18 December 2009

नर्मदा परिक्रमा स्कूटरवरुन...

नर्मदा परिक्रमा हा विषय गेल्या काही वर्षात जगन्नाथ कुंटे यांच्या नर्मदे हर या पुस्तकामुळे अनेक लोकांपर्यंत पोहोचला आङे. कुंटे यांच्यापूर्वीही या विषयावरील काही पुस्तके प्रकाशित झाली होती तसेच काही मंडळींनी नर्मदा परिक्रमाही केली होती. गो. नि. दांडेकर यांच्या कुणा एकाची भ्रमणगाथा या खूप वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकातही याविषयी सांगण्यात आले आहे. नर्मदा परिक्रमा ही पायी किंवा बसमधून केली जाते. अनेक जणांनी ती केलीही असेल तर काही जणांच्या मनात करण्याची इच्छा असेल. सातारा येथील घाडगे दाम्पत्याने (प्रकाश आणि वासंती घाडगे) स्कुटरवरुन ही नर्मदा परिक्रमा केली म्हणून त्याचे वेगळेपण. स्कुटरवरील नर्मदा परिक्रमेवरचे नर्मदातीरी हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.


वासंती प्रकाश घाडगे यांनी लिहिलेले हे पुस्तक ठाणे येथील उद्वेली बुक्स या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. पंधरा दिवसातील स्कूटरवरुन केलेल्या नर्मदा परिक्रमेचे प्रवासवर्णन यात आहे. २३ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २००९ या कालावधीत घाडगे दाम्पत्याने ही परिक्रमा केली. या दोघांनी .ापूर्वी स्कुटरवरुन भारतात अनेक ठिकाणी भ्रमंती केली आहे. त्या प्रवास करण्याच्या वेडातूनच स्कुटरवरुन नर्मदा परिक्रमा करावी, असे त्यांच्या मनात आले आणि जिद्दीने, आलेल्या संकटांना तोंड देत दोघांनी ही परिक्रमा पूर्ण केली.


या पुस्तकात त्यांनी पंधरा दिवसातील स्कूटरवरील प्रवासाचा तक्ता दिला आहे. नर्मदा परिक्रमेचा पायी मार्ग २ हजार ८५६ किलोमीटर इतका असून वाहनाने काही ठिकाणी लांबून रस्ते असल्याने हे अंतर वाढते. घाडगे दाम्पत्याने सातारा ते धुळे (४४०), धुळे ते ओंकारेश्वर (२८०), ओंकारेश्वर ते शहादा (३००), शहादा ते कटपोर (२३०), कटपोर ते मनसर (७०), मनसर ते कुक्षी (३९०), कुक्षी ते इंदूर (२३०), इंदूर ते बरेली (२३०), बरेल ते कटनी (३७०), कटनी ते अमरकंटक (३६०), अमरकटंक ते महाराजपूर (१८०), सहाराजपूरह ते होशंगाबाद (३००), ओंकारेश्वर ते धुळे (३१०) आणि धुळे ते सातारा (४४०) असे अंतर स्कूटरवरुन पार केले. (कंसातील सर्व आकडे किलोमीटरमध्ये)


घाडगे दाम्पत्याने १९९८ पासून स्टूरवरुन भ्रमण करायला सुरुवात केली. नर्मदा परिक्रमेचा प्रवास या दोघांनी केला तेव्हा प्रकाश घाडगे यांनी साठी ओलांडली होती तर वासंती या साठीकडे झुकल्या होत्या. या वयाय नर्मदा परिक्रमेला जाणे आणि तेही स्कूटरच्या प्रवासाने म्हणजे खरोखऱच जिद्दीचे आणि धाडसाचे काम. पण दोघांनीही हिंमतीने ते पूर्ण केले. त्या अनुभवावर आधारित वासंती घाडगे यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचनीय झाले आहे. प्रवासाची दैनंदिनी असे याचे स्वरुप असले तरी ओघवत्या भाषेमुळे ते वाचायला हातात घेतले की पुढे काय याची उत्सुकता निर्माण करते. यापूर्वी वासंदी घाडगे यांनी लिहिलेले कन्याकुमारी ते कैलास हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.


नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांच्या यादीत घाडगे दाम्पत्याच्या स्कूटरवरील नर्मदा परिक्रमेच्या पुस्तकाची भर पडली आहे. बाईकिंग करणाऱया धाडसी तरुणांसाठी किंवा प्रवासाची आवड असणाऱयांकरता वासंती घाडगे यांचे हे पुस्तक संग्राह्य आणि उपयुक्त असे आहे. पुस्तकाच्या शेवटी नर्मदा परिक्रमेचा आराखडा नकाशाच्या स्वरुपात देण्यात आला आहे.    

17 December 2009

चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी संमेलन

महर्षी शांडिल्य प्रतिष्ठान आणि सोलापूर येथील जोशी कुलबंधु व भगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २६ व २७ डिसेंबर रोजी सोलापूर येथे २९ वे चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. प्रकाश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. सध्याच्या काळात अशी ज्ञाती संमेलने आयोजित करावी का, असा वादाचा मुद्दा उपिस्थत होऊ शकतो. मात्र मला असे वाटते की अशी ज्ञाती संमेलने भरविण्यात काहीही चूक नाही. वेगवेगळ्या प्रांतात आणि राज्यातील विविध शहरात पसरलेले कुलबंधु या निमित्ताने दोन दिवस एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होते, परस्परांच्या ओळखी होतात, यातून काही नवीन उपक्रम हाती घेतले जाऊ शकतात.  सर्वात महत्वाचे म्हणजे दूरचित्रवाहिन्या, इंटरनेट आणि परस्परांमधील संवाद कमी होत जाण्याच्या काळात अशा संमेलनाच्या निमित्ताने अनोळखी व्यक्तीनी एकत्र येऊन नवीन ओळखी वाढवणे आणि सवंदा साधणे हे काम या संमेलनांच्या निमित्ताने होत असते. त्यामुळे अशी विविध ज्ञाती संमेलने होणे गरजेचे आहे.


चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी संमेलनाची सुरुवात १९८२ मध्ये झाली आणि आजतागायत गेली २८ वर्षे ही संमेलने आयोजित करण्यात येत आहेत. संमेलनाला ज्ञाती बांधवांची उपिस्थतीही  मोठ्या प्रमाणात असते हे विशेष. ज्येष्ठ पत्रकार आणि नाटककार विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली पहिले संमेलन २८ मार्च १९९२ मध्ये पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर पुणे, रत्नागिरी, इचलकरंजी, बडोदा, डोंबिवली, नाशिक, कोळथरे (जिल्हा-रत्नागिरी, तालुका-दापोली), ठाणे, चिपळूण, मुंबई, वरवडे विलेपार्ले, अकोला, लोणावळा, नागपूर, सातारा आदी विविध ठिकाणी ही संमेलने झाली आहेत. यंदाचे २९ वे संमेलन सोलापूर येथे होणार आहे.


सोलापूर येथील गजानन कृष्णाजी जोशी व अतुल वसंत जोशी हे संमेलनाचे प्रमुख संयोजक आहेत. उपलम मंगल कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे हे संमेलन होणार आहे. २६ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून संमेलनार्थींचे स्वागत आणि नावनोंदणी सुरु होणार आहे. संध्याकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि नऊनंतर भोजन असा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आहे. दुसऱया दिवशी सकाळी (२७ डिसेंबर) सकाळी ७ ते ९ या वेळेत कुलदैवतपूजन, आरती मंत्रपुष्प व तीर्थप्रसाद सकाळी ९ ते १० या वाळेत अल्पोपहार, १० ते १२.३० या वेळेत मुख्य समारंभ आणि दुपारी साडेबारानंतर भोजन झाल्यावर  संमेलनाची सांगता  होणार आहे. संमेलनाची वर्गणी प्रत्येकी २०० रुपये असून ती संमेलनस्थळीच स्वीकारण्यात येणार आहे. शनिवार २६ डिसेंबरची संध्याकाळ ते रविवार २७ डिसेंबर पर्यंतचा संमेलन समारोप होईपर्यंत संमेलनार्थींच्या निवास व भोजनाची सोय स्थानिक संमेलन समितीकडून केली जाणार आहे.


चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी संमलेनात जास्तीत जास्त कुलबंधु आणि भगिनी तसेच माहेरवाशीणींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. आमडेकर, उत्तुरकर, घनवटकर, घुले, घोरपडे, जोशीराव, टकले, टोकेकर, दणगे, दाणेकर, गुदल, नामजोशी, फडणीस, बावडेकर, भाटे, मटंगे, मनोळीकर, मेडदकर, मोकाशी, योगी, राजवाडे, वाडेकर, शेंडे, हरिश्चंद्रकर, हुपरीकर, ही आडनावे असणारे सर्वजण मूळचे चित्पावन शांडिल्य गोत्र जोशीच आहेत. विविध कारणांनी त्यांच्या पूर्वजानी वरील आडनावे स्वीकारलेली आहेत. या सर्व आडनावांचा समावेश १९८२ मध्ये प्रकाशित झालेल्या चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी  या कुलवृत्तान्तात करण्यात आला आहे. आपल्या परिचयातील अशा कुलबांधवानाही ही माहिती सांगून त्यानाही सोलापूर येथील संमेलनास येण्यास सांगावे, असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.


चित्पावन शांडिल्य गोत्र  जोशी यांचे श्री लक्ष्मी केशव, कोळिसरे, जिल्हा रत्नागिरी आणि श्री लक्ष्मी नृसिंह, कसबा-संगमेश्वर, जिल्हा-रत्नागिरी ही कुलदैवत आहेत. काहींचे लक्ष्मीकेशव तर काहींचे लक्ष्मीनृसिंह असे कुलदैवत आहे. लक्ष्मीकेशव, कोळीसरे येथे भार्गव मराठे हे मंदिराचे पुजारी आहेत. त्यांचा दूरध्वनी असा ०२३५७-२४३८३५ तर लक्ष्मीनृसिंह येथे जाण्यासाठी संपर्क दूरध्वनी पुढीलप्रमाणे बापू जोशी ०२३५४-२५२९६० किंवा केशव जोशी ०२३५४-२५२४४६


सोलापूर येथील २९ व्या चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी संमेलनासाठी ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांच्यासाठी अधिक माहितीकरता संपर्क दूरध्वनी पुढीलप्रमाणे
गजानन कृष्णाजी जोशी-०९९७५२५८२६०

संमेलनाला उपिस्थत राहणाऱयांनी आपली नावे आणि वय लेखी स्वरुपात डॉ. पी. के. जोशी, चर्च स्ट्रीट, शांतिसागर मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर येथे कळवावीत.       

16 December 2009

प्रांजळ आत्मकथन-रास

ज्येष्ठ कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर यांनी लिहिलेले रास हे आत्मचरित्र नुकतेच वाचनात आले. मौज प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. अत्यंत प्रांजळ असे हे आत्मकथन असून आपले आयुष्य त्यांनी जसे आहे तसे पारदर्शकतेने मांडले आहे. मराठी साहित्यातील एका ज्येष्ठ कवीची पत्नी म्हणून या आत्मकथनात कुठेही बडेजाव किंवा मीपणा दिसत नाही.


सुमा या विंदांच्या द्वितीय पत्नी. सुमा यांचाही पहिला विवाह झाला होता. दुर्दैवाने त्यांच्या पतीचे निधन झाले. तर  करंदीकर यांच्याही पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. करंदीकर यांना विनापत्य विधवेबरोबरच लग्न करायचे होते. सुमा यांचे स्थळ त्यांना सुचवल्यानंतर ते सुमा यांच्या मामांकडे येऊन त्यांना भेटले. २८ जानेवारी १९४७ रोजी मामाच्या घरी देवांसमोर सुमा या करंदीकर झाल्या. त्या मुळच्या कुसुम दामले. नंतरच्या ज्योत्स्ना साने आणि विंदा करंदीकर यांच्याशी लग्न झाल्यानंतर सुमा करंदीकर.


प्रसिद्ध व्यक्तींच्या बायकोंनी लिहिलेली आत्मचरित्रे म्हणजे काहीतरी खमंग, सनसनाटी आणि वाद होईल, असा मजकूर असे एक चित्र काही आत्मचरित्रांमधून आपल्याला दिसून य़ेते. मात्र सुमा करंदीकर यांचे रास हे आत्मचरित्र त्याला अपवाद आहे. आयुष्यात जे काही वाट्याला आले ते सहजतेने आणि कोणतीही तक्रार न करता स्वीकारणे, आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे जाणे आणि हे सर्व करतानाही त्याचा कुठेही बडेजाव किंवा मी पणा नाही हे महत्वाचे.


असे हे कंरदीकर, अरेरावी, उर्मट, भांडखोर आणि संतापी पण आतून अतिशय ऊाबडे आणि हळवे. तोंडाला येईल ते फडाफडा बोलून मन दुखावणारे, पण जीव तोडून प्रेम करणारे. वरवर अतिशय कंजुष व काटकसरी, पण प्रसंग आला तर नेसलेलेही सोडून देण्याची तयारी असणारे, असे सुमाताई सांगतात, पण त्याचबरोबर करंदीकर यांच्यासारखा प्रतिभावंत, बुद्धिवान आणि थोर विद्वान असा नवरा मिळाला हे माझे सात जन्माचे भाग्य. मी एक सामान्य बाई. एका जन्मीचे नव्हे तर आपल्या जुन्या धर्मकल्पनेप्रमाणे सात जन्मांचे माझे पूर्वसुकृत. हे सर्व अगदी खऱे. पण करंदीकरांना माझ्यासारखी शांत, समजूतदार (माझ्यामते), त्यांना समजून घेणारी आणि त्यांच्या अरेरावीने नाउमेद न होणारी, विवेकी बायको मिळाली हे करंदीकरांचेही भाग्यच. दुसरी एखादी कर्तगार, हुषार बायको मिळती तर एव्हाना चारदा घटस्फोट झाला असता, असेही त्या स्पष्टपणे सांगून टाकतात.


सुमा करंदीकर यांनीही काही कथा लिहिल्या आहेत. त्यांचा एक कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. लग्न झाल्यानंतरचे दिवस, करंदीकर यांच्या सासरची मंडळीं आणि विंदा यांच्याविषयी सुमाताईंनी सविस्तर लिहिले आहे.   बेळगाव, डोंबिवली, माहीम येथील घरे आणि सध्याचे वांद्रे येथील साहित्य सहवास हे निवासस्थान येथील आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. आपली मुले, नातवंडे आणि आयुष्यात जी जी मंडळी भेटली, त्या सर्वांविषयी त्यांनी लिहिले आहे.


साधी व सोपी भाषा आणि थोडीशी विस्कळीत पण एकेक आठवणींचा पट उलगडून सांगणारी शैली यामुळे हे आत्मकथन वाचनीय झाले आहे.          

14 December 2009

घरातल्या घरात खतनिर्मिती

आपल्या घरात तयार होणाऱया ओल्या आणि सुक्या कचऱयाचे आपण काय करतो. तर तो दररोज घरी येणाऱया कचरेवाल्याला/वालीला तो  देऊन टाकतो. घरातील कचरा बाहेर दिला की आपले काम संपते. आपल्या घरी आपण हौसेने विविध झाडे लावलेली असतात. ही झाडे चांगली वाढावीत, त्यांना भरपूर फुले यावीत असे आपल्याला नेहमी वाटते. त्यासाठी आपण नसर्रीतून महाग रासायनिक खतेही आणतो.  पण आपल्या घरातच तयार होणाऱया ओल्या कचऱयापासून उत्तम प्रकारचे खत तयार करता येते आणि ते करणेही काही अवघड नाही, हे समजले तर प्रत्येकाला घरच्या घऱी असे खत तयार करता येईल.


घरच्या घऱी खत तयार करायला खूप मोठी जागा लागेल, तो कचरा कुजल्यानंतर त्याचा घाण वास येईल, त्यावर माशा, किडे बसतील, असा समज असेल तर तो चुकीचा आहे. कारण घऱच्या घऱी खत तयार करताना अशा प्रकारची कोणतीही दुर्गंधी त्या कचऱयाला किंवा तयार झालेल्या खताला येत नाही. डोंबिवलीत राहणारी माझी चुलत बहीण अनघा जोशी हिने सध्या घरातील ओल्या व सुक्या कचऱयापासून खतनिर्मिती करण्याचा छंद जोपासला आहे. हे खत ती स्वतपुरते तयार करुन थांबली नाही तर तीने त्याचा चांगल्यापैकी प्रचार-प्रसार केला आहे. तिच्या माध्यमातून आज डोंबिवलीतील अनेक जणांनी घरच्याघरी खत तयार करणे सुरु केले आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था, बैठी घरे किंवा चाळी, महिला मंडळे, शाळा आणि महाविद्यालयातून ती घरच्याघरी खतनिर्मितीवर व्याख्याने आणि प्रात्यक्षिक देत आहे. 


आपल्या घरातील कचऱयाचा डबा ठेवायला जेवढी जागा लागते, तेवढीच जागा कचऱयापासून खत तयार करणाऱया बास्केटला किंवा बादलीला लागते. घरी दररोज केल्या जाणाऱया भाज्यांची देठे, पाने,  किडलेली पाने, फळे किंवा भाज्यांची साले, घरातील झाडांच्या कुड्यांमधील वाळलेली पाने, कांदे-बटाटे यांची साले, फळांची टरफले, देवांचे निर्माल्य आदी साहित्यापासून आपल्याला घरच्या घऱी खतनिर्मिती करता येऊ शकते. खत तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली की तीन ते चार महिन्यात उत्तम दर्जाचे आणि त्यात कोणतेही रासायनिक घटक नसलेले खत तयार होते. इतकेच नव्हे तर झाडे लावताना कुंडीमध्ये माती न घालता केवळ हे खत घातले तरी त्यात फळझाडे किंवा फुलझाडे चांगल्या प्रकारे वाढू शकतात.


