23 November 2010

मराठी संग्रहालयाने जपलाय दुर्मिळ ग्रंथाचा खजिना

मराठी साहित्य आणि ग्रंथव्यवहारात ११७ वर्षांचा वारसा लाभलेल्या मराठी ग्रंथसंग्रहाय, ठाणे यांनी दुर्मिळ ग्रंथांच्या खजिन्याची जपणूक केली आहे. संस्थेकडे आज सुमारे एक हजार २०० दुर्मिळ ग्रंथ आहेत. ‘प्रेस अ‍ॅक्ट’ कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी (१८६७) प्रकाशित झालेले विविध विषयांवरील ग्रंथ संस्थेकडे आहेत.संस्थेकडे असलेला हा पुस्तकांचा खजिना अत्यंत दुर्मिळ असून, त्याचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातून अभ्यासक आणि विद्यार्थी ठाण्यात येत असतात. हे सर्व ग्रंथ दुर्मिळ असल्याने ते सभासद किंवा अन्य अभ्यासकांना घरी नेता येत नाहीत.

संस्थेकडे असलेल्या या दुर्मिळ पुस्तकांच्या खजिन्यात कादंबरी या गटातील पुस्तके कमी आहेत. सर्वाधिक पुस्तके इतिहास, गणित, ज्योतिष, भूमिती, बीजगणित, मराठी भाषा, व्याकरण, शेती, धर्म, पौराणिक आदी विषयांची आहेत.

ग्रंथसंग्रहालयाकडे असलेल्या खजिन्यात ‘मराठय़ांची खबर’ (१८२९), हिंदुस्थानचा विकास-बाळगंगाधर शास्त्री जांभेकर (१८४६), बाळाजी जर्नादन भानू ऊर्फ नाना फडणीस यांची बखर-मॅग्लोनल्ड (१८२७), दशम स्कंधाच्या आर्या, अथ विराट पर्व आर्या-मोरोपंत (१८४० व १८४८), अशौच विचार-बाळकृष्ण भिकाजी राजवाडे (१८४१), मराठी भाषेचे व्याकरण-दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८३६), मराठी भाषेचे व्याकरण-शास्त्री फडके (१८५०) या आणि अन्य अनेक पुस्तकांचा समावेश आहे.

ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष पां. के. दातार यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले की, संस्थेकडे असे दुर्मिळ सुमारे एक हजार २०० ग्रंथ असून त्यापैकी सुमारे ५० ग्रंथांची आम्ही झेरॉक्स प्रत तयार केली आहे. हे सर्व ग्रंथ दुर्मिळ असल्याने ते सभासद किंवा अन्य कोणाला वाचण्यासाठी घरी देत नाही. ज्यांना हा ग्रंथ पाहायचा आहे, त्याला आम्ही त्याची झेरॉक्स प्रत उपलब्ध करून देतो. तीसुद्धा अभ्यासकाने ग्रंथालयात बसूनच वाचायची आम्ही वाचकाला परवानगी देतो.

संस्थेकडे असलेले सर्व ग्रंथ योग्य पद्धतीने जतन करायचे आहेत. अत्याधुनिक पद्धतीने हे काम करण्याचा विचार आहे. अर्थात त्यासाठी खर्चही खूप आहे. त्यामुळे सध्या तरी जमेल तसे हे काम आम्ही करत असल्याचेही दातार म्हणाले.

पां. के. दातार यांचा संपर्क ०९८३३६१२८४७

मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे दूरध्वनी संपर्क
०२२-२५४०६७८७/२५४४२२५१

ई-मेल info@mgst.in 

(ही बातमी लोकसत्ता-मुंबई व ठाणे वृत्तान्तमध्ये प्रसिद्ध झाली आहे.)

14 November 2010

मराठी अभिमान गीताचे मार्केटिंग

ठाणे येथे पुढील महिन्यात भऱणाऱया ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कौशल इनामदार यांने संगीत दिलेल्या मराठी अभिमान गीताने होणार आहे. हे अभिमान गीत म्हणजे ज्येष्ठ दिवंगत कवी सुरेश भट यांनी लिहिलेली कविता आहे. भट यांची लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी  ही कविता अनेक वर्षांपू्वीच प्रसिद्ध झालेली आहे. या कवितेलाच कौशल यांनी वेगळ्या पद्धतीने चाल लावून आणि अनेक गायकांकडून गाऊन घेऊन मराठी अभिमान गीत म्हणून लोकांपुढे आणले आहे.

खासगी एफएम वाहिन्यांवर मराठी गाणी वाजवली जात नाहीत. त्यामुळे कौशल इनामदार यांनी मराठी भाषेचे अभिमान गीत तयार केले. त्याचे चांगल्या प्रकारे मार्केटिंगही केले गेले. प्रसारमाध्यमानीही त्याला उचलून धरल्यामुळे त्याचा खूप बोलबाला झाला. गेल्या वर्षी पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बीग बी अर्थातच अमिताभ बच्चन यांनीही कौशलचे आणि त्याच्या या अभिमान गीताचे कौतुक केले होते. मला प्रश्न पडतो की या पू्र्वी मराठी भाषा, महाराष्ट्र यांचा गौरव करणारी गाणी झाली नव्हती का, ही लिहिलेली गाणी लोकांच्या मनातून हद्दपार झाली आहेत का, आज ही गाणी कोणाला किंवा तरुण पिढीला आवडत नाही का, जर यांची उत्तर नाही अशी असतील तर कौशल इनामदार यांच्या  अभिमान गीताचे एवढे कौतुक कशासाठी.

राजा बढे यांनी लिहिलेले, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि शाहीर साबळे यांनी अजरामर केलेले जयजय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेले, शंकरराव व्यास यांनी संगीतबद्ध केलेले आणि ज्योत्स्ना भोळे व स्नेहल भाटकर यांनी गायलेले बहु असोत सुंदर की संपन्न की महा प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा  ही दोन गाणी आजही प्रत्येकाच्या ओठावर आहेत.   किंवा महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय राष्ट्र महान कोटी कोटी प्राणांतून उसळतो एक तुझा अभिमान हे गाणेही आजही लोकप्रिय आहे. हे गाणे चकोर आजगावकर यांनी लिहिलेले असून त्याचे संगीत श्रीनिवास खळे यांचे तर स्वर शाहीर साबळे यांचा आहे. राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांनी लिहिलेले मंगल देशा पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा हे गाणेही महाराष्ट्राचे अभिमान गीत होऊ शकते. याचे संगीत वसंत देसाई यांचे असून ते जयंवत कुलकर्णी यांनी गायले आहे. माधव ज्युलीयन यांची मराठी असे आमुची मायबोली हे गाणेही प्रत्येकाला आठवत असलेच

 सर्व सांगताना सुरेश भट यांचे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या कवितेला मला कमी लेखायचे नाही. अन्य महाराष्ट्र गाण्यांप्रमाणेच हे गाणेही लोकप्रिय असून त्याची यापूर्वीच कॅसेट, रेकॉर्डही निघालेली आहे. मला तर कौशल इनामदार यांनी आत्ता या गाण्याला जी चाल लावली आहे त्यापेक्षा याची जुनी चाल अधिक आवडते. त्यात जोश वाटतो.

साहित्य संमेलन आयोजकांना ठाण्यातील साहित्य संमेलनाची सुरुवात महाराष्ट्र गीतानेच करायची होती तर कौशल इनामदारच्या पूर्वी झालेली महाराष्ट्र गीते किंवा सुरेश भट यांचे हे पूर्वीचे गाणे होतेच ना. मग पूर्वसुरींचे देणे असताना नव्या चालीतील हे गाणे ठेवायचा अट्टाहास का. काहीतरी वेगळे करतो आहोत, असे दाखवयाचे म्हणून की कौशल यांच्या या अभिमान गीताचा प्रसारमाध्यमातून बोलबाला झाला आहे म्हणून...

जुनी महाराष्ट्र गीते आणि कौशल इनामदार यांनी संगीत दिलेले मराठी अभिमान गीत यांची तुलना केली असता मला जुनीच गाणी अधिक जोशपूर्ण वाटतात. अर्थात प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. ही सर्व गाणी येथे ऐकण्यासाठी मी खाली काही लिंक दिल्या आहेत.

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे गाणे
 http://www.video4viet.com/music.html?act=play&id=ca6fa56a73ae2b08b807176dc13bf6eb
येथे ऐकता येईल.

बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिय आमुचा हे गाणे
http://www.video4viet.com/music.html?act=play&id=&eid=64cb53bc-0b5b-45cf-b5d7-7027bca3ebd6&title=Priya%20Amucha%20Ek%20Maharashtra%20Desh%20Ha.mp3
 येथे ऐकता येईल.

गोविंदाग्रज यांचे मंगलदेशा पवित्रदेशा हे गाणे
http://www.video4viet.com/music.html?act=play&id=&eid=e639491e-d529-4aeb-99a1-3b0e9d448248&title=12%20Mangal%20Desha%20Pavitra%20Desha%20Maharashtra%20Desha.wma येथे ऐकू शकाल.

आणि या सगळ्या गाण्यांनंतर कौशल इनामदार यांनी संगीत दिलेले हे गाणे ऐका. http://www.youtube.com/watch?v=Txa_J7lPRhg

हे गाणे ऐकल्यानंतर/ पाहिल्यानंतर आता तुम्हीच ठरवा जुनी महाराष्ट्र गाणी की हे गाणे अधिक प्रभावी आणि जोशपूर्ण वाटते.
  

13 November 2010

आता खरी कसोटी

कल्याण-डोंबिवली महापालिकेत अखेर मनसे विऱोधी पक्ष म्हणून विराजमान झाला. पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱया मनसेने शिवसेना, भाजप आणि दोन्ही कॉंग्रेसला धूळ चारली आणि राज ठाकरे यांचे २७ नगरसेवक निवडून आले. पहिल्याच निवडणुकीत मिळालेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.

निवडणुकीच्या काळात राज ठाकरे कल्याण-डोंबिवलीत ठाण मांडून बसले होते. मनसेचे उमेदवार निवडताना त्यांनी जास्तीत जास्त तरुण, सुशिक्षित, उच्चशिक्षितांना संधी दिली. मनसेच्या सर्व उमेदवारांनाही कल्याण-डोंबिवलीत भरभरून मतदान झाले. त्यामुळेच मनसेला सत्ता स्थापन करता आली नसली तरी सर्वात जास्त मते घेतलेला मनसे हाच पक्ष ठरला आहे.

सत्ता दिलीत तर पूर्ण बहुमत द्या, अपक्षांच्या हनुवट्यांना मला हात लावायला लावू नका, असे निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी सांगितले होते. मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले तरी एकहाती सत्ता त्यांना स्थापन करता आली नाही. सत्तेसाठी घोडेबाजार न करता राज ठाकरे यांनी विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय़ घेतला. पण आता त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे.

महापालिका सभागृहात आता त्यांचे २७ नगरसेवक असणार आहेत. त्यामुळे पालिका नियम आणि लोकशाहीची सर्व आयुधे वापरून त्यांनी सत्ताधाऱयांवर अंकुश ठेवला पाहिजे. नागरी हिताची कामे सत्ताधाऱयांकडून करवून घेतली पाहिजेत. मनसे विरोधासाठी विरोध करणार नाही तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करून दाखवू, असेही राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

गेली साडेबारा वर्षे शिवसेना-भाजप युती आणि अडीच वर्षे दोन्ही कॉंग्रेसने राज्य केले आहे. त्यावेळीही महापालिकेत विरोधी पक्ष सक्षम नव्हताच. अनेकदा तर तो सत्ताधाऱयांच्या ताटाखालचे मांजर झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे मनसेची जबाबदारी वाढली आहे. लोकांनी भरभऱून मते देऊन तसेच शिवसेना-भाजपचे पारंपरिक बालेकिल्ले उध्वस्त करत मनसेच्या नवख्या पण सुशिक्षित उमेदवारांना निवडून दिले आहे.

मतदारांनी टाकलेला हा विश्वास मनसेच्या सर्वच्या सर्व म्हणजे २७ नगरसेवकांनी सार्थ करून दाखवावा. पाच वर्षांच्या काळात आपल्या हातून वावगे काही घडणार नाही, सत्ताधाऱयांच्या चुकीच्या धोरणांना साथ देणार नाही याची त्यांनी मनोमन काळजी घेतली पाहिजे.  ज्या प्रभागातून आपण निवडून आलो आहोत, त्या प्रभागीत समस्या, नागरिकांचे प्रश्न यात जातीने लक्ष घातले पाहिजे. निवडणुकीच्या काळात उघडलेली जनसंपर्क कार्यालये बंद न करता दररोज सुरू ठेवावी. त्या कार्यालयात दररोज ठराविक वेळेत मनसेच्या नगरसेवकांनी बसावे, नागरिकांना भेटावे, त्यांच्याशी बोलावे आणि मुख्य म्हणजे आपला नगरसेवक रस्त्यावरून पायी फिरतोय, प्रभागात फिरताना दिसतोय हे पाहायला मिळावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

कोणताही भ्रष्टाचार, भानगडी, टक्केवारी यात आपण गुंतणार नाही याची मनसेच्या सर्व नगरसेवकांनी खबरदारी घ्यावी आणि पाच वर्षांचा कारभार अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शी ठेवावा. असे झाले तरच मतदारांनी मनसेवर आणि त्यांच्या नगरसेवकांवर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरेल आणि या  विश्वासाला तडा जाणार नाही.  राज ठाकरे आणि पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते या बाबत वेळोवेळी नगरसेवकांना मार्गदर्शन करतीलच. कल्याण-डोंबिवलीतील सर्वसामान्य मतदारांना आता मनसेकडून खूप अपेक्षा आहेत. मनसेची आता खरी कसोटी आहे...

25 September 2010

पूर्वजांचे स्मरण करणारा पितृपंधरवडा

अनंत चतुर्दशीनंतर असलेली पौर्णिमा संपली की त्या दिवसापासून सुरू होणारा पंधरवडा हा ‘पितृपंधरवडा’ म्हणून ओळखला जातो. पंचागानुसार सांगायचे झाले तर भाद्रपद महिन्यातील भाद्रपद कृष्ण एक ते भाद्रपद अमावास्या हा पंधरवडा पितृपंधरवडा म्हणून पाळण्यात येतो.

पितृपंधरवडा म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्मरण करणारा, त्यांची आठवण ठेवून श्राद्धविधी करण्याचा पंधरवडा मानण्यात येतो. गणेशोत्सव संपल्यानंतर सुरू होणारा पितृपंधरवडा हा काही जणांच्या दृष्टीने शुभकार्यासाठी निषिद्ध मानण्यात येतो. त्यामुळे या पंधरा दिवसांत कोणतेही शुभकार्य, नवीन खरेदी, लग्न जुळविणे, गृहखरेदी इत्यादी कामे केली जात नाहीत.

 गणेशोत्सवकाळात किंवा पितृपंधरवडा संपल्यानंतर सुरू होणारा नवरात्रौत्सव, दसरा किंवा दिवाळीत व्यापारी, दुकानदार यांच्यादृष्टीने ‘खरेदीचा सीझन’ तेजीत असतो. या दिवसात बाजारपेठेत अक्षरश: कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते. तर पितृपंधरवडय़ाचा कालावधी नवीन खरेदी आणि व्यापाऱ्यांसाठी मंदीचा काळ समजला जातो.


धार्मिक ग्रंथांत दिलेल्या माहितीनुसार आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता किंवा आदर व्यक्त करण्याच्या या दिवसांना पितृपंधरवडा किंवा श्राद्धपक्ष असे म्हटले जाते. यंदाच्या वर्षी २४ सप्टेंबरपासून पितृपंधरवडा सुरू झाला असून तो ७ ऑक्टोबपर्यंत आहे. ७ ऑक्टोबर रोजी भाद्रपद अमावास्या असून ती सर्वपित्री अमावास्या म्हणूनही ओळखली जाते.

कोणाला पितृपंधरवडय़ात पूर्वजांचे स्मरण करण्यास जमले नाही, या काळात श्राद्ध करता आले नाही तर किमान शेवटच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावास्येला तरी ते केले जावे, असे मानले जाते. पितृपंधरवडय़ात ज्या तिथीला व्यक्ती निधन पावली असेल त्या तिथीला श्राद्ध, तर्पण असे विधी केले जातात. जेवणाचे ताट कावळ्यासाठी ठेवले जाते. कावळ्याच्या रुपाने ते आपल्या पितरांना पोहोचते, अशी समजूत आहे.

पितृपंधरवडय़ात आपल्या पितरांचे स्मरण आणि पूजन केले तर त्यांना गती मिळते, ते संतुष्ट होतात अशी सर्वसामान्यांची श्रद्धा आहे. या काळात आपले पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियांकडे येत असतात. त्यामुळे या दिवसांत ती व्यक्ती निधन झालेल्या तिथीला श्राद्ध, तर्पण केले तर आपले पितर सुखी होतात, आपल्या कुटुंबियांनी आपली आठवण ठेवली आहे, हे पाहून त्यांना आनंद होतो, अशी पूर्वापार समजूत हिंदू धर्मात आहे. त्यामुळेच हिंदू धर्मात पितृपंधरवडय़ाला खूप महत्त्व आहे.

 पितृपंधरवडय़ाच्या काळात भाद्रपद कृष्ण नवमी ही अविधवा नवमी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद त्रयोदशी / चतुर्दशी या दिवशी शस्त्राने मरण पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध केले जाते. या कालावधीत निधन पावलेल्या व्यक्तीच्या नावाने श्राद्ध, तर्पण केले जाते.

