03 September 2009

गणेशस्तुती

लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये मी २५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २००९ या कालावधीत गणेशस्तुती हा स्तंभ चालवला होता. त्यातील सर्व लेखन मी येथे एकत्रित दिले आहे. गणेशस्तुती : विश्वव्यापी गणेश! ‘गणेशस्तुती’ या स्तंभातून गेल्या काही दिवसांत आरती, स्तोत्र, भूपाळी, कवने, ओव्या, गाणी आणि अन्य साहित्यातून करण्यात आलेले गणेशवंदन पाहिले. आजच्या शेवटच्या भागात इंटरनेटवर गणपतीविषयक असलेली विविध संकेतस्थळे आणि मजकूर याचा आढावा घेण्यात आला आहे. सध्या माहिती-तंत्रज्ञानाचे युग असून इंटरनेट आणि संगणक हा परवलीचा शब्द झाला आहे. आजची पिढीही संगणक व नेटवेडी आहे. गणपतीविषयक हजारो संकेतस्थळे आणि मजकूर आज इंटरनेटवर उपलब्ध आहे. गणपती हे दैवत केवळ भारतापुरतेच मर्यादित नसून जगातील अनेक देशातही वेगळ्या स्वरुपात आणि पद्धतीने त्याची उपासना सुरू आहे. त्यामुळे गणपती ही देवता विश्वात्मके आहे, त्याची खात्री इंटरनेटच्या महाजालात मिळते.गुगल किंवा अन्य सर्च इंजिनवर आपण नुसते गणपती, गणेश किंवा गणेशोत्सव असे शब्द टाइप केले तरी आपल्यासमोर गणपतीविषयक हजारो पानांचा मजकूर येतो. यात गणपतीविषयीच्या कथा, गणपतीची माहिती आणि त्याची छायाचित्रे, वॉलपेपर्स आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणेश मंदिरे, अष्टविनायक, भारतातील गणेशोत्सव, भारतातील व जगातील गणेश मंदिरे, गणपती स्तोत्र, आरती आणि इतर मजकूर आपण पाहू शकतो.मुंबईकरच नव्हे तर संपूर्ण देशातील आणि परदेशातील गणेशभक्तांसाठी प्रभादेवीचा सिद्धीविनायक आणि लालबागचा राजा हे श्रद्धेचे स्थान आहे. सिद्धीविनायक आणि लालबागच्या राजाच्या भक्तांसाठी आता ते संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. सिद्धीविनायकाचे www.siddhivinayak.org हे संकेतस्थळ असून त्यात देवळाचा इतिहास, देळातील दैनंदिन कार्यक्रम, ऑनलाइन पूजा बुकिंग अशा सुविधा उपलब्ध आहेत. अष्टविनायक यात्रा, गणपतीच्या गोष्टी, गणपती स्तोत्र, गणपतीविषयक प्रश्नोत्तरे यांचीही माहिती मिळते. श्री सिद्धीविनायकाची आरती, भजने असून ती डाऊनलोड करण्याचीही सोय आहे. पुण्याचा दगडुशेट हलवाई गणपतीही जगभरात प्रसिद्ध आहे. या गणपतीचीही www.dagdushethganpati.com असे संकेतस्थळ असून त्यावरही दगडुशेट हलवाई गणपतीबद्दलची माहिती आणि छायाचित्रे आहेत. तसेच काही प्रसिद्ध मंदिरांच्या संकेतस्थळांचे पत्ते देण्यात आले असून त्यावर क्लिक केल्यावर त्या त्या देवस्थानासाठी ऑनलाइन पूजेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अष्टविनायक, गणतीपुळे, शिर्डी व शनी शिंगणापूर, पंढरपूर आदी प्रसिद्ध देवस्थानांची माहितीही देण्यात आली आहे.लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने www.lalbaugcharaja.com असे संकेतस्थळ तयार केले आहे. यावर यंदाचा गणेशोत्सव, मंडळाची माहिती, लालबागच्या राजाची छायाचित्रे आणि वॉलपेपर्स, लालबागच्या राजाची जुनी छायाचित्रे असे सर्व पाहायला मिळते. तसेच www.marathiworld.com या संकेतस्थळावरही खास गणेशोत्सव विभाग पाहायला मिळतो. यात श्रीगणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, गणपतीचे आध्यात्मिक महत्त्व, गणेशपूजा, आरती, स्तोत्र, दुर्वा आणि मोदक गणपतीला प्रिय का, अष्टविनायक आणि खास गणेश भेटकार्डे देण्यात आली आहेत.www.indianheritage.org या संकेतस्थळावर गणपतीची विविध छायाचित्रे पाहायला मिळतात. तर http://shrigajanan.tripod.com या संकेतस्थळावर अष्टविनायक दर्शन, गणपतीची आरती, स्तोत्र, गणपतीची छायाचित्रे आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील प्रसिद्ध गणेश मंदिरांची माहिती पाहायला मिळते. www.ganapati.club.fr यावर गणपतीविषयक प्रश्नोत्तरे देण्यात आली आहेत. http://www.khapre.in या संकेतस्थळावर गणपती आरती संग्रह देण्यात आला आहे. गणपतीच्या पारंपरिक आरतीसह अन्य विविध आरत्या येथे वाचायला मिळतात. www.ganapati.club.fr/anglais/tslesganesheng.’ यावर भारतातील विविध राज्ये आणि परदेशातील काही प्रसिद्ध गणपती स्थानांची माहिती मिळू शकते.जागेअभावी काही संकेतस्थळांचाच उल्लेख केला आहे. गणपती हे दैवत विश्वव्यापी असून त्याची सर्व माहिती केवळ एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. इंटरनेटवरील गणपतीच्या माहितीचा हा खजिना म्हणजे त्याची वेगळ्या प्रकारे केलेली स्तुतीच आहे. (समाप्त)शेखर जोशी ------------------------------------------------------------------------------------------------- गणेशस्तुती : श्री गणपती अथर्वशीर्ष गणपतीची विविध स्तोत्रे, आरती आणि गणेश स्तुती असलेल्या साहित्यामध्ये संस्कृतमधील ‘श्री गणपती अथर्वशीर्ष’या स्तोत्राला विशेष महत्त्व आहे. ‘अथर्वशीर्ष’ हे उपनिषद आहे. गणेशोत्सवाच्या काळात दररोज व संकष्टी-विनायकी-अंगारकी चतुर्थीच्या दिवशी अनेक जण ‘अथर्वशीर्षा’ची आवर्तने करतात. तर काही जण दररोज गणेशाची आराधना म्हणून किमान एकदा तरी ‘श्री गणपती अथर्वशीर्षा’चे पठण करतात. ‘गणपती अथर्वशीर्षा’ची वैयक्तिक किंवा सामूहिक आवर्तने केली जातात. पुण्यामध्ये दगडुशेट हलवाई गणपतीसमोर हजारो महिला दरवर्षी ‘गणपती अथर्वशीर्षा’ची आवर्तने विशिष्ट दिवशी करीत आहेत.भारतीय संस्कृतीतील विविध पुराणे आणि अन्य प्रश्नचीन ग्रंथांमधूनही विविध ऋचा, ओव्या, श्लोक यांच्या माध्यमातून गणेशाची स्तुती केलेली आहे. गणेशभक्तांमध्ये प्रसिद्ध असलेले आणि नेहमी म्हटले जाणारे ‘गणपती अथर्वशीर्ष’ हे गणकऋषींनी सांगितले असून ते मूळचे अथर्ववेदातील आहे. ‘अथर्वशीर्ष’ याची फोड ‘अ’ अधिक थर्व अधिक शीर्ष अशी केली जाते. ‘अ’ म्हणजे अभाव, ‘थर्व’ म्हणजे चंचल आणि ‘शीर्ष’ म्हणजे डोके. चंचलपणाचा अभाव असणारे डोके, किंवा शांत डोके असा या शब्दाचा साधा अर्थ. डोके शांत ठेवण्याची विद्या यात सांगण्यात आली आहे. म्हणूनच असे म्हणतात की चंचल वृत्ती असलेल्यांसाठी ‘गणपती अथर्वशीर्ष’ हे एक वरदान आहे. विद्यार्थ्यांसाठी डोके शांत ठेवण्याकरिता याचे पठण नक्कीच लाभदायक ठरते.