अनघाने ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंच या पर्यावरणविषयक काम करणाऱया स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थेत काम करताना घऱच्या घऱी खतनिर्मिती कशी करायची हे तंत्र शिकून घेतले. सध्या  किमान शंभर ठिकाणी तिने तयार करुन दिलेल्या कचऱयापासून खतनिर्मितीच्या बास्केट वापरल्या जात आहेत. ही बास्केट रेडिमेडही मिळते किंवा मार्गदर्शन घेऊन आपल्यालाही घरी तयार करता येऊ शकते. याचा सुरुवातीचा खर्च अवघा चारशे रुपये इतका आहे. यात बास्केट, खतनिर्मिती तयार करण्यासाठी लागणारे बायोकल्चर आणि काही अन्य बाबींचा समावेश आहे. एकदा का खत तयार झाले की नवीन बास्केट तयार करताना आपल्याला त्यात बायोकल्चरही टाकावे लागत नाही. तयार झालेले खत त्यात टाकले तरी खत तयार करता येऊ शकते. म्हणजे चारशे रुपये ही एकदाच करायची गुंतवणूक आहे. खतनिर्मितीसाठी उपयोगाता आणली जाणारी बास्केट/बादली तीन ते चार वर्षे चांगल्या प्रकारे टिकू शकते.


अनघाप्रमाणेच महाराष्ट्रात आणि मुंबईतही काही मंडळी ओल्या व सुक्या कचऱयापासून अशा प्रकारची खत निर्मिती करत आहेत. अन्य लोकांना त्याबाबत मार्गदर्शन करत आहेत. खरे म्हणजे आपण प्रत्येकाने आपल्या घरात तयार होणाऱया ओल्या व सुक्या कचऱयापासून अशा प्रकारे खत तयार करण्याचे ठरवले तर कचऱयाची समस्याच निर्माण होणार नाही. राज्यातील बृहन्मुंबई महापालिकेसह अन्य महापालिका आणि नगरपालिका प्रशासनाला दिवसेंदिवस वाढणाऱया कचऱयाची विल्हेवाट कशी लावायची ही मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. प्रत्येकाने आपल्या घरातील कचऱयापासून अशा प्रकारचे खत तयार करण्याचे ठरवले तरीही कचऱयाची विल्हेवाट लावण्याची  समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकेल.


शहरातील मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले, निवासी वसाहती, महापालिका किंवा नगरपालिका क्षेत्रातील एखादा प्रभाग आणि तेथील नागरिकांनी आपल्या येथे तयार होणाऱया ओल्या व सुक्या कचऱयापासून असे खत तयार करण्याचे ठरवले तर आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर राहू शकेल. कचऱयाची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्न निर्माण होणार नाही. भविष्यात या कचऱयापासून केवळ खतनिर्मितीवरच मर्यादित न राहता, त्यापासून वीजनिर्मिती करण्याचाही प्रकल्प हाती घेता येऊ शकेल. सध्याच्या भारनियमनाच्या काळात त्याची नक्कीच आवश्यकता आहे. अर्थात हे सर्व करण्यासाठी राज्य शासन, स्थानिक महापालिका, नगरपालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांनीही यात विशेष रुची दाखवली पाहिजे. नागरिकांना अशा प्रकारचे प्रकल्प उभाऱण्यासाठी सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. किमान आपल्या घरापासून तरी याची सुरुवात झाली पाहिजे.


ओल्या आणि सुक्या कचऱयापासून घरच्या घरी खतनिर्मिती, रेडिमेड बास्केट, बायोकल्चर आणि या संदर्भातील अधिक माहितीसाठी अनघा जोशी यांच्याशी खालील ई मेल आय़डीवर

anagha75@rediffmail.com  किंवा swami1075@gmail.com   तसेच ०९८३३६२१८२२ या भ्रमणध्वनीवरही संपर्क साधता येईल.

लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त (२५ ऑक्टोबर २००९) पुरवणीत अनघाच्या या उपक्रमाविषयीचा लेख प्रकाशित झाला आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=18046:2009-10-24-15-20-20&catid=42:2009-07-15-04-00-30&Itemid=53
  
 
          

13 December 2009

द्वारकेत भागवत सप्ताह...

हिंदू धर्मामध्ये चार वेद आणि अठरा पुराणांना खूप महत्व आहे. जी अठरा पुराण आहेत, त्यात भागवत या पुराणाचा समावेश होतो. भागवत आणि भगवदगीता यांचा काहीही संबंध नाही. भगवदगीता म्हणजे कृष्णाने अर्जूनाला केलेला उपदेश आहे. तर भागवतपुराणाचा मुख्य विषय भक्तीयोग हा आहे. महर्षी व्यास यांनी रचलेल्या या भागवतपुराणात भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी सांगण्यात आले आहे. भागवतपुराणातील कृष्णकथा, कृष्णनिती आणि कृष्णविचारांचा प्रचार होण्यासाठी विविध ठिकाणी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. भागवत पुराण हे बारा भागांमध्ये
पहिल्या भागात विष्णूच्या सर्व अवतारांविषयी माहिती देण्यात आली आहे. भागवतपुराणात एकूण १८ हजार श्लोक आहेत.


वैष्णव पंथीयांसाठी भागवतपुराण हा ग्रंथ महत्वाचा मानण्यात येतो. वेद आणि उपनिषदे यांचे सार या पुराणात सांगण्यात आले आहे. सकाम कर्म, निष्काम कर्म, ज्ञान साधना, सिद्धि साधना, भक्ति, अनुग्रह,  द्वैत-अद्वैत, द्वैताद्वैत, निर्गुण-सगुण  आदींबाबत यात मार्गदर्शन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आणि भारतात विविध ठिकाणी भागवतपुराणाचे कायर्क्रम आयोजित करण्यात येत असतात. त्यालाच भागवत सप्ताह म्हणून ओळखले जाते.


गेल्या काही वर्षांपासून विवेक घळसासी हे नाव मराठी लोकांना वक्ता, प्रवचनकार आणि भागवतपुराण निरुपणकार म्हणून परिचित झाले आहे. घळसासी यांनी काही वर्षे तरुण भारत या दैनिकाचे मुख्य संपादक म्हणूनही काम पाहिले आहे.  डोंबिवलीतील स्मिता केसकर, सुखदा वेलणकर यांनी पुढील वर्षी एप्रिल महिन्यात घळसासी यांच्या भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे हा कार्यक्रम द्वारका येथे होणार आहे. घळसासी यांचा भागवत सप्ताह यापूर्वी नुकताच द्वारका येथे आयोजित करण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे पुढील वर्षी येणाऱया अधिक मासाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.


दर तीन वर्षांनी अधिक महिना येत असतो. या अधिक महिन्यांत विविध व्रतवैकल्ये केली जातात. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन कीर्तन, प्रवचन श्रवण करणे, तीर्थयात्रा करणे आदी केले जाते. पुढील वर्षी १५ ते २१  एप्रिल या कालावधीत द्वारका येथे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ एप्रिल २०१० रोजी मुंबई सेंट्रलहून पोरबंदरकडे प्रयाण करायचे असून सुदामनगरी, किर्तीमंदिर, सोमनाथ, सोमनाथशहर दर्शन केले जाणार आहे. १४ तारखेला संध्याकाळी द्वारकेत आगमन होणार असून १५ तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून भागवत कथा/सप्ताहास सुरुवात होणार आहे. २१ एप्रिल रोजी भागवत सप्ताहाची समाप्ती होणार असून दुसऱया दिवशी दुपारी एक वाजता परतीच्या प्रवासाला निघायचे आहे.


घळसासी यांच्या भागवत सप्ताहात सामाजिक व राजकीय सद्यस्थिती,  त्या परिस्थितीला अनुरुप ठरणारे भगवान श्रीकृष्ण यांचे विचार, कृष्णनिती यांचा उहापोह केला जातो. गेल्या काही वर्षात ठिकठिकाणी घळसासी यांचे भागवत सप्ताहाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मात्र खुद्द द्वारकेमध्ये आयोजित या भागवत सप्ताहाला विशेष असे महत्व आहे.या संदर्भात अधिक माहिती आणि ज्यांना या भागवत सप्ताहासाठी जाण्याची इच्छा आहे, त्यांनी स्मिता केसकर  यांच्याशी ९९२०८५८८१४/०२५१-२४८८९८० किंवा सुखदा वेलणकर यांच्याशी ९९२०६५९३७९/०२५१-२४८०५०३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.             

10 December 2009

ने मजसी ने परत मातृभूमीला...स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या कवितेला आज शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या या कवितेला ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले आणि ही कविता सर्वसामान्यांच्या ओठावर आली. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर आणि स्वत हृदयनाथ या पाच भावंडांनी ही कविता गायली.


ज्येष्ठ संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात ही कविता घेतली असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरच ती चित्रित करण्यात आली आहे. आपल्याला ही कविता/गाणे लता मंगेशकर यांच्या आवाजात परिचित झालेली आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी या कवितेला दिलेली चाल आपल्या स्मरणात आहे. मात्र सुधीर फडके यांनीही त्याला वेगळी पण चांगली चाल लावली आहे.


स्वातंत्र्यवीर विनायक  दामोदर सावरकर यांना क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणून ओळखले जाते. अशा या थोर क्रांतिकारक योध्याची स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण म्हणजे केंद्र शासनाने उपेक्षाच केली. सावरकर हे कट्टर हिंदुत्वनीष्ठ असल्यामुळेच कॉंग्रेसी सरकारने त्यांचे महत्व वाढू दिले नाही. खरे तर सावरकर हे द्रष्टे राजकारणी आणि नेते होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी जे जे सांगितले तिकडे आपण वेळीच लक्ष दिले असते आणि गांधीनिती ऐवजी सावरकरनितीने वागलो असतो तर देशापुढे आज जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत, ते झाले नसते. केंद्रातील कॉंग्रेस शासनाचा सावरकर द्वेष इतका पराकोटीचा होता की आकाशवाणी केंद्रावरुन सावरकर यांनी लिहिलेल्या कविता/गाणी यांच्या ध्वनिमुद्रीका वाजवायलाही बंदी घालण्यात आली होती. मात्र नंतर सावरकर यांची गाणी आकाशवाणीवरुन वाजवायला सुरुवात झाली.


देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सावरकर यांनी जे काही सोसले त्याच्या नखाचीही सर आजच्या राजकारणी नेत्यांना नाही. सुधीर फडके यांनी निर्माण केलेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहताना सावरकर आणि आजच्या राजकारणी नेत्यांची तुलना मनात येते. आजचे भ्रष्टाचारी, स्वार्थी, निर्लज्ज, गेंड्याची कातडी असलेले सर्वपक्षीय राजकारणी नेते आणि त्यांच्या भानगडी वाचल्या की या सर्व मंडळींना सावरकर यांनी ज्या अंदमान कोठडीत मरणयातना भोगल्या तेथे आजच्या राजकारणी नेत्यांनाही शिक्षा म्हणून किमान काही दिवस तरी पाठवावे, असे मनात येते.


सावरकर यांनी लिहिलेल्या ने मजसी ने परत मातृभूमीला या गाण्याच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यानीच लिहिलेली ही कविता आज सर्वांच्या माहितीसाठी देत आहे.


ने मजसी ने परत मातृभूमीला

सागरा प्राण तळमळलाभूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता

मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू

तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले

मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन

विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी

तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला

सागरा, प्राण तळमळला ... ॥१॥शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी

भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती

गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे

जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा

ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे

तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला

सागरा, प्राण तळमळला ...नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा

प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी

तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा

भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे

तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला

सागरा, प्राण तळमळला ...या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा ?

त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्लभूमीते

मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देती

तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे

कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला

सागरा, प्राण तळमळला ...


सनातन प्रभात या दैनिकाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर एक विशेषांक प्रकाशित केला आहे.
त्याची लिंकही खाली देत आहे.

http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/veersavarkar/index.htm


सुधीर फडके यांनी निर्माण केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटातील या गाण्याचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा


http://www.video4viet.com/watchvideo.html?id=8cA4BPFHi7M&title=सागरा%20प्राण%20तळमळला

         

09 December 2009

रुद्राध्याय आता मायबोलीत

श्री रुद्र हे प्रमुख देव असून रुद्राध्यायाचे पठण सर्व वेदांमध्ये प्रचलित हे. भगवान शिव किंवा त्यांच्या अवतार स्वरुपाच्या कोणत्याही पूजेत श्री रुद्र म्हणून अभिषेक केला जातो. रुद्र हे यजुर्वेदातील मंत्र असून वाजसनेयी संहितेतील (अध्याय १६ व १८)  तैत्तरीय संहितेतील (४.५ मधील ११ अनुवाक व ४.७ मधील ११ अनुवाक) यातून ते संकलित केले आहेत. ते सर्व रुद्राध्याय म्हणून प्रसिद्ध आहेत. संस्कृत भाषेत असलेला हा रुद्राध्याय आता मायबोली मराठी भाषेत जिज्ञासू आणि अभ्यासकांसाठी प्रभाकर गोखले यांनी उपलब्ध करुन दिला आहे.गोखले यांनी रुद्राध्यायाचे केवळ मराठी भाषांतर केलेले नाही तर ते संगीतमय पद्यांतर आहे. यात महामृत्यूंजय मंत्र, शिवस्तुती आणि मंत्र पुष्पांजलीचे मराठी भाषांतरही देण्यात आले आहे. वृंदावनी सारंग रागात हे मराठी पद्यांतर बांधण्यात आले आहे. श्री रुद्र हे तीन भागात आहेत.  पहिल्या भागात शांतीपाठ असून दुसऱया भागात श्री रुद्राच्या सर्व स्वरुपाचे वर्णन करण्यात आले आहे. त्यास नमक असे म्हटले जाते. तर तिसऱया भागात मानवाने आपल्यासाठी सर्व सुखाची मागणी केलेली असल्याने त्याला चमक असे म्हणतात. श्री रुद्राचे पठण करत असताना पहिल्यांदा शांतीपाठ, नंतर नमकचे ११ अनुवाक, महामृत्यूंजय मंत्र  आणि  शेवटी चमक ११ अनुवाक आणि शेवटी पुन्हा शांतीपाठ म्हणण्याची पद्धत आहे.


रुद्राध्याय हा संस्कृतमधील असल्याने अनेक जणांना त्याचे पठण करण्याची इच्छा असूनही तो करता येत नाही. त्यासाठीच गोखले यांनी हे मराठी रुपांतर केले आहे. डाव्या पानावर मूळ संस्कृत रुद्राध्यायचे अनुवाक आणि उजवीकडे प्रत्येक अनुवाकचे मराठी रुपांतर देण्यात आले आहे. गोखले यांनी रुद्राध्यायाच्या मराठी रुपांतराबरोबरच श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री श्रीसूक्त, श्री पुरुषसुक्त, श्री रुद्राभिषेक माहात्म्य, श्री महिम्न स्तोत्र, श्री देवी अथर्वशीर्ष, ललिता पंचक, भवान्याष्टक, कनकधारा स्तोत्र,  अन्नपूर्णा स्तोत्र, देवी आराधाना, श्रीमद्भभगवतगीता अध्याय १२ व १५, उपनिषद शांतीपाठ, त्रिसुपर्ण, संकल्प, विष्णूध्यान, गंगालहरी-स्वल्प, सत्यनारायण कथा आदींचेही मराठी रुपांतर केले आहे. विशेष म्हणजे या सर्व स्तोत्रांचे मराठी रुपांतर करताना ती वेगवेगळ्या रागात गाता येतील, अशा प्रकारे त्यांची रचना करण्यात आली आहे.


गोखले यांनी संस्कृत स्तोत्रे मराठीत आणून खूप मोठे काम केले आहे. गोखले हे मुळचे वाराणसीचे. त्यांचे शिक्षण अलाहाबाद येथे झाले. पुढे काशी हिंदू विद्यापीठात त्यांनी स्टेनोग्राफर म्हणून नोकरी केली. तर पुढे अनेक वर्षे विद्यापीठाच्या कुलगुरुंचे सचिव म्हणून काम पाहिले व त्याच पदावरून निवृत्त झाले. अनेक जणांना संस्कृतमधील ही स्तोत्रे म्हणायची असतात, पाठ करायची असतात, पण योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा म्हणायला कठीण गेल्यामुळे ते म्हणणे अर्धवट सोडून देतात. हीच अडचण लक्षात घेऊन गोखले यांनी हे काम केले आहे.


गोखले यांचा संपर्क भ्रमणध्वनी आणि ईमेल आयडी पुढीलप्रमाणे

०९८२४३३८९४३

gokhalepg@yahoo.co.in


 
      

06 December 2009

पहाटवारा

सध्या आपल्याकडेही मस्त थंडी पडायला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी आपल्याकडे अजिबातच थंडी पडली नाही आणि त्याच्या गेल्यावर्षी मुंबई, ठाणे परिसरात वाढत्या थंडीने उच्चांक गाठला होता. मला स्वतला थंडीचा हा ऋतू खूप आवडतो. सगळीकडे आल्हाददायक वातावरण असते. सकाळी  विशेषत पहाटेच्या वेळेस तर खूपच छान वाटते. थंडीच्या दिवसातील हा पहाटवारा प्रत्येकाने तरी अनुभवावा असाच असतो.


खरे तर पावसाळ्याचे दोन-तीन महिने सोडले तर मी पहाटे फिरायला जात नाही. पावसाळा संपला की दरवर्षी ऑक्टोबरपासून  मी पहाटेचे फिरणे सुरु करतो. पावसाळा सुरु होईपर्यंत जून अखेरपर्यंत माझे पहाटेचे फिरणे सुरु असते.  पण यावर्षी मी ऑक्टोबरऐवजी १ डिसेंबरपासून पहाटे फिरायला सुरुवात केली. सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जाण्याचा अनुभव छान असतो. रस्त्यावर फारशी वर्दळ वाहने आणि माणसांचीही नसते. रस्ते जणू काही आपल्यासाठीच आहेत, असे ते मोकळे असतात. या मोकळ्या रस्त्यांवरुन चालायला आणि फिरायला मला खूप आवडते.


