25 September 2010

पूर्वजांचे स्मरण करणारा पितृपंधरवडा

अनंत चतुर्दशीनंतर असलेली पौर्णिमा संपली की त्या दिवसापासून सुरू होणारा पंधरवडा हा ‘पितृपंधरवडा’ म्हणून ओळखला जातो. पंचागानुसार सांगायचे झाले तर भाद्रपद महिन्यातील भाद्रपद कृष्ण एक ते भाद्रपद अमावास्या हा पंधरवडा पितृपंधरवडा म्हणून पाळण्यात येतो.

पितृपंधरवडा म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्मरण करणारा, त्यांची आठवण ठेवून श्राद्धविधी करण्याचा पंधरवडा मानण्यात येतो. गणेशोत्सव संपल्यानंतर सुरू होणारा पितृपंधरवडा हा काही जणांच्या दृष्टीने शुभकार्यासाठी निषिद्ध मानण्यात येतो. त्यामुळे या पंधरा दिवसांत कोणतेही शुभकार्य, नवीन खरेदी, लग्न जुळविणे, गृहखरेदी इत्यादी कामे केली जात नाहीत.

 गणेशोत्सवकाळात किंवा पितृपंधरवडा संपल्यानंतर सुरू होणारा नवरात्रौत्सव, दसरा किंवा दिवाळीत व्यापारी, दुकानदार यांच्यादृष्टीने ‘खरेदीचा सीझन’ तेजीत असतो. या दिवसात बाजारपेठेत अक्षरश: कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते. तर पितृपंधरवडय़ाचा कालावधी नवीन खरेदी आणि व्यापाऱ्यांसाठी मंदीचा काळ समजला जातो.


धार्मिक ग्रंथांत दिलेल्या माहितीनुसार आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता किंवा आदर व्यक्त करण्याच्या या दिवसांना पितृपंधरवडा किंवा श्राद्धपक्ष असे म्हटले जाते. यंदाच्या वर्षी २४ सप्टेंबरपासून पितृपंधरवडा सुरू झाला असून तो ७ ऑक्टोबपर्यंत आहे. ७ ऑक्टोबर रोजी भाद्रपद अमावास्या असून ती सर्वपित्री अमावास्या म्हणूनही ओळखली जाते.

कोणाला पितृपंधरवडय़ात पूर्वजांचे स्मरण करण्यास जमले नाही, या काळात श्राद्ध करता आले नाही तर किमान शेवटच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावास्येला तरी ते केले जावे, असे मानले जाते. पितृपंधरवडय़ात ज्या तिथीला व्यक्ती निधन पावली असेल त्या तिथीला श्राद्ध, तर्पण असे विधी केले जातात. जेवणाचे ताट कावळ्यासाठी ठेवले जाते. कावळ्याच्या रुपाने ते आपल्या पितरांना पोहोचते, अशी समजूत आहे.

पितृपंधरवडय़ात आपल्या पितरांचे स्मरण आणि पूजन केले तर त्यांना गती मिळते, ते संतुष्ट होतात अशी सर्वसामान्यांची श्रद्धा आहे. या काळात आपले पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियांकडे येत असतात. त्यामुळे या दिवसांत ती व्यक्ती निधन झालेल्या तिथीला श्राद्ध, तर्पण केले तर आपले पितर सुखी होतात, आपल्या कुटुंबियांनी आपली आठवण ठेवली आहे, हे पाहून त्यांना आनंद होतो, अशी पूर्वापार समजूत हिंदू धर्मात आहे. त्यामुळेच हिंदू धर्मात पितृपंधरवडय़ाला खूप महत्त्व आहे.

 पितृपंधरवडय़ाच्या काळात भाद्रपद कृष्ण नवमी ही अविधवा नवमी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद त्रयोदशी / चतुर्दशी या दिवशी शस्त्राने मरण पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध केले जाते. या कालावधीत निधन पावलेल्या व्यक्तीच्या नावाने श्राद्ध, तर्पण केले जाते.

रुढी-परंपरेचा पगडा असणारी किंवा हे केल्याने आपले काही नुकसान तर होणार नाही ना, मग परंपरेने जे सांगितले आहे, ते केले तर काय बिघडले? असे मानणाराही मोठा वर्ग समाजात आहे. तो कोणत्याही एका विशिष्ट जातीचा नाही. हिंदू धर्मातील बहुतेक प्रत्येक जातीमध्ये त्यांच्या परंपरेनुसार पितृपंधरवडय़ात पितरांचे स्मरण केले जाते. तर काही मंडळींचा या गोष्टींवर विश्वास नसतो. त्यांच्या दृष्टीने हे सर्व थोतांड असून काही मूठभर मंडळींनी धर्माच्या नावावर पैसे कमाविण्यासाठी निर्माण केलेल्या रूढी व परंपरा असल्याचेही त्यांचे म्हणणे असते. त्यामुळे ही मंडळी कोणताही धार्मिक विधी किंवा कर्मकांड न करता आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने समाजातील स्वयंसेवी संस्था, वृद्धाश्रम, अनाथाश्रमाला किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला पैशांच्या, कपडय़ांच्या स्वरूपात मदत करतात.

समाज कितीही पुढारला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी धार्मिक रूढी आणि परंपरांचा पगडा जोपर्यंत आपल्या समाजावर आहे तोपर्यंत पितृपंधरवडा पाळला जाणार. फक्त त्यात काळानुरूप काही बदल होत जातील हे नक्की.
 
(माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २५ सप्टेंबर २०१० च्या अंकात पान-१ वर प्रसिद्ध झाला आहे)

24 September 2010

साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक-विद्यमान पद्धतीला सध्यातरी पर्याय नाही

विद्यमान पद्धतीला सध्यातरी पर्याय नाही

मुंबई मराठी साहित्य संघाकडे व्यक्त झाला सूर


संमेलनाध्यक्षपद निवडणूक

प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदाच्या विद्यमान निवडणूक पद्धतीत बदल व्हावा, अशी चर्चा होत असली तरी विद्यमान निवडणूक पद्धतीला सध्यातरी सक्षम आणि ठोस पर्याय नाही, असा सूर या संदर्भात मुंबई मराठी साहित्य संघाकडे व्यक्त झाला असल्याची माहिती संघाच्या सूत्रांकडून देण्यात आली. मुंबई मराठी साहित्य संघ ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून विद्यमान निवडणूक पद्धतीविषयी संघाने मान्यवरांची मते जाणून घेतली होती. त्यातून उपरोक्त सूर व्यक्त झाला आहे.