‘अथर्वशीर्ष’ हे एकूण दहा भागांमध्ये असून पहिल्या सहा भागांमध्ये गणपतीच्या निर्गुण रुपाचे वर्णन सांगण्यात आले आहे. सातव्या भागामध्ये गणेश विद्या तर आठव्या भागात गणपतीची गायत्री सांगण्यात आली आहे. नवव्या भागात गणेशाच्या ध्यानासाठी सगुण स्वरुपाचे वर्णन असून दहाव्या भागात गणपतीला वंदन केले आहे. तर त्यापुढे ‘अथर्वशीर्ष’ पठणाची फलश्रुती देण्यात आली आहे. ‘गणपती अथर्वशीर्षा’चे पठण करताना ‘ओम नमस्ते गणपतये’ येथून सुरुवात करून ‘नमो व्रातपतये नमो गणपतये नम: प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नम:’ इथपर्यंत म्हणण्याची पद्धत आहे. हे एकदा म्हटले की ‘अथर्वशीर्षा’चे एक आवर्तन पूर्ण होते. आपल्याला जेवढय़ा संख्येत आवर्तने करायची आहेत ती करून झाल्यानंतर शेवटी फक्त एकदाच ‘एतदर्वशीर्षम’पासून पुढील फलश्रुती म्हणायची असते. भारतीय संस्कृतीत देव-देवतांना विविध स्तोत्रे, मंत्र म्हणून अभिषेक करण्याची पद्धत आहे. ‘गणपती अथर्वशीर्ष’ म्हणून गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करण्याची पद्धत असून अभिषेकासाठी गणेशभक्तांमध्ये ‘अथर्वशीर्ष’ अधिक आवडीचे आहे. शेखर जोशी ------------------------------------------------------------------------------------------------- गणेशस्तुती: गाण्यांमधील गणेश! श्रीगणेश हे सर्वव्यापी दैवत असून पौराणिक, ऐतिहासिक काळाप्रमाणे आजच्या काळातही गणेशावर केलेले काव्य मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. हे काव्य कधी चित्रपट गाण्यांमधून तर कधी गणपतीवर तयार केलेल्या खास गाण्यांमधून दिसून येते. यापैकी काही गाणी गेली अनेक वर्षे आपल्या ओठांवर असून इतक्या वर्षांनंतरही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घराघरांमधून ती ऐकायला मिळतात. ही गाणी आजही लोकप्रिय असून त्याचे श्रेय, त्या गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायक या सर्वाचेच आहे. कॅसेट्स आणि सीडीच्या दुकानांमधून आणि रस्त्यांवरील सीडी विक्रेत्यांकडे गणपतीवरील गाणी ऐकू येऊ लागली की गणेशोत्सव जवळ आला असल्याची खात्री पटते. सर्व वातावरण गणेशमय झालेले असते. लता मंगेशकर यांनी गायलेली गणपतीची ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ ही पारंपरिक आरती आजही सर्वत्र अग्रक्रमाने ऐकायला मिळते. समर्थ रामदास स्वामी यांच्या या पारंपरिक आरतीची वेगळी चाल आणि निर्माण होणारे मांगल्य भाविकांना एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जाते.‘अष्टविनायक’ या चित्रपटातील ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’, ‘प्रथम तुला वंदितो’ ही गाणी इतक्या वर्षांनंतरही रसिकांच्या ओठावर आहेत. उषा मंगेशकर यांनी गायलेली ‘रचिल्या ऋषीमुनींनी ऋच्या तुझ्या अनंत’, ‘रांजणगावाला गावाला, गावाला, महागणपती पावला’ आणि अन्य गाणीही प्रसिद्ध आहेत. याबरोबरच तुझ्या कांतीसम रक्तपताका,ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था, ओंकार प्रधान रुप गणेशाचे, गणराज रंगी नाचतो, गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया, तु सुखकर्ता, तु दु:खहर्ता, विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया, अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्यांची ग, आदी गाणीही पटकन आठवतात. मराठीमधील बहुतांश गायक-गायिकांनी एखादे तरी गणपतीवरील गाणे म्हटलेले आहे. पण हिंदीतील शंकर महादेवन यांनीही ‘सिद्धिविनायक महिमा’ या चित्रपटात ‘नारद मुनी सुर देऊनी, ताल देई तुंबर हो’ हे गणपतीवरील गाणे म्हटले आहे. नाटय़संगीत किंवा