02 December 2009

विजय नव्हे तर अप्रत्यक्ष पराजय

बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शिवसनेच्या श्रद्धा जाधव निवडून आल्या म्हणून शिवसेनेत जल्लोष केला जात आहे. शिवसेनेचे कार्यकारी अध्य़क्ष तर थेट सहकुटुंब महापालिका मुख्यालयात आले. नुसत येऊन थांबले नाहीत तर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी चक्क बोलले. हा निष्ठावान शिवसैनिक व नगरसेवकांचा विजय असून शिवसेना आणि मुंबईवरील प्रेमाला तडा गेलेला नसल्याचे यातून दिसून येत असल्याची प्रतिक्रियाही ठाकरे यांनी दिली. विजय हा विजय असतो, असेही त्यांनी सांगितले. अगदी मान्य. पण हे यश खरोखरच निर्भेळ आहे का, याचा मनाशी प्रामाणिकपणे विचार करा. असे कळेल की या यशात कार्यकारी अध्यक्ष म्हणून आपला काहीही वाटा नाही. हा विजय नव्हे तर अप्रत्यक्ष पराजयच आहे.


समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी निवडणुकीच्या आदल्या दिवशी आम्ही तटस्थ राहणार असे जाहीर केले आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी सुटकेचा निश्वास टाकला. जर सपाने हे जाहीरच केले नसते तर शिवसेना शेवटपर्यंत गॅसवर राहीली असती. मनसेचे नगरसेवक सभागृहातच उपिस्थत राहिले नाहीत. आणि शिवसेनेतील ज्या दोन नगरसेविका हरवल्या होत्या त्या शिवसेनेच्या मदतीला आल्या. नशीब शिवसेनेतील अन्य नाराज नगरसेवक फुटले नाहीत. तसेच अखिल भारतीय सेनेच्या दोन नगरसविकाही शिवसनेच्या बाजूने राहिल्या. या सगळ्यामुळे कॉंग्रेसने केलेला चमत्काराचा बार अखेर फुसका ठरला.


बृहन्मुंबई महापालिकेच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेने सात जागा जिंकून भविष्यातील आपल्या वाटचालीची चुणुक दाखवली होती. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षात गेल्या काही वर्षांपासून तीव्र नाराजी आहे. उमेदवार निवड करण्यात अर्थपूर्ण व्यवहार केले जात असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे हे सर्वसामान्य शिवसैनिक, निष्ठावान पदाधिकारी आणि  अगदी शिवसेना नेत्यानाही त्यांच्यापर्यंत पोहोचणे अवघड जाते, त्यांच्या भोवताली असलेल्या चौकडीकडून जे निर्णय घेतले जातात, त्याला उद्धव केवळ मम म्हणतात, निष्ठावान शिवसैनिक, कार्यकर्ते यांची नेहमीच उपेक्षा केली जाते, असे शिवसेनेत सर्रास बोलले जाते. या सगळ्या गोष्टी एका रात्रीत घडून येत नाहीत. त्या आजवर साचत साचत गेल्या आहेत. त्यातूनच आपले महत्व वाढावे म्हणून पक्षातील अन्य नेत्यांचे पंख कापण्याचे धोरण उद्धव यांच्या सल्लागारांनी त्यांना दिल्यामुळे नारायण राणे, राज ठाकरे या सारखे मासलिडर पक्षातून अखेर बाहेर पडले. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेला मनसेच्या वाढत्या प्रभावाचा फटका बसला. शिवसेनेची उधोगती सुरु झाली. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेतील विजय हा खरे तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हवा होता.


राज ठाकरे यांनी भविष्याचा तसेच महापालिकेच्या दोन वर्षात होणाऱया सार्वत्रिक निवडणुकीचा विचार करुन कॉंग्रेसला मदत न करण्याचा योग्य निर्णय घेतला. ते जर कॉंग्रेसबरोबर गेले असते तर मतदारांच्या मनातील मनसेविषयीची सहानुभुती कदाचित कमी झाली असती. लोकांची नस उच्च पदावरील नेत्यांना ओळखता यायला हवी आणि थेट लोकांशी,  सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी संवाद साधायला हवा. संवाद नसला की मनामध्ये कटुता येते आणि त्याचा परिणाम पक्ष संघटनेवर होतो. कदाचित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी नगरसेवकांना केलेल्या मार्गदर्शनामुळेही शिवसेनेतील नाराज नगरसेवकांनी जाऊ दे, महापौर निवडणुकीत तरी आपली नाराजी बाजूला ठेवु या, असा व विचार केला असण्याची शक्यता आहे.


