01 December 2009

हात उंचावून मतदान

बृहन्मुंबई महापालिकेसह राज्यातील अन्य काही महापालिकांच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक होत आहे. या सर्व महापालिकांमध्ये हे मतदान हात उंचावून आणि आवाजी पद्धतीने होणार आहे. या महापालिकांमध्ये अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापौर-उपमहापौर पदाची निवडणूकही गुप्त मतदान पद्धतीने न होता हात उंचावून पद्धतीनेच झाली होती. त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी गुप्त मतदान पद्धतीत बदल करुन ही नवी पद्धत आणण्याचा अध्यादेश जारी केला होता. महापौर-उपमहापौर निवडणुकीसह विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी तसेच या समित्यांवरील सदस्यांची निवडही हात उंचावून  पद्धतीने करण्यात आली होती. निवडणुकीतील घोडेबाजार आणि अर्थपूर्ण व्यवहार टाळण्यासाठी देशमुख यांनी एक चांगला पायंडा सुरु केला आहे.


कोणतीही निवडणूक म्हटली की त्यात कोटीच्या कोटी उड्डाणे होत असतात. त्यामुळेच नगरसेवक ते खासदार पदापर्यंतची निवडणूक लढणे हे सर्वसामान्यांसाठी  अत्यंत कठीण जाते. जो पैसेवाला आणि पैसे खर्च करु शकणारा आहे, तोच यात बाजी मारतो हा समज त्याममुळेच अधिक दृढ झाला आहे. या निवडणुकींप्रमाणेच नंतर होणाऱया विविध निवडणुकांमध्येही घोडेबाजार हा ठरलेला असायचा. गुप्त मतदान असल्याने आपले मत फुटले तरी ते कोणाला कळण्याची भीती नसल्याने ही फोडाफोडी सहज के्ली जायची. त्यासाठी लाखो, कोट्यवधी रुपयांची उधळण होत असे. किंवा कोणाला काही वेगळी आमीषेही दाखवली जात असत. मात्र गुप्त मतदानाऐवजी हात उंचावून मतदान करण्याची पद्धत सुरु केल्यामुळे या घोडेबाजाराला नाही म्हटले तरी आळा बसला आहे. कारण उघडपणे मतदान होत असल्याने शक्यतो पक्षाचा आदेश झुगारुन व पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान करण्यास आता कोणीही सहजासहजी तयार होणार नाही. असे केले तर त्याचा थेट परिणाम म्हणजे पक्षविरोधी मतदान केल्यामुळे तो नगरसेवक म्हणून अपात्र ठरू शकतो.


महापौर-उपमहापौर किंवा विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी  प्रत्येक नगरसेवक माझे मत मी अमूक उमेदवाराला देत आहे, असे उभे राहून जाहीर करतो. याची नोंद तसेच चित्रिकरण पालिका प्रशासनाकडून करण्यात येत असते. तसेच त्यानंतर प्रत्यक्ष मतदान घेताना अमूक एका उमेदवाराला कोणाचे मत आहे, अशी विचारणा केल्यानंतर त्याला मत देणाऱयांनी आपला हात उंच करुन मत नोंदवायचे असते. त्याचीही नोंद ठेवली जाते. या पद्धतीमुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आली. अत्यंत चांगला अशी पद्धत विलासराव देशमुख यांनी सुरु केली. तसेच दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली तर पूर्वीच्या पद्धतीनुसार कास्टींग व्होटचा अधिकार महापौरांना असायचा. ते आपले मत ज्याच्या पारड्यात टाकतील त्या उमेदवाराला विजयी घोषीत केले जायचे. त्यातही बदल करण्यात येऊन समसमान मते पडली तर चक्क दोन्ही उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी टाकून उमेदवाराला विजयी करण्याची नवी पद्धतही अंमलात आणली गेली.


महापौर-उपमहापौर निवडणूक पद्धतीत ज्या प्रमाणे हात उंचावून मतदान करण्याची पद्धत आणली गेली तशीच ती विधानपरिषदेवरील आमदारांची निवड करण्यासाठीही लागू केली जावी. म्हणजे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही जो घोडेबाजार चालतो, त्यालाही आळा बसू शकेल.  विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत निर्णय घेऊन एक नवा पायंडा सुरु करावा आणि विधानपरिषद निवडणुकीतील घोडेबाजारालाही लगाम घालावा.            

No comments:

Post a Comment