13 April 2012

तरंगते अभंग संत तुकाराम यांच्या भिजक्या वहीतील

संत तुकाराम यांच्या हस्ताक्षरातील ‘भिजक्या वहीचे अभंग’ हे पुस्तक ६२ वर्षांनंतर पुनर्मुद्रित करण्यात आले आहे. पुनर्मुद्रित पुस्तकाची विशेष बाब म्हणजे या पुस्तकासोबत तुकाराम यांच्या हस्ताक्षरातील (मोडी लिपीतील) पाच अभंग असलेले आणि विशिष्ट रासायनिक प्रक्रिया केलेले एक पान पाण्यावर तरंगणारे आहे. 
alt


तुकाराम महाराजांच्या वंशजांकडे १९३० पर्यंत असलेले तुकाराम यांच्या हस्ताक्षरातील अभंग हे ‘भिजक्या वहीतील अभंग’ म्हणून ओळखले जात होते. बॅ. बाबाजी परांजपे यांनी देहू येथे जाऊन या वहीतील अभंग उतरवून घेतले आणि १९५० मध्ये या अभंगांचे पुस्तक काढले. बाबामहाराज सातारकर यांच्या वडिलांनी निरुपण केलेल्या या अभंगांचे पुस्तक धनंजयराव गाडगीळ यांनी प्रकाशित केले होते.


 अत्यंत दुर्मिळ असलेल्या या पुस्तकाच्या फक्त तीन प्रती उपलब्ध होत्या. अभ्यासक आणि तुकाराम महाराज यांच्या भक्तांसाठी ‘वरदा प्रकाशन’ या संस्थेने हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे.  बॅ. बाबाजी परांजपे यांच्या मूळ पुस्तकाच्या तीन प्रती पुणे विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय, तुकाराम महाराज पादुका मंदिर आणि तुकाराम डॉट कॉम या संकेतस्थळाचे दिलीप धोंडे यांच्याकडे होत्या. धोंडे यांनी त्यांच्याकडील प्रत आम्हाला दिली आणि आम्ही त्या मूळ पुस्तकावरून हे पुस्तक पुनर्प्रकाशित केल्याचे वरदा प्रकाशनाचे ह. अ. भावे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. 


मासिकाच्या आकारातील सुमारे ३९२ पानाच्या या पुस्तकात पाच अभंगांचे स्वतंत्र पान देण्यात आले आहे. पाच अभंगांचे एक पान फ्रेम करून घेण्यासाठी तर एक पान वेगळ्या प्रकारे उपलब्ध करून दिले आहे. रासायनिक अभियंता असलेले आमचे मित्र शरद हर्डिकर यांनी तयार केलेले विशिष्ट रसायन या पानासाठी वापरण्यात आले असून त्यामुळे हे पान पाण्यात बुडत नाही किंवा बुडवले तरी खराब न होता तरंगणारे असल्याची माहितीही भावे यांनी दिली.

संत तुकाराम यांच्या मूळ अभंगगाथेत सुमारे साडेचार हजार अभंग असून त्यात या भिजक्या वहीतील साडेसातशे अभंगांचाही समावेश आहे. आम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकात हे साडेसातशे अभंग  आहेत. मूळ वहीतील ३६० ते ३६४ या क्रमांकांचे पाच अभंग आम्ही वेगळ्या पानावर दिले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही हे तरंगणारे पान तयार केले असून त्यामागे तुकाराम महाराज यांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही. मूळ पुस्तक पुर्नमुद्रित करताना काहीतरी वेगळे करावे, हाच उद्देश यामागे असल्याचेही भावे यांनी स्पष्ट केले.
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबईच्या मुख्य अंकात (१३ एप्रिल २०१२) पान क्रमांक ७ वर प्रसिद्ध झाली आहे)

12 April 2012

तुकाराम महाराज यांचे चरित्र आता कोंकणीत

आपल्या विविध अभंगांमधून सामाजिक समरसतेचा संदेश देणारे तसेच समाजातील अनिष्ट रुढी-परंपरा, अंधश्रद्धा यावर कोरडे ओढणारे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील महत्वाचे संत तुकाराम यांचे चरित्र आता लवकरच कोंकणी भाषेत उपलब्ध होणार आहे. या पुस्तकात तुकाराम महाराजांच्या काही अभंगांचाही कोंकणी अनुवाद असणार आहे. 