साहित्य संमेलन आणि अध्यक्षपदाची निवडणूक हा कायम वादाचा विषय राहिला आहे. महामंडळाच्या घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थेचे मतदार तसेच संमेलन आयोजक निमंत्रक संस्थेचे पदाधिकारी संमेलनाध्यक्ष निवडणुकीत मतदान करतात. मात्र ही संख्या खूप कमी आहे. यंदाच्या वर्षी सुमारे ७९० मतदार मतदान करणार आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष इतक्या कमी संख्येत असलेल्या मतदारांनी ठरवणे हे योग्य नसल्याची टीका करण्यात येते. तसेच संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक होत असल्याने काही ज्येष्ठ साहित्यिकांना ही पद्धत मान्य नसल्याने त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे यात काही बदल करता येईल का, अशी चर्चा नेहमी सुरू असते. त्या पाश्र्वभूमीवर मुंबई मराठी साहित्य संघाने ही मते जाणून घेतली होती. साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष, मान्यवर साहित्यिक आणि साहित्यविषयक संबंधित घटकांकडे संमेलनाध्यक्षपद निवडीच्या विद्यमान पद्धतीविषयी मते जाणून घेतली होती. त्यावेळी विद्यमान निवडणूक पद्धतीत काही त्रुटी असल्या तरी सध्या योग्य आणि सक्षम पर्याय समोर नसल्याचे मत या मंडळींनी व्यक्त केले होते.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या मंडळींची नावे मागवायची आणि महामंडळाच्या कार्यकारिणीत त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करायचे. म्हणजे निवडणूक न होता संमेलनाध्याची निवड करता येईल, असा एक पर्याय समोर आला होता. मात्र त्यामुळे आणखी वाद आणि गोंधळ उडेल, असे एक मत पुढे आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आलेल्या नावांमधून केवळ एका नावाची निवड करायची झाल्यास कार्यकारिणीतील सदस्यांवर राजकीय किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ शकतो किंवा प्रादेशिकतेचा विचार करूनही एखाद्याची निवड केली जाऊ शकते. तसे होण्यापेक्षा विद्यमान पद्धतीत काही त्रुटी असल्या तरी मतदान लोकशाही पद्धतीने होत असल्याने तक्रार करायला वाव नाही.

ही प्रक्रिया राबवताना जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सध्या तरी हीच पद्धत योग्य वाटते. एकूण मतदार संख्येत वाढ करणे हा पर्याय विचार करण्यासारखा असल्याचे मतही व्यक्त करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २४ सप्टेंबर २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे)

22 September 2010

देवा तुझ्या दारी आलो...

गीतगणेश-९

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या ‘गीतगणेश’ लेखमालिकेत आजच्या शेवटच्या भागात ‘देवा तुझ्या दारी आलो’ हे गाणे घेतले आहे. ‘उलाढाल’ या चित्रपटासाठी संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले हे गाणे जबरदस्त हीट झाले आहे.

विविध वाहिन्यांवरील संगीतस्पर्धेत सहभागी स्पर्धकांकडून तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतही ते हमखास गायले आणि वाजवले जाते. हे गाणे स्वत: अजय गोगावले यांनी गायले असून ‘अजय-अतुल’ यांच्या खास शैलीमुळे गाण्याला एक वेगळेच परिमाण मिळाले आहे.


‘नटरंग’ या चित्रपटातील ‘आता वाजले की बारा’, ‘अप्सरा आली’, ‘नटरंग उभा’ लोकप्रिय झालेल्या गाण्याप्रमाणेच त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘सावरखेड एक गाव’, ‘अगबाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘साडेमाडेतीन’, ‘एक डाव धोबीपछाड’ या चित्रपटातील गाण्यांनाही रसिकांची दाद मिळाली. ‘जोगवा’ या चित्रपटासाठी अजय-अतुल यांना सवरेत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

संगीतकार अजय-अतुल हे दोघे भाऊ असून त्यांनी संगीत दिलेला ‘विश्वविनायक’ हा अल्बमही खूप गाजला. श्रीगणेशावरील असलेल्या या आल्बमधील गाणी एस. पी. बालसुब्रमण्यम, शंकर महादेवन यांनी गायली आहेत.

‘उलाढाल’ चित्रपटातील हे गाणे ऐकताना आपणही त्यात रंगून जातो. ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली अनेक गाणी, लावण्या मराठी संगीत रसिकांच्या मनात घर करून आहेत. ‘अष्टविनायक’ या चित्रपटातील लोकप्रिय ठरलेले ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायकांचा महिमा सांगणारे गीत खेबुडकर यांनीच लिहिले आहे.
 
‘उलाढाल’मधील ‘देवा तुझ्या दारी आलो’ हे गणपतीवरील त्यांचे आणखी एक गाजलेले गीत. साधी, सोपी परंतु सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारी आणि गुणगुणायला लावणारी शब्दरचना हे खेबुडकर यांच्या आजवरच्या गीतांचे प्रमुख वैशिष्टय़. तीच परंपरा खेबुडकर यांनी ‘देवा तुझ्या दारी आलो’ मध्येही जपली आहे.
 
अजय-अतुल गोगावले बंधुंमध्ये अजय हे गातातही. ‘नटरंग’ मधील ‘खेळ मांडला’, ‘सावरखेड एक गाव’ मधील ‘आई भवानी तुझ्या कृपेने’, ‘मल्हारवारी’ ही त्यांनी गायलेली गाणी रसिकांना परिचयाची आहेतच. त्यात ‘देवा तुझ्या दारी आलो’चाही समावेश होतो.
 
हे गाणे ऐकताना प्रत्येकजण गणपतीच्या भक्तीत अक्षरश: न्हाऊन निघतो. गाण्याच्या सुरुवातीला अजय यांनी आपल्या आर्त स्वरातून गणपतीला घातलेली ‘देवा तुझ्या दारी आलो’ ही साद आणि ‘मोरया मोरया’ हा गजर गणेशभक्तांच्या मनाचा ठाव घेतो. ‘शिवगर्जना’ या प्रसिद्ध ढोल-पथकाच्या साथीने अजय-अतुल यांनी या लोकप्रिय ठरलेल्या गाण्याचे ध्वनिमुद्रण केले आहे.
 
गाण्याचा शेवट ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोटय़ानकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी’ या पारंपरिक श्लोकाने करण्यात आला आहे.
 
गाण्यातील ढोल-ताशा, मोरया-मोरयाचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’ हा जयजयकार, तुतारीचा निनाद आणि शेवटच्या गजर आपल्याही मनात नकळत वीररस आणि गणेशभक्ती निर्माण करतो. खेबुडकरांचे शब्द, अजय-अतुल यांचे संगीत व अजय यांचा स्वर असा सुंदर मिलाफ या गाण्यात झाला आहे.
 
हे संपूर्ण गाणे पुढीलप्रमाणे
 
देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्याइना माणसाचा जन्म जाई वाया
ए देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया, तुझी समिंदराची माया
मोरया, मोरया ।।ध्रु।।
 
ओंकाराचं रुप तुझं चराचरामंदी
झाडं, येली, पानासंग फुल तू संगंधी,
भक्तांचा पाठीराखा, गरिबांचा वाली
माझी भक्ती, तुझी शक्ती एकरूप झाली
देवा दिली हाक, उद्धार कराया ।।१।।
 
आदि अंत तूच खरा, तूच बुद्धिदाता
शरण आलो आम्ही तुला पायावर माथा
डंका वाजे दहा दिशी गजर नामाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
देवा दिली हाक उद्धार कराया ।।२।।
 
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी 
 
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २२ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे)

21 September 2010

ओंकार प्रधान रुप गणेशाचे...

गीतगणेश-८

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणेश देवतेचे आपल्या लेखणीद्वारे अनेकांनी गुणगान केले आहे. कवी, गीतकार, शाहीर यांच्यासह महाराष्ट्रातील संतांनीही आपल्या अभंगांतून आणि काव्यातून गणपतीचे वर्णन केले आहे.

संत ज्ञानेश्वरांनी गणपतीचे वर्णन ‘ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या’ असे केले आहे. ज्ञानेश्वरांप्रमाणेच अन्य संतांनीही गणेशाला वंदन केले असून त्यात संत तुकारामही आहेत. संत तुकाराम यांची ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ ही रचना गणपतीचे भक्त आणि संगीतप्रेमी रसिकांनाही परिचयाची आहे. याचे संगीत कमलाकर भागवत यांचे असून स्वर सुमन कल्याणपूर यांचा आहे.


