19 September 2010

विनायका हो सिद्ध गणेशा...

गीतगणेश-७

तमाशामधील गण-गौळण किंवा वगामधील नमन असो, येथेही गणपतीचे स्तवन आणि गुणगान केलेले पाहायला मिळते. शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमात सादर होणारे ‘पयलं नमन, आम्ही करितो वंदन’हे सगळ्यांना परिचित असून यातच गणपतीला रंगमंचावर नृत्य करतानाही दाखवले आहे.

ज्येष्ठ गायक रामदास कामत यांच्या स्वरातील गणेशाचे ‘विनायका हो सिद्ध गणेशा’ हे गाणे लोकप्रिय आहे. हे गीत अशोकजी परांजपे यांचे असून संगीत विश्वनाथ मोरे यांचे आहे. मराठी संगीत रंगभूमीवरील गायक-अभिनेते म्हणून कामत परिचित आहेत.

अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदाचाही बहुमान त्यांना मिळाला होता. कामत म्हटले की ‘मयुरा रे फुलवित ये रे पिसारा’, ‘गुंतता हृदय हे’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे’ अशी अनेक गाणी रसिकांच्या पटकन ओठावर येतात. या गाण्यांप्रमाणेच कामत यांच्या स्वरामुळे ‘विनायका हो सिद्ध गणेशा’ हे गाणेही खूप लोकप्रिय आहे.

परांजपे यांची लिहिलेली अनेक गाणीही रसिकांच्या स्मरणात असून त्यात ‘विनायका हो सिद्ध गणेशा’ या गाण्यासह ‘अवघे गर्जे पंढरपूर’, ‘केतकीच्या बनी तेथे नाचला मोर गं’, ‘नाविका रे वारा वाहे रे’, आदी गाण्यांचा समावेश आहे.

संगीतकार मोरे यांनी संगीत दिलेले ‘गोंधळात गोंधळ’, ‘मायमाऊली’, ‘भालू’ आदी चित्रपटांतील ‘हा सागरी किनारा’, ‘सावध हरिणी सावध गं’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ आणि इतर अनेक गाणी गाजली आहेत.


‘विनायका हो सिद्ध गणेशा’ हे गाणे शास्त्रीय संगीताच्या अंगाने जाणारे असून मोरे यांचे वेगळ्या धाटणीचे संगीत, कामत यांचा दमदार आवाज व परांजपे यांची सुगम शब्दरचना यामुळे हे गीत लक्षात राहते. गण-गौळण, वग, तमाशाच्या प्रारंभी गणेशाचे नमन आणि गुणगान केले जाते.

या गाण्यातही गणपतीला रंगसभेसाठी आमंत्रण दिले असून त्याचा आशीर्वाद मागितला आहे. हा गणपती कसा आहे तर तो लंबोदर असला तरी नृत्यविशारद असून त्याच्या हातात परशू आहे. कमरेला नाग बांधलेला असून अशा या गणेशाने रंगसभेला, कार्यक्रमाला यावे, असे आवाहन कवीने केले आहे. ‘अपराधाला घाला पोटी’ अशी विनंतीही कवीने केली आहे.

 गणेशोत्सवाप्रमाणेच हे गाणे अनेकदा आकाशवाणीवरून प्रसारित होत असते. रामदास कामत यांचा स्वर, विश्वनाथ मोरे यांचे संगीत आणि अशोकजी परांजपे यांनी लिहिलेल्या शब्दातून हे गाणे शांतपणे ऐकताना आपल्या डोळ्यासमोर जणू ती रंगसभा आणि साक्षात गणपती उभा राहतो. हेच या गाण्याचे यश आहे.

हे संपूर्ण गाणे पुढीलप्रमाणे

विनायका हो सिद्ध गणेशा
रंग सभेला या तुम्ही या
पक्षी गाती घरटय़ामधूनी
आशिर्वच हो द्या तुम्ही द्या ।।१।।

नृत्य विशारद तुम्ही लंबोदर
हाती शोभे परशु तोमर
नाग कटिला बांधून या ।।२।।

अपराधाला घाला पोटी
तुमच्या माझ्या प्रेमासाठी
रसिकाशी ही भेटी गाठी
काव्यसुधा ही प्राशुनी ओठी
तृप्त मनाने ढेकर द्या ।।३।।

आम्ही बालक तव गुणगायक
कृपावंत हो प्रभू गुणग्राहक
प्रसाद हाती घेऊनी या ।।४।।

(लोकसत्ता- रविवार वृत्तान्तमध्ये १९ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे)

No comments:

Post a Comment