थंडी सुरु झाली की त्या ठराविक काळापुरती बाहेर फिरायला जाणारीही मंडळी असतात. मुंबईत फारशी थंडी नसली तरी कानटोपी, मफलर, हात व पायमोजे, शाली, स्वेटर बहुतेक जणांच्या अंगावर दिसायला लागतात. मोकळी मैदाने, समुद्र किनारे, खाडी किनारा, बागा, जॉगिंग पार्क आदी ठिकाणी पहाटे पाच-साडेपाच वाजल्यापासून माणसे दिसायला लागतात. या प्रत्येक व्यक्तीची फिरण्याची, फेऱया मारण्याची किंवा जॉगिंग करण्याची स्वताची अशी खास पद्धत असते. काही जण वॉकमन, एमपी थ्री प्लेअर किंवा मोबाईलवरची गाणी ऐकत फेऱया मारतात. सकाळी फिरायला आलेल्या मंडळींमध्ये लहान मुलांपासून ते आजोबा-आजींपर्यंत सर्व वयोगटातील माणसे असतात. काही ठिकाणी योग वर्ग, हास्यक्लब सुरु असतात. मैदाने, क्लबच्या बाहेर कारले, आवळा आणि अन्य फळे किंवा पालेभाज्यांचे रस विकणारी मंडळी बसलेली असतात.


पहाटेच्या वेळेस किंवा सकाळी वातावरणात झाडे, पाने आणि फुलांचा एक धुंद करणारा सुगंध पसरलेला असतो. सोसायटी, बंगला किंवा मोकळ्या मैदानात असलेल्या अनंत, पारिजातक आणि अन्य काही फुलांचा सुगंध मनाला प्रफुल्लीत आणि उल्हसित करत असतो. दीर्घ श्वास घेऊन ही मोकळी हवा, पहाटवारा आणि सुगंध भरुन घेतला की तो दिवस एकदम मजेत, आनंदात आणि उत्साहातच जातो. सकाळी फिरून आल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. मला वाटते की ही सारी निसर्गाची किमया आहे. प्रत्येक ऋतू बदलताना असे वेगळे वातावरण निसर्ग तयार करत असतो. थंडीनंतर उन्हाळा आणि नंतर पावसाळा सुरु होतो. बदलणारा हा प्रत्येक ऋतू नवा रंग, नवा गंध घेऊन येत असतो.


हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तीनही ऋतूंमध्ये मला हिवाळा खूप आवडतो. माझ्याप्रमाणेच इतरांचेही तसेच मत असेल. अनेक जण थंडी सुरू झाली की पहाटे लवकर उठून फिरायला जाण्याचा मनाशी निश्चय करतात. लवकर उठण्यासाठी गजर लावतात. पण गुलाबी थंडीत गजर झाल्यावर जाऊ दे,  असे म्हणून पुन्हा पांघरुणात गुरफटून झोपी जातात. तो एक क्षण असा असतो की आळस झटकून आपण उठायचे मनाशी एकदा नक्की केले की पहाटेच्या वेळेस बाहेर फिरण्यातला आणि पहाटवारा अंगावर घेण्याचा आनंद काय असतो, ते कळेल. फर्त त्यासाठी मनाची निर्दार पक्का केला पाहिजे.


मग काय उद्यापासून पहाटे लवकर उठून फिरायला सुरुवात करताय ना...         

05 December 2009

आल्बम आठवणींचा...

छायाचित्रण अर्थातच फोटोग्राफी ही एक कला असून त्याचा वापर किंवा उपयोग म्हटले तर स्वताच्या आनंदासाठी आणि पैसे मिळविण्यासाठीही करता येऊ शकतो. प्रसारमाध्यमात किंवा एखादा विषय घेऊन त्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे अनेक छायाचित्रकार आहेत. वृत्तपत्रातील छायाचित्राबाबत असे म्हणतात की एखादी बातमी किंवा अग्रलेख जे शब्दात सांगू शकणार नाही ते  एखादे छायाचित्र सांगू शकते. छायाचित्र हे खूप बोलके असते. त्यामुळे छायाचित्र एखादे जळजळीत वास्तव किंवा सामाजिक प्रश्न जितक्या ताकदीने मांडू शकते तितक्याच ताकदीने व्यक्तीविषयक किंवा अन्य प्रसंग चपखलपणे टिपू शकते. आज हे सांगायचे कारण म्हणजे केवळ छायाचित्र या विषयाला वाहिलेला एक ब्लॉग.


मराठीमध्ये आज विविध विषयांवर लेखन करणारे ब्लॉगर्स तयार झाले आहेत. ते नियिमतपणे ब्लॉगवर लेखन करत असतात. विलास आंबेकर यांनी मात्र आपल्या अभिव्यक्तीसाठी लेखनाऐवजी छायाचित्रांचे माध्यम निवडले आणि  त्यांनी फक्त छायाचित्रे असलेला आपला ब्लॉग सुरु केला. आंबेकर हे एअर इंडियामध्ये इंजिनीअरिंग डिपार्टमेंटला व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. नोकरी सांभाळून त्यांनी आपला छायाचित्रणकलेचा छंद जोपासला आहे. हजारो विविध छायाचित्रे आज त्यांच्या संग्रहात आहेत. आपल्याकडे असलेल्या या छायाचित्रांचा खजिना त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून सर्वांसाठी खुला केला आहे. एक्स्प्रेस डॉट ए मायनस थ्री डॉट कॉम या संकेतस्थळावर त्यांनी आपला ब्लॉग सुरु केला. जागतिक पातळीवर कोणीही या संकेतस्थळावर आपण काढलेली छायाचित्रे अपलोड करु शकतो. याहू किंवा गुगलप्रमाणे या संकेतस्थळाने जागा उपलब्ध करुन दिली आहे.  हे संकेतस्थळ केवळ छायाचित्रांसाठीचे असून अन्य ब्लॉगप्रमाणे येथे कोणालाही छायाचित्रांसाठीचा आपला ब्लॉग सुरु करता येऊ शकतो.


१९७७ मध्ये आंबेकर एअर इंडियात एअरक्राफ्ट टेक्निशियन म्हणून नोकरीला लागले. एअर इंडियात नोकरीला लागल्यानंतरच त्यांच्या छायाचित्रण कलेला व छंदाला चांगला वाव मिळाला. एअर इंडियात असल्यामुळे परदेशातही त्यांना जाता आले. तेथेही त्यांनी भरपूर छायाचित्रे काढली. आंबेकर यांना मूळात हायकिंग व ट्रेकिंगची आवड होती. या आवडीच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि भारतात विविध ठिकाणी त्यांचे जाणे झाले होतेच. या सर्व ठिकाणीही त्यांनी निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेला खजिना आपल्या कॅमेरात बंदिस्त केला. हायकिंग व ट्रेकिंगनंतर त्यांना बायकिंगही  केले. मित्रांसमवेत मोटारबाईकवरुन त्यांनी मुंबई ते मध्यप्रदेश, ओरिसा, राजस्थान, उत्तरपूर्व भारत पालथा घातला. नुकताच त्यांनी कुटुंबीयांसमवेत लेह-लडाखचाही दौरा केला. या सर्व प्रवासात त्यांना खूप चांगली छायाचित्रे मिळाली. मित्र, परिचित, नातेवाईक यांच्याकडून त्यांच्या छायाचित्रांचेही कौतुक झाले. तुमच्याकडे असलेली ही सर्व छायाचित्रे लोकांना पाहण्यासाठी काहीतरी करा, अशी सूचना त्यांना अनेकांनी केली आणि त्यातूनच आंबेकर यांचा हा ब्लॉग तयार झाला आहे. आंबेकर यांच्याकडे सध्या डीएसएलआर ४०० डी हा कॅनन कंपनीचा कॅमेरा आहे. त्यांच्याकडे असलेली हजारो छायाचित्रे त्यांनी कॉम्प्युटरवर टाकली असून काही फोटोंच्या सीडीही तयार केल्या आहेत. २६ जुलै २००५ ला मुंबईत आलेल्या अस्मानी संकटात त्यांच्या घरातही पाणी गेले आणि त्यात त्यांच्याकडील छायाचित्रांचा संग्रह, अनेक फोटो शब्दश पाण्यात गेला. 


ऑक्टोबर महिन्यात आंबेकर यांनी ब्लॉग सुरु केला असून त्यावर दररोज एक नवीन छायाचित्र ब्लॉगला भेट देणाऱयांना पाहायला मिळते. निसर्ग, पर्यावरण, फुले, वाहतूक अशा विविध गटातील छायाचित्रे आंबेकर यांच्या ब्लॉगवर पाहायला मिळतात. छायाचित्राबाबतची थोडक्यात माहितीही ते कधी देतात. प्रत्येक फोटो काढताना आपण नेहमीच काहीतरी वेगळे टिपण्याचा प्रयत्न करतो.  सुर्योदय किंवा  सूर्यास्ताचे फोटो सगळेच काढतात पण त्यातही काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर फोटो अधिक चांगला होऊ शकतो. आंबेकर हे नुकतेच दिवेआगर, हरिहरेश्वर येथे गेले होते. समुद्रात मासेमारी करणाऱया कोळ्यांनी लावलेल्या जाळीला एका ठिकाणी काठी होती. त्यांनी ती काठी आणि सूर्य यांचा एकत्र आणले त्यामुळे काठीवर दिवा लावावा, असा सूर्य त्यांना टिपता आला. काही वर्षांपूर्वी ते माथेरान येथे गेले होते. तेथे पहाटेच्या वेळेस त्यांना आकाशात एकाच दिशेला चंद्र आणि सूर्य टिपता आले. कोणतेही छायाचित्र काढण्यासाठी आपल्याकडे संयम असला पाहिजे. तरच ते छायाचित्र उत्कृष्ट निघू शकते. तसेच हातात कॅमेरा आहे म्हणून वाटेल तसे फोटो न काढता त्यात वेगळेपण कसे येईल, ते पाहावे, व्यक्तींचे फोटो काढताना ते पोझ देऊन काढण्यापेक्षा त्यांच्या सहज आविर्भावात काढले तर जास्त चांगले येतात, असे आंबेकर यांचे म्हणणे आहे. आंबेकर यांनी छायाचित्रण कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले नाही. हौस आणि छंदातून व  नवनवीन अनुभव घेत, कधी चुका करत, त्यातून शिकत  आपली छायाचित्रण कला समृद्ध केली आहे.    

आंबेकर यांच्या फोटोंच्या ब्लॉगची लींक अशी

http://ekspressions.aminus3.com/

आंबेकर यांच्याशी संपर्कासाठी त्यांचा ई-मेल असा

spmangomaker@yahoo.com


     

    

04 December 2009

पाणीसंकट

यंदाच्या वर्षी कमी पडलेला पाऊस आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावातील कमी होत चाललेला पाणीसाठा यामुळे मुंबईत पाणीप्रश्न येत्या काही दिवसात गंभीर होत जाणार आहे. याची प्रचिती स्वाभीमान संघटनेने काल महापालिका मुख्यालयावर काढलेल्या मोर्चाने आली. पुढील वर्षीच्या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत सध्या आहे तो पाणीसाठा पुरेल, असा दावा प्रशासन करत असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने मुंबईत १५ टक्के पाणीकपात सुरु केली आहे. मात्र कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अजिबातच पाणी न येणे, पाण्याचे असमान वितरण यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत जाणार आहे. भविष्यात कदाचित पाण्याच्या प्रश्नावरुन नागरिकच एकमेकांची डोकीही फोडू शकतील.


हा प्रश्न केवळ मुंबई शहर आणि उपनगरापुरता मर्यादित नाही. उद्या याचे लोण मुंबई परिसरातील ठाणे, कल्याण किंवा राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रातही पसरु शकते. मुळात वाढते प्रदूषण, ढासळते पर्यावरण, उघडे-बोडके केलेले डोंगर, अमर्याद केलेली वृक्षतोड, बदलती जीवनशैली, नदी, नाले, विहीरी आणि समुद्रही बुजवून केलेली बांधकामे, जमिनीत पाणी मुरण्यासाठी इंचभरही शिल्लक न ठेवलेली जागा या आणि अशा काही कारणांमुळे अगोदरच पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पडणाऱया पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जितक्या मोठ्या प्रमाणात योजना हाती घेणे आवश्यक होते, तितक्या प्रमाणात त्या न राबवल्यामुळे हजारो नव्हे लाखो लिटर्स पाणी वाया जात आहे. धरणे किंवा तलाव भरले की पाणी सोडून देऊन वाया घालवावे लागत आहे. हे पाणी साठविण्याचे काही प्रयत्न नक्की होत आहेत, मात्र ते तोकडे पडत आहेत.


पाण्याचे नवीन स्त्रोतही आपण निर्माण करु शकलो नाहीत. त्यामुळे इंग्रजांच्या काळापासून ज्या तलावातून मुंबईला पाणीपुरवठा होत आहे, त्यातील पाणी आजही आपण वापरत आहोत. नवीन धरणे आपण बांधलीच नाहीत असे नाही. पण निसर्गाची वाट आपण माणसांनी जितक्या प्रमाणात लावली त्या तुलनेत नवीन पर्याय निर्माण झाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. बृहन्मुंबई महापालिका दररोज सुमारे साडेतीन हजार दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा करते. मात्र त्यातील ६०० ते ७०० दशलक्ष लीटर्स पाणी हे गळती किंवा चोरीच्या माध्यमातून वाया जात आहे. राज्यातील एखाद्या छोट्याश्या गावाची तहान हे पाणी भागवू शकते.


पाणीचोरी, अनधिकृत पाणीजोडण्या ही सुद्धा मुख्य समस्या आहे. महापालिकेचे अधिकारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, झोपडपट्टी दादा, पोलीस आणि शासकीय अधिकारी यांच्या अर्थपूर्ण व्यवहारातून अनेक ठिकाणी  अनधिकृत नळजोडण्या दिल्या जातात. फक्त मुंबईतच नव्हे तर राज्यातील कोणत्याही महापालिकेत किंवा नगरपालिका, ग्रामपंचायत येथेही तीच परिस्थिती आहे. राजकारणी मंडळींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्यामुळे पाणीप्रश्न किंवा समस्येवर सभागृहात आरडाओरड करणे, मोर्चे काढणे, आंदोलने व उपोषण करणे, अधिकाऱयांना घेराव घालणे असा देखावा केला जातो. मात्र या सर्वाच्या मूळाशी जाऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी अपवाद वगळता कोणीही राजकीय पक्ष पुढाकार घेत नाहीत. आपल्याकडे सर्वच राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना प्रत्येक प्रश्नाचे भांडवल करण्याची आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी राजकारण करण्याची सवय झाली आहे. त्यातून तात्कालिक फायदा होत असेलही पण प्रश्न सुटण्यास त्यामुळे काहीच मदत होत नाही.


जगातील तिसरे महायुद्ध हे पिण्याच्या पाणी प्रश्नावरुन होणार असे म्हटले जाते. मुंबईत काल घडलेला प्रकार पाहता तो दिवस दूर नाही, असे म्हणावे लागेल. राज्यकर्ते आणि विरोधीपक्ष यांनीही पुढील पन्नास ते साठ वर्षांचा विचार करुन नवीन योजना राबवणे, नवे प्रकल्प उभे करणे गरजेचे असते. बृहन्मुंबई किंवा राज्यातील अन्य भागात काही प्रयत्न झालेही. मात्र वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी आणि असलेला पाणीसाठा यांचे गणित काही जुळत नाही. पाणी या विषयावर कोणतेही राजकारण न करता सर्वपक्षीय नेते, स्वयंसेवी संस्था आणि मुख्य म्हणजे नागरिकांनीही गंभीर विचार केला पाहिजे. पाणी साठवा आणि पाणी वाचवा ही नुसती घोषणा न राहता ती प्रत्येकाने कृतीत उतरवली पाहिजे.                  

03 December 2009

पंचाहत्तर लाखांचे पुस्तक

सचिन तेंडुलकर.  तमाम मराठी माणसांसाठी असलेले अभिमानाचे आणि गौरवाचे नाव. सचिनने मोठ्या मेहनतीने  आज स्वताचे आणि महाराष्ट्राचेही नाव मोठे केले आहे. सचिन नावाभोवतीच एक वलय निर्माण झाले आहे. सचिन हे एक चलनी नाणे झाले असून गोष्टीतील मिडास राजाप्रमाणे सचिन तेंडुलकर ही मुद्रा ज्या ज्या वस्तू किंवा उत्पादन कंपनीवर उमटली की सोन्यापेक्षाही जास्त किंमत आणि महत्व त्याला प्राप्त होते. आजच बहुतेक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या सचिनबाबतच्या बातम्या वाचल्या तर मी काय म्हणतो ते लक्षात येईल. आता सचिन तेंडुलकर या विषयावर लवकरच  एक पुस्तक प्रकाशित होणार असून त्याची किंमत ७५ लाख रुपये असणार आहे.


आजवर प्रकाशित झालेल्या पुस्तकांमध्ये हे पुस्तक केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील सर्वात महागडे पुस्तक ठरणार आहे. या पुस्तकाचे वजनच ३० किलो राहणार असून पुस्तकाच्या पानांची संख्या ८०० असेल. भारतात किंवा जगभरातही आत्तापर्यंत अनेक  क्रिकेटपटूंवर मराठीसह इंग्रजी आणि अन्य भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मात्र सचिनला जे भाग्य लाभले आहे ते आजवर कोणत्याच क्रिकेटपटूला मिळाले नाही. सचिनने या बाबतीतही सर्व विक्रम मोडून स्वताचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. क्रिकेटमध्ये सचिनने केलेले  धावांचे विक्रम भविष्यात मोडलेही जातील पण या विक्रमी किंमतीच्या पुस्तकाचा विक्रम न भुतो न भविष्यती असाच राहण्याची शक्यता आहे, असे वाटते.