कमलाकर भागवत हे जुन्या पिढीतील प्रतिभावान संगीतकार. त्यांची खूप गाणी गाजली. अनेक वर्षांनंतरही भागवत यांनी संगीतबद्ध केलेली गाणी रसिकांच्या स्मरणात आहेत. यात ‘उठा उठा चिऊताई’, ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’, ‘दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट’, ‘देह जावो अथवा राहो’ आदी तसेच इतरही अनेक गाण्यांचा समावेश आहे.

खरे तर तुकाराम, नामदेव, एकनाथ आदी सर्व संतांनी विठ्ठलाची भक्ती आणि स्तुती केली. या सर्व संतांनी विठ्ठलाला आपला सखा मानले. आपले सुख-दु:ख त्याला सांगितले. ज्ञानेश्वर आणि तुकारामांसह सर्व संतांचे अभंग मराठी भाषा आणि संस्कृतीत अढळ स्थान मिळवून आहेत.

 इतक्या वर्षांनंतरही त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा, जातीभेद, विषमता यांच्यावरही संतांनी आपल्या अभंगांतून आसूड ओढले आहेत. तुकारामांचे ‘सुंदर ते ध्यान’, ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’, ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’, ‘कन्या सासुरासी जाये’, ‘खेळ मांडियला वाळवंटी काठी’, ‘जे का रंजले गांजले’ आणि इतरही अनेक अभंग प्रसिद्ध आहेत.

 संत तुकाराम यांचे बहुतांश अभंग ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी ‘अभंग तुक्याचे’ या कॅसेटमध्ये संगीतबद्ध केले आहेत. लता मंगेशकर यांच्या आवाजात ते प्रसिद्ध आहेत.

‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ ही तुकारामांची रचना संगीतकार कमलाकर भागवत आणि गायिका सुमन कल्याणपूर यांच्यामुळे अधिक प्रसिद्ध झाली आहे. गणपतीची स्तुती असलेला तुकारामांचा हा अभंग अवघ्या चार कडव्यांचा आहे. ‘ओम’ हा शब्द आप जेव्हा उच्चारतो तेव्हा अ, उ आणि म हे स्वर म्हणत आपण ‘ओम’चा उच्चार करतो. ओंकार हेच गणेशाचे मुख्य स्वरूप असून ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन प्रमुख देवांचे ते जन्मस्थान आहे. हे तीनही देव अनुक्रमे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे प्रतीक आहेत. सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. गणपती किंवा गजाजन हा मायबाप असल्याचेही तुकाराम या अभंगात सांगतात.
 
मन प्रसन्न करणारा सुमन कल्याणपूर यांचा स्वर आणि कमलाकर भागवत यांचे संगीत यामुळे हे गाणे ऐकताना आपणही अगदी तल्लीन होऊन जातो.
 
हा अभंग पुढीलप्रमाणे
 
ओंकार प्रधान रुप गणेशाचे
गे तिन्ही देवांचे जन्मस्थान ।।ध्रु।।
 
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू
मकार महेश जाणियेला ।।१।।
 
ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप ।।२।।
 
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
पाहावी पुराणे व्यायाचिया ।।३।। 
 
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २१ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख गीतगणेश या लेखमालिकेत प्रसिद्ध झाला आहे)

19 September 2010

विनायका हो सिद्ध गणेशा...

गीतगणेश-७

तमाशामधील गण-गौळण किंवा वगामधील नमन असो, येथेही गणपतीचे स्तवन आणि गुणगान केलेले पाहायला मिळते. शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमात सादर होणारे ‘पयलं नमन, आम्ही करितो वंदन’हे सगळ्यांना परिचित असून यातच गणपतीला रंगमंचावर नृत्य करतानाही दाखवले आहे.

ज्येष्ठ गायक रामदास कामत यांच्या स्वरातील गणेशाचे ‘विनायका हो सिद्ध गणेशा’ हे गाणे लोकप्रिय आहे. हे गीत अशोकजी परांजपे यांचे असून संगीत विश्वनाथ मोरे यांचे आहे. मराठी संगीत रंगभूमीवरील गायक-अभिनेते म्हणून कामत परिचित आहेत.

अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदाचाही बहुमान त्यांना मिळाला होता. कामत म्हटले की ‘मयुरा रे फुलवित ये रे पिसारा’, ‘गुंतता हृदय हे’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे’ अशी अनेक गाणी रसिकांच्या पटकन ओठावर येतात. या गाण्यांप्रमाणेच कामत यांच्या स्वरामुळे ‘विनायका हो सिद्ध गणेशा’ हे गाणेही खूप लोकप्रिय आहे.

परांजपे यांची लिहिलेली अनेक गाणीही रसिकांच्या स्मरणात असून त्यात ‘विनायका हो सिद्ध गणेशा’ या गाण्यासह ‘अवघे गर्जे पंढरपूर’, ‘केतकीच्या बनी तेथे नाचला मोर गं’, ‘नाविका रे वारा वाहे रे’, आदी गाण्यांचा समावेश आहे.

संगीतकार मोरे यांनी संगीत दिलेले ‘गोंधळात गोंधळ’, ‘मायमाऊली’, ‘भालू’ आदी चित्रपटांतील ‘हा सागरी किनारा’, ‘सावध हरिणी सावध गं’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ आणि इतर अनेक गाणी गाजली आहेत.


‘विनायका हो सिद्ध गणेशा’ हे गाणे शास्त्रीय संगीताच्या अंगाने जाणारे असून मोरे यांचे वेगळ्या धाटणीचे संगीत, कामत यांचा दमदार आवाज व परांजपे यांची सुगम शब्दरचना यामुळे हे गीत लक्षात राहते. गण-गौळण, वग, तमाशाच्या प्रारंभी गणेशाचे नमन आणि गुणगान केले जाते.

या गाण्यातही गणपतीला रंगसभेसाठी आमंत्रण दिले असून त्याचा आशीर्वाद मागितला आहे. हा गणपती कसा आहे तर तो लंबोदर असला तरी नृत्यविशारद असून त्याच्या हातात परशू आहे. कमरेला नाग बांधलेला असून अशा या गणेशाने रंगसभेला, कार्यक्रमाला यावे, असे आवाहन कवीने केले आहे. ‘अपराधाला घाला पोटी’ अशी विनंतीही कवीने केली आहे.

 गणेशोत्सवाप्रमाणेच हे गाणे अनेकदा आकाशवाणीवरून प्रसारित होत असते. रामदास कामत यांचा स्वर, विश्वनाथ मोरे यांचे संगीत आणि अशोकजी परांजपे यांनी लिहिलेल्या शब्दातून हे गाणे शांतपणे ऐकताना आपल्या डोळ्यासमोर जणू ती रंगसभा आणि साक्षात गणपती उभा राहतो. हेच या गाण्याचे यश आहे.