शास्त्रीय संगीतगाणारे म्हणून प्रसिद्ध असलेले गायक छोटा गंधर्व, रामदास कामत यांनीही गणपतीवरील काही गाणी गायली आहेत. छोटा गंधर्व यांनी म्हटलेली ‘गणराजाला करु मुजरा’ आणि ‘शुभ मंगल क्षणी गण नाचला, नाचला कसा तरी पाहू चला’ तर रामदास कामत यांनी गायलेली ‘हे शिवशंकर गिरीजातनया गणनायका प्रभुवरा’ व ‘हे गणनायका सिद्धी विनायक वंदन पहिले तुला गणेशा’ ही गाणीही अधूमधून आकाशवाणीवर लागत असतात. प्रल्हाद शिंदे यांनी म्हटलेले ‘बाप्पा मोरया रे, अवघ्या दीनांच्या राजा’ हे गाणेही खूप लोकप्रिय आहे. काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या काळात ‘अशी चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्यांची’ हे गाणे खूप लोकप्रिय होते. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रत्येक मंडपात आणि गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या वेळी ते हमखास वाजवले जात होते आणि आजही वाजवले जाते.गणपतीवरील गाण्यांचा हा धावता आढावा असून काही गाण्यांचा उल्लेख अनवधनाने राहूनही गेला असेल. कलेचा अधिपती असलेल्या गणपतीवर यापूर्वीही गाणी तयार झाली आणि पुढेही होत राहतील हे नक्की. ------------------------------------------------------------------------------------------------- गणेशस्तुती : भूपाळीतील गणेशस्तुती आरत्या, विविध स्तोत्रे याबरोबरच भूपाळी या काव्यप्रकारातूनही कवींनी गणेशस्तुती केलेली आहे. खूप पूर्वीपासूनच देवाला उद्देशून प्रश्नत:काळी काही स्तोत्रे म्हणण्याचा प्रघात होता. पहाटे पूजा केल्यानंतर केली जाणारी काकड आरती माहिती आहेच. आपल्याकडे गणपतीच्या आरत्या, स्तोत्रे जशी प्रसिद्ध आहेत तशाच काही भूपाळ्याही प्रसिद्ध आहेत. होनाजी बाळा यांनी रचलेली ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ ही भूपाळी खूप गाजली. श्रीकृष्ण, श्रीराम, गणपती आदी देवतांवर विविध कवी, संत यांनी भूपाळ्या रचलेल्या आहेत.गिरिधर नावाच्या गणेशभक्ताने ‘उठा उठा सकळ जन’ ही भूपाळी लिहिली आहे. या भूपाळीचे वैशिष्टय़ म्हणजे ही गणपतीची भूपाळी असून ती गणपतीला उद्देशून लिहिलेली नाही तर ती सर्वसामान्य लोकांना उद्देशून लिहिलेली आहे. उठा उठा सकळ जन वाचे स्मरा गजाननगौरी हाच नंदन गजवदन गणपतीध्यानी आणुनी सुखमू स्तवन करा एकचित्तीतो देईल ज्ञानमू मोक्ष सुख सोज्वळगिरिधर म्हणतात की, गणपतीच्या सुखदायक मू चे ध्यान करा आणि एकचित्ताने त्याचे स्तवन करा. त्याचे गुणगान गा. मग तो ज्ञानाची मू असलेला गणेश तुम्हाला सोज्वळ शुद्ध मोक्षही देईल. पुढच्या कडव्यात गिरिधर सांगतात की, जो निजभक्तांचा दाता वंद्य सुरवरा समस्तात्यासी ध्याता भव भय चिंता विघ्न वार्ता निमाहीहा गणेश आपल्या भक्तांना जे हवे ते देणारा आहे. तो कोणालाही दूर करत नाही. हा गणेश देवांनाही पूज्य आहे. त्याचे चिंतन केले असता सर्व प्रकारची विघ्ने आणि चिंता दूर होतात. भूपाळीच्या अखेरीस त्यांनी तो हा सुखाचा सागर श्री गणराय मोरेश्वरभावे विनवितो गिरिधर भक्त त्याचा होऊनीअशी त्याची प्रश्नर्थना केली आहे.