14 September 2011

आठवणींचा आल्बम

ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांना प्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांनी वाहिलेली श्रद्धांजली आठवणींचा आल्बम
माझी  ही बातमी लोकसत्ता- १४ सप्टेंबर २०११ च्या मुख्य अंकात पान २ वर प्रसिद्ध झाली आहे. 
------
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून चित्रपट सृष्टीतील माधुरी दीक्षित ते काजोल आणि अन्य ‘तारांगणा’बरोबरच लष्करी शिस्तीचे सॅम माणकेशा, भारतातील विमान उद्योगाचे जनक जे. आर. डी.टाटा, उद्योगपती रतन टाटा, क्रिकेट विश्वातील सचिन तेंडुलकर ते कला, उद्योग, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्वे आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करणारे खरे तर अशा मान्यवरांचे व्यक्तिमत्व, त्यांचा स्वभाव आणि साक्षात ती व्यक्ती छायाचित्रातून उलगडणारे ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष आज आपल्यात नाहीत, यावर खरेतर विश्वासच बसत नाही.
गेल्या तीन दशकात छायाचित्रण, लेखनात त्यांनी केलेली मुशाफिरी आणि छायाचित्रण कलेत केलेले काम विसरता येणे शक्य नाही. माझ्यासाठी ते श्रद्धास्थान होते. मी त्यांच्याकडे पाहूनच छायाचित्रकार झालो. छायाचित्रण कलेच्या पलिकडेही ते माणूस म्हणून खूप मोठे होते. माझे भाग्य की मला त्यांच्या सहवासात खूप काळ घालवता आला. गौतम राजाध्यक्ष हे छायाचित्रण कलेतील माझे आदर्श होते. मोठे झाल्यावर ‘गौतम राजाध्यक्ष’ व्हायचे, असे मी मनाशी ठरवले होते.
आमीर खान याचा ‘बाजी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी नवखा होतो. छायाचित्रणाला नुकतीच सुरुवात केली होती. या चित्रपटात आमीर खानवर स्त्री वेषात एक गाणे चित्रित करण्यात आले होते. त्या गाण्याचे करण्यात आलेले चित्रिकरण पाहण्यासाठी त्यांना बोलाविण्यात आले होते. या वेळी मी पहिल्यांदा त्यांना पाहिले. त्यांना पाहून मी भारावून गेलो होतो. या प्रसंगानंतर माझी आणि त्यांची दोन-चार वेळा भेट झाली. आमचा परिचय वाढला. मी काढलेली छायाचित्रे घेऊन त्यांना दाखवायला त्यांच्या घरी जायचो. छायाचित्रे पाहून ते त्यांचे स्पष्ट मत व्यक्त करत असत. छायाचित्रे आवडली तर मनापासून कौतूक करायचे आणि आवडली नाहीत तर ते सुद्धा सांगायचे.
गौतम राजाध्यक्ष यांच्या छायाचित्रांबद्दल बोलायचे तर त्यांच्या छायाचित्रात साधेपणा होता. त्यांच्या छायाचित्रांत कोणतेही ‘गिमिक्स’ नसायचे.त्यांनी काढलेल्या छायाचित्रातून ती व्यक्ती आणि त्यांचा स्वभाव अलगद उमटायचा. कोणतेही गिमिक्स न करताही चांगले छायाचित्र कसे काढायचे, हे मी त्यांच्याकडूनच शिकलो. कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्री त्यांच्यासमोर खुलतात कसे? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. पण त्यांचे व्यक्तिमत्वच असे होते की ते त्यांच्यासमोर बसलेल्या कोणत्याही व्यक्तिला आपलेसे करायचे. कितीही मोठी व्यक्ती असली तरी ती त्यांच्यापुढे खुलायची. ‘शब्देविणू संवादू’ अशी त्यांची खासियत होती. त्यांची छायाचित्रे साधी असूनही ती खूप बोलकी होती. ते ही डिजिटल कॅमेऱ्यावर छायाचित्रे काढायचे. पण त्यातही आपले वेगळेपण त्यांनी शेवटपर्यंत जपले.
अन्य क्षेत्रातील एखादी व्यक्ती आपल्यातून निघून गेली तर त्या व्यक्तिचा वारसा पुढे चालवला जातो. पण छायाचित्रण हा असा एक व्यवसाय आहे की, राजाध्यक्ष यांच्याबरोबरच ती कला आता संपली आहे. त्यांनी काढलेल्या छायाचित्रातून ते आपल्या सदैव बरोबर असतील आणि स्मरणातही राहतील. पण आता त्यांनी काढलेली छायाचित्रे आपल्याला पाहता येणार नाहीत. काही दिवसांपूर्वीच माझे आणि त्यांचे बोलणे झाले होते. लवकरच ते माझा नवा स्टडिओ पाहण्यासाठी येणार होते. पण त्यांच्या अचानक जाण्याने आता ते कधीच घडू शकणार नाही आणि ही खंत माझ्या कायम मनात राहील..
(शब्दांकन-शेखर जोशी)

या बातमीची लिंक अशी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=181838:2011-09-13-17-01-49&catid=212:2009-08-18-16-27-

11 September 2011

श्लोक गणेश-९ स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम्

लेखमालिकेतील आजच्या शेवटच्या भागात महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा अष्टविनायक स्थानांची नावे असलेला श्लोक घेतला आहे.  महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांप्रमाणेच गणपतीची ही आठ स्वयंभू स्थाने प्रसिद्ध आहेत. भाविक आणि गणेशभक्त अष्टविनायकाची ही यात्रा नेमाने करत असतात. या आठ स्थानांपैकी पाच स्थाने पुणे जिल्ह्य़ात (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर आणि लेण्याद्री), दोन रायगड जिल्ह्य़ात (महड व पाली)आणि एक अहमदनगर (सिद्धटेक) जिल्ह्य़ात आहे. अष्टविनायक स्थानातील प्रत्येक गणपती स्वतंत्र नावाने ओळखला जातो. अष्टविनायकातील पहिला गणपती हा मोरगावचा ‘मयुरेश्वर’ आहे. थेऊरचा दुसरा गणपती हा  ‘चिंतामणी’, सिद्धटेकचा तिसरा गणपती ‘सिद्धिविनायक’, रांजणगावचा चौथा गणपती ‘महागणपती’, ओझरचा पाचवा गणपती हा ‘विघ्नेश्वर’ या नावाने भक्तांमध्ये परिचित आहे. सहावा गणपती हा लेण्याद्रीचा ‘गिरिजात्मक’म्हणून, महडचा सातवा गणपती ‘वरदविनायक’ आणि शेवटचा पाली येथील आठवा गणपती ‘बल्लाळेश्वर’ नावाने माहितीचा आहे.  अष्टविनायकांतील सर्व स्थानांचे वर्णन करणारा श्लोक आपल्या सर्वाच्या परिचयाचा आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात विविध गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात किंवा घरोघरीही आरतीनंतर हा श्लोक म्हटला जातो. अभिनेता-दिग्दर्शक सचिन यांचे वडील शरद पिळगावकर यांच्या ‘अष्टविनायक’ या चित्रपटाच्या अखेरीस या सर्व अष्टविनायकांचे दर्शन घडविणारे गाणे आहे. हे गीत जगदीश खेबूडकर यांचे असून संगीत अनिल-अरुण यांचे आहे. या गाण्यातील प्रत्येक कडव्याला मराठीतील आघाडीच्या गायकांनी आपला आवाज दिला असून मराठीतील अनेक अभिनेते-अभिनेत्री यांच्यावर यातील प्रत्येक कडवे चित्रित करण्यात आले आहे. आज इतक्या वर्षांनंतरही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. या गाण्याच्या सुरुवातीला अष्टविनायकातील सर्व गणपतींची नावे गुंफलेला
स्वस्ति श्रीगणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिदम्
बल्लाळम्  मुरुडम् विनायक मढम् चिंतामणींस्थेवरम्
लेण्याद्रिम् गिरिजात्मजम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम्
ग्रामो रांजणसंस्थितो गणपती: कुर्यात सदा मंगलम्
हा प्रसिद्ध श्लोक आहे. हा श्लोक संस्कृत भाषेतील असून या रचनेला ‘अष्टक’ रचना असे म्हणतात. गणपतीचा हा श्लोक आपण लग्नकार्यात वर्षांनुवर्षे ‘मंगलाष्टक’ म्हणून ऐकत आणि म्हणत आलो आहोत.  या श्लोकाचे एक खास वैशिष्टय़ म्हणजे हा श्लोक केवळ विशेष नामांनी तयार झाला आहे. श्लोकाच्या अखेरीस सर्व काही मंगलमय होवो, एवढी एकच ओळ येते. संपूर्ण श्लोकात अष्टविनायक स्थाने आणि नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. आरतीनंतर हा श्लोक किंवा अष्टविनायकाच्या या स्थानांच्या प्रत्येक गणपतीचे नाव घेऊन त्याचा गजर केला जातो. 

(माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई रविवार वृत्तान्तमध्ये ११ सप्टेंबर २०११ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी)
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=181463:2011-09-10-17-01-26&catid=41:2009-07-15-03-58-1

10 September 2011

श्लोक गणेश- ८ गणपती तुझे नाव चांगले

‘श्लोक गणेश’ या लेखमालिकेत आजवर आपण जे विविध श्लोक घेतले त्यातील आजचा श्लोक सगळ्यात सोपा आणि सहज अर्थ समजेल असा आहे. हा श्लोक घरी किंवा शाळेत नेहमी म्हटला जातो. हा श्लोक आणि त्यातील शब्द इतके सोपे आहेत की नुकत्याच बोलायला लागलेल्या लहान मुलालाही तो अगदी सहज म्हणता येऊ शकेल.
गणपती तुझे नाव चांगले
आवडे बहु चित्त रंगले
प्रार्थना तुझी गौरीनंदना
हे दयानिधे, श्री गजानना
या ओळी वाचतानाच आपल्याला याचा अर्थ लक्षात येईल. या श्लोकात गणपतीच्या नावाचा उल्लेख करून गणपतीची स्तुती करण्यात आली आहे. आपल्या सर्वाच्या आवडत्या गणपती बाप्पाची अनेक नावे असून त्यातील विनायक, एकदंत, हेरंब, गौरीपुत्र, वक्रतुंड, भालचंद्र, कृष्णपिंगाक्ष, लंबोदर, चिंतामणी अशी नावे आपल्या सर्वाना माहिती आहेत.
गणपतीचे मस्तक हत्तीचे, मोठे कान, बारीक डोळे, मोठे पोट असे बाह्य़ रूप असले तरी त्याचे हेच रूप सगळ्यांना आवडते, भावते. गणपतीचे हे रूप पाहून भक्तांना आनंद होतो. त्याच्या रूपात आणि नामात भक्त रंगून जातात. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी, चिंता, महागाई आणि अन्य प्रश्न भेडसावत असले तरी दरवर्षी येणाऱ्या गणपतीमुळे  सारे वातावरण बदलून जाते. ‘नेमेची येतो गणपती’ असे असले तरी केवळ त्याच्या नावाने आपले दु:ख, चिंता, क्लेश आपण विसरतो आणि आनंदाने त्याचे स्वागत करतो. रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या ‘सुखकर्ता-दु:खहर्ता’ या आरतीत ‘दर्शन मात्रे मन कामनापूर्ती’ असे जे म्हटले आहे, त्याची अनुभूती आपण घेत असतो.  भाद्रपद चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत त्याची पूजा, आराधना केल्यानंतर त्याला निरोप देताना आपल्याला वाईट वाटते. ‘गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला’ अशी आपली अवस्था होते. आजच्या श्लोकात हेच वेगळ्या शब्दांत सांगितले आहे. हे गणराया, गजानना अरे तुझे नाव खूप चांगले आहे. ते सगळ्यांना आवडणारे आहेच पण तुझे नाव घेतले की  तुझ्या नामात आमचे मन अगदी रंगून जाते. आमच्या चिंता, क्लेश दूर पळून जातात. गणपतीला आपण सुखकर्ता आणि दु:खहर्ता त्यासाठीच म्हणतो. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव गौरीनंदन असे आहे. गणपती हा पार्वतीचा पुत्र. पार्वतीचे आणखी एक नाव गौरी असेही आहे. त्यामुळे हे गौरीपुत्रा, विघ्नहर्त्यां गजानना आम्ही तुझी प्रार्थना करत आहोत, असा या श्लोकाचा अर्थ आहे.

(माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई व ठाणे वृत्तान्तमध्ये (१० सप्टेंबर २०११)च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=181253:2011-09-09-15-18-34&catid=41:2009-07-15-03-58-1  

