याऐवजी ‘अमूक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले किंवा अमूक यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते’, असे वाक्य असायला पाहिजे. काही वेळेस अंत्यसंस्काराची बातमी सांगताना ‘यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे काल निधन झाले होते’ असे सांगण्यात येते. ‘निधन झाले होते’ म्हणजे आता त्या व्यक्तीबाबत काही वेगळी गोष्ट घडली आहे किंवा घडणार आहे का, त्यामुळे येथे खरे तर ‘काल त्यांचे निधन झाले’ असे वाक्य असायला पाहिजे.

आकाशवाणीवरून हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज सांगण्यात येतो. येथेही काही वेळेस ‘आत्ताच आपण हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज ऐकलं’ असे चुकीचे बोलले जाते. वाक्याच्या शेवटी हवामानाचा अंदाज हा शब्द वापला असेल तर ‘ऐकलात’ असेच म्हणायला पहिजे. जर वाक्याच्या शेवटी हवामान वृत्त असा शब्द वापरला तर त्या ठिकाणी ‘ऐकलं’ हा शब्द वापरणे योग्य ठरेल.

ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती ही दरवर्षी २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरी केली जाते. हा दिवस केवळ उपचार म्हणून साजरा न करता आपण सगळ्यानीच त्या निमित्ताने काही संकल्प करुन तो मनापासून अंमलात आणण्याची गरज आहे. नाहीतर मराठी भाषा दिन आणि १ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस आपण फक्त साजरे करत राहू पण मराठी भाषा आणि संस्कृतीचे भवितव्य मात्र कठीण असेल. वि. वा. शिरवाडकर यांनीच काही वर्षांपूर्वी ‘भरजरी वस्त्रे ल्यालेली मराठी भाषा मंत्रालयाच्या बाहेर दिनवाणी उभी आहे’ असे सांगितले होते. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत आणि येणाऱ्या भविष्यकाळात वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचे हे वाक्य खरे करून दाखवायचे की खोटे ठरवायचे हे आपल्याच सर्वाच्या हातात आहे.
 
माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (२७ फेब्रुवारी २०१०) मध्ये पान-१ वर प्रसिद्ध झाला आहे. 

23 February 2010

वरातीमागून घोडे

हातात अधिकार आणि सत्ता असताना काहीही ठोस कृती न करता केवळ तोंडपाटीलक्या आणि गप्पा मारायच्या. आणि सत्ता गेल्यानंतर मात्र  हे काम कसे झाले पाहिजे, ते काम आम्हीच कसे मार्गी लावू शकतो,  याच्या निव्वळ घोषणा करायच्या. हा कोणत्याही राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या नेत्यांचा हातखंडा प्रयोग असतो. सर्वसामान्य मतदार आणि नागरिक हे मूर्ख आहेत, या गैरसमजातून किंवा आपण काहीही बोललो तरी काय फरक पडतोय, आपले कोण काय वाकडे करू शकते या वृत्तीतून हे घडत असते. भाजप आणि शिवसेनेच्या अशा दोन गोष्टी नुकत्याच समोर आल्या आहेत. हा प्रकार म्हणजे वरातीमागून घोडे आहे.


काही वर्षांपूर्वी अस्तित्व संपलेल्या भारतीय जनता पक्षाला राम मंदिराचा हुकमी एक्का सापडला. लालकृष्ण अडवाणी यांनी भारतभर रथयात्रा काढून वातावरण तापवले, नंतर कारसेवा करुन बाबरी मशिद पाडण्यातही आली. त्यानंतर देशभर दंगली झाल्या. (बाबरी पाडली  गेल्याचे अजिबात वाईट वाटत नाही.खऱे तर कॉंग्रेस पक्षानेच मुस्लिमांचे लांगूनचालन न करता ठोस भूमिका घेऊन तेव्हाच हा प्रश्न सोडवला असता तर या प्रश्नाचा भस्मासूर आज झाला नसता. राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या प्रमुख उपिस्थतीत सोरटी सोमनाथ या मंदिराचा जिर्णोद्धार केला गेलाच ना ) वेळोवेळी राम मंदिर उभारणीच्या भावनीक मुद्यावर भाजपने राजकारण केले.


आता इंदूर येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात कोलांटी उडी मारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नीतीन गडकरी यांनी एक नवा उपाय सांगितला.  हा उपाय काय तर मुस्लिमांनी रामजन्मभूमीची जागा हिंदूना देऊन टाकावी आणि त्या ठिकाणी राम मंदिर उभारु द्यायचे. मग त्या बदल्यात  त्याच्याच बाजूला भव्य मशिद त्यांना बांधून देण्यात येईल. अरे वा, गडकरी. तुमचा हा उपाय म्हणजे वरातीमागून घोडे असा प्रकार आहे. तुमचा पक्षही पाच वर्षे सत्तेत होता, हा वाद सोडवण्यासाठी समाजातील काही मान्यवरांनी तेव्हाही असा विचार मांडला होता. मग त्यावेळेस त्यावर विचार का नाही केला, केंद्रात तुमची सत्ता असल्याने आणि या पर्यायाला सत्तेतील तुमच्या घटक पक्षानीही विरोध केला नसता. मग तेव्हापासून आजतागायत राम मंदिराचे राजकारण का करत राहिलात. हा सर्व प्रकार पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर स्वतला पुरोगामी सिद्ध करण्यासाठीची खेळी आहे का, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही यावर आपली परखड प्रतिक्रिया दिलेली नाही.  त्याचे प्रमुख आता गप्प का


ज्या राम मंदिरासाठी सर्वसामान्य स्वयंसेवकांनी, कार्यकर्त्यांनी आपले रक्त सांडले, या लढ्यात झोकून दिले, त्यांच्या भावनांशी हा खेळ नाही का, त्यांच्या जखमेवर मीठ चोळणे नाही का, हेच तुम्हाला करायचे होते, तर इतकी वर्षे का थांबलात, या प्रश्नाचे राजकारण का केले, पण याची उत्तरे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मतदारांना कधीच मिळणार नाहीत.


असेच वरातीमागून घोडे शिवसेनेने केले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या अभावी तेथे अधूनमधून अपघात घडत आहेत. येथे जवळपास सुसज्ज रुग्णालय नसल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना मुंबईला आणावे लागत आहे. त्यासाठी आता शिवसेना जागी झाली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आजच  मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शिवसेनेचे रणशिंग. वडखळजवळ ट्रॉमा सेंटर बांधणार, अशी बातमी वाचनात आली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेना तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा दिला आहे.


अरे हे अपघात काय गेल्या चार-सहा महिन्यांपासून होत आहेत का, यापू्र्वी ते होत नव्हते का, मग या अगोदर या कामासाठी रणशिंग का नाही फुंकावेसे वाटले, महाराष्ट्रात पाच वर्षे तुमची सत्ता होती, मग तेव्हा का नाही हा प्रश्न मार्गी लावावासा वाटला, आता सत्ता गेल्यावर या प्रश्नाची तुम्हाला आठवण झाली का,


आज भाजप-शिवसेना आहेत तर  उद्या दोन्ही कॉंग्रेसचे वरातीमागून घोडे असेल. गेंड्याच्या कातडीचे  आणि सर्वसामान्यांच्या सुखदुखाशी कसलेही देणेघेणे नसलेले राजकीय पक्ष आणि त्यांचे निर्लज्ज पुढारी आपल्या देशात असतील आणि त्याना निवडून देणारे आपण सूज्ञ मतदार असू तर काय होणार, वर्षानुवर्षे हे असेच सुरु राहणार.                

12 February 2010

आठवणीतल्या वस्तू

काळ बदलतो आणि काळाबरोबर आपणही बदलत जातो. काळानुरुप हे बदल कधी मनापासून तर कधी मनाविरुद्ध केले जातात. या बदलात घरातील वस्तू,  पेहराव, वागण्या-बोलण्याच्या पद्धती, आवड-निवड, खाण्याचे पदार्थ असे सर्व काही बदलत जाते. या सर्वांमध्ये आपल्या घऱातील वस्तू हा एक मोठा  बदल झालेला आहे. आजच्या पिढीला यापैकी काही वस्तूंची नावेही आता माहिती नसतील. पण काही वर्षांपूर्वी या सर्व वस्तू प्रत्येकाच्या घरातील गरज होती. प्रत्येकाच्या घरी या वस्तू असायच्याच. विस्मृतीत आणि आता काळाच्या पडद्याआड गेलेल्या या वस्तूंची आत्ताच्या पिढीला ओळख करुन देण्याचे आणि जुन्या पिढीतील लोकांना त्याच्या स्मृतिरंजनात रंगून जाण्यासाठीचे एक महत्वाचे काम म. वि. सोवनी यांनी  हरवले ते या पुस्तकाद्वारे केले आहे. सोवनी यांचे हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. आज मी त्याचीच ओळख करून देणार आहे.