रुढी-परंपरेचा पगडा असणारी किंवा हे केल्याने आपले काही नुकसान तर होणार नाही ना, मग परंपरेने जे सांगितले आहे, ते केले तर काय बिघडले? असे मानणाराही मोठा वर्ग समाजात आहे. तो कोणत्याही एका विशिष्ट जातीचा नाही. हिंदू धर्मातील बहुतेक प्रत्येक जातीमध्ये त्यांच्या परंपरेनुसार पितृपंधरवडय़ात पितरांचे स्मरण केले जाते. तर काही मंडळींचा या गोष्टींवर विश्वास नसतो. त्यांच्या दृष्टीने हे सर्व थोतांड असून काही मूठभर मंडळींनी धर्माच्या नावावर पैसे कमाविण्यासाठी निर्माण केलेल्या रूढी व परंपरा असल्याचेही त्यांचे म्हणणे असते. त्यामुळे ही मंडळी कोणताही धार्मिक विधी किंवा कर्मकांड न करता आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने समाजातील स्वयंसेवी संस्था, वृद्धाश्रम, अनाथाश्रमाला किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला पैशांच्या, कपडय़ांच्या स्वरूपात मदत करतात.

समाज कितीही पुढारला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी धार्मिक रूढी आणि परंपरांचा पगडा जोपर्यंत आपल्या समाजावर आहे तोपर्यंत पितृपंधरवडा पाळला जाणार. फक्त त्यात काळानुरूप काही बदल होत जातील हे नक्की.
 
(माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २५ सप्टेंबर २०१० च्या अंकात पान-१ वर प्रसिद्ध झाला आहे)

24 September 2010

साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक-विद्यमान पद्धतीला सध्यातरी पर्याय नाही

विद्यमान पद्धतीला सध्यातरी पर्याय नाही

मुंबई मराठी साहित्य संघाकडे व्यक्त झाला सूर


संमेलनाध्यक्षपद निवडणूक

प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदाच्या विद्यमान निवडणूक पद्धतीत बदल व्हावा, अशी चर्चा होत असली तरी विद्यमान निवडणूक पद्धतीला सध्यातरी सक्षम आणि ठोस पर्याय नाही, असा सूर या संदर्भात मुंबई मराठी साहित्य संघाकडे व्यक्त झाला असल्याची माहिती संघाच्या सूत्रांकडून देण्यात आली. मुंबई मराठी साहित्य संघ ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून विद्यमान निवडणूक पद्धतीविषयी संघाने मान्यवरांची मते जाणून घेतली होती. त्यातून उपरोक्त सूर व्यक्त झाला आहे.

साहित्य संमेलन आणि अध्यक्षपदाची निवडणूक हा कायम वादाचा विषय राहिला आहे. महामंडळाच्या घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थेचे मतदार तसेच संमेलन आयोजक निमंत्रक संस्थेचे पदाधिकारी संमेलनाध्यक्ष निवडणुकीत मतदान करतात. मात्र ही संख्या खूप कमी आहे. यंदाच्या वर्षी सुमारे ७९० मतदार मतदान करणार आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष इतक्या कमी संख्येत असलेल्या मतदारांनी ठरवणे हे योग्य नसल्याची टीका करण्यात येते. तसेच संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक होत असल्याने काही ज्येष्ठ साहित्यिकांना ही पद्धत मान्य नसल्याने त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे यात काही बदल करता येईल का, अशी चर्चा नेहमी सुरू असते. त्या पाश्र्वभूमीवर मुंबई मराठी साहित्य संघाने ही मते जाणून घेतली होती. साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष, मान्यवर साहित्यिक आणि साहित्यविषयक संबंधित घटकांकडे संमेलनाध्यक्षपद निवडीच्या विद्यमान पद्धतीविषयी मते जाणून घेतली होती. त्यावेळी विद्यमान निवडणूक पद्धतीत काही त्रुटी असल्या तरी सध्या योग्य आणि सक्षम पर्याय समोर नसल्याचे मत या मंडळींनी व्यक्त केले होते.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या मंडळींची नावे मागवायची आणि महामंडळाच्या कार्यकारिणीत त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करायचे. म्हणजे निवडणूक न होता संमेलनाध्याची निवड करता येईल, असा एक पर्याय समोर आला होता. मात्र त्यामुळे आणखी वाद आणि गोंधळ उडेल, असे एक मत पुढे आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आलेल्या नावांमधून केवळ एका नावाची निवड करायची झाल्यास कार्यकारिणीतील सदस्यांवर राजकीय किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ शकतो किंवा प्रादेशिकतेचा विचार करूनही एखाद्याची निवड केली जाऊ शकते. तसे होण्यापेक्षा विद्यमान पद्धतीत काही त्रुटी असल्या तरी मतदान लोकशाही पद्धतीने होत असल्याने तक्रार करायला वाव नाही.

ही प्रक्रिया राबवताना जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सध्या तरी हीच पद्धत योग्य वाटते. एकूण मतदार संख्येत वाढ करणे हा पर्याय विचार करण्यासारखा असल्याचे मतही व्यक्त करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २४ सप्टेंबर २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे)

22 September 2010

देवा तुझ्या दारी आलो...

गीतगणेश-९

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या ‘गीतगणेश’ लेखमालिकेत आजच्या शेवटच्या भागात ‘देवा तुझ्या दारी आलो’ हे गाणे घेतले आहे. ‘उलाढाल’ या चित्रपटासाठी संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले हे गाणे जबरदस्त हीट झाले आहे.

विविध वाहिन्यांवरील संगीतस्पर्धेत सहभागी स्पर्धकांकडून तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतही ते हमखास गायले आणि वाजवले जाते. हे गाणे स्वत: अजय गोगावले यांनी गायले असून ‘अजय-अतुल’ यांच्या खास शैलीमुळे गाण्याला एक वेगळेच परिमाण मिळाले आहे.


‘नटरंग’ या चित्रपटातील ‘आता वाजले की बारा’, ‘अप्सरा आली’, ‘नटरंग उभा’ लोकप्रिय झालेल्या गाण्याप्रमाणेच त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘सावरखेड एक गाव’, ‘अगबाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘साडेमाडेतीन’, ‘एक डाव धोबीपछाड’ या चित्रपटातील गाण्यांनाही रसिकांची दाद मिळाली. ‘जोगवा’ या चित्रपटासाठी अजय-अतुल यांना सवरेत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

संगीतकार अजय-अतुल हे दोघे भाऊ असून त्यांनी संगीत दिलेला ‘विश्वविनायक’ हा अल्बमही खूप गाजला. श्रीगणेशावरील असलेल्या या आल्बमधील गाणी एस. पी. बालसुब्रमण्यम, शंकर महादेवन यांनी गायली आहेत.

‘उलाढाल’ चित्रपटातील हे गाणे ऐकताना आपणही त्यात रंगून जातो. ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली अनेक गाणी, लावण्या मराठी संगीत रसिकांच्या मनात घर करून आहेत. ‘अष्टविनायक’ या चित्रपटातील लोकप्रिय ठरलेले ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायकांचा महिमा सांगणारे गीत खेबुडकर यांनीच लिहिले आहे.
 
‘उलाढाल’मधील ‘देवा तुझ्या दारी आलो’ हे गणपतीवरील त्यांचे आणखी एक गाजलेले गीत. साधी, सोपी परंतु सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारी आणि गुणगुणायला लावणारी शब्दरचना हे खेबुडकर यांच्या आजवरच्या गीतांचे प्रमुख वैशिष्टय़. तीच परंपरा खेबुडकर यांनी ‘देवा तुझ्या दारी आलो’ मध्येही जपली आहे.
 
अजय-अतुल गोगावले बंधुंमध्ये अजय हे गातातही. ‘नटरंग’ मधील ‘खेळ मांडला’, ‘सावरखेड एक गाव’ मधील ‘आई भवानी तुझ्या कृपेने’, ‘मल्हारवारी’ ही त्यांनी गायलेली गाणी रसिकांना परिचयाची आहेतच. त्यात ‘देवा तुझ्या दारी आलो’चाही समावेश होतो.
 
हे गाणे ऐकताना प्रत्येकजण गणपतीच्या भक्तीत अक्षरश: न्हाऊन निघतो. गाण्याच्या सुरुवातीला अजय यांनी आपल्या आर्त स्वरातून गणपतीला घातलेली ‘देवा तुझ्या दारी आलो’ ही साद आणि ‘मोरया मोरया’ हा गजर गणेशभक्तांच्या मनाचा ठाव घेतो. ‘शिवगर्जना’ या प्रसिद्ध ढोल-पथकाच्या साथीने अजय-अतुल यांनी या लोकप्रिय ठरलेल्या गाण्याचे ध्वनिमुद्रण केले आहे.
 
गाण्याचा शेवट ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोटय़ानकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी’ या पारंपरिक श्लोकाने करण्यात आला आहे.
 
गाण्यातील ढोल-ताशा, मोरया-मोरयाचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’ हा जयजयकार, तुतारीचा निनाद आणि शेवटच्या गजर आपल्याही मनात नकळत वीररस आणि गणेशभक्ती निर्माण करतो. खेबुडकरांचे शब्द, अजय-अतुल यांचे संगीत व अजय यांचा स्वर असा सुंदर मिलाफ या गाण्यात झाला आहे.
 
हे संपूर्ण गाणे पुढीलप्रमाणे
 
देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्याइना माणसाचा जन्म जाई वाया
ए देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया, तुझी समिंदराची माया
मोरया, मोरया ।।ध्रु।।
 
ओंकाराचं रुप तुझं चराचरामंदी
झाडं, येली, पानासंग फुल तू संगंधी,
भक्तांचा पाठीराखा, गरिबांचा वाली
माझी भक्ती, तुझी शक्ती एकरूप झाली
देवा दिली हाक, उद्धार कराया ।।१।।
 
आदि अंत तूच खरा, तूच बुद्धिदाता
शरण आलो आम्ही तुला पायावर माथा
डंका वाजे दहा दिशी गजर नामाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
देवा दिली हाक उद्धार कराया ।।२।।
 
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी 
 
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २२ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे)

21 September 2010

ओंकार प्रधान रुप गणेशाचे...

गीतगणेश-८

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणेश देवतेचे आपल्या लेखणीद्वारे अनेकांनी गुणगान केले आहे. कवी, गीतकार, शाहीर यांच्यासह महाराष्ट्रातील संतांनीही आपल्या अभंगांतून आणि काव्यातून गणपतीचे वर्णन केले आहे.

संत ज्ञानेश्वरांनी गणपतीचे वर्णन ‘ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या’ असे केले आहे. ज्ञानेश्वरांप्रमाणेच अन्य संतांनीही गणेशाला वंदन केले असून त्यात संत तुकारामही आहेत. संत तुकाराम यांची ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ ही रचना गणपतीचे भक्त आणि संगीतप्रेमी रसिकांनाही परिचयाची आहे. याचे संगीत कमलाकर भागवत यांचे असून स्वर सुमन कल्याणपूर यांचा आहे.


कमलाकर भागवत हे जुन्या पिढीतील प्रतिभावान संगीतकार. त्यांची खूप गाणी गाजली. अनेक वर्षांनंतरही भागवत यांनी संगीतबद्ध केलेली गाणी रसिकांच्या स्मरणात आहेत. यात ‘उठा उठा चिऊताई’, ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’, ‘दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट’, ‘देह जावो अथवा राहो’ आदी तसेच इतरही अनेक गाण्यांचा समावेश आहे.

खरे तर तुकाराम, नामदेव, एकनाथ आदी सर्व संतांनी विठ्ठलाची भक्ती आणि स्तुती केली. या सर्व संतांनी विठ्ठलाला आपला सखा मानले. आपले सुख-दु:ख त्याला सांगितले. ज्ञानेश्वर आणि तुकारामांसह सर्व संतांचे अभंग मराठी भाषा आणि संस्कृतीत अढळ स्थान मिळवून आहेत.

 इतक्या वर्षांनंतरही त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा, जातीभेद, विषमता यांच्यावरही संतांनी आपल्या अभंगांतून आसूड ओढले आहेत. तुकारामांचे ‘सुंदर ते ध्यान’, ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’, ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’, ‘कन्या सासुरासी जाये’, ‘खेळ मांडियला वाळवंटी काठी’, ‘जे का रंजले गांजले’ आणि इतरही अनेक अभंग प्रसिद्ध आहेत.

 संत तुकाराम यांचे बहुतांश अभंग ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी ‘अभंग तुक्याचे’ या कॅसेटमध्ये संगीतबद्ध केले आहेत. लता मंगेशकर यांच्या आवाजात ते प्रसिद्ध आहेत.

‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ ही तुकारामांची रचना संगीतकार कमलाकर भागवत आणि गायिका सुमन कल्याणपूर यांच्यामुळे अधिक प्रसिद्ध झाली आहे. गणपतीची स्तुती असलेला तुकारामांचा हा अभंग अवघ्या चार कडव्यांचा आहे. ‘ओम’ हा शब्द आप जेव्हा उच्चारतो तेव्हा अ, उ आणि म हे स्वर म्हणत आपण ‘ओम’चा उच्चार करतो. ओंकार हेच गणेशाचे मुख्य स्वरूप असून ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन प्रमुख देवांचे ते जन्मस्थान आहे. हे तीनही देव अनुक्रमे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे प्रतीक आहेत. सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. गणपती किंवा गजाजन हा मायबाप असल्याचेही तुकाराम या अभंगात सांगतात.
 
मन प्रसन्न करणारा सुमन कल्याणपूर यांचा स्वर आणि कमलाकर भागवत यांचे संगीत यामुळे हे गाणे ऐकताना आपणही अगदी तल्लीन होऊन जातो.
 
हा अभंग पुढीलप्रमाणे
 
ओंकार प्रधान रुप गणेशाचे
गे तिन्ही देवांचे जन्मस्थान ।।ध्रु।।
 
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू
मकार महेश जाणियेला ।।१।।
 
ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप ।।२।।
 
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
पाहावी पुराणे व्यायाचिया ।।३।। 
 
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २१ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख गीतगणेश या लेखमालिकेत प्रसिद्ध झाला आहे)

19 September 2010

विनायका हो सिद्ध गणेशा...

गीतगणेश-७

तमाशामधील गण-गौळण किंवा वगामधील नमन असो, येथेही गणपतीचे स्तवन आणि गुणगान केलेले पाहायला मिळते. शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमात सादर होणारे ‘पयलं नमन, आम्ही करितो वंदन’हे सगळ्यांना परिचित असून यातच गणपतीला रंगमंचावर नृत्य करतानाही दाखवले आहे.

ज्येष्ठ गायक रामदास कामत यांच्या स्वरातील गणेशाचे ‘विनायका हो सिद्ध गणेशा’ हे गाणे लोकप्रिय आहे. हे गीत अशोकजी परांजपे यांचे असून संगीत विश्वनाथ मोरे यांचे आहे. मराठी संगीत रंगभूमीवरील गायक-अभिनेते म्हणून कामत परिचित आहेत.

अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदाचाही बहुमान त्यांना मिळाला होता. कामत म्हटले की ‘मयुरा रे फुलवित ये रे पिसारा’, ‘गुंतता हृदय हे’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे’ अशी अनेक गाणी रसिकांच्या पटकन ओठावर येतात. या गाण्यांप्रमाणेच कामत यांच्या स्वरामुळे ‘विनायका हो सिद्ध गणेशा’ हे गाणेही खूप लोकप्रिय आहे.

परांजपे यांची लिहिलेली अनेक गाणीही रसिकांच्या स्मरणात असून त्यात ‘विनायका हो सिद्ध गणेशा’ या गाण्यासह ‘अवघे गर्जे पंढरपूर’, ‘केतकीच्या बनी तेथे नाचला मोर गं’, ‘नाविका रे वारा वाहे रे’, आदी गाण्यांचा समावेश आहे.

संगीतकार मोरे यांनी संगीत दिलेले ‘गोंधळात गोंधळ’, ‘मायमाऊली’, ‘भालू’ आदी चित्रपटांतील ‘हा सागरी किनारा’, ‘सावध हरिणी सावध गं’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ आणि इतर अनेक गाणी गाजली आहेत.


‘विनायका हो सिद्ध गणेशा’ हे गाणे शास्त्रीय संगीताच्या अंगाने जाणारे असून मोरे यांचे वेगळ्या धाटणीचे संगीत, कामत यांचा दमदार आवाज व परांजपे यांची सुगम शब्दरचना यामुळे हे गीत लक्षात राहते. गण-गौळण, वग, तमाशाच्या प्रारंभी गणेशाचे नमन आणि गुणगान केले जाते.

या गाण्यातही गणपतीला रंगसभेसाठी आमंत्रण दिले असून त्याचा आशीर्वाद मागितला आहे. हा गणपती कसा आहे तर तो लंबोदर असला तरी नृत्यविशारद असून त्याच्या हातात परशू आहे. कमरेला नाग बांधलेला असून अशा या गणेशाने रंगसभेला, कार्यक्रमाला यावे, असे आवाहन कवीने केले आहे. ‘अपराधाला घाला पोटी’ अशी विनंतीही कवीने केली आहे.