विधान परिषदेच्या दोन जागांसाठी बृहन्मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना मतदान करायचे आहे. -तसेच दोन-सव्वादोन वर्षांनी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेसाठी गुप्त मतदान असल्याने त्यावेळी शिवसेनेतील नाराजी बाहेर पडू शकते. किंवा महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून काही नाराज शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार शिवसेनेतून बाहेर पडू शकतात. ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे काही निष्ठावान नगरसेवक नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे हे दोन दिवस गायब झाले होते आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलून त्यांनी आपले मौन सौडले होते. पुन्हा मराठी माणसांनीच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, असे सांगून तमाम मराठी माणसांचा अपमान केला होता.


खरे सांगायचे तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सल्लागारांनी केलेली प्रत्येक खेळी चुकत गेली. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या श्रद्धा जाधव निवडून येणे यात उद्धव ठाकरे यांचे काहीही कर्तृत्व नाही. बाय लक त्यांना ते यश मिळाले आहे. आपल्या स्वताच्या ताकदीवर शिवसेनेतील नाराजी दूर करता येत नाही म्हणून शिवसेनाप्रमुखांना मैदानात उतरवून त्यांनी आपली लंगडी बाजू सावरली आहे. आताही शिवसेनाप्रमुख दर पंधरा दिवसांनी शिवसेनाभवनात कार्यकर्ते, पदाधिकारी यांना भेटतील, असे जाहीर केले आहे. म्हणजे आपल्या चेहऱयाऐवजी ते पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांचाच चेहरा पुढे णात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईवरच त्यांचे नेतृत्व पुढे येत आहे. राज ठाकरे यांनी आपल्या स्वताच्या ताकदीवर आणि हिंमतीवर तीन वर्षात सर्वसामान्य मराठी मनावर अधिराज्य निर्माण केले आहे. आपल्या पक्षाची ताकद दाखवून दिली आहे.


तेव्हा महापौर निवडणुकीतील विजयाच्या आनंदात मश्गुल न राहता उद्घव यांनी जमिनीवर उतरून आत्मपरीक्षण करावे. तसे केले तर हा विजय नसून अप्रत्यक्ष पराजयच असल्याचे त्यांच्या लक्षात येईल.          

3 comments:

  1. ११४ विरुद्ध ९५ अशा मोठ्या फरकाने धूळ चारली.
    हे जरा लक्षात घ्यावे.उगाच विरोधासाठी विरोध नको.
    बाकी जे तठ्स्त राहिले ते जरी दुसर्या बाजूला गेले असते तरी फरक नसता पडला.

    असो शिवसेनेच्या मिळालेल्या यशातही काहीना चुका काढायची सवय असते चालायचं

    ReplyDelete
  2. अनामिक,
    नमस्कार
    आपले म्हणणे मान्य. विरोधासाठी विरोध नाही. पण लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची जी अधोगती झाली, त्याचे काय, विद्यमान नेतृत्व सर्वाना बरोबर घेऊन जाण्यात अपयशी ठरले आहे, शिवसेनेतील निष्ठावान शिवसैनिक, नगरसेवक, आमदार व पदाधिकारी नाराज आहेत त्याचे काय, मनसेमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असे जे सांगत होते, ते विधानसभा निवडणुकीनंतर पराभवाला खुलेपणाने सामोरे का गेले नाहीत, मनसेने विधानसभा निवडणुकीत जे शिवसेनेचे बालेकिल्ले होते, तेथेही मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेत जे काही सध्या चालले आहे, त्यावर शिवसेना नेतृत्व गंभीरपणे विचार करणार आहे की नाही, हा खरा मुद्दा आहे. बहुमत होते तर शिवसेना शेवटपर्यंत गॅसवर का होती, आपल्याच नगरसेवकांवर विश्वास नव्हता का. आणि आता खरी परीक्षा महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत होणार आहे. पाहू या काय होते ते. असो.
    आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबाबत आभार.

    ReplyDelete
  3. Ekandarit, ShivSene chyaa leadership baddal lokanna hi kaaLjee aahe kee BaLa sahebaanchya nantar kon? He kaLjee donhi prakarchya-virudha ani shivsainikanchyat pan- lokannmadhye disun yete.ani, vishesh mhanje, Raj ne sena sodlyanantar tar jaastach! Me swataha sainik nahi paN virodhi paN naahi.karan mala ase vaTte ki senene swatahacha mul chehera badalu naye jyamule Marathi maNasache nuksan hoil. Dhanyavad!

    ReplyDelete