या पुस्तकाच्या पुस्तकात नांदीचा पहिला सूर यात लेखकांनी म्हटले आहे की, कालप्रवाह हा वाहात असतो. त्या ओघात जुन्या गोष्टी वाहून जातात. त्यांची जागा नव्या वस्तूंनी घेतली जाते.
अंगरखा, रुमाल, उपरणे, नऊवारी
लुगडी हे सारे कालबाह्य होते                        पानाची चंची 
आणि सफारी सूट, सलवार कमीज हे दिसू लागते. भरघोस अंबाडा नाहीसा होतो आणि त्याची जागा बॉबकट व
बॉयकट घेतात. नव्या पिढीला या स्थित्यंतराची काहीच
पाणी साठविण्याचे घंगाळे

कल्पना नसते. आजच्या युगातल्या बार्बी बाहुलीशी खेळणाऱया मुलीला, आपली आजी लाकडाची ठकी ही बाहुली घेऊन खेळत असे, हे कळले की ती टखी होती तरी कशी, हे जाणून घेण्याची अनावर इच्छा होते. तशीच ती ठकी पाहून आजीच्याही दृष्टीसमोर तिचे सारे बालपण साक्षात उभे राहते. आणि म्हणूनच प्रौढांना आपले बालपण पुन्हा आठवावे आणि बालांना आपले आई-वडील कसे राहात असावेत हे नव्याने समजावे त्यासाठी अशा जुन्या हरवलेल्या काही वस्तूंची ओळख या पुस्तकात आहे. 


सोवनी यांनी हरवले ते या पुस्तकात अशा विस्मृतीत गेलेल्या सुमारे एकशे एक वस्तूंची सचित्र ओळख करुन दिली आहे. हे पुस्तक पुण्याच्या श्रीराम रानडे व सौ. सजीवन रानडे यांच्या भारद्वाज प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. दोन वर्षांपूर्वी ( १ मे २००७) या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. या पुस्तकात काळाच्या पडद्याआड गेलेल्या वस्तूंची सचित्र माहिती  वाचतांना आपल्यालाही थक्क व्हायला होते आणि या वस्तूंचा त्या काळात लोक  वापर करत होते, ते वाचून गंमत वाटते. यात काही वस्तू अनवधनाने राहूनही गेल्या आहेत. त्यापैकी एक सगळ्यात महत्वाची आणि वापरात असलेली वस्तू म्हणजे पाणी तापविण्याचा बंब. आजच्या गिझर आणि हिटर व सोलर उर्जेवरील पाणी तापवण्याच्या काळात बंब हे नाहीसे झाले आहेत. मात्र अशा काही वस्तू सोडल्या तर सोवनी यांनी जुन्या काळातील अनेक वस्तूची आपल्याला या पुस्तकात ओळख करुन दिली आहे.


अधोली या वस्तूपासून सुरु झालेला हा प्रवास हंडी पर्यंत येऊन थाबतो. हे पुस्तक वाचताना आपण जणू काही त्या जुन्या काळात सहजपणे एक फेरफटका मारून येतो. १९५७ मध्ये नवीन वजने-मापे प्रचारात आली. पूर्वीची शेर, पायली, पल्ला मण ही मापे जाऊन ग्रॅम, किलो यांचा वापर सुरु झाला. पूर्वीची मापे ही बारीक आणि दोन्ही बाजूंना खाली व वर पसरत जाणाऱया वर्तुळाकाराच्या आकाराची असत. त्यापैकीच अधोली हे एक माप होते. उखळी आणि मुसळ ही अशीच काळाच्या पडद्याआड गेलेली वस्तू. उखळी म्हणजे दोन ते अडीच फूट उंचीची लाकडी किंवा दगडाची डमरुच्या आकाराची आणि आत पूर्ण पोकळी असलेली वस्तू. तर मुसळ म्हणजे पाच ते सहा फूट उचीचा आणि तीन ते चार इंच व्यासाचा एक साकडी दंडगोल दांडा. यात शेतातून आलेले धान्य घालून वरुन घाव घातले जायचे. त्यामुळे धान्याला चिकटलेली साले, टरफले, भूसा वेगळा होऊन धान्याचे दाणे मोकळे होत असे.


लहान बाळाच्या टोपीचा एक पारंपरिक प्रकार असलेली कुंची.  पायात घालण्याच्या लाकडी खडावा, दाणे किंवा अन्य पदार्थ कुटून त्याची बारीक पूड करण्यासाठी वापरण्यात येणारा खलबत्ता,  कपडे अडकवायची खुंटी, विहिरीत पडलेली भांडी, बादली काढण्याचा गळ, गंगेचे पाणी असणारा गडू, गंजिफा हा सोंगट्यांचा खेळ, गंध लावण्याची साखळी, घटिकापात्र, ताक करण्याचा घुसळखांब, पाणी साठवण्याचे घंगाळ, चरखा, पाळण्याला टांगले जाणारे चिमणाळे, चिलिम, अंगणातील माती नीट बसविण्यासाठी असलेले चोपणे, पान, सुपारी, कात आणि
तंबाकू ठेवण्याची चंची, धान्य दळण्याचे जाते, झारी, टकळी

धान्य कांडण्याचे उखळ

आणि पेळू, कपडे ठेवण्याची लोखंडी ट्रंक, डिंकदाणी,  पाणी साठविण्याची डोणी, ढब्बू पैसा, दिंडी दरवाजा, कापूस पिंजण्याची पिंजण धनुकली, केस कापणारा नाभिक वापरायची ती धोपटी, पाणी वाहून नेण्याची पखाल, पगडी, पाटा-वरवंटा, पानाचा डबा, लहान मूल उभे राहू लागले की त्याला देण्यात येणारा पांगुळगाडा, प्रवासात पाणी पिण्यासाठी वापरला जाणारा फिरकीचा तांब्या, भिकबाळी, पोहण्याचा भोपळा, वाळूचे घड्याळ, रॉकेलचा पंप, रोवळी, रांगोळी काढण्याचे रांगोळे, शिंके, धान्य पाखढण्याचे सूप अशा वस्तूंची  माहिती यात देण्यात आली आहे.
आजच्या पिढीसाठी माहितीचा नवा खजिना तर जुन्या पिढीतील लोकांसाठी स्मृतिरंजन असे हे पुस्तक आहे.

लेखक म. वि. सोवनी यांचा संपर्क
९, अनामय अपार्टमेंट, २३, आयडियल कॉलनी, पौंड रस्ता, कोथरुड, पुणे-४११०३८

भारद्वाज प्रकाशन संपर्क
उमेश, १२८/२ सुमार्ग गृहरचना, नवकेतन, गल्ली क्रमांक-५, कोथरुड, पुणे-४११०३८
दूरध्वनी (०२०-२५४४८०३८)

 देऊळ, जुने वाडे यात दिवे लावले जायचे
त्या हंड्या (हंडी)
                        
                                       लहान मुलांचे डोके आणि कान                                        झाकणारी कुंची 

   

11 February 2010

गडांचा कोश

गड-किल्ल्याची भटकती करणाऱयांसाठी प्र. के. घाणेकर हे नाव अपरिचित नाही. गड, किल्ले, भटकंती, गर्यारोहण या विषयावरील त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. घाणेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या नावावरुनच आपल्याला पुस्तकात काय असेल त्याची सहज कल्पना येऊ शकते. समर्थांचा सज्जनगड, महाराष्ट्र निसर्गदर्शन, जलदुर्गांच्या सहवासात, आडवाटेवरचा महाराष्ट्र, अथ तो दुर्गजिज्ञासा, गडदर्शन, मैत्री सागरदुर्गांशी ही त्यापैकी काही नावे. गाणेकर यांनी लिहिलेले साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. गड-किल्ले आणि भटकंतीची आवड असणाऱयांसाठी हे पुस्तक म्हणचे गडांचा कोश आहे. महाराष्ट्राच्या िविवध जिल्ह्यातील सुमारे १०० किल्ल्यांची सविस्तर माहिती, छायाचित्रे आणि नकाशे या पुस्तकात देण्यात आले आहेत. नेहमी भटकंती करणाऱयांना आणि हौस म्हणून कधीतरी गडांवर जाणाऱया मंडळींना हे पुस्तक अत्यंत उपयुक्त असे आहे.


