17 September 2010

तू सुखकर्ता तू दुखहर्ता

गीतगणेश-५

गणपती, त्याची भक्ती, महिमा यावर आधारित ‘अष्टविनायक’ हा मराठी चित्रपट आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्या ना कोणत्या वाहिनीवर हा चित्रपट दरवर्षी एकदा तरी दाखवला जातोच. या चित्रपटातील सर्वच गाणी गाजली. गणपतीविषयक चित्रपटातील तीन गाणी आजही रसिकांच्या ओठावर असून सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव किंवा गणपतीच्या दिवसात वाहिन्यांवरून सादर होणाऱ्या कार्यक्रमात तसेच मराठी वाद्यवृंदातूनही या तीनपैकी एखादे गाणे सादर होतेच.

‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ या गाण्याला वेगवेगळ्या गायकांनी आवाज दिला असून ते महाराष्ट्रातील विविध संगीत लोकप्रकारात गुंफण्यात आले आहे. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या या गाण्याची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही.


याच चित्रपटातील ‘प्रथम तुला वंदितो’ हे गाणेही खूप छान आहे. शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेले हे गाणे पं. वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायले असून त्यास अनिल-अरुण यांचे संगीत आहे. चित्रपटात पडद्यावरही स्वत: वसंतराव देशपांडे यांच्यावरच हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.

‘अष्टविनायक’ चित्रपटातील गणपतीविषयक ‘तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता’ या गाण्याचा आजच्या ‘गीतगणेश’मध्ये विचार करणार आहोत. हा चित्रपट १९७९ मध्ये प्रदर्शित झाला होता. म्हणजे आज त्याला ३१ वर्षे झाली. तरीही चित्रपटातील या गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही हे विशेष.

‘तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता’ हे गाणे मधुसूदन कालेलकर यांनी लिहिले असून संगीत अनिल-अरुण यांचे आहे. पं. वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांनी हे गाणे गायले आहे. गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती मानला जातो. गणपती हा सुख देणारा आणि जीवनातील दु:ख, संकटे हरण करणारा आहे.
 
कालेलकर यांनी या गाण्यात गणपतीला ‘तूच कर्ता आणि करविता’ असे म्हटले आहे. या गाण्यातून कालेलकर यांनी गणपतीची काही नावे सुंदरतेने गुंफली असून गणपती दैवत कसे आहे ते सांगून गणपतीजवळ देवा माझा ‘मी’ पणा नष्ट होऊ दे असे मागणेही मागितले आहे.
 
मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेल्या या दोन कडव्यांच्या गाण्याची चाल श्रवणीय आणि मनात घर करणारी असून पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्वरांनी दुग्धशर्करा योग जुळवून आणला आहे.
 
हे संपूर्ण गाणे असे
 
तू सुखकर्ता तू दुखहर्ता
मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया
 
ओंकारा तू , तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धिविनायक
मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक
तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता ।।१।।
 
देवा सरु दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन
नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण
सदैव राहो ओठावरती, तुझीच रे गुणगाथा ।।२।।
 
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १७ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे) 

No comments:

Post a Comment