31 January 2010

सर्वभाषा कवी संमेलन

साहित्य प्रकारात कविता या प्रकाराला विशेष महत्व आहे. कथा, कादंबरी, ललित लेखन, प्रवासवर्णन, आत्मचरित्र इत्यादी साहित्य प्रकाराबरोबरच कविता हा प्रकारही लोकप्रिय आहे. कवितेलाच संगीत दिल्याने अनेक चांगल्या कवितांची सुमधुर आणि अजरामर अशी गाणी तयार झाली आहेत. मराठीत तर ही काव्यपरंपरा खूप मोठी आहे. कथा किंवा कादंबऱ्यांच्या तुलनेत मराठी काव्यसंग्रहाला फारसा खप नसला तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अन्य कोणत्याही साहित्यविषयक कार्यक्रमात नवोदित आणि मान्यवरांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम हा असतोच आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो.सध्याच्या दूरचित्रवाहिन्यांच्या आक्रमणात आकाशवाणी थोडीशी मागे पडली असली तरी अन्य प्रसारमाध्यमांच्या तुलनेत आकाशवाणीवर कविता या प्रकाराला चांगले स्थान दिले जाते. गेली तीस वर्षे आकाशवाणीकडून आयोजित करण्यात येणारे ‘राष्ट्रीय सर्वभाषा कवी संमेलन’ हे त्याचेच ठळक उदाहरण आहे. आकाशवाणीची विभागीय केंद्रे आणि राष्ट्रीय स्तरावर दरवर्षी होणारा हा कार्यक्रम म्हणजे कवितेच्या माध्यमातून देशातील अनेक भाषांना एकत्र आणण्याचे आणि त्या त्या भाषेतील चांगल्या कविता संपूर्ण देशभरात पोहोचविण्याचा एक स्तुत्य उपक्रम आहे.


यंदाच्या वर्षीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या गुवाहाटी केंद्राकडून नुकताच श्रोत्यांपुढे गुवाहाटी येथे सादर झाला. यात निवडण्यात आलेल्या कवितांचे सादरीकरण देशभरातील विभागीय आकाशवाणी केंद्रांकडून आपापल्या केंद्र स्तरावर करण्यात येते. मुंबई केंद्राकडून सादर झालेल्या कार्यक्रमाची निर्मिती येथील कार्यक्रम अधिकारी महेश केळुस्कर यांनी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या संचालिका भारती गोखले-रुस्तुम (या आज सेवानिवृत्त होत आहेत) यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. मंगेश पाडगावकर, प्रा. शंकर वैद्य, अशोक नायगावकर, अनुपमा उजगरे आणि अन्य कवींनी विविध भाषातील या कवितांचे सादरीकरण केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे लेखन आणि निवेदन आकाशवाणीचे निवेदक किशोर सोमण यांनी केले होते.


सर्वभाषा कवी संमेलनात देशभरातील २३ विविध भारतीय भाषांमधून कविता सादर केल्या जातात. यात संस्कृत, मराठी, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराथी, कन्नड, कोकणी, काश्मीरी, मणीपुरी, मल्याळम, मैथीली, नेपाळी, पंजाबी, सिंधी, तेलुगू, उडिया, ऊर्दू आणि हिंदी या भाषांचा समावेश आहे. आकाशवाणीच्या स्थानिक केंद्रांतर्फे कवितांची निवड करुन त्याची शिफारस विभागीय केंद्रांकडे केली जाते. विभागीय केंद्रांकडून त्यातील निवडक कवितांची निवड करून मूळ कविता, त्या कवीचा परिचय आणि हिंदी व इंग्रजी भाषेतील त्या कवितेचा सारांश हा दिल्ली केंद्राकडे पाठवला जातो. दिल्लीत आकाशवाणी मंत्रालयाच्या महासंचालनालयाकडून त्या त्या भाषेतील तज्ज्ञ मंडळींकडून अंतिम सादरीकरणासाठीच्या कवितांची निवड केली जाते.


त्यानंतर देशभरातील एखाद्या आकाशवाणी केंद्राकडून निवडण्यात आलेल्या कवितांचे सादरीकरण श्रोत्यांपुढे सादर केले जाते. त्या कार्यक्रमात मूळ कवी, अनुवादक सहभागी होतात. यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम गुवाहाटी केंद्राने आयोजित केला होता. महाराष्ट्रातून नाशिकचे राम पाठक यांच्या कवितेची निवड यात झाली होती. या कार्यक्रमानंतर सादर झालेल्या सर्व कविता गुवाहाटी, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली, बंगलोर, श्रीनगर, थिरुवनंतपुरम, मुंबई, कटक, जालंधर, चेन्नई, हैद्राबाद, पणजी, जम्मू, पाटणा आदी विभागीय आकाशवाणी केंद्रांकडे मूळ कवितेच्या हिंदूी व इंग्रजी अनुवादासह पाठवल्या जातात. आकाशवाणीच्या त्या त्या केंद्राकडून विविध नामवंतांना आमंत्रित करून त्या आकाशवाणी केंद्राच्या अखत्यारीतील स्थानिक भाषेत अनुवादित करून श्रोत्यांना ऐकविण्यात येतात. म्हणजे मुंबई आकाशवाणी केंद्रावरुन त्या सादर करताना सर्व कवितांचा मराठी भाषेतील अनुवाद सादर केला जातो. हा कार्यक्रम राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रे सहक्षेपित करत असतात. सोबत मूळ भाषेतील कवितेचा काही भागही श्रोत्यांना ऐकविण्यात येतो.

 
राष्ट्रीय सर्वभाषा कवी संमेलनासाठी कवितांची निवड करताना देशाची संस्कृती, समाजजीवन, वर्तमानाचे भान या बरोबरच कवितेतून व्यक्त होणारा सामाजिक आशय पाहिला जातो. या निकषांवर कवितांची निवड केली जाते. या कवी संमेलनाच्या निमित्ताने भारतातील विविध प्रादेशिक भाषांमधील कविता आणि कवी संपूर्ण देशभरात पोहोचतात. विविध भाषेतील या कवितांमधून आपल्या समोर भारत उलगडला जातो. विविध प्रादेशिक भाषांमधील कवी आणि कविता अन्य भाषिक राज्यातील श्रोत्यांपर्यंत पोहोचतात, असे आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम अधिकारी महेश केळुस्कर यांनी सांगितले.

30 January 2010

मागोवा महाराष्ट्राचा

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्राशी संबंधित विविध विषयांचा समग्र मागोवा घेणारी पन्नास पुस्तके प्रकाशित करण्याचा पुण्याच्या ‘डायमंड पब्लिकेशन्स’चा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाला असून ३१ जानेवारी रोजी पुण्यात एका विशेष कार्यक्रमात या पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. ‘डायमंड पब्लिकेशन्स’चे दत्तात्रय पाष्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राचा समग्र मागोवा आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीबद्दल आस्था असणारे रसिक, विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि सर्वसामान्यांसाठीही ही सर्व पुस्तके म्हणजे आपली संस्कृती, इतिहास, सद्यस्थिती यांचा संदर्भ ठेवा ठरणार आहे.महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने काहीतरी वेगळे करण्याचे पाष्टे यांच्या मनात होते. पाष्टे यांनी २००५ मध्ये ‘डायमंड पब्लिकेशन्स’ची स्थापना केली आणि अल्पावधीतच शैक्षणिक पुस्तके व कोशवाङ्मय प्रकाशित करणारे एक दर्जेदार प्रकाशक म्हणून त्यांनी आपली आणि आपल्या प्रकाशन संस्थेची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आत्तापर्यंत त्यांनी सुमारे साडेचारशे पुस्तके प्रकाशित केली असून तीस कोशही प्रकाशित केले आहेत. पाष्टे यांच्या घरी पुस्तक प्रकाशन व्यवसायची परंपरा नव्हती. पाष्टे यांनी स्वत: पुण्याच्या स. प. महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काही वर्षे नोकरी केली. नोकरी सोडून देऊन नंतर ते पुस्तकविक्री व्यवसायात उतरले. गेली २५ ते ३० वर्षे ते पुस्तकविक्रीच्या व्यवसायात आहेत. तेव्हा ते अन्य प्रकाशकांची पुस्तके विकत होते. या व्यवसायातील अनुभवानंतर त्यांनी स्वत:ची प्रकाशन संस्था सुरु करण्याचे ठरवले आणि जिद्दीने ते यात उतरले. सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक आणि मुख्यत्वे कोशवाङ्मय प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था म्हणून त्यांची ख्याती आहे.


‘डायमंड पब्लिकेशन्स’ प्रकाशित करणार असणाऱ्या या पुस्तकांच्या नावावरुन केवळ एक दृष्टीक्षेप टाकला तरी हे काम किती मोठे आहे, त्याची कल्पना येऊ शकते आणि केवळ पुस्तकांच्या नावावरुन पुस्तकात काय आहे, ते सहज कळू शकते. ठरविण्यात आलेल्या प्रत्येक विषयावर तज्ज्ञ लेखक/अभ्यासकाकडून ते पुस्तक लिहून घेण्यात आले आहे. रविकिरण साने, निलिमा साने, डॉ. शुभदा कुलकर्णी, डॉ. श्री. वि. कडवेकर, प्रा. पद्माकर प्रभुणे, प्रा. शिल्पा कुलकर्णी, मंजुषा जोशी-पाटील, संभाजी पाटील, वि. ना. होनप, प्रा. गणेश राऊत, प्रा. सु. ह. जोशी, प्रा. ज्योती राऊत, प्रा. डॉ. शुभांगना अत्रे, प्रा. कल्पना रायरीकर, सौमित्र केंजळे, प्रा. अ. रा. कुलकर्णी, डॉ. म.रा. कुलकर्णी, डॉ. मा. रा. कंटक, अनिल बळेल, डॉ. भाग्यश्री काळे-पाटसकर, प्रा. एस. व्ही. ढमढेरे, डॉ. सुनील मायी, डॉ. आरती दातार, य. न. केळकर, ज. शं. आपटे, प्रा. शैलजा सांगळे, ऋता बावडेकर, संजय कोल्हटकर, प्रसाद कुलकर्णी, डॉ. एम. आर. कुलकर्णी, डॉ. द. ग. देशपांडे, शिल्पा कुलथे, सुहास आगरकर, अनुजा जोशी, प्रा. शमशुद्दीन तांबोळी, प्रा. डॉ. शरद आहेर, प्रा. डॉ. बालाजी पोटे, जयप्रकाश झेंडे, डॉ. नीलम ताटके, प्रा. मंजिरी भालेराव, प्रा. डॉ. एम. यू. मुलाणी, प्रतापराव अहिरराव, निलिमा शिकारखाने, एस. के. कुलकर्णी, प्रा. डॉ. शौनक कुलकर्णी, प्रा. डॉ. श्रीकांत कार्लेकर, डॉ. सरोजिनी बाबर, डॉ. राजा दीक्षित, डॉ. दुर्गा दीक्षित या लेखक मंडळींनी या पुस्तकांचे लेखन केले आहे.


या प्रकल्पात महाराष्ट्राचे शासन व राजकारण, महाराष्ट्रातील संगीत परंपरा, उद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र, महाराष्ट्रातील चलनाचा इतिहास, महाराष्ट्राचे समाजशास्त्र, महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तिमत्वे, महाराष्ट्रातील पर्यटन, महाराष्ट्र दिनविशेष, महाराष्ट्रातील लेणी, महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास, महाराष्ट्र संस्कृती-१८१८ पर्यंत, मध्ययुगीन महाराष्ट्र, मराठय़ांचे इतिहासकार, मराठय़ांचा इतिहास-साधन परिचय, उज्ज्वल महाराष्ट्रासाठी-भाग १ व २ (आर. आर. पाटील यांच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील निवडक भाषणांचा संग्रह), महाराष्ट्र-समाज व संस्कृती, मराठे आणि महाराष्ट्र, महाराष्ट्रातील वक्ते, महाराष्ट्राची मंदिरशैली, महाराष्ट्रातील जलसंपदा, महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे, महाराष्ट्रातील गरीबी, महाराष्ट्रातील संत परंपरा, ऐतिहासिक पोवाडे, महाराष्ट्राची लोकसंख्या-नियोजन आणि विकास, महाराष्ट्रातील महिला उद्योजक, लढा संयुक्त महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातील प्रमुख संपादक, महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमे-काल आणि आज, महाराष्ट्रातील प्रसिद्ध सरदार घराणी, महाराष्ट्रातील किल्ले, महाराष्ट्रातील वैभवशाली दागिन्यांची परंपरा, महाराष्ट्रातील पंथ, महाराष्ट्रातील नद्या, महाराष्ट्राचा शैक्षणिक विकास, महाराष्ट्रातील खेळ-आजचे आणि कालचे, महाराष्ट्रातील उद्योजक, महाराष्ट्रातील समाजसुधारक, महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार, महाराष्ट्रातील शेती, महाराष्ट्रातील देव-देवता, महाराष्ट्रातील आधुनिक संत, महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्र, महाराष्ट्रातील आदिवासी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रातील संत कवयित्री, महाराष्ट्रातील संतकवी, महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र संस्कृतीकेश, १९ व्या शतकातील महाराष्ट्र-मध्यमवर्गाचा उदय अशा विविध आणि सर्वकष विषयांचा समावेश आहे.

 
या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत ‘मुंबई वृत्तान्त’ला माहिती देताना पाष्टे यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकल्पासाठी मला आमच्या प्रकाशन संस्थेतील सर्व कर्मचारी व सहकारी, डॉ. अ. रा. कुलकर्णी (जे नुकतेच दिवंगत झाले), प्रा. सु. ह.जोशी आणि आमचे सर्व लेखक तसेच या पन्नास पुस्तकांची मुखपृष्ठे करणारे शामकांत भालेकर आणि सर्वाच्या सहकार्यानेच हा प्रकल्प आज पूर्ण होत आहे. कोशवाङ्मय प्रकाशित करण्याची आमची परंपरा असली तरी हा विषय आम्हाला सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवायचा होता. या पन्नास पुस्तकांची सर्व पाने एकत्रित केली तर ही संख्या सुमारे नऊ हजार इतकी होत आहे. हे सर्व खंड स्वरुपात प्रकाशित केले असते तर त्याची किंमतही हजारो रुपये ठेवावी लागली असती. हे सर्व विषय विद्यार्थी आणि सर्वसामान्य वाचकांपर्यंत जावेत आणि त्यांना ही पुस्तके खरेदी करता यावीत, या उद्देशाने मोठे खंड किंवा कोश न करता हे सर्व विषय स्वतंत्रपणे पुस्तकस्वरुपात प्रकाशित करण्याचे आम्ही ठरवले. किमान १०० आणि कमाल ३२८ अशी या पुस्तकांची पृष्ठसंख्या असून यातील फक्त एक पुस्तक सर्वात जास्त म्हणजे ७०० पानांचे आहे. या प्रकल्पातील पुस्तकांची किंमत अगदी ३० रुपये किमतीलाही एक पुस्तक असून अन्य काही पुस्तकांच्या किंमती ७०, ७५, १२५, १५०, २००, २५० रुपये अशा आहेत. तर काही मोजक्या पुस्तकांच्या किंमती ४००, ४२५, ५००, ७५० अशा आहेत.
 
 
महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने आम्ही हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला तेव्हा गेल्यावर्षी १२ आणि गेल्या सहा महिन्यात ३८ पुस्तकांचे काम आम्ही मार्गी लावले. आम्ही जे विविध विषय ठरवले होते त्यापैकी ‘महाराष्ट्राची अर्थव्यवस्था’ हे एक पुस्तक मात्र पूर्ण होऊ शकले नाही. येत्या ३१ जानेवारी रोजी पुण्यातील हॉटेल सेंट्रल पार्क येथे सकाळी अकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय ऊर्जामंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होणार असून आमदार उल्हास पवार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, माजी कुलगुरु डॉ. शं. ना. नवलगुंदकर आणि ‘लोकसत्ता’ (पुणे)चे निवासी संपादक मुकुंद संगोराम हे यावेळी प्रमुख पाहुणे तर राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असल्याचेही पाष्टे यांनी सांगितले.
 
 
माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये ३० जानेवारी २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. त्याची लिंक अशी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=43665:2010-01-29-15-12-59&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81

27 January 2010

नको च्यायला आणि आयला

आपल्या नेहमीच्या बोलण्यात आपण अगदी सहजपणे च्यायला आणि आयला असे शब्द उच्चारत असतो. मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुले, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही हे शब्द आपल्या बोलण्यात वापरत असतात. हे शब्द म्हणजे थेट शिवी नसली तरी ते वापरणे अयोग्य आणि असंस्कृत  असल्याचे मोठ्यांकडून लहानांना नेहमीच सांगितले जाते.  व्यवहार्य नसलेले हे शब्द आता मात्र लवकरच  शासकीय स्तरावरही अव्यवहार्य ठरण्याची शक्यता आहे. या दोन शब्दांप्रमाणेच अशाच प्रकारचे अन्य दहा ते बारा शब्द शोधण्यात आले असून ते ही शासन स्तरावर बाद केले जातील.


महाराष्ट्र राज्य शासनाने आपले सांस्कृतिक धोरण तयार करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची एक समिती तयार केली होती. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुखे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत प्रा. दत्ता भगत, आमदार उल्हास पवार, अशोक नायगावकर, गिरीश गांधी, प्रा. सिसिलिया कार्व्हालोव्ह, शफाअत खान आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर यांचा समावेश होता. या समितीने सांस्कृतिक धोरणाचा मसुदा तयार करुन नुकताच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सादर केला.


या समितीने अप्रयोगार्थ शब्दरचना समितीपुढे विचारार्थ ठेवायचे असे काही शब्द आणि त्याला पर्याय म्हणून सूचविलेले शब्द यात सांगितले आहेत. त्यात आयला आणि च्यायला या शब्दांना अरेच्चा असा पर्याय सुचविण्यात आला आहे. तसेच चांभारचौकशा या शब्दाला नसत्या चौकशा असा पर्याय सुचवला आहे. धेडगुजरी, खेळखंडोबा, बाटगा आणि बुद्धू या शब्दांना अनुक्रमे संमिश्र/संकरित, विचका, धर्मांतरित आणि मूर्ख असे शब्द सूचवले आहेत.


