03 September 2009

गणेशस्तुती

लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये मी २५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २००९ या कालावधीत गणेशस्तुती हा स्तंभ चालवला होता. त्यातील सर्व लेख येथे दोन भागात एकत्रित देत आहे. गणेशस्तुती : श्री गणपती स्तोत्र शाळेमध्ये जायला लागल्यानंतर किंवा हातात पाटी-पेन्सील आल्यानंतर सर्वप्रथम लहान मुले ‘श्री’ हे अक्षरकाढतात आणि त्याच्या पाटीवरही पहिल्यांदा ‘श्री गणेशाय नम:’ असेच लिहिले जाते. कोणत्याही कार्याला सुरुवात करायची असेल तर त्याचा ‘श्रीगणेशा’ करु असे म्हटले जाते. सदैव ‘नारायण नारायण’ असा जप करणाऱ्या आणि स्वर्ग, पातळ व पृथ्वी या तीनही स्थळी संपर्क असणाऱ्या श्री नारदमुनी यांनीही गणेशाची स्तुती केली आहे.नारदमुनी यांनी रचलेले ‘श्री गणपती स्तोत्र’ प्रसिद्ध आहे. घराघरांमध्ये हे गणपती स्तोत्र म्हटले जाते. अनेक शाळांमध्ये हल्ली परिपाठ असतो. त्यात या स्तोत्राचाही समावेश आहे. हे स्तोत्र संकटनाशक स्तोत्र म्हणून ओळखले जाते. या स्तोत्राच्या पठणाने गणपतीचा आशीर्वाद आणि कृपादृष्टी त्याच्या भक्तांवर होते, असा भाविकांचा विश्वास आहे. हे स्तोत्र संस्कृतमध्ये असले तरी म्हणायला आणि पाठ करायला अत्यंत सोपे आहे. लहान मुले आणि विद्यार्थ्यांना लहानपणीच याची संथा दिली जाते. या स्तोत्राचे एक वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये गणपतीची विविध नावे एकत्र गुंफण्यात आली आहेत.श्री नारदमुनी यांनी रचलेल्या या स्तोत्रात गणपतीची बारा नावे देण्यात आली आहेत. स्तोत्राची सुरुवात ‘श्री गणेशाय नम:, नारद उवाच’ असे म्हणून करण्यात येते. गणपती हा पार्वतीचा मुलगा आहे. त्यामुळे त्याला ‘गौरीपुत्र विनायक’ अशा नावांनी या स्तोत्रात संबोधण्यात आले आहे. अशा या गणपतीचे सदैव स्मरण केले, त्याची उपासना केली तर तो त्याच्या उपासकांवर आणि भक्तांवर सदैव कृपा करतो, असे यात नारदमुनींनी म्हटले आहे. नारदमुनी यांनी पुढे या स्तोत्रात वक्रतुंड, एकदंत, कृष्णिपगाक्ष, गजवक्त्रं, लंबोदर, विकटमेव, विघ्नराजेंद्र, धूम्रवर्ण, भालचंद्र, गजाजन अशा विविध नावांनी गणेशाला संबोधले आहे. नंतरच्या कडव्यांमध्ये नारदमुनी यांनी हे गणपती स्तोत्र दररोज म्हटले तर त्याची काय फलश्रुती मिळेल, ते सांगितले आहे. तर याचा शेवट ‘इति श्री नारदपुराणे संकटनाशनस्तोत्रम् संपूर्णम्’ अशा शब्दात केला आहे. संस्कृतमधील या स्तोत्रपठणामुळे त्यात सांगितलेल्या फलश्रुतीचा खरोखर लाभ होतो की नाही हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे. मात्र विविध संस्कृत श्लोक आणि स्तोत्रांच्या नियमित पठणामुळे शब्दोच्चार स्वच्छ, सुस्पष्ट आणि शुद्ध होण्यास नक्कीच मदत होते हे जाणकार आणि तज्ज्ञही मान्य करतात. शेखर जोशी ------------------------------------------------------------------------------------------------- गणेशस्तुती : श्रीगणेशाची उपासना चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या श्रीगणेशाचा उत्सव रविवारपासून सुरू झाला. गेल्या हजारो वर्षापासून आपल्याकडे श्रीगणेशाची उपासना सुरू आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्येही गणपती उपासना आणि गणपती ही देवता वेगवेळ्या रुपात पाहायला मिळते. वेद हे भारतातीलच नव्हे तर जगातीलही सर्वात प्रश्नचीन वाङ्मय मानले जाते. त्या वेदांमध्येही श्रीगणेशाची ओंकार स्वरुप म्हणून स्तुती केलेली आहे. विविध पुराणांमधूनही गणेशाची उपासना, पूजा सांगितली आहे.आपल्याकडे नेहमी म्हटली जाणारी आणि सगळ्यांना पाठ असणारी गणपतीची ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनीच रचलेली आहे. संत ज्ञानेश्वर यांच्यापासून त्यांचे सर्व समकालीन संत, सर्व पंडीत कवी आणि शाहीरानीही आपल्या साहित्यातून, काव्यातून श्रीगणेश स्तुती केली आहे. श्रीगणेश हा संत साहित्यात ज्ञान आणि भक्तीचा समन्वय मानला गेला आहे. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’मध्ये सुरुवातीलाच ‘ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जयजय स्वसंवेद्या आत्मरुपा, देवा तूचि गणेशु, सकलार्थ मति प्रकाशु’ असे गणपतीचे वर्णन केले आहे. रामदास स्वामी यांनी आपल्या ‘मनाच्या श्लोकां’मध्येही गणपतीचे वर्णन ‘गणाधीश जो ईश सर्व गुणांचा’ असे केले आहे. पौराणिक काळात स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी अशा तीनही लोकांत संचार करणाऱ्या नारदमुनी यांनीही गणेशाची स्तुती आपल्या स्तोत्रांमधून केली आहे. नारदमुनी यांनी रचलेले ‘प्रणम्य शिरसा देवमं’ हे स्तोत्र प्रसिद्ध आहे. केवळ पौराणिक काळातच नव्हे तर स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात विविध शाहीरांनी जी कवने किंवा पोवाडे रचले त्यातही गणेशाची स्तुती केलेली आहे. दशावतारी नाटके किंवा गण, गौळण, वग, तमाशा यातूनही गणेश गुणवर्णन करण्यात आले आहे. ‘पयलं नमन, आम्ही करितो वंदन, तुम्ही ऐका हो द्वीजन’ या गाण्यात तर चक्क गणपतीच रंगमंचावर नाचताना दाखवला आहे. गेल्या काही वर्षात चित्रपट गीते आणि खास गणपतीवरील गाण्यांमधूनही गणेश स्तुती केलेली दिसून येते. शांता शेळके यांनी लिहिलेली आणि लता मंगेशकर यांनी गायलेली गणपतीची गाणी प्रसिद्ध आहेतच. ज्येष्ठ कवी व गीतकार जगदीश खेबुडकर यांनीही गणपतीची गाणी रचली असून त्यांचे ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे गाणे प्रसिद्ध आहे. शांताराम नांदगावकर, प्रश्न. प्रवीण दवणे यांच्यासह अनेक गीतकार व कवींनी गणपतीवर गाणी लिहिली आहेत. गणपतीवर आजवर अनेक मान्यवर आणि अभ्यासकांनी लेखन केले आहे.त्यापैकी काहीच आपल्याला माहिती आहे. माहिती नसलेले सुद्धा साहित्य मोठय़ा प्रमाणात आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्तोत्र, अभंग, आरती तसेच अन्य साहित्यातील गणेशवर्णन आणि गणेशस्तुतीचे केलेले हे संकलन व घेतलेला थोडक्यात आढावा. शेखर जोशी

No comments:

Post a Comment