हे संपूर्ण गाणे पुढीलप्रमाणे

विनायका हो सिद्ध गणेशा
रंग सभेला या तुम्ही या
पक्षी गाती घरटय़ामधूनी
आशिर्वच हो द्या तुम्ही द्या ।।१।।

नृत्य विशारद तुम्ही लंबोदर
हाती शोभे परशु तोमर
नाग कटिला बांधून या ।।२।।

अपराधाला घाला पोटी
तुमच्या माझ्या प्रेमासाठी
रसिकाशी ही भेटी गाठी
काव्यसुधा ही प्राशुनी ओठी
तृप्त मनाने ढेकर द्या ।।३।।

आम्ही बालक तव गुणगायक
कृपावंत हो प्रभू गुणग्राहक
प्रसाद हाती घेऊनी या ।।४।।

(लोकसत्ता- रविवार वृत्तान्तमध्ये १९ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे)

18 September 2010

बाप्पा मोरया रे

गीतगणेश-६

मराठी किंवा हिंदी चित्रपट संगीतात अनेक संगीतकारांनी लोकसंगीताचा वापर मोठय़ा कल्पकतेने करून घेतला आहे. ज्या संगीतकारांनी चित्रपटातील गाण्यांना लोकसंगीतातील ठेका किंवा संगीत वापरले ती गाणी अमाप लोकप्रिय झाली. एवढेच नव्हे तर अनेक वर्षांनंतरही आजही अशी गाणी लोकप्रिय असून त्या गाण्यांवर रसिकांचे पाय थिरकायला लागतात. पहाडी आवाजासह गाण्याच्या वेगळ्या शैलीमुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेले दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली सर्व गाणी लोकप्रिय झाली.


‘ऐका सत्यनारायणाची कथा’, पाऊले चालती पंढरीची वाट’, ‘चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी’ आणि शिंदे यांची इतर गाणीही सार्वजनिक उत्सवांमध्ये हमखास वाजविली जातात. विशेषत: ग्रामीण भागांत प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली गाणी हमखास वाजतातच. आजच्या ‘गीतगणेश’ मध्ये शिंदे यांनी गायलेल्या ‘तूच सुखकर्ता, तूच द:ुखहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे’ या गाण्याविषयी. हे गीत हरेंद्र जाधव यांनी लिहिले आहे. त्याचे संगीत मधुकर पाठक यांचे असून ते गायले आहे, अर्थातच प्रल्हाद शिंदे यांनी.

गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडपांमधून किंवा गणपतीच्या आगमन-विसर्जन मिरवणुकीच्या वेळी बॅण्ड, ढोल-ताशा किंवा डिजेंकडून वाजविल्या जाणाऱ्या गाण्यांमध्ये प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्यांचा समावेश असतो. अनेक वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. गाण्याच्या माध्यमातून सर्वसामान्य भक्ताच्या मनातील भावना गीतकार हरेंद्र जाधव यांनी व्यक्त केली आहे.

गाण्यात कठीण शब्द अजिबात नाहीत. सर्वसामान्यांचे जगणे, ते करत असलेली गणपती बाप्पाची भक्ती आणि गरिबांची व्यथा, त्यांच्या मनातील संवेदना जाधव यांनी या गाण्यातून व्यक्त केली आहे. हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारा गणपतीचा भक्त त्याची व्यथा गणपतीकडे मांडतो आहे आणि हाच गणपती बाप्पा आपल्याला सुखाचे दिवस नक्की दाखवेल, असा आशावादही त्याच्या मनातून व्यक्त होत आहे.

‘तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता’ हे लोकगीत असून लोकगीतामध्ये असलेला विशिष्ट संगीताचा ठेका, उडती चाल आणि गाणे ऐकायला सुरुवात केल्यानंतर आपल्याही नकळत ताल धरायला लागणारी आपली पावले हे यश संगीतकार मधुकर पाठक आणि आपल्या पहाडी आवाजाने या गाण्याला लोकप्रिय करणारे प्रल्हाद शिंदे यांचे आहे.

हे संपूर्ण गाणे असे
 
तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता अवघ्या दीनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवीतो माथा ।।ध्रु।।
 
पाहा पुरे झाले हो एक वर्ष, वर्षाने होतो एकदाच हर्ष
गोड अन्नाचा होतो स्पर्श, घ्यावा जाणूनी परामर्ष
पुऱय़ा वर्षाची. साऱया दुखाची, वाचावी कशी ही गाथा ।।१।।
 
पाहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ
गुळ, फुटाणे, खोबरं नी केळ, साऱया प्रसादाची केली भेळ 
कर रक्षण आणि भक्षण, तूच पिता आणि तूच माता ।।२।।
 
नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख साऱया घराचे, कधी येतील दिवस सुखाचे
सेवा जाणूनी, गोड मानुनी, द्यावा आशिर्वाद आता ।।३।।
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १८ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे)      
  

17 September 2010

तू सुखकर्ता तू दुखहर्ता

गीतगणेश-५

गणपती, त्याची भक्ती, महिमा यावर आधारित ‘अष्टविनायक’ हा मराठी चित्रपट आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्या ना कोणत्या वाहिनीवर हा चित्रपट दरवर्षी एकदा तरी दाखवला जातोच. या चित्रपटातील सर्वच गाणी गाजली. गणपतीविषयक चित्रपटातील तीन गाणी आजही रसिकांच्या ओठावर असून सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव किंवा गणपतीच्या दिवसात वाहिन्यांवरून सादर होणाऱ्या कार्यक्रमात तसेच मराठी वाद्यवृंदातूनही या तीनपैकी एखादे गाणे सादर होतेच.

‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ या गाण्याला वेगवेगळ्या गायकांनी आवाज दिला असून ते महाराष्ट्रातील विविध संगीत लोकप्रकारात गुंफण्यात आले आहे. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या या गाण्याची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही.


याच चित्रपटातील ‘प्रथम तुला वंदितो’ हे गाणेही खूप छान आहे. शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेले हे गाणे पं. वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायले असून त्यास अनिल-अरुण यांचे संगीत आहे. चित्रपटात पडद्यावरही स्वत: वसंतराव देशपांडे यांच्यावरच हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.

‘अष्टविनायक’ चित्रपटातील गणपतीविषयक ‘तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता’ या गाण्याचा आजच्या ‘गीतगणेश’मध्ये विचार करणार आहोत. हा चित्रपट १९७९ मध्ये प्रदर्शित झाला होता. म्हणजे आज त्याला ३१ वर्षे झाली. तरीही चित्रपटातील या गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही हे विशेष.

‘तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता’ हे गाणे मधुसूदन कालेलकर यांनी लिहिले असून संगीत अनिल-अरुण यांचे आहे. पं. वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांनी हे गाणे गायले आहे. गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती मानला जातो. गणपती हा सुख देणारा आणि जीवनातील दु:ख, संकटे हरण करणारा आहे.
 
कालेलकर यांनी या गाण्यात गणपतीला ‘तूच कर्ता आणि करविता’ असे म्हटले आहे. या गाण्यातून कालेलकर यांनी गणपतीची काही नावे सुंदरतेने गुंफली असून गणपती दैवत कसे आहे ते सांगून गणपतीजवळ देवा माझा ‘मी’ पणा नष्ट होऊ दे असे मागणेही मागितले आहे.
 
मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेल्या या दोन कडव्यांच्या गाण्याची चाल श्रवणीय आणि मनात घर करणारी असून पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्वरांनी दुग्धशर्करा योग जुळवून आणला आहे.
 
हे संपूर्ण गाणे असे
 
तू सुखकर्ता तू दुखहर्ता
मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया
 
ओंकारा तू , तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धिविनायक
मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक
तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता ।।१।।
 
देवा सरु दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन
नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण
सदैव राहो ओठावरती, तुझीच रे गुणगाथा ।।२।।
 
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १७ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे) 

16 September 2010

गजाननासी वंदन करुनी

गीतगणेश-४

मराठी रंगभूमीवरील नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून दिवंगत बाळ कोल्हटकर यांचे नाव सर्वाना परिचित आहे. त्यांच्या ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘देव दिनाघरी धावला’ या नाटकांनी मराठी रंगभूमीवर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. कुटुंबातील सर्वाना एकत्र बसून बघता येतील अशी कुटुंबवत्सल, मध्यमवर्गीयांचे भावविश्व दाखवणारी नाटके त्यांनी रंगभूमीवर सादर केली.

