05 July 2010

कुठं कुठं जायाचं ट्रेकिंगला...

मस्त पावसळा सुरू झाला असून ट्रेकिंग आणि पावसाळी सहलीच्या पारंपरिक मंडळींबरोबरच नव्या लोकांनाही आता ट्रेकिंग आणि पावसाळी सहलीचे वेध लागले असतील. शनिवार आणि रविवार असे सुट्टीचे दिवस अनेक मंडळी एखाद्या छानशा ट्रेकला जाऊनही आली असतील. मुंबई आणि जवळच्या परिसरातील अशी काही ठिकाणे खास ट्रेकर्स आणि भटक्या मंडळींसाठी...

लोकसत्तामधील माझा सहकारी कैलास कोरडे हे अशाच ट्रेकर्स आणि भटक्या मंडळींपैकी. लोकसत्ताच्या रविवार वृत्तान्तमध्ये (१३ जून २०१०) त्याने काही दिवसांपूर्वी कुठं कुठं जायाचं ट्रेकिंगला असा लेख लिहिला होता. तो लेख येथे देत आहे.

हा लेख वाचून मुरलेल्या ट्रेकर्सना स्मृतीरंजनाचा आनंद होईल तर नव्या मंडळींना अरेच्चा आपणही एकदा पावसाळी ट्रेकला जायलाच पाहिजे, असे वाटेल. 

बाष्पयुक्त ढगांच्या पांढऱ्या पुंजक्यांची अरबी समुद्राकडून सह्यकडय़ांकडे कूच सुरू होताच ट्रेकर्स मंडळींना वेध लागतात पावसाचे..लवकरच पाऊस येईल. मृगाच्या सरींनी तृप्त झालेली धरती हिरवी शाल ओढून घेईल.. उन्हाच्या तडाख्याने तापलेले डोंगरमाथे थंडाव्यासाठी धुक्याच्या दुलईत शिरतील. नदी-सागराच्या भेटीसाठी आतूर जलधारा कडय़ांवरून स्वत:ला धबधब्यांत झोकून देतील. संपूर्ण सृष्टीमध्ये नवचैतन्याची सळसळ निर्माण होईल.. जलधारांनी एकीकडे निसर्ग तृप्त होत असतानाच चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या ट्रेकर्सना सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्या, सभोवतालचा निसर्ग, निसरडय़ा वाटा, दुथडी वाहून भरणारे नदी-ओढे खुणावू लागतात. आणि सुरू होते तयारी..पावसाळी ट्रेकची!


दरवर्षी अर्धा मे महिना उलटला ट्रेकिंग ग्रुप्सच्या मीटिंग्जना भरू लागतात. ग्रुपमधील जुनी-नवी उत्साही मंडळी या बैठकीला आवर्जून हजेरी लावतात. कॅलेंडर समोर ठेवून ट्रेकच्या तारखा ठरविल्या जातात. पण पहिला ट्रेक नेमका कधी करायचा हा सर्वात मोठा प्रश्न असतो. या बैठकीपूर्वी मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल झालेला असतो. तो केरळला कधी पोहोचणार आणि महाराष्ट्रात कधी धडकणार, याविषयीचे अंदाज हवामान खात्याने वर्तविलेले असतात. पण मान्सूनच्या लहरीपणा लक्षात घेता जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ातील मुहूर्त काढला जातो. प्रवासाची फारशी दगदग आणि जास्त अवघड चढण नसलेले ठिकाण पहिल्या ट्रेकसाठी ठरविण्यात येते.

पहिला ट्रेक एक दिवसाचा असतो. त्याला ‘वॉर्म अप’ ट्रेक म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सुमारे तीन महिने घामाच्या धारांमध्ये भिजल्यानंतर पावसात मनसोक्त चिंब होणे, हाच या ट्रेकचा उद्देश असतो. यानिमित्ताने ग्रुपचे सदस्य आपल्या ओळखीच्या मंडळींना ट्रेकला घेऊन येतात. या ट्रेकमध्ये येणाऱ्या अनुभवावरून ती मंडळी पुढे ‘रेग्युलर ट्रेकर’ होणार की नाही, हे ठरत असते. पहिल्या ट्रेकमध्येच निसर्गाशी नाळ जुळल्यामुळे आजीवन ट्रेकर झाल्याची अगणित उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे पहिल्या ट्रेकनंतर ट्रेकिंगचे नावही न काढणारेसुद्धा काहीजण आढळतात.