 गणेशोत्सवाप्रमाणेच हे गाणे अनेकदा आकाशवाणीवरून प्रसारित होत असते. रामदास कामत यांचा स्वर, विश्वनाथ मोरे यांचे संगीत आणि अशोकजी परांजपे यांनी लिहिलेल्या शब्दातून हे गाणे शांतपणे ऐकताना आपल्या डोळ्यासमोर जणू ती रंगसभा आणि साक्षात गणपती उभा राहतो. हेच या गाण्याचे यश आहे.

हे संपूर्ण गाणे पुढीलप्रमाणे

विनायका हो सिद्ध गणेशा
रंग सभेला या तुम्ही या
पक्षी गाती घरटय़ामधूनी
आशिर्वच हो द्या तुम्ही द्या ।।१।।

नृत्य विशारद तुम्ही लंबोदर
हाती शोभे परशु तोमर
नाग कटिला बांधून या ।।२।।

अपराधाला घाला पोटी
तुमच्या माझ्या प्रेमासाठी
रसिकाशी ही भेटी गाठी
काव्यसुधा ही प्राशुनी ओठी
तृप्त मनाने ढेकर द्या ।।३।।

आम्ही बालक तव गुणगायक
कृपावंत हो प्रभू गुणग्राहक
प्रसाद हाती घेऊनी या ।।४।।

(लोकसत्ता- रविवार वृत्तान्तमध्ये १९ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे)

18 September 2010

बाप्पा मोरया रे

गीतगणेश-६

मराठी किंवा हिंदी चित्रपट संगीतात अनेक संगीतकारांनी लोकसंगीताचा वापर मोठय़ा कल्पकतेने करून घेतला आहे. ज्या संगीतकारांनी चित्रपटातील गाण्यांना लोकसंगीतातील ठेका किंवा संगीत वापरले ती गाणी अमाप लोकप्रिय झाली. एवढेच नव्हे तर अनेक वर्षांनंतरही आजही अशी गाणी लोकप्रिय असून त्या गाण्यांवर रसिकांचे पाय थिरकायला लागतात. पहाडी आवाजासह गाण्याच्या वेगळ्या शैलीमुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेले दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली सर्व गाणी लोकप्रिय झाली.


‘ऐका सत्यनारायणाची कथा’, पाऊले चालती पंढरीची वाट’, ‘चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी’ आणि शिंदे यांची इतर गाणीही सार्वजनिक उत्सवांमध्ये हमखास वाजविली जातात. विशेषत: ग्रामीण भागांत प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली गाणी हमखास वाजतातच. आजच्या ‘गीतगणेश’ मध्ये शिंदे यांनी गायलेल्या ‘तूच सुखकर्ता, तूच द:ुखहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे’ या गाण्याविषयी. हे गीत हरेंद्र जाधव यांनी लिहिले आहे. त्याचे संगीत मधुकर पाठक यांचे असून ते गायले आहे, अर्थातच प्रल्हाद शिंदे यांनी.

गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडपांमधून किंवा गणपतीच्या आगमन-विसर्जन मिरवणुकीच्या वेळी बॅण्ड, ढोल-ताशा किंवा डिजेंकडून वाजविल्या जाणाऱ्या गाण्यांमध्ये प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्यांचा समावेश असतो. अनेक वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. गाण्याच्या माध्यमातून सर्वसामान्य भक्ताच्या मनातील भावना गीतकार हरेंद्र जाधव यांनी व्यक्त केली आहे.

गाण्यात कठीण शब्द अजिबात नाहीत. सर्वसामान्यांचे जगणे, ते करत असलेली गणपती बाप्पाची भक्ती आणि गरिबांची व्यथा, त्यांच्या मनातील संवेदना जाधव यांनी या गाण्यातून व्यक्त केली आहे. हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारा गणपतीचा भक्त त्याची व्यथा गणपतीकडे मांडतो आहे आणि हाच गणपती बाप्पा आपल्याला सुखाचे दिवस नक्की दाखवेल, असा आशावादही त्याच्या मनातून व्यक्त होत आहे.

‘तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता’ हे लोकगीत असून लोकगीतामध्ये असलेला विशिष्ट संगीताचा ठेका, उडती चाल आणि गाणे ऐकायला सुरुवात केल्यानंतर आपल्याही नकळत ताल धरायला लागणारी आपली पावले हे यश संगीतकार मधुकर पाठक आणि आपल्या पहाडी आवाजाने या गाण्याला लोकप्रिय करणारे प्रल्हाद शिंदे यांचे आहे.

हे संपूर्ण गाणे असे
 
तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता अवघ्या दीनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवीतो माथा ।।ध्रु।।
 
पाहा पुरे झाले हो एक वर्ष, वर्षाने होतो एकदाच हर्ष
गोड अन्नाचा होतो स्पर्श, घ्यावा जाणूनी परामर्ष
पुऱय़ा वर्षाची. साऱया दुखाची, वाचावी कशी ही गाथा ।।१।।
 
पाहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ
गुळ, फुटाणे, खोबरं नी केळ, साऱया प्रसादाची केली भेळ 
कर रक्षण आणि भक्षण, तूच पिता आणि तूच माता ।।२।।
 
नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख साऱया घराचे, कधी येतील दिवस सुखाचे
सेवा जाणूनी, गोड मानुनी, द्यावा आशिर्वाद आता ।।३।।
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १८ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे)      
  

17 September 2010

तू सुखकर्ता तू दुखहर्ता

गीतगणेश-५

गणपती, त्याची भक्ती, महिमा यावर आधारित ‘अष्टविनायक’ हा मराठी चित्रपट आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्या ना कोणत्या वाहिनीवर हा चित्रपट दरवर्षी एकदा तरी दाखवला जातोच. या चित्रपटातील सर्वच गाणी गाजली. गणपतीविषयक चित्रपटातील तीन गाणी आजही रसिकांच्या ओठावर असून सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव किंवा गणपतीच्या दिवसात वाहिन्यांवरून सादर होणाऱ्या कार्यक्रमात तसेच मराठी वाद्यवृंदातूनही या तीनपैकी एखादे गाणे सादर होतेच.

‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ या गाण्याला वेगवेगळ्या गायकांनी आवाज दिला असून ते महाराष्ट्रातील विविध संगीत लोकप्रकारात गुंफण्यात आले आहे. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या या गाण्याची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही.


याच चित्रपटातील ‘प्रथम तुला वंदितो’ हे गाणेही खूप छान आहे. शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेले हे गाणे पं. वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायले असून त्यास अनिल-अरुण यांचे संगीत आहे. चित्रपटात पडद्यावरही स्वत: वसंतराव देशपांडे यांच्यावरच हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.

‘अष्टविनायक’ चित्रपटातील गणपतीविषयक ‘तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता’ या गाण्याचा आजच्या ‘गीतगणेश’मध्ये विचार करणार आहोत. हा चित्रपट १९७९ मध्ये प्रदर्शित झाला होता. म्हणजे आज त्याला ३१ वर्षे झाली. तरीही चित्रपटातील या गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही हे विशेष.

‘तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता’ हे गाणे मधुसूदन कालेलकर यांनी लिहिले असून संगीत अनिल-अरुण यांचे आहे. पं. वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांनी हे गाणे गायले आहे. गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती मानला जातो. गणपती हा सुख देणारा आणि जीवनातील दु:ख, संकटे हरण करणारा आहे.
 
कालेलकर यांनी या गाण्यात गणपतीला ‘तूच कर्ता आणि करविता’ असे म्हटले आहे. या गाण्यातून कालेलकर यांनी गणपतीची काही नावे सुंदरतेने गुंफली असून गणपती दैवत कसे आहे ते सांगून गणपतीजवळ देवा माझा ‘मी’ पणा नष्ट होऊ दे असे मागणेही मागितले आहे.
 
मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेल्या या दोन कडव्यांच्या गाण्याची चाल श्रवणीय आणि मनात घर करणारी असून पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्वरांनी दुग्धशर्करा योग जुळवून आणला आहे.
 
हे संपूर्ण गाणे असे
 
तू सुखकर्ता तू दुखहर्ता
मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया
 
ओंकारा तू , तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धिविनायक
मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक
तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता ।।१।।
 
देवा सरु दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन
नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण
सदैव राहो ओठावरती, तुझीच रे गुणगाथा ।।२।।
 
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १७ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे) 

16 September 2010

गजाननासी वंदन करुनी

गीतगणेश-४

मराठी रंगभूमीवरील नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून दिवंगत बाळ कोल्हटकर यांचे नाव सर्वाना परिचित आहे. त्यांच्या ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘देव दिनाघरी धावला’ या नाटकांनी मराठी रंगभूमीवर आपला स्वतंत्र ठसा उमटवला. कुटुंबातील सर्वाना एकत्र बसून बघता येतील अशी कुटुंबवत्सल, मध्यमवर्गीयांचे भावविश्व दाखवणारी नाटके त्यांनी रंगभूमीवर सादर केली.

त्यांची ‘सीमेवरून परत जा’, ‘देणाऱ्याचे हात हजार’, ‘उघडले स्वर्गाचे दार’ ही नाटकेही रंगभूमीवर गाजली. आजच्या ‘गीतगणेश’ मध्ये कोल्हटकर यांच्या ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकातील एक गीत घेतले आहे.


हे नाटक १९६४ मध्ये रंगभूमीवर आले. त्यात स्वत: कोल्हटकर यांची प्रमुख भूमिका होती. याच नाटकातील हे गणेशगीत. जाहीर कार्यक्रम, प्रकट मुलाखत तसेच दूरदर्शनवरील कार्यक्रमातून कोल्हटकर यांनी हे गीत अनेकवेळा सादर केले. कोल्हटकर यांच्या खास शैलीत सादर होणारे हे गीत आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

हे गाणे स्वत: कोल्हटकर यांनीच लिहिले असून त्याचे संगीतही त्यांचेच आहे. पुढे त्याची कॅसेट निघाली आणि त्यात हे गाणे प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांनी गायले. साधी व सोपी आणि प्रासादिक शब्दरचना हे या गाण्याचे वैशिष्टय़. कोल्हटकर हे गाणे त्यांच्या खास शैलीत सादर करायचे. गणेशोत्सवाच्या काळात सध्या हे गाणे फारसे वाजवले जात नसले तरी एकेकाळी ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ हे नाटक आणि त्यात कोल्हटकर यांनी सादर केलेले हे गीत खूप गाजले होते.
 
गजाननाला वंदन करोनी
सरस्वतीचे स्तवन करोनी
मंगल शिवपद मनी स्मरोनी
सद्भावाने, मुद्रीत मनाने
अष्टांगाची करोनी ओंजळ
वाहतो ही दुर्वांची जुडी
 
अभिमनाला नकोच जपणे
स्वार्थासाठी नकोच जगणे
विनम्र होऊन घालव मनुजा
जीवन हे हर घडी
वाहतो ही दुर्वांची जुडी
 
विघ्न विनाशक गणेश देवा
भावभक्तीचा हृदयी ठेवा
आशिर्वाद हा द्यावा मजला
धन्य होऊ दे कुडी
वाहतो ही दुर्वांची जुडी
 
पार्वती नंदन सगुण सागरा
शंकर नंदन तो दुख हरा
भजनीपुजनी रमलो देवा
प्रतिभा नयनी खडी
वाहतो ही दुर्वांची जुडी
 
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १६ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे)  
 

15 September 2010

अशी चिक मोत्यांची माळ...

गीतगणेश-३

लोकसंगीताचा वापर करण्यात आलेली हिंदी आणि मराठी चित्रपटातील अनेक गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत. लोकसंगीताचा ठेका हाच मुळात रसिकांचे पाय थिरकवणारा असतो. अंगात उत्साह सळसळतो आणि आपली पावले आपोआपच जागेवर थिरकायला लागतात. लोकसंगीताच्या ठेक्यावरील अशाच एका गाण्याने गेल्या काही वर्षांपासून अक्षरश: धुमाकुळ घातला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव, गणपतीचे आगमन किंवा विसर्जन मिरवणूक, लग्नाची वरात ते विविध वाद्यवृंदातूनही याच गाण्याची मागणी असायची. वाद्यवृंद किंवा विसर्जनाची मिरवणूक हे गाणे झाल्याशिवाय पूर्ण व्हायची नाही. तुमच्याही मनात ते गाणे कोणते याची उत्सुकता निर्माण झाली असेल किंवा तुम्ही ते ओळखलेही असेल.

ज्या गाण्यांनी काही वर्षांपूर्वी गणेशोत्सव गाजवला आणि आज इतक्या वर्षांनंतरही ते गाणे ऐकू येते ते म्हणजे ‘अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्याची ग’. काही गाणी अशी असतात की गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्यामुळे ती अजरामर होतात. कित्येक पिढय़ा ते गाणे रसिकांच्या ओठावर राहते. ‘अशी चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची’ या गाण्यालाही असेच भाग्य लाभले आहे.

शाहीर विलास जैतापकर यांनी हे गीत लिहिले असून गाण्याचे संगीत निर्मल-अरविंद यांचे आहे. हे गाणे जयश्री शिवराम व श्रीनिवास कशाळकर यांनी गायले आहे. मूळ गाणे जयश्री शिवराम यांनी गायले असले तरी काही कॅसेट कंपन्यांनी काढलेल्या कॅसेट्स मध्ये हे गाणे गायिका उत्तरा केळकर यांनी गायले आहे.

 उत्तरा केळकर यांच्या ‘बिलनशी नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला’ या गाण्याप्रमाणेच त्यांचे हे गाणेही लोकप्रिय ठरले आहे. गाण्याची साधी व सोपी शब्दरचना आणि पावले थिरकायला लागतील असे संगीत, गाण्यातील विशिष्ट ठेका आणि लोकसंगीतावर आधारित असलेले हे गाणे गणेशोत्सवाच्या संपूर्ण काळात सगळीकडे वाजत असतेच पण शाळा-महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनातूनही यावर समूह नृत्य केले जाते आणि त्याला आत्ताच्या पिढीकडूनही जोरदार दाद मिळते, हेच या गाण्याचे यश आहे.

अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्यांची ग


जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा हो

या चिकमाळेला रेशमी मऊ दोरा ग

मऊ रेशमाच्या दौऱ्यात नवरंगी माळ ओविली ग ।। १।।

अशा चिकमाळेला हिऱ्याचे आठआठ पदर गं

अशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली गं ।। २।।

मोरया गणपतीला खुलुन माळ शोभली ग

अशी चिक माळ पाहून गणपती किती हसला गं ।। ३।।

त्यान गोड हासूनी गोड आशीर्वाद दिला गं

चला करू या नमन गणरायला गं ।। ४।।

(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १५ सप्टेंबर २०१० च्या अंकात गीतगणेशचा हा भाग प्रसिद्ध झाला आहे)

14 September 2010

तुझ्या कांतिसम रक्तपताका

गीतगणेश- २

गणपतीच्या पारंपरिक आरतीबरोबरच मराठी चित्रपटातील गणपतीच्या गाण्यांची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. ‘अन्नपूर्णा’ या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेले आणि संगीतकार स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘तुझ्या कांतिसम रक्तपताका’ हे असेच लोकप्रिय आणि अजरामर झालेले गाणे. या गीताची रचना ‘महाराष्ट्र वाल्मिकी’ ग. दि. माडगुळकर यांनी केलेली आहे. ‘अन्नपूर्णा’ हा चित्रपट १९६८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन आज ४२ वर्षांनंतरही या गाण्याची गोडी कमी झालेली नाही. आजही हे गाणे तितकेच ताजे आणि टवटवीत वाटते.


संगीतकार स्नेहल भाटकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले. हिंदीतील त्यांनी संगीतबद्ध केलेले ‘कभी तनहाईयों में यँू हमारी याद आएगी’ हे त्यांचे गाणे खूप गाजले. मराठीतही त्यांनी ‘रुक्मिीणी स्वयंवर’, ‘चिमुकला पाहुणा’, ‘मानला तर देव’ आदी चित्रपटांना संगीत दिले. त्यातील गाणीही बरीच गाजली. सुमन कल्याणपूर यांनी आपल्या गोड गळ्याने हिंदी आणि मराठी चित्रपट पाश्र्वगायनात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

दोन वर्षांपूर्वी ‘नवचैतन्य प्रकाशन’तर्फे त्यांचे ‘सुमनसुगंध’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. निवेदिका मंगला खाडिलकर यांनी त्याचे शब्दांकन केले आहे. या पुस्तकात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांचा गौरव करताना मंगला खाडिलकर यांनी म्हटले आहे की, शब्दातील ऱ्हस्व व दीर्घ आणि मात्रांचे नेमके भान ठेवून उच्चारण करण्याची सुघट शैली, भक्तीभाव, संस्कार भावना जागविणारे सहज गायन आणि त्यात स्वत: रंगून जाण्याचा स्वभाव यामुळे श्रोत्यांच्या मनावर सुमनताईंच्या गाण्यांचा प्रचंड पगडा आहे. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाबाबत नेमके भाष्य मंगला खाडिलकर यांनी केले आहे.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या अनेक मराठी आणि हिंदी गाण्यांप्रमाणेच ‘तुझ्या कांतिसम रक्तपताका’ हे गाणे लोकप्रिय झाले. ‘अन्नपूर्णा’ या चित्रपटातील पाचही गाण्यांची जबाबदारी स्नेहल भाटकर यांनी अत्यंत विश्वासाने सुमन कल्याणपूर यांच्याकडे सोपवली होती. या गाण्यासाठी सुमन कल्याणपूर यांना ‘सूरसिंगार’ नियतकालिकचा ‘मिया तानसेन पुरस्कार’ मिळाला होता. त्यावेळी स्नेहल भाटकर यांनीसुद्धा सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामुळेच हे गाणे लोकप्रिय झाले, अशा भावना व्यक्त केल्या.