चांभार,  भंगी,  मांग आणि न्हावी या जातीवाचक शब्दांनाही अनुक्रमे चर्मकार, सफाई कामगार, मातंग आणि नाभिक या शब्दांचा वापर करावा, असे सूचवले आहे. या समितीने सादर केलेल्या या मसुद्यावर नागरिकांनाही आपल्या सूचना व हरकती नोंदवता येणार आहेत. राज्य़ शासनाच्या
http://maharashtra.gov.in/  किंवा   http://mahanews.gov.in/  या संकेतस्थळांवर सांस्कृतिक धोरणाचा हा मसूदा येत्या १ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. तो वाचून आपल्या सूचना येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत करायच्या आहेत.


आलेल्या सर्व सूचना आणि हरकती यावर विचार करुन सांस्कृतिक धोरणाचा सुधारित मसुदा मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.  मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर येत्या १ मे रोजी राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर करण्यात येणार आहे. भाषा, साहित्य, सर्व प्रकारच्या कला, चित्रपट, नाटक, क्रिडा, महिला, संस्कृती आणि अन्य विविध कलांबाबत या समितीने सांस्कृतिक धोरणाचा हा मसुदा तयार केला आहे.  


शासनस्तरावर अशा असंस्कृत शब्दांचा वापर करु नये, असे जरी सांगण्यात आले तरी जोपर्यंत आपण स्वत आपल्या मनाशी मी असे असंस्कृत शब्द वापरणार नाही, असे ठरवत नाही तो पर्यंत समाजात असे शब्द प्रचलित राहणार आणि बोलण्यात त्यांचा वापरही होत राहणार.
        

24 January 2010

चव्हाणांचे घालीन लोटांगण

राकट देशा, कणखर देशा दगडांच्या देशा, असे महाराष्ट्राचे, महाराष्ट्रीयन संस्कृतीचे, मराठीपणाचे  वर्णन मराठी नाटककार राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी आपल्या एका कवितेत केले आहे. मात्र ते वर्णन केवळ कवितेपुरतेच असल्याचा प्रत्यय महाराष्ट्रातील राजकीय नेते विशेषत कॉंग्रेसी पुढारी नेहमीच देत असतात. आत्ताही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी टॅक्सी परवाने देण्याबाबतचा आपला निर्णय फिरवून दिल्लीपुढे घालीन लोटांगण घातले आहे.


देशातील कर्नाटक, तामिळनाडु या राज्यांनी आणि तेथील राज्यकर्त्यांनी किंवा चेन्नई, कोलकाता आदी प्रमुख शहरांतील स्थानिक प्रशासनाने स्थानिक भाषेची अस्मिता जपली तर ते भाषाप्रेम, स्वतच्या भाषेचा अभिमान म्हणून गौरवाने सांगितले जाते. तेथेही अन्य कोणी राजकीय पुढारी, पक्ष त्यांना याबाबत बोलत नाहीत. पण महाराष्ट्राने, येथील राजकीय पक्षांनी किंवा राजकीय पुढाऱयांनी मराठी  भाषेची सक्ती केली, मराठीचा अभिमान बाळगला तर ते मात्र राष्ट्रविघातक, देशातील नागरिकांमध्ये फूट पाडणारे, भाषिक वाद किंवा वैमनस्य निर्माण करण्याचे धोरण म्हणून त्याच्यावर टिका करायची, असा हा दुटप्पीपणा आहे. पण हे ही तेवढेच खरे की मराठी किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नावर आपल्याकडे सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी अन्य राज्यातील राजकीय नेत्यांप्रमाणे कधीच एकत्र येत नाहीत किंवा तो प्रश्न संसदेत लावून धरत नाहीत.


केंद्रात सर्वोच्च पदावर अनेक मराठी व महाराष्ट्रीयन नेते अशूनही इतक्या वर्षात बेळगावचा प्रश्न सुटलेला नाही किंवा तो भाग महाराष्ट्रात समाविष्ट झालेला नाही. या मंडळींना काहीही करायची इच्छा आणि आच नाही हेच खरे. ज्या ठिकाणी स्वार्थ असेल तिथे मात्र हे सर्वपक्षीय पुढारी पक्षभेद विसरुन एकत्र येतात हे ही आपण पाहिले आहे. त्यामुळे दिल्लीपुढे नेहमी घालीन लोटांगण घालायचे हेच धोरण येथील कॉग्रेसी पुढाऱयांनी राबवले आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी टॅक्सी परवाने देण्याबाबत केलेले घुमजाव. या पुढे टॅक्सी परवाने देताना  ज्याला मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येते तसेच मुंबई व परिसरातील भागाची ज्याला माहिती आहे, अशानाच टॅक्सी परवाने देण्यात येतील, असा मंत्रिमंडळाचा निर्णय झाला. त्याची माहीती वृत्तपत्रे आणि सर्व प्रसार माध्यमातून ठळकपणे प्रसिद्ध झाली.

्र
खरे तर या निर्णयात काहीही चूक नाही. राज्याच्या मोटारवाहन कायद्यातही तसे स्पष्ट म्हटलेले आहे. पण आपल्याकडे होते काय की सर्व नियम, कायदे हे फक्त कागदावरच राहतात. त्याची कठोरपणे अंमलबजावणी कधी होत नाही. मराठी भाषा ही या राज्याची प्रमुख भाषा अर्थात राजभाषा म्हणून स्वीकारली गेली आहे. त्यामुळे सर्व राजकीय व्यवहार हे मराठीतूनच होणे अपेक्षित आहे. मराठी सक्तीची केली गेली तरीही ते कायद्यानुसार योग्यच ठरेल. पण इतक्या वर्षात कॉंग्रेसी राजवटीने त्याची  कधीच कठोरपणे अंमलहजावणी केली नाही. त्यामुळे साहजिकच अगोदर शिवसेना आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना मराठी विषयाचे आयते कोलीत मिळाले.


चव्हाण यांच्या या निर्णयानंतर देशभरातून त्यावर टीका झाली. दिल्लीश्वरांनी डोळे वटारताच अशोक चव्हाण यांनी घुमजाव केले आणि मराठीबरोबरच हिंदी व गुजराथी आली तरी चालेल, असे स्पष्टीकरण दिले. अरे कशासाठी ही लाचारी. तुम्ही  काही चुकीचे वागत नव्हता, जे कायद्यात आहे, तेच तुम्ही सागितलेत. मग त्यावर टीका झाल्यानंतर तुम्ही शेपूट का घातली, आम्ही जे करतोय ते योग्य करतोय असे का नाही ठणकावून सांगितले, घालीन लोटांगणचा प्रयोग का केलात, असे प्रश्न विचारले जात आहेत. पण कॉंग्रेसचे हे को़डगे नेते त्यातून काही शिकणार नाहीत आणि सुधारणारही नाहीत.


भाषावार प्रांतरचनेचे धोरण स्वीकारल्यानंतर देशात ती ती भाषिक राज्ये सहजपणे निर्माण झाली. महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र आपले हक्काचे राज्य मिळविण्य़ासाठी संघर्ष करुन रक्त सांडावे लागले होते. खऱे तर त्यावेळी पंडित नेहरु यांचा मुंबई वगळून महाराष्ट्र व गुजराथ अशी दोन राज्ये एकत्र निर्माण करण्याचा डाव होता. मात्र मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून प्रखर आंदोलन उभे राहिले. त्या सर्व आंदोलनात अनेक मंडळींचे मोठे योगदान होते. मात्र त्यातही  आचार्य प्रल्हाद केशव अत्रे  यांचा आणि त्यांचे मराठा हे दैनिक व नवयुग हे साप्ताहिक यांचा मोठा वाटा होता. त्या आंदोलनाच्या वेळी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर झालेले राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी अत्रे यांना विचारले होते, की झालाच पाहिजे असे का म्हणता, यात च नसला तर काय बिघडले, त्यावर अत्रे यांनी चव्हाण यांना तुमच्या आडनावातील च काढून टाकला तर फक्त व्हाण उरेल ना, असे प्रत्युत्तर दिले होते.


महाराष्ट्राला आज आचार्य अत्रे यांच्या साऱख्या व्यक्तीची, तशा विचारांच्या नेत्यांची व राजकीय पक्षांची  खरी गरज आहे. अत्रे आज असते तर कॉंग्रेसी शासनाने तसेच राज्यातील अन्य राजकीय पक्ष आणि नेत्यांनी राज्याचा जो काही खेळखंडोबा करण्याचे उद्योग चालवले आहेत, त्यावर कोरडे ओढले असते आणि अनेकांना आपल्या लेखणीने आणि वाणीने सळो की पळो केले असते आणि मग कदाचित सध्याच्या महाराष्ट्राचे एक वेगळे चित्र पाहायला मिळाले असते...      

23 January 2010

आचार्य अत्रे यांचा मराठा आता डिव्हिडीवर

‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी फार मोठा लढा देऊन आपल्याला आजचा महाराष्ट्र मिळाला आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार देशातील अन्य राज्यांची निर्मिती सहजपणे झालेली असताना महाराष्ट्राच्या वाटय़ाला मात्र संघर्ष आणि रक्त सांडून महाराष्ट्र राज्य मिळवावे लागले होते. महाराष्ट्र आणि गुजरात असे एकच द्विभाषिक राज्य निर्माण करण्याचा आणि त्यातून मुंबई वेगळी करण्याचा घाट केंद्रातील कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी घातला होता. मात्र प्रखर आंदोलनानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. यात सर्वसामान्य माणसांप्रमाणेच ज्यांचे योगदान खूप मोठे होते, त्यात आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे नाव ठळकपणे घ्यावे लागेल.


मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी आचार्य अत्रे आणि त्यांचे ‘मराठा’ हे दैनिक आणि ‘नवयुग’ हे साप्ताहिक यांचे मोठे योगदान आहे. आचार्य अत्रे यांनी आपल्या धारदार लेखणी आणि वाणीच्या जोरावर महाराष्ट्र ढवळून काढलाच परंतु केंद्रातील आणि त्यावेळच्या मुंबई राज्यातील मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या मंडळींना अक्षरश: सळो की पळो करून सोडले तर अनेकांचे शाब्दिकवस्त्रहरण केले.

१५ नोव्हेंबर १९५६ रोजी ‘मराठा’ दैनिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला आणि १ मे १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र मिळाला. या काळात अत्रे यांच्या लेखणीमुळे ‘मराठा’ अमाप लोकप्रिय झाला. त्याचा खपही खूप होता. अत्रे यांचे अग्रलेख, लेख, ठिकठिकाणच्या भाषणांचे हशा आणि टाळ्यांसह येणारे वृत्तान्त, बातम्या आणि अंकातील अन्य सर्व मजकूर खास अत्रे स्टाईल मध्ये असायचा. सर्वसामान्यांच्या भावनेला, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला ‘मराठा’ने वाचा फोडली. ‘मराठा’चा हा काळ म्हणजे त्या वृत्तपत्राचे वाचक आणि तेथे काम करणाऱ्या पत्रकारांसाठीही सुवर्णयुग होते. अशा या इतिहास घडविणाऱ्या ‘मराठा’ दैनिकाचे सर्व अंक नव्या पिढीला तसेच अभ्यासकांना चिरस्थायी स्वरुपात उपलब्ध करुन देण्यासाठी ते डिव्हिडी स्वरुपात आणण्यात येणार आहेत. 


‘मराठा’च्या पहिल्या अंकापासूनचे सर्व जुने अंक मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जपून ठेवण्यात आले आहेत. मात्र कालपरत्वे कागद जुना झाल्यामुळे ते अंक खराब होऊ लागले आहेत.शिरीष पै यांची बहिण  मीना देशपांडे या त्या लिहित असलेल्या एका पुस्तकाच्या निमित्ताने तेथे गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्या  ही बाब लक्षात आली. वृत्तपत्राचा कागद हा काही काळानंतर जीर्ण होऊ लागतो. वृत्तपत्राच्या अंकाची योग्य ती काळजी घेतली तरीही कालांतराने त्याला नुसता हात लावला तरी त्याचे तुकडे पडतात. अशा वेळी अत्याधुनीक तंत्राचा वापर करुन हे सर्व अंक जतन करण्यात यावेत आणि ते चिरकाळ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने शिरीष पै,  मीना आणि शिरीष पै यांचा मुलगा राजेंद्र पै यांनी ‘मराठा’चे हे सर्व अंक डिव्हिडी स्वरुपात जतन करण्याच्या दृष्टीने विचार सुरु केला आहे.

‘मराठा’चा पहिला अंक १५ नोव्हेंबर १९५६ मध्ये प्रसिद्ध झाला. तर १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. या काळातील ‘मराठा’चे सर्व अंक म्हणजे एक प्रकारे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा इतिहासच आहे. त्यामुळे ‘मराठा’ अंकांच्या डिव्हिडी दोन कालखंडात काढण्यात येणार आहेत. ‘मराठा’चा पहिला अंक ते महाराष्ट्र राज्याची निर्मिती हा पहिला कालखंड असेल. १९६० ते आचार्य अत्रे यांचे निधन होईपर्यंत म्हणजे १९६९ पर्यंतचा हा दुसरा कालखंड असेल. पहिल्या कालखंडात संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि त्या अनुषंगाने ‘मराठा’ मध्ये आलेले सर्व काही तर त्यानंतरच्या कालखंडात त्यानंतरचा सर्व भाग असेल. या डिव्हिडीमध्ये संपूर्ण अंक म्हणजे अंकातील सर्व पाने देण्यात येतील. त्यामुळे वाचक, अभ्यासक, पत्रकारितेचे विद्यार्थी या सर्वाना मूळ अंक पुन्हा एकदा वाचल्याचे समाधान मिळणार आहे.


‘मराठा’चे सर्व अंक डिव्हिडीवर आणण्याचे हे काम येत्या वर्षअखेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.  मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी आचार्य अत्रे आणि त्यांचे ‘मराठा’ हे दैनिक आणि ‘नवयुग’ हे साप्ताहिक यांचे मोठे योगदान होते. यातील ‘मराठा’ आता डिव्हिडीवर उपलब्ध होणार आहे.

याच विषयावरील माझी बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २३ जानेवारी २०१० च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे. त्याची लिंक अशी

22 January 2010

महत्व सूर्यनमस्काराचे

सूर्यनमस्कार हा एक सर्वांगसुंदर व्यायामप्रकार असून तो आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी आपल्याला वेळ मिळत नाही, अशी तक्रार केली जाते. अशा वेळी किमान बारा सूर्यनमस्कार घातले तरी त्याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी होतो. या संदर्भात सकाळ (मुंबई)च्या २२ जानेवारी २०१० च्या अंकात पान क्रमांक चार वर उत्तम आरोग्यासाठी सूर्यनमस्कार हा एक चांगली बातमी प्रसिद्ध झाली आहे. सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने डॉ. नितीन उनकुले यांच्य़ाशी केलेली बातचित बातमी स्वरुपात देण्यात आली आहे. सर्वांच्या माहितीसाठी ती  बातमी ब्लॉगवर देत आहे.सूर्यनमस्काराच्या  निमित्ताने आपण एकाच वेळी सात ते आठ योगासने करतो. त्यामुळे सर्वांगिण व्यायाम म्हणून सूर्यनमस्कार घालावे, असे सांगितले जात असल्याची माहिती या मुलाखतीत डॉ. उनकुले यांनी दिली आहे.  ही मुलाखत पुढीलप्रमाणे


सूर्यनमस्काराचे फायदे काय?


सूर्यनमस्कारामुळे चरबी वाढत नाही. पोट सुटणे, वजन वाढणे, मांड्या मोठ्या किंवा दंड मोठे दिसणे असे आजाराला निमित्त ठरणारे घटक सूर्यनमस्कारामुळे कमी करता येतात. त्या दृष्टीने हा उत्तम व्यायाम आहे. आजकाल जीवनपद्धती बदलली आहे. नोकऱ्यांच्या, व्यवसायांच्या जागा अशा असतात, की बऱ्याच वेळा त्यामुळेच व्याधींना आमंत्रण दिले जाते; पण हाडांची दुखणी, सलग आठ-दहा तास खुर्चीवर, बसणे, उभे राहणे याचा परिणाम पाठीचा कणा, हाडांचा सापळा, सांधे यांना दुखापत होण्यात होतो. त्याच्या जोडीला मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, पचनसंस्थेचे आजार होतात. हे आजार सूर्यनमस्कारामुळे बरे होतात.सूर्यनमस्काराची शास्त्रशुद्ध पद्धती आणि त्याची उपयुक्तता काय?

सांधे आणि स्नायूंच्या कार्यक्षमतेवर आपली हालचाल अवलंबून असते. सूर्यनमस्कार म्हणजे खरे तर वीस मिनिटांत सर्वांगीण व्यायाम होतो; कारण त्यात आठ टप्पे महत्त्वाचे असतात. सूर्यनमस्कारामध्ये सात ते आठ प्रकारची योगासने असातात. या योगाभ्यासाची सुरवात ताडासनामध्ये होते. त्यानंतर नमस्कार मुद्रा करताना दीर्घश्‍वसन केले जाते. पुढे मणक्‍यांचा व्यायाम, अष्टांग दंडवत यामुळे सांधे, स्नायू मोकळे होतात. दीर्घश्‍वसनामुळे शरीरातील प्राणवायूचे आकारमान वाढते. शिवाय, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने राहायला मदत होते. आपल्या शरीरातील अनेक प्रकारच्या संस्था, एकत्रपणे नांदाव्यात अशी रचना आहे. त्यात पचन, श्‍वास, स्नायू, मूत्रपिंड, मेंदू या सगळ्या संस्था सूर्यनमस्कारामुळे एकमेकाला मदत करत राहतात, हे जगभरातील संशोधनाने सिद्ध केले आहे. सूर्यनमस्कार घालताना काय काळजी घेतली पाहिजे?