सातारा जिल्ह्यातील अजिंक्यगडापासून सुरु होणारी सफर नगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र गडापर्यंत येऊन थांबते, या वाचन सफरीत आपण जणू काही प्रत्यक्ष त्या किल्ल्यावर जाऊन येतो. गडाचा इतिहास, काही आख्यायिका, आठवणी, ऐतिहासिक महत्व, गड-किल्ल्याशी संबंधित  इतिहासातील व्यक्ती. त्या ठिकाणी कसे जायचे त्याची माहिती आणि काही नकाशे या पुस्तकात असल्यामुळे ते वाचनीय झाले आहे.


घाणेकर पुस्तकातील आपल्या मनोगतात म्हणतात, ट्रेकिंग म्हणून हिडणं सध्या बरचं बोकाळलाय. हौस म्हणून चार ठिकाणं पाहणं, शायनिंग म्हणून एखाद्या वेळी जाणं वेगळं. आणि तिथल्या गौरवशाली  इतिहासाचा एखादा क्षण जगण्यासाठी त्याच स्थळी जाऊन इतिहासाचा मागोवा घेत शिवस्मरण समाधीच्या आनंदात बुडून जाणं वेगळं. हा आनंद मी लुटला, तुम्ही लुटावा, असं मला वाटलं. म्हणून तुम्हाला खास आवतन. घेतला आनंद, वाटिला आनंद, यापरता आनंद, आणखी कोणता


घाणेकर यंनी आजवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील सुमारे तीनशे किल्ले पायी हिंडून पाहिले आहेत. किल्ले, हिमालय, निसर्ग, गिर्यारोहण, विज्ञान, भटकंती, पर्यंटन आदी विषयांवर आठशेहून अधिक लेख आणि पाचशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत. या विषयावरील दहा हजार लेखांचा कात्रणसंग्रह व पुस्तके त्यांच्याकडे आहेत.  


ओघवत्या लेखनशैलीतून इतिहासाची करुन दिलेली ओळख यामुळे घाणेकर यांची सर्वच पुस्तके वाचनीय आणि संग्राह्य ठरली आहेत.


हे पुस्तक स्नेहल प्रकाशन (पुणे) यांनी प्रकाशित केले आहे. २७ नोव्हेंबर २००७ मध्ये या पुस्तकाची सहावी आवृत्ती प्रसिद्ध झाली.  स्नेहल प्रकाशनाचे संकेतस्थळ http://www.snehalprakashan.com/ असे आहे. (दूरध्वनी-०२०-२४४५२९११)

प्र. के, घाणेकर यांचा पत्ता
१०५, नारायण पेठ, पुणे-४११०३०
      

10 February 2010

हरवले ते गवसले का

आपल्या रोजच्या धावपळीत आणि गडबडीत आपण एखादी वस्तू किंवा आपल्याला हवी असलेली  कागदपत्रे आपण आठवणीने कुठेतरी ठेवून दिलेली असतात. पण जेव्हा ती आपल्याला हवी असतात, तेव्हा मात्र ती सापडत नाहीत. आपण अगदी हवालदील होऊन जातो. आपण आपल्यावरच रागावतो,  आपल्याच वेंधळपणावर मनातल्या मनात चरफडतोही. पण नेमके हवे त्या वेळी आपल्याला जे पाहिजे ते सापडत नाही.  यात कधी तासनतास जातात तर कधी एक-दोन दिवसही. आपल्याला काही केल्या आठवत नाही. मग घरातल्यांकडून आपल्यावर वेंधळा, विसराळू, धांदरट, महत्वाची अशी वस्तू कशी जागेवर ठेवता येत नाही, ठेवल्यानंतर ती कशी सापडत नाही, अशा शब्दातही आपला उद्धार होतो. आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी अशा अनुभवातून नक्कीच गेला असेल.


असे नेमके कसे होत असले, म्हणजे एखादा माणूस मुळातच विसराळू, धांदरट किंवा अव्यवस्थित असेल आणि त्याच्याकडून असे घडले तर आपण समजू शकतो. हं, त्यात काय, तो धांदरटच आहे, असे आपण म्हणतो. पण जी व्यक्ती नेहमी व्यवस्थित असते, आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवते तिलाही कधीतरी अशा प्रसंगाला सामोरे जावे लागते. हरवले ते गवसेल का अशी आपली अवस्था होऊन जाते.  म्हटली तर महत्वाची आणि म्हटली तर नाही, अशी ती वस्तु असते. कितीही प्रयत्न केले तरी आपण ती वस्तू कुठे ठेवली आहे ते काही केल्या आठवच नाही आणि आपण ती वस्तू शोधण्याच्या, कुठे ठेवली आहे, ते आठवण्याच्या जितके मागे लागतो, तितकी ती वस्तू आपल्यापासून दूर जाते म्हणजे कुठे ठेवली आहे, ते अजिबात आठवत नाही.


हे होण्याचे साधे कारण म्हणजे कदाचित आपली मनस्थिती त्या वेळी ठिक नसते. घऱातील किरकोळ वाद, मुलांचा अभ्यास, त्यांचे परीक्षेतील मार्क, ऑफिसमधील ताण-तणाव, मनात एक आणि डोक्यात सुरु असलेले भलतेच विचार, अकारण उद्याची (भविष्याची) वाटणारी काळजी अशा काही कारणांमुळे आपल्या मेंदुत विचारांचा ट्रॅफीक जाम झालेला असतो. त्यामुळे आपण कितीही आठवायचा प्रयत्न केला तरी आपल्याला आठवत नाही. अशा वेळी आपले डोके  व मन शांत ठेवणे आणि  त्या गोष्टीचा/वस्तूचा नाद सोडून देणे काही वेळा फायदेशीर ठरते. आपली मनस्थिती ठिक झाल्यानंतर अचानक मेंदुत काहीतरी घडते आणि ती वस्तू आपल्याला सापडते. अशा वेळी होणारा आनंद अवर्णनीय असतो. केवळ युरेका युरेका म्हणत आपण ओरडायचेच बाकी असते. हरवले ते गवसले की अरेच्चा इथेच तर आपण हे ठवले होते, मग इतका वेळ कसे लक्षात आले नाही, याचा विचार करुन आपण आपल्याच वेंधळेपणावर हसतो.


पूर्वी विसराळुपणा किंवा लक्षात न राहणे या गोष्टी वाढत्या वयाबरोबर येतात, असे समजले जात होते. वाढत्या वयोबरोबर आपल्यात काही शारिरीक आणि मानसिक बदल होत असल्याने या गोष्टी घडायच्या. पण आता लहान किंवा तरुण वयातही ही समस्या दिसून येते. याला आपली बदलती जीवनशैली, धावपळ, जीवघेणी स्पर्धा, दैनंदिनी व्यवहारातून आपल्यावर येणारा ताण आदीही कारणे त्यामागे असू शकतात, हे आपण लक्षातच घेत नाही. तेव्हा कधी कधी विसराळूपणा झाला तर डोके शांत झाल्यानंतर ती वस्तू शोधा. नक्की सापडेल की नाही पाहा.  उगाचच आदळआपट, आरडाओरड आणि चरफ़त बसून काहीही होत नाही. उलट त्याचा आपल्याला आणि इतरानाही त्रासच होतो. मात्र  असा विसराळूपणा वारंवार घडायला लागला तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते सांगतील ते औषधोपचार करा, मानसोपचार तज्ज्ञांचाही सल्ला घ्या.  विसराळूपणा विसरु नका ...  

या संदर्भातील माहिती, अन्य लेख पुढीलप्रमाणे
१) http://www.miloonsaryajani.com/node/388
२) http://www.loksatta.com/old/daily/20030605/chtan.htm
३) http://marathi.webdunia.com/miscellaneous/health/article/0706/19/1070619009_1.htm
४) http://marathi.webdunia.com/miscellaneous/health/article/0706/19/1070619009_1.htm

             

09 February 2010

बोलणारी पुस्तके

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड अर्थात ‘नॅब’ या संस्थेने उपलब्ध करुन दिलेली ‘ऑडिओ बुक्स’ अंध व्यक्ती आणि विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरली आहेत. ऑडिओ बुक्समुळे सर्वसामान्यांप्रमाणेच अंधानाही वाचनाचा आनंद घेणे शक्य झाले आहे. कथा, कादंबरी, आत्मचरित्र या सारख्या ललित साहित्याबरोबरच पहिली ते पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीही अभ्यासाची पुस्तके ‘नॅब’ने ऑडिओ स्वरुपात उपलब्ध करुन दिली आहेत. ‘नॅब’च्या ग्रंथालयात पाच हजारांहून अधिक ऑडिओ बुक्स असून महाराष्ट्रासह देशभरातील अंध वाचक त्याचा लाभ घेत आहेत.