रामानंद यांनी रचलेली ‘उठा उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख’ ही भूपाळीही प्रसिद्ध आहे. भूपाळी या काव्य प्रकाराबरोबरच कवी श्रीधर, मुक्तेश्वर यांनीही गणेशाला वंदन केले आहे. कवी श्रीधर यांनी ‘कमलोद्भव वैकुंठ कर्पूरगौर अंबिका गजवदन दिनकर ही स्वरुपे तुझी साचार तू विर्विकार सर्वदामंगलकारक तू गजवदन मंगलारंभी तुझेच नमन मंगल जननीवरी करिता लेखनतुझे गुण न सरती’तर कवी मुक्तेश्वर यांनीआता बालार्क बीज कंदीस्कंधी बिरुढला हस्तपादीसगुण सुरंगाचा उद्धी गजानन नमियेला अशा शब्दांत त्याची प्रश्नर्थना केली आहे. शेखर जोशी ------------------------------------------------------------------------------------------------- गणेशस्तुती : सुखकर्ता दु:खहर्ता गणेशोत्सव किंवा अन्य कोणत्याही धार्मिक कार्यानिमित्त आपण पूजा झाल्यानंतर आरती करतो, तेव्हा पहिली आरती अर्थातच गणपतीची आणि तीसुद्धा ‘सुखकर्ता दु:खहर्ता’हीच असते. ही आरती मराठी भाषेतील असून साधी व सोपी शब्दरचना हे या आरतीचे वैशिष्टय़ आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी ही आरती रचली आहे.गेली अनेक वर्षे घराघरांमधून ती मनोभावे म्हटली जात आहे. आरती म्हणजे देवांची केलेली स्तुती. आपल्याकडे विविध देव देवतांच्या आरत्या प्रसिद्ध आहेत. गणेशोत्सवाच्या काळात तर घराघरांमधून विविध आरत्यांचे पठण होत असते. गणपती या देवतेच्याही अनेक आरत्या असून त्यात रामदास स्वामी यांनी रचलेली ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ तसेच मोरया गोसावी यांनी रचलेली ‘नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमीपत्रे’, ‘शेंदुर लाल चढाओ अच्छा गजमुख को’ आदी आरत्या आपल्या माहितीच्या आहेत. लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘सुखकर्ता’ ही आरती अजरामर झाली आहे.समर्थ रामदास स्वामी हे रामभक्त होते. ते एकदा पंढरपूर येथे गेले असता त्यांना विठ्ठलाच्या जागी श्रीराम दिसला. त्यांनी रामस्वरुपात दिसणाऱ्या विठ्ठलाला उद्देशून येथे का रे उभा श्रीरामा मनमोहन मेघश्यामाकाय केले धनुष्यबाण कर कटेवर ठेवूनकाय केली सीतामाई येथे राही रखुमाईकाय केले वानरदळ येथे मेळविले गोपाळकाय केली अयोध्यापुरी येथे वसविली पंढरपुरीकाय केली शरयूगंगा येथे आणली चंद्रभागारामदासी जैसा भाव तैसा झाला पंढरीराव असा प्रश्न केला होता. असे म्हटले जाते की समर्थ रामदास स्वामी कोणत्याही देवाच्या देवळात दर्शनासाठी गेले की त्यांना त्या देवाच्या जागी श्रीरामाचेच दर्शन होत असे. मात्र एकदा ते गणपतीचे आद्यस्थान असलेल्या मोरगावात गेले असता तेथे त्यांना गणपतीच्या जागी श्रीराम न दिसता गणपतीच दिसला. त्या ठिकाणी समर्थानी गणपतीची स्तुती करणारी ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वागी सुंदर उटी शेंदुराची, कंढी झळके माळ मुक्ताफळांची’ ही आरती रचली, अशी आख्यायिका आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेली ही आरती महाराष्ट्रात आबालवृद्धांना तोंडपाठ आहे. या आरतीत रामदास स्वामी यांनी गणेशाची स्तुती केली आहे. अवघ्या दोन कडव्यांच्या या आरतीचे वैशिष्टय़ म्हणजे नेहमी हातात शस्त्रे असलेला गणपती रामदास स्वामी यांना शस्त्रास्त्रे धारण न केलेला आणि दागिन्यांनी नटलेला दिसला. त्याने चंदन आणि शेंदूराची उटी लावलेली असून गळ्यात मोत्याची माळ व डोक्यावर हिरेजडीत मुकुट आहे. पायात रुणझुणती नुपुरे असून त्याने पितांबर नेसला असल्याचे वर्णन समर्थ करतात. केवळ दर्शनाने भक्तांच्या मनोकामना पूरवणारा, भक्तांचे त्रिविध ताप हरण करणारा, विघ्न निवारणारा, असाही गुणगौरव समर्थानी या आरतीत केला आहे.आरतीच्या शेवटी दास रामाचा वाट पाहे सदनासंकटी पावावे, निर्वाणी रक्षावेअशा शब्दांत गणपतीची प्रश्नर्थना केली आहे. (संदर्भ- ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांचे ‘दुर्वाक्षरांची जुडी’ हे पुस्तक) शेखर जोशी ------------------------------------------------------------------------------------------------- गणेशस्तुती : शाहिरांनी केलेली गणेशस्तुती ‘शाहीर’ म्हटले की आपल्याला त्यांनी रचलेले पोवाडे किंवा लावण्या आठवतात. स्वातंत्र्यपूर्व काळात शाहिरांच्या या पोवाडय़ांनी, कवनांनी प्रत्येक नागरिकामध्ये देशप्रेम आणि वीरश्री निर्माण करण्याचे मोठे काम केले होते. पोवाडे, लावण्या लिहिणाऱ्या शाहीरांनी गणपतीचीही स्तुती केली आहे. गणपतीला चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती मानले जाते. गणपती हा प्रत्येकाला आपला जवळचा देव वाटतो. त्यामुळे रंगमंचावर ‘पयलं नमन, आम्ही करितो वंदन, तुम्ही ऐका हो द्विजन’ असे किंवा ‘गणपती आला अन् नाचून गेला’ असे सांगत गणपती रंगमंचावर नृत्य करतानाही आपण पाहिला आहे. अनेक शाहीरांनी आपल्या रचनांमधून गणेशस्तुती केली आहे. शाहीर रामजोशी यांनी महाराज गौरीनंदनाअमरवंदना दैत्यकंदना हे मंगलमूर्त ठेवी कृपादृष्टीएकदंत दिनावर पूर्तीअसे म्हटले आहे. रामजोशी यांनी गणपतीला गौरीनंदन म्हणजे पार्वतीचा पुत्र, दुष्टांचा, दुर्जनांचा आणि राक्षसांचा नाश करणारा असा दैत्यकंदन असे संबोधून हे गणराया तुझी कृपादृष्टी आमच्यावर ठेव अशी विनंतीही केली आहे.तर शाहीर प्रभाकर यांनीगौरीसुता सभे लंबोदरा येसिंदूर मर्दन विघ्नहरा येमती दे गजानना परशुधरा येगीत प्रसंगी रे करी आज सिद्धी गातोआधी तुला विघ्नहरा येअशा शब्दांत गणपतीची स्तुती केली आहे.शाहीर होनाजी बाळा यांनीही गजवदन बहुत गोजिरे मस्तकी बरे दुर्वाकुर तुरेसमीची पत्रे ती चार आयुधे चतुष्करी चित्रविचित्रेमूषकध्वज, लंबोदरा, सिदूरध्यान, सुंदर जे जपती मंत्रेअसे सांगून भजियेला एकदंत सिद्धविनायक तो सुखदायक हे गुणनायक हृदयी धरतीअशी त्याची स्तुती केली आहे.मराठी साहित्यातही काव्य, ओवी, भजन, भुपाळी अशा विविध शैलीत गणेशाची स्तुती करण्यात आली आहे. गोसावीसुत वासुदेव कवी यांनी रचलेली गणपतीची प्रश्नर्थना सगळ्यांना माहिती आहे.प्रश्नरंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोनी मती दे आराध्य मोरेश्वराचिंता, क्लेश, दारिद्रय़, दु:ख अवघे देशांतरा पाठवी हेरंबाल गणनायका गजमुखा भक्ता बहू तोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरेमाथा शेंदूर पाझरे वरी बरे दुर्वाकुराचे तुरेमाझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरेगोसावीसुत वासुदेव कवी रे त्या मोरयाला स्मरेया रचनेचे वैशिष्टय़ यातील शब्दरचना साधी व सोपी आणि कोणालाही सहज समजेल, अशी आहे. अनेक शाळांमध्ये किंवा धार्मिक कार्यात ही रचना प्रश्नर्थना म्हणून म्हटली जाते. शेखर जोशी ------------------------------------------------------------------------------------------------- गणेशस्तुती : ज्ञानेश्वरीतील गणेश वंदन श्रीगणेशाच्या आराधनेमुळे कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीत कोणत्याही कार्याच्या प्रश्नरंभी गणेश वंदन व गणेश पूजन करण्याची परंपरा आहे. संत वाङ्मयातही अनेक संतांनी गणेशस्तुती केली आहे. संत ज्ञानेश्वरांनीही आपल्या ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातच श्री गणेशाला ‘ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरुपा’ अशा शब्दात वंदन केले आहे. ओंकार हाच परमात्मा असून तोच सर्वाचे मूळ आहे. तोच वेदांचेही मूळ असून वेदांनी याचेच प्रतिपादन केले आहे. हा स्वत:च स्वत:ला जाणून घेतो. अशा आत्मरुपी गणेशाला ज्ञानेश्वरांनी मनोभावे नमस्कार केला आहे.पुढे ज्ञानेश्वरांनी, ‘देवा तूचि गणेशु, सकलमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु, अवधारिजो’ असे म्हटले आहे. सर्वाच्या बुद्धीचा प्रकाश असलेला श्रीगणेश म्हणजे तूच आहेस, असे त्यांनी सांगितले आहे. पहिल्या अध्यायाच्या एकूण वीस ओव्यांमध्ये गणेशाचेच वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे. पहिल्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वरांनी ‘अकार चरणयुगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल, मस्तकाकारे’ आणि ‘हे तिन्ही एकवटले, तेथे शब्दब्रह्म कवळले , ते मिया गुरुकृपा नमिले, आदिबीज’ असे सांगून पहिल्या अध्यायाची सांगता केली आहे. या ओंकाररुपी गणपतीचे ‘अ’कार हे दोन पाय, ‘उ’कार हे त्याचे लंबोदर असे विशाल पोट आणि ‘मकार’ म्हणजे मोठय़ा डोक्याचा आकार असे वर्णन ज्ञानेश्वरांनी पहिल्या अध्यायात केले आहे.ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायातही त्यांनी सुरुवातीला गणेशाची ‘आत्मरुप गणेश’ अशा शब्दात स्तुती केली आहे. ते म्हणतात ‘आत्मरुप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेचि वंदू श्रीचरणी, श्री गुरुचे’. सर्व विद्यांचे आश्रयस्थान जे आत्मरुप गणेशाचे स्मरण तेच श्रीगुरुंचे चरण आहेत. ज्ञानेश्वरांनी त्यास मनोभावे वंदन केले आहे. सतराव्या अध्यायाच्या सुरुवातीलाही ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांचे श्रीगणेशाच्या रुपात वंदन केले आहे. त्रिपुरासुराचा वध करुन देवांना मुक्त करण्याच्या वेळी भगवान शंकरांना गणेशाची स्तुती करावी लागली तो प्रसंग, लढाई आणि संघर्ष करावा लागला त्याविषयी सतराव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी ‘म्हणोनी शिवेंसी कांटाळा, गुरुत्वे तूचि आगळा, तह्री हळु मायाजळा, माजी तारुनी’ अशी ओवी रचली आहे. सत्व, रज आणि तमरुपी शहरांनी वेढलेला आणि जीव भावरुपी किल्ल्यात अडकलेला जो आपला आत्मा तो शिवाने गुरु रुपी गणेशाचे स्मरण करुन सोडवला, असे ज्ञानेश्वर सांगतात. (संदर्भ-डॉ. मधुकर मोकाशी लिखित ‘आस्वादक ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ) शेखर जोशी

4 comments:

 1. Welcome back....Ganesh Stuti ne suruvat tar changli zalai....

  ReplyDelete
 2. हो, कालपासूनच पुन्हा सुरु केला आहे. पूर्वीसारखे दररोज लिहायचे म्हणतोय. पहिली प्रतिक्रिया तुझी कळाली, छान.