तेंडुलकर ओपस असे या पुस्तकाचे नाव असून लंडन येथील क्रॅकन ओपस या प्रकाशन संस्थेतर्फे ते प्रकाशित केले जाणार आहे. सचिनविषयी सर्व काही असे या पुस्तकाचे स्वरुप राहणार असून सचिनची आजवर कुठेही प्रकाशित न झालेली दुर्मिळ छायाचित्रेही यात असतील, असा दावा प्रकाशकांकडून करण्यात आला आहे. या पुस्तकाची खरेदी करणाऱया पहिल्या दहा ग्राहकांना पुस्तकाबरोबर सचिनच्या रक्ताचा थेंबही मिळणार असल्याचे या बातम्यांमध्ये म्हटले  आहे. जाहिरातदार कंपन्यांकडूनही आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी सचिनलाच अग्रक्रम दिला जातो. त्यासाठी सचिनला कोट्यवधी रुपयांचे मानधनही देण्याची त्यांची तयारी असते. आता वस्तू आणि  अन्य उत्पादनांबरोबरच सचिनने पुस्तकांचे क्षेत्रही काबीज केले आहे. पुस्तक खरेदी, विक्री आणि प्रकाशन क्षेत्रातही सचिन तेंडुलकर हा मोहोर उमटवली आहे. सर्वसामान्य माणूस आणि सचिनप्रेमी चाहते तर हे पुस्तक विकत घेऊन वाचू शकणार नाहीत. भारतातील बडे उद्योगपती, राजकारणीच हे पुस्तक विकत घेऊ शकतील. त्यांना केवळ प्रसारमाध्यमातून या पुस्तकाविषयी आलेल्या बातम्या वाचूनच समाधान मानावे लागणार आहे.


     

02 December 2009

विजय नव्हे तर अप्रत्यक्ष पराजय

बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शिवसनेच्या श्रद्धा जाधव निवडून आल्या म्हणून शिवसेनेत जल्लोष केला जात आहे. शिवसेनेचे कार्यकारी अध्य़क्ष तर थेट सहकुटुंब महापालिका मुख्यालयात आले. नुसत येऊन थांबले नाहीत तर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी चक्क बोलले. हा निष्ठावान शिवसैनिक व नगरसेवकांचा विजय असून शिवसेना आणि मुंबईवरील प्रेमाला तडा गेलेला नसल्याचे यातून दिसून येत असल्याची प्रतिक्रियाही ठाकरे यांनी दिली. विजय हा विजय असतो, असेही त्यांनी सांगितले. अगदी मान्य. पण हे यश खरोखरच निर्भेळ आहे का, याचा मनाशी प्रामाणिकपणे विचार करा. असे कळेल की या यशात कार्यकारी अध्यक्ष म्हणून आपला काहीही वाटा नाही. हा विजय नव्हे तर अप्रत्यक्ष पराजयच आहे.


समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी निवडणुकीच्या आदल्या दिवशी आम्ही तटस्थ राहणार असे जाहीर केले आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी सुटकेचा निश्वास टाकला. जर सपाने हे जाहीरच केले नसते तर शिवसेना शेवटपर्यंत गॅसवर राहीली असती. मनसेचे नगरसेवक सभागृहातच उपिस्थत राहिले नाहीत. आणि शिवसेनेतील ज्या दोन नगरसेविका हरवल्या होत्या त्या शिवसेनेच्या मदतीला आल्या. नशीब शिवसेनेतील अन्य नाराज नगरसेवक फुटले नाहीत. तसेच अखिल भारतीय सेनेच्या दोन नगरसविकाही शिवसनेच्या बाजूने राहिल्या. या सगळ्यामुळे कॉंग्रेसने केलेला चमत्काराचा बार अखेर फुसका ठरला.


बृहन्मुंबई महापालिकेच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेने सात जागा जिंकून भविष्यातील आपल्या वाटचालीची चुणुक दाखवली होती. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षात गेल्या काही वर्षांपासून तीव्र नाराजी आहे. उमेदवार निवड करण्यात अर्थपूर्ण व्यवहार केले जात असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे हे सर्वसामान्य शिवसैनिक, निष्ठावान पदाधिकारी आणि  अगदी शिवसेना नेत्यानाही त्यांच्यापर्यंत पोहोचणे अवघड जाते, त्यांच्या भोवताली असलेल्या चौकडीकडून जे निर्णय घेतले जातात, त्याला उद्धव केवळ मम म्हणतात, निष्ठावान शिवसैनिक, कार्यकर्ते यांची नेहमीच उपेक्षा केली जाते, असे शिवसेनेत सर्रास बोलले जाते. या सगळ्या गोष्टी एका रात्रीत घडून येत नाहीत. त्या आजवर साचत साचत गेल्या आहेत. त्यातूनच आपले महत्व वाढावे म्हणून पक्षातील अन्य नेत्यांचे पंख कापण्याचे धोरण उद्धव यांच्या सल्लागारांनी त्यांना दिल्यामुळे नारायण राणे, राज ठाकरे या सारखे मासलिडर पक्षातून अखेर बाहेर पडले. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेला मनसेच्या वाढत्या प्रभावाचा फटका बसला. शिवसेनेची उधोगती सुरु झाली. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेतील विजय हा खरे तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हवा होता.


राज ठाकरे यांनी भविष्याचा तसेच महापालिकेच्या दोन वर्षात होणाऱया सार्वत्रिक निवडणुकीचा विचार करुन कॉंग्रेसला मदत न करण्याचा योग्य निर्णय घेतला. ते जर कॉंग्रेसबरोबर गेले असते तर मतदारांच्या मनातील मनसेविषयीची सहानुभुती कदाचित कमी झाली असती. लोकांची नस उच्च पदावरील नेत्यांना ओळखता यायला हवी आणि थेट लोकांशी,  सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधायला हवा. संवाद नसला की मनामध्ये कटुता येते आणि त्याचा परिणाम पक्ष संघटनेवर होतो. कदाचित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी नगरसेवकांना केलेल्या मार्गदर्शनामुळेही शिवसेनेतील नाराज नगरसेवकांनी जाऊ दे, महापौर निवडणुकीत तरी आपली नाराजी बाजूला ठेवु या, असा व विचार केला असण्याची शक्यता आहे.


विधान परिषदेच्या दोन जागांसाठी बृहन्मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना मतदान करायचे आहे. -तसेच दोन-सव्वादोन वर्षांनी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेसाठी गुप्त मतदान असल्याने त्यावेळी शिवसेनेतील नाराजी बाहेर पडू शकते. किंवा महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून काही नाराज शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार शिवसेनेतून बाहेर पडू शकतात. ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे काही निष्ठावान नगरसेवक नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे हे दोन दिवस गायब झाले होते आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलून त्यांनी आपले मौन सौडले होते. पुन्हा मराठी माणसांनीच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, असे सांगून तमाम मराठी माणसांचा अपमान केला होता.


खरे सांगायचे तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सल्लागारांनी केलेली प्रत्येक खेळी चुकत गेली. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या श्रद्धा जाधव निवडून येणे यात उद्धव ठाकरे यांचे काहीही कर्तृत्व नाही. बाय लक त्यांना ते यश मिळाले आहे. आपल्या स्वताच्या ताकदीवर शिवसेनेतील नाराजी दूर करता येत नाही म्हणून शिवसेनाप्रमुखांना मैदानात उतरवून त्यांनी आपली लंगडी बाजू सावरली आहे. आताही शिवसेनाप्रमुख दर पंधरा दिवसांनी शिवसेनाभवनात कार्यकर्ते, पदाधिकारी यांना भेटतील, असे जाहीर केले आहे. म्हणजे आपल्या चेहऱयाऐवजी ते पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांचाच चेहरा पुढे णात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईवरच त्यांचे नेतृत्व पुढे येत आहे. राज ठाकरे यांनी आपल्या स्वताच्या ताकदीवर आणि हिंमतीवर तीन वर्षात सर्वसामान्य मराठी मनावर अधिराज्य निर्माण केले आहे. आपल्या पक्षाची ताकद दाखवून दिली आहे.


तेव्हा महापौर निवडणुकीतील विजयाच्या आनंदात मश्गुल न राहता उद्घव यांनी जमिनीवर उतरून आत्मपरीक्षण करावे. तसे केले तर हा विजय नसून अप्रत्यक्ष पराजयच असल्याचे त्यांच्या लक्षात येईल.          

01 December 2009

हात उंचावून मतदान

बृहन्मुंबई महापालिकेसह राज्यातील अन्य काही महापालिकांच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक होत आहे. या सर्व महापालिकांमध्ये हे मतदान हात उंचावून आणि आवाजी पद्धतीने होणार आहे. या महापालिकांमध्ये अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूकही गुप्त मतदान पद्धतीने न होता हात उंचावून पद्धतीनेच झाली होती. त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी गुप्त मतदान पद्धतीत बदल करुन ही नवी पद्धत आणण्याचा अध्यादेश जारी केला होता. महापौर-उपमहापौर निवडणुकीसह विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी तसेच या समित्यांवरील सदस्यांची निवडही हात उंचावून  पद्धतीने करण्यात आली होती. निवडणुकीतील घोडेबाजार आणि अर्थपूर्ण व्यवहार टाळण्यासाठी देशमुख यांनी एक चांगला पायंडा सुरु केला आहे.


कोणतीही निवडणूक म्हटली की त्यात कोटीच्या कोटी उड्डाणे होत असतात. त्यामुळेच नगरसेवक ते खासदार पदापर्यंतची निवडणूक लढणे हे सर्वसामान्यांसाठी  अत्यंत कठीण जाते. जो पैसेवाला आणि पैसे खर्च करु शकणारा आहे, तोच यात बाजी मारतो हा समज त्याममुळेच अधिक दृढ झाला आहे. या निवडणुकींप्रमाणेच नंतर होणाऱया विविध निवडणुकांमध्येही घोडेबाजार हा ठरलेला असायचा. गुप्त मतदान असल्याने आपले मत फुटले तरी ते कोणाला कळण्याची भीती नसल्याने ही फोडाफोडी सहज के्ली जायची. त्यासाठी लाखो, कोट्यवधी रुपयांची उधळण होत असे. किंवा कोणाला काही वेगळी आमीषेही दाखवली जात असत. मात्र गुप्त मतदानाऐवजी हात उंचावून मतदान करण्याची पद्धत सुरु केल्यामुळे या घोडेबाजाराला नाही म्हटले तरी आळा बसला आहे. कारण उघडपणे मतदान होत असल्याने शक्यतो पक्षाचा आदेश झुगारुन व पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान करण्यास आता कोणीही सहजासहजी तयार होणार नाही. असे केले तर त्याचा थेट परिणाम म्हणजे पक्षविरोधी मतदान केल्यामुळे तो नगरसेवक म्हणून अपात्र ठरू शकतो.


महापौर-उपमहापौर किंवा विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी  प्रत्येक नगरसेवक माझे मत मी अमूक उमेदवाराला देत आहे, असे उभे राहून जाहीर करतो. याची नोंद तसेच चित्रिकरण पालिका प्रशासनाकडून करण्यात येत असते. तसेच त्यानंतर प्रत्यक्ष मतदान घेताना अमूक एका उमेदवाराला कोणाचे मत आहे, अशी विचारणा केल्यानंतर त्याला मत देणाऱयांनी आपला हात उंच करुन मत नोंदवायचे असते. त्याचीही नोंद ठेवली जाते. या पद्धतीमुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आली. अत्यंत चांगला अशी पद्धत विलासराव देशमुख यांनी सुरु केली. तसेच दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली तर पूर्वीच्या पद्धतीनुसार कास्टींग व्होटचा अधिकार महापौरांना असायचा. ते आपले मत ज्याच्या पारड्यात टाकतील त्या उमेदवाराला विजयी घोषीत केले जायचे. त्यातही बदल करण्यात येऊन समसमान मते पडली तर चक्क दोन्ही उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी टाकून उमेदवाराला विजयी करण्याची नवी पद्धतही अंमलात आणली गेली.


महापौर-उपमहापौर निवडणूक पद्धतीत ज्या प्रमाणे हात उंचावून मतदान करण्याची पद्धत आणली गेली तशीच ती विधानपरिषदेवरील आमदारांची निवड करण्यासाठीही लागू केली जावी. म्हणजे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही जो घोडेबाजार चालतो, त्यालाही आळा बसू शकेल.  विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत निर्णय घेऊन एक नवा पायंडा सुरु करावा आणि विधानपरिषद निवडणुकीतील घोडेबाजारालाही लगाम घालावा.            

30 November 2009

ऑफर्सच्या जाळ्यात ग्राहकांचा मामा

सध्याचा जमाना मार्केटिंगचा आहे.  जो बोलेल त्याची मातीही विकली जाईल आणि बोलणार नाही, त्याचे सोनेही विकले जाणार नाही, असे आपल्याकडे म्हटले जाते. आपल्या मालाची तडाखेबंद विक्री करण्यासाठी किंवा आपल्या कंपनीच्या योजनांकडे ग्राहकांनी वळण्यासाठी आकर्षक ऑफर्स देण्यात येतात. जो  बोलबच्चनगिरी करतो, मोठ्या प्रमाणात जाहिराती करुन स्वताचे ढोलताशे वाजवतो त्या कंपनीच्या मालाकडे/ योजनांकडे ग्राहक वळतात. फक्त वस्तूंसाठीच नव्हे तर अन्य काही योजनांही आकर्षक ऑफर्सच्या नावाखाली ग्राहकांच्या माथी मारल्या जातात.  हे सगळे करताना संबंधित कंपन्या, व्यापारी यांचे उखळ  पांढरे होते आणि या ऑफर्सच्या जाळ्यात गुरफटून ग्राहकांचा मामा होतो.


विविध वाहिन्यांवरुन सुरु असलेल्या रिअॅलिटी शो किंवा गाण्यांच्या स्पर्धेसाठी महाअंतिम फेरीतील विजेता निवडण्यासाठी एसएमएस मागवले जातात. या कार्यक्रमांचे लाखो प्रेक्षक आपल्या आवडत्या गायकासाठी एसएमएस पाठवतात. मात्र या सगळ्याचा ती वाहिनी आणि एसएएमएस कंपनी यांनाच प्रचंड फायदा होतो. स्पर्धा संपल्यानंतर जो निकाल लागतो, तो अगोदरच ठरवलेला असतो, हे ही आता सगळ्यांना माहिती झालेले आहे. मात्र तरीही सर्वसामान्य प्रेक्षक यात गुरफटत जातो. एसएमएस करुन आपले पैसे घालवतो आणि इतरांना फायदा करुन घेतो.


एका शर्टवर दोन शर्ट फ्री, एका पॅन्टवर दोन पॅन्ट फ्री किंवा अमूक एका वस्तूवर तमूक फ्री अशाही जाहिराती आपल्या वाचनात येतात. त्यालाही आपण बळी पडतो. कारण मूळातच एका शर्टाची किंमत वाढवून ठेवलेली असते. ते आपल्या लक्षात येत नाही. एकावर एक  किंवा दोन फ्री मिळणार म्हणून आपण ते खरेदी करतो. बरे आपल्याला आत्ता खरोखऱच इतक्या शर्टची गरज आहे का, याचाही सारासार विचार आपण करत नाही. म्हणजे कधीकधी गरज नसतानाही ऑफर्स दिली आहे म्हणूनही खरेदी केली जाते.


अनेकवेळा स्टॉक क्लिअरिंग सेलच्या नावाखाली आकर्षक ऑफर्स देऊन जुना माल विकला जातो. काही जणांचा अपवाद वगळता अन्य ग्राहकांच्या पदरी निराशाच येते. कारण दुकानातून किंवा प्रदर्शनातून वस्तू किंवा कपडे घरी आणल्यानंतर त्या वस्तूतील किंवा कपड्यातील खोट लक्षात येते. पण तोपर्यंत आपण फसले गेलेलो असतो. एक महिन्यात/ वर्षात दुप्पट अशा पैशांच्या योजनांमधूनही सर्वसामान्य आणि सुशिक्षित लोकही पैसे गुंतवतात. काही जणांना सुरुवातीला आश्वासन दिलेली रक्कम मिळते. नंतर मात्र संबंधित कंपनीची लोक गाशा गुंडाळून पसार होतात आणि हजारो, लाखोंची रक्कम गुंतवलेल्या ग्राहकांना कंगाल व्हायची वेळ येते.   


मेगा ऑफर, मास्टर-ब्लास्टर ऑफर, पुन्हा अशी संधी येणार नाही, आला नाहीत तर पस्तावाल असे शब्दांचे खेळ करुन ग्राहकांना भुलवले जाते. पर्यटन कंपन्याही यात मागे नाही. मुळात आपण जर आपले स्वताचे नियोजन करुन प्रवासाला गेलो तर पर्यटन कंपन्यांनी दिलेल्या ऑफरपेक्षाही स्वस्तात आपली ट्रीप पार पडते. पर्यटन  कंपन्या ऑफर देताना अमूक एका तारखेपर्यंत नोंदणी केली तर इतक्या हजार रुपयांची सवलत, अशा जाहिराती करत असतात. म्हणजेच हजारो रुपयांची सवलत देऊनही कंपन्याना फायदा होणारच असतो. मग सवलत देण्यापूर्वीचे जे दर प्रवाशांना लावण्यात आले असतात तेव्हा या पर्यटन कंपन्यांनी ग्राहकांना किती लुबाडले असेल, याचा विचार आपण कधी करतो का.


असाच प्रकार सेलचाही असतो. मुळातच सेलमध्ये वस्तू, कपडे यांच्या किंमती वाढवून ठेवलेल्या असतात. सेलच्या किंवा आकर्षक ऑफर्सच्या नावाखाली संबंधित दुकानदार, सेलचे आयोजक ग्राहकांना लुबाडतच असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मंडळी धंदा करायलचा बसलेली आहेत. ते सर्व धंदेवाईक आणि व्यापारी असल्यामुळे ते आपले नुकसान कधीही करुन घेणार नाहीत. नुकसान सोसून एखाद्याला अव्वाच्या सव्वा द्यायला किंवा पैसे कमी करण्याच्या नावाखाली प्रवास घडवायला ती मंडळी साधूसंत किंवा धर्मादाय संस्था नाहीत. त्यामुळे अशा अशा कोणत्याही ऑफर्स म्हणजे ग्राहकांना लुटण्याचे आणि मामा करण्याचे नवनवे प्रयोग आहेत, ही खुणगाठ प्रत्येकानेच मनाशी बांधावी.                    