‘नॅब’कडे दोन हजारांहून अधिक मराठी भाषेतील ऑडिओ बुक्स असून हिंदी, इंग्रजी, गुजराथी व अन्य भाषेतील ऑडिओ बुक्सचाही त्यात समावेश आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच अंध विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी ‘नॅब’ने शालेय अभ्यासक्रमाची ऑडिओ बुक्स उपलब्ध करुन दिली आहेत. यात पहिली ते पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील पुस्तकांचा समावेश आहे. तसेच बी.एड, डी. एड आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी असलेली पुस्तकेही ‘नॅब’ने तयार केली आहेत. ललित साहित्य आणि क्रमिक पुस्तके अशा दोन स्तरावर ‘नॅब’तर्फे ऑडिओ बुक्स तयार केली जात असल्याची माहिती ‘नॅब’चे संचालक रमण शंकर यांनी दिली.


‘नॅब’च्या कार्यालयात येणारे अंध वाचक, आमची व्यवस्थापन समिती, अंध विद्यार्थी यांच्याकडून येणाऱ्या सूचना आणि शिफारसींनुसार आम्ही कोणती पुस्तके ‘ऑडिओ बुक्स’ म्हणून तयार करायची ते ठरवत असतो. क्रमिक पुस्तकांबरोबरच ललित साहित्यातील कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र या प्रकारातील पुस्तके आम्ही ऑडिओ बुक्स म्हणून तयार करतो. अंध विद्यार्थ्यांसह अंध गृहिणी, ज्येष्ठ नागरिक या पुस्तकांचा लाभ घेत असतात. मराठीतील पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, गो. नी. दांडेकर यांच्यासह मराठीतील अनेक लेखकांच्या पुस्तकांची ‘ऑडिओ बुक्स’ आमच्याकडे आहेत, अशी माहितीही रमण शंकर यांनी दिली.

आमची ही ‘ऑडिओ बुक्स’ बाहेर विक्रीसाठी नसतात. तर ती फक्त अंध व्यक्तींसाठीच आम्ही उपलब्ध करु देतो. ‘नॅब’चे स्वत:चे ऑडिओ बुक्सचे ग्रंथालय, स्वतंत्र स्टुडिओ आहे. आमच्या ग्रंथालयाचे जे सभासद आहेत, त्यानाच ही ऑडिओ पुस्तके आम्ही कुरिअरने घरपोच करतो. आता सीडी स्वरुपातील ही ऑडिओ पुस्तके उपलब्ध असून काही जण आपल्या मोबाईलवरही पुस्तके घेतात आणि ऐकतात. पुस्तके ऐकून झाल्यानंतर ती पुन्हा आमच्याकडे परत केली जातात. सभासदांसाठी वार्षिक पन्नास रुपये शुल्कात आम्ही ही ऑडिओ पुस्तके उपलब्ध करुन देतो. पुस्तकांचे ध्वनिमुद्रण करण्यापूर्वी संबंधित लेखक, प्रकाशक आणि संबंधितांची रितसर परवानगी घेण्यात येते. ही परवानगी देताना याचा उपयोग फक्त अंधांसाठीच केला जाईल, या अटीवरच आम्हाला परवानगी देण्यात येते. त्यामुळे अंधांखेरीज सर्वसाधारण लोकांसाठी आम्ही ही ऑडिओ बुक्स देऊ शकत नसल्याचे ते म्हणाले.

 
गेल्या चाळीस वर्षांपासून आमचा हा उपक्रम अव्याहतपणे सुरु असून आगामी काळातही जास्तीत जास्त पुस्तके ऑडिओ स्वरुपात तयार करुन अंधांना ती उपलब्ध करुन दिली जातील. या ऑडिओ बुक्ससाठी आवाज देण्याकरता व्यावसायिक निवेदकांबरोबरच हौशी निवेदकांचाही यात सहभाग असतो. आकाशवाणीचे निवृत्त निवेदक अनिल कीर, अभिनेते प्रसाद फणसे, प्रसाद पंडित आदी मंडळी आमच्याकडे पुस्तकांना नियमित आपला आवाज देत असतात. ‘ऑडिओ बुक्स’ तयार करण्याच्या या उपक्रमाचा वार्षिक खर्च सुमारे ३० लाख रुपये इतका आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून दरवर्षी सहा ते सात लाख रुपये इतके अनुदान मिळते. मात्र एकूण वार्षिक खर्चाच्या तुलनेने ते कमी आहे. त्यामुळे दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी आमच्या या उपक्रमास मदत करावी, असे आवाहनही रमण शंकर यांनी केले.
 
माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (६ फेब्रुवारी २०१०) पान एकवर प्रसिद्ध झाली असून त्याची लिंक
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=45567:2010-02-05-15-21-53&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81
 अशी आहे.
 
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड आणि अंध व्यक्ती व संस्थांबाबत अधिक माहिती खालील संकेतस्थळांवर मिळू शकेल.
१) http://www.nabindia.org/
२) http://www.senseintindia.org/htmls/nab_mumbai.html
३) http://www.disabled-world.com/artman/publish/famous-blind.shtml 

08 February 2010

द्रष्टा

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक धुंडीराज ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मुकपट) तयार केला आणि तिथेच भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला गेला. आज भारतीय चित्रपट सृष्टी/उद्योगात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब यांनी रोवली. त्यांनी निर्माण केलेल्या राजा हरिश्चंद्र या चित्रपटानंतर त्यांना लंडन येथे राहून तेथे चित्रपट निर्मिती करावी, असे तेथील लोकांनी सुचवले होते. मात्र मी येथे राहिलो तर भारतात, माझ्या मायदेशात या उद्योग कसा फोफावेल, त्याचा विकास कसा होईल असे उत्तर देऊन दादासाहेब फाळके पुन्हा मायदेशी परतले. पहिल्या चित्रपटाची निर्मिती करत असताना त्यांना समाजाकडून टिका, चेष्टा प्रसंगी अवहेलनाही सहन करावी लागली. मात्र ते सर्व सोसून त्यांनी एका जिद्दीने आपला पहिला चित्रपट पूर्ण केला. काळाच्याही पुढे जाऊन दादासाहेब यांनी  चित्रपट निर्मितीच्या उचललेले हे शिवधनुष्य म्हणजे त्यांचे द्रष्टेपणच होते.


भारतीय चित्रपट सृष्टीच्या या थोर जनकाची जीवनकथा आणि मेकिंग ऑफ राजा हरिश्चंद्रची कथा उलगडणारा हरिश्चंद्राची फॅक्टरी हा मराठी चित्रपट पाहिला. चित्रपट पाहताना कुठेही कंटाळा  येत नाहीच आणि तो केवळ फाळके यांची जीवनकथा सांगणारा माहितीपटही होत नाही. याचे सारे यश चित्रपटाचे सर्व निर्माते आणि दिग्दर्शकांचे आहे. छोट्या-मोठ्या प्रसंगातून हा चित्रपट पुढे सरकत जातो आणि आपण चित्रपटात कसे गुंतत जातो, ते आपल्यालाही कळत नाही. दादासाहेब आणि त्यांचे कुटूंब आपलेच होऊन जाते. त्यांच्या सुखदुखाशी आपण समरस होऊन जातो. हे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सर्व कलाकारांचेच यश आहे. दादासाहेब फाळके यांच्या भूमिकेतील नंदू माधव, त्यांच्या पत्नीचे काम करणाऱया विभावरी देशपांडे, दोन्ही मुले (   ) तसेच त्यांना साथ देणाऱया सगळ्या कलाकारांनी सुरेख साथ दिली आहे.
.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या जनकाची जिद्द, हलत्या चित्रांचे पडद्यावरचे नाटक निर्माण करण्याचा घेतलेला ध्यास,  हा ध्यास पूर्ण करण्यासाठी समाज, आप्त किंवा परिचितांकडून झालेली अवहेलना, टिका, मात्र त्यामुळे खचून न जाता आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारी,  पत्नी, मुले आणि काही आप्त व परिचितांचे मिळालेले सहकार्य यातून दादासाहेब फाळके यांचे व्यक्तिमत्व समर्थपणे आपल्यापुढे उभे राहते. हलती चित्र किंवा छायाचित्र काढणे म्हणजे काहीतरी जादूटोणा किंवा विपरित गोष्ट आहे. असा समज समाजात ठामपणे पसरलेला असताना तो खोडून टाकून समाजाला आपण करतोय ते पटवून देण्याचे अवघड काम दादासाहेब फाळके यांनी त्या काळात केले.


