07 March 2012

शब्दचर्चा

आपल्या बोलण्यात काही वेळेस जाणीवपूर्वक तर कधी नकळत आपण मराठी भाषेतील शब्द वापरत असतो. पण त्या मागचा अर्थ किंवा तो शब्द वापरात कसा आला त्याची माहिती आपल्याला असतेच असे नाही. प्रा. डॉ. म. बा. कुलकर्णी यांनी मेहनत घेऊन लिहिलेल्या शब्दचर्चा या पुस्तकाने ही अडचण दूर झाली आहे.

कुलकर्णी   यांचे हे पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले असून त्याची पृष्ठसंख्या ४४० इतकी आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकातील कोणतेही पान उघडून आपण वाचायला सुरुवात केली तरी चालू शकते. कारण प्रत्येक पानावर मराठी भाषेतील असे विशिष्ट शब्द, तो शब्द वापरात कसा आला त्याची माहिती, शब्दाचा अर्थ, हे दिले आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना कंटाळा येत नाही. पुस्तकातील सर्व शब्द अकारिवल्हे नुसार देण्यात आले आहेत. या पुस्तकात कुलकर्णी यांनी तब्बल एक हजार शब्दांची चर्चा केली आहे.

मराठी भाषेत आपण अठरा विश्वे दारिद्र्य असा शब्दप्रयोग आपण करतो. हा शब्द कसा आला तर त्याविषयी डॉ. कुलकर्णी यांचे म्हणणे असे की अठरा विश्वे कोणती आहेत, त्यांची नावे सांगता येतील का, तर त्याचे उत्तर नाही, असे आहे. कारण अशी अठरा विश्वे नाहीत. मग हा शब्द आला कसा, त्यावर कुलकर्णी यांचे सांगणे असे की, हा शब्द अठराविसे असा असायला हवा. अठराविसे बरोबर ३६०. म्हणजे बाराही महिने दारिद्र्य. कुलकर्णी यांनी या पुस्तकात अशा अनेक शब्दांचे अर्थ, त्याचा झालेला अपभ्रंश, मूळ शब्द, सध्या वापरात असलेला शब्द हे उलगडून दाखवले आहे.

मराठीतील ठोंब्या, ढालगज, छक्केपंजे, चावट, गबाळग्रंथी, कूपमंडूक, करवली, कपोलकल्पित, ऊहापोह, उत्तान, आयुरारोग्य, आजोबा, अनुवाद, अतिथी, अथर्व, शिंचा, वदंता, सुश्राव्य, स्तोत्र, सव्यापसव्य, हातखंडा, विदुषी, मेहूण, रसातळ, भार्या, बादनारायण संबंध, फुकट फौजदार, पराकाष्ठा, पंगत, दशग्रंथी, तारतम्य, गावकूस, खांदेपालट या आणि अशा अनेक शब्दांचे अर्थ पुस्तकात उलगडून दाखविण्यात आले आहेत.

मराठी विषयाचे अभ्यासक, मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणारे पदव्युत्तर, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, प्रसार माध्यमात काम करणारी मंडळी, शिक्षक व प्राध्यापक  आदी सर्वानाच हे पुस्तक खूप उपयुक्त आणि संग्रही ठेवावे असे आहे.

लेखक डॉ. म. बा. कुलकर्णी यांचा संपर्क
०२५३-२४१४९२१

   

No comments:

Post a Comment