29 November 2009

राणे, राज आणि आता स्मिता...

शिवसेनेचे सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती गेल्यानंतर ज्या प्रकारे कारभार सुरू आहे, ते पाहता एक ना एक  दिवस शिवसेनेत फक्त उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर हे दोघेच राहतील, असे विधान नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर केले होते. राणे यांच्या सारखा मासबेस असलेला नेता बाहेर पडल्यानंतर नाही म्हटले तरी शिवसेनेला धक्का होता. राणे यांच्यापूर्वी छगन भुजबळ यांनी मोठे बंड करुन काही आमदारांसह शिवसेना सोडली होती. त्यानंतर गणेश नाईक बाहेर पडले. राणे यांच्यानंतर शिवसेनेत सारे काही आलबेल असल्याचे चित्र रंगविण्यात येत होते. मात्र ते फार काळ टिकले नाही. राणे यांच्यानंतर राज ठाकरे बाहेर पडले आणि आता राणे व राज यांच्यासारखे पक्षात कोणतेही पद नसलेल्या परंतु काही काळ पर्यायी सत्ताकेंद्र असलेल्या स्मिता ठाकरे फुटीच्या उंबरठ्यावर आहेत.


शिवसेनाप्रमुख यांनी आपला राजकीय वारसा पुत्राकडे अर्थात उद्धव यांच्याकडे जेव्हा सोपवला तेव्हापासूनच शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरु झाली होती. केवळ पुत्रप्रेमापोटी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतील अन्य नेते आणि राज यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केल्याचे तेव्हाही बोलले गेले होते. कारण तोपर्यंत शिवसेनेत भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी आपले बस्तान चांगल्यापैकी बसवले होते. अन्य ज्येष्ठ नेतेही कार्यकारी अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. शिवसेनेत राज आणि अन्य ज्येष्ठ नेते आंदोलने करतांना रस्त्यावर उतरत होते तेव्हा उद्धव हे फोटोग्राफी करण्यात मग्न होते. शिवसेना किंवा राजकारणाशी त्यांचा संबंध नव्हता. शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली, जोपासली आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या नावाचा, कार्याचा दबदबा निर्माण केला. त्यांच्या शब्दाला संघटनेत मान आणि वजन होते. पक्षावर, पक्षातील नेत्यांवर आणि शिवसैनिकांवरही त्यांची पकड व जरब होती. उद्धव यांनी शिवसेनेत सक्रीय होऊन काही वर्षेच झाली होती. तरीही बाळासाहेब ठाकरे यांनी केवळ पुत्रप्रेमापोटी उद्धव यांच्या पारड्यात आपले वजन टाकले आणि तेथेच चुकले, असे आता उघडपणे बोलले जात आहे.


राणे यांच्यानंतर राज यांच्यारुपाने एक ठाकरे पक्षाबाहेर गेले. उद्धव यांना सर्व काही आयते मिळाले. वडिलांची पुण्याई त्यांना कामाला आली. मात्र राज ठाकरे यांनी स्वबळावर पक्षाला मतदारांमध्ये विशेष म्हणजे तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिलांमध्ये मनसेची क्रेझ निर्माण केली. पक्षातून बाहेर पडल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सात नगरसेवकही निवडून आणले. त्यानंतर मराठीचा मुद्दा हाती घेत प्रत्येक वेळी शिवसेनेला पर्यायाने उद्धव ठाकरे यांना नामोहरम करण्याची संधी सोडली नाही. त्यात ते यशस्वीही होत गेले. लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेची सर्व गणिते चुकत गेली. मात्र या पराभवानंतरही उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण न करता मराठी माणसालाच दोष दिला. नेमके काय करायचे ते कळत नसल्याने किंवा उद्धव व त्यांच्या सल्लागारांनी केलेली प्रत्येक खेळी चुकत गेली.


आता स्मिता ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबातील आणखी एक ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडत आहे. त्यांची ताकद किती, त्यामुळे शिवसेनेला किती फटका बसू शकेल, राज यांच्यामागे शिवसेनेतील काही मंडळी जशी गेली, तशी स्मिता ठाकरे यांच्या मागोमाग किती जण बाहेर पडतील याबाबत आत्ता काहीच सांगता येत नसले तरी शिवसेनेचे मुख्यत उद्धव यांचे विरोधक  उद्धव यांच्याच नाकर्तेपणामुळे स्मिता यांनी शिवसेना सोडली किंवा त्यांना ती सोडायला भाग पाडण्यात आले, असा  प्रचार करण्यासाठी आता आणखी कोलीत मिळेल. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून प्रगती होण्याऐवजी अधोगतीच होत चालली असल्याचे सर्वाना पाहायला मिळत आहे. प्रत्येकवेळी उद्धव यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच अवलंबून राहावे लागत आहे, उद्धव हे स्वतच्या ताकदीवर काहीही करु शकत नाही, शिवसेनेसारख्या संघटनेचे नेतेपद सांभाळण्याची त्यांची खरोखरच कुवत आहे की नाही, कोणताही निर्णय़ घेताना खुषमस्कऱया सल्लागारांचे किती काळ ऐकणार, शिवसेनाप्रमुखांनी कष्टाने उभी केलेली संघटना ते खरोखरच रसातळाला नेणार का, असे अनेक प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसला, मुंबईतही शिवसेनेला शह देत मनसेचे उमेदवार निवडून आले, विधानसभा आणि विधानपरिषदेतील संख्याबळ कमी झाल्याने शिवसेनेला दोन्ही ठिकाणच्या विरोधीपक्षनेतेपदावरही पाणी सोडावे लागले.खरे म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव यांनी जनाची नाही किमान मनाची तरी लाज बाळगत आपण कार्यकारी अध्यक्ष झाल्यापासूनचा जमाखर्च एकदा मांडावा. जमा किती आणि खर्च किती याचा तसेच  आपण खरोखरच ही जबाबदारी पेलायला समर्थ आहोत का त्याचाही गंभीरपणे विचार करावा. अन्यथा एक दिवस नारायण राणे म्हणाले त्याप्रमाणे शिवसेनेत फक्त उद्धव, त्यांची पत्नी रश्मी, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत आणि अन्य खुषमस्करेच राहतील. वेळीच सावध होऊन पावले उचलली नाहीत तर राणे यांचे भाकीत खरे व्हायला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कष्टाने उभी केलेली शिवसेना रसातळाला जायला आणि तिची शकले व्हायलाही फार वेळ लागणार नाही...          

28 November 2009

सांगा कसं जगायचं

काही दिवसांपूर्वी मी हे जीवन सुंदर आहे या शीर्षकाअंतर्गत ब्लॉगवर लेखन केले होते. जीवनात अनेक दुख, अडचणी असल्या, जीवन हे क्षणभंगूर असले तरीही आपण प्रत्येकाने आलेला प्रत्येक क्षण आनंदात घालवावा, उद्याच्या भविष्याची काळजी करण्यात आजचा क्षण वाया घालवू नये, असे लिहिले होते. खरे तर त्याच्या दुसऱयाच दिवशी या विषयासंदर्भातील काही गाणी येथे द्यायची होती. पण दुसऱया विषयावर लेखन केले आणि ते राहून गेले. आज त्याविषयी...जावई विकत घेणे आहे या चित्रपटातील एक छान गाणे मला पटकन आठवले. शरद तळवलकर यांच्यावर ते चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचे सगळे शब्द मला मिळाले  नाहीत. माझ्या आठवणीप्रमाणे सुधीर फडके यांचा आवाज या गाण्याला आहे.


हाती नाही येणे

हाती नाही जाणे

हसत जगावे, हसत मरावे

हे तर माझे गाणे

असे गाण्याचे ध्रुवपद आहे.


हे गाणे मला खूप आवडते. जणू काही जीवनाचे सर्व सार आणि जीवन कसे जगा, याचेच मार्मिक वर्णन यात केलेले आहे.

असेच आणखी एक गाणे पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातील तेही हे जीवन सुंदर आहे या विषयाशी निगडीत आहे. ते म्हणजे

व्यथा असो आनंद असू दे

प्रकाश किंवा तिमिर असू दे

वाट दिसो अथवा न दिसू दे,

जात पुढेच रहाणे.

माझे जीवनगाणे


मंगेश पाडगावकर यांचेच या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे गाणेही छान आहे. अरुण दाते यांचा स्वर या गाण्याला लाभला आहे.

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावरकर यांची याच विषयावरची आणखी एक  कविता.  अनेक सार्वजनिक कार्यक्रमातून पाडगावकर यांनी या कवितेचे वेळोवेळी वाचन केले आगे. सांगा कसं जगायचं ही ती कविता. ती मात्र मला मिळाली. आपल्या माहितीसाठी ती कविता...


सांगा कस जगायचं?


कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत

तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण

कोणीतरी काढतंच ना?

ऊन ऊन दोन घास

तुम्च्यासाठी वाढतंच ना?

शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं

तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात

जेव्हा काही दिसत नसतं

तुमच्या साठी कोणीतरी

दीवा घेऊन उभं असतं

कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं

तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात

हे अगदी खरं असतं;

आणि फ़ुलं फ़ुलुन येतात

हे काय खरं नसतं?

काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं

तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे

असं सुद्धा म्हणता येतं

पेला अर्धा भरला आहे

असं सुद्धा म्हणता येतं

सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं

तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?

कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत

तुम्हीचं ठरवा!

-मंगेश पाडगावकर.


ज्येष्ठ कवी, गायक आणि संगीतकार यशवंत देव हे त्यांच्या कार्यक्रमातही ही कविता सादर करतात. देव यांनी गाण्याला सहज, सोपी चाल लावली आहे. त्यामुळे खुद्द पाडगावकर यांच्या आवाजात आणि देव यांच्याही आवाजात कवितेचे गाणे खूप छान वाटते. मनावर आलेली मरगळ, जीवनात आलेले नैराश्य या कवितेने दूर निघून जाते.   

26 November 2009

मुंबईचा पाणीपुरवठाही अतिरेक्यांचे लक्ष्य ठरू शकतो..


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या सुरक्षिततेबाबत पालिका प्रशासनाने दावा केला असला तरीही दहशतवादी किंवा राष्ट्रद्रोही शक्तींकडून कधीही, केव्हाही आणि कसाही घातपात घडवून आणला जाऊ शकतो, अशी वस्तुस्थिती असल्याचे दिसून येत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना असणारा बेकायदा झोपडपट्टय़ांचा विळखा घातलेला भस्मासूर याला कारणीभूत ठरू शकतो. तसेच जलवाहिन्या असलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्ते नसणे, अपुरी टेहळणी पथके, सुरक्षा विभागातील रिक्त असलेल्या -जागा, झोपडय़ाबरोबरच अन्य अनधिकृत बांधकामांचा विळखा ही कारणेही असू शकतात.

मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणारे तानसा, मोडकसागर हे तलाव मुंबईबाहेर आहेत. त्या तलावांपासून जलवाहिन्यांद्वारे हे पाणी मुंबईत आणले जाते. पवई, भांडुप कॉम्प्लेक्स, भांडुपखिंडी पाडा आदी मार्गे ते मुंबईकरांना मिळते. ठाण्यातील काल्हेर चौक हे भिवंडी रस्त्यावर असून त्या समोरुन म्हणजे बाळकूम व कशेळी गावातून सुमारे १२० इंच व्यासाची मोठी जलवाहिनी जाते. काल्हेर चौकी ते कल्याण पूल व कल्याण पूल ते शांतीनगर येथे सुरक्षा व्यवस्था अपुरी आहे. भिवंडी परिसरातील शांतीनगर झोपडपट्टीतील नागरिक कल्याण पूल ते पोगाव जंक्शन या परिसरात आंघोळ आणि प्रश्नत:विधीसाठी याच जलवाहिनीच्या पाण्याचा वापर करतात. त्यांना अटकाव करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रकारही घडले आहेत.

जलवाहिन्यांना पडलेल्या बेकायदा झोपडपट्टय़ांची संख्या सुमारे तीस हजारांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येते. मुलुंड ते धारावी आणि शीव परिसरात हा विळखा जास्त प्रमाणात आहे. वांद्रे रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावरुन पूर्वेकडे जाताना जलवाहिन्यांना वेढलेल्या या झोपडय़ा अगदी सहज दृष्टीस पडतात. काही ठिकाणी तर बैठय़ा झोपडय़ांवर चक्क एक ते दोन मजलेही उभारण्यात आले आहेत. हा सगळा भाग बेहरामपाडा म्हणून ओळखला जातो. जलवाहिन्यांना असलेल्या या बेकायदा झोपडय़ांमुळे पाणीचोरी, पाणीगळती मोठय़ा प्रमाणात होत आहेच, पण त्यामुळे पालिकेच्या जलंभियंता खात्याच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन जलावाहिन्यांची देखभाल करणेही कठीण जात आहे.

पालिका प्रशासनानेच तयार केलल्या अहवालानुसार मुलुंड ते भांडुप संकुल, भांडुंप संकुल ते दिनशा ब्रिज, मरोशी ते अंधेरी-कुर्ला मार्ग, कुर्ला अंधेरी मार्ग ते सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ, साकीविहार भाग, घाटकोपर ते साकीनाका क्रॉस कनेक्शन, सहार एबी ते वांद्रे आणि माहीम परिसरात या झोपडय़ा आहेत.

या प्रश्नाकडे राजकीय किंवा जातीय भूमिकेतून न पाहता लाखो मुंबईकरांसाठी असलेला धोका म्हणून त्याकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती आणि धाडस दाखवत तेथे राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करत या झोपडय़ा जमिनदोस्त केल्या पाहिजेत. तसेच येथून पुढे जलवाहिन्यांच्या परिसरात किंवा जलवाहिन्यांवर एकही झोपडपट्टी होणार नाही, त्याची खबरदारी घेतली पाहिजे.

(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त, २६ नोव्हेंबर २००९ पान क्रमांक एकवर प्रसिद्ध झालेली माझी बातमी)

25 November 2009

सुरक्षेतील क्षुल्लक ढिलाईही घातक

मुंबईवर गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी हल्ल्या केल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. यापूर्वीही महापालिका मुख्यालयावर दहशतवादी हल्ला करण्याचे प्रयत्न झाल्यामुळे २६/११ नंतर अधिक खबरदारी घेण्यात आली. सुरक्षा व्यवस्थेत वाढ, अत्याधुनिक यंत्रसामग्री, कमांडो सुरक्षा असे विविध उपाय करण्यात आले असले तरीही महापालिका सुरक्षित आहे की असुरक्षित हे ठामपणे कोणीच सांगू शकत नाही.


छत्रपती शिवाजी टर्मिनससमोर असलेली पालिका मुख्यालयाची इमारत पारंपरिक वारसा लाभलेली (हेरिटेज) वास्तू म्हणून ओळखली जाते. देशातील सर्वात श्रीमंत आणि सुमारे १८ ते २० हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली महापालिका अशीही तिची ओळख आहे. १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळीच महापालिका मुख्यालयावर हल्ला करण्यात येणार होता. मात्र सुदैवाने तो प्रयत्न फसला. त्यानंतर राज्य शासन, पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले. पण त्याची तीव्रता असा एखादा प्रसंग घडला की काही दिवसच राहते, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.


२६/११ च्या हल्ल्यानंतर महापालिका मुख्यालयात प्रवेश करणाऱ्यांसाठी कठोर र्निबध घालण्यात आले होते. पालिकेचे मुख्यालय व त्याला लागूनच असलेल्या इमारतीमधून जाणारा रस्ता खासगी वाहने आणि लोकांसाठी बंद करण्यात आला. तेथे दोन्ही बाजूनी सुरक्षारक्षकांच्या चौक्या, महापालिका मुख्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार आणि अन्य ठिकाणी बंकर तयार करण्यात आले होते, त्यात पहारा देण्यासाठी जवान तैनात करण्यात आले होते, प्रवेशद्वारांवर स्कॅनर मशिन, मेटल डिटेक्टर लावण्यात आले होते, पालिका सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांखेरीज स्वतंत्र प्रशिक्षण दिलेले खास कमांडोही तैनात करण्यात आले होते, काही सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हातात हॅण्ड मेटल डिटेक्टर देण्यात आले.


