03 November 2011

आठवणीतील कविता-बालभारतीच्या

शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातील कविता आपण अभ्यासाकरिता पाठ करत असतो. शाळा आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कधी तरी आपल्याला शाळेच्या दिवसांतील एखादी कविता किंवा त्यातील ओळ आठवते आणि आपण स्मरणरंजनात जातो. ‘बालभारती’मधील स्मरणरंजनात घेऊन जाणाऱ्या आठवणींच्या कवितांचा हा खजिना आता ई-पुस्तक स्वरूपात रसिकांसाठी उपलब्ध झाला आहे. ई-साहित्य प्रतिष्ठानने या कवितांचे ई-पुस्तक प्रकाशित केले असून त्याची संकल्पना आणि संकलन सुरेश शिरोडकर यांचे आहे.
स्मरणरंजनाचा आनंद देणाऱ्या या कविता ‘बालभारती- आठवणीतल्या कविता’ या ई-पुस्तकात एकत्र करण्यात आल्या आहेत. ग. ह. पाटील यांच्या ‘छान किती दिसते फुलपाखरू’ या कवितेने आपण कवितांच्या खजिन्यात पाऊल टाकतो. इंदिरा संत यांची ‘गवतफुला’, ग. ह. पाटील यांचीच ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’, कुसुमाग्रज यांची ‘उठा उठा चिऊताई’, मंगेश पाडगावकर यांची ‘टप टप पडती अंगावरती’, नारायण गोविंद शुक्ल यांची ‘लाल टांगा घेऊनी आला लाल टांगेवाला’, वा. भा. पाठक यांची ‘खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे’, केशवकुमार यांची ‘आजीचे घडय़ाळ’ यासह इतर अनेक कविता येथे आहेत.
या कवींबरोबरच ना. धों. महानोर, वसंत बापट, प्रा. शंकर वैद्य, बा. भ. बोरकर, पद्मा गोळे, बालकवी, कवी ग्रेस, वामन पंडित, यशवंत, ना. घ. देशपांडे, ना. वा. टिळक, माधव ज्युलियन, केशवसुत, मोरोपंत, साने गुरुजी, भा. रा. तांबे आदींच्याही कविता या पुस्तकात असून कोणतीही कविता उघडून वाचायला सुरुवात केल्यानंतर वाचक नक्कीच शाळेच्या आठवणीत पोहोचतील.
या संदर्भात ‘वृत्तान्त’शी बोलताना शिरोडकर म्हणाले की, बालभारतीमधील आठवणीतल्या कवितांचा माझा ब्लॉग असून त्यावरही या कविता संकलित केल्या असून या सर्व कविता ई-साहित्य प्रतिष्ठानने पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत. पहिल्या भागात १५० कवितांचा समावेश करण्यात आला आहे. अन्य कविता पुढील भागात देण्यात येतील. तसेच पहिला भाग वाचून रसिक वाचकांनी ज्या सूचना केल्या आहेत त्याची दखल घेऊन या सर्व कविता सुधारित स्वरूपात देण्याचा आमचा प्रयत्न आहे, तर ई-साहित्य प्रतिष्ठानचे वितरक सुनील सामंत यांनी सांगितले की, आजवर आम्ही १६० ई-पुस्तके प्रकाशित केली आहेत.
‘बालभारती- आठवणीतल्या कविता’ या उपक्रमात रसिक वाचकांनाही सहभागी होता येईल. उपक्रमास मदत करणाऱ्या वाचकाला ई-साहित्य प्रतिष्ठानच्या १५० ई-पुस्तकांचा समावेश असलेली सीडी भेट म्हणून देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क
ई-साहित्य प्रतिष्ठान -esahity@gmail.com
सुरेश शिरोडकर -skarsuresh@gmail.com 

(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त-३ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे)

No comments:

Post a Comment