 सूर्यनमस्कार शक्‍यतो सकाळी घातले पाहिजेत. त्या वेळी पोट रिकामे असावे. शिवाय ढगळ कपडे असतील तर नमस्कार आणि त्यायोगे होणारा व्यायाम सोपा होतो. हा व्यायाम आहे, त्यामुळे तो शास्त्रीयदृष्ट्या योग्य असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच सूर्यनमस्कार घालावेत.सूर्यनमस्कार आणि प्राणायाम यांचे गणित कसे असते?

प्राणायाम करायचा असेल तर तज्ज्ञ योगशिक्षकाचा सल्ला घ्यावा. सूर्यनमस्काराच्या निमित्ताने प्राणायाम, मंत्रसाधना, योगासने एकाच वेळी केली जातात; पण "प्राणायाम' सावधगिरीने करायला हवा. सूर्यनमस्कार करताना, हात वर केले, की दीर्घ श्‍वसन करावे आणि पुढे वाकताना श्‍वास सोडला पाहिजे. एकूण ताडासनापासून पुन्हा ताडासनापर्यंत येईपर्यंत श्‍वसनाचे हे गणित आहे; पण तो श्‍वास संथ गतीनेच घेतला पाहिजे. त्यात घाईगडबड नको. महिनाभर सूर्यनमस्कार घातल्यानंतर, शरीराला त्याची सवय झाल्यानंतरच प्राणायामाचा विचार करावा.

वरील सर्व भाग सकाळ-मुंबई २२ जानेवारी २०१० च्या अंकात पान क्रमांक चार वर प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील आहे.

सूर्यनमस्कार या विषयी मराठीमध्येही अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. जिज्ञासुंनी ती जरुर वाचावित.
 
१) सूर्यनमस्कार लेखक-विश्वास मंडलिक, योग विद्या धाम
२) आरोग्याची गुरूकिल्ली (स्वास्थ्ययोग भाग-२-सूर्यनमस्कार-योगासने), लेखक:हठयोगी पुंडलिक रामचंद्र निकम गुरूजी, श्री अम्बिका योग कुटीर प्रकाशन.
३)सूर्यनमस्कार, स्वामी पूर्णानंद, श्रद्धा प्रकाशन
 
 
सूर्यनमस्कार घालतांना सूर्याची बारा नावे घेतात. ती अशी यालाच सुर्यनमस्काराचे मंत्र असेही म्हटले जाते. 


ऒम मित्राय नम: । ऒम खगाय नम: । ऒम आदित्याय नम: ।

ऒम रवये नम: । ऒम पूष्णे नम: । ऒम सविते नम: ।

ऒम सूर्याय नमं: । ऒम हिरण्यगर्भाय नम:। ऒम अर्काय नम:।

ऒम भानवे नम:। ऒम मरीयचे नम: । ऒम भास्कराय नम: ।

ऒम श्रीसवितृसूर्यनारायणाय नम:


सूर्यनमस्कार विषयीचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. त्याचीही लिंक येथे देत आहे. जिज्ञासूना त्याचाही उपयोग होईल.


http://video.google.com/videoplay?docid=198968031165287678&ei=oTNZS5fpA4yKwgPVnan3AQ&q=surya+namaskar&hl=en#

20 January 2010

मिलिंद गुणाजी आता साईबाबांच्या भूमिकेत

मराठी-हिंदी मालिका किंवा चित्रपटांमधून खलनायक साकारणारा मिलिंद गुणाजी आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या एका हिंदी चित्रपटात ‘श्री साईबाबा’ साकारत आहे. लंडन येथील एस. सत्यप्रकाश यांची निर्मिती असलेला हा चित्रपट शिर्डीच्या साईबाबांवर आहे. एकाच वेळी हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार होणाऱ्या या चित्रपटात मिलिंद गुणाजी साईबाबाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. खुद्द मिलिंद गुणाजी यांनीच ही माहिती दिली. अभिनेता म्हणून परिचित असलेल्या मिलिंदची खरी ओळख ही ट्रेकर- हायकर आणि भटकंतीकार म्हणून आहे. परंतु अभिनयाच्या क्षेत्रात येऊनही त्याने आपले निसर्ग, गड, किल्ले आणि भटकंतीवरील प्रेम आजही जपले आहे. जाहिराती, मालिका आणि चित्रपटाच्या चित्रिकरणातून वेळात वेळ काढून तो आपली ही आवड जोपासत आहे.माझी मुलुखगिरी, भटकंती, चला माझ्या गोव्याला, गुढरम्य महाराष्ट्र अशी मराठी पुस्तके तसेच ऑफ बीट ट्रॅक्स इन महाराष्ट्र हे इंग्रजी पुस्तक त्याच्या नावावर जमा आहे. आता त्यांने लिहिलेले ‘मिस्टिकल, मॅजिकल महाराष्ट्र’ हे नवे पुस्तक येत्या २९ जानेवारीला मुंबईत क्रॉसवर्ड, वांद्रे येथे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, अभिनेते देवानंद, जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशित होत आहे. पॉप्युलर प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने मुंबईत महाल्क्ष्मी येथील पॉप्युलर प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात अनौपचारिक गप्पा करताना त्यांने आपण साईबाबा साकारत असल्याची माहिती दिली.


एस. प्रकाश यांना मी मालिका किंवा चित्रपटातून खलनायकी भूमिका करतो, हे काही जणांनी सांगितले. अशा भूमिकांचा शिक्का बसलेल्या अभिनेत्याने साकारलेला ‘साईबाबा’ प्रेक्षक स्वीकारतील का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. पण त्यांनी ही भूमिका मिलिंद गुणाजीच करेल, असे सांगून माझ्यावर विश्वास टाकला. काही काही योग असतात. त्यामुळे मला साईबाबा साकारायची संधी या चित्रपटामुळे मिळाल्याचे सांगून चित्रपटाचे सुमारे साठ टक्के चित्रिकरण पूर्ण झाले असल्याचेही मिलिंदने सांगितले.

‘मिस्टिकल, मॅजिकल महाराष्ट्र’ या पुस्तकाविषयी अधिक माहिती देताना त्याने सांगितले की, महाराष्ट्रातील गुढरम्य आणि चमत्कारिक स्थळांची माहिती आपण या पुस्तकात दिली आहे. माझ्या भटकंतीमध्ये मला राज्यात अशी अनेक स्थळे आणि ठिकाणे आढळली. त्या प्रत्येक ठिकाणाशी काही दंतकथा किंवा चमत्कार निगडित आहेत. मी स्वत: त्याचा अनुभव घेतला आहे. याला अंधश्रद्धा म्हणायचे की त्यामागील कार्यकारण किंवा विज्ञान शोधायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला जे दिसले, अनुभवायला मिळाले ते मी या पुस्तकात मांडले आहे.पुणे-सोलापूर रस्त्यावर यावत या ठिकाणी भुलेश्वर हे देऊळ आहे. या ठिकाणी शंकराची पिंड असून तेथे नैवेद्य म्हणून पेढे ठेवले की त्यातील काही आपोआप कमी होतात. याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. नांदेड येथे एक दर्गा असून तेथे स्वर येणारे दगड (सुरीला पाषाण) आहेत. त्या दगडांवर आघात केला की ‘सारेगमपधनीसा’हे स्वर ऐकू येतात. पुणे, सोलापूर, अहमदनगर, कोकण, उत्तर कोकण, दमण-दीव, लोणावळा, खंडाळा कर्जत, मुरबाड, नाशिक, सातारा, धुळे, अमरावती आदी परिसरातील विविध ठिकाणांचा यात समावेश आहे.


काही वर्षांपूर्वी ‘झी मराठी’ या वाहिनीवर झालेली ‘भटकंती’ ही मालिका खूप गाजली. आजही त्याचे जुने भाग प्रसारित करण्यात येत असतात. झी मराठीसाठीच मी आणि संतोष कोल्हे ‘डिस्कव्हर महाराष्ट्र’ ही नवी मालिका करतोय. पुढच्या आठवडय़ात आम्ही या मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात करत आहोत. ‘भटकंती’ मालिकेतून यापूर्वी येऊन गेलेल्या एक-दोन ठिकाणांचा अपवाद वगळता यात सर्व नवीन ठिकाणे असतील. महाराष्ट्रातील किल्ले, सागरी किल्ले, जंगले, समुद्रकिनारे अशा ठिकाणांचा यात समावेश असेल, असेही त्यांने सांगितले.

सध्याच्या तरुण पिढीमध्ये गड, किल्ले तसेच भटकंतीविषयी आवड निर्माण झालेली आहे. अनेक तरुणांचे ग्रुप शनिवार-रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी भटकंतीला बाहेर पडत असतात. त्यांच्यातील ही आवड नक्कीच कौतुकास्पद आहे. येत्या काही महिन्यात ‘खट्टामिठा’, ‘इडियट बॉक्स’ हे हिंदूी तर
 ‘जयमल्हार’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याचेही त्यांने सांगितले.
 
 
माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (२० जानेवारी २०१०, पान एक)  प्रसिद्ध झाली आहे. त्याची लिंक अशी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=41258:2010-01-19-15-23-43&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81

19 January 2010

लावणीचा ठसका

झी टॉकिजच्या नटरंग या मराठी चित्रपटातील लावण्यांमुळे पुन्हा एकदा लावणीचा ठसका अनुभवायला मिळाला आहे. त्याबद्दल संगीतकार अजय-अतुल आणि गीतकार गुरु ठाकुर हे खरोखरच अभिनंदानास पात्र आहेत. आज शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा, अप्सरा आली ही गाणी लोकप्रिय झाली आहेत. अनेकांच्या मोबाईलवर ही गाणी हमखास ऐकायला मिळतातच.


मराठी चित्रपट म्हणजे तमाशा आणि लावणी हे एकेकाळी समीकरण झालेले होते. किमान एखादी तरी लावणी मराठी चित्रपटात असायचीच. तर अनेक चित्रपट हे केवळ तमाशाप्रधान होते.  व्ही. शांताराम यांच्या पिंजरा या चित्रपटातील सर्वच गाणी अर्थात लावण्या गाजल्या. आज इतक्या वर्षांनंतरही त्या गाण्यांची गोडी कमी झालेली नाही. ढोलकीची कडकडीत थाप ऐकली की आपले पायही बसल्या जागी ताल धरून नाचायला लागतात. मरगळलेल्या मनाला एक नवा उत्साह आणि उभारी मिळते. अंगात जोश संचारतो. तुम्हाला असा अनुभव आला आहे की नाही. रेडिओ, दूरचित्रवाहिन्या किंवा मोबाईलवरती लावणीतील ढोलकीची थाप आणि तो  ठेका ऐकून आपणही नाचावे असे वाटते. कोणत्याही मराठी वाद्यवृंदात एखादी तरी लावणी असतेच असते. त्याच्याशिवाय तो कायर्क्रम होऊच शकत नाही. शाळा आणि महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनातही लावणीवर नाच असतातच.


नटरंगच्या निमित्ताने आता पुन्हा एकदा लावणी या गीत व नृत्य प्रकाराचे नव्या पिढीकडूनही स्वागत झाले आहे. गेल्या काही वर्षात नव्याने प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातील लावण्या या खूप गाजल्या. नवरा माझा नवसाचा मधील चला जेजुरीला जाऊ किंवा दे धक्का मधील उगवली शुक्राची चांदणी आणि अन्य काही लावण्या ही याची ठळक उदाहरणे म्हणता येतील. मराठी संगीत आणि संस्कृतीत लावणी या लोकप्रकाराला विशेष महत्व आहे. लावणीमध्ये फडाची लावणी, बैठकीची लावणी,
बालघाटी, छक्कड, सवाल -जबाब, कलगीतुरा असे काही प्रकार आहेत. यातील सवालजबाब, बैठकीची लावणी, फडाची लावणी आपण बरेचदा मराठी चित्रपटातून पाहिलेल्या आहेत. लता मंगेशकर यांनी म्हटलेली राजसा जवळी जरा बसा हा बैठकीची लावणी आहे. काही दिवसांपूर्वी मला वाटते दूरदर्शच्या सह्याद्री वाहिनीवर असेल, संगीततज्ज्ञ डॉ. अशोक रानडे यांचा एक कार्यक्रम पाहिल्याचे आठवते. त्यात त्यांनी लावणीचा इतिहास, लावणीचे विविध प्रकार हे सगळे सविस्तर सांगितले होते.


मराठी चित्रपटातून लावणी हा प्रकार अमाप लोकप्रिय झाला त्याचे सर्व श्रेय गीतकार, गायक आणि संगीतकार यांनाच आहे. सुलोचना चव्हाण, उषा मंगेशकर, आशा भोसले, लता मंगेशकर, उत्तरा केळकर, पुष्पा पागधरे आदींच्या अनेक लावण्या प्रसिद्ध आहेत. राम कदम, वसंत पवार, वसंत प्रभू हृदयनाथ मंगेशकर ते आत्ताच्या अजय-अतुल पर्यंत संगीतकारांचाही लावणी लोकप्रिय करण्यात मोठा वाटा आहे. शाहीर होनाजी बाळा, राम जोशी, पठ्ठे बापुराव आणि त्या पिढीतील मंडळींनी लावणीचा पाया घातला.  त्यानंतर ग. दि. माडगूळकर, जगदीश खेबुडकर आणि अन्य गीतकारांनी त्यावर कळस चढवला. तमाशाचे विविध फड, वग आणि त्यात काम करणाऱया कलाकारांनी लावणी जीवंत ठेवली आहे. अनेकांनी तर आपले सारे आयुष्य यात खर्ची घातले आहे.  नटरंगच्या निमित्ताने गुरु ठाकुर यांनी पुन्हा एकदा लावणी लोकप्रिय  केली आहे. मराठी माणूस आणि संस्कृती जोपर्यंत आहे, तोपर्यंत लावणी हा प्रकार आणि  लावणीचा पर्यायाने मराठी लोकसंगीताचा ठसका असाच अजरामर राहिल यात शंका नाही. 


  


 

18 January 2010

फोटो ब्लॉग

छायाचित्रण अर्थातच फोटोग्राफी ही एक कला असून त्याचा उपयोग म्हटले तर स्वत:च्या आनंदासाठी म्हणजेच छंद म्हणून आणि म्हटले तर पोटापाण्याचा व्यवसाय म्हणूनही करता येतो. वृत्तपत्रात तर छायाचित्राला अत्यंत महत्त्व आहे. वृत्तपत्राच्या प्रत्येक पानावर छायाचित्र असणे हे त्या पानाची सजावट आणि मांडणीच्या दृष्टीने तसेच वाचकांच्याही दृष्टीने आवश्यक असते.


असे म्हटले जाते की एखादी बातमी किंवा अग्रलेख जे परिणामकारतेने सांगू शकणार नाही ते एखादे छायाचित्र सहज सांगू शकते. त्यामुळेच वृत्तपत्रात छायाचित्र आणि छायाचित्रकाराला आजही महत्त्व आहे. सध्याचा जमाना हा संगणक, इंटरनेट क्रांतीचा असून त्यामुळे आपल्याला घरबसल्या हवे ते पाहणे, ऐकणे आणि कोणत्याही विषयावरील माहिती मिळवणे सहज शक्य झाले आहे. गुगल, याहू आणि अन्य संकेतस्थळांनी आपल्याला मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याच्या माध्यमातून आपण मेल आणि अन्य अनेक गोष्टी सहज साठवून ठेवत असतो. गेल्या काही वर्षांत यात आता विविध ब्लॉग्ज्ची भर पडली आहे. आपल्या मनातील विचार, भावना सहजपणे व्यक्त करण्याचे माध्यम या ब्लॉग्ज्ज्च्या स्वरूपात आज उपलब्ध झाले आहे. मराठी भाषेतही आज दीड हजारांहून अधिक लोक विविध विषयांवर ब्लॉगलेखन करीत आहेत. या ब्लॉगलेखनाप्रमाणेच आता फोटोब्लॉग ही संकल्पनाही हळूहळू वाढीस लागली आहे.


सध्या मोबाईल, डिजिटल कॅमेरे यामुळे कधी नव्हे ते फोटो काढणे सोपे झाले आहे. त्याच्या किंमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्यातील असल्याने पूर्वीचे रोल भरण्याचे कॅमेरे मागे पडून त्यांची जागा डिजिटल कॅमेऱ्यांनी घेतली आहे. कितीही फोटो काढा, एखादा फोटो चांगला आला नसेल तर लगेच डिलीट करा, काढलेला फोटो लगेच पाहा, आदींमुळे हे माध्यम खूप जवळचे आणि सोपे झाले आहे. आपल्या मनातील भावना किंवा विचार व्यक्त करण्यासाठी ज्याप्रमाणे ब्लॉग आहेत, तसेच आपण काढलेले फोटो कोणीही पाहू शकेल, त्यावर आपली प्रतिक्रिया देऊ शकेल, असे फोटोब्लॉग आज कोणालाही तयार करता येऊ शकतात.आपण गुगल व अन्य संकेतस्थळांच्या माध्यमातून ज्याप्रमाणे ई-मेल खाते किंवा ब्लॉग सुरू करतो त्याचप्रमाणे एखाद्याला फोटोब्लॉगही सुरू करणे सहज शक्य आणि सोपे झाले आहे. या ठिकाणी आपण आपला फोटोब्लॉग सुरू केल्यानंतर त्यावर आपल्याला फोटो अपलोड करता येऊ शकतात. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आपण अपलोड केलेली छायाचित्रे जगभरात कोणीही पाहू शकतो.