गोवा राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे माजी अध्यक्ष, गोवा साक्षरता अभियानाचे संचालक आणि गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणारे पद्मश्री सुरेश आमोणकर हे तुकाराम यांचे चरित्र कोंकणीत अनुवादित करत आहेत. आमोणकर यांच्या ‘गीता प्रसार’ या संस्थेतर्फेच हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.


 संत तुकाराम यांच्यावरील ‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळावर ह.भ.प. श्रीधर महाराज मोरे-देहुकर यांनी लिहिलेल्या तुकाराम महाराज यांच्या संक्षिप्त चरित्राचा आणि काही अभंगांचा कोंकणी भाषेत अनुवाद आमोणकर यांनीच केलेला आहे.

यासंदर्भात ‘लोकसत्ता’ला अधिक माहिती देताना आमोणकर म्हणाले की, तुकाराम महाराज यांनी समाजातील सर्व प्रकारच्या वैयक्तिक आणि सामाजिक ढोंगांवर कोरडे ओढले आहेत. त्यांनी  आपले अभंग आणि कृतीतून साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वी सामाजिक समतेचा जो संदेश दिला, त्याचीच समाजाला सध्या गरज आहे. संत तुकाराम यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग आणि घटना यांचा यात समावेश असेल.    
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबईच्या मुख्य अंकात ( १२ एप्रिल २०१२) पान क्रमांक दहावर प्रसिद्ध झाली आहे) 

11 April 2012

मराठी साहित्याला लाभले चित्रपटांचे कोंदण

मराठी वाचन संस्कृती कमी होत चालली असल्याची ओरड होत असतानाच मराठी साहित्यावर आधारित मराठी चित्रपटांना मात्र चांगले दिवस आले आहेत. मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सकस आणि सशक्त अशा उत्तमोत्तम कथा, कादंबरी यावर चित्रपट निर्मिती करत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला ‘शाळा’ हा मराठी चित्रपट त्याचे ताजे उदाहरण ठरावे. 