समाजाकडून अवहेलना आणि अपमान होत असूनही भारतीय चित्रपट निर्मिती करण्याचा घेतलेला वसा त्यांनी सोडला नाही. त्यामळेच आज भारतीय चित्रपट सृष्टीचा झालेला विशाल वटवृक्ष आपण पाहत आहोत. खऱे म्हणजे यापूर्वीच दादासाहेब फाळके यांच्यावर चित्रपटांची निर्मिती व्हायला हवी होती. पण उशिराने का होईना ती उणीव भरुन निघाली हे महत्वाचे आहे. त्याबद्दल चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अन्य सर्व संबंधित तसेच चित्रपटातील सर्व कलाकार यांचे मनापासून अभिनंदन. 
 

07 February 2010

कवचकुंडले

विळीवर भाजी चिरताना कधी कधी घाईगडबडीत अचानक बोट कापते आणि त्यातून भळाभळा रक्त वाहायला सुरुवात होते, मग आपण रक्त वाहणारा हात/बोट थेट वाहत्या पाण्याखाली धरतो, रक्तस्त्राव थांबविण्यासाठी बोट तोंडात घालतो किंवा हळद चेपून रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न करतो. मोठा अपघात झाला किंवा गंभीर भाजण्याच्या घटनेतही मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होतो. अशा वेळी पहिल्यांदा रक्तस्त्राव थांबविणे हे रुग्णाच्या जीवासाठी महत्त्वाचे असते. छोटी जखम असेल तर रक्तस्त्राव काही वेळाने आपोआप थांबतो, पण गंभीर जखम झाल्यास रक्तस्त्राव थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. आपल्या रक्तातील ‘प्लेटलेट्स’ रक्त गोठण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत असतात.त्यामुळे ‘प्लेटलेट्स’ म्हणजे आपल्या प्राणांसाठीचे कवचकुंडल आहेत.



‘प्लेटलेट्स’रुपी या कवचकुंडलांविषयी अधिक माहिती देताना नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात ‘निमा’च्या महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य डॉ. अभय कानेटकर यांनी सांगितले की, कोणत्याही गंभीर अपघातात किंवा भाजण्याच्या दुर्घटनेत तसेच डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस् यांसारख्या गंभीर आजारात प्लेटलेट्सची आवश्यकता भासते. आपल्या शरीरातील रक्तात हिमोग्लोबीन, कॅल्शिअम, पांढऱ्या आणि लाल पेशी, ऑक्सिजन असे अनेक महत्त्वाचे घटक असतात. तसेच आपल्या रक्तात ‘प्लेटलेट्स’ हाही एक महत्त्वाचा घटक असतो. रक्त गोठविण्याचे काम या ‘प्लेटलेट्स’ करीत असतात. एखादी जखम झाल्यास रक्तस्त्राव होतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये रक्तस्त्राव होण्याचा आणि तो थांबण्याचा काळ वेगवेगळा असतो. रक्तातील ‘प्लेटलेट्स’ हा घटक रक्त गोठविण्याचे (गुठळी तयार करण्याचे)काम करतो. जखमेच्या ठिकाणी प्लेटलेट्स एकत्र येतात आणि रक्तस्त्राव बंद होतो.


एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील हिमोग्लोबीन कमी झाले तर त्याला बाहेरून औषधे, गोळ्या किंवा इंजेक्शन देऊन त्याची पातळी वाढवता येते. तसेच कॅल्शियमच्याही गोळ्या किंवा इंजेक्शन देऊन ते वाढवता येते. मात्र रक्तातील ‘प्लेटलेट्स’ कमी झाल्या तर कोणत्याही गोळ्या, औषधे किंवा इंजेक्शन देऊन त्या वाढविता येत नाहीत. संबंधित व्यक्तीला त्या रक्तावाटेच द्याव्या लागतात, असे सांगून डॉ. कानेटकर म्हणाले की, रक्ताच्या तपासणीमध्ये अन्य घटकांप्रमाणेच ‘प्लेटलेट्स’चे प्रमाणही तपासता येते. सर्वसामान्य माणसाच्या शरीरात अडीच लाख इतक्या संख्येत ‘प्लेटलेट्स’ असतात, सुदृढ व्यक्तीसाठी ही संख्या आवश्यक असते. त्यापेक्षा प्रमाण कमी असेल तर ‘प्लेटलेट्स’ द्याव्या लागतात. काही वर्षांपूर्वी रक्तातून ‘प्लेटलेट्स’ वेगळ्या काढण्याचे तंत्र विकसित झालेले नव्हते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला रक्तातील फक्त ‘प्लेटलेट्स’ची गरज असली तरी त्याला संपूर्ण रक्त द्यावे लागायचे. मात्र आता तसे होत नाही. रक्तातील घटक वेगळे करणारी यंत्रणा ‘आयएसओ’ नामांकनप्राप्त रक्तपेढय़ांमध्ये असते. या ठिकाणी प्रयोगशाळेत रक्तातील ‘प्लेटलेट्स’ वेगळ्या काढून त्या वेगळ्या पिशवीत भरतात. त्यामुळे आता रुग्णाला फक्त ‘प्लेटलेट्स’ही देता येऊ शकतात.


आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा रक्त जमा केलेली पिशवी रक्तपेढीत जमा केली जाते. या ठिकाणी रक्ताच्या प्रत्येक पिशवीतील लालपेशी (आरबीसी), हिमोग्लोबीन आणि ‘प्लेटलेट्स’ वेगळ्या केल्या जातात. हे तीन घटक वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरले जातात. त्यामुळे आता एका व्यक्तीने दिलेल्या रक्ताचा उपयोग तीन वेगवेगळ्या रुग्णांना होऊ शकतो. रुग्णाला ‘प्लेटलेट्स’ देण्याचे काम दोन प्रकारे होते. एक प्रकार म्हणजे रक्तपेढीत जमा झालेल्या रक्तातील वेगळ्या केलेल्या ‘प्लेटलेट्स’ ज्याला गरज आहे, त्याला देता येऊ शकतात. तर दुसरा प्रकार म्हणजे ‘प्लेटलेट्स’ दान (रक्तदान करण्याप्रमाणे ‘प्लेटलेट्स’ही दान करता येतात) करणाऱ्या दात्याच्या रक्तातून थेट ‘प्लेटलेट्स’ काढल्या जातात आणि त्या लगेच संबंधित रुग्णाला दिल्या जातात. रुग्ण आणि ‘प्लेटलेट्स’दाता हे एकाच वेळी रुग्णालयात हजर असतात. ही यंत्रणा डायलेसिस्सारखी असते. दात्याच्या रक्तातून काढलेल्या ‘प्लेटलेट्स’ रुग्णाच्या रक्तात मिसळल्या जातात.


गंभीर अपघात, भाजणे यांसारख्या दुर्घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होत असतो. अशा वेळी रक्तस्त्राव थांबवणे ही पहिली गरज असते. त्यासाठी प्लेटलेट्सची आवश्यकता भासते. डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस् यांसारख्या आजारात प्रतिजैविके देऊन ताप बरा केला जातो. मात्र ताप उतरला तरी रक्तातील ‘प्लेटलेट्स’ कमी होत असतात. कमी झालेल्या ‘प्लेटलेट्स’ कोणतीही औषधे किंवा इंजेक्शनने भरून निघत नाहीत. त्यासाठी थेट रक्तातील ‘प्लेटलेट्स’चे प्रमाण वाढविण्याची गरज असते. रुग्ण बरा होऊन घरी गेला आणि एखाद्या अपघातात तो जखमी झाला, तर रक्तस्त्राव होऊन त्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा रुग्णांना ‘प्लेटलेट्स’ची अत्यंत गरज भासते. रक्तदानाप्रमाणेच ‘प्लेटलेट्स’ दानही करता येऊ शकते. मात्र त्याचा मोठय़ा प्रमाणात प्रचार होण्याची गरज असून ‘प्लेटलेट्स’ दान करणाऱ्या दात्यांच्या संख्येत वाढ होणे आवश्यक आहे. त्यामुळे आता रक्तदान करणाऱ्यांप्रमाणेच ‘प्लेटलेट्स’ दान करण्यासाठी मोठय़ा संख्येने व्यक्तींनी पुढे यायला हवे, अशी अपेक्षाही डॉ. कानेटकर यांनी व्यक्त केली.

माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (रविवार, ७ फेब्रुवारी २०१०) च्या अंकात पान-१ वर प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=45837:2010-02-06-15-54-26&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81

06 February 2010

नानाची टांग

प्रिय नाना पाटेकर,
नमस्कार

आता पत्राची सुरुवात जय महाराष्ट्र म्हणून की जय भारत म्हणून करु,  असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे. खऱे तर कोणत्याही भाषणाचा समारोप हा कोणीही सर्वसामान्य मराठी व्यक्ती किंवा मान्यवर हे अगोदर जय महाराष्ट्र आणि नंतर जय भारत म्हणून करत असतात. आजपर्यंत आमच्या मनात तुमच्याबद्दल प्रखर मराठीप्रेमी आणि धर्माभिमानी अशी ओळख होती. सार्वजनिक क्षेत्रातील तुमचा वावर, प्रसार माध्यमातून तुमच्याविषयी आलेले लेख, प्रसिद्ध झालेल्या तुमच्या मुलाखती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आपल्याला असलेले प्रेम, आदर, मराठी असल्याचा अभिमान असे तुमची इमेज तयार झाली होती. मात्र आजच्या वृत्तपत्रातून पुण्यातील एका कार्यक्रमात तुम्ही केलेल्या भाषणाचा वृत्तान्त वाचला आणि धक्का बसला. नाना पाटेकर तुम्हसुद्धा...


साधना ट्रस्टने आयोजित केलेल्या एका कायर्क्रमात मी केवळ मराठीच कसा असा सवाल तुम्ही उपस्थित केला. मी देशातल्या इतर राज्यांचाही आहे व इतर राज्यातील मंडळीही माझीच आहेत. त्यामुळे मी केवळ मराठी किंवा महाराष्ट्रीयन माणूस कसा असू शकतो, असेही तुम्ही या वेळी बोललात. इलेक्ट्रॉनिक मिडियातूनही तुमचे हे वक्तव्य आम्ही पाहिले. तुमच्या या विधानाने समस्त मराठी समाज, तुमचे चाहते यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण तुम्ही राजकारणी नाही, राजकारण्यांसारखी गेंड्याची कातडी आणि प्रवृत्तीही तुमची नाही. तुम्ही एक संवेदनशील माणूस आणि अभिनेता म्हणून ओळखले जाता. समाजातील दुर्बल घटकांसाठी तुम्ही जी काही मदत करता, त्याची कधीही दवंडी पीटत नाहीत. तुम्ही जे करता, त्यात आत-बाहेर असे काहीही नसते. जे आहे ते रोखठोक. मग तुमच्या या स्वभावाला आत्ताच असे बोलून मुरड का घालाविशी वाटली. राजकारणात उतरायची किंवा शासकीय पुरस्कार मिळविण्यासाठीची तर ही पहिली पायरी नाही ना


बॉलिवूडमध्ये मराठीचा झेंडा अभिमानाने घेऊन फिरणारे, सर्वसामान्यांशी नाळ अजुनही न तोडलेले आणि कायम जमिनीवर राहणारे म्हणून आम्ही तुम्हाला ओळखत होतो. हिंदी चित्रपट करुन आणि येथील सर्वसामान्य प्रेक्षकांच्या प्रेमावर मोठे झालेले सर्व कलाकार हे बॉलिवूडच्या कोणत्याही जाहीर समारंभात, पुरस्कार प्रदान सोहळ्यात हिंदीला टांग मारून जणू काही हे कायर्क्रम भारतातील तोणत्याही शहरात नव्हे तर इंग्लंड, अमेरिकेतील प्रेक्षकांसमोर चालले आहेत, असे समजून सर्रास इंग्रजीत बोलत असतात. त्यात तुमचा अपवाद होता. अशा पुरस्कार वितरण सोहळ्यात किंवा कार्यक्रमात तुम्ही आवर्जून मराठी किंवा हिंदीतच बोलता, अशी तुमची प्रसिद्धी होती आणि आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत असल्याचेही तुम्हीच जाहीरपणे सांगितले होते. मग पुण्याच्या कार्यक्रमात असे अचानक काय झाले की तुम्हाला मी केवळ मराठीच कसा, असा प्रश्न पडला.


मागे सचिन तेंडुलकर यानेही मुंबईबाबत असेच गुळमुळीत विधान केले होते. त्यावेळीही त्याने मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली, हे शहर बहुभाषिक असले तरी सगळ्यात पहिल्यांदा मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. आणि राज्याच्या राजधानीत मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे, मराठी भाषा व मराठी माणसांना डावलून चालणार नाही, असेही त्याने बोलायला हवे होते.  खरे तर मराठी सेलिब्रेटीजनी आपण मराठी असल्याचा आणि महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान बाळगला तर काय बिघडले, अन्य राज्यातील अभिनेते, क्रिकेटपटू, राजकीय नेते, सेलिब्रेटीज अभिमानाने आपल्या भाषेचा आणि त्या राज्याचा असल्याचे जाहीरपणे सांगत असतात. रजनीकांत हा मुळचा मराठी माणूस. शिवाजी गायकवाड हे त्यांचे मूळ नाव. पण आज ते तामिळ भाषेतील चित्रपटांचे सुपरस्टार आहेत. ते तामिळ भाषा आणि त्यांच्या हितासाठीच बोलतात. मग आपल्या मराठी सेलिब्रेटीजनीही कलावंत किंवा क्रिकेटपटू हे कोणत्या जातीचे, भाषेचे किंवा एखाद्या राज्याचे नसतात हे मान्य केले आणि तसे जाहीरपणे सांगितले तरी ते सांगून असे असले तरी मी सर्वप्रथम मराठी/महाराष्ट्रीयन असून मला त्याचा अभिमान आहे, असे सांगितले तर ते जास्त संयुक्तीक ठरले असते,   असे मला वाटते.


आपली भाषा, धर्म आणि संस्कृतीचा आपणच अभिमान बाळगायचा असतो. आपण आपले हे स्वत्व हरवले तर इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे. उलट तुमच्या साऱखे अनेक मान्यवर आणि सेलिब्रेटीज जेव्हा ठामपणे आणि जाहीरपणे वेळोवेळी मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे, असे सांगाल किंवा मराठी भाषा आणि संस्कृती व धर्माच्या होणाऱया गळचेपीबद्दल आवाज उठवाल, त्या त्या वेळी होणाऱया आंदोलनात रस्त्यावर उतरुन सहभागी व्हाल, तेव्हा त्या आंदोलनाला वेगळी धार येईल, हे तुम्ही मंडळी कसे विसरता.


पण खरे सांगू मी केवळ मराठीच कसा, या तुमच्या विधानाने तुमचे समस्त चाहते आणि मराठी समाजाला धक्का बसला आहे. त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तुमच्या आजपर्यंतच्या प्रतिमेच्या विपरित घडले आहे. तुम्ही मराठीपणाला, मराठी असण्याच्या अभिमानाला दिलेली टांग मन व्यथीत करणारी आहे. तुमचा एकूण स्वभाव पाहता, मी असे बोललेलोच नाही, प्रसारमाध्यमांनी माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला, असेही तुम्ही म्हणालात, तरी ते आम्हाला पटणार नाही. नाना, तुम्हाला तुम्ही कोणाचे, महाराष्ट्राचे की भारताचे, असेही कोणी विचारले नव्हते. मग असे बोलून नवा वाद का निर्माण केलात, जे बोललात, त्याला जोडूनच तुम्ही मात्र असे असले तरीही मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे, असे वाक्य म्हणाला असतात तर आमच्यासाठी ते अधिक आनंददायक ठरले असते.


मराठी नसलेल्या अन्य कलाकारांवरही आम्ही मराठी प्रेक्षक प्रेम करतो व आम्हाला ते आवडताततही. पण तुम्ही आपले म्हणून मराठी प्रेक्षक इतरांपेक्षा तुमच्यावर काकणभर जास्त प्रेम करतात.  असो.  आणखी काय लिहू. . 

कळावे,

आपला

शेखर जोशी                           

05 February 2010

अनिल अंबानी यांचा मराठी बाणा

मुकेश आणि अनिल अंबानी बंधुंच्या वादातून धीरुभाई अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमुहाची विभागणी झाली. दोघे भाऊ वेगवेगळे झाले. दोघांनी आपले स्वतंत्र साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यात अलिकडेच मुकेश अंबानी यांनी मुंबई सर्वांची असे वक्तव्य करुन आपला वेगळा बाणा दाखवून दिला तर आता अनिल अंबानी हे आपल्या बिग टीव्ही (डीटीएचसेवा)च्या माध्यमातून मराठी बाणा जपण्याचा प्रयत्न करणार आहेत. (लोकमत-मुंबई,  ५ फेब्रुवारी २०१०च्या अंकात प्रसिद्ध झालेली बातमी) सध्याच्या मुंबई कोणाची, मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्यावर होणारा अन्याय या पाश्वर्भूमीवर अनिल अंबानी यांचा हा निर्णय त्यांच्यातील मुत्सद्दीपणाची आणि व्यावयायिक दृष्टीकोनाची साक्ष देत आहे.