त्यावर आपली प्रतिक्रियाही देऊ शकतो. विविध विषयांचे वर्गीकरण येथे केलेले असते. आपल्याला ज्या विषयाची आवड आहे, त्या विषयातील फोटो आपण येथे पाठवू शकतो. गुगल, याहू, ऑर्कूट, फेसबुक, ट्वीटर आदी संकेतस्थळांवरही आपल्याला फोटो अपलोड करता येऊ शकतात. पण काही संकेतस्थळे अशी आहेत की, त्यावर फोटोब्लॉग आपल्याला सुरू करता येऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने लोकप्रिय असलेल्या संकेतस्थळांमध्ये http://www.aminus3.com/, http://www.myphotoalbum.com/ तसेच http://www.photoblogs.org/,
http://www.photographyblogs.com/,  blog.flickr.net, http://www.photoblogdirectory.net/
यांचा समावेश आहे. ब्लॉगला भेट देणाऱ्या लोकांना दररोज एक नवीन छायाचित्र पाहायला मिळते. आपण काढलेली छायाचित्रे ही आपल्यापुरतीच मर्यादित न राहता ती अशा संकेतस्थळांच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतात .


आज विविध संकेतस्थळावर असे फोटो ब्लॉग असले तरी त्यावर मराठी मंडळी तुलनेत कमी दिसतात. छायाचित्रांच्या बाबतीत ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे. फोटोब्लॉगच्या माध्यमातून हौशी, व्यावसायिक असे कोणीही आपल्या छायाचित्रांचा ब्लॉग सुरू करू शकतो. त्याला वयाचेही बंधन नाही. आपली कला आणि छायाचित्रण कलेतील कौशल्य हे आपल्या स्वत:पुरते किंवा कुटुंबीय मित्र आणि परिचितांपुरतेच मर्यादित न राहता अशा फोटोब्लॉग्ज्च्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तेव्हा आता फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांनी त्याचा जरूर फायदा करून घ्यावा.


याच विषयावरील माझा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (१६ जानेवारी २०१०) नध्ये पान क्रमांक एकवर प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=40643:2010-01-16-15-47-42&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81
 

17 January 2010

आरोग्यम ग्रंथसंपदा

लोकसत्ता, मुंबई वृत्तान्तमध्ये (१६ जानेवारी २०१०) पान क्रमांक एकवर या विषयावर मी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. सगळ्यांच्या माहितीसाठी आज तो लेख मी ब्लॉगवर देत आहे. 

आपले आरोग्य चांगले राखणे हे आपल्या प्रत्येकाच्याच हातात असते. सध्याच्या बदलत्या आणि स्पर्धात्मक जीवशैलीत आरोग्यासारख्या अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायलाही कोणाला वेळ नसतो. धावपळीचे जीवन, सततचा ताण-तणाव, वेळी-अवेळी खाणे यातून आपल्याला कधी ना कधी किरकोळ आजारांना सामारे जावे लागते. अशा किरकोळ आजारांकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा ते अंगावर काढतो. त्यातूनच मग अनेकदा साधे वाटणारे आजार गंभीर स्वरुप धारण करतात


. एखादे दुखणे गळ्यापर्यंत आले की मग आपण डॉक्टरकडे धाव घेतो. आपल्याला झालेल्या आजाराविषयीची माहिती घ्यायला सुरुवात करतो. पण असा एखादा आजार झाल्यानंतर त्याविषयी माहिती घेण्यापेक्षा आपल्या आरोग्याविषयी आपण सुरुवातीपासुनच जागरुक राहिलो आणि आजार होणार नाहीत, त्याची काळजी घेतली तर ते केव्हाही चांगले.सध्या इंटरनेट, दूरचित्रवाहिन्या आणि प्रसारमाध्यमांमुळे आपल्याला आरोग्यविषयक विविध माहिती सहज उपलब्ध होत आहे. मात्र त्यालाही काही मर्यादा आहेत. अशा वेळी आरोग्यविषयक पुस्तके, मासिके, सीडीद्वारे आरोग्यविषयक खूप माहिती आपल्याला मिळू शकते. आरोग्यविषयक पुस्तकांचा खजिना असलेले आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करणारे एक ग्रंथालय मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. डॉ. अनिरुद्ध आणि डॉ. अंजली मालपाणी यांनी हे ग्रंथालय काही वर्षांपूर्वी सुरु केले. काही वर्षांपूर्वी केम्स कॉर्नर येथे असलेले हे ग्रंथालय गेल्या चार वर्षांपासून तळमजला, नॅशनल इन्शुरन्स बिल्डिंग, डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग, एक्सलसिअर चित्रपटगृहाजवळ, फोर्ट (छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून चालत हुतात्मा चौकाकडे निघाले की सुविधा हॉटेलच्या जवळ) येथे येथे आहे.


 या ग्रंथालयाचे वैशिष्टय़ म्हणजे आरोग्यविषयक पुस्तके, मासिके आणि सीडीज्चा खजिना येथे उपलब्ध आहे. आरोग्यविषयक आस्था असलेली मंडळी किंवा एखाद्या आजाराबाबत माहिती घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना या पुस्तकांचा येथे मोफत लाभ घेता येऊ शकतो. या ठिकाणी दररोज तज्ज्ञ डॉक्टरांचीही व्याख्याने होत असतात, ती ही सर्वासाठी मोफत असतात.

ग्रंथालयाच्या व्यवस्थापक एव्हलिन या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाल्या की, सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहावे आणि त्यांना सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे ग्रंथालय मालपाणी दाम्पत्याने सुरु केले. सध्या हेल्थ एज्युकेशन लायब्ररी फॉर पिपल या स्वयंसेवी संस्थेकडून याचे व्यवस्थापन पाहिले जाते. इंग्रजी, हिंदी या भाषांसह मराठी भाषेतील दहा हजारांहून अधिक पुस्तके आमच्याकडे आहेत. तसेच आमचे संकेतस्थळही असून एका ब्लॉगच्या माध्यमातूनही आरोग्यविषयक माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आमच्या येथे विविध तज्ज्ञ डॉक्टरांची दररोज व्याख्याने होत असतात. त्याचे ध्वनिचित्रमुद्रण आम्ही करतो. त्या व्याख्यानांच्या सीडीज् येथे पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. पुस्तकांबरोबरच आमच्याकडे स्वतंत्र ऑडिओ व व्हिडिओ कक्ष असून त्याचाही लाभ लोकांना घेता येऊ शकतो.


येथील ग्रंथपाल तुषार झिंगडे यांनी सांगितले की, ग्रंथालयात येणाऱ्या लोकांना नेमक्या एखाद्या आजाराविषयी माहिती किंवा पुस्तके हवी असतील तर त्यांना ती पुस्तके सहज मिळतील, अशा प्रकारे ती ठेवण्यात आली आहेत. विविध आजार आणि त्यावरील पुस्तकांना काही संकेतांक देण्यात आले असून ते सर्वाना दिसतील, अशा प्रकारे लावण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही आजारावरील एखादे पुस्तक सहज मिळू शकते. ताण-तणाव, गर्भारपण, कर्करोग, मानसिक स्वास्थ्य, मधुमेह, हृदयविकार, लहानमुलांचे आजार, त्वचाविकार आणि अशा विविध विषयांचे वर्गीकरण येथे करण्यात आले आहे.

आमचे www.healthlibrary.com असे संकेतस्थळ असून त्यावरही विविध माहिती देण्यात आली आहे. तसेच www.helplibrary.blogspot.com असा इंग्रजीमधील आमचा ब्लॉगही असल्याची माहिती एव्हलिन आणि तुषार यांनी दिली.

सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसहा अशी या ग्रंथालयाची वेळ असून रविवार सोडून सोमवार ते शनिवार या दिवशी हे ग्रंथालय सुरु असते.

अधिक माहितीसाठी संपर्क दूरध्वनी

०२२-६५९५२३९३/६५९५२३९४/२२०६११०१

हा लेख वाचण्यासाठी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तची लिंक अशी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=40344:2010-01-15-15-17-59&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81

16 January 2010

चित्रपटाच्याच...घो

चित्रपटाच्या नावावरुन प्रसिद्धीच्या झोतात आलेला शिक्षणाच्या आयचा घो हा मराठी चित्रपट मुद्दामहुन टॉकीजमध्ये जाऊन पाहिला. चित्रपटातील कलाकारांच्या भूमिका आणि काही संवाद वगळता मला तरी चित्रपट फारसा प्रभावशाली आणि परिणामकारक  वाटला नाही. चित्रपटाचे शीर्षक बदलणार नाही, लोकांनी माझा चित्रपट पाहावा. मग त्यांनाच कळेल की चित्रपटाचे हेच शीर्षक कसे योग्य आहे, असे जाहीर वक्तव्य महेश मांजरेकर यांनी केले होते. चित्रपटाच्या उत्तरार्धात भरत जाधव यांनी प्रचलित शिक्षण पद्धतीवर कोरडे ओढले असून त्यांचे काही संवाद हे नक्कीच टाळ्याघेण्यासारखे झाले आहेत. मात्र  दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य, चित्रपट माध्यम म्हणून घेण्यात येणारे स्वातंत्र्य कितीही मान्य केले तरी ते ज्या प्रकारे आणि पद्धतीने दाखवले आहे ते फारसे पटत नाही. हा सर्व प्रकार तद्दन फिल्मी वाटतो.


चित्रपटाच्या मध्यतरानंतर भरत जाधव हे सर्वत्र प्रचलित शिक्षण पद्धतीच्या आयचा घो असे सांगत सगळीकडे फिरताना दिसतात. पण ही वेळ त्यांनी स्वतच आपल्या मुलावर आणलेली आहे. त्यांचा मुलगा हा अभ्यासात फारसा हुशार नाही, त्याला शिष्यवृत्ती परीक्षेला बसवू नका, असे शाळेचे प्राचार्य, शिक्षिका, शिकवणीच्या बाई सांगत असतात. तरीही भरत जाधव त्याकडे दुर्लक्ष करुन आपलेच म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करतात.  अभ्यास आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षेपायी ते मुलाचे क्रिकेट बंद करतात. हे सगळे त्यांना अगोदर कळत नाही का. चित्रपटातील भरत जाधव अर्थात राणे हे महापालिकेत नोकरी करत असल्याचे दाखवले आहे. महापालिकेत ते  क्लार्क असावेत, असे दिसते. महापालिकेत बरीच वर्षे नोकरी केलेल्या व्यक्तीचा पगार इतका कमी असू शकतो, हे पटत नाही.


राणे आणि त्यांचे मित्र चित्रपटातील बहुतेक प्रसंगात फक्त दारु पितांना दाखवले आहेत. ते ज्या चाळीत राहतात, तेथील लोक त्यांच्या या दारुकामाला आक्षेप घेत नाहीत का, एकीकडे मुलांवर संस्कार, अभ्यासातील हुशारी याबाबत सांगणारे राणे हे दारुच्या आहारी गेलेले किंवा रोज प्यायला बसणारे का दाखवले आहेत., तसेच दररोज दारु पितांना चर्चा करण्यापेक्षा कधी नुसतेच गप्पा मारताना दाखवले असते तर चालले नसते का, महापालिकेत क्लार्क म्हणून काम करणारा माणूस गाड्या पुसण्याचे काम करत असेल हेही पटत नाही.  व्हाईट कॉलर गुंडाकडून प्रत्येकवेळी व्याजाने पैसे घेण्यापेक्षा राणे हे ऑफिसातून का कर्ज घेत नाहीत, चित्रपटाच्या मध्यंतरानंतर राणे यांच्यात झालेले परिवर्तन हे अचानक झाल्यासारखे वाटते. त्यांची भाषणबाजी, शाळेच्या वर्गात जाऊन बोलणे, स्टार माझा या वृत्तवाहिनीवर जाणे,  स्टार माझा या वाहिनीवर शालेय पुस्तके दर दोन वर्षांनी बदलणे व त्यात असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणे, त्यासाठी राणे यांना गुंडांकरवी मारहणार होणे, राणे मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी जागा विकताहेत म्हटल्यानंतर त्यांचा भाऊ व बहिणाने घरी येऊन आपला हिस्सा मागणे हे सगळे मुद्दामहुन आणि ओढूनताणून आणल्यासारखे वाटते. किमान आधी त्यांच्या भावाच्या स्वभावाबद्दल काही संवाद किंवा प्रसंग दाखवायला त्यांची प्रवृत्ती कशी आहे, हे समोर यायला हवे होते.


मुळात राणे यांनी शिक्षक, शाळेचे प्राचार्य, मुलाचे क्रिकेटचे प्रशिक्षक यांचा सल्ला मानला असता तर ही वेळच आली नसती. राणे हे कधीही अगोदर मुलांचा अभ्यास घेताना दाखवलेले नाहीत एकदम शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा अभ्यास घेताना आणि मुलाला पाढे येत नाहीत म्हणून प्रचंड मारहाण करताना दाखवले आहेत.   चित्रपटाच्या शीर्षकावरुन जर वाद झाला नसता तर कदाचित सध्या चित्रपट पाहण्यासाठी जी गर्दी होत आहे किंवा लोकांच्या मनात जी उत्सुकता निर्माण झाली आहे, ती कदाचित झाली नसती. तसेच सध्या होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, आमीर खानचा थ्री इडियट चित्रपट याचाही मांजरेकर यांच्या या चित्रपटाला मोठा फायदा होत आहे. चित्रपटात जे दाखवले आहे ते तद्दन फिल्मी वाटते. त्यात वास्तवता जाणवत नाही. भरत जाधव यांचे दात खाऊन बोलणे आता नेहमीचे झाले आहे. मी शिवाजीराजे बोलतोय या चित्रपटात सिद्धार्थ जाधव याने रंगवलेला खलनायक हा खलनायक न वाटता विनोदी वाटला होता. मुळात तो त्या भूमिकेत शोभून दिसला नव्हता. या चित्रपटात तो विनोदी वाटत नाही.


चित्रपटातील काही संवाद मात्र खटकेबाज  आहेत. पडद्यावर ते पाहताना सहज टाळ्या पडतात. सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य या मुलांनी सहज अभिनय केला असून तो उत्स्फूर्त वाटतो. क्रांती रेडकरी ठिक. महेश मांजरेकर यांनी ज्या प्रकारे चित्रपटाची जाहिरातबाजी केली त्यावरुन सध्याची शिक्षणपद्धती, त्यामुळे मुलांवर होणारे परिणाम, याबद्दल काही वेगळे पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण चित्रपट पाहून मला तरी तो फुसका बार वाटला. आता नाव बदलण्यावरुन झालेल्या स्टंटचा फायदा कदाचित चित्रपटाला होईलही.


 शिक्षणपद्धती, शिक्षण, मुलांचा अभ्यास, त्यांचे भावविश्व  या विषयावर यापूर्वीही काही चित्रपट येऊन गेले आहेत. दहावी फ हे त्यातले पटकन आठवणारे नाव. तो चित्रपटही चांगला होता. प्रौढ साक्षरतेवर सई परांजपे यांनी तयार केलेला अंगुठाछाप ही खास सई परांजपे टच असलेला होता. काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवरुन सादर झालेली संस्कार ही मालिकाही उत्कृष्ट होती. त्यातही सध्याची शिक्षणपद्धती, सध्याचे शिक्षक, त्यांचे स्वभाव, शिकविण्याची पद्धत, मुलांचे भावविश्व परिमाणकारतेने उलगडण्यात आले होते.  महेश मांजरेकर यांचा हा चित्रपट त्यात बसत नाही, असे वाटते.
          

15 January 2010

प्रसिद्धी हव्यास

मराठी चित्रपटाच्या नावावरुन किंवा त्यात दाखविण्यात आलेल्या व्यक्तीरेखांवरुन वाद होण्याचे प्रसंग तसे विरळा. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय वातावरण अवधुत गुप्ते यांच्या झेंडा आणि महेश मांजरेकर यांच्या शिक्षणाच्या आयचा घो या दोन चित्रपटांनी ढवळून निघाले होते. आता हे आपसूक घडले की घडवून आणले किंवा हा सगळ्या चित्रपटाला आयती प्रसिद्धी मिळण्यासाठी केलेला प्रसिद्धी हव्यास होता.

सेन्सॉर मंडळाकडून एखादा चित्रपट, त्याचे शीर्षक, संवाद किंवा दश्ये संमत झाली की अन्य सामाजिक संस्था किंवा राजकीय पक्षांनी चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शकावर आपली राजकीय सेन्सॉरशिप लादणे कितपत योग्य आहे. म्हणजे चित्रपटात  आपल्या बाजूने असेल तर चित्रपटाला हिरवा कंदिल आणि विरोधात असेल तर त्याला विरोध असे करणे कितपत योग्य आहे. झेंडा या चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व शिवसेना यांना झुकते माप दिल्यामुळे  आणि राज ठाकरे यांना कमी लेखल्यामुळे शिवसेनेने चित्रपटाला हिरवा कंदिल दिला पण याच्या उलट झाले असते तर शिवसेनेने हा चित्रपट इतक्या सहजतेने प्रदर्शित होऊ दिला असता का तर याचे उत्तर नाही असेच आहे.


या चित्रपटातील सदा मालवणकर या पात्राचे आता नाव बदलून आणि त्याच्या तोंडचे मालवणी संवाद मराठीत करून हा चित्रपट आता प्रदर्शित करण्यात येणार आहे. हे संवाद किंवा व्यक्तीरेखेचे नाव बदलून काय फायदा झाला. लोकांना जे माहिती आहे, त्यात काही बदल होणार आहे का, मध्यंतरी याच संदर्भात अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेल्या वक्तव्याची बातमी वाचनात आली. झेंडा या चित्रपटात सदा मालवणकर हे पात्र दारू पिणारे दाखवले आहे, म्हणजे मग प्रत्यक्षात नारायण राणे हे दारू पितात हे विरोध करणाऱया स्वाभीमान्यांना मान्य आहे का, असा सवाल पोंक्षे यांनी विचारला. मुळात एखादा चित्रपट सेन्सॉरसंमत झाल्यानंतर अशा प्रकारे राजकीय सेन्सॉरशिप घालणे हे चुकीचे असून त्यामुळे चुकीचा पायंडा पाडला जात आहे.