मराठी साहित्य समृद्ध असून त्यात मराठी न समजणाऱ्या व्यक्तींच्याही काळजाला भिडण्याची ताकद आहे. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर याच नावाचा चित्रपट तयार केला आणि भाषाभेदांच्या िभती ओलांडून या चित्रपटाने मराठीला राष्ट्रीयस्तरावर पहिले सुवणपदक मिळवून दिले. ज्येष्ठ साहित्यिक य. गो. जोशी, गो. नी. दांडेकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, वसंत सबनीस आदींच्याही कथा/कादंबऱ्यांवर चित्रपट झाले. मराठी साहित्यावर आधारित चित्रपट तयार करण्याचा हा प्रवास त्यानंतरही असाच पुढे सुरू राहिला.मराठीतील पहिला राजकीय आणि ‘मल्टिस्टारकास्ट’ म्हणता येईल, असा ‘सिंहासन’ हा चित्रपट अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या दोन कादंबऱ्यांवर आधारित होता. श्री. ना. पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीवरील याच नावाचा चित्रपट, रत्नाकर मतकरी यांच्या ‘जौळ’ कादंबरीवर आधारित ‘माझं घर माझा संसार’, बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘शेलारखिंड’ या कादंबरीवर आधारित ‘सर्जा’, जयवंत दळवी यांच्या ‘महानंदा’ कादंबरीवरील याच नावाचा चित्रपट ही काही निवडक उदाहरणे. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित ‘गोळाबेरीज’ आणि मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवरील याच नावाच्या चित्रपट हे साहित्यावर आधारित चित्रपटांचे अगदी अलीकडचे प्रयत्न म्हणता येतील.या निमित्ताने मराठीतील उत्तमोत्तम साहित्य चित्रपटांच्या माध्यमातून लोकांपुढे येत असून साहित्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वाचकांकडूनही त्या पुस्तकाला चांगली मागणी येत आहे. काही वाचक त्या पुस्तकाकडे वळत आहेत. मराठी साहित्यासाठी ही चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया साहित्यप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, उत्तम बंडू तुपे यांच्या ‘भस्म’ आणि रमेश उद्राटकर यांच्या ‘निशाणी डावा अंगठा’ या कादंबऱ्यांवर निर्माण झालेल्या याच नावाच्या चित्रपटांचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, गेल्या काही वर्षांत मराठी साहित्यावर आधारित चित्रपट तयार होत असले तरी मराठी साहित्यावर आधारित चित्रपटांची आता लाट येईल, असे मला वाटत नाही. एक मात्र नक्की की मराठी साहित्याची आवड आणि आस्था असलेले निर्माते-दिग्दर्शक अशा प्रकारचे चित्रपट तयार करण्याचे धाडस करताहेत, तसेच आजच्या पिढीतील तरुण निर्माते-दिग्दर्शक अशा ‘सिनेमॅटिक’ मराठी साहित्याचा शोध घेत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे.साहित्यावर आधारित चित्रपट/मराठी कादंबरी
श्वास- कथालेखिका माधवी घारपुरे यांच्या कथेवर आधारित
नटरंग- डॉ. आनंद यादव यांच्या ‘नटरंग’वर आधारित
घर गंगेच्या काठी- ज्योत्स्ना देवधर यांची कादंबरी
बनगरवाडी- व्यंकटेश माडगूळकर यांच्या पुस्तकावर आधारित
पांगिरा- विश्वास पाटील यांच्या ‘पांगिरा’वर आधारितआगामी
व. पु. काळे यांच्या ‘पार्टनर’वर आधारित श्री पार्टनर
डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकावर आधारित चरित्रपट
योगीराज बागुल लिखित पुस्तकावर आधारित विठाभाऊ नारायणगावकर यांच्यावरील चित्रपट ‘विठा’

(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १० एप्रिल २०१२ च्या अंकात पान क्रमांक चार वर प्रसिद्ध झाली आहे) 

09 April 2012

अनुवाद अकादमीला साडेसाती

मुंबईत रंगभवन येथे मराठी भाषा भवन उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच विधिमंडळात केली. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले. मात्र ही घोषणा मराठी साहित्य अनुवाद अकादमीच्या घोषणेप्रमाणे ‘बोलाची कढी आणि बोलाचाच भात न राहो’, अशी अपेक्षा साहित्य वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.


ठाणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी भाषेतील उत्तमोत्तम साहित्य अन्य भारतीय भाषांमध्ये पोहोचविण्यासाठी साहित्यविषयक संस्थांनी योजना सादर केली तर त्याला राज्य शासनाकडून जरुर मदत केली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र त्या वेळी चव्हाण यांना त्यांचेच एक ‘आदर्श’सहकारी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याच विषयी केलेल्या घोषणेचा आणि त्याच्या पूर्ततेचा विसर पडला असल्याची प्रतिक्रिया त्या वेळी साहित्य रसिकांमध्ये उमटली होती. 

मार्च २००५ मध्ये मुंबईत झालेल्या राज्य ग्रंथ पुरस्कार वितरण सोहळ्यात तत्कालिन सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मराठी साहित्य अनुवाद अकादमी स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर चव्हाण हे मुख्यमंत्रीही झाले. पण मराठी साहित्य अनुवाद अकादमी अद्याप स्थापन झालेली नाही. महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनीही काही वर्षांपूर्वी राज्य शासनाला मराठीतील उत्तमोत्तम पुस्तके भारतातील अन्य प्रादेशिक भाषेत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचा प्रस्ताव दिला होता. मात्र त्यावरही अद्याप अनुवाद अकादमी स्थापनेच्या स्वरूपात   कार्यवाही झालेली नाही.