अनिल अंबानी यांच्या बिग टीव्हीने महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचा जनमानसावरील प्रभाव ओळखून निवडक पु. ल. देशपांडे, बटाट्याची चाळ, ती फुलराणी तसेच अन्य दर्जेदार मराठी चित्रपट व नाटके बिग टीव्हीवर दाखविण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात/मुंबईत अनेक लोकांनी आता टाटा स्काय, बिग टीव्ही, झीची डीश टीव्ही आणि अन्य कंपन्यांची  सेवा घेतलेली आहे. केबल चालकांची मनमानी आणि खराब प्रक्षेपणापेक्षा यांचा दर्जा चांगला असल्याने अनेक लोक त्याकडे वळत आहेत. मात्र सर्वच कंपन्यांच्या डिश सेवेवर मराठीमध्ये सुरु असलेल्या सर्व दूरिचत्रवाहिन्या पाहायला मिळत नाहीत. त्याच वेळी कन्नड, तामिळ, तेलगु आदी भाषांच्या वाहिन्या मात्र मोठ्या संख्येत पाहायला मिळतात. त्या पाश्वभूमीवर मराठी प्रेक्षकांना आकर्षित करुन घेऊन आपल्याकडे खेचून घेण्यासाठी अनिल अंबानी यांनी हे पाऊल उचलले आहे. यात त्यांची व्यावसायिकता आहेच पण सध्याच्या परिस्थितीत अंबानी यांचे हे पाऊल मराठी लोकांसाठी दिलासादायक ठरु शकते.

मराठीतील दर्जेदार चित्रपट, नाटके आणि अन्य कलाकृतींचे हक्क मिळविण्यासाठी बिग टीव्ही कामाला लागले आहे. या सर्व कलाकृती बिग टीव्हीवर मराठी प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळतील, अशी व्ववस्था करण्यात येणार आहे. प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिलेल्या अशा कलाकृती त्यांना अत्यल्प किंमतीत आणि उत्कृष्ट दर्जासह घरबसल्या पुन्हा पाहायला मिळाल्या तर त्याला नक्कीच मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास अनिल अंबानी यांना नक्कीच वाटत असावा. आणि म्हणूनच त्यानी आपल्या बिग टीव्हीच्या माध्यमातून हे पाऊल उचलले आहे. मराठी प्रेक्षकांना स्मरणरंजन आवडते त्यातही  मराठी नाटक, संगीतविषयक कार्यक्रम, संगीत मैफली, जुने चित्रपट, संगीत नाटके हा त्यांचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, हे ओळखुनच अंबानी यांनी बिग टीव्हीच्या माध्यमातून मराठी प्रेक्षक आपल्याकडे खेचण्यासाठी हा धोरणी निर्णय घेतला आहे.    


खरे तर डीश टीव्हीच्या अन्य उत्पादकांनाही असे पाऊल यापूर्वीच उचलता आले असते. किमान मराठीत सध्या जितक्या वाहिन्या सुरु आहेत, त्या सर्व आम्ही दाखवतो, अशी प्रसिद्धी करुन अनेक मराठी ग्राहक त्यांना मिळवता आले असते. मराठी वृत्तपत्रातूनही या विषयी अनेक बातम्याही वेळोवेळी प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र अद्यापही  कोणत्याच डिश टीव्हीवर मराठीत सुरु असलेल्या सगळ्या वाहिन्या दिसू शकत नाहीत.


अनिल अंबानी यांच्या या मराठी बाण्याला मराठी प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, यामुळे बिग टीव्हीची सेवा घेणाऱया प्रेक्षकांच्या संख्येत वाढ होते का, सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही तरी अनिल अंबानी आपले मराठी बाण्याचे धोऱण पुढे सुरु ठेवणार की काही महिन्यात ते गुंडाळणार याची उत्तरे लवकरच मिळतील. आता अंबानी यांना टक्कर देण्यासाठी अन्य एखादी कंपनी काही वेगळे करते का, तेही लवकरच पाहायला मिळेल. तसे झाले तर या स्पर्धेतून मराठी प्रेक्षकांचाच फायदा होणार आहे हे मात्र  ठामपणे म्हणता येईल.           

04 February 2010

मराठीची वज्रमुठ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत झालेल्या जाहीर सभेत पुन्हा एकदा मराठीचा राग आळवत मराठी बाणा, मराठी भाषा आणि संस्कृती यांची जपणूक करण्याचा राजमंत्र सांगितला.त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते आणि सर्वसामान्य माणसांनी मतभेद आणि पक्षभेद विसरुन एकत्र आले पाहिजे. मराठीची वज्रमुठ केली तर कोणाचीही मराठी भाषा आणि महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही.


राज ठाकरे यांनी जनमानसाची नाडी नेमकी ओळखलेली आहे. कुठे, कसे आणि किती बोलायचे हे त्यांना चांगले माहिती आहे. त्यामुळेच डोंबिवलीच्या सभेत त्यांनी मराठीच्या मुद्यावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, शिवसेना आणि दोन्ही कॉंग्रेससह राहूल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला. आपण घेतलेली मराठीपणाची भूमिका चुकीची नाही तर ती कायद्याच्या दृष्टीनेही कशी बरोबर आहे ते सांगून देशाच्या अन्य राज्यातील नेते आणि पक्ष आपल्या मातृभाषेचा कसा अभिमान बाळगतात हे सोदाहरण स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते आणि सर्वसामान्य माणसांनी मतभेद आणि पक्षभेद विसरुन एकत्र आले पाहिजे. पण ते कधी होईल का की त्यासाठी मराठी माणसांनाच रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल.


कॉंग्रेस आणि भाजपची मंडळी महाराष्ट्रात एक बोलतात पण कर्नाटक, तामिळनाडू येथे मात्र कशी दुटप्पी भूमिका घेतात हे सांगून त्यांचे पितळ उघडे पाडले. राहुल गांधी यांचा रोमपूत्र असा केलेला उल्लेख, मग राम माधव यांना कोण संरक्षण देणार हे टाकलेले वाक्य, मराठीच्या प्रश्नावर मनसेने निवडून आणलेल्या तेरा आमदारांमुळे आता इतरांना मराठीविषयी फुटलेला कंठ हा कोणाचे नाव न घेता मारलेला टोला, मराठीच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील मनसेसह सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज, मराठी भाषेतच बोला आणि व्यवहार करा, असा दिलेला सल्ला आणि अधूनमधून घातलेली भावनिक साद यामुळे राज यांनी पुन्हा एकदा मराठी माणसांना जिंकून घेतले आहे.


तामिळनाडूचे एक मुख्यमंत्री अण्णा दुराई यांच्या समाधीचे छायाचित्र, त्यावर लिहिलेल्या ओळी, हिंदी भाषेविषयी असलेला दुस्वास, ममता बॅनर्जी यांनी पन्नास टक्के भूमीपुत्रांसाठी जागा राखीव ठेवा अशा केलेली सूचना, कॉंग्रेसमधील मराठी तरुणांनीही विचार करावा, असे केलेले आवाहन सर्वांची दाद घेऊन गेले. ज्येष्ठ कवी आणि नाटककार वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचे स्मरण करुन यंदाच्या वर्षी मराठी भाषा दिन दणक्यात साजरा करा, पूर्वसंध्येला घरे व इमारतींवर रोषणाई करा आणि महाराष्ट्र राज्य स्थापनेचा पन्नासावा वर्धापन दिन जोशात साजरा करा, हे त्यांचे आवाहनही सर्वाना भावले.


भाषिक प्रांतरचनेनुसार महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठी भाषेची सक्ती केली किंवा याच भाषेला प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा ठेवली तर त्यात काय चुकीचे आहे. उलट हे ज्यांनी आजवर केले नाही म्हणूनच आज मराठीची दुरवस्था झाली आहे. हे वास्तव आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. मनसेच्या धसक्याने अन्य राजकीय पक्षही पुन्हा एकदा मराठीच्या प्रश्नावर बोलायला लागले आहेत. मराठी भाषा, मराठी माणूस याची दखल त्यांनाही घ्यावी लागत आहे आणि हेच राजमंत्राचे व राजबाण्याचे यश आहे. त्यामुळे राज यांनी केलेल्या आवाहनानुसार निदान मराठीच्या प्रश्नावर तरी आपल्या येथील सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी पक्षभेद विसरुन एकत्र आले पाहिजे.


हाताची पाचही बोटे जेव्हा वेगवेगळी असतात, तेव्हा त्यांच्यात ताकद नसते पण ती जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्याचीच वज्रमुठ तयार होते. मराठी भाषेसाठी मराहाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते आणि सर्वसामान्य मराठी माणसांचीही अशीच वज्रमुठ तयार झाली पाहिजे.               