09 September 2011

श्लोक गणेश-७ ओम नमोजी गणनायका

‘श्लोक गणेश’च्या आजच्या भागात घेतलेला श्लोक हा रूढार्थाने श्लोक नाही. संत रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या ‘दासबोध’ या ग्रंथातील ती रचना आहे. अन्य श्लोकांप्रमाणे हा श्लोक म्हटला जात नसला तरी चार ओळींची ही रचना श्लोकासारखीच आहे.
समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ ही आरती प्रसिद्ध आहे. रामदास स्वामी यांचे आराध्यदैवत श्रीराम आणि हनुमान असले तरी त्यांनी आपल्या साहित्यातून गणपतीचीही स्तुती आणि आराधना केली आहे. रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांची सुरुवातच ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा’ अशी केली आहे.
रामदास स्वामी यांच्या ‘दासबोध’ या ग्रंथाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासाची सुरुवातही गणेश स्तवनाने केली आहे. रायगड जिल्ह्यातील शिवथर घळ येथे रामदास स्वामी यांनी ‘दासबोध’ हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ एकूण वीस दशकांमध्ये असून प्रत्येक दशकात दहा समास आहेत. प्रत्येक समासात रामदास स्वामी यांनी एक विषय घेऊन सर्वसामान्यांना मार्गदर्शन केले आहे.
पहिल्या समासात श्रोत्यांना ग्रंथाची माहिती देण्याबरोबरच ग्रंथाचे श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे ते सांगितले आहे. दासबोधाचा पहिला दशक हे ‘स्तवननाम’ असून त्यातील दुसऱ्या समासात रामदास स्वामी यांनी गणेश स्तवन केले आहे. गणेश स्तवनात एकूण ३० ओव्या आहेत.
 रामदास स्वामी यांनी गणेश स्तवन करताना-
ओम नमोजी गणनायका
सर्व सिद्धी फळदायका
अज्ञानभ्रांती छेदका बोधरूपा
असे म्हटले आहे.
संत ज्ञानेश्वरानीही ज्ञानेश्वरीचा आरंभ करताना-
ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या
जयजय स्वसंवेद्या आत्मरूपा
देवा तूचि गणेशु, सकलमति प्रकाशु
म्हणे निवृत्तीदासु अवधरिजोजी
असे गणपतीचे वर्णन केले आहे.
रामदास स्वामी गणपतीला ओम नमोजी गणनायका असे म्हणतात. ओंकार हे गणेशाचे स्वरूप मानले जाते. गणपती याचा अर्थ गण, सैन्य यांचा प्रमुख, सेनापती, नायक अर्थात गणनायक अशा या गणेशाला माझा नमस्कार असो. गणपतीला सुखकर्ता आणि दु:खहर्ता असे म्हटले जाते. तो विघ्नहर्ता आहे. त्यामुळे शुभकार्याच्या प्रारंभी गणपतीचेच पूजन केले जाते. गणपती ही देवता भक्तांच्या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण करणारी आणि भक्तांचे अज्ञान दूर करुन चांगली बुद्धी देणारी आहे. म्हणूनच गणपतीला बुद्धीदाता असेही म्हटले जाते. 
दासबोधातील गणेश स्तवनाच्या सुरुवातीच्या या रचनेचा अर्थ समजायला सोपा आहे.
माझा  हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये ९ सप्टेंबर २०११ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी  08 September 2011

  श्लोक गणेश-६ नेत्र दोन हिरे प्रकाश पसरे

  दिवंगत ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी गणपतीवर लिहिलेले ‘गणराज रंगी नाचतो’ हे गाणे प्रसिद्ध आहे. गाण्याचा स्वर लता मंगेशकर यांचा असून संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचे आहे. या गाण्यात गणपतीच्या पायात रुणझुण करणाऱ्या घागऱ्या असून कमरेला भरजरी पितांबर असल्याचे म्हटले आहे. तर संत तुकाराम यांनी ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ असे वर्णन केले आहे. अनेक संतकवी, शाहीर आणि गीतकार यांनीही आपापल्या परीने गणपतीच्या रूपाचे वर्णन केले आहे.
  आजच्या ‘श्लोकगणेश’ लेखमालिकेत गोसावीसुत वासुदेव कवी यांनी अगदी सहज-सोप्या भाषेत गणेशरूपाचे जे वर्णन केले आहे, तो चार ओळींचा श्लोक घेतला आहे.
  नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे
  माथा शेंदूर झरे वरी बरे, दूर्वाकुराचे तुरे
  माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनी चिंता हरे
  गोसावीसुत वासुदेव कवी रे, त्या मोरेश्वराला स्मरे
  गोसावीसुत कवी वासुदेव हे संत कवी आणि गाणपत्य संप्रदायातील होते. त्यांचा कार्यकाल इसवी सन १६५८ ते १७२८ असा मानण्यात येतो. सिंदखेड येथे राहणाऱ्या गोसावीसुत कवी वासुदेव यांनी या ठिकाणी एक गणेश मंदिरही बांधले आहे. यांच्या रचनांवर ज्ञानेश्वरी आणि दासबोधाच्याशैलीचा प्रभाव आहे.
  साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकातही या श्लोकाचा संदर्भ येतो. एका प्रसंगात श्यामची आई श्यामला कोणता श्लोक म्हटलास, लोकांना तो आवडला का? असे
  विचारते, त्यावर श्याम आईला श्लोक म्हटल्याचे खोटेच सांगतो. मी ‘नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे’ हा श्लोक म्हटला असल्याचे सांगून आईला हा श्लोक तो संपूर्ण म्हणून दाखवतो. तेवढय़ात शेजारची मुले येतात आणि ती श्यामच्या आईला, ‘यशोदाकाकू, सर्वजण श्यामला श्लोक म्हण असे सांगत असतानाही श्यामने श्लोक म्हटलाच नाही,’ असे सांगतात, असा एक भाग आहे.
  गोसावीसुत वासुदेव कवी यांनी रचलेला हा श्लोक समजण्यास अत्यंत सोपा आहे. गणपतीचे वर्णन करताना गोसावीसुत म्हणतात की, गणपतीचे डोळे म्हणजे जणू काही दोन हिरे आहेत. अस्सल हिऱ्याचा प्रकाश जसे आपले डोळे दिपवून टाकतो, त्याप्रमाणे नेत्री दोन हिरे असलेल्या गणपतीचे हे रूप भक्तांना आवडणारे व साजिरे असे आहे. गणपतीच्या माथ्यावर म्हणजेच डोक्यावर शेंदूर असून त्यावर वाहिलेल्या दूर्वा या मुकुटावरील एखाद्या तुऱ्यासारख्या शोभत आहेत. गणपतीचे रूप पाहून माझे चित्त हरपून गेले आणि माझ्या सर्व चिंता, काळज्याही मिटल्या. अशा या मोरयाला गोसावीसुत वासुदेव कवी नमस्कार करत असल्याचे या श्लोकात सांगण्यात आले आहे.

