30 May 2012

माथ्यावर तळपे उन

काय उन्हाळा चांगलाच तापलाय ना, कधी एकदा पावसाला सुरुवात होतेय, असं झालय. खरं आहे. या उन्हाळ्याबद्दल जरा पुन्हा थोडेसे. आपण गाण्याचे शौकीन असाल तर विविध मूड्समधील गाणी आपण ऐकली असतील. काय काही वेगळं लक्षात येतंय. थंडी किंवा पाऊस या विषयावर मराठीत जेवढी गाणी आहेत, त्या तुलनेत उन्हाळा/उन या विषयी गाणी कमी आहेत, असं नकोसा उन्हाळा या मागील लेखात मी म्हटलं होतं. हिवाळा किंवा पावसाळा हे दोन ऋतू आपल्याला जेवढे आवडतात त्या तुलनेत उन्हाळा हा ऋतू विशेषत्वानं कोणाला आवडत नाही. उन्हाळा म्हटला की आपण नाक मुरडतो. मग आपल्याप्रमाणेच कवी/गीतकार यांनाही उन्हाळा विशेष आवडत नसल्याने त्याचे प्रतिबिंब गाण्यातून फारसे उमटले नसावे का. पण उन/उन्हाळा हा शब्द असलेली काही गाणी आहेत आणि ती चांगली लोकप्रियही आहेत.
गाण्यांमधून ऊन किंवा उन्हाळा हा शब्द असलेली गाणी आठवताहेत का, जरा विचार करा. एकदम सोपं असलेलं आणि प्रत्येकाला माहिती असलेलं आहे हे गाणं. पिकनिक, घरगुती गाण्यांची मैफल, भेंड्या किंवा मराठी वाद्यवृदातून हे गाणं हमखास म्हटलं जातं, त्याला वन्समोअरही मिळतो. अजून लक्षात येत नाहीये.
सांगतो
ही चाल तुरुतुरू, उडती केस भुरभुरू
डाव्या डोळ्यावर बट ढळली
कशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात, नागीण सळसळली
ज्येष्ठ गायक दिवंगत जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील आणि शांता शेळके यांनी लिहिलेले व देवदत्त साबळे यांनी संगीत दिलेले हे गाणे आजही लोकप्रिय आहे. या गाण्यात उन हा शब्द आलेला आहे.
उन हा शब्द असलेलं आणखी एक माहितीचे आणि लोकप्रिय असलेलं गाणं म्हणजे उषा मंगेशकर यांच्या आवाजातील
वेळ झाली धर्मासांन
माथ्यावर तळपे उन
नको जाऊ कोमेजून
माझ्या प्रितीच्या फुला
हे गाणं. ज्येष्ठ गायक-संगीतकार यशवंत देव यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून ही कविता कवी आ. रा. देशपांडे ऊर्फ अनिल यांची आहे. काही वर्षांपूर्वी आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्रावरून म्हणजे आत्ताची अस्मिता वाहिनीवरून हे गाणं बरेचदा प्रसारित होत असे. या गाण्यात उन्हाळ्यातील रखरखाट, अंगाची होणारी काहिली हे सर्व काही आलं आहे.
कारण पुढील कडव्यातील शब्द
तप्त दिशा झाल्या चारी
भाजतसे सृष्टी सारी
कसा तरी जीव धरी
माझ्या प्रितीच्या फुला
असे आहेत.
या गाण्याबरोबरच मला शाळेत शिकलेले बालकवी यांची कविता आठवली. यातही उन हा शब्द आहे.
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येत सरसर शिरवे, क्षणात फिरूनी उन पडे
उन हा शब्द असलेलं आणखी एक लोकप्रिय गाणे सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजातील आहे.
आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे
हे गाणेही अधूनमधून आकाशवाणीवर लागत असते.
आशा भोसले यांच्या आवाजातील
तुझी नी माझी गंमत वहिनी ऐक सांगते कानात
आपण दोघी बांधू या गं दादाचं घर उन्हात
या गाण्यातही उन हा शब्द आलेला आहे.
ग. दि. माडगूळकर यांचं गीत, सुधीर फडके यांचं संगीत आणि माणीक वर्मा यांच्या आवाजातील एका लावणीतही उन हा शब्द आलेला आहे. ही लावणी आजही लोकप्रिय असून मराठी वाद्यवृंद किंवा विविध वाहिन्यांवरील गाण्यांच्या स्पर्धेच्या रिअॅलिटी शो मध्ये एखादा तरी स्पर्धक ही लावणी म्हणतो आणि वन्समोअर घेतो.
जाळीमंदी पिकली करवंद या लावणीत
भर उन्हात बसली धरुन सावली गुरं
न्हाई चिंता त्यांची तिन्हीसांज पातुरं
चला दोघं मिळूनी चढू टेकडीवर
चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद
जाळीमंदी पिकली करवंद
या प्रमाणेच आशा भोसले यांच्या आवाजातील
भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं
बाई श्रावणाचं उन मला झेपेना
या गाण्यातही उन हा शब्द आलेला आहे.
तर सहज आठवतील अशी उन/उन्हाळा हा शब्द असलेली ही काही गाणी. असो. गाण्यांमधल्या उन शब्दानेही अंगाची काहिली झाली असेल तर पावसाला अजून सुरुवात व्हायची आहे. तो पर्यंत थंडी आणि पाऊस असलेली गाणी आठवा. तेवढाच मनालाही गारवा...

(माझा हा लेख लोकसत्ता डॉट कॉमवरील ब्लॉगमध्ये २८ मे २०१२ या दिवशी प्रसिद्ध झाला आहे)

No comments:

Post a Comment