हे गाणे ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. गदिमा यांची शब्दरचना, स्नेहल भाटकर यांचे संगीत आणि सुमन कल्याणपूर यांचा आवाज या तिहेरी संगमामुळे हे गाणे खूप सुंदर आणि श्रवणीय झाले असून इतक्या वर्षांनंतरही या गाण्याची जनमानसावरील मोहिनी कमी झालेली नाही.

हे संपूर्ण गाणे पुढीलप्रमाणे :-

तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती

अरुण उगवला, प्रभात झाली, उठ महागणपती

सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा

सुभग सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा

छेडुनी वीणा जागविते तुज सरस्वती भगवती ।।१।।

आवडती तुज म्हणूनी आणिली रक्तवर्ण कमळे

पाचुमण्याच्या किरणासम ही हिरवी दुर्वादळे

उभ्या ठाकल्या चौदा विद्या घेऊनिया आरती ।।२।।

शुर्पकर्णका, उठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा

तिनही जगाचा तूच नियंता विश्वासी आसरा

तुझ्या दर्शना अधिर देवा हर, ब्रह्म, श्रीपती ।।३।।

(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १४ सप्टेंबर २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे)

11 September 2010

दर्शनमात्रे मन कामनापूर्ती

आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये गणपतीविषयक गाण्यांचा आढावा घेणारी गीतगणेश ही लेखमालिका सुरू झाली आहे. ११ सप्टेंबरच्या मुंबई वृत्तान्तात त्याचा पहिला भाग प्रसिद्ध झाला आहे. तो भाग आजच्या ब्लॉगवर मी देत आहे.

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या श्रीगणेशाचे वर्णन व गुणगान पौराणिक काळापासून विविध प्रकारे करण्यात येत आहे. वेद, उपनिषदे, शहिरी काव्य, संतसाहित्य ते अगदी चित्रपटगीते, सुगम संगीत आणि भक्तीसंगीतातून गणेशाचा महिमा कथन करण्यात आला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मराठीतील गणेशगीतांचा हा आढावा..


गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी गणपतीवरील नव्या आणि जुन्या कॅसेट्स, सीडीज् बाजारात विक्रीसाठी येत असतात. गणपती ही प्राचीन देवता असून वेद, उपनिषदांतूनही गणपतीचे गुणगान करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतानाही गणेशस्तुती केली आहे. त्याचप्रमाणे विविध शाहीर, कवी, गीतकार यांनीही गणपती या दैवतावर काव्यरचना केली आहे. आज सुमारे तीनशे वर्षांनंतरही गणपतीवरील एक रचना लोकप्रिय असून गणेशोत्सवात किंवा घरातील कोणत्याही पूजेच्यावेळी सर्वप्रथम तीच म्हटली जाते. ही रचना समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली असून ती गणपतीची लोकप्रिय आरती आहे. रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या ‘तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची’ या आरतीला गणेशोत्सवात तसेच कोणत्याही मंगलप्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजेतही अग्रमान मिळालेला आहे.

समर्थ रामदास स्वामी हे खरे तर भगवान श्रीरामाचे उपासक आणि परमभक्त. असे सांगतात की, समर्थ रामदास स्वामी हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव या गणेशस्थानी गेले असता गणपतीच्या दर्शनानंतर त्यांनी ही आरती लिहिली. या आरतीची तीन कडवी सर्वत्र म्हटली जात असून ती अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वाना तोंडपाठ आहेत. रामदास स्वामी यांनी या आरतीत गणपतीचे वर्णन केले असून शब्दरचना सोपी आहे. हे गणेशा केवळ तुझ्या दर्शनाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे सांगताना समर्थानी ‘जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मन कामना पूर्ती’ असे म्हटले आहे.

आरतीच्या शेवटी रामदास स्वामी यांनी आपले नाव गुंफले असून ‘दास रामाचा वाट पाहे सदना’ असे सांगून त्याच्याकडे ‘संकटी पावावे निर्वाणी रक्षावे’ अशी आळवणीही केली आहे. रामदास स्वामी यांची रचलेली ही आरती अनेक घरांमधून पारंपरिक चालीत म्हटली जाते. रामदास स्वामी यांची ही रचना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अजरामर केली असून या आरतीची लोकप्रियता आजच्या काळातही कमी झालेली नाही. प्रासादिक शब्दरचना असलेली ही आरती लता मंगेशकर यांनी तितक्याच प्रभावीपणे आपल्या स्वरातून सादर केली आहे. 
 
 गणेशोत्सव आणि लतादिदींच्या आवाजातील ही आरती यांचे अतूट नाते तयार झाले आहे. या आरतीच्या शेवटी मंत्रपुष्पांजली असून ती गायक-संगीतकार यशवंत देव यांनी म्हटली आहे. स्वच्छ, स्पष्ट, शब्दोच्चार आणि आवाजातील भारदस्तपणाने आरतीबरोबरच मंत्रपुष्पांजलीही रसिकांच्या आणि भक्तांच्या मनात घर करून राहिली आहे.

03 September 2010

प्रतीक्षा डोंबिवली-सीएसटी फास्ट ट्रेनची

सुशिक्षितांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीकरांची ओळख ‘सहनशील प्रवासी’ म्हणूनही आहे. शहरातील रिक्षाचालकांची मुजोरी, पदपथ आणि रेल्वेस्थानक परिसरात फेरीवल्यांनी केलेले अतिक्रमण आणि अन्यनागरी प्रश्न डोंबिवलीकर शांतपणे घेतात. हक्काची डोंबिवली लोकल मिळविण्यासाठीही डोंबिवलीकरांना अनेक वर्षे प्रतिक्षा करावी लागली होती. रेल्वे प्रशासनाने काही ना काही कारणे देत हा प्रश्न टोलवत ठेवला होता. अखेर डोंबिवलीहून लोकल सुरू झाली. आता डोंबिवलीकरांना प्रतीक्षा आहे ती डोंबिवलीहून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी (डोंबिवली ते थेट ठाणे आणि पुढे सीएसटी)फास्ट ट्रेन सुटण्याची..


सकाळी ऐन गर्दीच्या वेळी डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाडीत चढणे म्हणजे खरोखरच एक दिव्य असते. डोंबिवली लोकलमुळे डोंबिवलीकरांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला असला तरी या सर्व गाडय़ा ठाण्यापर्यंत स्लो आणि पुढे फास्ट होणाऱ्या आहेत. सकाळच्या वेळेत फलाट क्रमांक तीनवर (अप स्लो) कल्याण, कर्जत आणि कसाऱ्याहून येणाऱ्या गाडय़ा ठाण्यापर्यंत स्लो तर फलाट क्रमांक पाचवर (अप फास्ट)येणाऱ्या गाडय़ा थेट डोंबिवली ते ठाणे व पुढे सीएसटी अशा असतात. सकाळी गर्दीच्या वेळी फलाट क्रमांक तीनवर येणाऱ्या गाडीत कसाबसा प्रवेश तरी करता येतो. मात्र फलाट क्रमांक पाचवर येणाऱ्या फास्ट गाडय़ांमध्ये प्रवेश करणेही कठीण जाते. त्यामुळे अनेक प्रवासी गाडी पकडू शकत नाहीत. कल्याण, कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेने फलाट क्रमांक पाचवर आलेल्या आणि ‘सीएसटी’कडे जाणाऱ्या सर्व गाडय़ा अगोदरच खच्चून भरून येतात. त्यामुळे त्यात प्रवेश करणे ही जिवावरची कसरतच असते. त्यामुळे किमान सकाळी ऐन गर्दीच्या वेळी तरी डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी थेट फास्ट गाडय़ा सोडण्यात याव्यात, अशी डोंबिवलीकर प्रवाशांची मागणी आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर (डाऊन फास्ट) कल्याण, कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेकडे जाणाऱ्या फास्ट गाडय़ा येतात. या गाडय़ा ठाकुर्ली रेल्वे स्थानकात थांबत नाहीत. सकाळी गर्दीच्या वेळी किमान दोन ते चार गाडय़ा फलाट क्रमांक चार वरून ‘सीएसटी’च्या दिशेने सोडता येऊ शकतील. त्यामुळे लाखो डोंबिवलीकर प्रवाशांना दिलासा मिळेल. फलाट क्रमांक चारवर आणण्यात आलेली डोंबिवली लोकल (म्हणजे डाऊन फास्ट ट्रॅकवर आलेली डोंबिवली लोकल; ती अप फास्ट ट्रॅकवर वळवून) ‘सीएसटी’साठी फास्ट लोकल म्हणून सोडता येणे शक्य आहे. फलाट क्रमांक चारवर आणलेली डोंबिवली लोकल अप फास्ट ट्रॅकवर वळविण्यासाठी वेगळे काही करावे लागणार नाही. कारण चारवरून पाचवर (डाऊन फास्ट व अप फास्ट) जाणारा रेल्वेमार्ग जोडलेला आहे.

कधी कामाच्या निमित्ताने साइडिंगला असलेले रेल्वे इंजिन फलाट क्रमांक चारवर आणून ते पुन्हा पाच क्रमांकाच्या फलाटाच्या (डाऊन फास्ट वरून अप फास्ट) रेल्वेमार्गावर वळवले जाते. असे इंजिन वळवताना अनेकदा प्रवाशांनी पाहिलेले आहे. जर हे इंजिन वळवता येऊ शकते तर तशाच प्रकारे डाऊन फास्ट ट्रॅकवर आणण्यात आलेली लोकल अप फास्ट ट्रॅकवर वळवता येणे शक्य आहे. म्हणजेच डोंबिवलीत फलाट क्रमांक चारवर डोंबिवली लोकल आणून ती सीएसटीसाठी फास्ट लोकल म्हणून सोडता येऊ शकते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. सध्याच्या फलाट क्रमांक चारवर ‘सीएसटी’च्या दिशेकडे सिग्नल बसवणे आणि अन्य काही किरकोळ तांत्रिक बदल यासाठी करावे लागतील मात्र ते करणे फारसे कठीण नाही. रेल्वे प्रशासन आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून ते मनावर घेतले तर डोंबिवलीकरांचे डोंबिवलीहून ‘सीएसटी’कडे फास्ट ट्रेनने जाण्याची मागणी पूर्ण करता येऊ शकेल. प्रश्न आहे प्रखर इच्छाशक्तीचा..!

02 September 2010

मराठी पुस्तकांची ऑनलाईन बुकगंगा

मराठी पुस्तके जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अमेरिकास्थित ‘माय विश्व’ या कंपनीतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘बुकगंगा डॉटकॉम’ (www.bookganga.com) या संकेतस्थळाचे उद्घाटन आज मुंबईत ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर यांच्या हस्ते झाले. या संकेतस्थळावर मराठीसह भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणाऱ्या विविध विषयांवरील पुस्तकांची माहिती देण्यात आली असून आपल्याला हवे असेल ते पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्याचीही सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.


माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. या वेळी ‘माय विश्व’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, ‘ग्लोबल मराठी’ या संकेतस्थळाचे संचालक संजय पेठे आदी उपस्थित होते.

‘माय विश्व’ने मराठीसह विविध भारतीय भाषांमधील पुस्तके अ‍ॅपल कंपनीच्या आयपॅडवर वाचण्याची सुविधा ‘आयबुकगंगा’ या खास सॉफ्वेअरच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.

संकेतस्थळाचे उद्घाटन केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. टिकेकर म्हणाले की, आयपॅडच्या मदतीने किंवा थेट बुकगंगा डॉट कॉम या संकेतस्थळावरून मराठी पुस्तके आपण प्रिंट किंवा ई-बुक स्वरुपात विकत घेऊ शकतो. ‘आयपॅड’वर मराठी कविता, कादंबरी, कथा आदी साहित्यप्रकाराबरोबरच संदर्भग्रंथ, संस्कृतीकोश टाकण्यात यावेत.

मंदार जोगळेकर यांनी सांगितले की, सध्या या संकेतस्थळावर सात हजार पुस्तकांची माहिती देण्यात आली असून २५ प्रकाशक सहभागी झाले आहेत. संकेतस्थळावरून वाचकांना हवी ती पुस्तके ई-बुक स्वरूपात डाऊनलोड करून घेता येतील. ‘आयपॅड’ नसले तरी लॅपटॉप किंवा संगणकावरही ऑनलाईन पुस्तके खरेदी करता येतील.

सध्या मराठी, संस्कृत भाषेतील पुस्तके उपलब्ध असून लवकर तामिळ, तेलगु, कन्नड आणि बंगाली भाषेतील पुस्तके येथे मिळू शकतील.

माय विश्वने विकसित केलेल्या खास तंत्रज्ञानामुळे ज्याने पुस्तक विकत घेतले आहे त्यालाच ते त्याच्या संगणक, लॅपटॉप किंवा अ‍ॅपल कंपनीच्या आयपॅडवर वाचता येणार आहे. त्यामुळे पुस्तकांच्या पायरसीला आळा बसू शकेल, असा विश्वासही जोगळेकर यांनी व्यक्त केला.

जोगळेकर यांच्या या उपक्रमामुळे मराठी साहित्य व्यवहार आणि वाचन संस्कृती वाढण्यास मोठी मदत होणार आहे. मराठी पुस्तक प्रकाशकांनी या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवहन ‘ग्रंथाली’चे दिनकर गांगल यांनी या वेळी केले. प्रारंभी संजय पेठे यांनी प्रास्ताविक केले.
(ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १ सप्टेंबर २०१०च्या अंकात पान क्रमांक ३ वर प्रसिद्ध झाली आहे)

01 September 2010

भक्तीमोहिमेची तपपूर्ती

कटरा येथील माता वैष्णोदेवी
महाराष्ट्रात जे महत्व साडेतीन शक्तीपीठांना आहे, तेच महत्व जम्मू-काश्मीरमधील कटरा जिल्ह्यात असलेल्या माता वैष्णोदेवीचे आहे. संपूर्ण भारतात असलेल्या निवडक देवी शक्तीपीठांमध्ये वैष्णोदेवीचा समावेश होतो. दरवर्षी लाखो भक्त ‘जय माता दी’ असा जयजयकार करत मोठय़ा श्रद्धेने वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असतात. वैष्णोदेवीच्या दर्शनाचा मुख्य उद्देश ठेवून त्या अनुषंगाने आजूबाजूच्या काही निवडक ठिकाणांचे दर्शन भाविकांना घडविणाऱ्या ‘माता वैष्णोदेवी यात्रा संघा’ची यंदाची यात्रा नुकतीच पार पडली. यंदा यात्रेचे बारावे वर्ष होते. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर गेली बारा वर्षे संघाचे ही यात्रा अव्याहतपणे सुरू आहे. माता वैष्णोदेवी यात्रा संघ ही मालाड येथील संस्था असून त्यांच्यातर्फे मालाड (पूर्व) येथे प्रती वैष्णोदेवी मंदिर उभारण्यात आले असून दररोज आणि विशेषत: नवरात्रामध्ये तेथे भाविकांची विशेष गर्दी असते. मिठुभाई, राजेश शहा, गिरीश शहा, जगदीश खक्कर, किशोर वर्मा, अनिल हिंगड, हसमुख शेठ आदी मंडळींचा संयोजनात महत्वाचा सहभाग असतो. या मंडळींच्या बरोबर त्यांचे सर्व सहकारी , कार्यकर्ते दरवर्षी उत्साहाने यात्रा आयोजनात सहभागी होत असतात.
वैष्णोदेवीच्या दर्शनला जाताना असे मनोहारी दृश्य पाहायला मिळते

वाटेत अनेक माकडेही दिसतात
माता वैष्णोदेवी यात्रा संघाच्या आयोजनातील एक सदस्य आणि मंदिर व्यवस्थानाचे अध्यक्ष गिरिश शहा यांनी ‘मुंबई वृत्तान्त’ला अधिक माहिती देताना सांगितले की, माता वैष्णोदेवीची यात्रा ही तशी कठीण मानली जाते. तरुण मंडळी यात्रेला सहज जाऊ शकतात. पण अनेकदा वृद्ध नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनात असूनही नेमके कसे जायचे, कोणाबरोबर जायचे याची माहिती नसल्याने त्यांना जाता येत नाही. त्यामुळे मुंबईतून वृद्ध नागरिक आणि कुटुंबासहित सर्वाना एकत्र वैष्णोदेवीच्या यात्रेला जाता यावे, या मुख्य उद्देशाने आम्ही १९९७ मध्ये यात्रेला सुरुवात केली. एक वर्षांचा खंड वगळता गेली बारा वर्षे अव्याहतपणे आमची यात्रा सुरू आहे. पहिल्या यात्रेत अवघे १३५ भाविक सहभागी झाले होते. यात्रेसमवेत आलेली मंडळी, यात्रा संयोजक यांच्या चर्चेतून मालाड येथे प्रती वैष्णोदेवी मंदिर उभारण्याची कल्पना पुढे आली. सर्वाची मदत आणि माता वैष्णोदेवीच्या कृपेमुळे फेब्रुवारी २००१ मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले.

कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिरातून आणलेली अखंड ज्योत मालाड येथील मंदिरात आहे. पहिल्या वर्षांच्या यात्रेमुळे आमचा उत्साहही दुणावला होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी अनुक्रमे २६५ आणि ४५० भाविक यात्रेत सहभागी झाले होते. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात आमची वैष्णोदेवी यात्रा निघते. आम्ही आमच्या यात्रेची कुठेही जाहिरात करत नाही. आमच्या यात्रेबरोबर एकदा आलेला माणूस त्याच्या मित्रांना, नातेवाईकांना आमच्या यात्रेविषयी, त्याच्या आयोजनाबाबत, यात्रेतील जेवणखाण, राहणे आणि अन्य सोयी-सुविधांबाबत माहिती देतो. त्यातून दरवर्षी आम्हाला जास्तीत जास्त संख्येने यात्रेकरू मिळतात. हळूहळू भाविकांची संख्या वाढत गेल्याने २००० सालापासून आम्ही स्पेशल चार्टर ट्रेन करून यात्रा काढत असल्याची माहितीही गिरीश शहा यांनी दिली.
वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाताना डोंगरावरून कटरा गावाचे दिसणारे विहंगम दृश्य

आमच्या बरोबर यात्रेत सहभागी झालेल्या सर्वाची व्यवस्थीत काळजी घेतली जाते. गाडीत मिनरल वॉटर, दुपार व रात्रीचे जेवण, सकाळ व दुपारचा चहा आणि नाश्ता दिले जाते. जेवण साधे व रुचकर असते. दररोजच्या जेवणात वेगवेगळा गोड पदार्थही आम्ही देतो. यात्रेचा मुख्य उद्देश माता वैष्णोदेवी दर्शन हा असतो. यात्रेच्या मुक्कामाच्या ठिकाणी एक दिवस माता वैष्णोदेवीचे जागरण (चौकी) आम्ही करतो. देवीची भजने, आरती, गाणी असा मोठा कार्यक्रम असतो. वैष्णोदेवीचे दर्शन झाले की परतीच्या प्रवासात येणाऱ्या मार्गातील काही ठिकाणे आम्ही करतो. यंदाच्या वर्षी उज्जनला गेलो होतो. येथे बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेले महाकालेश्वर तसेच उज्जनमधील अन्य ठिकाणांचे दर्शन होते. यापूर्वी आम्ही चार देवी, चंदीगढ, अमृतसह, मथुरा, वृंदावन, हरिद्वार यांचे दर्शन घडवले होते, असेही गिरीश शहा यांनी सांगितले.

माता वैष्णोदेवी यात्रा संघ आणि मालाड येथील मंदिरातर्फे काही सामाजिक उपक्रमही राबविण्यात येतात. आम्ही आरोग्य सुविधाही उपलब्ध करून दिल्या असून त्यात फिजिओथेरपीस्ट, नेचर थेरपी, होमिओपॅथी यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही विद्यार्थ्यांसाठी समुपदेश केंद्रही सुरू केले असल्याची माहिती शहा यांनी दिली.

(माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १ सप्टेंबर २०१०च्या अंकात पान क्रमांक चारवर प्रसिद्ध झाला आहे. लेखात वापरलेली छायाचित्रे अश्विन कराळे यांची आहेत)

माता वैष्णोदेवी यात्रा संघ-४, मणी भवन, माता वैष्णोदेवी दिव्य धाम, सुभाष लेन, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७ (दूरध्वनी ०२२-२८८२९५७०)
06 August 2010

संमेलन आयोजकांना हवेत ५१ लाख

येत्या डिसेंबर महिन्यात ठाणे येथे होणाऱ्या ८४ व्या साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाकडून ५१ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळविण्यासाठी संयोजक प्रयत्न करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.

 दरवर्षी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाकडून २५ लाख रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते. यंदा राज्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने विशेष बाब म्हणून ५१ लाख रुपये मिळावेत,
असा संयोजकांचा प्रयत्न आहे.


गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनांच्या आयोजनावर कोटय़वधी रुपये खर्च होत आहेत. संमेलनाचा वाढता भपकेबाजपणा, राजकारणी मंडळींचा संमेलनातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागाबरोबरच संमेलनासाठी राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीबाबतही वाद-प्रतिवाद होत आहेत.
 
यंदा महाराष्ट्र राज्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्या निमित्ताने विशेष बाब म्हणून ठाणे येथे होणाऱ्या ८४ व्या साहित्य संमेलनासाठी ५१ लाख रुपये देण्यात यावेत, असे प्रयत्न संयोजकांनी सुरू केले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी भाषेचा, संस्कृतीचा आणि साहित्याचा मोठा उत्सव असल्याचे सांगितले जाते. ते मान्य केले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रमाणेच साहित्यविषयक अशी २५ ते ३० संमेलने महाराष्ट्रात आयोजित होत असतात. त्या संमेलन आयोजकांकडूनही आपल्याला भरघोस अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात येत असते. मात्र त्यांना इतक्या मोठय़ा प्रमाणात अनुदान मिळत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.
 
गेल्या काही वर्षांपासून भपकेबाजपणे होणाऱ्या या संमेलनाच्या खर्चाबाबत जाणकार साहित्यिक, साहित्यप्रेमी यांच्याकडूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संमेलनावर होणारा खर्च कमी व्हावा, ती साधेपणाने साजरी व्हावीत, असा विचार पुढे येत आहे.
 
दरम्यान या संदर्भात ठाणे ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष आणि साहित्य संमेलन समितीचे कार्याध्यक्ष पां. के. दातार यांच्याकडे विचारणा केली असता ‘लोकसत्ता’शी बोलताना त्यांनी संमेलनासाठी ५१लाख रुपयांची मदत मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे मान्य केले. ते पुढे म्हणाले की, संमेलन साधेपणाने साजरे व्हावे, त्यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत. मात्र सध्या सर्वच क्षेत्रात महागाई वाढलेली आहे. संमेलनासाठीचा मंडप, येणाऱ्या प्रतिनिधींचा तीन दिवसांसाठीचा भोजन आणि निवास यावरील खर्चच काही लाखांच्या घरात जाणार आहे. हा सर्व बोजा संमेलन आयोजित करणाऱ्या शहरातील यजमान संस्था पेलू शकत नाहीत. त्यामुळेच राज्य शासन, महापलिका यांच्याकडून जास्तीत जास्त प्रमाणात आर्थिक मदत मिळविण्याचा प्रयत्न केला जातो.
 
(माझी ही बातमी लोकसत्ता (मुख्य अंक- ५ ऑगस्ट २०१०)मध्ये पान क्रमांक-२ वर प्रसिद्ध झाली आहे)

24 July 2010

गुरुवंदन

"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।"

उद्या २५ जुलै रोजी आषाढ महिन्यातील पौर्णिमा असून ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात गुरुला/शिक्षकाला खूप महत्वाचे स्थान आहे. भारतीय संस्कृतीतही गुरुचे महत्व सांगितले आहे.

आपण वयाने लहान असू किंवा मोठे. आयुष्याच्या आरंभापासून ते अंतापर्यंत आपण नेहमी शिकत असतो. आपली ही प्रक्रिया निरंतर सुरू असते. त्यामुळे आपल्याला गुरु किंवा शिक्षक कोणीना कोणीतरी असतोच. लहान असताना आपली आई आपला गुरु असते. घरातील मंडळी आपले गुरू असतात. शाळेत जायला लागल्यानंतर शाळेतील शिक्षक, पुढे महाविद्यालयातील शिक्षक आपले गुरु होतात. एखाद्या कलेचे शिक्षण आपण घेत असू तर ती कला शिकण्यासाठी आपण ज्यांच्याकडे जातो, ते आपले गुरु असतात.

शिक्षण संपल्यानंतर आपण नोकरी-व्यवसायाला सुरुवात करतो. येथेही आपल्याला सुरुवातीला कोणीना कोणी शिकवत असतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला करून देतात. त्या शिदोरीवर आपण आपली प्रगती करून घेत असतो. गुरु हा वयाने लहान किंवा मोठा असू शकतो. गुरु म्हणजे तो आपल्यापेक्षा मोठाच असला पाहिजे असे नाही. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्याकडूनही आपण काही शिकत असतो.

आपल्या आय़ुष्यात तसेच समाजात वावरताना आपण शिकण्याची सवय ठेवावी.  मला सर्व काही येते, अशी भावना ठेवणे योग्य नाही. आपल्यात काही कमीपणा असेल, तर तो मोकळेपणाने मान्य करण्यात काही चूक नाही. तुम्हालाही असा अनुभव कधी ना कधी आला असेल की आपल्याला न येणारी किंवा न जमणारी एखादी गोष्ट आपण दुसऱयाकडून शिकलो आहोत. जे दुसऱयाकडून शिकणे आहे, त्यालाच समोरच्याला मोठेपणा देणे आणि आपण शिष्यत्व पत्करणे असे म्हणता येईल.

    

23 July 2010

हा तर लोकमान्य टिळकांचा अपमान

दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री म्हणून दिल्लीच्या राजकारणावर आणि समाजकारणावर सलग तीन टर्म आपला ठसा उमटवल्याबद्दल तसेच समाज सुधारणेसाठी विविध क्षेत्रांच्या माध्यमातून मोलाचा सहभाग दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे.

केसरी-मराठा ट्रस्टतर्फे देशाच्या विकासात आणि सामाजिक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केलेल्या व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. एक लाख रुपये, सुवर्णपदक आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या राजकारणावर आणि विकासावर काय ठसा उमटवला असेल तो असू द्या. पण शीला दीक्षित यांनी अलीकडेच अफजल गुरू प्रकरणी जी बोटचेपी आणि मुस्लिम लांगुचालनाची भूमिका घेतली होती, त्याचे काय, त्या बद्दल त्यांना कोण जाब विचारणार आहे की नाही, असे प्रश्न मनात येतात.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव त्यांनीच सुरू करून एका नव्या अध्यायाची मुहूर्तमेढ रोवली. सर्व जातीपातीच्या समाजाला त्यांनी एकत्र आणले. लोकमान्य टिळक हे प्रखर राष्ट्रवादी, तत्वनिष्ठ होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार त्यांची तत्वे आणि विचार पुढे नेणाऱया व्यक्तीला देणे हे अधिक योग्य ठरले असते.

काही दिवसांपूर्वीच संसदेवर हल्ला करणाऱया अफजल गुरुच्या फाशी प्रकरणावरून चर्चा रंगली होती. अफजल गुरुला फाशी होऊ नये असे दीक्षित यांना वाटत होते. कारण त्यांना म्हणजे दिल्ली सरकारने याबाबतचा अर्ज केंद्रीय गृहमंत्री/गृहमंत्रालयाकडे पाठवलाच नाही. याविषयी वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमातून माहिती जाहीर झाल्यानंतरचच हे सर्व उघड झाले. अफजल गुरुच्या फाशीबाबतचा अर्ज पुढे न पाठवून शीला दिक्षित यांनी कॉंग्रेसी मुस्लिम तुष्टीकरणाचा कित्ता गिरवला आहे.

भारताच्या संसदेवर हल्ला करणाऱया अफजल गुरुच्या फाशीसंदर्भात वेळकाढूपणा करणाऱया शीला दिक्षित यांना लोकमान्य टिळक यांच्या नावाचा हा पुरस्कार देणे म्हणूनच योग्य वाटत नाही. मग भले त्यांनी खूप काही सामाजिक व राजकीय काम केले असले तरी शीला दिक्षित यांनी अफजल गुरुबाबत केलेल्या चुकीमुळे त्या लोकमान्य टिळकांच्या नावे देण्यात येणाऱया या सन्मानास पात्र ठरत नाहीत. त्यांना पुरस्कार देणे म्हणजे लोकमान्य टिळकांचाही अपमान आहे.

        

09 July 2010

ऐशा नरा मोजूनी माराव्या...

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच केंद्र शासनाकडून बेळगावप्रश्नाबाबत महाराष्ट्राच्या आणि येथील कोट्यवधी जनतेच्या तोंडाला पाने पुसली जावीत, ही दुर्देवाची बाब आहे. गेली अनेक वर्षे सनदशीर आणि आंदोलनाच्या माध्यमातून बेळगावातील मराठी भाषिक आणि महाराष्ट्रातील मराठीप्रेमी  मराठी भाषेच्या मुद्यावर बेळगावचा महाराष्ट्रात समावेश व्हावा, म्हणून लढा देत आहेत. पण या मागणीला वेळोवेळी वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.

भाषेच्या आधारावर देशातील विविध राज्यांची निर्मिती झाली. पण महाराष्ट्रातील जनतेला आपले स्वताचे राज्य मिळविण्यासाठी १९६ हुतात्म्यांचे बलिदान द्यावे लागले. केंद्रातील कॉंग्रेस शासनाची महाराष्ट्राच्या बाबतीत नेहमीच आकसाची भूमिका राहिलेली आहे. मराठी भाषा, मराठी नेते यांनाही दिल्लीकडून अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. अर्थात याला काही नव्हे तर बऱयाच अंशी  महाराष्ट्रातील बेशरम राजकीय पुढारी आणि  राजकीय पक्ष जबाबदार आहेत. देशातील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आदी राज्यातील राज्यकर्ते, राजकीय पक्ष, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आपल्या राज्याच्या प्रश्नावर किंवा भाषेच्या मुद्यावर नेहमी एकत्र येतात. तेथील सर्वपक्षीय खासदारही संसदेत आणि दिल्लीत आपली वज्रमुठ दाखवतात. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याने, खासदाराने, किंवा सर्वपक्षीय खासदारांनी अशी एकजूट कधी दाखवली आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर पं. नेहरू यांच्या तोंडावर बाणेदारपणे राजीनामा फेकणारे फक्त सी. डी. देशमुख. त्यांच्यानंतर दिल्लीश्वरांपुढे महाराष्ट्रतील एकाही नेत्याने, लोकप्रतिनिधीने किंवा केंद्रात मंत्रीपदे भुषविणाऱया मराठी मंत्र्यांनी असा बाणेदारणा कधीच दाखवला नाही. केंद्रात महाराष्ट्रातील अनेक मातब्बर नेत्यांना मंत्रीपदे मिळाली. पण त्याचा उपयोग त्यांनी स्वार्थासाठी केला. मराठी भाषा, महाराष्ट्रातील प्रश्न आदी प्रश्नांवर या मंडळींनी कधीही मराठी अस्मिता आणि अभिमान दाखवला नाही. मोडेन पण वाकणार नाही, असे मराठी माणसाबद्दल म्हटले जाते. पण हा समज दिल्लीत गेलेल्या मराठी नेत्यांनी खोटा ठरवला.

खरे तर केंद्र शासनातील मराठी मंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय ४८ खासदारांनी ठरवले तर ते आपली एकजूट दाखवून मराठी बाणा  दिल्लीश्वरांना दाखवू शकतात. पण हाच तर मोठा प्रश्न आहे. केंद्राकडून मराठी जनतेचा वारंवार होणारा अपमान, अवहेलना याला महाराष्ट्रातील नालायक राज्यकर्ते, राजकीय पक्ष आणि नेतेच कारणीभूत आहेत. तुकाराम महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा असा दणका देण्याची गरज आहे.

लोकांच्या सहनशक्तीचीही एक मर्यादा असते. महाराष्ट्रातील जनतेची ही मर्यादा बेळगाव प्रश्नाबाबत कधीच संपली आहे. देशाच्या प्रथम नागरिक अर्थातच राष्ट्रपती या एक मराठी आहेत. केंद्रात सत्तारुढ असलेल्या आघाडीत अनेक मराठी मंत्रीही आहेत. पण यापैकी एकालाही या प्रश्नावर ठाम, ठोस आणि मराठी हिताची भूमिका घ्यावीशी वाटलेली नाही, हे आपले दुर्देव. सगळे घालीन लोटांगण हा नेहमीचा यशस्वी प्रयोग पार पाडत आहेत.

महाराष्ट्राला आज गरज आहे ती सी. डी. देशमुख  यांच्यासारख्या बाणेदार नेत्याची. असा नेता महाराष्ट्रला मिळेल का...           

08 July 2010

एका उडीची जन्मशताब्दी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मार्सेलिस येथील बंदरात बोटीतून जी ऐतिहासिक उडी मारली त्या घटनेला आज म्हणजे ८ जुलै रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने आजच्या विविध वृत्तपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काही लेख आले आहेत. त्या सर्व लेखांच्या तसेच सावरकर यांच्याविषयी असलेल्या अन्य लिंक्स येथे देत आहे.

लोकसत्तामध्ये सागरा प्राण तळमळला  हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याची लिंक अशी
१)http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=83978:2010-07-07-14-27-14&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10

२) मार्सेलिस-१९१० दूरगामी परिणाम करणारी उडी हा लेखही लोकसत्तामध्येच प्रसिद्ध झाला आहे.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=84130:2010-07-07-17-31-16&catid=212:2009-08-18-16-27-53&Itemid=210

३)लोकसत्ताचा अग्रलेख वारसा टिळकांचा या विषयाशी संबंधित आहे. हा अग्रलेखही
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=83973:2010-07-07-14-24-09&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7
या लिंकवर वाचता येईल.

४)ऐतिहासिक उडीची शताब्दी हा लेख महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6140588.cms

५)सामना दैनिकातही या उडीच्या निमित्ताने एक लेख आहे.
http://www.saamana.com/

६)स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील संकेतस्थळ
http://www.savarkar.org/

७)स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयीचा हिंव्हिडिओ
http://video.google.com/videoplay?docid=6998295758226432612#

८) हिंदू जनजागृती समिती यांच्या संकेतस्थळावर सावरकर यांच्याविषयी देण्यात आलेली माहिती
http://www.hindujagruti.org/hinduism/national-icons/veer-savarkar/

05 July 2010

कुठं कुठं जायाचं ट्रेकिंगला...