त्यांची ‘सीमेवरून परत जा’, ‘देणाऱ्याचे हात हजार’, ‘उघडले स्वर्गाचे दार’ ही नाटकेही रंगभूमीवर गाजली. आजच्या ‘गीतगणेश’ मध्ये कोल्हटकर यांच्या ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकातील एक गीत घेतले आहे.


हे नाटक १९६४ मध्ये रंगभूमीवर आले. त्यात स्वत: कोल्हटकर यांची प्रमुख भूमिका होती. याच नाटकातील हे गणेशगीत. जाहीर कार्यक्रम, प्रकट मुलाखत तसेच दूरदर्शनवरील कार्यक्रमातून कोल्हटकर यांनी हे गीत अनेकवेळा सादर केले. कोल्हटकर यांच्या खास शैलीत सादर होणारे हे गीत आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

हे गाणे स्वत: कोल्हटकर यांनीच लिहिले असून त्याचे संगीतही त्यांचेच आहे. पुढे त्याची कॅसेट निघाली आणि त्यात हे गाणे प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांनी गायले. साधी व सोपी आणि प्रासादिक शब्दरचना हे या गाण्याचे वैशिष्टय़. कोल्हटकर हे गाणे त्यांच्या खास शैलीत सादर करायचे. गणेशोत्सवाच्या काळात सध्या हे गाणे फारसे वाजवले जात नसले तरी एकेकाळी ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ हे नाटक आणि त्यात कोल्हटकर यांनी सादर केलेले हे गीत खूप गाजले होते.
 
गजाननाला वंदन करोनी
सरस्वतीचे स्तवन करोनी
मंगल शिवपद मनी स्मरोनी
सद्भावाने, मुद्रीत मनाने
अष्टांगाची करोनी ओंजळ
वाहतो ही दुर्वांची जुडी
 
अभिमनाला नकोच जपणे
स्वार्थासाठी नकोच जगणे
विनम्र होऊन घालव मनुजा
जीवन हे हर घडी
वाहतो ही दुर्वांची जुडी
 
विघ्न विनाशक गणेश देवा
भावभक्तीचा हृदयी ठेवा
आशिर्वाद हा द्यावा मजला
धन्य होऊ दे कुडी
वाहतो ही दुर्वांची जुडी
 
पार्वती नंदन सगुण सागरा
शंकर नंदन तो दुख हरा
भजनीपुजनी रमलो देवा
प्रतिभा नयनी खडी
वाहतो ही दुर्वांची जुडी
 
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १६ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे)  
 

15 September 2010

अशी चिक मोत्यांची माळ...

गीतगणेश-३

लोकसंगीताचा वापर करण्यात आलेली हिंदी आणि मराठी चित्रपटातील अनेक गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत. लोकसंगीताचा ठेका हाच मुळात रसिकांचे पाय थिरकवणारा असतो. अंगात उत्साह सळसळतो आणि आपली पावले आपोआपच जागेवर थिरकायला लागतात. लोकसंगीताच्या ठेक्यावरील अशाच एका गाण्याने गेल्या काही वर्षांपासून अक्षरश: धुमाकुळ घातला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव, गणपतीचे आगमन किंवा विसर्जन मिरवणूक, लग्नाची वरात ते विविध वाद्यवृंदातूनही याच गाण्याची मागणी असायची. वाद्यवृंद किंवा विसर्जनाची मिरवणूक हे गाणे झाल्याशिवाय पूर्ण व्हायची नाही. तुमच्याही मनात ते गाणे कोणते याची उत्सुकता निर्माण झाली असेल किंवा तुम्ही ते ओळखलेही असेल.

ज्या गाण्यांनी काही वर्षांपूर्वी गणेशोत्सव गाजवला आणि आज इतक्या वर्षांनंतरही ते गाणे ऐकू येते ते म्हणजे ‘अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्याची ग’. काही गाणी अशी असतात की गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्यामुळे ती अजरामर होतात. कित्येक पिढय़ा ते गाणे रसिकांच्या ओठावर राहते. ‘अशी चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची’ या गाण्यालाही असेच भाग्य लाभले आहे.

शाहीर विलास जैतापकर यांनी हे गीत लिहिले असून गाण्याचे संगीत निर्मल-अरविंद यांचे आहे. हे गाणे जयश्री शिवराम व श्रीनिवास कशाळकर यांनी गायले आहे. मूळ गाणे जयश्री शिवराम यांनी गायले असले तरी काही कॅसेट कंपन्यांनी काढलेल्या कॅसेट्स मध्ये हे गाणे गायिका उत्तरा केळकर यांनी गायले आहे.

 उत्तरा केळकर यांच्या ‘बिलनशी नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला’ या गाण्याप्रमाणेच त्यांचे हे गाणेही लोकप्रिय ठरले आहे. गाण्याची साधी व सोपी शब्दरचना आणि पावले थिरकायला लागतील असे संगीत, गाण्यातील विशिष्ट ठेका आणि लोकसंगीतावर आधारित असलेले हे गाणे गणेशोत्सवाच्या संपूर्ण काळात सगळीकडे वाजत असतेच पण शाळा-महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनातूनही यावर समूह नृत्य केले जाते आणि त्याला आत्ताच्या पिढीकडूनही जोरदार दाद मिळते, हेच या गाण्याचे यश आहे.

अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्यांची ग


जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा हो

या चिकमाळेला रेशमी मऊ दोरा ग

मऊ रेशमाच्या दौऱ्यात नवरंगी माळ ओविली ग ।। १।।

अशा चिकमाळेला हिऱ्याचे आठआठ पदर गं

अशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली गं ।। २।।

मोरया गणपतीला खुलुन माळ शोभली ग

अशी चिक माळ पाहून गणपती किती हसला गं ।। ३।।

त्यान गोड हासूनी गोड आशीर्वाद दिला गं

चला करू या नमन गणरायला गं ।। ४।।

(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १५ सप्टेंबर २०१० च्या अंकात गीतगणेशचा हा भाग प्रसिद्ध झाला आहे)

14 September 2010

तुझ्या कांतिसम रक्तपताका

गीतगणेश- २

गणपतीच्या पारंपरिक आरतीबरोबरच मराठी चित्रपटातील गणपतीच्या गाण्यांची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. ‘अन्नपूर्णा’ या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेले आणि संगीतकार स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘तुझ्या कांतिसम रक्तपताका’ हे असेच लोकप्रिय आणि अजरामर झालेले गाणे. या गीताची रचना ‘महाराष्ट्र वाल्मिकी’ ग. दि. माडगुळकर यांनी केलेली आहे. ‘अन्नपूर्णा’ हा चित्रपट १९६८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन आज ४२ वर्षांनंतरही या गाण्याची गोडी कमी झालेली नाही. आजही हे गाणे तितकेच ताजे आणि टवटवीत वाटते.