इकडे महेश मांजरेकर यांनीही मी चित्रपटाचे नाव बदलणार नाही त्यापेक्षा मी महाराष्ट्र सोडेन असे वक्तव्य केले होते. खरे तर मराठा महासंघानेही चित्रपटाच्या नावाला विरोध करण्याचे काहीच कारण नव्हते. हा चित्रपट मांजरेकर यांनी अचानक प्रदर्शित केलेला नाही किंवा नाव अचानक दिलेले नाही. यापूर्वीही वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमातून चित्रपटाविषय़ी आणि या नावाविषयी येऊन गेले होते. मग मराठा महासंघाने त्याच वेळी याला आपला विरोध का दर्शवला नाही, चित्रपट प्रदर्शित होण्यास काही दिवस राहिलेले असताना हा विरोध का केला, चित्रपटाचे नाव बदलणार नाही असे सांगणाऱया मांजेरकर यांनी चित्रपटाच्या प्रत्येक खेळापूर्वी चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल दिलगिरी व्यक्त करू, असे सांगितले आणि हा वाद मिटला की मिटवला. मांजरेकर हे आपल्या मुद्द्यावर जर ठाम होते तर त्यांनी या तोडग्यालाही का मान्यता दिली. म्हणजे केवळ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हे सर्व केले गेले का.


अनेक वर्षांपूर्वी आलेल्या सखाराम बाईंडर या नाटकाबद्दलही त्या वेळेस शिवसेनेने आक्षेप घेऊन ते नाटक बंद पाडले होते. गेल्या वर्षी संतसूर्य तुकाराम या कादंबरीत तुकाराम यांच्याविषयायी अपशब्द आणि त्यांचा अपमान करणारा मजकूर असल्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पुस्तकाचे लेखक डॉ. आनंद यादव यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लागला होता. येथे गोष्ट वेगळी होती. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज या सारख्या लोकोत्तर आणि समाजात आदर असणाऱया व्यक्तींबद्दल मुळात असे लिहावे का, लेखनस्वातंत्र्याचा आदर राखुनही असे म्हणावेसे वाटते की खरे तर मोठ्या व्यक्तींच्या जीवनातील  अशा गोष्टी जरी खऱया असल्या तरी त्या लेखनातून का मांडाव्यात, समजा मांडल्या गेल्या तर आंदोलने, किंवा तोडफोड करुन हा प्रश्न सुटणार आहे का, त्यापेक्षा त्याला प्रत्युत्तर म्हणून वेगळे पुस्तक लिहावे किंवा पुरावे मांडून ते म्हणणे खोडून काढावे. पण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे राजकारण केले जाते. तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्यासाठी सारेच पुढे सरसावतात.


चित्रपट किंवा एखाद्या पुस्तकातून कधी आणि केव्हा व कोणाच्या भावना दुखावतील, याचेही आता राजकारण झाले आहे. समाजातील सुजाण नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक व कलाकार यांनीही एकत्र बसून याचा सामापचाराने विचार केला पाहिजे. अर्थात व्यक्तीस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली एम. एफ. हुसेन यांच्या सारखी माणसे हिंदू देवदेवतांचा अपमान करणार असतील, त्यांचे विटंबन करून, त्यांना नग्न स्वरुपात दाखवून आपली कला लोकांपुढे आणणार असतील किंवा जाहिरातींच्या माध्यमातून असे विडंबन होणार असेल तर अशा प्रवृत्तींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे धाडस पोलीस आणि शासनाने दाखवले पाहिजे.  हे प्रकार फक्त हिंदू देवदेवतांच्याच बाबतीत का घडले जातात की मुद्दामहुन घडवून आणले जातात. ख्रीश्चन किंवा मुसलमान धर्माच्या बाबतीत असे करण्याची मुळात कोणी हिंमत दाखवत नाही आणि चुकून असे घडले तर सर्व सहानुभूती, कायदे हे तेव्हा त्यांच्या बाजूने असतात. हे योग्य नाही. यात बदल झाला पाहिजे.

    
आयचा घो हा शब्द यापूर्वीही काही गाण्यातून आलेला होता. तेव्हा त्याला विरोध का झाला नाही, आत्ताच तो कऱण्याचे काय कारण होते, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. तेव्हा विनाकारण  अशा प्रकारे राजकीय दबाव आणि सेन्सॉरशिप आणून राजकारण करणाऱया संस्था, संघटना आणि व्यक्तींना पोलिसी हिसका दाखवून कठोर कारवाई केली गेली पाहिजे. तरच असे प्रकार घडणार नाहीत आणि याला कुठेतरी पायबंद बसू शकेल. नाहीतर आज शिवसेना/भाजपचा पाठिंबा तर उद्या त्यांचा विरोध. आज कॉंग्रेस/राष्ट्रवादीचा विरोध तर भविष्यात पाठिंबा, असे नेहमीच घडत राहील. त्याला कधीतरी आळा बसणार आहे की नाही...                    

14 January 2010

प्रामाणिकतेची हत्त्या

विविध घोटाळे, राजकारणी आणि शासकीय अधिकाऱयांचे गैरव्यवहार तसेच अन्य माहीतीच्या अधिकाराअंतर्गत बाहेर काढणारे प्रामाणिक व निर्भिड सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी  यांच्या हत्येची बातमी आजच्या वृत्तपत्रात आल्या आहेत. शेट्टी यांच्यासारख्या कार्यकर्त्याची झालेली ही हत्या समाजासाठी निर्भिडपणे काम करणाऱया अन्य लोकांसाठी मोठा धक्का असून ही हत्या म्हणजे प्रामाणिकता, निर्भिडतेवर झालेला नियोजित आणि अमानुष असा हल्ला  आहे. 


भ्रष्टाचार निर्मूलन हा एक आता धंदा झाला असून माहितीच्या अधिकाराचा धाक दाखवून मध्यस्ती व सेटलमेंट करणारी काही मंडळी समाजात आपल्याला पाहायला मिळतात. या कायद्याचा वापर करुन शासकीय अधिकारी, पोलीस यांना ब्लॅकमेल करण्याचेही तंत्र काही जणानी अवलंबले आहे. म्हणजे सर्वसामान्यांसाठी तयार करण्यात आलेला हा कायदा या मंडळींमुळे बदनाम झाला आहे. अर्थात सर्वच मंडळी अशा प्रकारची सेटर आहेत, असे नाही. त्यातही समाजासाठी निस्पृह व निर्भिडतेने काम करणारेही काही जण आहेत. मंजुनाथ षण्मुगम, सत्येंद्रनाथ दुबे ही नावे अशाच प्रामाणिक आणि निस्पृहपणे काम करणाऱया कार्यकर्त्यांची. त्यांनी उघड केलेला भ्रष्टाचार हा राष्ट्रीय पातळीवरचा आणि मोठा असा होता. षण्मुगम यांनी पेट्रोलियम कंपन्यांचा तर दुबे यांनी राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येणारा भ्रष्टाचार बाहेर काढला.      


हत्या झालेले सतीश शेट्टी यांचे कामही राज्य आणि स्थानिक पातळीवर मोठे होते. हजारो एकर शासकीय जमिनीच्या परस्पर खरेदी-विक्रीचा घोटाळा, शिधावाटप दुकांवरील रॉकेलचा काळाबाजार आणि भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे त्यांनी उघडकीस आणली. अशी प्रकरणे उघडकीस आणणारे लोक हे शासकीय अधिकारी, पोलीस, राजकारणी यांना नकोसे असतात. त्यामुळे त्यांना संपविण्यासाठी राजकारणी, गुंड, पोलीस अशी अभद्र युती नेहमीच होत असते. अशा प्रकारचे हल्ले झाल्यानंतर किंवा हल्ल्यात असा प्रामाणिक कार्यकर्ता मरण पावल्यानंतर राजकीय नेते मानभावीपणे प्रतिक्रिया देत असतात. मराठी किंवा हिंदी चित्रपटांमधूनही आपण ते पाहिले आहे. अशा प्रकरणी खरे गुन्हेगार कधीच सापडत नाहीत. लोकांपुढे डमी गुन्हेगार आणले जातात. कारवाई करण्याचे नाटक केले जाते आणि काही दिवसांनंतर सर्वजण झालेले विसरुन जातात आणि तेथेच राजकारणी नेते, राजकीय पक्ष, शासकीय अधिकारी यांचे फावते.


खरे म्हणजे अशा प्रकरणात कोणीही आणि कितीही मोठा गुन्हेगार असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण आपल्याकडे तसे कधी घडणार नाही. राजकीय लागेबांधे, राजकीय नेत्यांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा,  भ्रष्ट पोलीस आणि शासकीय अधिकारी यांचे संबंधच अशा घटनांना कारणीभूत असल्याचे उघड सत्य सगळ्यानाच माहिती असते. क्वचित अशा एखाद्या दुर्घटनेनंतर समाजात मोठे आंदोलन किंवा लढा उभा राहतो. प्रसारमाध्यमेही काही दिवसांपुरता हा विषय लावून धरतात. पुन्हा एखादे नवे प्रकरण घडले की जुने विसरले जाते. त्याप्रमाणे अशा घटनांचा प्रसारमाध्यमांकडूनही पाहिजे त्या प्रमाणात पाठपुरावा केला जात नाही.


अशा प्रकरणी दोषी असलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत असेच घडत राहणार. प्रामाणिक, निस्पृह आणि समाजासाठी काम करणाऱऱया लोकांच्या हत्या होणे, त्यांच्यावर हल्ले करुन त्यांना कायमचे अपंग करणे,  असे घडतच राहणार. कारण ते जे काम करत असतात ते राजकारणी, शासकीय अधिकारी आणि पोलीस यांच्यासाठी तोट्याचे असते. आपल्या मार्गात येणाऱयांचा काटा कसा दूर करायचा हे या मंडळींना चांगलेच माहिती असते. हे चित्र कधी बदलणार, अशा घटनांनतर प्रामाणिकपणे काम करणाऱया लोकांचे मनोधैर्य खच्ची होत असते आणि तेच काहीजणांना हवे असते हे आपलेच नव्हे तर समाजाचेही दुर्दैव आहे.             

13 January 2010

नॅबचे ब्रेल साप्ताहिक

वाचन हा कधीही, कुठेही आणि केव्हाही जोपासता येणारा छंद असून सुजाण आणि सुबुद्ध व्यक्तीला वाचनातून खूप आनंद मिळत असतो. अर्थात डोळे असूनही अक्षरशत्रू असणारी  आणि डोळे नसूनही वाचन करणारी, करवून घेणारीही मंडळीही कमी नाहीत. दृष्टीहीन अर्थात अंध व्यक्ती या ब्रेल लिपीमार्फत किंवा अन्य डोळस व्यक्तींकडून वाचून घेऊन आपली वाचनाची आवड पूर्ण करत असतात. आता अंध व्यक्तीनाही ताज्या घडामोडी आणि अन्य साहित्य वाचण्याचा आनंद घेता यावा, त्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड अर्थातच नॅबने मराठीत ब्रेल साप्ताहिक सुरु केले आहे. अशा प्रकारचे हे भारतातील पहिलेच साप्ताहिक असल्याचा नॅबचा दावा आहे.


नॅबतर्फे मराठी भाषेत पूर्वीपासूनच अंधांसाठी स्पर्शज्ञान आणि हिंदी भाषेत वर्तमान हे पाक्षिक चालविण्यात येत आहेच. त्यात आता ब्रेल साप्ताहिकाची भर पडली आहे. वर्तमानाचे भान राखत अंध व्यक्तींना स्पर्शज्ञानाद्वारे वाचनाचा आनंद मिळवून देण्यासाठी हे साप्ताहिक जानेवारी महिन्यापासून सुरु करण्यात आले आहे. पहिल्या अंकाला अंध व्यक्तीकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नॅबच्या मंडळींचा उत्साह वाढला असून सध्यातरी ना नफा ना तोटा या तत्वावर हे साप्ताहिक चालविण्यात येत असल्याची माहिती नॅबचे संचालक रमणशंकर यांनी दिली.खरे म्हणजे अशा साप्ताहिकाची गरज होतीच. नॅबकडून पाक्षिके चालविण्यात येण्यात येत असली तरी पंधरा दिवसांचा हा कालावधी तसा खूप मोठा वाटतो. त्यामुळे दर आठवड्याला काहीतरी नवीन मजकूर देण्याचा प्रयत्न या ब्रेल साप्ताहिकाच्या माध्यमातून केला जाणार आहे. साप्ताहिकाच्या एका अंकाची किंमत दहा रुपये असलून वार्षिक वर्गणी पाचशे रुपये इतकी आहे. नॅबचे स्वताचे मुद्णालय असल्यामुळे साप्ताहिकाला मागणी वाढली तरी आम्ही ती पूर्ण करू शकू, या साप्ताहिकातील सर्व मजकूराचे संकलन नॅबचे मनाद सचिव आनंद आठलेकर करणार असल्याचेही रमणशंकर यांनी सांगितले.


साप्ताहिकाचे निश्चित असे स्वरुप ठरविण्यात आलेले नाही. एखादा अंक संपूर्णपणे राजकारण या विषयावर असेल तर कधी क्रीडा, विज्ञान, मनोरंजन, सामाजिक, आरोग्य असेही विविध विषय हाताळण्यात येतील. कधी मराठी वृत्तपत्रातील अग्रलेखही देण्याचा विचार असल्याचे रमणशंकर म्हणाले.


या साप्ताहिकाची पृष्ठसंख्या सुमारे वीस इतकी असेल. या ब्रेल साप्ताहिकामुळे अंध व्यक्तीनाही आपले हक्काचे साप्ताहिक उपलब्ध झाले आहे. त्यामुळे अंध व्यक्तीही आता वाचनाचा आणि ताज्या घडामोडींचा निर्भेळ आनंद घेऊ शकणार आहेत.ब्हेल साप्ताहिकाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क
रमणशंकर (संचालक-नॅब)-०९९२०१५८३७५ 

12 January 2010

नटरंगचे रंग दिसलेच नाहीत

झी टॉकीजच्या नटरंग या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत अनेक वर्षांच्या कालावधीनंतर एक उत्कृष्ट तमाशापट तयार झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांच्याच नटरंग या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. तमाशातील नाच्या ही भूमिका रंगविणाऱया नटाच्या वाट्याला येणारे दुख, मानहानी, त्याचा जीवनसंघर्ष यात मांडण्यात आला आहे. चित्रपटातील अतुल कुलकर्णी यांच्यासह सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. अजय-अतुल यांचे संगीत, महेश लिमये यांचे कॅमेरामन म्हणून असलेले काम, रवींद्र जाधव यांचे दिग्दर्शन, बेला शेंडे व अजय-अतुल यांचे पार्श्वगायन, गुरु ठाकूर यांचे संवाद व गीते आदी सर्वच उत्तम. एक चांगली कलाकृती प्रेक्षकांसमोर आली आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.


गुणा पैलवान याला तमाशाचे वेड असते. त्या वेडापायी तो घराकडेही नीट लक्ष देत नाही. तमाशाचा फड/वग उभा करण्याच्या जिद्दीने तो घरही सोडतो आणि आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने पिळदार शरीर कमी करुन, मिशी उतरवून अखेर नाच्याची भूमिका करायलाही तयार होतो. त्यात तो यशस्वीही होतो. पण नाच्या म्हणून काम करताना होणारी अवहेलना, घरच्यांकडून केली जाणारी निर्भत्सना, नाच्या म्हणजे तो तसाच असणार अशा शब्दात त्याची केली जाणारी टवाळी, प्रत्यक्षात तमाशाचा फड उभा केल्यानंतर त्याला येणारे विविध अनुभव, नाच्याबरोबर संपूर्ण आयुष्य कसे काढायचे म्हणून नयनाने दिलेला नकार, अरे मी खऱा पुरुषच आहे, पण परिस्थितीमुळे ही भूमिका करायला लागली असल्याबद्दलचे त्याचे सांगणे आदी सर्व गोष्टी चित्रपटातून चांगल्या पद्धतीने दाखवल्या आहेत.


पण नाच्यावर झालेला बलात्कार, वृत्तपत्रातून त्या संदर्भात आलेल्या बातम्या, बायको, सासरा आणि पोटच्या मुलाकडून झालेला अपमान, दोन राजकारण्यांच्या भांडणातून त्यांच्या तमाशाची झालेली वाताहत, सहकाऱयांनी सोडलेली साथ यातूनही हा नाच्या एका जिद्दीने पुन्हा चित्रपट, नाटक या क्षेत्रात आपले नाव मोठे करतो, इतके मोठे करतो की त्याला आजवरच्या कारकिर्दीचा सन्मान म्हणून जीवनगौरव पुरस्कारानेही गौरविण्यात येते. मात्र चित्रपटाचा हा शेवट अवघ्या काही मिनिटात गुंडाळला गेला आहे. नाच्या म्हणून सर्व अपमान आणि अवहेलना झाल्यानंतरही हा नाच्या ज्या जिद्दीने पुन्हा नव्याने सुरुवात करतो, तो संघर्ष काही प्रसंगातून चित्रपटात यायला पाहिजे होता असे वाटते. मात्र हे सगळे एका गाण्याच्या कडव्यातून सांगण्यात आले आहे. त्यात नाच्याने केलेल्या वेगवेगळ्या भूमिका, वृत्तपत्रातून त्याच्याविषयी प्रसिद्ध झालेल्या बातम्या उडतउडत दाखवल्या गेल्या आहेत. नाच्या म्हणून बसलेला शिक्का पुसून टाकण्यासाठी त्याने केलेले परिश्रम, नाच्याखेरीज साकार केलेल्या आणि प्रेक्षकांनीही गौरवलेल्या त्याच्या अन्य भूमिका, त्या त्याने कशा केल्या, त्यासाठी कसे परिश्रम घेतले हे यायला पाहिजे होते. तसे झाले असते तर खऱया अर्थाने नटरंग या शीर्षकाला साजेसे नाच्याच्या जीवनातील विविध रंग, त्याचे कलागुण दिसून आले असते.