मस्त पावसळा सुरू झाला असून ट्रेकिंग आणि पावसाळी सहलीच्या पारंपरिक मंडळींबरोबरच नव्या लोकांनाही आता ट्रेकिंग आणि पावसाळी सहलीचे वेध लागले असतील. शनिवार आणि रविवार असे सुट्टीचे दिवस अनेक मंडळी एखाद्या छानशा ट्रेकला जाऊनही आली असतील. मुंबई आणि जवळच्या परिसरातील अशी काही ठिकाणे खास ट्रेकर्स आणि भटक्या मंडळींसाठी...

लोकसत्तामधील माझा सहकारी कैलास कोरडे हे अशाच ट्रेकर्स आणि भटक्या मंडळींपैकी. लोकसत्ताच्या रविवार वृत्तान्तमध्ये (१३ जून २०१०) त्याने काही दिवसांपूर्वी कुठं कुठं जायाचं ट्रेकिंगला असा लेख लिहिला होता. तो लेख येथे देत आहे.

हा लेख वाचून मुरलेल्या ट्रेकर्सना स्मृतीरंजनाचा आनंद होईल तर नव्या मंडळींना अरेच्चा आपणही एकदा पावसाळी ट्रेकला जायलाच पाहिजे, असे वाटेल. 

बाष्पयुक्त ढगांच्या पांढऱ्या पुंजक्यांची अरबी समुद्राकडून सह्यकडय़ांकडे कूच सुरू होताच ट्रेकर्स मंडळींना वेध लागतात पावसाचे..लवकरच पाऊस येईल. मृगाच्या सरींनी तृप्त झालेली धरती हिरवी शाल ओढून घेईल.. उन्हाच्या तडाख्याने तापलेले डोंगरमाथे थंडाव्यासाठी धुक्याच्या दुलईत शिरतील. नदी-सागराच्या भेटीसाठी आतूर जलधारा कडय़ांवरून स्वत:ला धबधब्यांत झोकून देतील. संपूर्ण सृष्टीमध्ये नवचैतन्याची सळसळ निर्माण होईल.. जलधारांनी एकीकडे निसर्ग तृप्त होत असतानाच चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या ट्रेकर्सना सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्या, सभोवतालचा निसर्ग, निसरडय़ा वाटा, दुथडी वाहून भरणारे नदी-ओढे खुणावू लागतात. आणि सुरू होते तयारी..पावसाळी ट्रेकची!


दरवर्षी अर्धा मे महिना उलटला ट्रेकिंग ग्रुप्सच्या मीटिंग्जना भरू लागतात. ग्रुपमधील जुनी-नवी उत्साही मंडळी या बैठकीला आवर्जून हजेरी लावतात. कॅलेंडर समोर ठेवून ट्रेकच्या तारखा ठरविल्या जातात. पण पहिला ट्रेक नेमका कधी करायचा हा सर्वात मोठा प्रश्न असतो. या बैठकीपूर्वी मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल झालेला असतो. तो केरळला कधी पोहोचणार आणि महाराष्ट्रात कधी धडकणार, याविषयीचे अंदाज हवामान खात्याने वर्तविलेले असतात. पण मान्सूनच्या लहरीपणा लक्षात घेता जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ातील मुहूर्त काढला जातो. प्रवासाची फारशी दगदग आणि जास्त अवघड चढण नसलेले ठिकाण पहिल्या ट्रेकसाठी ठरविण्यात येते.

पहिला ट्रेक एक दिवसाचा असतो. त्याला ‘वॉर्म अप’ ट्रेक म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सुमारे तीन महिने घामाच्या धारांमध्ये भिजल्यानंतर पावसात मनसोक्त चिंब होणे, हाच या ट्रेकचा उद्देश असतो. यानिमित्ताने ग्रुपचे सदस्य आपल्या ओळखीच्या मंडळींना ट्रेकला घेऊन येतात. या ट्रेकमध्ये येणाऱ्या अनुभवावरून ती मंडळी पुढे ‘रेग्युलर ट्रेकर’ होणार की नाही, हे ठरत असते. पहिल्या ट्रेकमध्येच निसर्गाशी नाळ जुळल्यामुळे आजीवन ट्रेकर झाल्याची अगणित उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे पहिल्या ट्रेकनंतर ट्रेकिंगचे नावही न काढणारेसुद्धा काहीजण आढळतात.

एकदिवसीय ट्रेकसाठी कर्जत-कसारा आणि लोणावळा परिसरात अनेक ‘हॉट स्पॉट’ आहेत. पेठ किंवा कोथळीगड, लोहगड, कोंदिवडे लेणी, कोरीगड, कर्नाळा, ईशाळगड, पेब, उल्हास व्हॅली, तिकोणा, माहुली, कळसूबाई, नाखिंद, माथेरान अशी या ठिकाणांची मोठी यादी आहे. केवळ ट्रेकचे ठिकाण किंवा तारीख ठरवून चालत नाही. प्रत्येक ट्रेकचे व्यवस्थित नियोजन करावे लागते. ट्रेकसाठी निघताना कुठे जमायचे? प्रवास रेल्वेने करायचा की वाहनाने? रात्री निघायचे की भल्या पहाटे? कोणती वेळ सर्वाना सोयीची ठरेल? खाण्यापिण्याची व्यवस्था कशी करायची? चढाईला सुरुवात कधी करायची? खर्च किती येईल? यांसारख्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. या गोष्टी ग्रुपकडून ठरविण्यात येत असल्या, तरी प्रत्येक ट्रेकसाठी लीडर आणि को-लीडर ठरविण्यात येतात. ही जबाबदारी ट्रेकिंग स्पॉटबद्दल चांगली माहिती असलेल्या मंडळींवर टाकली जाते.

प्रत्येक ट्रेकिंग ग्रुप आपापल्या सोयीनुसार वर्षभरातील ट्रेकचे नियोजन करतो. काही ग्रुप पावसाळी आणि हिवाळी ट्रेकचा कार्यक्रम एकदाच आखतात, तर काही मे-जूनमध्ये पावसाळी आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हिवाळी ट्रेकचे नियोजन आखतात. दोन किंवा तीन आठवडय़ाच्या विश्रांतीनंतर पुढच्या ट्रेकचे नियोजन केले जाते. पहिला ट्रेक सोपा व वनडे असेल, तर पुढील ट्रेक तुलनेने अवघड आणि दोन-तीन दिवसांचेही असतात. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत अनेक ट्रेकिंग स्पॉट आहेत. भीमाशंकर, नाणेघाट, हरिश्चंद्रगड, कळसूबाई, सुधागड, राजमाची, काळदुर्ग, टकमक, सिद्धगड, गोरखगड, दुर्ग-ढाकोबा, माथेरानमधील वन ट्री हिल पॉइंट व गारबेट पॉइंट यांसारखी ठिकामे निवडली जातात. ट्रेकिंग स्पॉटच्या यादीत दरवर्षी नवनवीन ठिकाणांची भर पडतच असते. गेल्या एक-दोन वर्षांपासून खंडाळा येथील नागफणीच्या बाजूला असलेल्या उंबरखिंडचा ट्रेक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

पावसाळी ट्रेकचे नियोजन करण्याची पद्धत दहा-पंधरा वर्षांपूर्वीही हीच होती. मात्र त्यावेळी फोनाफोनी करून किंवा पत्राद्वारे ग्रुपमधील सर्व सदस्यांना ट्रेकच्या तारखा कळविल्या जायच्या. ‘यूथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया’सारख्या (वायएचएआय) ट्रेकिंग संस्थांच्या नोटीस बोर्डावर ट्रेकच्या तारखा लावल्या जायच्या. त्यामुळे ट्रेकला जायची हुक्की आल्यास ट्रेकर्सची पावले आपोआप या संस्थांकडे वळायची. आता मात्र ट्रेकचे वेळपत्रक प्रत्येकाच्या ईमेलवरच येते. सोबत ट्रेकसाठी भेटण्याचे ठिकाण, खर्च, आवश्यक सूचना आणि लीडर्सचे मोबाइल नंबर असतात. ट्रेकला निघण्यापूर्वी भेटण्याच्या सर्व ग्रुपच्या जागा कॉमन आहेत. सीएसटीला इंडिकेटरखाली, दादरला स्वामीनारायण मंदिराच्या कोपऱ्यावर, कर्जत-कसाऱ्याला बस स्टॅण्डवर, विरारला तिकीट खिडकीच्या बाजूला..त्या मात्र आजही बदललेल्या नाहीत.

ट्रेकिंग ग्रुप पावसाळ्यात केवळ ट्रेक आयोजित करतात असे नाही. दोन-तीन ट्रेक झाल्यानंतर वॉटर फॉल रॅपलिंग, रेस्क्यू ऑपरेशन, नेचर ट्रेल्स, वृक्षारोपण, सायकलिंग यांसारखे उपक्रमही आयोजित केले जातात. याखेरीज भरारीसारख्या ट्रेकिंग ग्रुपकडून गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाळ्यात पन्हाळगड ते विशाळगड मोहीम आखण्यात येत आहे. काही ट्रेकिंग ग्रुपकडून भीमाशंकर ते लोणावळा मोहिमेचे आयोजन केले जाते. आता तर मान्सून दाखल झाला आहे. 

संपर्क- कैलास कोरडे
kailash.korde@expressindia.com

kkorde@gmail.com


 

04 July 2010

मनोज नव्हे विक्रम तिरोडकर

मराठी उद्योजक मनोज तिरोडकर यांच्या जीटीएल इन्फ्रा कंपनीने एअरसेल सेल्युलर कंपनीकडून देशातील त्यांचे सर्वच्या सर्व  १७ हजार ५०० मोबाइल टॉवर्स खरेदी करण्याचा करार आता इतिहास झाला. तिरोडकर यांच्या कंपनीने आता अनिल अंबानी समूहातील 'रिलायन्स इन्फ्रा'कडील ७५ हजार टॉवरचे ग्राहक मिळवून एक नवा विक्रम केला आहे. मराठी उद्योजकाच्या या गगनभरारीमुळे त्यांना मनोज ऊर्फ विक्रम तिरोडकर असे म्हणणे अधिक समर्पक ठरेल.

अंबानी यांच्याबरोबर केलेल्या करारामुळे 'जीटीएल इन्फ्रा'कडील ग्राहकांची संख्या आता सव्वा लाखाच्या घरात जाणार आहे. व्होडाफोन, रिलायन्स, एअरसेल, आयडिया, ,  भारती एअरटेल,  युनॉर, टाटा टेलि सव्हिर्सेस, व्हिडिओकॉन आणि अन्य काही टेलिकंपन्यांचा समावेश आहे.

तिरोडकर यांनी मोबाइल कंपन्यांसाठी आवश्यक असलेल्या टॉवर्समध्ये मक्तेदारी मिळविली आहे. टूजी सेवा पुरविणाऱ्या १४ कंपन्या आणि थ्रीजी सेवा पुरविणाऱ्या नऊ कंपन्या तसेच ब्रॉड बँड वायरलेस (बीडब्ल्यूए)ची सेवा पुरविणाऱ्या आठ कंपन्या अशा या सर्व कंपन्यांना जीटीएलच्या टॉवर्सचा वापर केल्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही.

आज ग्लोबल समूहात आठ कंपन्या आहेत, त्यापैकी दोन शेअर बाजारात लिस्टिंग झालेल्या आहेत. त्यांचा व्यवसाय ४६ देशांत चालतो. २२ देशांत स्वत:च्या कंपनीचे कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या ३५ हजारांवर गेली आहे. आज ग्लोबल समूहात आठ कंपन्या आहेत, त्यापैकी दोन शेअर बाजारात लिस्टिंग झालेल्या आहेत. त्यांचा व्यवसाय ४६ देशांत चालतो. २२ देशांत स्वत:च्या कंपनीचे कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या ३५ हजारांवर गेली आहे.

तिरोडकर यांच्या या विक्रमाची नोंद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांकडूनही घेण्यात आली आहे. फोर्ब्सच्या भारतीय श्रीमंतांच्या यादीतही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. 'र्वल्ड कॉम समूहा'ने त्यांना 'र्वल्ड यंग बिझनेस अचिव्हर अवॉर्ड' देऊन त्यांचा गौरव केला असून  कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)नेही त्यांना 'यंग आंत्रप्रीनर्स ट्रॉफी' प्रदान केली आहे.

उद्योग व्यवसायात मराठी माणूस यश मिळवू शकत नाही, त्याने केवळ दुसऱयांची चाकरीच करावी, असे मराठी माणसांबद्दल उपहासाने म्हटले जायचे आणि जातेही. पण आता हे चित्र बदलायला सुरुवात झाली आहे. किर्लोस्कर, दांडेकर (कॅम्लीन), बेडेकर, पाठारे (व्हीआय़पी), अत्तरवाले केळकर, पेंढरकर (विको टुथुपेस्ट). चितळे (बाकरवडी, श्रीखंड) आणि अन्य काही असतील (मला पटकन जेवढी नावे आठवली तेवढी लिहिली) त्या मंडळींच्या य़ादीत आता मनोज तिरोडकर यांचे नाव कोरले गेले आहे. समस्त मराठी माणसांसाठी ही अभिमानाची बाब आहे.  

03 July 2010

मराठी सृष्टीचा संदर्भकोश

ज्येष्ठ गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा परिचय, त्यांनी गायलेली गाणी, त्यांना आजवर मिळालेले पुरस्कार आणि त्यांच्याविषयीची माहिती आपल्याला एकाच ठिकाणी मिळाली आणि त्याचबरोबर त्यांनी गायलेली गाणी ऐकता आणि पाहताही आली तर? रसिकांसाठी तो दुग्धशर्करा योग ठरेल. अशक्य वाटणारी ही बाब ‘मराठी सृष्टी डॉट कॉम’ या संकेतस्थळाने शक्य करून दाखवली आहे.

या संकेतस्थळातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच अप्रसिद्ध पण समाजासाठी वेगळे काम करणाऱ्या व्यक्तींचा परिचय करून देणाऱ्या संदर्भकोशाचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या संकेतस्थळावर विविध क्षेत्रातील दोन हजार मराठी व्यक्तिमत्वांचा परिचय वाचक, अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे.


मराठी भाषा आणि संस्कृती याविषयी अनेक संकेतस्थळांचा पर्याय सध्या मराठी रसिकांना उपलब्ध आहे. त्यामुळे आम्हाला त्यापेक्षा वेगळे असे काही द्यायचे होते. त्यातून संदर्भकोश ही संकल्पना आम्हा सहकाऱ्यांच्या चर्चेतून पुढे आली, अशी माहिती संकेतस्थळाचे संचालक कालिदास वांजपे यांनी दिली. ते म्हणाले की, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रसिद्ध व्यक्तींची माहिती गुगल किंवा अन्य सर्च इंजिनवर मिळते. पण आम्हाला या मंडळींबरोबरच अन्य क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या आणि ज्यांचे कार्य समाजासाठी महत्त्वाचे आहे, अशा व्यक्तीही लोकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. त्यांच्या कामापासून अन्य काही जणांनी प्रेरणा घ्यावी, हा यामागे उद्देश होता. त्यातून संदर्भकोश आकाराला आला.

आमच्या या संकेतस्थळावर त्या त्या क्षेत्रातील मराठी माणसांच्या परिचयाबरोबरच त्या व्यक्तीविषयी इंटरनेटवर जी जी माहिती उपलब्ध आहे, त्यापैकी काही महत्त्वाची माहिती आम्ही येथे दिली आहे. माहितीबरोबरच त्या व्यक्तीविषयी असलेली विविध संकेतस्थळे, त्यांची छायाचित्रे, ध्वनीफिती, चित्रफिती यांचाही समावेश करण्यात आला आहे. एखाद्या मराठी व्यक्तीबाबत समग्र माहिती एकाच ठिकाणी देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.

या संदर्भकोशात स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, सहकार क्षेत्र, समाजसुधारक, संत, शिक्षण क्षेत्र, शासन-प्रशासन, व्यावसायिक उद्योजक, राजकीय व्यक्ती, पत्रकार, खेळाडू, कृषी क्षेत्र, कलाकार, ऐतिहासिक व्यक्ती आणि अन्य क्षेत्रातील माहिती येथे देण्यात आली आहे. आमच्याकडे दहा हजार व्यक्तींची माहिती सध्या जमा झाली असून त्या माहितीचे संपादन, संकलन करण्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच या व्यक्तींविषयीची माहितीही संकेतस्थळावर वाचता येऊ शकेल. या संदर्भकोशासाठी वाचकही माहिती पाठवू शकतील. या संकेतस्थळावर संदर्भकोशासह विविध विषयांवरील अन्य लेखही वाचता येणार असल्याचे वांजपे यांनी सांगितले.

अधिक माहिती आणि मदत करू इच्छिणाऱ्यांनीwww.marathisrushti.com या संकेतस्थळावर किंवा कालिदास वांजपे यांच्याशी ९९२०२७१६७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
 
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त ३ जुलै २०१० च्या अंकात पान क्रमांक-१ वर प्रसिद्ध झाली आहे)

29 June 2010

संग्रहालय वैद्यकशास्त्राच्या इतिहासाचे

जगात औषधांचा वापर आणि वैद्यक विश्वाचा जन्म कधी झाला, जगातला सर्वात प्रथम डॉक्टर कोण किंवा कोणते वैद्यक शास्त्र प्रथम अस्तित्वात आले, असे प्रश्न अनेकदा आपल्या मनात येतात. सगळ्यानाच त्याची उत्तरे माहिती असतातच असे नाही. पण आता आपल्या महाराष्ट्रात नाशिक येथे याविषयीची माहिती देणारे अनोखे संग्रहालय उभे राहिले आहे.