संगीतकार स्नेहल भाटकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले. हिंदीतील त्यांनी संगीतबद्ध केलेले ‘कभी तनहाईयों में यँू हमारी याद आएगी’ हे त्यांचे गाणे खूप गाजले. मराठीतही त्यांनी ‘रुक्मिीणी स्वयंवर’, ‘चिमुकला पाहुणा’, ‘मानला तर देव’ आदी चित्रपटांना संगीत दिले. त्यातील गाणीही बरीच गाजली. सुमन कल्याणपूर यांनी आपल्या गोड गळ्याने हिंदी आणि मराठी चित्रपट पाश्र्वगायनात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

दोन वर्षांपूर्वी ‘नवचैतन्य प्रकाशन’तर्फे त्यांचे ‘सुमनसुगंध’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. निवेदिका मंगला खाडिलकर यांनी त्याचे शब्दांकन केले आहे. या पुस्तकात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांचा गौरव करताना मंगला खाडिलकर यांनी म्हटले आहे की, शब्दातील ऱ्हस्व व दीर्घ आणि मात्रांचे नेमके भान ठेवून उच्चारण करण्याची सुघट शैली, भक्तीभाव, संस्कार भावना जागविणारे सहज गायन आणि त्यात स्वत: रंगून जाण्याचा स्वभाव यामुळे श्रोत्यांच्या मनावर सुमनताईंच्या गाण्यांचा प्रचंड पगडा आहे. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाबाबत नेमके भाष्य मंगला खाडिलकर यांनी केले आहे.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या अनेक मराठी आणि हिंदी गाण्यांप्रमाणेच ‘तुझ्या कांतिसम रक्तपताका’ हे गाणे लोकप्रिय झाले. ‘अन्नपूर्णा’ या चित्रपटातील पाचही गाण्यांची जबाबदारी स्नेहल भाटकर यांनी अत्यंत विश्वासाने सुमन कल्याणपूर यांच्याकडे सोपवली होती. या गाण्यासाठी सुमन कल्याणपूर यांना ‘सूरसिंगार’ नियतकालिकचा ‘मिया तानसेन पुरस्कार’ मिळाला होता. त्यावेळी स्नेहल भाटकर यांनीसुद्धा सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामुळेच हे गाणे लोकप्रिय झाले, अशा भावना व्यक्त केल्या.

हे गाणे ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. गदिमा यांची शब्दरचना, स्नेहल भाटकर यांचे संगीत आणि सुमन कल्याणपूर यांचा आवाज या तिहेरी संगमामुळे हे गाणे खूप सुंदर आणि श्रवणीय झाले असून इतक्या वर्षांनंतरही या गाण्याची जनमानसावरील मोहिनी कमी झालेली नाही.

हे संपूर्ण गाणे पुढीलप्रमाणे :-

तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती

अरुण उगवला, प्रभात झाली, उठ महागणपती

सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा

सुभग सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा

छेडुनी वीणा जागविते तुज सरस्वती भगवती ।।१।।

आवडती तुज म्हणूनी आणिली रक्तवर्ण कमळे

पाचुमण्याच्या किरणासम ही हिरवी दुर्वादळे

उभ्या ठाकल्या चौदा विद्या घेऊनिया आरती ।।२।।

शुर्पकर्णका, उठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा

तिनही जगाचा तूच नियंता विश्वासी आसरा

तुझ्या दर्शना अधिर देवा हर, ब्रह्म, श्रीपती ।।३।।

(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १४ सप्टेंबर २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे)

11 September 2010

दर्शनमात्रे मन कामनापूर्ती

आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये गणपतीविषयक गाण्यांचा आढावा घेणारी गीतगणेश ही लेखमालिका सुरू झाली आहे. ११ सप्टेंबरच्या मुंबई वृत्तान्तात त्याचा पहिला भाग प्रसिद्ध झाला आहे. तो भाग आजच्या ब्लॉगवर मी देत आहे.

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या श्रीगणेशाचे वर्णन व गुणगान पौराणिक काळापासून विविध प्रकारे करण्यात येत आहे. वेद, उपनिषदे, शहिरी काव्य, संतसाहित्य ते अगदी चित्रपटगीते, सुगम संगीत आणि भक्तीसंगीतातून गणेशाचा महिमा कथन करण्यात आला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मराठीतील गणेशगीतांचा हा आढावा..


गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी गणपतीवरील नव्या आणि जुन्या कॅसेट्स, सीडीज् बाजारात विक्रीसाठी येत असतात. गणपती ही प्राचीन देवता असून वेद, उपनिषदांतूनही गणपतीचे गुणगान करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतानाही गणेशस्तुती केली आहे. त्याचप्रमाणे विविध शाहीर, कवी, गीतकार यांनीही गणपती या दैवतावर काव्यरचना केली आहे. आज सुमारे तीनशे वर्षांनंतरही गणपतीवरील एक रचना लोकप्रिय असून गणेशोत्सवात किंवा घरातील कोणत्याही पूजेच्यावेळी सर्वप्रथम तीच म्हटली जाते. ही रचना समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली असून ती गणपतीची लोकप्रिय आरती आहे. रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या ‘तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची’ या आरतीला गणेशोत्सवात तसेच कोणत्याही मंगलप्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजेतही अग्रमान मिळालेला आहे.

समर्थ रामदास स्वामी हे खरे तर भगवान श्रीरामाचे उपासक आणि परमभक्त. असे सांगतात की, समर्थ रामदास स्वामी हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव या गणेशस्थानी गेले असता गणपतीच्या दर्शनानंतर त्यांनी ही आरती लिहिली. या आरतीची तीन कडवी सर्वत्र म्हटली जात असून ती अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वाना तोंडपाठ आहेत. रामदास स्वामी यांनी या आरतीत गणपतीचे वर्णन केले असून शब्दरचना सोपी आहे. हे गणेशा केवळ तुझ्या दर्शनाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे सांगताना समर्थानी ‘जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मन कामना पूर्ती’ असे म्हटले आहे.

आरतीच्या शेवटी रामदास स्वामी यांनी आपले नाव गुंफले असून ‘दास रामाचा वाट पाहे सदना’ असे सांगून त्याच्याकडे ‘संकटी पावावे निर्वाणी रक्षावे’ अशी आळवणीही केली आहे. रामदास स्वामी यांची रचलेली ही आरती अनेक घरांमधून पारंपरिक चालीत म्हटली जाते. रामदास स्वामी यांची ही रचना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अजरामर केली असून या आरतीची लोकप्रियता आजच्या काळातही कमी झालेली नाही. प्रासादिक शब्दरचना असलेली ही आरती लता मंगेशकर यांनी तितक्याच प्रभावीपणे आपल्या स्वरातून सादर केली आहे. 
 
 गणेशोत्सव आणि लतादिदींच्या आवाजातील ही आरती यांचे अतूट नाते तयार झाले आहे. या आरतीच्या शेवटी मंत्रपुष्पांजली असून ती गायक-संगीतकार यशवंत देव यांनी म्हटली आहे. स्वच्छ, स्पष्ट, शब्दोच्चार आणि आवाजातील भारदस्तपणाने आरतीबरोबरच मंत्रपुष्पांजलीही रसिकांच्या आणि भक्तांच्या मनात घर करून राहिली आहे.

03 September 2010

प्रतीक्षा डोंबिवली-सीएसटी फास्ट ट्रेनची

सुशिक्षितांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीकरांची ओळख ‘सहनशील प्रवासी’ म्हणूनही आहे. शहरातील रिक्षाचालकांची मुजोरी, पदपथ आणि रेल्वेस्थानक परिसरात फेरीवल्यांनी केलेले अतिक्रमण आणि अन्यनागरी प्रश्न डोंबिवलीकर शांतपणे घेतात. हक्काची डोंबिवली लोकल मिळविण्यासाठीही डोंबिवलीकरांना अनेक वर्षे प्रतिक्षा करावी लागली होती. रेल्वे प्रशासनाने काही ना काही कारणे देत हा प्रश्न टोलवत ठेवला होता. अखेर डोंबिवलीहून लोकल सुरू झाली. आता डोंबिवलीकरांना प्रतीक्षा आहे ती डोंबिवलीहून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी (डोंबिवली ते थेट ठाणे आणि पुढे सीएसटी)फास्ट ट्रेन सुटण्याची..