  (माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई व ठाणे वृत्तान्तच्या ८ सप्टेंबर २०११ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी
  http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=180816:2011-09-07-15-42-55&catid=41:2009-07-15-03-58-1 

  07 September 2011

  श्लोक गणेश-५ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी

  ‘श्लोक गणेश’ लेखमालिकेतील आजच्या भागात सर्वाना माहिती असलेल्या श्लोकाची ओळख करून घेणार आहोत. हा श्लोक आपल्यापैकी अनेकजण दररोज सकाळी घरातील देवांसमोर हात जोडून म्हणतात. संस्कृतमधील हा श्लोक म्हणायलाही खूप सोपा आहे.
  वक्रतुंड महाकाय
  सूर्यकोटी सम:प्रभ
  निर्विघ्नम कुरु मे देव
  सर्वकार्येषु सर्वदा
  अगदी लहानपणापासून आपल्या सर्वाना हा श्लोक माहितीचा आहे. शाळेतही आपल्यापैकी अनेकांनी प्रार्थना झाल्यानंतर तो दररोज म्हटला असेल आणि आजही म्हणत असतील. श्रीनारदमुनी यांनी रचलेले गणपतीचे संस्कृत भाषेतील ‘प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायक’ हे स्तोत्र परिचयाचे आहे. संस्कृत भाषेतीलच ‘श्रीगणपती अथर्वशीर्ष’ही अनेक भाविक रोज म्हणत असतात. ‘प्रणम्य शिरसा देवं’ हा  संस्कृत भाषेतील गणपतीची प्रार्थना असलेला सगळ्यात लहान श्लोक आहे. श्रीगणेशाला १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती मानले जाते. कोणत्याही शुभकार्यात सर्वप्रथम गणपतीचे स्मरण आणि पूजन केले जाते. कोणतेही कार्य यशस्वीपणे पार पडण्यासाठी माणसाच्या प्रयत्नांबरोबरच परमेश्वराच्या कृपेची आवश्यकता असते. समर्थ रामदासस्वामी यांनीही
  सामथ्र्य आहे चळवळीचे
  जो जो करील तयाचे
  परंतु तेथे भगवंताचे
  अधिष्ठान पाहिजे
  असे म्हटले आहे.
  गणपतीला आपण ‘विघ्नहर्ता’ म्हणतो. कोणत्याही कार्यातील आणि आपल्या दैनंदिन आयुष्यातीलही संकटे आणि अडचणी दूर करण्यासाठी भक्त मंडळी विघ्नहर्त्यां गणरायालाच साकडे घालतात.  वक्रतुंड याचा अर्थ वाकडे तोंड असलेला आणि महाकाय म्हणजे मोठे शरीर असलेला असा होतो. गणपतीला आपण लंबोदर या नावानेही ओळखतो. सर्वसामान्यत: एखादा मोठे पोट असलेला माणूस बेढब दिसतो. मात्र गणपतीचे हत्तीचे शीर असलेले आणि तुंदीलतनु असलेले हेच रूप भक्तांना लोभस दिसते. या श्लोकात गणपतीच्या रूपाचे वर्णन करण्याबरोबरच विघ्न दूर करण्याच्या त्याच्या गुणाची महतीही सांगण्यात आली आहे. उगवत्या सूर्याकडे आपण डोळे उघडे ठेवून पाहू शकतो. पण सूर्य जसजसा डोक्यावर येऊ लागतो, तसतसे त्याच्या तेजाकडे आपण पाहू शकत नाही. तेव्हा महाकाय शरीर असणाऱ्या आणि अशा कोटी कोटी सूर्याचे तेज सामावलेल्या गणराया माझ्या मार्गातील सर्व विघ्न/अडथळे तू दूर कर. माझ्या कामात मला यश दे, अशी प्रार्थना या श्लोकाद्वारे गणपतीला करण्यात आली आहे.   