एकदिवसीय ट्रेकसाठी कर्जत-कसारा आणि लोणावळा परिसरात अनेक ‘हॉट स्पॉट’ आहेत. पेठ किंवा कोथळीगड, लोहगड, कोंदिवडे लेणी, कोरीगड, कर्नाळा, ईशाळगड, पेब, उल्हास व्हॅली, तिकोणा, माहुली, कळसूबाई, नाखिंद, माथेरान अशी या ठिकाणांची मोठी यादी आहे. केवळ ट्रेकचे ठिकाण किंवा तारीख ठरवून चालत नाही. प्रत्येक ट्रेकचे व्यवस्थित नियोजन करावे लागते. ट्रेकसाठी निघताना कुठे जमायचे? प्रवास रेल्वेने करायचा की वाहनाने? रात्री निघायचे की भल्या पहाटे? कोणती वेळ सर्वाना सोयीची ठरेल? खाण्यापिण्याची व्यवस्था कशी करायची? चढाईला सुरुवात कधी करायची? खर्च किती येईल? यांसारख्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. या गोष्टी ग्रुपकडून ठरविण्यात येत असल्या, तरी प्रत्येक ट्रेकसाठी लीडर आणि को-लीडर ठरविण्यात येतात. ही जबाबदारी ट्रेकिंग स्पॉटबद्दल चांगली माहिती असलेल्या मंडळींवर टाकली जाते.

प्रत्येक ट्रेकिंग ग्रुप आपापल्या सोयीनुसार वर्षभरातील ट्रेकचे नियोजन करतो. काही ग्रुप पावसाळी आणि हिवाळी ट्रेकचा कार्यक्रम एकदाच आखतात, तर काही मे-जूनमध्ये पावसाळी आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हिवाळी ट्रेकचे नियोजन आखतात. दोन किंवा तीन आठवडय़ाच्या विश्रांतीनंतर पुढच्या ट्रेकचे नियोजन केले जाते. पहिला ट्रेक सोपा व वनडे असेल, तर पुढील ट्रेक तुलनेने अवघड आणि दोन-तीन दिवसांचेही असतात. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत अनेक ट्रेकिंग स्पॉट आहेत. भीमाशंकर, नाणेघाट, हरिश्चंद्रगड, कळसूबाई, सुधागड, राजमाची, काळदुर्ग, टकमक, सिद्धगड, गोरखगड, दुर्ग-ढाकोबा, माथेरानमधील वन ट्री हिल पॉइंट व गारबेट पॉइंट यांसारखी ठिकामे निवडली जातात. ट्रेकिंग स्पॉटच्या यादीत दरवर्षी नवनवीन ठिकाणांची भर पडतच असते. गेल्या एक-दोन वर्षांपासून खंडाळा येथील नागफणीच्या बाजूला असलेल्या उंबरखिंडचा ट्रेक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

पावसाळी ट्रेकचे नियोजन करण्याची पद्धत दहा-पंधरा वर्षांपूर्वीही हीच होती. मात्र त्यावेळी फोनाफोनी करून किंवा पत्राद्वारे ग्रुपमधील सर्व सदस्यांना ट्रेकच्या तारखा कळविल्या जायच्या. ‘यूथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया’सारख्या (वायएचएआय) ट्रेकिंग संस्थांच्या नोटीस बोर्डावर ट्रेकच्या तारखा लावल्या जायच्या. त्यामुळे ट्रेकला जायची हुक्की आल्यास ट्रेकर्सची पावले आपोआप या संस्थांकडे वळायची. आता मात्र ट्रेकचे वेळपत्रक प्रत्येकाच्या ईमेलवरच येते. सोबत ट्रेकसाठी भेटण्याचे ठिकाण, खर्च, आवश्यक सूचना आणि लीडर्सचे मोबाइल नंबर असतात. ट्रेकला निघण्यापूर्वी भेटण्याच्या सर्व ग्रुपच्या जागा कॉमन आहेत. सीएसटीला इंडिकेटरखाली, दादरला स्वामीनारायण मंदिराच्या कोपऱ्यावर, कर्जत-कसाऱ्याला बस स्टॅण्डवर, विरारला तिकीट खिडकीच्या बाजूला..त्या मात्र आजही बदललेल्या नाहीत.

ट्रेकिंग ग्रुप पावसाळ्यात केवळ ट्रेक आयोजित करतात असे नाही. दोन-तीन ट्रेक झाल्यानंतर वॉटर फॉल रॅपलिंग, रेस्क्यू ऑपरेशन, नेचर ट्रेल्स, वृक्षारोपण, सायकलिंग यांसारखे उपक्रमही आयोजित केले जातात. याखेरीज भरारीसारख्या ट्रेकिंग ग्रुपकडून गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाळ्यात पन्हाळगड ते विशाळगड मोहीम आखण्यात येत आहे. काही ट्रेकिंग ग्रुपकडून भीमाशंकर ते लोणावळा मोहिमेचे आयोजन केले जाते. आता तर मान्सून दाखल झाला आहे. 

संपर्क- कैलास कोरडे
kailash.korde@expressindia.com

kkorde@gmail.com


 

No comments:

Post a Comment