मात्र हे सगळे झाले असले तरी तेथे काम करणारे कर्मचारी, अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, नगरसेवक यांची मानसिकता बदलली नाही, असे म्हणावे लागते. काही अपवाद वगळता सर्वाकडूनच सुरक्षिततेच्या बाबतीत ढिलाई दाखविण्यात येत आहे आणि तीच गोष्ट घातक ठरू शकते.नगरसेवक, अन्य लोकप्रतिनिधी किंवा पक्षाचा कोणी पुढारी पालिकेत येताना आपल्याबरोबर वीस-पंचवीस कार्यकर्त्यांना घेऊन येतो. प्रवेशद्वारावर या सगळ्यांना अडवले तर लोकप्रतिनिधीची बोलणी सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना खावी लागतात. काही नगरसेवक तर आपल्याला सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ओळखले नाही म्हणजे आपला अपमान झाल्याच्या थाटात अरेरावीने वागतात. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडेही ओळखपत्र मागितले तर त्यांनाही तो अपमान वाटतो. अशा प्रकारांमुळे सुरक्षारक्षकांची कुचंबणा होत आहे.काही वेळेस सुरक्षा अधिकारी/कर्मचारीही अयोग्य पद्धतीने वागतात. एखादा गरीब, अशिक्षित माणूस काही विचारायला आला की त्याला योग्य उत्तरे देत नाहीत आणि प्रवेशद्वारापाशी भपकेबाज कपडे घातलेला आणि महागडय़ा गाडीतून कोणी बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार उतरला की त्यांना काही विचारायचे भानही त्यांना राहात नाही. कधी विचारले तर का विचारले म्हणून नोकरी जाण्याची किंवा कारवाई होण्याची भीती असते. मात्र महापालिका मुख्यालयाची सुरक्षितता सांभाळणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.महापालिका मुख्यालय इमारत आणि बाजूच्या नवीन इमारतीचा पसारा अवाढव्य आहे. विविध खाती, विभागात काम करणारे कर्मचारी व अधिकारी, महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, पक्षकार्यालये अशा सर्व ठिकाणी दररोज अनेक माणसे येत असतात. सध्या असे चित्र पाहायला मिळते की महापालिकेची सर्वसाधारण सभा, स्थायी किंवा अन्य महत्त्वाच्या समितीच्या बैठका, एखादा विशेष कार्यक्रम असला की कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली जाते. अन्य दिवशी मात्र तुलनेत सुरक्षा व्यवस्था मंदावलेली दिसते.पालिकेच्या सुरक्षिततेसाठी दररोज कडेकोट सुरक्षा व्यवस्था असली पाहिजे. प्रत्येक मजल्यावर दररोज अधूनमधून सुरक्षा अधिकाऱ्यांने गस्त घातली पाहिजे. त्यासाठी वेगळ्या माणसांची व्यवस्था करावी. स्फोटकांचा शोध घेणारे श्वान दररोज मुख्यालयातून फिरवण्यात आले पाहिजेत. अर्थात त्यासाठी लागणारे मनुष्यबळ राज्य शासन व पालिका प्रशासनाने उपलब्ध करुन दिले पाहिजे. पालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांनाही आपले ओळखपत्र दिसेल अशा पद्धतीने लावले पाहिजे, पालिका मुख्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नेत्यांनी सोबत दोन किंवा चार कार्यकर्त्यांना आणावे. प्रवेशद्वारावर सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता प्रत्येकाकडे ओळखपत्राची मागणी केली पाहिजे, तसेच तो अपमान न समजता सुरक्षारक्षकांना सहकार्य करावे.


 अशी काही बंधने प्रत्येकाना पाळली पाहिजेत. तसे झाले तर महापालिका मुख्यालय असुरक्षित न राहता सुरक्षित होऊ शकेल.

(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (२५ नोव्हेंबर २००९)पान क्रमांक  एकवर प्रसिद्ध झालेली माझी बातमी)  

24 November 2009

ऐलमा पैलमा मातोश्री देवा

महापौरपदाच्या सोडतीचे आरक्षण नुकतेच मंत्रालयात जाहीर झाले आणि बृहन्मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या तमाम महिला नगरसेविकांना महापौरपदाचा शालू आपल्यालाच मिळणार, अशी स्वप्ने पडायला लागली. अर्थात महापौरपदाची माळ एकाच महिला नगरसेविकेच्या गळ्यात पडणार असल्याने प्रत्येकीने आपापल्या परीने मार्चेबांधणी करायला सुरुवात केली. महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या चार ते पाच महिला नगरसेविकांची गुप्त बैठक नुकतीच झाली. त्या बैठकीत प्रत्येकीने आपल्यालाच हे पद का मिळाले पाहिजे ते ठासून सांगितले. त्या बैठकीचा गुप्त वृत्तान्त आमच्या सूत्रांकडून आम्हाला कळला. आज तो सादर करत आहोत.


बैठकीसाठी जमलेल्या सर्व महिला नगरसेविकांनी सगळ्यात पहिल्यांदा

ऐलमा पैलमा मातोश्री देवा

महापौरपद मलाच मिळू दे

करीन पक्षाची व जनतेची सेवा

असे गाणे म्हणत सामूहिक फेर धरला.  


त्यानंतर महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या क्रमांक एकने

मागे उभा मिलिंद

पुढे उभा मिलिंद

आपल्या सगळ्यांकडे

मिलिंद हा पाहतो आहे

असे गाणे म्हटले.

त्यावर इच्छुक क्रमांक दोनने आपल्या फटकळ आणि डॅशिंग स्वभावानुसार मोठ्या आवाजात

नाव गाव कशाला पुसता

मी असले जरी गुजराथी

मला हो म्हनत्यात लवंगी मिरची

असे गाण्यातूनच प्रत्युतर क्रमांक एकला दिले.


त्यावर इच्छुक क्रमांक एक म्हणाली, मी तर सगळ्यात ज्येष्ठ नगरसेविका. स्थायी समिती किंवा अन्य समित्यांचे सदस्यपद मला मिळाले असले तरी महापौरपद ते महापौरपद. त्याची शान, गाडी आणि  बंगला व रुबाब काही वेगळाच. माझ्याकडे अनुभव आणि मनोहर रुप आहे. तेव्हा हे पद मलाच मिळाले पाहिजे.


लगेच इच्छुक क्रमांक दोनने आवाज चढवत सांगितले की, अग नुसते मनोहर रुप असून चालत नाही. कामे करुन घेण्यासाठी माझ्यासारखा डॅशिंग स्वभावही लागतो. अग आपल्यापैकी जीची निवड होणार आहे, तिला फक्त सहा महिनेच मिळणार आहेत. त्यानंतर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे जनमानसावर शिवसेनेच्या कामाचा ठसा उमटविण्यासाठी मीच योग्य आहे. आणि हल्ली मातोश्रीचाही मनोहररुपावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे शिवसेनेतही माझेच नाव सगळ्यांना पटेल की नाही बघ.

आणखी थोडीशी फोडणी देत इच्छुक क्रमांक दोन म्हणाली, सध्या मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरु आहे. त्यामुळे जर मलाच हे पद मिळाले तर शिवसेना अमराठी माणसांच्या विरोधात नाही, असा संदेश सगळ्यांना मिळेल. हे म्हणणे खोडून काढताना इच्छुक क्रमांक तीन म्हणाली की, कसला योग्य संदेश जाईल, कप्पाळ. अग असे झाले तर राजकारण कसे वळण घेईल हे तुला माहिती नाही का, आपल्या शत्रू क्रमांक एकच्या हातात या निमित्ताने आपण आयते कोलीतच देऊ. शिवसेनेने मराठी माणसांचा मुद्दा कसा सोडला, मराठी माणसावर शिवसेना कसा अन्याय करत आहे, असे बोंबलायला ते मोकळे होतील, त्याचे काय. त्यामुळे या पदासाठी तू योग्य नाहीस.


इच्छुक क्रमांक चारने तिसरीला पाठिंबा दिला. ती म्हणाली, अग त्यातून तू पश्चिम उपनगरातली. आत्ताचे महापौरपदही पश्चिम उपनगरालाच मिळाले आहे आणि आता पुन्हा ते तुमच्याकडे का, पूर्व उपनगर किंवा शहर भागालाही ते मिळायला हवे, असे पेच तिने टाकला.


चौघींचेही आवाज वाढू लागले. प्रकरण हातघाईवर येते की काय, अशी शंका वाटू लागली. तेव्हा वयाने अनुभवी असलेली, आपल्या सध्याच्या कारकिर्दीत एकदा सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतलेली आणि महापौरपदाच्या स्पर्धेत असलेली इच्छुक क्रमांक पाच म्हणाली, धन्य आहे तुम्हा सगळ्यांची. आपापसात इथे भांडत काय बसलात, आपल्याकडे कोणत्याही पदासाठी पात्रता, अनुभव किंवा ज्येष्ठता हा निकष सध्या नसतो, हे काय माहिती नाही तुम्हाला. अग कोणतेही पद मिळविण्यासाठी सध्या  मिलिंद, वहिनीसाहेब, मातोश्रीच्या दरबारातील चौकडी आणि नंतर आपल्या कार्यकारी साहेबांचा आशीर्वाद असतो लागतो हे विसरलात का.


अग मोठ्या साहेबांचे दिवस आता संपले.  ही मंडळी सगळे ठरवून मग त्यांना नुसत मम म्हणायला लावतात. अग  आपण इथे भांडत बसू आणि महापौरपदाचा शालू दुसरीच कोणीतरी पटकावायची. आजवर आपल्याला आलेले अनुभव काही कमी आहेत का. आणि हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो राजसिंहही यंदाच्या वेळेस आपल्याकडून महापौरपद हिसकावून घ्यायला टपला आहे, हे विसरलात का. तेव्हा आपण भांडत न बसता आपल्यात एकमत करु या आणि वरपर्यंत एकीचेच नाव पोहोचवू या, काय माझे म्हणणे पटताय ना सगळ्याजणींना


वयाने ज्येष्ठ असलेल्या त्या नगरसेविकेच्या सल्ल्याने सगळ्यांजणीं भानावर आल्या आणि या गुप्त बैठकीचा समारोप झाला...

(गुप्त बैठकीच्या या वृत्तान्तातील  इच्छुक नगरसेविका आणि त्यांच्या  नामसाधर्म्याशी वास्तवाचा काहीही संबंध नाही , त्याची सर्वानी नोंद घ्यावी.  तरीही ते वर्णन कोणाला लागू पडत असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा.  )
              

23 November 2009

औषधाविना उपचार

माझ्या वाचनात नुकताच चैत्राली हा दिवाळी अंक आला. रमेश पाटील याचे संपादक असून गेली अठ्ठावीस वर्षे हा अंक प्रकाशित होत आहे. यंदाचा दिवाळी अंक औषधाविना उपचार विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. सध्याची प्रचलित भरमसाठ किंमतीची महागडी औषधे न देता आणि बड्या औषध कंपन्यांच्या स्पर्धात्मक मोहाला बळी न पडता ज्यांनी औषधाविना उपचार चिकित्सा पद्धतीचे समर्थन केले, नव्हे व्रत स्वीकारले त्या ज्ञात, अज्ञात डॉक्टर, वैद्य मित्रांना आमचे लाख लाख सलाम. हा अंक त्यांच्यासाठीच, अशी टीप संपादक रमेश पाटील यांनी दिली आहे. पाटील यांनी अशा विषयावर अंक प्रकाशित करुन एक वेगळा विषय लोकांपुढे ठेवला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन,


या अंकातील अरविंद जोशी यांच्या निसर्गशक्ती आणि स्वयंचिकित्सा  या लेखांची ओळख आज मी करुन देत आहे.  अरविंद जोशी यांनी आपल्या लेखात मुळाक्षरे आणि आरोग्य, आरोग्यदायी रंगीत स्वस्तिके आणि भारतीय पुष्पौषधी याबाबत विवेचन केले आहे. या लेखात ते म्हणतात, आपल्या शरीरात सात चक्रे असून त्या चक्रांना वेगवेगळ्या संख्येच्या पाकळ्या आहेत. त्या पाकळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना जोडल्या असून प्रत्येक पाकळीला एक एक बीजाक्षर आहे. ही बीजाक्षरे म्हणजे मराठीतील एक एक मुळाक्षर आहेत. जर ही अक्षरे अनुस्वार देऊन म्हटली तर ती पाकळी कंप पावते आणि ती ज्या अवयवाला जोडली आहे तो अवयव नीट काम करु लागतो व आपले आरोग्य सुधारते. 


जोशी यांनी याबाबत अभ्यास करून काही प्रयोग केले आणि त्याचे खूप चांगले अनुभव आले. त्याची माहितीही थोडक्यात त्यांनी लेखात दिली आहे. या विषयावर त्यांचे षटचक्र आणि आरोग्य हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.


 लाल रंगाच्या स्वस्तिकामध्ये खूप शक्ती असते, हे जोशी यांच्या वाचनात आले.  त्यावरुन कल्पना सुचून जोशी यांनी इंद्रधुष्याच्या सात रंगांची स्वस्तिके तयार केली आणि त्याचे काही प्रयोग केले. रंगकिरण चिकित्सा आणि रंगीत स्वस्तिके यांचे गुण सारखेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. छाती कफाने भरली असता लाल रंगाचे स्वस्तिक छातीवर ठेवले तर कफ कमी होतो. थंडीच्या दिवसात लाल रंगाच्या स्वस्तिकावर बसले असता थंडी वाजणे कमी होते. फिक्या निळ्या रंगाचे स्वस्तिक बेंबीवर लावले असता अॅसिडीटी व पित्त कमी होते, असे अनुभव जोशी यांनी दिले आहेत.


पुष्पौषधीचेही काही अनुभव जोशी यांनी दिले आहेत. ते सांगतात की,  विशिष्ट फुले किंवा त्याच्या पाकळ्या रात्रभर (आठ तास) किंवा दिवसभर (२४ तास) भांडभर पाण्यात ठेवायच्या.नंतर ते पाणी गाळून घेऊन ४ ते ८ चमचे एका वेळी असे दिवसातून आवश्यकतेनुसार ३ ते ५ वेळा प्यायचे.  झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांचे पाणी करावे. या पाण्याने खोकला कमी होतो, नव्हे जातो. गुलछडीच्या पाण्याने कोलायटीस कमी होते. बेकरीचे पदार्थ खाणाऱयांसाठी उपयुक्त, तसेच लघवी साफ होणे, बद्धकोष्ठता यावरही उपयोगी. लाल किंवा पांढऱया जास्वदांच्या फुलांचे पाणी कोलायटीस, मेंदूचे विकार, यकृताची सूज व हृदयाच्या आजारांवर उपयुक्त आहे. लाल कर्दळीच्या फुवाच्या पाण्याने घसा दुखणे, सुजणे थांबते. आंब्याच्या मोहोराचे केलेले पाणी निद्रानाश, रक्तीमुळव्य़ाध, अंगावर गाठी, उष्णतेचे रोग यावर काम करते. बेलाच्या पाण्याने शरीरातील हीट कमी होते. तसेच उच्च रक्तदाब व मधुमेहावर उपयुक्त आहे. जोशी यांनी लेखात ज्या फुलांची माहिती दिली आहे, त्यातील काही निवडक फुलांचे हे उपयोग.


आपल्या पूर्वजांनी निसर्गातील शक्तींचा अभ्यास करुन माणसाला निरोगी राहण्यासाठी सहज, सोपे उपचार (ज्यात डॉक्टरला वा वैद्याला पैसे मिळत नाहीत) दिले. आम्ही त्यांना जुनाट, अडाणी म्हणतो. देवाला वाहण्याची फुले चांगली उपयुक्त आहेत. म्हणजे देवावर अभिषेक केलेले पाणी, दूध. तीर्थ (फुलावरुन आलेले) किती उपयोगी आहे पाहा. आमच्या पूर्वजामनी  तीर्थ पवित्र आहे ते घ्यावे अशी प्रथा पाडून समाजाच्या सहज आरोग्याचा विचार केला. त्याला अंधश्रद्धा म्हणायचे का, असा सवालही जोशी यांनी केला आहे.


अधिक माहितीसाठी जोशी यांचा संपर्क दूरध्वनी

०२०-२४४५०२७३ (रविवार खेरीज दररोज दुपारी ४ ते ६)

चैत्राली मासिकाचे संपादक रमेश पाटील यांचा संपर्क दूरध्वनी

०२०-३०२२२८१२              

22 November 2009

शिवसेनेची गोची

लोकसभा निवडणुकीबरोबरच नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागले. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे आम्हाला कोणतेही आव्हान नाही, मनसेचा बुडबुडा विधानसभा निवडणुकीत फुटेल, लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मनसेला मत देऊन जी चूक केली ती आता ते  करणार नाहीत, एकवेळ कॉंग्रेसला मत द्या पण मनसेला देऊ नका, अशी  आणि अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चौकडीतून केली गेली. मात्र विधानसभा निवडणुकीत मनसेचे तेरा आमदार निवडून आले. अनेक ठिकाणी दुसऱया क्रमांकाची मते घेतली. मुंबईत तर शिवसेना पार भुईसपाट झाली. तरीही उद्धव ठाकरे आणि त्यांचे ढोल वाजवणाऱया पित्यांचे डोळे उघडत नाहीत, याला काय म्हणायचे. मनसे आणि त्यांनी उचलून धरलेल्या मराठीच्या मुद्यामुळे शिवसेनेची  पार गोची झाली आहे. नेमके काय करावे आणि काय करु नये याबाबत शिवसेना नेतृत्व संभ्रमावस्थेत सापडले आहे आणि त्यातूनच धरले तर चावते आणि सोडले तर पळते किंवा करायला गेलो एक आणि झाले भलतेच अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे.


विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून त्याचे खापर सर्वसामान्य मराठी माणसांवरच फोडले गेले. मुळात निकाल लागल्यानंतर चार ते पाच दिवसांनी उद्धव ठाकरे हे प्रसारमाध्यमांना  सामोरे गेले. खऱे तर निकाल लागल्यानंतर लगेचच त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन झाले ते झाले, आमचे कुठे  चुकले त्याचे आत्मपरिक्षण आम्ही करु आणि झालेल्या चुका सुधारु, असे जाहीर वक्तव्य करायला हवे होते. भाजपच्या मुंडे व गडकरी यांनी तसे वक्तव्य केले. निकाल लागल्यानंतर तुम्ही प्रसारमाध्यमांसमोर आला नाहीत, तेथेच पहिल्यांदा चुकले. त्यानंतर सामनामध्ये अग्रलेखाद्वारे मराठी माणसांनी पाठीत खंजीर खुपसला असे विधान करून समस्त मराठी माणसांची नाराजी ओढवून घेतली. त्या विधानावर गदारोळ झाल्यानंतही उद्धव ठाकरे यांनी त्याचे समर्थन केले होते. बरे सामान्य शिवसैनिक आणि मराठी माणसाला ते विधान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच केले असे वाटले. पण शिवसेनाभवनात बाळासाहेब ठाकरे यांनीच त्याचा खुलासा केला आणि मी असे बोललेलोच नाही, असे सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे, सामनाचे संपादक संजय राऊत उघडे पडले. 


त्यानंतर मराठीतून शपथ घेण्याच्या मुद्यावरुनही मनसेने बाजी मारली. भर विधानसभेत अबू आझमी याला मनसेच्या आमदारांनी चोपले. तेव्हाही शिवसेनेला नेमकी काय भूमिका घ्यावी ते कळले नाही. मात्र त्यामुळे मनसेची भूमिका पुन्हा एकदा सर्वसामान्य मराठी मनापर्यंत पोहोचली. खरे तर हा मुद्दा सर्वप्रथम शिवसेनेला उचलून धरायला काहीच हरकत नव्हती. किंवा मनसेने तो लावून धरल्यानंतर किमान मराठीच्या मुद्दयावर तरी त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता. विधानसभेत अबूचा चोपले ते बरोबर की चूक हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण मराठीतून शपथ घेणे या मुद्द्यावर तरी शिवसेनेने मनसेला जाहीरपणे समर्थन द्यायला हवे होते.