  (श्लोक गणेश लेखमालिकेतील माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई व ठाणे वृत्तान्तच्या ७ सप्टेंबर २०११ अंकात पान एकवर प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी
  http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=180585:2011-09-06-15-54-11&catid=41:2009-07-15-03-58-1      

  06 September 2011

  श्लोक गणेश-४ प्रारंभी विनंती करू गणपती

  आजच्या ‘श्लोकगणेश’च्या भागात सर्वाना माहिती असलेला आणि साधी-सोपी आणि सर्वसामान्यांना सहज समजेल अशी भाषा असलेला श्लोक घेतला आहे. हा श्लोक वाचताना आपल्या सर्वाच्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतील.  प्रत्येकाने शाळेत असताना हा श्लोक नक्कीच म्हटला असेल. आज तो पुन्हा वाचताना लहान झाल्यासारखे वाटेल. हा श्लोक अवघ्या दोन कडव्यांचा आहे.
  प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा
  अज्ञानत्व हरूनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा
  चिंता, क्लेश, दारिद्रय़ दु:ख अवघे देशांतरा पाठवी
  हेरंबा गणनायका गजमुखा चित्ता / भक्ता बहू तोषवी
  या श्लोकात मोरेश्वराची आराधना करण्यात आली आहे. अष्टविनायक अर्थात आठ स्वयंभू गणपती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. अष्टविनायक यात्रेला भक्तांच्या दृष्टीनेही खूप महत्त्व आहे. या अष्टविनायकापैकी मोरगाव येथील ‘मयूरेश्वर’ गणपतीलाच मोरेश्वर असे म्हटले जाते. गणपती हा सुखकर्ता आणि विघ्नहर्ता आहे. मंगलप्रसंगी सर्वप्रथम श्रीगणेशाचेच पूजन केले जाते. गणपती ही विद्येची अर्थात बुद्धीची देवता मानली जाते.
  श्लोकात या बुद्धीच्या देवतेची, प्रारंभी प्रार्थना करण्यात येऊन आपले अज्ञान दूर करावे आणि आपल्याला चांगली बुद्धी द्यावी, अशी विनंती गणपतीला केली आहे. प्रत्येकालाच आपण सुखी आणि आनंदी असावे, असे वाटत असते. मात्र सुख आणि आनंद सगळ्यांच्याच वाटय़ाला येत नाही. दैनंदिन जीवनात सर्वसामान्यांना चिंता, त्रास, काळजी, दु:ख, दारिद्रय़ असे अनेक क्लेश भोगावे लागतात. गणपतीच्या आशीवार्दाने, त्याच्या कृपाप्रसादाने हे क्लेश दूर व्हावेत, अशी त्याची अपेक्षा तो विघ्नहर्त्यांकडे व्यक्त करतो.
  याच श्लोकातील आणखी एक विशेष म्हणजे यात गणपतीची काही नावे चपखल गुंफण्यात आली आहेत. या नावांद्वारे १९ अक्षरांच्या ‘शार्दूलविक्रीडित’ या अक्षरगण वृत्ताच्या चालीतही हा श्लोक म्हणता येतो. श्लोकात गणपती, मोरेश्वरा, हेरंब, गणनायक, गजमुख आदी गणपतीची नावे आली आहेत.
  घराघरांमधून पूजा किंवा आरती झाल्यानंतर ‘प्रारंभी विनती करू गणपती’ हाही श्लोक भक्तीभावाने म्हटला जातो. सर्वसामान्यांना सहज समजेल अशा अत्यंत सोप्या भाषेतील या श्लोकाद्वारे भाविक आपला सर्व भार त्या विघ्नहर्त्यांवर सोपवून आपले अज्ञान, दोष दूर होऊन चांगली बुद्धी देण्याची विनंती करत असतात.

  (माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (६ सप्टेंबर २०११)च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी
  http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=180379:2011-09-05-15-52-01&catid=41:2009-07-15-03-58-1

