14 September 2010

तुझ्या कांतिसम रक्तपताका

गीतगणेश- २

गणपतीच्या पारंपरिक आरतीबरोबरच मराठी चित्रपटातील गणपतीच्या गाण्यांची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. ‘अन्नपूर्णा’ या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेले आणि संगीतकार स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘तुझ्या कांतिसम रक्तपताका’ हे असेच लोकप्रिय आणि अजरामर झालेले गाणे. या गीताची रचना ‘महाराष्ट्र वाल्मिकी’ ग. दि. माडगुळकर यांनी केलेली आहे. ‘अन्नपूर्णा’ हा चित्रपट १९६८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन आज ४२ वर्षांनंतरही या गाण्याची गोडी कमी झालेली नाही. आजही हे गाणे तितकेच ताजे आणि टवटवीत वाटते.


संगीतकार स्नेहल भाटकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले. हिंदीतील त्यांनी संगीतबद्ध केलेले ‘कभी तनहाईयों में यँू हमारी याद आएगी’ हे त्यांचे गाणे खूप गाजले. मराठीतही त्यांनी ‘रुक्मिीणी स्वयंवर’, ‘चिमुकला पाहुणा’, ‘मानला तर देव’ आदी चित्रपटांना संगीत दिले. त्यातील गाणीही बरीच गाजली. सुमन कल्याणपूर यांनी आपल्या गोड गळ्याने हिंदी आणि मराठी चित्रपट पाश्र्वगायनात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

दोन वर्षांपूर्वी ‘नवचैतन्य प्रकाशन’तर्फे त्यांचे ‘सुमनसुगंध’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. निवेदिका मंगला खाडिलकर यांनी त्याचे शब्दांकन केले आहे. या पुस्तकात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांचा गौरव करताना मंगला खाडिलकर यांनी म्हटले आहे की, शब्दातील ऱ्हस्व व दीर्घ आणि मात्रांचे नेमके भान ठेवून उच्चारण करण्याची सुघट शैली, भक्तीभाव, संस्कार भावना जागविणारे सहज गायन आणि त्यात स्वत: रंगून जाण्याचा स्वभाव यामुळे श्रोत्यांच्या मनावर सुमनताईंच्या गाण्यांचा प्रचंड पगडा आहे. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजाबाबत नेमके भाष्य मंगला खाडिलकर यांनी केले आहे.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या अनेक मराठी आणि हिंदी गाण्यांप्रमाणेच ‘तुझ्या कांतिसम रक्तपताका’ हे गाणे लोकप्रिय झाले. ‘अन्नपूर्णा’ या चित्रपटातील पाचही गाण्यांची जबाबदारी स्नेहल भाटकर यांनी अत्यंत विश्वासाने सुमन कल्याणपूर यांच्याकडे सोपवली होती. या गाण्यासाठी सुमन कल्याणपूर यांना ‘सूरसिंगार’ नियतकालिकचा ‘मिया तानसेन पुरस्कार’ मिळाला होता. त्यावेळी स्नेहल भाटकर यांनीसुद्धा सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामुळेच हे गाणे लोकप्रिय झाले, अशा भावना व्यक्त केल्या.

हे गाणे ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. गदिमा यांची शब्दरचना, स्नेहल भाटकर यांचे संगीत आणि सुमन कल्याणपूर यांचा आवाज या तिहेरी संगमामुळे हे गाणे खूप सुंदर आणि श्रवणीय झाले असून इतक्या वर्षांनंतरही या गाण्याची जनमानसावरील मोहिनी कमी झालेली नाही.

हे संपूर्ण गाणे पुढीलप्रमाणे :-

तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती

अरुण उगवला, प्रभात झाली, उठ महागणपती

सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा

सुभग सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा

छेडुनी वीणा जागविते तुज सरस्वती भगवती ।।१।।

आवडती तुज म्हणूनी आणिली रक्तवर्ण कमळे

पाचुमण्याच्या किरणासम ही हिरवी दुर्वादळे

उभ्या ठाकल्या चौदा विद्या घेऊनिया आरती ।।२।।

शुर्पकर्णका, उठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा

तिनही जगाचा तूच नियंता विश्वासी आसरा

तुझ्या दर्शना अधिर देवा हर, ब्रह्म, श्रीपती ।।३।।

(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १४ सप्टेंबर २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे)

No comments:

Post a Comment