त्यानंतर सचिन तेंडुलकर याच्या विधानावरुन शिवसेना पुन्हा एकदा गोत्यात आली. मी मराठी असलो तरी पहिल्यांदा भारतीय आहे, असे विधान त्याने केले होते. त्यावर शिवसेनेने सामनामधून सचिनवर दुगाण्या झाडल्या. कदाचित हा मुद्दा मनसेने उचलला तर, या भीतीपोटी आपण पहिल्यांदा प्रतिक्रिया देऊ या, असे वाटून शिवसेनेने जाहीर भाष्य केले आणि देशभरातून तसेच महाराष्ट्रातूनही शिवसेनेवर जोरदार टिका करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेला अखेर नमते घ्यावे लागले आणि शिवसेनाप्रमुखांनी सचिनला वडिलकीच्या नात्याने हा सल्ला दिला अशी सारवासारव करावी लागली.


आणि आता नुकताच घडलेला आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीवरील हल्ल्याचा प्रकार. मुळात अशा प्रकारे हल्ला करणे आणि त्यानंतर त्याचे निर्लज्जपणे समर्थन करणे हे चुकीचे आहे. निखिल वागळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना उद्देशून जर काही अपशब्द वापरले असतील तर त्याचा तीव्र निषेध तुम्हाला तुमच्या सामना या मुखपत्रातून करता आला असता. सामना कोणी वाचत नाही , याची तुम्हाला खात्री वाटत होती तर तुमचे या बाबतीतील निवेदन जाहिरातीच्या स्वरुपात सर्वाधिक खप असलेल्या अन्य मराठी वृत्तपत्रातून द्यायला हवे होते. किंवा किमान तुमचा खुलासा व वागळे यांच्या वक्तव्यावर तुमचे म्हणणे आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीला पाठवून द्यायला हवा होता. पोलिसांकडे तक्रार दाखल करायला हवी होती ते करुनही वागळे यांनी दिलगिरी व्यक्त केली नसती तर या वाहिनीच्या कार्यालयासमोर शिवसैनीकांची शांततापूर्ण निदर्शने, काळ्या फिती लावून धरणे आंदोलन किंवा लाक्षणिक उपोषण करता आले असते, प्रेस कौन्सीलकडेही तक्रार करता आली असती.जेव्हा शिवसेनाप्रमुखांनी पत्रकारांना उद्देशून घुबड, कावळे असे अपशब्द वापरले होते, पु. ल. देशपांडे यांचाही अवमानकारक शब्दात अपमान करण्यात आला होता आणि वेळोवेळी शिवसेनेकडून किंवा त्यांच्या मुखपत्र असलेल्या सामनामधून इतरांवर अशी जहरी टीका करण्यात आली, तेव्हा संजय राऊत यांची लेखणी आणि तोंड का मूग गिळून बसले होते. म्हणजे आम्ही काहीही लिहू, कोणाच्या विरोधात काहीही बोलू, तुम्ही मात्र आमच्या विरोधात काहीही बोलायचे नाही, ही कोणती पद्धत झाली.


 मात्र  यापैकी कोणताही सनदशीर मार्ग न अवलंबता थेट कार्यालयावर हल्ला चढवणे, कार्यालयाची नासधूस कऱणे, कर्मचाऱयांना मारहाण करणे हे कोणत्या संस्कृतीत बसते. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील राडा संस्कृती संपवली, वेगळ्या वाटेने आणि विचारांने शिवसेनेला नेतृत्व दिले, उद्धव ठाकरे हे कसे सुसंस्कृत आहेत,  म्हणून त्यांचे गोडवे गायले जात होते. मग शिवसेनेला पुन्हा राडा संस्कृतीकडे का वळावेसे वाटले, त्याचे उत्तर संजय राऊत देणार आहेत का, झाल्याप्रकाराबद्दल उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का, असे अनेक प्रश्न शिवसेना वर्तुळात उपिस्थत केले जात आहेत.


सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे हे सध्या भारताबाहेर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत असा हल्ला करण्याचा निर्णय कोणी घेतला, की त्यालाही उद्धव ठाकरे यांचे समर्थन घेतले होते. झाल्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले तोंड उघडलेले नाही. तसेच शिवसनेच्या अन्य नेत्यांनी किंवा प्रवक्त्यांनीही आपले मत जाहीरपणे व्यक्त केलेले नाही. एकटे संजय राऊत या हल्ल्याचे समर्थन करत आहेत. कदाचित त्यांचा भाऊ सुनील या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार असल्याने, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्याला उमेदवारी मिळवून देऊन त्याचा पराभव झाल्यामुळे काहीतरी करुन दाखविण्याच्या हेतूने सुनील राऊत यांनी हे कृत्य केले असावे किंवा तसे करण्यास त्यांना कोणी सल्ला दिला असावा. मात्र प्रत्यक्षात हे शिवसेनेला चांगलेच जड जाणार आहे. कदाचित सख्खा भाऊ यात गुंतल्यामुळे संजय राऊत यांना त्याची पाठराखण करणे भाग पडले असावे, असे वाटते.


एवढे सगळे घडून गेल्यानंतरी आता तरी उद्धव ठाकरे यांनी डोळे उघडावे. आपल्याभोवती जमलेल्या चौकडीकडून आपल्याला जो सल्ला दिला जातो, जी रणनिती आखण्यासाठी सांगितले जाते, ते साफ चुकीचे ठरत आहे. त्यामुळे आपल्याला आणि शिवसेनेनाही त्याचा कोणताच फायदा होत नाही तर उलट तोटाच होतो आहे. हे लक्षात घ्यावे. शिवसेनेतील जुने व ज्येष्ठ नेते आणि सर्वसामान्य शिवसैनिक यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी आपला संवाद वाढवावा. आपले नेमके कुठे चुकते आहे, ते प्राणाणिकपणे हीच मंडळी त्यांना सांगू शकतील. अजनुही वेळ गेलेली नाही. भोवती जमलेल्या तीन राऊत आणि एक नार्वेकर यांच्या तसेच चुकीचे सल्ले देऊन गोत्यात आणणाऱया खुषमस्कऱयांच्या तावडीतून वेळीच बाहेर पडावे अन्यथा जाग येईल तेव्हा खूप उशीर झालेला असेल...                             

21 November 2009

बृहन्मंबई महापालिकेत आत्तापर्यंत १२ अमराठी आयुक्त

मनसेने ‘मराठी’चा मुद्दा लावून धरल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. डॉ. जयराज फाटक यांच्यानंतर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मराठी की अमराठी आयुक्ताची नियुक्ती होणार त्याविषयी विविध तर्क सुरु आहेत. त्या पाश्र्वभूमीवर गेल्या ६३ वर्षात बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी १२ अमराठी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.


 याची सुरुवात बी. के. पटेल यांच्यापासून झाली. त्यानंतर अधूनमधून अमराठी अधिकारी आयुक्त म्हणून महापालिकेवर नियुक्त केले गेले. पटेल यांचा कालावधी २१ जानेवारी १९४६ ते २० सप्टेंबर १९५२ असा होता. त्यांच्यानंतर पी. आर. नायक यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. व्ही. एल. गिडवानी यांना अगोदर दीड महिन्याचा आणि नंतर १५ जुलै १९५७ ते २९ एप्रिल १९६० असा कार्यकाळ मिळाला होता.


 २८ फेब्रुवारी १९६२ ते १५ एप्रिल १९६३ अशा काळात ए.यू. शेख हे आयुक्त झाले. ७ मे १९६९ ते २४ मार्च १९७० या कालावधीत जे. बी. डिसोझा हे आयुक्त होते. १९७५ ते १९८४ या कालावधीत भालचंद्र देशमुख, बी. के. चौगुले आणि द.म. सुखटणकर असे मराठी आयुक्त झाले. १२ नोव्हेंबर १९८४ ते २४ जुलै १९८६ अशी दोन वर्षे पुन्हा जे. के. कांगा हे अमराठी आयुक्त होऊन गेले.


त्यांच्यानंतर २४ जुलै १९८६ ते ३० एप्रिल १९९० या काळात सदाशिवराव तिनईकर हे आयुक्त झाले. तिनईकर यांच्यानंतर पुन्हा एकदा के. पद्मनाभय्या यांच्या रुपाने महापालिकेला अमराठी आयुक्त मिळाला. पद्मनाभय्या यांच्यानंतर शरद काळे (१६ नोव्हेंबर १९९१ ते १७ मे १९९५), जर्नादन जाधव (१७ मे १९९५ ते १० जून १९९६) आणि गिरीश गोखले (१० जून १९९६ ते ३१ मे १९९९) असे तीन मराठी आयुक्त झाले. यांच्यानंतर लागोपाठ पाच वर्षे पुन्हा महापालिकेला अमराठी आयुक्त मिळाले.


 के. नलीनाक्षन, व्ही. रंगनाथन, रामानंद तिवारी, करुण श्रीवास्तव व जॉनी जोसेफ या अमराठी अधिकाऱ्यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. के. नलीनाक्षन यांची १ जून १९९९ रोजी आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. तर जॉनी जोसेफ हे १ मार्च २००४ ते १ मे २००७ या कालावधीत आयुक्त होते. जोसेफ यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पुन्हा एकदा डॉ. जयराज फाटक यांच्या रुपाने महापालिकेला मराठी आयुक्त मिळाला. डॉ. फाटक यांच्या बदलीनंतर आता पुन्हा एकदा या पदावर कोणाची नियुक्ती होणार त्याची चर्चा सुरु झाली आहे.

20 November 2009

जाणीव

मनाला भिडणारे लेखन आपल्या वाचनात येते. मग ते कधी एखाद्या पुस्तकातील, कादंबरीतील, मासिकातील कथा, कविता किंवा वृत्तपत्रातील लेखामधील असते. काही वेळेस असेही होते की कुठेतरी आपण एखादा चांगला उतारा, कविता वाचतो, पण ते लिहिणाऱयाचे नाव त्या खाली दिलेले नसते.

मात्र त्यातील आशय, शब्द आपल्या मनाला भावतात. मनात कुठेतरी घर करतात. असाच वाचनात आलेला  एक परिच्छेद किंवा मुक्तछंदातील काव्य नुकतेच वाचनात आले. ते कोणाचे आहे, कोणी लिहिले आहे किंवा ते एखाद्या पुस्तकातील आहे का ते माहिती नाही.

 सध्याच्या आपल्या बदलत्या जीवनशैलीचे समर्पक वर्णन त्यात केले आहे. जीवघेणी स्पर्धा आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपण कशाकशाला मुकलो आहोत, ते यात सांगितले आहे. तोच परिच्छेद सर्वांच्या माहितीसाठी. या मजकुराला जाणीव   असे नाव देण्यात आले होते.

जाणीव

दिवाणखान्यात टी.व्ही आल्याने बोलणे विसरलो आहे

घरात गाडी आल्यापासून चालणे विसरलो आहे

खिशात कॅल्कुलेटर आल्यापासून पाढे विसरलो आहे

ऑफीसमध्ये एसीत बसून झाडाखालचा गारवा विसरलो आहे

रस्त्यावर डांबर आल्यापासून मातीचा वास विसरलो आहे

मनालाच इतके कष्ट होतात की शरीराचे कष्ट विसरलो आहे

कचकड्यांची नाती जपतांना प्रेम करायला विसरलो आहे

बॅंकांमधली खाती सांभाळतांना पैशांची किंमत विसरलो आहे

उत्तेजक चित्रांच्या बरबटीमुळे सौदर्य पाहणे विसरलो आहे

कृत्रिम सेंटच्या वासामुळे फुलांचा सुगंध विसरलो आहे

फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीची ढेकर विसरलो आहे

पॉप व रॉपच्या दणदणाटात संगीत समाधी विसरलो आहे

क्षणभंगूर मृगजळाच्या मागे धावतांना सत्कर्माला विसरलो आहे

माझीच तुंबडी भरतांना दुसऱयाचा विचार करणं विसरलो आहे

धावत धावत असतांना क्षणभर थांबणंही विसरलो आहो

जागेपणीचं सुख जाऊच द्या सुखाची झोपही विसरलो आहे

कृत्रिम व खोट्या विनोदामुळे  खळखळून हसणं विसरलो आहे

आणि हसणं विसरल्याने जीवन जगणेच विसरलो आहे


खूप छान आणि मनाला भावणारे असे हे शब्द आहेत. हे ज्या लिहिले असतील, त्यांचे अभिनंदन. 

19 November 2009

शिवप्रताप दिन

छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या प्रतापगड येथे झालेल्या भेटीच्या वेळेस अफजलखान याने दगाफटका करुन शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. महाराष्ट्रावर चालून आलेल्या अफजलखानरुपी राक्षसाचा शिवाजी महाराजांनी वध केला. हा दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी. इंग्रजी कालगणनेनुसार येत्या २४ नोव्हेंबर रोजी हा दिवस येत असून यंदाच्या वर्षी या ऐतिहासिक घटनेला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने वाई येथील प्रतापगड उत्सव समितीने वाई येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.प्रतापगडाच्या युद्धात शिवाजी महाराज यांनी विजय संपादन करुन आणि अफजलखानाचा वध करुन बलाढ्य शत्रूला नेस्तनाबूत करण्याचा इतिहास घडवला. शिवाजी महाराज यांचे हे धाडस, चातुर्य, राजकारण, त्यांच्या मावळ्यांची कामगिरी हा सर्व इतिहास प्रत्येकालाच अभिमान वाटावा असा व प्रेरणादायी आहे. या दिवसाची आठवण म्हणून प्रतापगड उत्सव समितीने पंधरा वर्षांपूर्वी प्रतापगडाच्या परिसरात हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. अफजलखान वधाच्या ऐतिहासिक घटनेला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे समितीने ठरवले आहे.


शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेल्या प्रतापगडाच्या युद्धाचा दाखला जागतिक युद्धशास्त्रातही अभ्यासासाठी देण्यात येतो. आपण मात्र पाहिजे तितके या प्रकरणाकडे पाहात नाही. अफजलखान वध ही ऐतिहासिक सत्य घटना असली तरी त्याचा देखावा लावण्यास परवानगी न मिळणे, पाठ्यपुस्तकातून हा धडा किंवा चित्र वगळणे असे दुर्दैवी प्रकार आपल्याकडे मुस्लिमांच्या लांगुनचालनासाठी केले जात असतात.


प्रतापगड उत्सव समितीने या विषयावर व्यापक जनजागृती करण्याचे ठरवले आहे. सध्या आपल्या देशात दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांनी थैमान घातले आहे. या परिस्थितीत संपूर्ण देशाला आणि प्रत्येक राष्ट्राभिमानी नागरिकामध्ये लढाऊ वृत्ती निर्माण होण्याची गरज आहे. अफजलखानाच्या रुपाने शिलाजी महाराज यांनी महाराष्ट्रावर चाल करुन आलेल्या दहशतवादाचा समर्थपणे मुकाबला केला होता. त्यामुळे दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अफजलखान वधाचा हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असे समितीचे म्हणणे आहे.


हा शिवप्रताप दिन केवळ महाराष्ट्रातच साजरा न होता तो संपूर्ण देशभरात साजरा झाला पाहिजे. या घटनेकडे जातीय किंवा धार्मिक दृष्टीकोनातून न पाहता राष्ट्रहिताच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. प्रतापगड उत्सव समितीतर्फे येत्या २४ नोव्हेंबर रोजी वाई येथे शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम होणार आहे. या वेळी कर्नल संभाजी पाटील यांना वीरजीवा महाले तर शिवभक्त हरिदास पडळकर यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


२४ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी काही ना काही कार्यक्रम आयोजित केला जावा, असे आवाहनही या समितीने केले आहे.

