14 December 2009

घरातल्या घरात खतनिर्मिती

आपल्या घरात तयार होणाऱया ओल्या आणि सुक्या कचऱयाचे आपण काय करतो. तर तो दररोज घरी येणाऱया कचरेवाल्याला/वालीला तो  देऊन टाकतो. घरातील कचरा बाहेर दिला की आपले काम संपते. आपल्या घरी आपण हौसेने विविध झाडे लावलेली असतात. ही झाडे चांगली वाढावीत, त्यांना भरपूर फुले यावीत असे आपल्याला नेहमी वाटते. त्यासाठी आपण नसर्रीतून महाग रासायनिक खतेही आणतो.  पण आपल्या घरातच तयार होणाऱया ओल्या कचऱयापासून उत्तम प्रकारचे खत तयार करता येते आणि ते करणेही काही अवघड नाही, हे समजले तर प्रत्येकाला घरच्या घऱी असे खत तयार करता येईल.


घरच्या घऱी खत तयार करायला खूप मोठी जागा लागेल, तो कचरा कुजल्यानंतर त्याचा घाण वास येईल, त्यावर माशा, किडे बसतील, असा समज असेल तर तो चुकीचा आहे. कारण घऱच्या घऱी खत तयार करताना अशा प्रकारची कोणतीही दुर्गंधी त्या कचऱयाला किंवा तयार झालेल्या खताला येत नाही. डोंबिवलीत राहणारी माझी चुलत बहीण अनघा जोशी हिने सध्या घरातील ओल्या व सुक्या कचऱयापासून खतनिर्मिती करण्याचा छंद जोपासला आहे. हे खत ती स्वतपुरते तयार करुन थांबली नाही तर तीने त्याचा चांगल्यापैकी प्रचार-प्रसार केला आहे. तिच्या माध्यमातून आज डोंबिवलीतील अनेक जणांनी घरच्याघरी खत तयार करणे सुरु केले आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था, बैठी घरे किंवा चाळी, महिला मंडळे, शाळा आणि महाविद्यालयातून ती घरच्याघरी खतनिर्मितीवर व्याख्याने आणि प्रात्यक्षिक देत आहे. 


आपल्या घरातील कचऱयाचा डबा ठेवायला जेवढी जागा लागते, तेवढीच जागा कचऱयापासून खत तयार करणाऱया बास्केटला किंवा बादलीला लागते. घरी दररोज केल्या जाणाऱया भाज्यांची देठे, पाने,  किडलेली पाने, फळे किंवा भाज्यांची साले, घरातील झाडांच्या कुड्यांमधील वाळलेली पाने, कांदे-बटाटे यांची साले, फळांची टरफले, देवांचे निर्माल्य आदी साहित्यापासून आपल्याला घरच्या घऱी खतनिर्मिती करता येऊ शकते. खत तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली की तीन ते चार महिन्यात उत्तम दर्जाचे आणि त्यात कोणतेही रासायनिक घटक नसलेले खत तयार होते. इतकेच नव्हे तर झाडे लावताना कुंडीमध्ये माती न घालता केवळ हे खत घातले तरी त्यात फळझाडे किंवा फुलझाडे चांगल्या प्रकारे वाढू शकतात.


अनघाने ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंच या पर्यावरणविषयक काम करणाऱया स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थेत काम करताना घऱच्या घऱी खतनिर्मिती कशी करायची हे तंत्र शिकून घेतले. सध्या  किमान शंभर ठिकाणी तिने तयार करुन दिलेल्या कचऱयापासून खतनिर्मितीच्या बास्केट वापरल्या जात आहेत. ही बास्केट रेडिमेडही मिळते किंवा मार्गदर्शन घेऊन आपल्यालाही घरी तयार करता येऊ शकते. याचा सुरुवातीचा खर्च अवघा चारशे रुपये इतका आहे. यात बास्केट, खतनिर्मिती तयार करण्यासाठी लागणारे बायोकल्चर आणि काही अन्य बाबींचा समावेश आहे. एकदा का खत तयार झाले की नवीन बास्केट तयार करताना आपल्याला त्यात बायोकल्चरही टाकावे लागत नाही. तयार झालेले खत त्यात टाकले तरी खत तयार करता येऊ शकते. म्हणजे चारशे रुपये ही एकदाच करायची गुंतवणूक आहे. खतनिर्मितीसाठी उपयोगाता आणली जाणारी बास्केट/बादली तीन ते चार वर्षे चांगल्या प्रकारे टिकू शकते.


अनघाप्रमाणेच महाराष्ट्रात आणि मुंबईतही काही मंडळी ओल्या व सुक्या कचऱयापासून अशा प्रकारची खत निर्मिती करत आहेत. अन्य लोकांना त्याबाबत मार्गदर्शन करत आहेत. खरे म्हणजे आपण प्रत्येकाने आपल्या घरात तयार होणाऱया ओल्या व सुक्या कचऱयापासून अशा प्रकारे खत तयार करण्याचे ठरवले तर कचऱयाची समस्याच निर्माण होणार नाही. राज्यातील बृहन्मुंबई महापालिकेसह अन्य महापालिका आणि नगरपालिका प्रशासनाला दिवसेंदिवस वाढणाऱया कचऱयाची विल्हेवाट कशी लावायची ही मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. प्रत्येकाने आपल्या घरातील कचऱयापासून अशा प्रकारचे खत तयार करण्याचे ठरवले तरीही कचऱयाची विल्हेवाट लावण्याची  समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकेल.


शहरातील मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले, निवासी वसाहती, महापालिका किंवा नगरपालिका क्षेत्रातील एखादा प्रभाग आणि तेथील नागरिकांनी आपल्या येथे तयार होणाऱया ओल्या व सुक्या कचऱयापासून असे खत तयार करण्याचे ठरवले तर आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर राहू शकेल. कचऱयाची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्न निर्माण होणार नाही. भविष्यात या कचऱयापासून केवळ खतनिर्मितीवरच मर्यादित न राहता, त्यापासून वीजनिर्मिती करण्याचाही प्रकल्प हाती घेता येऊ शकेल. सध्याच्या भारनियमनाच्या काळात त्याची नक्कीच आवश्यकता आहे. अर्थात हे सर्व करण्यासाठी राज्य शासन, स्थानिक महापालिका, नगरपालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांनीही यात विशेष रुची दाखवली पाहिजे. नागरिकांना अशा प्रकारचे प्रकल्प उभाऱण्यासाठी सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. किमान आपल्या घरापासून तरी याची सुरुवात झाली पाहिजे.


ओल्या आणि सुक्या कचऱयापासून घरच्या घरी खतनिर्मिती, रेडिमेड बास्केट, बायोकल्चर आणि या संदर्भातील अधिक माहितीसाठी अनघा जोशी यांच्याशी खालील ई मेल आय़डीवर

anagha75@rediffmail.com  किंवा swami1075@gmail.com   तसेच ०९८३३६२१८२२ या भ्रमणध्वनीवरही संपर्क साधता येईल.

लोकसत्ता-ठाणे वृत्तान्त (२५ ऑक्टोबर २००९) पुरवणीत अनघाच्या या उपक्रमाविषयीचा लेख प्रकाशित झाला आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=18046:2009-10-24-15-20-20&catid=42:2009-07-15-04-00-30&Itemid=53
  
 
          

No comments:

Post a Comment