डॉ. आनंद यादव यांची मूळ कादंबरी मी वाचलेली नाही. मूळ कादंबरीतही नाच्या म्हणून झालेली अवहेलना आणि अपमान यातून जिद्दीने उभ्या राहिलेल्या त्या कलाकाराचा प्रवास दाखवला आहे की नाही ते माहिती नाही. पण कादंबरीत जरी नसता तरी चित्रपटात तो दाखवायला हवा होता, असे वाटते. अतुल कुलकर्णी यांनी गुणा पैलवान आणि नाच्या या दोन्ही भूमिका उत्कृष्टपणे सादर केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, भूमिकेची केलेली तयारी याबाबत प्रसारमाध्यमातून बरेच काही येऊन गेले आहे. प्रत्येक कलाकाराचेच अशा प्रकारची आव्हानात्मक भूमिका एकदा तरी करण्याचे स्वप्न असते. अतुल कुलकर्णी यांना ती संधी मिळाली. या भूमिकेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत, अभिनय याबाबत संपू्र्ण आधर राखत एक गोष्ट जी मला खटकली ती सांगतो. अतुल कुलकर्णी यांची ग्रामीण बोली ग्राणीण ढंगातील वाटत नाही. तसेच नाच्या झाल्यानंतर त्यांचे बोलण्यात  बायकी सहजता जाणवत नाही. आता त्यांना खरोखऱच तसे बोलता आले नाही की एका पैलवनाचा नाच्या झाल्यामुळे मुद्दामहून तसे दाखवले आहे ते माहिती नाही.


तमाशामध्ये नाच्या हा पाहिजेच, हा नयनाच्या आईचा हट्ट हा जितक्या प्रभावीपणे समोर यायला पाहिजे होता, तसा तो येत नाही. तसा एखादा प्रसंग दाखवायला हवा होता. किंवा नाच्या नसला तर काय बिघडते,  तो नसला तरी तमाशा चालवता येईल,  असे गुणाच्या तोंडी एक वाक्य आहे. गुणा व नयनाच्या तमाशाला प्रसिद्धी मिळाल्यानंतर बऱयाच वर्षांनी गुणाला आता आपण नाच्यासोडून राजा किंवा अन्य भूमिका कराव्यात असे वाटल्याचे दाखवले आहे. हेच गुणाला अगोदर म्हणता आले असते, तसे तो का म्हणत नाही, कारण त्याचे लेखन आणि लावण्यांवरच त्यांच्या फडाला लोकप्रियता मिळाली असल्याचे पांडोबा, नयनाची आई यांचे म्हणणे असल्याचे चित्रपटात दाखवले आहे. मग गुणाही आपण नाच्याची भूमिका करणार नाही, असे अगोदर ठामपणे  का सांगत नाही किंवा  नाच्या म्हणून आपली अवहेलना होत आहे, हे समजल्यानंतरही तो यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना का दाखवला नाही,हे कुठेतरी अगोदर समोर यायला पाहिजे होते. मात्र ते येते चित्रपटाच्या शेवटाकडे. गुणाचे वडील गेल्यानंतरचा प्रसंग किंवा नयनाबरोबरच्या काही प्रसंगात, त्याचे चालणे, बोलणे यात पुरुषीपणा दिसत नाही. तो नाच्याच्याच भूमिकेत दिसतो. म्हणजे गुणा आपले पुरुषपण विसरुन नाच्या हीच भूमिका वास्तव जीवनातही जगत असतो का,  ढोलकीवाला त्याच्यावर जबरदस्ती करण्याच्या प्रसंगात गुणामधील पुरुषीपणा दाखवला आहे.  नाच्यावर होणाऱया बलात्काराच्या प्रसंगातही तो त्याचा प्रभावीपणे विरोध करताना दाखवलेला नाही. कार्यक्रमाची सुपारी मिळविण्यासाठी गुणाला नाच्या म्हणून का पुढे केले आहे,  असे काही प्रश्न मनात उभे राहतात.  म्हणजे तो केवळ तमाशात नाच्या आहे की वास्तव जीवनातही तो तसाच झाला आहे, याचा गोंधळ उडालेला दिसतो. 


असो, असे असले तरी या निमित्ताने तमाशातील नाच्या या कलाकाराचे दुख मोठ्या पडद्यावर आले आहे. मराठीत पूर्वी अनेक तमाशाप्रधान चित्रपट तयार झाले. त्यातील अनेक गाजलेही. तमाशाप्रधान मराठी चित्रपट हे एकेकाळी सुवर्णयुग होते. नटरंगच्या निमत्ताने कदाचित यापुढे आणखी काही अशा विषयावरील मराठी चित्रपट तयार होतील,  चित्रपटातील मला जाऊ द्या की घरी आता वाजले की बारा, अप्सरा आदी लावण्या लोकप्रिय झाल्या आहेत. आता पुढेही मराठी चित्रपटातून पुन्हा नव्या लावण्या  ऐकू येतील. तसे झाले तर ते नटरंगचेच यश असेल. पुन्हा एकदा नटरंगच्या सर्व टीमचे आणि कलाकारांचे अभिनंदन...                                

11 January 2010

नाहक वाद

आमीर खानची प्रमुख भूमिका असलेल्या थ्री इडियट्स हा चित्रपट सध्या चर्चेत आणि वदाता सापडला आहे. मुंबई आणि परिसरात सध्या विद्यार्थ्यांच्या ज्या आत्महत्या घडत आहेत, त्यास हा चित्रपट कारणीभूत असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. चित्रपटात रॅगींग दाखविण्यात आलेले रॅगिंग, चित्रपटात एका विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या आणि अन्य काही बाबी या खटकणाऱया असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. हा चित्रपट मी ही पाहिला. परंतु चित्रपटात कुठेही रॅगींगचे उदात्तीकरण करण्यात आलेले नाही. तसेच चित्रपटापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आत्महत्या कराव्यात, असे या चित्रपटात काहीही नाही, असे मला वाटते. या चित्रपटाचे प्रदर्शन आणि सध्या होणाऱया आत्महत्या  हा निव्वळ योगायोग आहे समजा आत्ता हा चित्रपट प्रदर्शित झाला नसता तर कदाचित या आत्महत्यांना या चित्रपटाला जबाबदार धरले गेले नसते. चित्रपटावरुन वाद निर्माण करण्यासारखे किंवा त्यावर बंदी घालण्यासारखे काहीही आक्षेपार्ह असे या चित्रपटात नाही.


चित्रपटातील रॅगींगची दृश्ये काही जणांना आक्षेपार्ह वाटू शकतील. परंतु चित्रपटात जे दाखवले आहे, त्यापेक्षाही भयानक आणि अश्लील प्रकारे सिनिअर्स विद्यार्थ्यांकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांचे रॅगींग केले जाते. मेडिकल आणि अभियांत्रिकी महाविद्यालये, हॉस्टेल येथे ते नियमित घडत असते. कधी वृत्तपत्रांच्या माध्यमातून असे प्रकार सगळ्यांना माहिती होतात. मुळात अशा प्रकारे रॅगींग करणे हेच चुकीचे आहे. नव्या विद्यार्थ्यांची थोडक्यात गंमत केली तर ठिक आहे. पण थोडक्यात गंमत आणि रॅगींग यातील अंतर कधी पुसले जाते, हेच गंमत करणाऱयांना कळत नाही. कधी तर असे प्रकार मुद्दामहून केले जातात.


त्यामुळे थ्री इडियट्समध्ये जे दाखवले आहे, ते नेहमीच आपल्या आजूबाजूला घडणारे आहे. त्यात नवीन काही नाही. आता कोंबडी आधी की अंडे आधी त्याप्रमाणे समाजातील घटनांचे प्रतिबिंब चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून उमटते की यात जे दाखवतात त्याचे अनुकरण समाज करत असतो हा नक्कीच वादाचा मुद्दा होऊ शकतो. चित्रपटात आमीर खानची व्यक्तिरेखा जे सांगतेय तेही काही चुकीचे नाही. आजच्या शिक्षणपद्धतीत आपण केवळ यांत्रिकपद्धतीने विद्यार्थी घडवत आहोत, केवळ पुस्तकी आणि परीक्षेतील मार्क म्हणजे त्या मुलाची/मुलीची हुशारी असेच आपण समजत आहोत. दहावी, बारावी तर जाऊ दे पण अगदी त्या खालच्या वर्गातूनही मुलांमध्ये आपण जीवघेणी स्पर्धा आज पाहतो आहोत. सगळेच रॅटरसेमध्ये आहेत. आपला मुलगा मेडिकल किंवा इंजिनिअरिंगलाच जायला पाहिजे, असा सगळ्या पालकांचा तरी अट्टाहास का, आपल्या इच्छा आपण का म्हणून मुलांवर लादायच्या, असे अनेक प्रश्न आजही समाजात चर्चिले जात आहेत. शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ आणि मान्यवर, मानसोपचार तज्ज्ञ यांनीही अभ्यास आणि मिळणारे यश यातील ही जीवघेणी स्पर्धा चुकीची असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे.
शी

थ्री इडियट्समधील आमीर खान तेच तर सांगतोय असे म्हणतात की एखादी गोष्ट किंवा सल्ला शिक्षक, आई-वडील किंवा मोठ्या माणसांनी दिला तर तो मुलांच्या पचनी पडत नाही. पण चित्रपट, नाटक किंवा एखाद्या मोठ्या सेलिब्रेटीकडून जर असा सल्ला दिला गेला तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम दिसून येतो. चित्रपटाच्या द्वारे आमीर तेच सांगतोय. आई-वडिलांनी आपल्या इच्छा मुलांवर लादू नका, त्याला ज्या विषयात आवड असेल तो विषय आणि तो अभ्यासक्रम त्याला करिअर म्हणून निवडू द्यावा. मुलांनीही आपले पालक, शिक्षक यांच्याशी मोकळेपणाने बोलावे, पालकानाही आपल्या मुलांना नेहमी विश्वासात घ्यावे. काहीही झाले तरी आपण आपल्या जीवाचे बरेवाईट करणार नाही, असे वचन आमीरखान चित्रपटातील आर. माधवनकडून घेतो. त्यासाठी त्याच्या पाकिटात त्याच्या आई-वडिलांचा फोटो ठेवतो आणि आत्महत्येचा विचार मनात आला तर पहिल्यांदा आई-वडिलांच्या या फोटोकडे पाहा, असा सल्ला तो देतो.


आजची शिक्षणपद्धती, रॅगींग आणि अन्य संबंधित विषय यात मनोरंजकतेने हाताळले आहेत. खरे तर आत्महत्येसारखा विचार मनात येण्यापूर्वी आपल्या पाल्याने किमान आपल्याशी बोलावे इतका विश्वास आपण त्याच्या मनात निर्माण केला पाहिजे. आणि जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे निराशेने न पाहता आनंदाने पाहायला शिकले पाहिजे. अधाशी आणि असमाधानी वृत्ती सोडून जे मिळाले  आहे त्यात आनंद मानायला शिकले पाहिजे. नेहमी आपल्यापेक्षा वरच्या माणसांकडे पाहण्यापेक्षा आपल्यापेक्षा जे काही पायऱया खाली आहेत, त्यांच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. जीवनाकडे नेहमी आशेने, आनंदाने पाहायला शिकले पाहिजे. हे जीवन खूप सुंदर आहे.


मराठीतील एक ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची एक सुंदर कविता मला या ठिकाणी आठवतेय. सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत. खूप सुंदर कविता आहे. खरे तर प्रत्येकानेच ती आपल्या मनावर कोरुन ठेवायला पाहिजे.  सगळ्यांसाठी मी ती कविता येथे देत आहे.


तेव्हा विचार करा आणि आपल्या मनाशी ठरवा...     

सांगा कस जगायचं?

कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!


डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुमच्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!


काळ्याकुट्ट काळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!


पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!


पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

-मंगेश पाडगावकर.

      

10 January 2010

साम्य- ज्ञानेश्वर आणि प्लेटो यांच्या तत्वज्ञानातील

संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील तर प्लेटो हा ग्रीक तत्ववेत्ता. दोघांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि भाषाही वेगळी. पण तरीही त्यांच्या विचारात आणि तत्वज्ञानात साम्य आहे, असे सांगितले तर कदाचित त्यावर पटकन विश्वास बसणार नाही. पण आता या दोघांचे तत्वज्ञान आणि विचार यांचे साम्य व तुलना करणारा ग्रंथच अभ्यासक आणि संशोधकांसाठी उपलब्ध झाला आहे. त्या ग्रंथात या दोघांच्या तत्वज्ञानातील साम्य उलगडण्यात आले आहे..


ज्ञानेश्वरांनी निष्काम कर्मयोगाचा सिद्धांत मांडला आहे. माणूस आत्मसाक्षात्कारी किंवा ज्ञानी झाल्यानंतर त्यांने तेवढय़ावर थांबू नये किंवा ते ज्ञान स्वत:पुरतेही ठेवू नये. या ज्ञानाचा फायदा समाजासाठी करावा, असे ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. तसाचा विचार प्लेटोनी मांडला आहे. त्यासाठी त्यांनी एक रुपक कथा सांगितली आहे.

एका गुहेत काही लोकांना कोंडून ठेवलेले असते. त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क नसतो. गुहेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या एका पडद्यावर त्यांना बाहेरील जगातील माणसांच्या सावल्या फक्त दिसत असतात. गुहेत कोंडून ठेवलेल्यांपैकी एक माणूस तेथून बाहेर पडतो आणि बाहेरचे जग, वास्तवातील माणसे त्याला पाहायला मिळतात. आपण गुहेतून फक्त माणसांच्या सावल्या पाहात होतो, आता प्रत्यक्ष माणसे पाहतोय हे ज्ञान त्याला गुहेच्या बाहेर पडल्यानंतरच होते. आता त्या माणसाने गुहेतील माणसांना बाहेरच्या जगासंबंधीचे त्याला माहिती झालेले ज्ञान सांगितले पाहिजे. ते त्याचे कर्तव्य आहे.

ज्ञानेश्वरांचा निष्काम कर्मयोग आणि प्लेटोची ही रुपककथा यात जसे साम्य आहे तसेच ते ‘आत्मा अमर आहे’ या समजुतीबाबतही दोघांमध्ये आहे. माणसाचे निधन झाल्यानंतर त्याचे शरीर दहन किंवा दफन केले जाते. शरीर नष्ट झाले तरी माणसाचा आत्मा अमर असल्याचे भारतीय संस्कृती मानते. ज्ञानेश्वरानीही आत्मा अमर असल्याचे मानले आहे. प्लेटोनेही पुढे तोच विचार मांडला आहे.

प्लेटोचे गुरु सॉक्रेटिस यांना विषप्राशन करण्याचा प्रसंग जेव्हा घडला तेव्हा तेव्हा प्लेटो तेथे उपस्थित होते. विषप्राशन करायला लावणाऱ्या लोकांनी सॉक्रेटिस यांना आता तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुमच्या शरीराचे काय करायचे, असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी माझ्या शरीराचे काही करा. मेल्यानंतर शरीर नष्ट झाले तरी आत्मा अमर राहणार असल्याचे उत्तर दिले होते पुढे प्लेटोनेही याचेच समर्थन केले आहे.. ज्ञानेश्वर आणि प्लेटो यांचे विचार आणि तत्वज्ञानातील साम्य असलेली ही केवळ दोन ठळक उदाहरणे. पुणे येथील शिक्षण प्रसारक मंडळी यांनी पुनर्मुद्रीत केलेल्या ‘ज्ञानेश्वर आणि प्लेटो’ या पुस्तकातून या दोघांचे विचार आणि तत्वज्ञान अशा विविध उदाहरणातून ज्ञानेश्वरीचे अभ्यासक दिवंगत सोनोपंत ऊर्फ मामासाहेब दांडेकर यांनी उलगडून दाखविले आहेत.

दिवंगत सोनोपंत ऊर्फ मामासाहेब दांडेकर यांनी काही वर्षांपूर्वी पुण्यात एका व्याख्यानमालेत या विषयावर सलग तीन दिवस व्याख्याने दिली होती. त्या व्याख्यानांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले असून ज्ञानेश्वर आणि प्लेटो यांचे विचार आणि तत्वज्ञानातील साम्य या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडण्यात आले आहे. शिक्षण प्रसारक मंडळी व स.प. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी कौशिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत असते. चाळीस वर्षांपूर्वी आयोजित या व्याख्यानमालेत सोनोपंत दांडेकर यांची ‘ज्ञानेश्वर आणि प्लेटो’ या विषयावर व्याख्याने झाली होती. त्याचे संकलन असलेले पुस्तक शिक्षण प्रसारक मंडळींतर्फे १९६७ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. संत साहित्याचे अभ्यासक, मराठी साहित्याचा अभ्यास करणारे पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त होते. गेल्या अनेक वर्षांपासून पुस्तकाची आवृत्ती संपल्यामुळे ते अभ्यासकांसाठी दुर्मिळ होते. पुस्तकाचे महत्व लक्षात घेऊन शिक्षण प्रसार मंडळी संस्थेने ते पुनर्मुद्रीत करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती स.प. महाविद्यालयाचे निवृत्त सहाय्यक ग्रंथपाल वसंत गाडगीळ यांनी दिली.
 
 
 शिक्षण प्रसारक मंडळींतर्फे स. प. महाविद्यालयात सोनापंत दांडेकर यांच्या नावाने एक अध्यासन केंद्र सुरु करण्यात आले आहे. डॉ. प्रकाश सोमण हे त्याचे समन्वयक म्हणून काम पाहतात. पुनर्मुद्रीत करण्यात आलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्यांची मोलाची मदत झाली आहे. या पुनर्मुद्रीत पुस्तकाला आचार्य किशोर व्यास यांची प्रस्तावना आहे. सुमारे दोनशे पानांच्या या ग्रंथात संत ज्ञानेश्वर आणि प्लेटो यांच्या विचारांची तुलना असून या दोघांचा जीवन आणि तत्वज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, तत्वज्ञानासंदर्भातील त्यांचे विचार याचे विवेचन करण्यात आले आहे.
 