नाशिकच्या आरोग्य विद्यापीठात हे संग्रहालय उभे राहिले आहे. आदिती वैद्य आणि तिच्या सहकाऱयांनी हे संग्रहालय उभारले आहे.

या विषयी सविस्तर माहिती देणारी प्रसाद मोकाशी यांची बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २९ जून २०१० च्या अंकात पान क्रमांक एक वर प्रसिद्ध झाली आहे. या बातमीची लिंक पुढीलप्रमाणे...

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=81391:2010-06-28-15-04-31&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81
  
या संग्रहलयाला केवळ वैद्यक शास्त्राच्या विद्यार्थ्यांनीच नव्हे तर सर्वसामान्यांनीही भेट दिली पाहिजे.  आजवरच्या वैद्यकशास्त्राचा इतिहास या संग्रहालयाच्या निमित्ताने आपल्यासमोर उलगडला गेला आहे.

28 June 2010

कृत्रिम पावसासाठी वरुण यंत्र

गेल्या काही वर्षांत पाऊस लहरी झाला असून त्याचे प्रमाणही कमी झाले आहे. गेल्या वर्षी मुंबईत पुरेसा पाऊस न झाल्याने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात तशीच परिस्थिती आहे. कृत्रीम पाऊस पाडण्याचे प्रयोग केले जातात मात्र त्यासाठी प्रचंड प्रमाणात खर्च येतो. मात्र कमी खर्चात हा प्रयोग करता आला तर, डॉ. राजा मराठे या अभियंत्याने असा प्रयोग केला असून त्यांनी पाऊस पाडणारे वरुण यंत्र तयार केले आहे. सकाळ मध्ये काही दिवसांपूर्वी  याविषयची सविस्तर बातमी प्रकाशित झाली होती. ही बातमी सगळ्यापर्यंत पोहोचावी म्हणून आज त्याविषयीची माहिती... 


डॉ. राजा मराठे हे  मुंबईमधील "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी'चे ते पदवीधर आहेत आणि अमेरिकेच्या राईस विद्यापीठातून पीएच. डी. मिळविली आहे. भारताने बनविलेल्या "परम' या पहिल्या महासंगणकाच्या विकासकार्यात त्यांचा सहभाग होता. सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेल्या डॉ. मराठे यांनी गेल्या वर्षी नांदेड जिल्ह्यातील सुजलेगाव येथे कृत्रिम पावसाबाबतचे काही प्रयोग केले. अशा दहा प्रयोगांत नऊ वेळा पाऊस झाला आहे. सुजलेगाव परिसरातील अन्य गावांतही त्यांनी हा प्रयोग केला आहे.

कृत्रिम पावसाचे अनेक प्रयोग जगभर होत असतात. त्यांपैकी सर्रास केला जाणारा प्रयोग म्हणजे विमानाद्वारे ढगात सिल्व्हर आयोडाईडची फवारणी करणे. या खेरीज खास बनविलेल्या रॉकेटद्वारा किंवा तोफांद्वाराही सिल्व्हर आयोडाईडची फवारणी केली जाते. बहुतेक ठिकाणी हे प्रयोग सरकारकडून केले जातात, शिवाय त्यांचा खर्चही अधिक असतो.

डॉ. मराठे यांनी "वरुण यंत्रा'चा छोटेखानी प्रयोग सुरू केला आहे. कृत्रिम पावसाच्या कोणत्याही प्रयोगात ढगापर्यंत उत्प्रेरक नेले जाते. पाऊस पडण्यासाठी ढगामधील पाण्याचे छोटे छोटे थेंब एकमेकांकडे आकर्षित होणे महत्त्वाचे असते. त्यासाठी उत्प्रेरकाची गरज असते. मिठाचे सूक्ष्म कण हे उत्प्रेरकासारखे काम करतात. ढगामध्ये विमानाने मिठाची फवारणी शक्‍य नसल्यास जमिनीवर भट्टी करून त्यात मिठाचे कण टाकल्यास ते ढगापर्यंत पोहोचू शकतात. हे तत्त्व वापरून डॉ. मराठे यांनी  प्रयोग केले आहेत. हा प्रयोग कोणालाही सहजगत्या करता येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गावात तो होऊ शकेल. तसे झाल्यास पाऊस न पडण्याच्या अडचणीवर मात करता येईल.

हा प्रयोग करण्यासाठी वातावरण ढगाळ असणे आवश्‍यक आहे. शिवाय प्रयोगाच्या वेळी हवेत चांगला ओलावा (आर्द्रता) असायला हवा आणि वारे नसावेत. पहाटेची किंवा सायंकाळची वेळ प्रयोगासाठी चांगली असल्याचे डॉ. मराठे यांचे म्हणणे आहे. या प्रयोगासाठी "आयआयटी'मधील आजी-माजी सहकाऱ्यांनी; तसेच रोहिणी नीलेकणी यांची त्यांना मदत केल्याचे झाली आहे.

"वरुण यंत्रा'चे नमुने डॉ. राजा मराठे यांनी तयार केले आहेत. त्याची किंमत २२५० रुपये आहे. सुजलेगाव (ता. नायगाव, जि. नांदेड) येथून ती मिळतील. हे यंत्र म्हणजे दोनशे लीटर क्षमतेची लोखंडी टाकी आहे. तिच्या दोन्ही बाजूंकडील पत्रे नसतात. त्यामुळे पोकळ असलेल्या या टाकीच्या एका बाजूला लोखंडी गजांची जाळी बसवतात. याच जाळीवर एक सच्छिद्र आडवी नळी बसविली असते. तिच्या मध्यभागी काटकोनातून दुसरी नळी बसवून ती बाहेर काढतात. या नळीला "ब्लोअर' किंवा भाता जोडला जातो. विजेवर चालणारे "ब्लोअर' चालू केल्यास टाकीमध्ये ऑक्‍सिजनचा पुरवठा वाढतो. वीज नसल्यास भाता वापरला तरी चालतो.

या टाकीत जळण म्हणून लाकडे, गोवऱ्या, भुश्‍श्‍याच्या विटा सहा इंचापर्यंत रचून ठेवाव्यात. त्यानंतर त्यात रॉकेल टाकून पेटवावे. चांगला जाळ पेटल्यानंतर भुश्‍श्‍याच्या गोवऱ्या किंवा लाकडाच्या ढिपल्या दोन फुटांपर्यंत टाकीत टाकाव्यात. त्यानंतर "ब्लोअर'ने किंवा भात्याने जोरात हवा द्यावी. भट्टी चांगली पेटवून वर आगीचा जाळ यायला लागल्या की त्यात सुमारे सहा किलो मीठ (बारीक) थोडे-थोडे टाकत राहावे.

हा प्रयोग करण्यासाठी आकाश ढगाळ असणे, आर्द्रता अधिक असणे आणि वारा नसणे आवश्‍यक आहे. आर्द्रता मापक यंत्र कोणत्याही शाळेत वा कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असते. वरुण यंत्राचे तंत्रज्ञान खुले असून डॉ. मराठे यांनी या यंत्राची नक्कल करण्यास सर्वांना परवानगी दिली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क  डॉ. राजा मराठे ९९७०४३५७४०,
उमाकांत देशपांडे नावंदीकर- ९९२२७२४१०३,
संतोष देशमुख सुजलेगावकर ९९७०४६३९०२.

27 June 2010

सुप्रिया सुळे यांचा डबल गेम

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या दुहेरी नागरिकत्वाचा प्रश्न आता चर्चेत आहे. सुळे यांनी सिंगापूरचे नागरिकत्व घेतले असून त्यामुळे त्यांचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात आणण्यासाठी आता विरोधी पक्षांनी केंद्रातील सत्ताधाऱयांवर दबाव आणण्याची गरज आहे. बारामती मतदार संघातून सुळे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविलेल्या मृणालिनी काकडे यांनी केलेल्या याचिकेवरून हे प्रकरण उघडकीस आले.

काकडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली नसती तर झाकली मूठ तशीच राहिली असती. सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवार हे केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या आघाडीला समर्थन देणारे एक बडे नेते असल्याने याचिकेवर सुनावणी घेण्यासही मुद्दामहून विलंब लावण्यात आला, असा आरोप काकडे यांनी केला होता. हिच बाब सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत घडली असती तर इतका वेळ काढला गेला असता का, भारतीय राज्य घटना आणि भारतीय दंड संहितेनुसार जी शिक्षा असेल ती त्या माणसाला भोगावी लागली असती. पण येथे प्रकरण वेगळे असल्याने चालढकल करण्यात येत आहे.

कोणत्याही भारतीय नागरिकाने अन्य कोणत्याही देशाचे नागरिकत्व किंवा कायम वास्तव्य स्वेच्छेने स्वीकारले की भारतीय नागरिकत्व कायद्यानुसार त्याचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. त्यामुळे आता सुप्रिया सुळे भारताच्या नागरिक राहिल्या नसल्याचे जाहीर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. एखाद्या परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यानंतर ती गोष्ट लपवून खासदारकीची निवडणुक लढवणे हीच मुळात बेकायदा बाब आहे. लोकांना उपदेशाचे डोस पाजणाऱया भारतीय नेत्यांनी पहिल्यांदा आपल्या पायाखाली काय जळते आहे ते पाहावे.

खरे तर हा मुद्दा शिवसेना, भाजप किंवा कॉंग्रेससाठीही शरद पवार यांना राजकारणातून नेस्तनाबूत करण्यासाठी हातात मिळालेले आयते कोलीत आहे. आयपीएल प्रकरणी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप कऱण्यात आले होते. मात्र त्यातून ही मंडळी कोणतीही शिक्षा न होता सहीसलामत सुटली. मात्र हे प्रकरण तसे नाही. येथे उघड पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे या विषयावर शिवसेना व भाजप आणि अन्य विरोधी पक्षांनी देशभरात जोरदार संघर्ष करायला पाहिजे, मात्र अद्याप या प्रश्नावर या पक्षाचे वरिष्ठ नेते मूग गिळून गप्प बसले आहेत.

सुळे यांनी सिंगापूरचे नागरिकत्व घेतले असल्याचे समोर आल्याने त्यांनी बारामती मतदार संघातून लढवलेली निवडणुक बेकायदेशीर ठरते. तसेच या प्रकरणी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सुळे यांचे वडील अर्थातच शरद पवार हे दोषी ठरतात. शरद पवार हे राजकारण करताना काय काय बेकायदेशीर गोष्टी करत असतात, त्याचा उघड झालेला हा एक भाग. पडद्याआड अशा कितीतरी गोष्टी असतील. कॉंग्रेसलाही शरद पवार वेळोवेळी अडचणीत आणत असतात, त्यामुळे आता सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही कठोर भूमिका घेऊन या प्रकरणाची तड लावली पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम पंतप्रधानांनी पवार यांचा राजीनामा घेतला पाहिजे.

भारतीय राजकारणी किती नालायक आणि सर्वसामान्य मतदारांचा विश्वासघात करणारे आहेत, हे सुप्रिया सुळे प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आले आहे. आता मतदारांनी याचा जाब विचारण्याची गरज आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या विश्वासघाताचा धडा त्यांना मिळालाच पाहिजे. सुज्ञ मतदारांनी आगामी विधानसभा, लोकसभा, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद अशा सर्व पातळीवरील निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व उमेदवारांना पाडून अद्दल घडविण्याची आता वेळ आली आहे.

पण ते होईल का, वाचक किंवा मतदार अशा गोष्टी वाचतात, चर्चा करतात आणि सोडून देतात. मतदारांची स्मृती अल्प असते, म्हणूनच आम्ही काहीही करू शकतो, अशा विचारातून भारतातील राजकीय नेते व पक्ष मुजोर झाले आहेत. भारतीय मतदारांना येथील राजकीय नेते आणि पक्षांनी कायमच गृहीत धरलेले आहे. त्याचेच परिणाम आपण भोगतो आहोत. खोटेपणा करण्यात सुप्रिया सुळे या आपल्या वडिलांच्याच तालमीत तयार झाल्या आहेत.

आता आणखी काही दिवस वृत्तपत्रे आणि अन्य प्रसार माध्यमातून याविषयी बातम्या येतील आणि नंतर सगळे शांत होईल. न्यायालयापुढे सगळे समान, असे आपण नुसते म्हणतो. सर्वसमान्यांना एखाद्या गुन्ह्यासाठी जो न्याय लावला जातो, तो राजकारणातील बड्या धेंडाना लावला जाईल का...
 

26 June 2010

चिंता करितो विश्वाची

समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावरील सुनील चिंचोलकर लिखित चिंता करितो विश्वाची हा ग्रंथ नुकताच वाचनात आला. १४ मार्च २००६ मध्ये या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती आणि अवघ्या तीन वर्षात पुस्तकाची चौथी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. हा ग्रंथ श्री गंधर्व वेद प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. ४७२ पानी या ग्रंथाची किंमत ४०० रुपये इतकी आहे.

प्राचार्य राम शेवाळकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या ग्रंथाला लाभली आहे. या ग्रंथात मोगलांच्या आक्रमणाने पिचलेला महाराष्ट्र, समर्थ रामदास स्वामी यांचे पूर्वज, समर्थांची जन्मभूमी, त्यांचे माता-पिता, थोरले बंधू, समर्थांचा जन्म, त्यांचे बालपण, श्रीराम यांचे झालेले दर्शन व अनुग्रह, विवाह मंडपातून पलायन, नाशिक येथे पंचवटीला झालेले आगमन, टाकळीतील दिनचर्या, करुणाष्टकांची रचना, शहाजी राजे व बालशिवाजी यांची भेट, पहिला मठ, पहिला मारुती व पहिला शिष्य, समर्थ रामदास स्वामी यांचे भारत भ्रमण, महाबळेश्वर येथे झालेले आगमन, रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची भेट, सज्जनगडावरील वास्तव्य, समर्थ रामदास स्वामी यांचे राजकारण असे विविध विषय या ग्रंथाच हाताळले आहेत.

समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची भेट झालीच नाही, रामदास स्वामी शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते असे काही मंडळींकडून सांगण्यात येते. चिंचोलकर यांनी या ग्रंथात काही जुने दाखले, हस्तलिखिते यांचे दाखले देऊन रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची अनेक वेळा भेट झाली होती, शिवाजी महाराजांना रामदास स्वामी वेळोवेळी कसे मार्गदर्शन करत होते, हे स्पष्ट केले आहे.

चौथ्या आवृत्तीच्या निमित्ताने लेखक चिंचोलकर या ग्रंथात म्हणतात की, शंभर दिवसात लिहिलेला हा ग्रंथ शंभर दिवसात छापून तयार झाला. त्याची पहिली आवृत्ती प्रकाशनपूर्व नोंदणीतच संपली. चौथी आवृत्ती समर्थभक्तांच्या सेवेसाठी सादर करत आहोत.  आता वेध लागले आहेत ते या ग्रंथाच्या इंग्रजी अनुवादाच्या प्रकाशनाचे. या इंग्रजी अनुवादाच्या ४०० प्रती जगातील ४०० ग्रंथालयांना भेट म्हणून पाठवून समर्थांची ४०० वी जयंती संपन्न करण्याचे सदभाग्य समर्थांनी आम्हास द्यावे, ही प्रभू रामचंद्रांच्या चरणी विनम्र प्रार्थना.

हा संपूर्ण ग्रंथ अभ्यासकांच्या दृष्टीने आणि समर्थ भक्तांसाठीही महत्वाचा आहे.

प्रकाशक संपर्क
दीपक खाडिलकर, श्री वेद गंधर्व प्रकाशन, १२८६, सदाशिव पेठ, चिमण्या गणपतीजवळ, पुणे-४११०३०, दूरध्वनी (०२०-२४४९३५०२)

लेखक संपर्क
सुनील चिंचोलकर, अजिंक्य नगर, हिंगणे खुर्द, पुणे-४११०५१
दूरध्वनी (०२०-२४३४८०७०)
         

25 June 2010

मराठी नाटय़सृष्टीतले ‘गंधर्वयुग’

मराठी रंगभूमीवरील अनभिषिक्त नटसम्राट बालगंधर्व यांचा २६ जून हा जन्मदिन! (जन्म २६ जून १८८८. महानिर्वाण १५ जुलै १९६७). आपल्या स्वर्गीय संगीताने, अभिनयाने त्यांनी रंगभूमीवर ‘गंधर्वयुग’ निर्माण केले. श्रीराम रानडे यांनी लिहिलेला हा लेख लोकसत्ता पुणे वृत्तान्तमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

‘‘आपल्या सखीगणांसह शकुंतलेने रंगभूमीवर प्रवेश करताच आपल्या नेत्रांचे सार्थक झाले, असे प्रेक्षकांना वाटले. कण्वमुनींच्या तापसी आश्रमास शोभेल असा साधा वेष तिने परिधान केला होता. ‘जातीच्या सुंदराला काहीही शोभते’, या दुष्यंताच्या उक्तीची सार्थकता पटत होती. ‘वृक्ष वेल या दोहींची जोडी शोभते’, हे पद जेव्हा ती गाऊ लागली त्या वेळी जणू काय स्वर्गीय संगीत ऐकल्याचा भास प्रेक्षकांना झाला आणि पहिल्या प्रवेशाच्या अखेरीस ‘सखये अनुसये, थांब की गं बाई’, हे पद म्हणत पायात रुतलेल्या दर्भाकुराच्या किंवा कोरांटीस अडकलेली साडी सोडविण्याच्या निमित्ताने दुष्यंताकडे नेत्रकटाक्ष टाकीत, लयबद्ध पावले टाकीत, तिच्या सख्यांच्या मागोमाग जाऊ लागली त्या वेळी तिच्या भावपूर्ण चेहऱ्यावर दुष्यंताप्रमाणे प्रेक्षकही अनुरक्त झाले..’’