दरम्यान या संदर्भात मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, केवळ मराठीतील कथा, कादंबरी नव्हे तर विविध क्षेत्रात (माहिती-तंत्रज्ञान, विज्ञान वगैरे) जे लेखन होते ते मराठीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून मराठीत अनुवाद करण्याची प्रक्रिया सुरू करा, असे निवेदन आम्ही तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सादर केले होते. त्यावरही पुढे काही झालेले नाही. राज्य मराठी विकास संस्था आणि राज्य साहित्य-संस्कृती महामंडळ यांचे काम एकच आहे, असे गृहीत धरून त्यांचे विलिनीकरण करणाऱ्या राज्य शासनाकडून मराठी साहित्य अनुवाद अकादमी स्थापन न होणे हे मराठी भाषा-संस्कृतीविषयी असलेल्या शासकीय अनास्थेला सुसंगत असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.

(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई च्या मुख्य अंकात (९ एप्रिल २०१२)च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झाली आहे)

08 April 2012

व्यवस्थापनाचे विद्यार्थीही गांधी मार्गावर

महात्मा गांधी यांच्या विचारांबाबत दुमत आणि वाद असला तरी आजही महात्मा गांधी यांचे विचार तरुणांना आकर्षित करत असल्याचे पाहायला मिळत आहे. चेतना मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमधील ‘व्यवस्थापन’ या विषयाच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांचे ‘सत्याचे प्रयोग’ हे आत्मचरित्र आणि गांधी विचारांच्या अन्य पुस्तकांच्यादहा हजारांहून अधिक प्रतींची विक्री केली आहे. याची किंमत सुमारे सव्वा पाच लाख रुपये इतकी आहे.   


‘व्यवस्थापन’च्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ‘जागृती’ या उपक्रमात ३६० विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी  मुंबईतील विविध शॉपिंग मॉल्स, कॉर्पोरेट ऑफिसेस् आणि वांद्रे येथील महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी, आयकर भवन, कॅनरा बॅंक, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अ‍ॅक्सिस बॅंक आणि अन्य महत्वाच्या ठिकाणी पुस्तकांच्या विक्रीसाठी स्टॉल उभारले आणि ही पुस्तके विकली.  प्रा. अपर्णा राव, डॉ. प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हा आगळा उपक्रम पार पडला. मुंबई सवरेदय मंडळ आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग यांचेही विशेष सहकार्य या उपक्रमास लाभले होते.

४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत झालेल्या या उपक्रमाची आखणी, प्रायोजकत्व, व्यवस्थापन, विपणन, विक्री आदी सर्व बाजू विद्यार्थ्यांनीच सांभाळल्या होत्या. व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना विक्री, व्यवस्थापन आणि विपणन यांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठीसह हिंदूी, इंग्रजी, गुजराती भाषेतील महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र (सत्याचे प्रयोग) ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी लिहिलेले ‘टाईमलेस इन्स्पिरेटर-रिलिव्हिंग गांधी’, राम प्रताप लिखित ‘गांधीयन मॅनेजमेंट’ पुस्तकांची विक्री या विद्यार्थ्यांनी केली.

महात्मा गांधी हे ‘भारतीय व्यवस्थापन गुरू’म्हणून ओळखले जातात. हॉवर्ड विद्यापीठात ‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांना महात्मा गांधी विचारांचा, त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो. गांधी विचार नेमका काय आहे, हे आपल्याही विद्यार्थ्यांना कळावे तसेच आपले शिक्षण हे नुसते पुस्तकी असता कामा नये तर ते विचार, मन आणि कृतीतून झाले पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे उपक्रमाच्या समन्वयक प्रा. अपर्णा राव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

दरम्यान उपक्रमाच्या समारोपा निमित्त येत्या १० एप्रिल रोजी शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व) येथील चेतना मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट मध्ये सकाळी ११ वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ गांधीवादी आणि निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.    
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबईच्या मुख्य अंकात पान क्रमांक २ वर ८ एप्रिल २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे)