20 August 2011

बोक्या सातबंडेवर साहित्य अकादमीची मोहर

आकाशवाणीवरून ‘श्रुतिका’ पुस्तकाच्या माध्यमातून ‘कथा’ तसेच दूरदर्शन मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रवास झालेल्या ‘बोक्या सातबंडे’ला अलिकडच्या काळातील बालसाहित्याचा ‘नायक’ होण्याचेही भाग्य लाभले आहे. ‘बोक्या’च्या या गुणवत्तेवर साहित्य अकादमीनेही आपली मोहर उमटविली असून दिलीप प्रभावळकर यांना ‘बोक्या सातबंडे’साठी साहित्य अकादमीचा (बाल साहित्य) पुरस्कार जाहीर झाला आहे.
राजहंस प्रकाशनाने ‘बोक्या सातबंडे’चे सात भाग प्रकाशित केले आहेत. एक ते पाच हे भाग आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या भागांवर आधारित होते. सहावा आणि सातवा भाग ‘लोकसत्ता’च्या लोकरंग पुरवणीतील ‘बालरंग’ पानावर प्रसिद्ध झालेल्या गोष्टींचे आहेत.
पुरस्काराच्या निमित्ताने प्रभावळकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ‘बोक्या सातबंडे’चा प्रवास उलगडला. ते म्हणाले आकाशवाणीच्या मुंबई ‘ब’ केंद्रावरील ‘बाल दरबार’ या कार्यक्रमातून ‘बोक्या’च्या गोष्टी श्रुतिका स्वरुपात पहिल्यांदा प्रसारित झाल्या. ‘बाल दरबार’चे निर्माते माधव कुलकर्णी यांनी ते सर्व भाग सादर केले होते. आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या  २५ भागांना खूप लोकप्रियता मिळाली. पुढे राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांनी त्याचे पुस्तक काढले. माजगावकर यांनीच सुचविल्यानुसार पुस्तकासाठी पुस्तकासाठी मी त्याचे पुन्हा नव्याने कथा स्वरुपात लेखन केले.
आमच्या लहानपणी ना. धो. ताम्हनकर यांचा ‘गोटय़ा’, श्री. शं. खानविलकर यांचा ‘चंदू’ हे बालसाहित्याचे नायक होते. त्यानंतरच्या काळात भा. रा. भागवत यांच्या ‘फास्टर फेणे’ने वाचकांवर मोहिनी घातली होती. लहान मुलांसाठी मी लिहिलेल्या ‘बोक्या सातबंडे’या व्यक्तिरेखेने आकाशवाणी आणि पुस्तक माध्यमाबरोबरच दूरदर्शन मालिका आणि मराठी चित्रपटाच्या रूपानेही आपला ठसा उमटवला आहे. सध्या ‘बोक्या’ची १४ वी आवृत्ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून त्यावरून ‘बोक्या’ किती लोकप्रिय आहे, त्याची सर्वाना कल्पना यावी, असेही प्रभावळकर यांनी सांगितले.
‘बोक्या सातबंडे’ हा आजच्या काळातील आहे. सध्याचे सभोवतालचे वातावरण, दैनंदिन ताण-तणाव, विविध प्रश्न यात मांडले आहेत. ‘बोक्या’च्या गोष्टीतील बोक्याबरोबरच आजी आणि दादा ही पात्रे वाचक आणि रसिकांना जास्त आवडणारी आहेत. यातील आजी लिहितांना माझ्या डोळ्यासमोर माझी आजी (वडिलांची आई) होती. मी दादरच्या ‘शारदाश्रम’सहकारी गृहनिर्माण संस्थेत वाढलो, लहानाचा मोठा झालो. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वातावरणाची पाश्र्वभूमीही ‘बोकया’मध्ये आहे. ‘बोक्या’च्या आणखी काही नवीन गोष्टी लिहीण्याचा विचार असल्याचेही प्रभावळकर म्हणाले.
५० हजार रुपये आणि ताम्रपट असे साहित्य अकादमीच्या पुरस्काराचे स्वरूप असून तो येत्या नोव्हेंबर महिन्यांत त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वी ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने तर गेल्या वर्षी मराठी रंगभूमीवरील योगदानासाठी संगीत नाटक अकादमीने पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.
साहित्य अकादमीच्या पुरस्काराने प्रभावळकर यांना आता तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे.     