03 February 2010

मराठी पाऊल पडते मागे

मुंबई कोणाची या विषयावरुन सध्या राजकीय गदारोळ सुरु आहे. मुंबई सर्वांची की मुंबई मराठी माणसांची असा वादाचा विषय आहे. भाषिक प्रांत रचनेनुसार राज्यांची निर्मिती झाल्यानंतर मराठी माणसांचे महाराष्ट्र हे राज्य निर्माण झाले. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मग मुंबईत मराठी माणसांचे, मराठी भाषेचे वर्चस्व असले किंवा मराठीला प्राधान्य दिले गेले तर इतरांच्या पोटात का दुखते. अन्य भाषिक राज्ये (तामिळनाडु, कर्नाटक) आणि तेथील नेते आपल्या भाषेबद्दल जितका अभिमान की दुराग्रह बाळगतात, तेवढा मराठी माणसे बाळगत नाही ना.


मराठीचा, मराठी माणसांचा दुस्वास हे त्या मागचे कारण आहे. पं. जवाहरलाल नेहरु यांचाही मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती करण्यास विरोध होता. त्यांना महाराष्ट्र आणि गुजराथ असे द्विभाषिक राज्य निर्माण करायचे होते. मुंबई स्वतंत्र/ केंद्रशासीत करायची होती. परंतु संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, हुतात्म्यांचे बलिदान यामुळे मराठी भाषिकांच्या स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली आणि मुंबईही महाराष्ट्रला मिळाली. शिवसेना-भाजपची पाच वर्षांची राजवट सोडली तर महाराष्ट्रात कॉंग्रेसचेच राज्य आहे. मराठी भाषा, मराठी माणूस यांच्याबाबत आज निर्माण झालेले प्रश्न आणि मुंबईवरुन पुसत चाललेला मराठीचा ठसा  याला केवळ आणि केवळ कॉंग्रेसचेच नेते जबाबदार आहेत. त्यांनी देशातील अन्य राज्यांप्रमाणे सुरुवातीपासुनच मराठी भाषेला येथे प्राधान्य दिले असते तर आज हा प्रश्नच निर्माण झाला नसता.


मुंबई हे कॉस्मोपोलिटन शहर आहे, याचे तुणतुणे किती वर्षे वाजवत बसायचे.  कॉस्मोपोलिटन शहर आहे म्हणून महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात मराठीची गळचेपी करायची परवानगी केंद्रातील कॉंग्रेस पुढाऱयांना आणि मराठीचा दुस्वास करणाऱया अन्य मंडळींना दिली आहे का, मराठी भाषिकांच्या राज्याची राजधानी असलेल्या मुंबई किंवा महाराष्ट्रात मराठी नाही तर अन्य दुसऱया कोणत्या भाषेला महत्व द्यावे, असे या मंडळींना वाटते का,   देशाला मुंबईतून जितक्या प्रमाणात कर जमा केला जातो, तेवढी देशातील अन्य कोणतीही राज्ये देत नाहीत. तरी मुंबईला अनुदान देताना किंवा त्या करातील काही रक्कम मुंबईला देण्यासाठी नेहमीच हात आखडता घेतला जातो.


महाराष्ट्रातील कॉंग्रेस पुढाऱयांनी दिल्लीपुढे घालीन लोटांगण घालणे सर्वप्रथम बंद केले पाहिजे. तसेच महाराराष्ट्रातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मराठी भाषा आणि तिचे महत्व वाढविण्यासाठी पक्षीय मतभेद विसरुन एकत्र आले पाहिजे. मराठी भाषेचा मुद्दा ही काही शिवसेना किंवा मनसेची मक्तेदारी नाहीये. देशाच्या अन्य राज्यातील सर्वपक्षीय नेते भाषेच्या मुद्यावर जसे एकत्र येतात आणि आपल्या राज्याचे हीत जपतात, तशी भूमिका महाराष्ट्रातील सर्वपक्षीय लोकप्रतिनधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ठामपणे घेतली पाहिजे. तसे झाले तरच असे वाद पुन्हा निर्माण होणार नाहीत आणि मागे पडत चाललेले मराठी पाऊल पुढे पडेल.


पण हे करणार कोण, तिथेच तर खरे दुखणे आहे.    

02 February 2010

दान-रक्तातील प्लेटलेट्सचे

आपल्या भारतीय संस्कृतीत कोणत्याही प्रकारचे दान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. बदलत्या काळानुसार दान देण्याच्या पद्धतीतही बदल झाले व होत आहेत. सध्याच्या काळात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानण्यात येते. रक्तदानाचा आता चांगला प्रसार झाला आहे. या दानाबरोबरच मरणोत्तर देहदान आणि डोळे, त्वचा दान याचेही महत्व आपल्याला हळूहळू पटायला लागले आहे. सर्वसामान्य कोणीही निरोगी माणसू रक्तदान करु शकतो. आपल्यापैकी अनेकजण करतातही. पण रक्तातील प्लेटलेट्सचेही दान करता येते आणि पुण्यातील विनायक देव गेली तीन वर्षे प्लेटलेट्स दानाचे काम निस्वार्थीपणे  करत आहेत. 


अनेक आजारांमध्ये संपूर्ण रक्ताची नव्हे तर रक्तातील केवळ प्लेटलेट्स या घटकाचीच रुग्णाला आवश्यकता असते. त्यामुळे ते देण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या रक्तातील फक्त प्लेटलेट्स काढून घेतल्या जातात. रुग्णालयात प्लेटलेट्स दान करण्यासाठी गेल्यानंतर तपासणी आणि दान या प्रक्रियेसाठी किमान दोन ते अडीच तास लागतात. देव यांच्या मित्राच्या मामाला शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज असल्याचे कळल्यानंतर देव रुग्णालयात गेले तेव्हा संपूर्ण रक्ताची नव्हे तर फक्त प्लेटलेट्सची गरज असल्याचे त्यांन कळले. सविस्तर वैद्यकीय तपासणीनंतर देव यांना आपण प्लेटलेट्स दान करु शकतो हे कळले. त्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत २२ वेळा प्लेटलेट्स दान केले आहे.


प्लेटलेट्स हे आठ ते दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवता येत नाहीत. प्लेटलेट्स हे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेला मदत करतात, त्यामुळे रक्ताप्रमाणेच त्याचेही खूप महत्व आहे.  प्लेटलेट्स दात्याने स्वेच्छेने कोणत्याही आर्थिक किंवा अन्य स्वरुपातील मोबदल्याची अपेक्षा न धरता दान केले तरी या प्रक्रियेचा आणि त्याला लागणाऱया किटचा खर्च संबंधित रुग्णाला करावा लागतो. हा सुमारे १२ ते १५ हजार रुपये इतका असतो.


प्लेटलेट्स दान केल्याने दात्याच्या शरीरावर किंवा प्रकृतीवर कोणताही विपरित परिणाम होत नाही. प्लेटलेट्स दानाचे महत्व लोकांपर्यंत पोहाचावे आणि त्यांनीही विशेष करुन तरुणांनी मोठ्या प्रमाणात या दानासाठी प्रवृत्त व्हावे, असे देव यांना वाटते. आपण दुसऱयासाठी काही करु शकतो, जीवनदान देऊ शकतो या विचारांनी मिळणारा आनंद पैशात मोजता येत नाही. त्यामुळे आपण माझी प्रकृती उत्तम ठेव जेणेकरुन कमीत कमी मी दानाचे शतक पूर्ण करु शकेन, अशी प्रार्थना देव परमेश्वराकडे करतात.


सकाळ-मुंबईच्या २ फेब्रुवारी २०१० च्या अंकात संपादकीय पानावरील (६) सहजच होते समाजसेवा या सदरात देव यांनी आपल्या प्लेटलेट्स दानाविषयी माहिती दिली आहे. देव यांचे हे काम खूप मोठे आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण सर्वानीच प्लेटलेट्स दानाला सुरुवात केली पाहिजे. या अभिनव दान उपक्रमाबद्दल आणि त्याची माहिती करुन दिल्याबद्दल  देव यांचे अभिनंदन      


विनायक देव यांच्याशी संपर्कासाठी त्यांचा ई-मेल आयडी असा
vcdeo@yahoo.co

मोबाईल नंबर-०९४२२०८२८२७


देव यांनी सकाळमध्ये लिहिलेल्या लेखाची लिंक अशी
http://72.78.249.124/esakal/20100202/4981752772574758145.htm

मनोगत या मराठी संकेतस्थळावरही प्लेटलेट्सविषयी बरीच माहिती देण्यात आली आहे. त्याची लिंक अशी
http://www.manogat.com/node/8595#comment-86820