09 March 2010

गॅझेट्स आता ऑनलाईन

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र दर्शनिका (गॅझेटिअर्स) विभागातर्फे तयार करण्यात आलेली सर्व जिल्हा आणि राज्य गॅझेटिअर्स आता ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आली असून यापैकी काही गॅझेट्स सीडी स्वरुपातही प्रकाशित करण्यात आली आहेत. संपूर्ण देशात अशा प्रकारचे काम करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. देशातील सर्व राज्यांनी आपली गॅझेट्स ऑनलाईन करावी, अशी सूचना केंद्र शासनाच्या गृह विभागाकडून नुकतीच सर्व राज्यांना करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वीच महाराष्ट्राने हे काम करुन या कामात पहिला क्रमांक पटकाविला आहे.


स्वातंत्र्यपूर्व काळातही गॅझेटिअर ही संकल्पना होती. ब्रिटिशांनी आपल्या प्रशासकीय कामासाठी अशी गॅझेट्स तयार केली. स्वातंत्र्यानंतर ‘लोककल्याणकारी राज्य’ ही संकल्पना आपल्या भारतीय राज्य घटनेने स्वीकारली आणि पुन्हा एकदा नव्याने किंवा आहे त्या गॅझेटिअर्समध्ये सुधारणा करुन त्याच्या पुनर्मुद्रणाचे काम हाती घेण्यात आले. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक राज्यात संपादक मंडळ स्थापन करुन हे काम सुरु करण्यात आले. या सर्व कामामध्ये महाराष्ट्र शासनाच्या दर्शनिका विभागाने आघाडी घेऊन जिल्हा, राज्य गॅझेटिअर्स काही वर्षांपूर्वीच ऑनलाईन स्वरुपात तयार करण्याचे काम सुरु केले. बंगरुळू येथे २००२ मध्ये पहिली अखिल भारतीय गॅझेटिअर्स परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी महाराष्ट्र राज्याची काही गॅझेट्स सीडी स्वरुपात आणि ऑनलाईन करण्यात आल्याचे तेथे सांगितल्यावर सर्व राज्यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन केले होते. पुढे दोन वर्षांतच सुमारे ७५ गॅझेटिअर्स आपण ऑनलाईन केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर विभागाचे कार्यकारी संपादक आणि संचालक डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना दिली.

देशातील अन्य कोणत्याही राज्याने जे काम आत्तापर्यंत केलेले नाही, ते आपण केले असल्याचे सांगून डॉ. पाठक म्हणाले की, गॅझेटिअर हे जिल्हा विकासाचे आणि नियोजनाचे दिशादर्शक साधन असावे, या उद्देशाने आपण हे काम केले आहे. महाराष्ट्रातील २६ जिल्ह्णाांची इंग्रजी भाषेतील गॅझेटिअर्स ऑनलाईन उपलब्ध असून लातूर, नागपूर सातारा (प्रत्येकी भाग १ व २)आणि रायगड जिल्ह्णााचे गॅझेटिअर्स मराठी भाषेतून तसेच महाराष्ट्र- भूमी व लोक, इतिहास प्राचीन काळ खंड-१, स्थापत्य व कला खंड १, भाग-२, औषधी वनस्पती आणि महाराष्ट्रातील वनस्पती शास्त्र आणि वनसंपदा ही राज्य गॅझेटिअर्स आपण ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहेत. स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास व नांदेड जिल्ह्णााच्या गॅझेटिअरचे काम सुरू असून मध्ययुगीन इतिहास या गॅझेटिअरचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांना गॅझेट्स ऑनलाईन करण्याच्या सुचना नुकत्याच दिल्या आहेत. मात्र आपण हे काम या प्रू्वीच केले असल्याने महाराष्ट्रासाठी ती अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रियाही डॉ. पाठक यांनी व्यक्त केली.

महाराष्ट राज्य शासनाच्या http://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ही सर्व गॅझेटिअर्स उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावर अग्रभागी असलेल्या एका पट्टीवरील ‘गॅझेटिअर्स’ असे लिहिलेल्या चित्रावर क्लिक केले की हा सर्व खजिना अभ्यासक आणि जिज्ञासकांसाठी ऑनलाईन उपलब्ध आहे. किंवा http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/index.php थेट या पत्त्यावर क्लिक केले तरी ही सर्व गॅझेट्स पाहता येतील.

इच्छुकांना अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर विभागात ०२२-२२६७८७७९/२२६९११२४ येथे संपर्क साधता येईल.

No comments:

Post a Comment