16 May 2012

मंडळी सध्या उन्हाळा सुरू असून उकाड्याच्या काहिलीने आणि वैशाख वणव्याने अंग भाजून निघत आहे. मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे त्यांचाही धुडगूस सुरू आहे. एवढी प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे या दिवसात आणखी एका गोष्टीला खूप महत्व असते. वसंतपेय म्हणून ओळखले जाणारे कैरीचे पन्हे हे असतेच. पण त्याजोडीला आणखीही काही खास असते. सुरुवातीला ही गोष्ट सर्वसामान्यांच्या  आवाक्याबाहेरची असते. पण जसजसे दिवस सरतात, तसतशी ती आवाक्यात येऊ लागते. उन्हाळा आणि ही वस्तू खाल्ली नाही, असे होऊच शकत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने जसा जमेल तसा त्याचा आस्वाद घेतच असतो. त्याचे विविध प्रकारही आपण चाखत असतो. काय लक्षात येतय का,  अगदी बरोब्बर. आंबा
उन्हाळा आणि आंबा हे जणू समीकरणच आहे. आंब्याचा रस अर्थात आमरस हा या दिवसात रोजच्या जेवणातील अविभाज्य भाग बनलेला असतो. आमरसाबरोबरच पन्हे, कैरीचे लोणचे, आंबापोळी, आंबावडी, मॅंगोपल्प, आम्रखंड, मॅंगो मिल्कशेक, आंबा आईस्क्रिम, कॅण्डी अशा विविध प्रकारे आपण या आंब्याचा आस्वाद घेत असतो.
हे आंबापुराण एवढ्यावरच थांबत नाही तर तो मराठीतील काही गाण्यांचाही एक भाग झालेला आहे. मराठीतील अनेक गाण्यांमध्येही आंब्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यात अगदी सहज ओठावर येणारे गाणे म्हणजे
नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच
सबकुछ पुल असलेल्या देवबाप्पा या चित्रपटातील हे गाणे ग. दि. माडगूळकर यांचे असून त्याचे संगीत पुलंचेच आहे. आशा भोसले यांच्या आवाजातील या गाण्याची लोकप्रियता आज इतक्या वर्षांनंतरही कमी झालेली नाही. मराठी वाद्यवृंदातून आजही हे गाणे हमखास म्हटले जाते आणि या गाण्याला वन्समोअरही घेतला जातो. गाण्याचे सहजसोपे शब्द आणि मनात गुंजणारे संगीत यामुळे हे गाणे अजरामर झाले आहे.
गीतकार शांताराम आठवले यांनी शेजारी या चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गाण्यातही आंबा हा शब्द आलेला आहे.
हासत वसंत ये वनी अलबेला हा
प्रियकर पसंत हा मनी, धरणीला हा
या गाण्याच्या पुढील कडव्यात
घनवनराई बहरून येई,
कोमल मंजुळ कोमल गाई
आंबा पाही फुलला हा
चाफा झाला पिवळा हा
जाई जुई चमेलीला, भर आला शेवंतीला
घमघमला हा
अर्थात आता ऐकायला हे गाणे तसे दुर्मीळ आहे.
आंबा हा शब्द असलेले आणखी एक लोकप्रिय गाणे म्हणजे सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातील
पाडाला पिकलाय आंबा ही लावणी.
आला गं बाई आला गं, आला गं,
आला आला आला,आला
पाडाला पिकलाय आंबा
तुकाराम शिंदे यांचे गीत आणि संगीत असलेली ही लावणी सुलोचना चव्हाण यांनी अशा काही ठसक्यात सादर केली आहे की आजही ती रसिकांच्या ओठावर आहे. विविध वाहिन्यांवर गाण्यांच्या कार्यक्रमाचे होणारे रिअॅलिटी शो, नृत्याचे कार्यक्रम यातून हे गाणे आजही सादर झाले की वन्समोअर मिळतोच मिळतो.
लहान मुलांच्या तोंडी असलेले आणि पारंपरिक गीत असलेले
आंबा पिकतो, रस  गळतो
कोकणचा राजा झिम्मा खेळतो
या गाण्यातही आंबा हा शब्द आहे.
कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ बी  यांनी लिहिलेले, वसंत प्रभू यांचे संगीत असलेले आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील लोकप्रिय
चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी काही केल्या उमलेना
या गाण्यातही आंबा हा शब्द आहे.
गेले आंब्याच्या वनी,
म्हटली मैनेसवे गाणी
आम्ही गळ्यात गळे मिळवूनी रे
असे कवीने पुढील कडव्यात म्हटले आहे.
गीत, संगीत आणि गायक अशा भूमिकेतील संदीप खरे यांच्या
मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही
या गाण्यातही आंबा आलेला आहे.
गाण्याच्या शेवटच्या कडव्यात संदीप खरे यांनी
मज जन्म फळाचा मिळता मिळता मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही
असे म्हटले आहे.
काही वर्षांपूर्वी प्रदशिर्त झालेल्या जोगवा या चित्रपटातील संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिलेल्या
मन रानात गेलं गं, पानापानात गेलं गं
मन चिंचेच्या झाडात, आंब्याच्या पाडात गेलं गं
या गाण्यातही आंबा या शब्दाचा वापर केलेला आहे. याचे संगीत अजय-अतुल यांचे आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्यावर हे गाणे चित्रित झाले असून ते श्रेया घोषाल यांनी गायलेले आहे.
आंबा हा शब्द असलेले आणखी एक लोकप्रिय गाण्याने या आंबा पुराणाची सांगता करतो.
बालकराम वरळीकर यांनी गायलेल्या
गंगा जमना दोगी बयनी गो पानी झुलझुलू व्हाय
दर्या किनारी एक बंगला गो पानी जाई जुई जाय
या गाण्याच्या शेवटच्या कडव्यात आंब्याचा उल्लेख असून
आंब्याच्या डांगलीवर बसलाय मोर
पोरीचा  बापूस कवठं चोर
करवल्या खुडतांना आंब्याच्या डांगल्या
म्हायेरा जावा सांजवल
आंब्याची डांगली हलविली
नवऱयाने नवरीला पलविली
असे यातील शब्द आहेत
तर आंबा हा शब्द असलेली अशी ही विविध गाणी. दुधाची तहान ताकावर या उक्तीप्रमाणे आज न परवडणारा आंबा या गाण्यांच्या माध्यमातून आपल्याला चाखायला मिळतो हेही काही कमी नाही.

(माझा हा लेख लोकसत्ता डॉट कॉमवरील ब्लॉगमध्ये १५ मे २०१२ रोजी प्रसिद्ध झाला आहे)
त्याची लिंक अशी-
मंडळी सध्या उhttp://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=226847:2012-05-15-14-10-06&catid=235:2009-09-14-09-37-24&Itemid=235

5 comments:

  1. खूपच छान लेख..! आवडला.
    हापूस सिनेमाचा उल्लेख कुठेतरी हवा होता कां ?

    ReplyDelete
  2. मनोज,
    नमस्कार
    आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हापूस चित्रपटाचे नाव टाकायचे राहून गेले. आपण आवर्जून लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.

    ReplyDelete
  3. नमस्कार. तुमचे ' जोशीपुराण' नुकतेच वाचनात आले. खूप सुंदर.

    ReplyDelete