 
 अभ्यासकांनी पुस्तकासाठी श्रीपाद तपस्वी यांच्याशी ९९६०५५८७०३ या क्रमांकावर किंवा बुकपॉइंट, देशमुखवाडी, सदाशिव पेठ, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

09 January 2010

पदयात्रा अर्थात चालणे

पंढरीची वारी करणाऱया मंडळींमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुशिक्षित मंडळीही सहभागी होऊ लागली आहेत. यामध्ये तरुणांचाही सहभाग वाढला आहे. वारीचा एकदा तरी अनुभव घेण्याची माझीही इच्छा आहे. पाहू या कधी योग येतो तो. पंढरीच्या वारीप्रमाणेच हल्ली अनेक संस्था, मंडळे शिर्डी, शेगाव आदी ठिकाणीही पदयात्रा आयोजित करत असतात. त्याचेही प्रमाण वाढले असून या पदयात्रेतही मोठ्या प्रमाणात तरुण, सुशिक्षित मंडळी सहभागी होत आहेत.


आपण राहतो त्या ठिकाणापासून पायी शिर्डीला किंवा आपण ठरवू त्या ठिकाणी  चालत जाणे, म्हणजे पदयात्रा. मधुमेह झालेल्या रुग्णांना औषधोपचाराबरोबरच भरपूर चालण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मधुमेही क्लब अथवा मंडळांतर्फेही इतक्या मोठ्या नाही पण एक दिवसात सहज चालून जाता येईल, इतक्या अंतरावर एखादी फेरी आयोजित केली जाते. देवस्थानाच्या ठिकाणी आयोजित केलेल्या पदयात्रेत सहभागी झालेली मंडळी ही धार्मिक उद्देशाने व त्या दैवतावरील श्रद्धेने सहभागी झालेली असतात. यात तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरिकही उत्साहाने सहभागी होतात. शारिरिक क्षमता, मनाची जिद्द आणि अतुट श्रद्धेच्या जोरावर पदयात्रेतील मंडळी यशस्वीपणे पदयात्रा पूर्ण करत असतात.


पहाटे लवकर उठून चालायला सुरुवात करणे, दिवस मावळेपर्यंत जेवढे चालणे शक्य असेल तितके चालणे आणि रात्रीच्या वेळेस धर्मशाळा, शाळा किंवा देवळात तर कधी उघड्यावर मुक्काम करणे असा या मंडळींचा दिनक्रम असतो. दररोज २५ ते ३० किलोमीटर चालायचे, उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवलेले असते. त्यामुळे साहजिकच आठ ते दहा दिवसात पदयात्रा पूर्ण होते. आपल्या नेहमीच्या रुटीनपेक्षा काहीतरी वेगळे म्हणूनही काही जण पदयात्रेत सहभागी होत असतात. अनेक संस्था आणि मंडळे आपल्या बरोबर स्वयंपाक, नाश्ता, चहापाणी करण्यासाठी खास आचारी ठेवतात तर काही मंडळी मुक्कामाला थांबल्यानंतर आपला स्वयंपाक करतात.


चालण्यासारखा चांगला व्यायाम नाही, असे डॉक्टरलोकही सांगतात. सध्याच्या काळात स्वताचे दोन चाकी किंवा चारचाकी वाहन, रिक्षा, बेस्ट, सायकल यामुळे आपल्या सर्वांचेच चालणे खूप कमी झाले आहे. कधी कधी आश्चर्य वाटते की पूर्वीच्या काळी वाहतुकीची विशेष साधने नसताना त्या लोकांनी प्रवास कसा केला असेल. काशीयात्रा, चारधाम यात्रा आता खूप सोपी झाली आहे. पण काही वर्षांपूर्वी चालून ती पूर्ण करणे किती त्रासदायक असेल, त्याची केवळ आपण कल्पनाच करु शकतो. संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम,  समर्थ रामदास स्वामी आणि अन्य अनेक संतांनीही महाराष्ट्र व देशभर भ्रमण केले. त्यांचा काळ तर आणखीनच कठीण. तरीही पायी फिरून त्यांनी भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचा प्रसार केला. समाजातील अनिष्ट रुढी आणि परंपरा नाहीशा करण्यासाठी लोकांचे प्रबोधन केले.  त्यांचे हे कार्य खूप मोठे आहे.


या मंडळींच्या तुलनेत आज आपण इतके फिरूही शकणार नाही. पण तरीही कधी संधी मिळाली तर अशी पदयात्रा जरुर करावी. त्या निमित्ताने आपण काही दिवस एका वेगळ्या वातावरणात असतो. आजूबाजूची गावे, त्यातील नागरिक, चालीरिती आणि समाजाचे जवळून दर्शन होते. त्यातही आपण आपली ओळख काही काळ तरी विसरतो नव्हे ती पदयात्रेत विसरली पाहिजे. स्वावलंबनाचे, आपली कामे आपण करण्याचे  धडे गिरवले जातात, नवीन ओळखी होतात आणि आपणही अनुभव समृद्ध होतो. अर्थात हे करत असताना आपल्या तिथे जाण्याने स्थानिक नागरिकांना आपला त्रास होणार नाही, त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपले वर्तन, बोलणे हे कोणाला त्रास होणार नाही, असे असले पाहिजे.


मला स्वतालाही चालायला खूप आवडते. नवीन शहरात गेल्यानंतर किंवा मी राहतो तिथेही मी सगळीकडे चालतच फिरतो. तर कधी मुद्दामहून एखाद्या लांबच्या ठिकाणी (फार नाही आठ ते दहा किलोमीटर) चालत जातो. त्यातन एक वेगळाच आनंद मिळतो. पहाटेच्या वेळेस फिरण्यातील आनंद तर काही वेगळाच असतो. प्रसन्न वातावरण, पक्षांचा किलबिलाट, रस्त्यावर माणसे आणि वाहनांची नसलेली वर्दळ यामुळे मन अधिक प्रसन्न होते आणि संपूर्ण दिवस उत्साहात  जातो.        
 

08 January 2010

गप्पा विंदांशी...

पुणे येथे येत्या मार्च महिन्यात होणाऱया ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्ञानपीठ पुरस्कारविजेते मराठीतील ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या हस्ते होणार आहे. लोकसत्ताच्या प्रतिनिधी म्हणून मला या निमित्ताने विंदांची भेट घेऊन त्यांच्याशी गप्पा करता आल्या. विंदांचे वय आज ९२ वर्षे आहे, वयोपरत्वे आता मला जास्त वेळ बोलणे आणि बसणे शक्य होत नाही. त्यामुळे पाच ते दहा मिनिटेच मी बोलू शकेन. चालेल ना. मराठी साहित्यातील एका उत्तुंग व्यक्तिमत्वाबरोबर पाच ते दहा मिनिटे का होईना आपल्याला बोलायला मिळते आहे, हा एक चांगला योग होता. मी त्यांना हो म्हटले आणि बुधवारी सकाळी विंदांच्या घरी ही भेट ठरली.  

विंदांशी वांद्रे येथील साहित्य सहवासमधील त्यांच्या निवासस्थानी मी बरोबर साडेअकरा वाजता पोहोचलो. घरी स्थानापन्न झाल्यानंतर पाढंराशुभ्र लेंगा व हाफ कु़डते अशा वेशात विंदा हॉलमध्ये प्रवेश करते झाले. गप्पांच्या सुरुवातीला साहित्य संमेलनाचे उद््घाटन तुमच्या सारख्या कवीच्या हस्ते होत आहे, ही चांगली सुरुवात असल्याचे सांगून मी बोलायला सुरुवात केली. त्यावर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी राजकारणी किंवा मंत्र्यांना बोलाविण्याची आजवरची परंपरा होती. माझ्यामुळे ती आता मोडली जाणार असल्याचे ते मिश्कीलपणे म्हणाले.


हा योग कसा जुळून आला, त्याबाबत विचारले असता विंदा म्हणाले की, संमेलन आयोजकांनी प्रत्यक्ष भेटून साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याची विनंती केली. मी त्यांना सांगितले की, उद्घाटन कार्यक्रमाला भाषण वगैरे करणार नाही. काव्यवाचन करेन आणि तेच संमेलनाचे उद्घाटन असेल. तुम्हाला चालेल का? संमेलन आयोजकांनीही त्यास मान्यता दिल्यामुळे मी या आमंत्रणाचा स्वीकार केला.माझ्याच काही कवितांचे वाचन मी या वेळी करणार असून तो कार्यक्रम म्हणजेच साहित्य संमेलनाचा उद््घाटन सोहळा असेल. आता वयोपरत्वे काव्यवाचनाचे कार्यक्रम मी करत नाही. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्याचा एक मोठा सोहळा असतो. हजारो रसिक, वाचक आणि साहित्यप्रेमी तेथे उपस्थित असतात. हे साहित्य संमेलन आपल्या मराठी भाषेचे, वाङ्मयाचे असते. त्यामुळे मराठी भाषेसाठी कर्तव्य म्हणून या वयात मी संयोजकांचे हे आमंत्रण स्वीकारले, असेही विंदानी सांगितले.


पूर्वी मी अडीच ते तीन तास इतका वेळ काव्यवाचनाचे कार्यक्रम करत असे. आता वयोपरत्वे इतका वेळ बसणे, बोलणे शक्य होत नाही. तरी उद्घाटनाच्या कार्यक्रमात अर्धा ते पाऊतास मी काव्यवाचन करेन. कोणत्या कविता वाचायच्या, ते ठरवले आहे का, असे विचारले असता, विंदा म्हणाले की, असे काही ठरवलेले नाही. ज्या नेहमी वाचतो आणि सगळ्यांना माहितीच्या आहेत, त्या कविता सादर करेन.


गप्पांच्या ओघात आपण चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी डोंबिवली पूर्वेला असलेल्या सरखोतांच्या चाळीत राहात होतो. माझी पत्नी सुमा तेव्हा कल्याणला शाळेत नोकरी करत होती आणि मी नोकरीसाठी मुंबईला येत होतो. काही महिने आम्ही डोंबिवलीला राहिलो. त्यानंतर एका कार्यक्रमाच्या निमित्तानेही मी डोंबिवलीला आलो होतो, अशा आठवणीनाही विंदानी या वेळी उजाळा दिला.


सध्या नवीन काही लिखाण करता का, या प्रश्नावर ते म्हणाले की, नाही हो, नवे लेखन करणे काही वर्षांपूर्वीच थांबवले. त्यामुळे सध्या नवीन कविता लेखन काही नाही. दिवाळी अंकातून माझ्या काही कविता येत असल्या तरी त्या जुन्याच असतात. खरे सांगू का ओढूनताणून अवसान आणायला मला पटत नाही. तो खोटेपणा वाटतो.विंदांनी भेटण्यासाठी पाच ते दहा मिनिटांचाच वेळ दिला होता. गप्पांच्या ओघात वेळ संपत आली तेव्हा त्यांनीच त्यांच्या परखड स्वभावानुसार त्याची जाणीव करुन दिली. वयोपरत्वे आता फार वेळ बोलता आणि बसता येत नाही, म्हणूनच वेळेची ही मर्यादा घालावी लागते असे सांगून मी आता थोडा वेळ विश्रांती घेतो असेही ते प्रांजळपणाने सांगून टाकतात. वयोपरत्वे ते थकले असले, आवाजही थोडा हळू झाला असला तरी त्यांचे विचार व मूल्यांतील ठामपणा आणि नवीन काही करण्याची जिद्द, गप्पा मारण्याचा उत्साह आजही कायम आहे. त्याची प्रचिती या गप्पांमधूनही येत होती.गप्पांचा समारोप करताना विंदानी ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ ही आपली गाजलेली कविता त्याच उत्साहात आणि खणखणीत आवाजात म्हटली आणि मराठी साहित्यातील एका उत्तुंग व्यक्तिमत्वाशी झालेली ही छोटेखानी भेटही लाखमोलाची ठरली...
 
 
विंदाशी झालेल्या या गप्पांच्या आधारे मी केलेली बातमी लोकसत्ता, ७ जानेवारी २०१०च्या मुख्य अंकात पान क्रमांक चारवर प्रसिद्ध झाली आहे. त्या बातमीची लिंक अशी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=37830:2010-01-06-16-59-51&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104

07 January 2010

पुरस्काराचा आनदं आणि समाधान वेगळेच

राज्य शासनातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱया लता मंगेशकर पुरस्कारासाठी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांची निवड झाली आहे. त्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला होता. ती बातमी लोकसत्ता (मुंबई) ७ जानेवारी २०१० च्या अंकात पान क्रमांक पाच वर प्रसिद्ध झाली आहे. आज ती बातमी मी येथे देत आहे. 

‘लता मंगेशकर’ हे नाव पाश्र्वगायनाच्या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वअसून या नावाची खरी ओळख त्यांचा सुमधुर आवाज ही आहे. ज्या सुमधुर आवाजासाठी हे नाव प्रसिद्ध आहे, त्या लतादीदींच्या नावाचा पुरस्कार मला जाहीर झाला, त्याचा आनंद आणि समाधान काही वेगळेच असल्याची भावना सुमन कल्याणपूर यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.


राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आणि त्यांच्या चाहत्यांना मनापासून आनंद झाला. आपल्या गोड गळ्याने गेली अनेक वर्षे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या या गायिकेचा या पुरस्काराने योग्य सन्मान झाला असल्याची प्रतिक्रिया सर्वस्तरातून उमटली.गेल्या काही वर्षांपासून पाश्र्वगायन आणि प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर असलेल्या सुमन कल्याणपूर या निमित्ताने पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आल्या.

पुरस्कारासाठी सुमन कल्याणपूर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आज सकाळपासूनच त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरचा दूरध्वनी सतत खणखणत होता. काहींनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या सर्व गडबडीत सुमनताई आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या की, गेली अनेक वर्षे मी भावगीते, भक्तीगीते, चित्रपटांसाठी पाश्र्वगायन केले आहे. रसिकांच्या उदंड प्रेमामुळे आणि देवीच्या आशीर्वादामुळे मी हे योगदान देऊ शकले. राज्य शासनाने माझ्या या योगदानाची दखल घेऊन लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड केली त्याचा आनंद होतोय. मनात आनंद आणि एक वेगळेच समाधान आहे..

काही महिन्यांपूर्वी सुमन कल्याणपूर यांच्या ‘सुमनसुगंध’ या आत्मचरित्राचे प्रकाशन रवींद्र नाटय़ मंदिर येथे झाले होते. नवचैतन्य प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून त्याचे शब्दांकन मंगला खाडिलकर यांनी केले आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमनताई बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर रसिकांसमोर आल्या होत्या. त्यावेळी भाषण न करता त्यांनी त्यांची गाजलेली काही मराठी आणि हिंदी गाणी गाऊन तर काही गुणगुणून उपस्थित रसिकांना एक वेगळाच आनंद दिला होता. या वयातही त्यांच्या गोड गळ्यातून उमटलेले स्वर रसिक आणि सुमनताईंच्या चाहत्यांना सुखावून गेले होते. त्यावेळी सुमनताई यांनी पुन्हा पाश्र्वगायनाकडे वळावे, अशी जाहीर विनंती त्यांना करण्यात आली होती.

तो संदर्भ घेऊन या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्याशी बोलताना त्यांना, पुन्हा पाश्र्वगायनाकडे वळण्याचा विचार आहे का, किंवा कोणाकडून तशी विचारणा झाली आहे का, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, रसिकांचा आग्रह हा शिराधार्थ आहे. रसिकांच्या प्रेमामुळेच मी आत्तापर्यंत जे काही गायले ते त्यांनी उचलून धरले. पण खरे सांगू का, आत्ता सध्या तरी पाश्र्वगायन करण्याचा कोणताही विचार नाही. पण मंत्र, स्तोत्रे, देवीच्या आरत्या अशा काही प्रासादिक रचना किंवा भक्तीगीते असलेल्या गाण्यांबद्दल विचारणा झाली तर मी त्यावर जरुर विचार करेन.

देवीवर माझी खूप श्रद्धा असून तिच्या कृपाआशीर्वादामुळेच मला हा आवाज मिळाला आहे. तो मी रसिकापर्यंत सुगम आणि चित्रपट संगीताच्या माध्यमातून पोहोचवला. देवीच्या कृपेमुळे पुन्हा अशी संधी चालून आली, मला पाश्र्वगायन करण्याची बुद्धी दिली तर कदाचित पुन्हा गाईनही, असेही कल्याणपूर यांनी सांगितले.‘सुमनसुगंध’ या आत्मचरित्राविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, या पुस्तकाच्या निमित्ताने माझे जीवनचरित्र, माझ्याबद्दलची सविस्तर माहिती, छायाचित्रे लोकांपर्यंत पोहोचली. गेल्या काही वर्षांपासून मी पाश्र्वगायन आणि प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर असलल्याने माझ्याबद्दलही फारशी माहिती नव्हती. ती या पुस्तकामुळे सगळ्यांना कळली. पुस्तकात माझी गाणी, पुरस्कार यांची यादी देण्यात आली आहे. मात्र काही पुरस्कार व गाण्यांचा समावेश राहून गेला आहे. आता दुसऱ्या आवृत्तीत त्या माहितीचा समावेश करण्याचा प्रयत्न करु. पुस्तकाला रसिक, साहित्यप्रेमी आणि आपल्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिली आवृत्ती आता संपत आल्याचेही त्या म्हणाल्या. विविध दूरचित्रवाहिन्यांवर सध्या सुरु असलेले संगीताचे कार्यक्रम, स्पर्धात्मक शो याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आजच्या पिढीला अशा माध्यमातून लोकांपुढे येण्याची संधी मिळतेय ही चांगली गोष्ट आहे. मात्र या मुलांनी मिळालेल्या प्रसिद्धीबरोबरच वाहावत न जाता संगीताचा आणि आपला शालेय-महाविद्यालयीन अभ्यासही पुढे सुरु ठेवावा, असा सल्लाही सुमनताईंनी दिला.याच अनुषंगाने अन्य काही प्रश्न त्यांना विचारले असता, त्या विनयाने म्हणाल्या की, अहो ही तर मुलाखतच व्हायला लागली. सध्या आपण फक्त मिळालेल्या पुरस्कारावरील माझी प्रतिक्रिया एवढय़ापुरतेच बोलू या. उगाच मी काहीतरी बोलायचे आणि नाहक नवा वाद निर्माण व्हायचा. त्यापेक्षा पुन्हा बोलू या कधीतरी. एका वृत्तपत्रात आज प्रसिद्ध झालेल्या बातमीत सुमनताईंचे आडनाव आणि जन्मठिकाण चुकीचे छापून आले आहे. त्याबद्दलही त्या व्यथीत झाल्या होत्या. त्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली. बोलण्याच्या शेवटी मिळालेल्या पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा त्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले..