शनिवार, ५ जानेवारी आणि रविवार, ६ जानेवारी १९०६. मिरजेतील सरकारी थिएटरात हा जणू चमत्कारच घडला. वरील दोन्ही दिवशी सरकारी नाटय़गृहात प्रेक्षकांची एकच गर्दी उसळलेली होती. सांगली, मिरज, बुधगाव येथील प्रेक्षक होतेच, पण पुणे, कोल्हापूर, बेळगाव येथील रसिक प्रेक्षक आवर्जून ‘शाकुंतल’ नाटकाला उपस्थित होते. कोल्हापूरहून आलेल्या प्रेक्षकांचे नेतृत्व छत्रपती शाहूमहाराजांकडे होते. त्यापूर्वीच्या चार-पाच वर्षांत किलरेस्कर नाटक मंडळींच्या नाटकाला अशी गर्दी उसळली नव्हती. १३ फेब्रुवारी १९०१ रोजी किलरेस्कर मंडळीत नायिकेची भूमिका करणारे भाऊराव कोल्हटकर (भावडय़ा) मृत्यू पावले आणि किलरेस्कर मंडळीचे सौभाग्यच हरवले, पण मिरज मुक्कामी झालेल्या ‘शाकुंतल’च्या प्रयोगानंतर किर्लोस्कर मंडळींचेच नव्हे तर अवघ्या मराठी रंगभूमीचे सौभाग्य आपल्या पायांनी पुन्हा चालत आले होते. ज्या व्यक्तीच्या पावलांनी हे सौभाग्य परत आले होते, त्या व्यक्तीचे नाव- नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व!

पुण्यातील शुक्रवार पेठेतील मोरगावकरांच्या वाडय़ानजीकच्या एका घरात २६ जून १८८८ रोजी सायंकाळी ६ वाजून २ मिनिटांनी नारायणाचा जन्म झाला. नारायणचे बालपण शब्दसुरांच्या संगतीतच गेले. शालेय शिक्षणाकडे मात्र या मुलाचा ओढा कमीच होता. जळगाव येथे मेहबूबखान यांच्याकडे नारायण शास्त्रशुद्ध गाणे शिकू लागला. पुण्यात लोकमान्यांनी नारायणाचे गाणे ऐकले आणि त्यांच्या तोंडून सहजोद्गार निघाले, ‘हा बालगंधर्व फार सुरेख गातो’ आणि तेव्हापासून ‘बालगंधर्व’ या नावानेच नारायण ओळखला जाऊ लागला.

मिरज मुक्कामी देवल मास्तर, चिंतोबा गुरव, दादा लाड, गणपतराव बोडस, शंकरराव मुजुमदार, नानासाहेब जोगळेकर, पांडोबा क्षीरसागर अशा जाणत्यांसमोर नारायणाने आपल्या आवडीच्या काही चिजा म्हटल्या व अखेरीस अण्णासाहेब किलरेस्करांच्या ‘रामराज्य वियोग’ नाटकातील ‘धन्य जाहला, तुम्ही माझा राम पाहिला’ हे गीत म्हटले. त्याचे गाणे सर्वाना आवडले. ‘नारायणा, तू स्त्री पार्टी करशील काय,’ असे देवलमास्तरांनी विचारले आणि त्यावर ‘शिकवल्यास करीन,’ असे १७ वर्षांच्या नारायणाने उत्तर दिले. नारायणाचा- बालगंधर्वाचा किलरेस्कर मंडळीत गुरुद्वादशीच्या सुमुहूर्तावर ऑक्टोबर-१९०५ला मिरज मुक्कामी प्रवेश झाला. सुरुवातीला ‘शारदा’ नाटकातील नटी- सूत्रधाराच्या प्रवेशाची रंगीत तालीम झाली. ‘नटीची भूमिका’ आणि ‘नाटक झाले जन्माचे’ हे तिच्या तोंडी असलेले पद म्हणून बालगंधर्वानी मोजक्याच, पण रसिक प्रेक्षकांकडून पसंतीची टाळी मिळविली आणि हा शकुंतलेची भूमिका करण्यास सर्वथैव योग्य अशी किलरेस्कर मंडळींच्या सर्वाचीच खात्री पटली. काही वर्षांपूर्वी ‘फुटक्या काठाचं मडकं’ म्हणत ज्याची संभावना केली तोच हा मुलगा, गायनाचा, अभिनयाचा सुवर्णकलश मिरवत कंपनीत आला आणि पुढील काळात त्याने आपल्या नावाची सुवर्णमुद्राच रंगभूमीवर उमटवली.

१९०५ ते १९१३च्या जुलै महिन्यापर्यंत बालगंधर्व किलरेस्कर मंडळीत होते. आपल्या मधुर आवाजाने आणि अप्रतिम लावण्यसंपदेने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. शकुंतला (शाकुंतल), नटी (शारदा), विषया (चंद्रहास), सरोजिनी (मूकनायक), सुभद्रा (सौभद्र) या भूमिका करून त्यांनी स्वत:ची अभिनयातली आणि गायनातली प्रगती उंचावलीच, त्याचबरोबर किर्लोस्कर मंडळीलाही अपार यश मिळवून दिले.

नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे किर्लोस्कर संगीत मंडळीच्या रंगभूमीवर आलेले पहिले संगीत नाटक ‘मानापमान!’ ‘मानापमान’चा पहिला प्रयोग १२ मार्च १९११ रोजी मुंबईत झाला. (‘मानापमान’ नाटकाच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे). प्रयोग दुपारचा होता. नानासाहेब जोगळेकर (धैर्यधर), गणपतराव बोडस (लक्ष्मीधर) आणि बालगंधर्व (भामिनी) असा त्रिवेणीसंगम! गोविंदराव टेंबे यांचे संगीत, पण दुर्दैवाने त्याच दिवशी सकाळी बालगंधर्वाची लाडकी मुलगी वारली. नियोजित प्रयोग रद्द करण्याचे ठरत होते, पण बालगंधर्वानी त्याला ठाम नकार दिला. खेळ झाला. ‘टकमक पाही’ या ‘मानापमाना’तल्या पहिल्या गाण्यापासूनच बालगंधर्वाना वन्समोअर मिळू लागला. त्यांची ‘भामिनी’ रंगतच गेली. स्वत:चे दु:ख बाजूला सारून संस्थेची, स्नेहय़ांची आणि रंगभूमीची काळजी वाहणारा श्रद्धाळू कलावंत म्हणून बालगंधर्वाची प्रतिमा रसिकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाली. किलरेस्कर नाटक मंडळीतून बाहेर पडून बालगंधर्व, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे यांनी स्वत:ची स्वतंत्र नाटय़कंपनी काढण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या बुधवार पेठेतील ढमढेऱ्यांच्या बोळातील माळय़ाची धर्मशाळा भाडय़ाने घेतली. ५ जुलै १९१३ रोजी पुष्य नक्षत्रावर सायंकाळी साडेपाच वाजता नव्या नाटय़संस्थेचा नारळ फोडला. नाटय़संस्थेला ‘न्यू किर्लोस्कर नाटक मंडळी,’ असे परंपरादर्शक नाव द्यावे, असे घाटत होते. परंतु काकासाहेब खाडिलकरांनी सुचवलेले नाव तात्यासाहेब केळकरांनाही पसंत पडले आणि कंपनीचे नामकरण झाले, ‘गंधर्व नाटक मंडळी.’ राम गणेश गडकऱ्यांना मात्र किर्लोस्कर नाटक मंडळीमधून फुटून नवीन नाटय़संस्था काढण्याचे मुळीच मान्य नव्हते. त्यांना विलक्षण संताप आलेला होता. ‘आमच्या नवीन कंपनीचा नारळ फुटला बरं का,’ असं गणपतराव बोडसांनी त्यांना सांगताच, ‘नारळ फुटला, आता कंपनी कधी फुटणार?’ असा संतप्त सवाल त्यांनी केला होता.

‘गंधर्व नाटक मंडळी’चा दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. ‘मूकनायक’ नाटक प्रथम रंगमंचावर आणले. ‘शाकुंतल’, ‘रामराज्यवियोग’ असे नाटकांचे प्रयोग सुरू झाले. ‘मानापमान’ आणि ‘सौभद्र’ नाटकांच्या प्रयोगांचे हक्क मिळविण्यास थोडा विलंब लागला, त्यामुळे उत्पन्नाचे वारू धाव घेईना, पण या कालखंडातील महत्त्वाची घटना म्हणजे अव्वल दर्जाचे नाटय़शिक्षक, नाटककार गो. ब. देवल पुन्हा नाटय़क्षेत्रात आले. गंधर्व मंडळीच्या तालमी घेऊ लागले. आपल्या ‘मृच्छकटिक’ आणि ‘गद्य फाल्गुनरावा’चे ‘संगीत संशयकल्लोळ’मध्ये रूपांतर करून त्यांनी तालमी सुरू केल्या. कंपनीच्या उत्कर्षांची सुचिन्हे दिसू लागली. तो पावेतो ‘मानापमान’, ‘सौभद्र’ नाटकांचे प्रयोगहक्क मिळाले. गंधर्व नाटक कंपनीच्या वैभवाचे दिवस सुरू झाले. राम गणेश गडकऱ्यांनी ज्या गंधर्व नाटक मंडळीच्या स्थापनेबद्दल राग व्यक्त केला होता, त्यांचेच ‘एकच प्याला’ नाटक गंधर्व नाटक मंडळीने २० फेब्रुवारी १९१९ रोजी बडोदा येथे रंगमंचावर आणले. त्या नाटकाने गंधर्व नाटक मंडळी, बालगंधर्व, गणपतराव बोडस यांना उदंड यश, कीर्ती, धनसंपदा मिळवून दिली. पण आपल्या नाटकाचे यश पाहण्याचे भाग्य गडकऱ्यांच्या नशिबी नव्हते. नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वीच २३ जानेवारी १९१९ रोजी गडकरी या जगाच्या रंगभूमीवरून कायमचे निघून गेले होते.

‘एकच प्याला’मधील ‘सिंधू’ ही बालगंधर्वाच्या इतर सर्व भूमिकांपेक्षा सर्वस्वी निराळी भूमिका! बालगंधर्वाना भरजरी पोशाखातून फाटक्या वस्त्रांकडे, शृंगार रसातून करुण रसात नेणारी आव्हानात्मक भूमिका! बालगंधर्वानी हे आव्हान पेललं. याबाबतची एक घटनाच या गोष्टीवर प्रकाश टाकणारी आहे. ‘रत्नाकर’ मासिकाने १९३१ जुलैचा अंक ‘बालगंधर्व विशेषांक’ म्हणून काढला. त्यानिमित्त ‘बालगंधर्वाची सवरेत्कृष्ट भूमिका कोणती,’ असा प्रश्न संपादकांनी रसिकांना विचारला. ३३५३ रसिकांकडून उत्तरे आली. त्यापैकी २०५२ जणांनी बालगंधर्वाची सवरेत्कृष्ट भूमिका राम गणेशांच्या ‘एकच प्याला’मधील ‘सिंधू’ची असा निर्वाळा दिला. या तत्कालीन जनमताच्या कौलास मान देऊन आम्ही ‘रत्नाकर’च्या मुखपृष्ठावर सिंधूचे रंगीत चित्र देत आहोत, अशी टीप ‘रत्नाकर’च्या संपादकांनी आवर्जून दिली.

‘गंधर्व नाटक मंडळी’ म्हणजे नाटय़क्षेत्रातले वैभव. अस्सल भरजरी कपडे, शालू, शेले, पैठण्या, खरे दागिने, सोन्या-चांदीचे मुकुट, वैभवशाली पडदे, सुदृढ कलाकार, कंपनीत बडदास्त इतमामाची, जेवण जेवावे तर गंधर्व कंपनीतले, ‘इथे नांदते वैभव सारे’, अशी सुस्थिती! निर्भेळ दूध आणि साजूक तूप असा सर्व मामला! तिरखवाँ, राजण्णासारखे तबलजी, कादरबक्ष महंमद हुसेनसारखे सारंगीवाले, ऑर्गनवर कांबळे, हरिभाऊ देशपांडे, नाटके रंगत होती, पण जमा-खर्चाचा ताळमेळ जमत नव्हता. गोविंदराव टेंबे, गणपतराव बोडस भागीदारीतून बाजूला झाले, कारण खर्चविषयक मतभेद हे प्रमुख कारण. अखेर बालगंधर्व एकटेच कंपनीचे मालक झाले. अर्थकारण चुकले. कर्जाचा डोंगर उभा राहिला आणि अखेर ३१ डिसेंबर १९३४ रोजी गंधर्व कंपनी बंद करण्याचा कटू निर्णय घेण्यात आला.

अडीच तपांचा संगीतमय, प्रकाशमय, आनंदमय, रसिकप्रिय नाटय़प्रवास थांबत होता. नियतीने खेळ मांडला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या आगेमागे जन्मलेल्या आमच्या पिढीने बालगंधर्व पाहिले, पण ते, ते बालगंधर्व नव्हते. आम्ही पाहिले बालगंधर्वाचे उतरतीला लागलेले रूप. भग्न अवशेष. भिंत खचली, कलथून खांब गेले, अशी अवस्था! दोघा-चौघांनी उचलून आणून गादीवर बसवलेले आणि अभंग, भजने गाणारे बालगंधर्व. पण त्यांना आणताना अनेकांचे डबडबलेले डोळे, गळय़ात दाटलेले हुंदके आम्ही बघितले आहेत आणि अरेरे! चे दर्दभरे उद्गार ऐकलेले आहेत. रंगभूमीच्या या अनभिषिक्त सम्राटाविषयी आमच्या पिढीने भरपूर ऐकले आहे, भरपूर वाचले आहे. त्यातील किती आठवावे आणि किती जतन करावे, याला मर्यादाच नाही.

‘नारायणराव (बालगंधर्व) म्हणजे रंगभूमीवरील एक अपूर्व घटना! फूटलाईटच्या प्रकाशात उगवलेले इंद्रधनुष्य! सुगंध असलेला स्वर आणि स्वर असलेले चांदणे!’ (कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर).

‘नारायणराव केवळ गळय़ाने जगले नाहीत. उद्या जर त्यांच्या पायाच्या अंगठय़ाला स्वर फुटला तर तेथूनही तेच गाणे स्रवेल. उसाचे कांडे जसे सर्वत्र गोड, तसे त्या गाण्याचे, गाण्याच्याच नव्हे तर गद्य वाक्यांच्या लयीचादेखील त्यांना झालेला साक्षात्कार तसाच.’ (पु. ल. देशपांडे).

बालगंधर्वाची अमाप स्तुती करणारी जशी रसिक मंडळी होती, आहेत आणि असतील, त्याचप्रमाणे त्यांच्यावर टीका करणारेही आहेत. याचे उदाहरण म्हणजे अहिताग्नी राजवाडे. त्यांनी आपल्या आत्मकथनात्मक पुस्तकात ‘ ‘स्वयंवर’ नाटकाचा आजचा प्रयोग काव्य, गायन, अभिनय, नाटय़ या सर्व बाबतीत हीन’ अशी नोंद आपल्या त्या दिवशीच्या डायरीत केली आहे. पु. शं. पतके हे बालगंधर्वाचे चाहते. त्यांनी आठवण लिहिली आहे- ‘संगीत नाटक अ‍ॅकॅडमीतर्फे त्यांचा (बालगंधर्वाचा) सवरेत्कृष्ट नट म्हणून गौरव होणार होता, त्या वर्षीच्या अ‍ॅकॅडमीच्या कौन्सिलवर मी आणि (कै.) मामा वरेरकर असे दोनच महाराष्ट्रीयन प्रतिनिधी होतो. मामांनी ‘गंधर्वाना अभिनय व संगीतातले श्रीगणेशासुद्धा समजत नाही’, असे विधान करताच कै. पृथ्वीराज कपूर, देविकाराणी व कमलादेवी चटोपाध्याय यांनी ‘बुढ्ढे, तुम चूप बैठो’ म्हणून मामांवर हल्ला केला होता.’

१९५६-५७च्या दरम्यानची गोष्ट आहे. बालगंधर्वानी आत्मचरित्र लिहावे, असा आचार्य अत्रे यांचा आग्रह होता. मिरजेच्या वसंतराव आगाशे यांनी ‘बालगंधर्वाचे असफल आत्मवृत्त’ या आपल्या लेखात यासंबंधीचे सविस्तर वर्णन केले आहे. जिज्ञासूंनी तो लेख जरूर वाचावा किंवा वसंतराव आगाशे यांच्याशी संपर्क साधावा. (मिरज- दूरध्वनी ०२३०-२२२५४४७). जर ते आत्मवृत्त प्रसिद्ध झाले असते तर बालगंधर्वाच्या अनेक अज्ञात गुणांवरही प्रकाश पडला असता. पण जर-तर या गोष्टींना काहीच अर्थ नसतो. आपण फक्त, ‘असा बालगंधर्व आता न होणे’ म्हणत या महान कलाकाराला वंदन करायचे.
(लोकसत्ता-पुणे वृत्तान्तवरून साभार)