  शेखर

  ReplyDelete
 3. सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.

  समर्थे सुंदरमठी गणपती केला !
  दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !!
  सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला !
  भाद्रपद माघ पर्यंत !!
  समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले.दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर  अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर  संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती.
  या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो.
  वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची !
  हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!४ ते माघ शु.!! ५ गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे.
  या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली १२१ खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली . त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो .
  समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !!
  आकारा आकरी खंडी कोठी पाठविली !
  हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया!!
  ११ x ११ म्हणजे १२१ एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे.पहा.....
  दास रामाचा वाट पाहे सदना !
  संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !!
  शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी १८ वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र महराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला.गणपतीची आरती १६५८ ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन १६७४ पर्यंत थांबले, नंतर १६७५ ला गणेशोत्सव केला आणि १६ सप्टेंबर १६७६ ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला.
  आज महाराष्ट्रात प्राचीन सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे पुरावे सापडतात ते हया उत्सवानंतरचे आहेत. हा उत्सव सुंदरमठ रामदास पठारावर पुन्हा नव्याने पाच दिवसाचा सुरू झाला असून या उत्सवातून प्रेरणा घेऊन श्री क्षेत्र शेंदूरमळई हे गुरुकुल येथेही हा उत्सव सुरू झाला आहे. आपण आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवात ही माहिती जरूर पुरवावी.वरील संशोधन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी केले असून हया माहितीचे सर्व अधिकार राखीव आहेत. या माहितीचा संबंध कोणत्याही जात, धर्म ,पंथ ,सांप्रदाय ,पक्ष ,संघटना यांच्याशी नाही.
  रामदास पठार - सुंदरमठावर येण्याकरीता महाड-पुणे रस्त्यावर वरंधाघाटात माझेरी जवळ कमानी खालून डाव्या हाताने सरळ पुढे कि.मी. मठाच्या माळावर शेवट पर्यंत डांबरी रस्त्याने यावे.निवास, भोजन व्यवस्था पूर्व सूचना दिल्यास विनामूल्य होऊ शकते.

  ReplyDelete
 4. सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.

  समर्थे सुंदरमठी गणपती केला !
  दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !!
  सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला !
  भाद्रपद माघ पर्यंत !!
  समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले.दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर  अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर  संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती.
  या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो.
  वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची !
  हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!४ ते माघ शु.!! ५ गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे.
  या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली १२१ खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली . त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो .
  समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !!
  आकारा आकरी खंडी कोठी पाठविली !
  हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया!!
  ११ x ११ म्हणजे १२१ एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे.पहा.....
  दास रामाचा वाट पाहे सदना !
  संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !!
  शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी १८ वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र महराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला.गणपतीची आरती १६५८ ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन १६७४ पर्यंत थांबले, नंतर १६७५ ला गणेशोत्सव केला आणि १६ सप्टेंबर १६७६ ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला.
  आज महाराष्ट्रात प्राचीन सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे पुरावे सापडतात ते हया उत्सवानंतरचे आहेत. हा उत्सव सुंदरमठ रामदास पठारावर पुन्हा नव्याने पाच दिवसाचा सुरू झाला असून या उत्सवातून प्रेरणा घेऊन श्री क्षेत्र शेंदूरमळई हे गुरुकुल येथेही हा उत्सव सुरू झाला आहे. आपण आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवात ही माहिती जरूर पुरवावी.वरील संशोधन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी केले असून हया माहितीचे सर्व अधिकार राखीव आहेत. या माहितीचा संबंध कोणत्याही जात, धर्म ,पंथ ,सांप्रदाय ,पक्ष ,संघटना यांच्याशी नाही.
  रामदास पठार - सुंदरमठावर येण्याकरीता महाड-पुणे रस्त्यावर वरंधाघाटात माझेरी जवळ कमानी खालून डाव्या हाताने सरळ पुढे कि.मी. मठाच्या माळावर शेवट पर्यंत डांबरी रस्त्याने यावे.निवास, भोजन व्यवस्था पूर्व सूचना दिल्यास विनामूल्य होऊ शकते.

  ReplyDelete