05 January 2010

मन करा रे प्रसन्न

मुंबई आणि डोंबिवलीतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी कोणाही सुजाण आणि संवेदनशील  माणसाचे मन हळहळल्यावाचून राहणार नाही. सातवी, सहावी आणि एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱया या मुलांनी आपले जीवन संपवले. परिक्षेत चार विषयात नापास झाला म्हणून एकाने, तर नृत्याचा क्लास बंद करुन अभ्यासाकडे लक्ष द्यावे, असे घरच्यांनी सांगितले म्हणून एका मुलीने आणि दोन विषयात नापास झाल्यामुळे एमबीबीएस करणाऱया एका तरुणीने आत्महत्या केली. अशा प्रकारच्या दुर्देवी घटना अधूनमधून आपल्या सभोवताली घडत असतात. आपण त्या वाचतो आणि सोडून देतो. साध्या आणि क्षुल्लक वाटणाऱया या घटनांमध्ये या मुलांनी आयुष्य संपविण्याचा इतका टोकाचा निर्णय का घेतला हे कळत नाही.


परीक्षेतील किंवा प्रेमातील अपयश, नोकरीतील जाच, वरिष्ठांचा त्रास, मानहानी, अपेक्षित यश न मिळणे, नोकरीच नसणे, सततचे आजारपण, घरातील भांडणे आणि कटकटी, कुटुंबातील बेबनाव, सर्व क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा, जीवनातील नैराश्य आदी आणि या सारख्या काही कारणांमुळे आत्महत्या करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. याला केवळ त्या व्यक्ती जबाबदार आहेत की आजूबाजूचा समाज, बदलती जीवनशैली, सभोवतालचे वातावरण, प्रसारमाध्यमे, हिंदी चित्रपट, मालिका, परस्परातील हरवलेला संवाद, अधिकाधीक मिळविण्याचा हव्यास, कोणत्याही गोष्टीत समाधान नसणे आदीही घटक त्यास कारणीभूत आहेत. खऱेतर आपण सर्वानीच याचा गंभीरपणे विचार करण्याची आज वेळ आली आहे.


बहुतेक घरातून आई-वडील नोकरीसाठी बाहेर आणि घरात मुले एकेकटी असे चित्र दिसते. करिअर आणि नोकरी, पैसा यातून पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. घरातील सदस्यांमध्ये संवाद नाही. मित्र, चित्रपट, हिंदी मालिका, मौज, मजा आणि मस्ती असे एक चित्र हल्लीच्या मुलांमध्ये दिसून येत आहे. अर्थात याला काही अपवाद असतीलही. लाहनसहान कारणा वरुन चिडचिड करणे, मोठ्यांचे न ऐकणे, आपलेच म्हणणे खरे करणे, शिक्षण आणि करिअरच्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाटेल ते करणे असेही काही जणांच्या बाबतीत घडते. कदाचित अशा काही घटनांमधून मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असेल. आपण अपेक्षित यश मिळवले नाही, अभ्यासात मागे राहिलो तर आई-वडील ओरडतील, ही भीती कदाचित मुलांच्या मनात असेल.


खरे म्हणजे आपण अजूनही जो मुलगा अभ्यासात हुशार तोच श्रेष्ठ, या मानसिकतेतून बाहेर पडलेलो नाही. सध्याच्या जगात चांगली नोकरी मिळविण्यासाठी अभ्यास आणि किमान पदवी पर्यंतचे शिक्षण आणि त्यानंतर काही अभ्यासक्रम करणे आवश्यकच आहे. पण एखाद्या मुलाला अभ्यासात गती नसेल, त्याची आवड नसेल पण तो अन्य एखाद्या कलेत निष्णात असेल, त्यात तो अन्य अभ्यासू मुलांपैक्षा जास्त हुशार असेल, तर त्यात चुकीचे काय आहे. त्याला त्या विषयाच पुढे येऊ द्या. त्याच्यातील सुप्तकलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यात त्याला यशाचे शिखऱ गाठू द्या, बिघडले कोठे. पण तसे घडत नाही,. कधी कधी आई-वडिलांच्या इच्छेखातर मुलांना आवड आणि कुवत नसतानाही कॉमर्स, मेडिकल, किंवा इंजिनिअरिंगला पाठवले जाते. का, त्याला त्याचा आवडीचा विषय निवडू द्या ना. आपल्या इच्छा त्यांच्यावर आपण का लादतो.


खरे म्हणजे आपल्या मुलाचा नेमका कल आणि आवड लक्षात घेऊन त्याला त्याचा मार्ग निवडू द्यावा. परिक्षेतील यश म्हणजे सर्वस्व नाही किंवा तो जीवनमरणाचा प्रश्न नाही, परमेश्वराने दिलेला माणसाचा जन्म असा अविचाराने एका क्षणात वाया घालवू नका, कोणत्याही अपयशाने निराश न होता झाले ते झाले, अजून वेळ गेलेली नाही, पुन्हा प्रयत्न करु या, असे या मुलांवर बिंबवण्याची गरज आहे.  बाहेरच्या जगात जे काही घडेल, त्यामुळे निराश आणि वैफल्यग्रस्त न होता पहिल्यांदा तुझ्या मनात जे काही आहे, ते आमच्याशी किंवा घरातील मोठ्या माणसांशी, बरोबरीच्या मित्रांशी मोकळेपणाने बोल, अशी शिकवण मुलांना द्यायला पाहिजे. पालकांनी तसा विश्वास आपल्या मुलांमध्ये निर्माण करायला पाहिजे.  एखाद्यापाशी आपले मन मोकळे केले की मनावरचा ताण आणि दडपण, नैराश्य नाहीसे होते, याचे बाळकडून लहानपणापासूनच आपल्या मुलांना द्या.


यश हे सर्वस्व नाही. ते मिळाले तरी आनंद आणि नाही मिळाले तरी आनंद, जे मिळाले असेल त्यात समाधानी राहायला शिका. आपल्यापेक्षा वरती असलेल्या माणसाकडे पाहण्यापेक्षा जो माणूस आपल्यापेक्षा एक पायरी खाली आहे, त्याच्याकडे पाहा. जगण्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. प्रत्येक घराघरांमधून तसे वातावरण निर्माण होण्याची गरज आहे. तसे झाल तर अशा घटना टाळता येऊ शकतील.  हे जीवन सुंदर आहे, ते क्षुल्लक कारणावरुन संपवू नका...

04 January 2010

नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा

आज पुन्हा एकदा नर्मदे परिक्रमेविषयी. सुहास लिमये लिखित नर्मदे हर हर नर्मदे हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. गेल्या काही महिन्यात नर्मदा परिक्रमेवरील जी जी पुस्तके मिळाली ती मी वाचून काढली आहेत. बॅंकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर लिमये यांच्या मनात नर्मदा परिक्रमेचा विचार आला आणि तो त्यांनी जिद्दीने तडीसही नेला. लिमये हे पुण्याचे असून ते आणि त्यांच्या काही सहकाऱयांनी नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली. परिक्रमा पायीच फिरून पूर्ण करायची असा लिमये यांचा आग्रह होता. प्रवासात काही ना काही कारणाने एकेक करत त्यांचे सहकारी परिक्रमेतून अर्ध्यावरुनच परतले. फक्त लिमये यांची परिक्रमा जशी ठरवली होती तशी पायी पूर्ण झाली. परिक्रमेतील सर्व प्रवासाचे हे वर्णन अत्यंत प्रांजळ झाले आहे. लिखाणात कुठेही प्रौढी किंवा बडेजाव नाही. नर्मदा परिक्रमा या विषयाची आवड असणाऱयांनी हे पुस्तक जरुर वाचावे.


लिमये यांची ही परिक्रमा १४ डिसेंबर २००१ ते १५ एप्रिल २००२ अशा एकूण १२३ दिवसात पूर्ण झाली. नर्मदामाईच्या कृपेने तिने माझ्याकडून परिक्रमा करवून घेतली, असे लिमये प्रांजळपणे नमूद करतात. परिक्रमेच्या दरम्यान आलेले बिकट प्रसंग, त्यातून नर्मदामाईच्या कृपेने झालेली सुटका, परिक्रमेच्या अखेरच्या टप्प्यात अश्वथ्थामाचे झालेले दर्शन, जागोजागी नर्मदामाता परिक्रमावासीयांची कशी काळजी घेत असते त्याचे आलेले अनुभव हे सर्व मुळातून वाचण्यासारखे आहे. लिमये यांचे हे पुस्तक लिमये कुल विश्वस्त निधीने प्रकाशित केले आहे. निधीचे प्रमुख विश्वस्त वामन गणेश खासगीवाले यांचेही मनोगत पुस्तकाच्या प्रारंभी देण्यात आले आहे.


नर्मदा परिक्रमा म्हणजे आजच्या काळात भारतीय संस्कृतीची आदर्श मूल्ये जोपासणारा अमूल्य ठेवा आहे. तो हस्तगत करण्यासाठी फार काही नको. फक्त मनुष्य देह पुरेसा आहे. परमेश्वरी योजनेनुसार त्यात श्रद्धा आहेच. ती जपली की बळ प्राप्त होते आणि या दोन्हींच्या संयोगाने सुयश प्राप्ती खेरीज अन्य काही घडणेच संभवत नाही. थोडक्यात चांगला माणूस बनण्यासाठी मानवी जीवनाचा प्रवास नर्मदे हर कडून हर नर्मदे कडे व्हावा. नर्मदे हर म्हणजे नर्मदामाईस विनवणी की माझ्या दोषांचे निर्मूलन कर अर्थात सदगुणांचा अभ्युदय कर. आणि हर नर्मदे म्हणजे नर्मदामाईस अनन्यभावे शरण जाणे, या परते दुसरे भाग्य कोणी मागेल काय, असे लिमये यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे.


पुस्तकातील नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा या लेखात लिमये यांनी आपल्या मनात ही परिक्रमा करण्याचा विचार कसा आला, त्याची तयारी कशी केली, घरच्यांची साथ कशी मिळाली, परिक्रमेहून परत आल्यानंतर पुस्तकाची तयारी कशी झाली, परिक्रमेदरम्यान लिमये यांनी दररोज दैनंदिनी लिहिण्याची सवय ठेवली होती. त्याचा फायदा या पुस्तकासाठी कसा झाला, पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी किर्लोस्कर मासिकात नर्मदा परिक्रमेविषयी प्रसिद्ध झालेली लेखमाला आदींचा सांगोपांग आढावा घेतला आहे. पुस्तकात लिमये यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमेचा मार्ग, नर्मदा मातेचे रंगीत छायाचित्र, परिक्रमेतील रंगीत छायाचित्रे,  श्री नर्मदा यंत्र, नर्मदा देवीची आरती, नर्मदाष्टकम, नर्मदा नित्यपाठ तसेच नर्मदा परिक्रमेसाठी उपयुक्त अशी माहिती दिली आहे. एक उल्लेख आवर्जू केला पाहिजे. तो या पुस्तकात देखील आहे.  नर्मदा परिक्रमेविषयी जगन्नाथ कुंटे लिखित नर्मदे हर या पुस्तकात जी काही छायाचित्रे देण्यात आली आहेत, ती लिमये यांनीच काढलेली आहेत.


एकंदरीत हे पुस्तक म्हणजे नर्मदा परिक्रमेविषयीचा एक संदर्भ ग्रंथ झाला आहे. जिज्ञासू आणि नर्मदा परिक्रमा करणाऱयांना त्याचा नक्कीच उपयोग होईल.  


लिमये यांचा संपर्क
०२०-२४४७३४८२

ई-मेल
  sblimaye2000@yahoo.com किंवा  sasuli@vsnl.com
   

03 January 2010

गोंदवलेकर महाराजांचे गोंदवले


आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. या सर्व संतांनी लोकांमध्ये भक्तीभाव निर्माण करण्याबरोबरच सामाजिक समरसतेचे मोठे काम केले. याच संतपरंपरेतील एक नाव म्हणजे गोंदवले येथील गोंदवलेकर महाराज. गोंदवलेकर महाराज हे रामाचे निस्सीम उपासक. त्यांनी सर्व समाजाला नामाची गोडी लावली. आजच्या काळात सर्वश्रेष्ठ असे जर काही असेल तर ते नाम आहे. प्रत्येकाने सतत नाम घेत राहावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक येथे गोंदवलेकर महाराज यांची समाधी आहे. नुकताच गोंदवले येथे जाण्याचा योग आला आणि मी तेथे जाऊन आलो.


वसई येथे राहणारे माझे चुलत मेव्हणे अशोक ऊर्फ बापू अभ्यंकर हे गोंदवलेकर महाराज यांचे भक्त. त्यांचे गोंदवले येथे जाणे असतेच. मला कधीपासून गोंदवल्याला जायचे होते. तो योग नुकताच आला. अशोक अभ्यंकर हे गोंदवले येथे जाणार होते. त्यांनी मला विचारले आणि मी हो म्हटले. गोंदवले येथील गोंदवलेकर महाराज यांचे समाधी मंदिर, मंदिराचा सर्व परिसर, गोशाळा, भव्य महाप्रसाद गृह आणि गोंदवले येथे येणाऱया भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाच्या इमारती आणि येथे निस्वार्थी वृत्तीने काम करणारे साधक सर्व काही विलक्षण आहे. प्रत्येकाने किमान एकदातरी  गोंदवले येथे गेले पाहिजे. तुम्ही भाविक/श्रद्धाळू असाल तर भक्तीभाव म्हणून आणि तसे नसाल तर तेथे सुरु असलेले काम पाहण्यासाठी तरी तेथे भेट दिलीच पाहिजे.


गोंदवले येथील सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तेथील भक्त निवासात आपल्याला मुक्काम करायचा असेल तर त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. खोली उपलब्ध असेल तर ती निशुल्क मिळते. तसेच दररोज दुपारी आणि रात्री महाप्रसाद असतो. एका वेळेस जेवणासाठी किमान पाच हजार भाविक (उत्सव किंवा गोंदवले येथे कोणताही विशेष कार्यक्रम नसताना) उपस्थित असतात. परंतु कुठेही गडबड, गोंधळ न होता सर्वांचे जेवण व्यवस्थित होते. महाप्रसादासाठी सर्वाना रांगेतून शिस्तीत आत सोडले जाते. जेवणात भात, गोड शिरा, कढी, ताक, एखादी रसभाजी. मसालेभात, मुगाची खिचडी असे पदार्थ असतात. दररोज हजारो माणसांचा स्वयंपाक येथे होत असतो. तसेच दररोज सकाळी व दुपारी सर्वाना चहा आणि सकाळी नाश्ताही कोणतेही शुल्क न घेता देण्यात येतो.


इतक्या मोठ्या प्रमाणात स्वयंपाक, चहा आणि नाश्ता करण्यासाठी पहाटेपासूनच तयारी सुरु असते. प्रत्येकजण आपल्याला जमेल तशी येथे मदत करत असतो. काही मंडळी तर येथे मुद्दामहून सेवा म्हणून काम करण्यासाठी येत असतात. यातील अनेक जण सुशिक्षित, शहरात राहणारे आणि वेगवेगळ्या व्यवसायात काम करणारेही असतात. गोंदवलेकर महाराज यांच्यावरील श्रद्धेपोटी ही सर्व मंडळी आपले नाव आणि हुद्दा विसरुन येथे सेवा म्हणून काम करतात. दररोज दोन्ही वेळा हजारो माणसांचे जेवण, नाश्ता आणि चहा ही कामे बिनबोभाट होत असतात.


समाधी मंदिरातही पहाटेपासून काकडआरती, प्रवचन, किर्तन असे कार्यक्रम होत असतात. येथे आले आणि गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले की मन शांत होते. समाधी मंदिराचे आवार खूप मोठे आहे. मात्र स्रर्वत्र टापटीप आणि स्वच्छता असते. समाधी मंदिराचा गाभाराही स्वच्छ आहे. मंदिर परिसरातच संस्थेचे कार्यालय असून तेथे गोंदवलेकर महाराजांविषयी पुस्तके, छायाचित्रे. जपमाळ आणि अन्य साहित्य मिळते. अभिषेक, देणगीही .येथे स्वीकारली जाते. अन्य देवस्थानातील बडवे किंवा पुजाऱयांप्रमाणे गोंदवले येथील पुजारी किंवा अन्य कोणीही देणगी किंवा अन्य कामासाठी तुमच्या मागे लागत नाहीत. महाराजांच्या समाधी दर्शनासाठी इतकी दक्षिणा दिली तर अमूक रांग, तितके पैसे दिले तर तमूक रांग असाही प्रकार नाही.  सर्वाना एकच न्याय. उगाचच गडबड, गोंधळही नसल्याने येथे मनाला खरोखरच शांत आणि प्रसन्न वाटते.


साध्या आणि सोप्या भाषेत, आपल्याच सभोवताली घडणारी उदहरणे देत गोंदवलेकर महाराज यांनी नाम आणि अध्यात्म खूप सोपे करुन सांगितले आहे. त्याचे चरित्र आणि त्यांनी केलेले रचना वाचल्यानंतर आपल्याही ते लक्षात येते. खरेच प्रत्येकाने किमान एकदा तरी गोंदवले येथे जाऊन हे सर्व काम प्रत्यक्ष पाहावे आणि अनुभवावे.               
समाधीमंदिर