  04 September 2011

  श्लोक गणेश-४ मोरया मोरया मी बाळ तान्हे

  गणपतीचे अनेक श्लोक आणि स्तोत्रे प्रसिद्ध असून त्यापैकी ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे’हा श्लोक आपल्या सर्वाच्या माहितीचा आहे. शाळेत प्रार्थना झाल्यानंतर रोजच्या परिपाठात किंवा आपल्या घरी एखादी पूजा / आरती झाल्यानंतर हा श्लोक म्हटला जातो.
  मोरया मोरया मी बाळ तान्हे
  तुझीच सेवा करू काय जाणे
  अन्याय माझे कोटय़ानकोटी
  मोरेश्वरा बा तू घाल पोटी
  सर्वसाधारणपणे आपण इतकाच श्लोक म्हणतो. मात्र त्यापुढेही
  कऱ्हेचे तिरी एकसे मोरगावू
  तिथे नांदतो मोरया जाण पाहू
  चला जाऊ यात्रे महापुण्य आहे
  मनी इच्छिले मोरया देत आहे
  असा आणखी एक श्लोक आहे.
  अष्टविनायकातील मोरगावचा मयुरेश्वर एक गणपती असून हे स्थान पुणे जिल्ह्य़ात आहे. गाणपत्य / गणपती संप्रदायाचे हे आद्यपीठ मानले जाते. गणेशपुराणात या स्थानाविषयी माहिती आहे. पूर्वी या गावात मोर मोठय़ा प्रमाणात होते. म्हणून या गावाला मोरगाव हे नाव पडले. मोरालाच मयूर असेही म्हटले जाते. मोरगावचा हा गणपती म्हणूनच मयुरेश्वर या नावाने ओळखला जातो.
  मोरया गोसावी हे गणपतीचे मोठे भक्त होते. त्यांचा जन्म याच ठिकाणी झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची स्थापना केली. मयुरेश्वराबाबत एक पौराणिक कथा सांगण्यात येते.
  चक्रपाणी राजाला सिंधू नावाचा एक पुत्र होता. उग्र तपश्चर्या करून त्याने सूर्याला प्रसन्न करून घेतले आणि अमरत्वाचे वरदान प्राप्त करून घेतले. पुढे उन्मत्त झालेल्या सिंधूने देवांना जिंकून घेऊन त्यांचा छळ करायला सुरुवात केली. सर्व देव भगवान विष्णूंना शरण गेले. त्यांनी सिंधूशी युद्ध केले, पण त्यांचाही पराभव झाला. अखेरीस सर्व देव गणपतीला शरण गेले. श्रीगणेशांनी पार्वतीच्या पोटी अवतार घेतला. पुढे सिंधूशी युद्ध करून त्याला पराभूत केले. तेव्हापासून मोरगावच्या गणपतीला मोरेश्वर / मयुरेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले.
  आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारा आणि आपल्याला जे हवे आहे ते देणारा हा गणपती असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे. हे देवा गणेशा, मी अज्ञ आहे. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा मी चुकीचे वागलो असेन, तर मला उदार अंत:करणाने क्षमा कर आणि माझ्या चुका व अपराध पोटात घाल, अशी विनवणी गणपतीला करण्यात आली आहे. ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे’ हा श्लोक काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘उलाढाल’ या चित्रपटातील ‘देवा तुझ्या दारी आलो..’ या लोकप्रिय गाण्याच्या अखेरीस घेण्यात आला आहे. जगदीश खेबूडकर यांच्या या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. गाण्याची सांगता याच पारंपरिक श्लोकानेच करण्यात आली आहे.

  (हा भाग लोकसत्ता-रविवार वृत्तान्त (४ सप्टेंबर २०११)मध्ये पान तीनवर प्रसिद्ध झाला आहे). त्याची लिंक अशी
  http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=180118:2011-09-03-16-30-53&catid=166:2009-08-11-13-00-15&It

  03 September 2011

  श्लोक गणेश-२ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा

  महाराष्ट्रातील संतपरंपरेत समर्थ रामदास स्वामी यांना महत्त्वाचे स्थान आहे. श्रीराम आणि हनुमान हे उपास्यदैवत असलेल्या रामदास स्वामी यांनी या दैवतांच्या भक्तीबरोबरच बलोपासनेलाही प्राधान्य दिले होते. रामदास स्वामी यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. समर्थ रामदास स्वामी यांनी विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती केली. साधी-सोपी भाषा आणि परखड विचार हे त्यांच्या लेखनाचे मुख्य वैशिष्टय़ म्हणता येईल.
  दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, अभंग, आरत्या, भूपाळी आदी विविध प्रकारांत त्यांनी लेखन केले. त्यांच्या रचनांमधील ‘जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला’, ‘धटासी असावे धट, उद्धटासी असावे उद्धट’, ‘केल्यांने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’, ‘सामथ्र्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे’ अशी काही वाक्ये / ओव्यांनी मराठी भाषेत स्थान मिळवले आहे. सर्वसामान्य माणूसही नेहमीच्या बोलण्यात या ओव्यांचा वापर करत असतो. राष्ट्रउभारणी / राष्ट्रसंघटनेबरोबच रामदास स्वामी यांनी प्रपंच, परमार्थ, विवेक, लोकशिक्षण या विषयांवरही समाजाचे प्रबोधन केले आहे.
  रामदास स्वामी यांनी लिहिलेले ‘मनाचे श्लोक’ प्रसिद्ध आहेत. मनाच्या श्लोकांची एकूण संख्या २०५ इतकी आहे. ‘मनाचे श्लोक’ हे प्रत्येक व्यक्तीने समाजात आणि कुटुंबात कसे वागावे, प्रत्येकाला चांगली बुद्धी प्राप्त व्हावी, सर्वानी सन्मार्गाने चालावे, आपल्यातील दोष दूर व्हावेत या उद्देशाने समर्थानी त्यांची रचना केली आहे.
  मनाच्या श्लोकांची सुरुवात रामदास स्वामी यांनी
  गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
  मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
  नमू शारदा मूळ चत्वार वाचा
  गमू पंथ आनंद या राघवाचा
  या श्लोकाने केली आहे.
  या श्लोकात रामदास स्वामी यांनी गणेशाची स्तुती केली आहे. अवघ्या चार ओळींच्या या श्लोकात रामदास स्वामी प्रारंभीच ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा’ असे म्हणतात.
  ‘गण’ म्हणजे सैन्य आणि पती म्हणजे त्यांचा नेता. गणपती हा मोठा योद्धा असून तो विघ्नहर्ता आहे. गणपती हा सर्व गणांचा नेता / राजा आहेच पण तो ‘ईश’ सर्वा गुणांचा असल्याचे  समर्थ रामदास स्वामी म्हणतात. म्हणजेच प्रत्येक व्यकतीने आपल्यातील दोष, दुर्गुण दूर सारून चांगल्या गुणांचा, सद्विचारांचा, सन्मार्गाचा अंगीकार करावा, असे रामदास स्वामी यांना म्हणायचे आहे.
  ‘चत्वार वाचा’ म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाचांनी विद्येची आराधना करावी, असेही समर्थ सांगतात. ‘श्रीराम’ हे समर्थाचे उपास्य दैवत असून रामाला मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हटले जाते. प्रत्येकाने सन्मार्गाने चालावे आणि आपल्यातील दोष काढून टाकून आनंदाने जीवन जगावे, असेच रामदास स्वामी यांना सांगायचे आहे. 