सकाळी ऐन गर्दीच्या वेळी डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाडीत चढणे म्हणजे खरोखरच एक दिव्य असते. डोंबिवली लोकलमुळे डोंबिवलीकरांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला असला तरी या सर्व गाडय़ा ठाण्यापर्यंत स्लो आणि पुढे फास्ट होणाऱ्या आहेत. सकाळच्या वेळेत फलाट क्रमांक तीनवर (अप स्लो) कल्याण, कर्जत आणि कसाऱ्याहून येणाऱ्या गाडय़ा ठाण्यापर्यंत स्लो तर फलाट क्रमांक पाचवर (अप फास्ट)येणाऱ्या गाडय़ा थेट डोंबिवली ते ठाणे व पुढे सीएसटी अशा असतात. सकाळी गर्दीच्या वेळी फलाट क्रमांक तीनवर येणाऱ्या गाडीत कसाबसा प्रवेश तरी करता येतो. मात्र फलाट क्रमांक पाचवर येणाऱ्या फास्ट गाडय़ांमध्ये प्रवेश करणेही कठीण जाते. त्यामुळे अनेक प्रवासी गाडी पकडू शकत नाहीत. कल्याण, कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेने फलाट क्रमांक पाचवर आलेल्या आणि ‘सीएसटी’कडे जाणाऱ्या सर्व गाडय़ा अगोदरच खच्चून भरून येतात. त्यामुळे त्यात प्रवेश करणे ही जिवावरची कसरतच असते. त्यामुळे किमान सकाळी ऐन गर्दीच्या वेळी तरी डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी थेट फास्ट गाडय़ा सोडण्यात याव्यात, अशी डोंबिवलीकर प्रवाशांची मागणी आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर (डाऊन फास्ट) कल्याण, कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेकडे जाणाऱ्या फास्ट गाडय़ा येतात. या गाडय़ा ठाकुर्ली रेल्वे स्थानकात थांबत नाहीत. सकाळी गर्दीच्या वेळी किमान दोन ते चार गाडय़ा फलाट क्रमांक चार वरून ‘सीएसटी’च्या दिशेने सोडता येऊ शकतील. त्यामुळे लाखो डोंबिवलीकर प्रवाशांना दिलासा मिळेल. फलाट क्रमांक चारवर आणण्यात आलेली डोंबिवली लोकल (म्हणजे डाऊन फास्ट ट्रॅकवर आलेली डोंबिवली लोकल; ती अप फास्ट ट्रॅकवर वळवून) ‘सीएसटी’साठी फास्ट लोकल म्हणून सोडता येणे शक्य आहे. फलाट क्रमांक चारवर आणलेली डोंबिवली लोकल अप फास्ट ट्रॅकवर वळविण्यासाठी वेगळे काही करावे लागणार नाही. कारण चारवरून पाचवर (डाऊन फास्ट व अप फास्ट) जाणारा रेल्वेमार्ग जोडलेला आहे.

कधी कामाच्या निमित्ताने साइडिंगला असलेले रेल्वे इंजिन फलाट क्रमांक चारवर आणून ते पुन्हा पाच क्रमांकाच्या फलाटाच्या (डाऊन फास्ट वरून अप फास्ट) रेल्वेमार्गावर वळवले जाते. असे इंजिन वळवताना अनेकदा प्रवाशांनी पाहिलेले आहे. जर हे इंजिन वळवता येऊ शकते तर तशाच प्रकारे डाऊन फास्ट ट्रॅकवर आणण्यात आलेली लोकल अप फास्ट ट्रॅकवर वळवता येणे शक्य आहे. म्हणजेच डोंबिवलीत फलाट क्रमांक चारवर डोंबिवली लोकल आणून ती सीएसटीसाठी फास्ट लोकल म्हणून सोडता येऊ शकते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. सध्याच्या फलाट क्रमांक चारवर ‘सीएसटी’च्या दिशेकडे सिग्नल बसवणे आणि अन्य काही किरकोळ तांत्रिक बदल यासाठी करावे लागतील मात्र ते करणे फारसे कठीण नाही. रेल्वे प्रशासन आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून ते मनावर घेतले तर डोंबिवलीकरांचे डोंबिवलीहून ‘सीएसटी’कडे फास्ट ट्रेनने जाण्याची मागणी पूर्ण करता येऊ शकेल. प्रश्न आहे प्रखर इच्छाशक्तीचा..!

02 September 2010

मराठी पुस्तकांची ऑनलाईन बुकगंगा

मराठी पुस्तके जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अमेरिकास्थित ‘माय विश्व’ या कंपनीतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘बुकगंगा डॉटकॉम’ (www.bookganga.com) या संकेतस्थळाचे उद्घाटन आज मुंबईत ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर यांच्या हस्ते झाले. या संकेतस्थळावर मराठीसह भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणाऱ्या विविध विषयांवरील पुस्तकांची माहिती देण्यात आली असून आपल्याला हवे असेल ते पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्याचीही सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.


माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. या वेळी ‘माय विश्व’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, ‘ग्लोबल मराठी’ या संकेतस्थळाचे संचालक संजय पेठे आदी उपस्थित होते.

‘माय विश्व’ने मराठीसह विविध भारतीय भाषांमधील पुस्तके अ‍ॅपल कंपनीच्या आयपॅडवर वाचण्याची सुविधा ‘आयबुकगंगा’ या खास सॉफ्वेअरच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.

संकेतस्थळाचे उद्घाटन केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. टिकेकर म्हणाले की, आयपॅडच्या मदतीने किंवा थेट बुकगंगा डॉट कॉम या संकेतस्थळावरून मराठी पुस्तके आपण प्रिंट किंवा ई-बुक स्वरुपात विकत घेऊ शकतो. ‘आयपॅड’वर मराठी कविता, कादंबरी, कथा आदी साहित्यप्रकाराबरोबरच संदर्भग्रंथ, संस्कृतीकोश टाकण्यात यावेत.

मंदार जोगळेकर यांनी सांगितले की, सध्या या संकेतस्थळावर सात हजार पुस्तकांची माहिती देण्यात आली असून २५ प्रकाशक सहभागी झाले आहेत. संकेतस्थळावरून वाचकांना हवी ती पुस्तके ई-बुक स्वरूपात डाऊनलोड करून घेता येतील. ‘आयपॅड’ नसले तरी लॅपटॉप किंवा संगणकावरही ऑनलाईन पुस्तके खरेदी करता येतील.

सध्या मराठी, संस्कृत भाषेतील पुस्तके उपलब्ध असून लवकर तामिळ, तेलगु, कन्नड आणि बंगाली भाषेतील पुस्तके येथे मिळू शकतील.

माय विश्वने विकसित केलेल्या खास तंत्रज्ञानामुळे ज्याने पुस्तक विकत घेतले आहे त्यालाच ते त्याच्या संगणक, लॅपटॉप किंवा अ‍ॅपल कंपनीच्या आयपॅडवर वाचता येणार आहे. त्यामुळे पुस्तकांच्या पायरसीला आळा बसू शकेल, असा विश्वासही जोगळेकर यांनी व्यक्त केला.

