19 November 2011

‘शिवसेने’च्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रे!



altमराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि आता महाराष्ट्रात प्रमुख राजकीय पक्ष म्हणून स्थान मिळविलेल्या ‘शिवसेना’या संघटनेच्या स्थापनेची मूळ कल्पना दिवंगत साहित्यिक, नाटककार आणि संपादक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची होती. ५२ वर्षांपूर्वी अत्रे यांनी आपल्या ‘मराठा’ या दैनिकात ‘शिवसेना’या नावाचा अग्रलेख लिहून मराठी तरुणांचे संघटन आणि या विषयीचा सविस्तर उहापोह केला होता.संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ दैनिकाने महत्वाची भूमिका बजावली. अत्रे यांच्या घणाघाती लेखणीने आंदोलनाला प्रचंड बळ मिळाले आणि त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. आचार्य अत्रे यांचे ‘मराठा’ हे दैनिक आता लवकरच  डिव्हिडीवर उपलब्ध होणार असून या डिव्हिडीमध्ये १५ नोव्हेंबर १९५६ ते १९६० च्या डिसेंबर अखेपर्यंतचे अंक असणार आहेत. आचार्य अत्रे यांचे नातू अॅड. राजेंद्र पै (आचार्य अत्रे यांच्या कन्या आणि ज्येष्ठ साहित्यिका शिरीष पै यांचे सुपुत्र) हे याविषयीची जबाबदारी सांभाळत आहेत. या निमित्ताने शिरीष पै यांनी ‘मराठा’च्या आठवणींना उजाळा देताना ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, १५ नोव्हेंबर १९५६ रोजी  ‘मराठा’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा कालखंडही याच सुमारास सुरू झाला. या डिव्हिडीत ‘मराठा’चे संपूर्ण अंक पाहायला मिळणार आहेत. ‘शिवसेना’ संघटनेची मूळ कल्पना माझ्या वडिलांची, आचार्य अत्रे यांचीच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेवादल या संघटनांप्रमाणे मराठी तरुणांची बिगर राजकीय विचारांची संघटना स्थापन करावी आणि त्यांनी एकत्र येऊन काम करावे, असे विचार अत्रे यांनी ‘मराठा’ मध्ये मांडले होते.
२५ जुलै १९५९ या दिवशी ‘मराठा’ दैनिकात ‘शिवसेना’याच नावाने अग्रलेख प्रसिद्ध झाला होता. समाजापुढे असलेल्या समस्या सोडविण्यासाठी मराठी तरुणांनी पुढाकार घेऊन एकत्र यावे आणि त्यासाठी ‘शिवसेना’ या नावाने संघटना स्थापन करावी, असे त्यांनी सुचविले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांचे संघटन केले आणि त्यातूनच पुढे हिंदूवी स्वराज्याची निर्मिती झाली. स्वतंत्र विचारांच्या मराठी तरुणांनी या मावळ्यांप्रमाणे एकत्र येऊन संघटित व्हावे, असे अत्रे यांनी सुचविल्याचे शिरीषताई म्हणाल्या.
अत्रे यांच्या या लेखानंतर प्रबोधनकार ठाकरे यांच्या मनात हा विचार सातत्याने घोळत होता. कालांतराने त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना मराठी माणसाची संघटना स्थापन करण्याची प्रेरणा दिली. अशी संघटना स्थापन करण्याचा विचार असेल, तर ‘शिवसेना’ हेच संघटनेचे नाव ठेवा, असेही प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना सुचविले, आणि विचार पक्का होताच, संघटनेच्या स्थापनेचा नारळ फोडण्यात आला. जून १९६६ मध्ये आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील मराठी तरुणांची संघटना साकार झाली..
(माझी ही बातमी लोकसत्ताच्या मुख्य अंकात पान क्रमांक १२ वर १९ नोव्हेंबर २०११ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे)
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=194502:2011-11-18-15-11-17&catid=26:2009-07-09-02-01-2

http://epaper.loksatta.com/17108/indian-express/19-11-2011#page/12/1

No comments:

Post a Comment