24 September 2010

साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक-विद्यमान पद्धतीला सध्यातरी पर्याय नाही

विद्यमान पद्धतीला सध्यातरी पर्याय नाही

मुंबई मराठी साहित्य संघाकडे व्यक्त झाला सूर


संमेलनाध्यक्षपद निवडणूक

प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदाच्या विद्यमान निवडणूक पद्धतीत बदल व्हावा, अशी चर्चा होत असली तरी विद्यमान निवडणूक पद्धतीला सध्यातरी सक्षम आणि ठोस पर्याय नाही, असा सूर या संदर्भात मुंबई मराठी साहित्य संघाकडे व्यक्त झाला असल्याची माहिती संघाच्या सूत्रांकडून देण्यात आली. मुंबई मराठी साहित्य संघ ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून विद्यमान निवडणूक पद्धतीविषयी संघाने मान्यवरांची मते जाणून घेतली होती. त्यातून उपरोक्त सूर व्यक्त झाला आहे.

साहित्य संमेलन आणि अध्यक्षपदाची निवडणूक हा कायम वादाचा विषय राहिला आहे. महामंडळाच्या घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थेचे मतदार तसेच संमेलन आयोजक निमंत्रक संस्थेचे पदाधिकारी संमेलनाध्यक्ष निवडणुकीत मतदान करतात. मात्र ही संख्या खूप कमी आहे. यंदाच्या वर्षी सुमारे ७९० मतदार मतदान करणार आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष इतक्या कमी संख्येत असलेल्या मतदारांनी ठरवणे हे योग्य नसल्याची टीका करण्यात येते. तसेच संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक होत असल्याने काही ज्येष्ठ साहित्यिकांना ही पद्धत मान्य नसल्याने त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे यात काही बदल करता येईल का, अशी चर्चा नेहमी सुरू असते. त्या पाश्र्वभूमीवर मुंबई मराठी साहित्य संघाने ही मते जाणून घेतली होती. साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष, मान्यवर साहित्यिक आणि साहित्यविषयक संबंधित घटकांकडे संमेलनाध्यक्षपद निवडीच्या विद्यमान पद्धतीविषयी मते जाणून घेतली होती. त्यावेळी विद्यमान निवडणूक पद्धतीत काही त्रुटी असल्या तरी सध्या योग्य आणि सक्षम पर्याय समोर नसल्याचे मत या मंडळींनी व्यक्त केले होते.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या मंडळींची नावे मागवायची आणि महामंडळाच्या कार्यकारिणीत त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करायचे. म्हणजे निवडणूक न होता संमेलनाध्याची निवड करता येईल, असा एक पर्याय समोर आला होता. मात्र त्यामुळे आणखी वाद आणि गोंधळ उडेल, असे एक मत पुढे आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आलेल्या नावांमधून केवळ एका नावाची निवड करायची झाल्यास कार्यकारिणीतील सदस्यांवर राजकीय किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ शकतो किंवा प्रादेशिकतेचा विचार करूनही एखाद्याची निवड केली जाऊ शकते. तसे होण्यापेक्षा विद्यमान पद्धतीत काही त्रुटी असल्या तरी मतदान लोकशाही पद्धतीने होत असल्याने तक्रार करायला वाव नाही.

ही प्रक्रिया राबवताना जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सध्या तरी हीच पद्धत योग्य वाटते. एकूण मतदार संख्येत वाढ करणे हा पर्याय विचार करण्यासारखा असल्याचे मतही व्यक्त करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २४ सप्टेंबर २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे)

No comments:

Post a Comment