प्रतापगड उत्सव समितीचे पदाधिकारी असे

विजयाताई भोसले-निमंत्रक, संजय भोसले-अध्यक्ष, मिलिंद एकबोटे- कार्याध्यक्ष, विनायक सणस-उपाध्यक्ष

अधिक माहितीसाठी संपर्क दूरध्वनी

मिलिंद एकबोटे-९४२३५७२३८०

अन्य क्रमांक-९८८१७३४२०३/९७६७७५५९९२/९९२२३४१३२२

18 November 2009

मुजोर रिक्षाचालक, ढिम्म लोकप्रतिनिधी आणि हतबल प्रवासी

डोंबिवली-कल्याणमध्ये ऑटोरिक्षांसाठी मीटर पद्धत लागू करण्यासाठी नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आरटीओ अधिकाऱ्यांनी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याऐवजी ‘खोटे बोल पण रेटून बोल’ असे सांगत स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेतली. डोंबिवलीत सर्व आलबेल असल्याचा जावईशोध लावत ‘डोंबिवली पॅटर्न’ची सर्वत्र अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मतही या बैठकीत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. मात्र ‘डोंबिवली पॅटर्न’ म्हणजे मुजोर रिक्षाचालकांनी मनाला येईल तसे भाडे सांगणे आणि ते प्रवाशांनी निमूटपणे देणे, असाच असल्याचे चित्र डोंबिवलीकरांना सध्या अनुभवास येत आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनाही याच ‘डोंबिवली पॅटर्न’ची अपेक्षा आहे काय, असा सवाल डोंबिवलीकर प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या सगळ्या प्रकारामुळे मुजोर रिक्षाचालक, ढिम्म लोकप्रतिनिधी आणि हतबल प्रवासी असे चित्र निर्माण झाले आहे.ऑगस्ट महिन्यापासून हा विषय प्रवासी संघटनांनी लावून धरला आहे. १५ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी जाहीरपणे सांगितले होते. डोंबिवतीत रिक्षाचालकांना गुलाबाचे फूल देऊन त्याची सुरुवात करण्याची गांधीगिरीही करण्यात आली. प्रवाशांनी मीटरप्रमाणे जायची इच्छा व्यक्त केली तर रिक्षाचालकांनी मीटर टाकणे आवश्यक आहे. ज्याला शेअर पद्धतीने जायचे आहे, त्यांना त्याप्रमाणे नेण्यात यावे, डोंबिवलीत या दोन्ही पद्धती सुरू राहतील, असे सांगण्यात आले होते. त्यानंतरही रिक्षाचालकांनी मीटर पद्धतीलाच ठाम विरोध केल्याने मीटरसक्ती झालीच नाही. त्यानंतर गणपती, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अशी फुटकळ कारणे देत वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकारी यांनी रिक्षाचालकांच्या नेत्यांपुढे नांगी टाकल्याचे पाहायला मिळत आहे. अद्यापही डोंबिवलीत प्रवाशांना मीटर पद्धतीने जाता येत नाही. एखाद्या प्रवाशाने तशी इच्छा व्यक्त केली तर त्याला मुजोर रिक्षाचालक नकार देतात. त्यामुळे रिक्षाचालक म्हणतील आणि मागतील तेवढे पैसे त्यांना द्यावेच लागतात. ज्या ठिकाणी जाण्यासाठी मीटर टाकले तर किमान १२ ते १५ रुपये भाडे होईल, तेथे प्रवाशांना रिक्षाचालक म्हणतील तितके पैसे द्यावे लागत आहेत. मध्यंतरी आरटीओ, प्रवासी संघटना यांनी डोंबिवली-कल्याणमध्ये पाहणी करून ठराविक ठिकाणे व स्टॅण्डपासून तेथे जायचे दरपत्रक नक्की केले होते. त्याचे फलक सर्व रिक्षातळांवर लवकरच लावण्यात येतील, असे गणेशोत्सवाच्या काळात सांगण्यात आले होते. गणपती झाले, दिवाळीही गेली तरी ते फलक लावण्यास आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. जवळच्या अंतरावर जायचे असले तरी डोंबिवलीतील रिक्षाचालक १२ रुपये इतके किमान भाडे घेतात. ठाणे किंवा अन्यत्र हेच भाडे ९ रुपये इतके आहे. लांबच्या ठिकाणी जायचे असेल तर रिक्षाचालक जेवढे पैसे मागतील तेवढे दिले तरच तुम्हाला रिक्षात बसण्याची परवानगी असते. याचा फायदा रिक्षाचालकांनाच होतो. पूर्वेकडून पश्चिमेला किंवा पश्चिमेकडून पूर्वेला जायचे असेल तर उड्डाणपूल पार करावा लागतो, हे कारण देत रिक्षाचालक प्रवाशांकडून किमान २५ ते कमाल ४० ते ४५ रुपयांपर्यत भाडे मागतात. मीटर टाकले तर हीच रक्कम अवघी पंधरा ते वीस रुपये किंवा त्यापेक्षाही कमी होऊ शकते. सकाळी आणि रात्रीच्या वेळी काही रिक्षाचालक एकेका रिक्षात चार ते सहा प्रवाशांना घेऊन एका फेरीत (सहा रुपये एका प्रवाशाचे) ३० ते ३६ रुपयांचा गल्ला जमवत असतात. त्यामुळे अशा रिक्षाचालकांचा मीटर पद्धतीला विरोध असणे स्वाभाविकच आहे. वाहतूक पोलिसांची पाठ वळली की डोंबिवलीच्या पश्चिम भागात पं. दीनदयाळ मार्ग चौक, विष्णूनगर पोलीस ठाण्यासमोरील रस्ता, कल्याण दिशेकडे उतरणारा पादचारी पूल आदी ठिकाणी काही मुजोर व बेशिस्त रिक्षाचालक वाटेल तशा रिक्षा उभ्या करुन उभे असतात. त्यामुळे सुभाष रस्ता, महात्मा फुले मार्ग येथून दिनदयाळ मार्गाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना या अडथळ्यातून वाहने नेण्याचे दिव्य पार - पाडावे लागते. जाणारे आणि येणारे नागरिक आणि पश्चिमेला लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा त्रास होतो. एखाद्या रिक्षाचालकाला सांगितले तर त्यांच्याकडून प्रवाशालाच दमदाटी करण्यात येते. खरे तर येथून हाकेच्या अंतरावर विष्णूनगर पोलीस ठाणे आहे. मात्र त्याचा वचक मुजोर रिक्षाचालकांना नाही. डोंबिवलीतील रिक्षाचालक-मालक संघटनांचे नेते महापालिकेत नगरसेवक आहेत. त्यामुळे ते नेहमीच प्रवाशांच्या ऐवजी मूठभर रिक्षाचालकांची बाजू घेत असतात. डोंबिवलीचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र चव्हाण हे टोलमुक्तीसाठी उपोषणास बसतात, मात्र डोंबिवलीकर प्रवाशांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या ठरलेल्या या विषयावर अद्याप तोंड उघडावेसे त्यांना वाटलेले नाही. त्यांना फक्त मोटारवाल्यांचीच काळजी वाटते का असा सवाल जनता करीत आहे. रिक्षा मीटरच्या अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधींची उदासीनता शिवसेनेचे अनेक नेते रिक्षा युनियनचे नेते आहेत. यामध्ये पुंडलिक म्हात्रे, प्रल्हाद जाधव, नगरसेवक प्रकाश पेणकर यांचा समावेश आहे. पेणकर यांची अनुपस्थिती नुकत्याच झालेल्या बैठकीत तीव्रतेने जाणवत होती. मनसे नेत्यांच्या रिक्षा युनियन नसल्या तरी त्यांचे नेते मात्र ऐन गर्दीच्या वेळेत डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रस्त्यावर वाहतूक कोंडी होईल अशा ठिकाणी आपली वाहने उभी करून ठेवतात. नित्याचाच हा प्रकार असल्याचे दिसून येत आहे. या नेत्यांनीही रिक्षा मीटर पध्दत होण्यासाठी पुढाकार घ्यावा. केवळ राज ठाकरे यांचे विचार फलकावर लावून जनतेला ऐकवले म्हणजे समाजसेवा होत नाही. यासाठी मनसेने पत्रकबाजी, फलकबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करावी, अशा नागरिकांच्या अपेक्षा आहेत. आरटीओ अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसेल तर मीटर पध्दत पुढील १०० वर्षे शहरात अमलात येणार नाही. कारण रिक्षा युनियनचे नेते आणि आरटीओ अधिकारी यांच्यामध्ये घरोब्याचे संबंध असतात. या संबंधांनीच मीटर पध्दतीचा घात केला आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. मीटर पद्धतीला आमचा विरोध नाही, ती झाली पाहिजे असे सांगत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आपली सुटका करून घेतात. पण मुजोर रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नाहीत किंवा प्रत्यक्ष कोणती कृतीही करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. राज्याचे परिवहनमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. आता किमान त्यांनी तरी या प्रश्नात लक्ष घालावे किंवा राज्य पातळीवरील सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रमुखांनी डोंबिवलीतील आपापल्या पक्षांच्या पुढाऱ्यांना या प्रश्नात प्रवाशांची बाजू घेऊन लक्ष घालण्यास सांगावे, अशी माफक अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महत्वाचे- हा प्रश्न फक्त डोंबिवली-कल्याणपुरताच मर्यादित नाही. महाराष्ट्राच्या अनेक भागातील प्रवाशांना याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

17 November 2009

गोमूत्र एक वरदान

डोंबिवलीतील माझे परिचित दीपक केसकर यांच्याकडून मला नुकताच गो विज्ञान संशोधन संस्था-पुणे व पुरुषार्थ मासिक यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेला गोवंश एक शाश्वत वरदान हा अंक वाचायला मिळाला. या अंकात गोवंश संवर्धन व संरक्षण या विषयाबरोबरच गाईचे दूध, तूप, दही, शेण आणि गोमूत्र याविषयी सविस्तर माहिती देणारे विविध लेख, चौकटी देण्यात आल्या आहेत. या विषयाची आवड असणाऱयांनी आणि नसणाऱयांनीही एक नवीन विषय म्हणून हा अंक वाचायला हवा. हा अंक वाचून गोमूत्राचा तसेच त्यापासून तयार केलेल्या विविध औषधांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग करुन घेता येईल, त्याचे मार्गदर्शन या अंकात आहे. शंभर वर्षांपूर्वी चौंडे महाराज यांनी वाई मुक्कामी कसायाच्या तावडीतून गाई सोडवल्या. गोमांस निर्यात करुन चार पैसे कनवटीला लावता यावेत म्हणून ब्रिटिशांनी गोहत्येस प्रोत्साहन दिले. चौंडे महाराज यांनी कसायाच्या तावडीतून गाईंना वाचवले त्या घटनेचे हे शताब्दी वर्ष आहे. चौंडे महाराज यांनी पुढे आपले सर्व आयुष्य गोरक्षण व संवर्धन या विषयाला वाहून घेतले. अनेक ठिकाणी गोसेवा संघ स्थापन होत आहेत. मात्र संपूर्ण भारतात गोवंशहत्या बंदी व्हावी आणि आपल्या कृषीवर आधारित अर्थव्यवस्थेला सुनिश्चित गती प्राप्त व्हावी त्या दृष्टीने आधुनिक वैज्ञानिक शास्त्र वापरून गोवंशाचा अधिकाधिक चांगला उपयोग करता यावा, म्हणून बरेच काही करावयाचे आहे. त्याची जागृती व्हावी म्हणून हा विशेषांक प्रकाशित करण्यात आल्याचे अंकाच्या संपादकीयात म्हटले आहे. अंकात हिंदी आणि मराठीतील या विषयाशी संबंधित विविध लेख आहेत. तसेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर गोसेवा, संशोधन करणाऱया काही संस्थांची माहिती, गोमूत्र व त्याचे उपयोग, पंचगव्य, गोमूत्राचा वापर करुन केलेली शेती आणि अन्य संग्राह्य माहिती आहे. मुख्य म्हणजे चौंडे महाराज यांचा परिचय व त्यांच्या कार्याची ओळखही अंकात काही लेखांद्वारे करुन देण्यात आली आहे. प्रभाकर पुजारी यांनी वेदातील गोसूत्रे सांगितली आहेत. डॉ. म. रु. पाचेगावकर यांनी गोपालन भारतीय संकल्पना-सद्यस्थिती आणि आव्हाने याविषयी सखोल विवेचन केले आहे. भारतात आढळणाऱया विविध जातींच्या गाईंची माहिती त्यांच्या छायाचित्रांसह देण्यात आली आहे. डॉ. केशव चौंडे यांनी जीवनदायिनी गोमाता या लेखात गाईचे दूध, तूप, दही, गोमूत्र यांची माहिती व औषधी उपयोग सांगितले आहेत. डॉ. स्मीता बोरा यांनी आयुर्वेदीय दृष्टीकोनातून गोविज्ञान सांगितले आहे. गोमूत्राचे रासायनिक पृथ्थकरण केले असता त्यात आढळणारी बावीस विविध रासायनिक द्रव्ये आणि रोग बरा होण्यासाठी होणारा त्याचा उपयोग, गोमूत्रामुळे बरे होणारे रोग याचीही माहिती आहे. आयुर्वेदातील गोमूत्र व गोमय यांचे महत्व वैद्य अजित जोशी यांनी तर गाईच्या शेणाचे औषधातील उपयोग या विषयी वैद्य सुविनय दामले यांनी माहिती दिली आहे. गोसेंद्रीय शेती, गोमूत्र शेतीला वरदान, गोसेंद्रीय शेतीचे शेतकऱयांचे अनुभवही अंकात आहेत. अकोला, नागपूर, मुंबईतील भाईंदर तसेच अन्य ठिकाणी असलेल्या गोसेवा संशोधन संस्था, या संस्थेकडून गोमूत्रापासून तयार केली जाणारी विविध औषधे यांचीही माहिती आहे. गोमूत्र उपचार पद्धतीकडे आता लोक वळायला लागले आहेत. या उपचार पद्धतीचे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने याचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार झाला पाहिजे. अधिक माहितीसाठी इच्छुकांना गोविज्ञान संशोधन संस्था, ७५९/३२, गोपिकाश्रम, डेक्कन जिमखाना, पुणे-४ या पत्यावर किंवा ०२०-२५६७२७८५ तसेच ०२०-२४४५११४३ (वितरण) येथे दुपारी ४ ते ८ या वेळेत संपर्क साधता येईल. गोमूत्रापासून औषधे तयार करणाऱया अन्य काही संस्था अशा आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्प, माधवनगर, म्हैसपूर फाटा, वाशीम रोड, अकोला दूरध्वनी ०७२४-२२४६८३५. गोसेवा परिषद, केशवसृष्टी गोशाला, उत्तन, भाईंदर (पश्चिम), ०२२-२८४५१०३१/२३०९४३०६

16 November 2009

हे जीवन सुंदर आहे

येणारा आत्ताचा क्षण हा आपला असतो, उद्याचा तर जाऊ दे पुढचा क्षणही आपला असेल की नाही, ते आपल्याला सांगता येत नाही. आपले मानवी जीवन हे असेच क्षणभंगूर आहे. मात्र पुढचा किंवा उद्याचा क्षण कसा असेल, त्याची काळजी करत बसण्यापेक्षा हातात असलेला प्रत्येक क्षण सार्थकी कसा लागेल, त्या क्षणी आपल्याला आणि दुसऱयानाही आपल्याला फक्त आनंद आणि आनंदच कसा देता येईल, याचा विचार केला तर हे जीवन सुंदर आहे, असे आपल्या लक्षात येईल. काहीही आजार नसलेला आणि धडधाकट असलेला माणूस अचानक आपल्यातून निघून जातो आणि आजारपणामुळे वर्षानुवर्षे/महिनोंमहिने अंथरुणाला खिळून असलेला कोणी जाऊ म्हटले तरी जात नाही. खरेच देवाची आणि दैवाची लिला आपल्याला कळत नाही हेच खरे. म्हणतात ना देवाचे/यमाचे बोलावणे आले की आपल्याला जावेच लागते. एखाद्याने देवा मला ने रे असे म्हटले तरी तो नेत नाही किंवा एखाद्याने मला नेऊ नको असे म्हटले तरी तो थांबत नाही. सकाळी घरातून बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुखरुप घरी येईल की नाही, त्याचीही सध्याच्या काळात शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे आपला माणूस सुखरुप घरी येईपर्यंत घरच्यांच्या मनाला चैन पडत नाही. कधी कोणी मृत्यूचे बोलावणे आल्यासारखा त्याच्याबरोबर जातो तर कोणी त्याचे बोलावणे आलेले असूनही नशिबामुळे, देव, दैव आणि पूर्वपुण्याईमुळे वाचतो. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील एका दुखद घटनेची बातमी सर्वच वृत्तपत्रातून आली होती. लिफ्टमधून जाताना सहा अग्निशमन दलाच्या जवांनाना आतमध्ये गुदमरुन प्राणाला मुकावे लागले होते. त्यांच्याबरोबरच लिफ्टमध्ये पाऊल टाकलेली एक महिला पोलीस अधिकारी ऐनक्षणी नंतर जाऊ म्हणून लिफ्ट बाहेर पडली आणि ती वाचली. याला काय म्हणायचे. अनेकदा अपघात किंवा अन्य दुर्घटनांमध्ये लहान बालके, तान्ही मुले आश्चर्यकारकपणे वाचतात तर काही जण मृत्यूमुखी पडतात. एखादा तरुण ज्याने आपल्या भावी आयुष्याची काही स्वप्ने रंगवलेली असतात तो अचानक जातो तर कोणाच्या जीवनाची नुकतीच सुरुवात झालेली असतानाच म्हणजे लहान वयातच त्यांना मृत्यू गाठतो. अनेक मृत्यू/अपघात हे कुलदेवतेच्या दर्शनाला किंवा देवाच्या दर्शनाला जाताना/परतताना झाले असल्याचे वाचायला किंवा ऐकायला मिळते. काही वेळेस रेल्वे, बस किंवा विमानाच्या भयानक अपघातात अनेकांचा एकाच वेळी मृत्यू होतो. त्या सगळ्यांचे मरण एकाच वेळी लिहिलेले असते का, अर्थात यातूनही काही वाचतात, पण अपघातात आलेल्या अपंगत्वामुळे अरे त्यापेक्षा आपण सुटलो असतो तर बरे झाले असते, असे विचार त्यांच्या मनात येऊन जातात. काही खरोखरच भाग्यवान ठरतात, जीवघेण्या अपघातात त्यांना केवळ खरचटण्यापलीकडे किंवा थोडेसे लागण्याखेरीज काही होत नाही. त्यांचे गंडांतर टळलेले असते. किंवा त्यांचा मृत्यूयोग तेव्हा नसतो, असेच म्हणावे लागते. या सगळ्याचा विचार केला की आपलेच डोके भणभणायला लागते. एकीकडे विज्ञान-तंत्रज्ञानात माणसाने केलेली प्रगती, विविध शोध, औषधे, वैद्यकीय सोयी-सुविधा, अत्याधुनिक उपकरणे यामुळे सुसह्य झालेल्या जीवनामुळे आपण निसर्गावर विजय मिळवला, त्याच्यावर मात केली अशा थाटात वावरत असतो. पण आत्ताचा आणि येणारा पुढचा क्षण आपला आहे की नाही या बाबतीत मात्र आपल्याला काही कळत नाही. मात्र पुढचा क्षण कसा असेल त्याची काळजी करत बसण्यापेक्षा आत्ताचा क्षण आपण आनंदाने जगू या, दुसऱयाला मदत करु या, आपल्या हातून कोणतेही वाईट कृत्य घडणार नाही, त्याची खबरदारी घेऊ या आणि आपल्या कृतीने समोरच्या व्यक्तीच्या जीवनात आनंद फुलवू या असे प्रत्येकाने ठरवले तर क्षणभंगूर असेलेले आपले मानवी जीवन सार्थकी लागेल...