(माझी ही बातमी लोकसत्ताच्या मुख्य अंकात( २० ऑगस्ट २०११) पान क्रमांक १५ वर प्रसिद्ध झाली आहे)
http://epaper.loksatta.com/10197/indian-express/20-08-2011#p=page:n=15:z=1

17 August 2011

कोश संत साहित्यातील सुभाषितांचा

ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास स्वामी आणि तुकारामांच्या साहित्यातील पाच हजारांहून अधिक सुभाषितांचे संकलन ‘अतिथी’ या विषयावर संत ज्ञानेश्वर यांचे ‘जैसा अपमानिता अतिथी ने सुकृतीची संपत्ती’ हे तर संते एकनाथ यांचे ‘अतिथी जाता परान्मुख त्या सवे जाय पुण्य निक्षेप’ अशी सुभाषिते आहेत. तर ‘आरोग्य’ या विषयावर संत ज्ञानेश्वरांची ३७ सुभाषिते आहेत. याच विषयावर नामदेव-४, एकनाथ-८ रामदास स्वामी-१ आणि तुकाराम यांची ११ सुभाषिते या कोशात देण्यात आली आहेत...
सुभाषिते ही संस्कृत भाषेतीलच असतात, हा समज दूर करण्याचा प्रयत्न  अठय़ाहत्तर वर्षांच्या रामभाऊ नगरकर यांनी केला आहे. अथक परिश्रम आणि अभ्यासातून नगरकर यांनी संकलित केलेला ‘संत सुभाषित कोश’तयार झाला आहे. या कोशात संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास स्वामी आणि तुकाराम या पाच संतांच्या साहित्यातील ५ हजार १४७ सुभाषिते एकत्रित देण्यात आली आहेत.
हा कोश पाचशे पानांचा असून तो मासिकाच्या आकारात आहे. गेली वीस वर्षे नगरकर या कोशावर काम करत होते. या पाच संतांचे सर्व साहित्य वाचून, त्यावर अभ्यास करून सुभाषिताचे निकष ज्याला चपखल बसतील, अशा ओळी त्यांनी अक्षरश: वेचून काढल्या आहेत. हा कोश पुण्याच्या डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केला असून येत्या २८ ऑगस्ट रोजी पुण्यात संत साहित्याचे अभ्यासक आणि पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अद्यासनाचे डॉ. यशवंत पाठक यांच्या हस्ते या कोशाचे प्रकाशन होणार आहे. या कोशाबाबत ‘वृत्तान्त’ला माहिती देताना नगरकर यांनी सांगितले की, या कोशात सुभाषित म्हणजे काय, ते ठरविण्याचे निकष कोणते, सुभाषिते मराठीत असू शकतात का, म्हणी आणि सुभाषिते यातील फरक, संस्कृत सुभाषिते असलेले विविध ग्रंथ, त्यांचा धावता आढावाही आपण घेतला आहे. सुभाषिते ही फक्त संस्कृत भाषेतच असतात, हा गैरसमज आपण या कोशाद्वारे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. सुभाषितांची निवड करताना या कोशात त्याचे विषयवार वर्गीकरण करण्यात आले असून ११५ विषय घेण्यात आले आहेत. अतिथी, अभ्यास, आाकाश, आरोग्य, आरसा, गंध, गुरू, ग्रंथ, भक्ती, भीती, मद्य, मासा, मुक्ती, मोक्ष आणि अनेक विषयांवरील मराठी सुभाषिते या कोशात असल्याचे सांगून नगरकर म्हणाले की, कोशात परिशिष्ट देण्यात आले असून या प्रत्येक संतांचे सुभाषित कोठून घेतले त्याचा मूळ संदर्भ देण्यात आला आहे. 

(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई आणि ठाणे वृत्तान्तमध्ये १७ ऑगस्ट २०११ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे. मुंबई वृत्तान्तमधील बातमीची लिंक अशी
http://epaper.loksatta.com/9978/indian-express/17-08-2011#p=page:n=19:z=1