  (हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (३ सप्टेंबर २०११) च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी
  http://epaper.loksatta.com/11164/indian-express/03-09-2011#p=page:n=17:z=1 

  02 September 2011

  श्लोक गणेश-१ श्री गणेशाय नम:

  श्री गणेशाय नम:
  चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाचा उत्सव आजपासून सुरू होत आहे. श्री गणेशाला अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपतीबाप्पाला प्रत्येक शुभकार्यात अग्रपूजेचा मान देण्यात आला आहे. पहिल्यांदा गणेशपूजन करूनच मंगलकार्याची सुरुवात केली जाते.
  घराघरांमधून साजऱ्या होत असलेल्या भाद्रपद महिन्यातील गणपती पूजनाला लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप दिले. हातात पाटी घेऊन त्यावर ‘श्री गणेशाय नम:’ असे लिहूनच आपल्या विद्याभ्यासाला सुरुवात होते. गेल्या हजारो वर्षांपासून आपल्या भारतात गणेशाची उपासना सुरू आहे. केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही  गणेशाची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. वेद हे भारतातीलच नव्हे तर जगातील सगळ्यात प्राचीन वाङ्मय मानले जाते. या वेदांमध्येही गणपतीची ‘ओंकार स्वरूप’म्हणून स्तुती केली आहे.
  सर्व संतांनीही आपल्या लेखनातून श्रीगणेश स्तुती केली आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेली सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ही आरती असो किंवा संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या सुरुवातीला  ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरुपा देवा तूचि गणेशु, सकल मति तू प्रकाशु
  अशा शब्दांत गणपतीची केलेली आराधना असो. नारदमुनी यांनी रचलेले ‘प्रणम्य शिरसा देवम्, गौरी पुत्रं विनायकम्’ हे स्तोत्र असो, ही काही प्रातिनिधिक उदाहरणे झाली.
  संस्कृत स्तोत्राप्रमाणेच आरती, भूपाळी, ओव्या, कवने, गाणी आदि विविध प्रकारच्या स्वरूपांतही गणेशाची आराधना आणि स्तुती करण्यात आली आहे. यात ‘श्लोक’ या वाङ्मय प्रकाराचाही समावेश होतो. संस्कृत भाषेबरोबरच मराठी भाषेतही गणपतीविषयक अनेक श्लोक आहेत. अवघ्या चार, सहा किंवा आठ ते दहा कडव्यांमध्ये रचनाकारांनी श्री गणेशाची स्तुती / आराधना केली आहे. सर्व संतांच्या वाङ्मयात किंवा काही प्राचीन ग्रंथात गणपतीची स्तुती करणारे श्लोक आहेत.  आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वाना माहिती असलेल्या आणि नसलेल्या अशा काही गणेश श्लोकांचे केलेले हे संकलन आणि त्यांचा घेतलेला आढावा. उद्यापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज एखाद्या श्लोकाचा आढावा या सदरात घेण्यात येईल.

  (हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (१ सप्टेंबर २०११) मध्ये पान एकवर प्रसिद्ध झाला आहे)
  http://epaper.loksatta.com/11020/indian-express/01-09-2011#p=page:n=17:z=1