जोगळेकर यांच्या या उपक्रमामुळे मराठी साहित्य व्यवहार आणि वाचन संस्कृती वाढण्यास मोठी मदत होणार आहे. मराठी पुस्तक प्रकाशकांनी या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवहन ‘ग्रंथाली’चे दिनकर गांगल यांनी या वेळी केले. प्रारंभी संजय पेठे यांनी प्रास्ताविक केले.
(ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १ सप्टेंबर २०१०च्या अंकात पान क्रमांक ३ वर प्रसिद्ध झाली आहे)

01 September 2010

भक्तीमोहिमेची तपपूर्ती

कटरा येथील माता वैष्णोदेवी
महाराष्ट्रात जे महत्व साडेतीन शक्तीपीठांना आहे, तेच महत्व जम्मू-काश्मीरमधील कटरा जिल्ह्यात असलेल्या माता वैष्णोदेवीचे आहे. संपूर्ण भारतात असलेल्या निवडक देवी शक्तीपीठांमध्ये वैष्णोदेवीचा समावेश होतो. दरवर्षी लाखो भक्त ‘जय माता दी’ असा जयजयकार करत मोठय़ा श्रद्धेने वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असतात. वैष्णोदेवीच्या दर्शनाचा मुख्य उद्देश ठेवून त्या अनुषंगाने आजूबाजूच्या काही निवडक ठिकाणांचे दर्शन भाविकांना घडविणाऱ्या ‘माता वैष्णोदेवी यात्रा संघा’ची यंदाची यात्रा नुकतीच पार पडली. यंदा यात्रेचे बारावे वर्ष होते. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर गेली बारा वर्षे संघाचे ही यात्रा अव्याहतपणे सुरू आहे. माता वैष्णोदेवी यात्रा संघ ही मालाड येथील संस्था असून त्यांच्यातर्फे मालाड (पूर्व) येथे प्रती वैष्णोदेवी मंदिर उभारण्यात आले असून दररोज आणि विशेषत: नवरात्रामध्ये तेथे भाविकांची विशेष गर्दी असते. मिठुभाई, राजेश शहा, गिरीश शहा, जगदीश खक्कर, किशोर वर्मा, अनिल हिंगड, हसमुख शेठ आदी मंडळींचा संयोजनात महत्वाचा सहभाग असतो. या मंडळींच्या बरोबर त्यांचे सर्व सहकारी , कार्यकर्ते दरवर्षी उत्साहाने यात्रा आयोजनात सहभागी होत असतात.
वैष्णोदेवीच्या दर्शनला जाताना असे मनोहारी दृश्य पाहायला मिळते

वाटेत अनेक माकडेही दिसतात
माता वैष्णोदेवी यात्रा संघाच्या आयोजनातील एक सदस्य आणि मंदिर व्यवस्थानाचे अध्यक्ष गिरिश शहा यांनी ‘मुंबई वृत्तान्त’ला अधिक माहिती देताना सांगितले की, माता वैष्णोदेवीची यात्रा ही तशी कठीण मानली जाते. तरुण मंडळी यात्रेला सहज जाऊ शकतात. पण अनेकदा वृद्ध नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनात असूनही नेमके कसे जायचे, कोणाबरोबर जायचे याची माहिती नसल्याने त्यांना जाता येत नाही. त्यामुळे मुंबईतून वृद्ध नागरिक आणि कुटुंबासहित सर्वाना एकत्र वैष्णोदेवीच्या यात्रेला जाता यावे, या मुख्य उद्देशाने आम्ही १९९७ मध्ये यात्रेला सुरुवात केली. एक वर्षांचा खंड वगळता गेली बारा वर्षे अव्याहतपणे आमची यात्रा सुरू आहे. पहिल्या यात्रेत अवघे १३५ भाविक सहभागी झाले होते. यात्रेसमवेत आलेली मंडळी, यात्रा संयोजक यांच्या चर्चेतून मालाड येथे प्रती वैष्णोदेवी मंदिर उभारण्याची कल्पना पुढे आली. सर्वाची मदत आणि माता वैष्णोदेवीच्या कृपेमुळे फेब्रुवारी २००१ मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले.

कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिरातून आणलेली अखंड ज्योत मालाड येथील मंदिरात आहे. पहिल्या वर्षांच्या यात्रेमुळे आमचा उत्साहही दुणावला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी अनुक्रमे २६५ आणि ४५० भाविक यात्रेत सहभागी झाले होते. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात आमची वैष्णोदेवी यात्रा निघते. आम्ही आमच्या यात्रेची कुठेही जाहिरात करत नाही. आमच्या यात्रेबरोबर एकदा आलेला माणूस त्याच्या मित्रांना, नातेवाईकांना आमच्या यात्रेविषयी, त्याच्या आयोजनाबाबत, यात्रेतील जेवणखाण, राहणे आणि अन्य सोयी-सुविधांबाबत माहिती देतो. त्यातून दरवर्षी आम्हाला जास्तीत जास्त संख्येने यात्रेकरू मिळतात. हळूहळू भाविकांची संख्या वाढत गेल्याने २००० सालापासून आम्ही स्पेशल चार्टर ट्रेन करून यात्रा काढत असल्याची माहितीही गिरीश शहा यांनी दिली.
वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाताना डोंगरावरून कटरा गावाचे दिसणारे विहंगम दृश्य

आमच्या बरोबर यात्रेत सहभागी झालेल्या सर्वाची व्यवस्थीत काळजी घेतली जाते. गाडीत मिनरल वॉटर, दुपार व रात्रीचे जेवण, सकाळ व दुपारचा चहा आणि नाश्ता दिले जाते. जेवण साधे व रुचकर असते. दररोजच्या जेवणात वेगवेगळा गोड पदार्थही आम्ही देतो. यात्रेचा मुख्य उद्देश माता वैष्णोदेवी दर्शन हा असतो. यात्रेच्या मुक्कामाच्या ठिकाणी एक दिवस माता वैष्णोदेवीचे जागरण (चौकी) आम्ही करतो. देवीची भजने, आरती, गाणी असा मोठा कार्यक्रम असतो. वैष्णोदेवीचे दर्शन झाले की परतीच्या प्रवासात येणाऱ्या मार्गातील काही ठिकाणे आम्ही करतो. यंदाच्या वर्षी उज्जनला गेलो होतो. येथे बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेले महाकालेश्वर तसेच उज्जनमधील अन्य ठिकाणांचे दर्शन होते. यापूर्वी आम्ही चार देवी, चंदीगढ, अमृतसह, मथुरा, वृंदावन, हरिद्वार यांचे दर्शन घडवले होते, असेही गिरीश शहा यांनी सांगितले.

माता वैष्णोदेवी यात्रा संघ आणि मालाड येथील मंदिरातर्फे काही सामाजिक उपक्रमही राबविण्यात येतात. आम्ही आरोग्य सुविधाही उपलब्ध करून दिल्या असून त्यात फिजिओथेरपीस्ट, नेचर थेरपी, होमिओपॅथी यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही विद्यार्थ्यांसाठी समुपदेश केंद्रही सुरू केले असल्याची माहिती शहा यांनी दिली.

(माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १ सप्टेंबर २०१०च्या अंकात पान क्रमांक चारवर प्रसिद्ध झाला आहे. लेखात वापरलेली छायाचित्रे अश्विन कराळे यांची आहेत)

माता वैष्णोदेवी यात्रा संघ-४, मणी भवन, माता वैष्णोदेवी दिव्य धाम, सुभाष लेन, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७ (दूरध्वनी ०२२-२८८२९५७०)