06 November 2011

ज्ञान भांडार

गेल्या दोनशे वर्षांच्या प्राच्यविद्या, भारतीय विद्या आणि सांस्कृतिक इतिहासाची मूक साक्षीदार असलेली मुंबईतील ‘एशियाटिक सोसायटी’ ही संस्था शब्दश: ज्ञानाचे भांडार आहे. दुर्मिळ हस्तलिखिते, पोथ्या, ग्रंथ, विविध भाषांमधील पुस्तके, नियतकालिके, वृत्तपत्रे, दुर्मिळ वस्तू, संशोधन विभाग यामुळे संस्थेने वाचक, अभ्यासक, संशोधक यांनाही अनुभव आणि ज्ञानसमृद्ध केले आहे. २६ नोव्हेंबर १८०४ मध्ये संस्थेची स्थापना करण्यात आली. altतेव्हा ही संस्था ‘लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे’ म्हणून ओळखली जात होती. १९३० मध्ये तिचे नामकरण ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ असे झाले आणि १९४७ नंतर आता ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ या नावाने ती ओळखली जाते. ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत डॉ. अरुण टिकेकर हे गेल्या पाच वर्षांपासून एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
altपरळ येथे ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित १६ ब्रिटिश विद्वानांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली. न्यायमूर्ती जेम्स मॉकिन्टॉस यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली ही संस्था पश्चिम भारतातील संशोधनात्मक कार्य करणारी पहिली-वहिली संस्था होती. स्थापना झाल्यानंतर मॉकिन्टॉस यांचीच अध्यक्ष आणि विल्यम आस्किर्न यांची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली. १८३० मध्ये परळ येथून संस्थेची वास्तू दक्षिण मुंबईत टाऊन हॉल येथे स्थलांतरित झाली. न्यायमूर्ती काशिनाथ त्र्यंबक तेलंग, भगवानलाल इंद्रजी, डॉ. भाऊ दाजी लाड, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर आदी दिग्गजांनी संस्थेची धुरा यापूर्वी सांभाळली आहे. महामहोपाध्याय पां. वा. काणे यांनी एशियाटिक सोसायटीच्या संशोधन कक्षात बसून ‘हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र’ चे खंड लिहिले. पुढे याच कामासाठी त्यांना ‘भारतरत्न’हा बहुमान मिळाला. ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिका दुर्गाबाई भागवत आणि अन्य अनेक मान्यवरांनी आपल्या सहभागाने ही संस्था मोठी केली आहे.
संस्थेकडे आज तीन लाखांहून अधिक पुस्तकांचा संग्रह असून यात मराठीसह गुजराथी, हिंदूी, संस्कृत, इंग्रजी, पर्शियन, उर्दू, फ्रेंच, इटालियन भाषेतील ग्रंथसंपदा आहे. संस्कृत भाषेतील सुमारे तीन हजारांहून अधिक दुर्मिळ हस्तलिखिते, पोथ्या आहेत. ‘लंडन टाइम्स’, ‘इंदूप्रकाश’, ‘बॉम्बे गॅझेट’ अशी जुनी वर्तमानपत्रेही येथे संग्रहित करण्यात आली आहेत. संस्थेकडे १५० वर्षांहून जुनी आणि दुर्मिळ अशी सुमारे दीड लाख पुस्तके असून ती डिजिटल स्वरूपात जतन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. संस्थेच्या संग्रहात मौर्यकालीन आणि ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील सुमारे १२ हजार नाणीही आहेत. नालासोपारा येथे काही वर्षांपूर्वी केलेल्या उत्खननात बौद्ध स्तुपाचे अवशेष मिळाले होते. एका मोठय़ा मातीच्या भांडय़ात सोने, चांदी, तांबे यांची छोटी भांडी सापडली होती. या सर्व वस्तूही जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.
सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण टिकेकर या संस्थेच्या कामकाजाबाबत बोलताना म्हणाले, की संग्रहात असणाऱ्या दुर्मिळ पुस्तकांचे जतन, बायडिंग, मायक्रोफिल्मिंग, डिजिटलकरण आदी सर्व कामे संस्थेच्या वास्तूतच केली जातात. एकही पुस्तक बाहेर नेऊ दिले जात नाही. पुस्तकांचे जतन करण्यासाठी ग्रंथ दत्तक योजनाही कार्यान्वित आहे. संस्थेतर्फे जे संशोधनात्मक प्रकल्प हाती घेण्यात येतात, त्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय आणि उद्योग जगताकडून देणगी मिळते. यातून असे उपक्रम आणि पुस्तक प्रकाशनाचे कामही केले जाते.
सोसायटीतर्फे सर्वसाधारण ग्रंथालय (वाचकांसाठी) आणि संशोधनात्मक चळवळ असे उपक्रम चालवले जातात. एशियाटिक सोसायटीतर्फे दरवर्षी १२ हून अधिक स्मृती व्याख्याने तसेच अन्य साहित्य-सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. संस्थेकडे असलेल्या विविध दुर्मिळ वस्तूंची मालकी संस्थेकडेच अबाधित ठेवून या वस्तू छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या असून त्या लोकांना पाहण्यासाठी संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. परदेशी आणि परप्रांतीय संशोधक अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी एशियाटिक सोसायटीत मोठय़ा प्रमाणात येत असल्याचेही डॉ. टिकेकर यांनी सांगितले.
१९९४ मध्ये एशियाटिक सोसायटी आणि मध्यवर्ती ग्रंथालय यांचे विभाजन झाले.  संस्थेकडे असलेल्या ग्रंथसंपदेत कला, इतिहास, हस्तलिखिते, पोथ्या, आत्मचरित्र, इतिहास, तत्त्वज्ञान आदी विविध विषयांवरील पुस्तके आहेत. पाश्चात्त्य लेखक डान्टे यांच्या ‘डिव्हाइन कॉमेडी’ या मूळ इटालियन हस्तलिखितासह अनेक दुर्मिळ ग्रंथ संस्थेच्या संग्रहात आहेत. जणू ज्ञानाचे हे भांडारच!
एशियाटिक सोसायटी संपर्क ०२२-२२६६०९५६/२२६६५५६०
ई-मेल - asml@mtnl.net.in
संकेतस्थळ- www.asiaticsocietymumbai.org 

(लोकसत्ता-रविवार वृत्तान्तमध्ये ६ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान एकवर माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे)
http://epaper.loksatta.com/15963/indian-express/06-11-2011?show=clip#page=21:w=757:h=1344:l=25:t=247
या लिकवर ई-पेपरवरही हा लेख वाचता येईल

No comments:

Post a Comment