07 November 2011

दुर्मिळ पुस्तकांचा खजिना

ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तकांचा संग्रह नव्हे तर साहित्य आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचे ते एक महत्त्वाचे केंद्र आहे. विविध साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांबरोबरच वाचन संस्कृती जोपासण्याचे आणि ती वृद्धिंगत करण्याचे काम ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय’ ही संस्था गेली ११३ वर्षे करत आहे.
वाचन आणि साहित्यप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन १ ऑगस्ट १८९८ मध्ये गिरगाव येथील ठाकुरद्वार येथे संग्रहालय स्थापन केले. या संस्थापक मंडळींमध्ये गुर्जर, पीटकर, शेजवलकर, पागे, जोशी, बाक्रे, पुणतांबेकर, मोडक, गद्रे आदींचा समावेश होता. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते संग्रहालयाच्या ठाकुरद्वार शाखेचे उद्घाटन तर संग्रहालयाच्या दादर येथील वास्तूचे उद्घाटन पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. संस्थेच्या आज एकूण ४४ शाखा आहेत.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्यालय अधीक्षक सुनील कुबल यांनी ‘वृत्तान्त’ला अधिक माहिती देताना सांगितले, की संग्रहालयाच्या सर्व शाखा मिळून १२ हजार ८०० सर्वसाधारण तर सुमारे साडेचार हजार आजीव सभासद आहेत. संस्थेकडे सुमारे पावणेतीन लाख पुस्तकांचा संग्रह असून नऊशेहून अधिक दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आहे. आचार्य अत्रे यांचे ‘मराठा’चे अंकही संग्रहालयाकडे जतन करून ठेवण्यात आले आहेत. संग्रहालयाकडून ग्रंथालयाबरोबरच अन्य विविध उपक्रम राबविले जातात. मराठी संशोधन मंडळ, इतिहास संशोधन मंडळ, साने गुरुजी बाल विकास विभाग आदी संग्रहालयाचे उपविभाग आहेत. या उपविभागांतर्फे व्याख्याने, स्पर्धा, साहित्यिकांची जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रम, अन्य सांस्कृतिक आणि साहित्यविषयक उपक्रम आयोजित केले जातात.
संग्रहालयातर्फे संदर्भ विभाग चालविला जातो. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अभ्यासक आणि नागरिकही याचा मोठय़ा प्रमाणात लाभ घेत आहेत. संग्रहालयाकडे असलेल्या काही दुर्मिळ पुस्तकांचे मायक्रोफिल्मिंग करण्यात आले असून यासाठी सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिराकडून आर्थिक मदत मिळाली होती. संग्रहालयाकडे १८६० पासूनची काही दुर्मिळ पुस्तके असून साधारणपणे १९५० पर्यंतची पुस्तके संगणकावर स्कॅन करून जतन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनोहर जोशी या उपक्रमासाठी निधी देणार असून अन्य खासदारांकडूनही मदत मिळविण्याचे आमचे प्रयत्न आहेत, अशी माहितीही कुबल यांनी दिली. वैजनाथ शर्मा लिखित ‘सिंहासन बत्तीशी’ (१८१४), ग्रॅट डफ यांची ‘मराठय़ांची बखर’ (१८२९), दादोबा पांडुरंग यांचे ‘मराठी नकाशांचे पुस्तक’ (१८३९), सदाशिव छत्रे यांचे ‘इसापनीती कथा’ (१८५१) यासह अनेक जुनी दुर्मिळ पुस्तके संग्रहालयाच्या दादर येथील संदर्भ विभागाकडे आहेत.  मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (दादर-पूर्व) ०२२-२४१३४२११/२४१२१९०१ संदर्भ विभाग- (०२२-२४१८५९६०)  संग्रहालयाचे संकेतस्थळ  www.mumbaimgs.org 

(हा लेख लोकसत्ता-रविवार वृत्तान्त, ६ नोव्हेंबर २०११ च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झाला आहे)

No comments:

Post a Comment