16 December 2009

प्रांजळ आत्मकथन-रास

ज्येष्ठ कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर यांनी लिहिलेले रास हे आत्मचरित्र नुकतेच वाचनात आले. मौज प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. अत्यंत प्रांजळ असे हे आत्मकथन असून आपले आयुष्य त्यांनी जसे आहे तसे पारदर्शकतेने मांडले आहे. मराठी साहित्यातील एका ज्येष्ठ कवीची पत्नी म्हणून या आत्मकथनात कुठेही बडेजाव किंवा मीपणा दिसत नाही.


सुमा या विंदांच्या द्वितीय पत्नी. सुमा यांचाही पहिला विवाह झाला होता. दुर्दैवाने त्यांच्या पतीचे निधन झाले. तर  करंदीकर यांच्याही पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. करंदीकर यांना विनापत्य विधवेबरोबरच लग्न करायचे होते. सुमा यांचे स्थळ त्यांना सुचवल्यानंतर ते सुमा यांच्या मामांकडे येऊन त्यांना भेटले. २८ जानेवारी १९४७ रोजी मामाच्या घरी देवांसमोर सुमा या करंदीकर झाल्या. त्या मुळच्या कुसुम दामले. नंतरच्या ज्योत्स्ना साने आणि विंदा करंदीकर यांच्याशी लग्न झाल्यानंतर सुमा करंदीकर.


प्रसिद्ध व्यक्तींच्या बायकोंनी लिहिलेली आत्मचरित्रे म्हणजे काहीतरी खमंग, सनसनाटी आणि वाद होईल, असा मजकूर असे एक चित्र काही आत्मचरित्रांमधून आपल्याला दिसून य़ेते. मात्र सुमा करंदीकर यांचे रास हे आत्मचरित्र त्याला अपवाद आहे. आयुष्यात जे काही वाट्याला आले ते सहजतेने आणि कोणतीही तक्रार न करता स्वीकारणे, आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे जाणे आणि हे सर्व करतानाही त्याचा कुठेही बडेजाव किंवा मी पणा नाही हे महत्वाचे.


असे हे कंरदीकर, अरेरावी, उर्मट, भांडखोर आणि संतापी पण आतून अतिशय ऊाबडे आणि हळवे. तोंडाला येईल ते फडाफडा बोलून मन दुखावणारे, पण जीव तोडून प्रेम करणारे. वरवर अतिशय कंजुष व काटकसरी, पण प्रसंग आला तर नेसलेलेही सोडून देण्याची तयारी असणारे, असे सुमाताई सांगतात, पण त्याचबरोबर करंदीकर यांच्यासारखा प्रतिभावंत, बुद्धिवान आणि थोर विद्वान असा नवरा मिळाला हे माझे सात जन्माचे भाग्य. मी एक सामान्य बाई. एका जन्मीचे नव्हे तर आपल्या जुन्या धर्मकल्पनेप्रमाणे सात जन्मांचे माझे पूर्वसुकृत. हे सर्व अगदी खऱे. पण करंदीकरांना माझ्यासारखी शांत, समजूतदार (माझ्यामते), त्यांना समजून घेणारी आणि त्यांच्या अरेरावीने नाउमेद न होणारी, विवेकी बायको मिळाली हे करंदीकरांचेही भाग्यच. दुसरी एखादी कर्तगार, हुषार बायको मिळती तर एव्हाना चारदा घटस्फोट झाला असता, असेही त्या स्पष्टपणे सांगून टाकतात.


सुमा करंदीकर यांनीही काही कथा लिहिल्या आहेत. त्यांचा एक कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. लग्न झाल्यानंतरचे दिवस, करंदीकर यांच्या सासरची मंडळीं आणि विंदा यांच्याविषयी सुमाताईंनी सविस्तर लिहिले आहे.   बेळगाव, डोंबिवली, माहीम येथील घरे आणि सध्याचे वांद्रे येथील साहित्य सहवास हे निवासस्थान येथील आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. आपली मुले, नातवंडे आणि आयुष्यात जी जी मंडळी भेटली, त्या सर्वांविषयी त्यांनी लिहिले आहे.


साधी व सोपी भाषा आणि थोडीशी विस्कळीत पण एकेक आठवणींचा पट उलगडून सांगणारी शैली यामुळे हे आत्मकथन वाचनीय झाले आहे.          

No comments:

Post a Comment