25 May 2010

मरावे परी....

धार्मिक समजुती किंवा अन्य काही कारणांमुळे देहदानाकडे अद्याप समाज मोठय़ा संख्येत वळलेला नाही. खरेतर भारतीय संस्कृतीत ‘दान’ हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे मृत्यूनंतर आपल्या देहाचा आणि अवयवांचा जर वैद्यकीय विद्यार्थी किंवा अन्य गरजूंना उपयोग झाला तर त्यासारखे दुसरे पुण्य असूच शकणार नाही. अंधाला डोळे मिळाले तर तो हे जग पाहू शकतो तर संपूर्ण देह वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयोगी पडू शकतो. दान केलेली त्वचा ही भाजलेल्या व्यक्तीच्या अंगावर शस्त्रक्रियेने लावता येऊ शकते. डोंबिवलीतील ‘दधिची देहदान मंडळ’ हे गेली २२ वर्षे मरणोत्तर देहदान या विषयाबाबत समाजात जनजागृतीचे काम करत आहे.


पुण्याचे दिवंगत ग. म. सोहनी यांनी मरणोत्तर देहदानाचा प्रचार आपल्या हयातीत केला होता. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन डोंबिवलीतील गुरुदास तांबे यांनी मरणोत्तर देहदानाबाबत प्रचार-प्रसार करण्याचा वसा घेतला. ‘जीपीओ’मधून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी या कामाला सुरुवात केली. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे त्यांनी स्वत:चा देहदानाचा अर्ज भरून दिला. पुढे या विषयाचा अधिक जोमाने प्रचार करण्यासाठी १९८८ मध्ये दधिची देहदान मंडळाची स्थापना केली. मंडळाचे आज पंधराशे सभासद असून मंडळाकडून आत्तापर्यंत ३०० जणांचे मरणोत्तर देहदान करवून घेण्यात आले आहे. मंडळाचे सभासद डोंबिवली, कल्याण, ठाणे, कळवा, अंबरनाथ, बदलापूर, मुंबई, पुणे, नाशिक आदी विविध ठिकाणी राहणार आहेत. पौराणिक काळातील दधिची ऋषींचे नाव सर्वाना परिचित आहेच. देहदान करणारी जगातील पहिली व्यक्ती म्हणून दधिची ऋषींचे नाव घेतले जाते. इंद्र आणि अन्य देवांच्या सांगण्यावरुन दधिची ऋषींनी प्राणत्याग करून आपला देह देवाना दिला. या ऋषींच्या अस्थींपासून देवांनी ‘वज्र’ नावाचे शस्त्र तयार केले आणि त्याने वृत्रासूराचा वध केला. त्यांचेच नाव मंडळाला देण्यात आले.

हळूहळू का होईना पण मरणोत्तर देहदानाबाबत समाजात जागरूकता निर्माण होत असून ती चांगली गोष्ट आहे. नुकतेच दिवंगत झालेले ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यानीही मरणोत्तर देहदान केले. त्यापूर्वी उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, ज्येष्ठ समाजवादी नेते मधु दंडवते, पश्चिम बंगालचे दिवंगत मुख्यमंत्री ज्योती बसू यांनीही देहदान करून एक चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे. मृत्यूनंतर नेत्रदान व त्वचादान करता येते. विशिष्ट वयातील देहदान झालेल्या व्यक्तीची हाडेही दुसऱ्या व्यक्तींना उपयोगी पडतात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात किंवा घरी झालेला असला आणि त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृत व्यक्तीच्या त्वचादानास परवानगी दिली तर त्या मृत व्यक्तीच्या मांडी किंवा पाठीवरील त्वचा काढून घेता येऊ शकते. मुंबईत शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात डॉ. माधुरी गोरे यांच्या प्रयत्नातून २० एप्रिल २००० पासून ‘त्वचापेटी’ सुरूकरण्यात आली आहे. मरणोत्तर त्वचादान करण्याची सोय या रुग्णालयात आहे.

मरणोत्तर देहदानाबरोबरच मंडळातर्फे नेत्रदान, त्वचादान आणि अवयवदान याबाबतही प्रचार-प्रसार केला जात आहे. मंडळाकडून ‘महर्षी दधिची देहदान पत्रिका’ हे त्रमासिकही गेली सात वर्षे प्रकाशित करण्यात येत आहे. देहदानाबाबत शंका समाधान, देहदानाबाबतची माहिती, देहदान केलेल्यांचा परिचय, मंडळाचे सभासद झालेल्या व्यक्तींची नावे आणि या विषयासंदर्भातील विविध लेख यात देण्यात येतात. मरणोत्तर देहदानासाठी आवश्यक तो अर्ज भरलेला नसला तरीही नातेवाईकांची इच्छा असेल तर एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या देहाचे दान करता येऊ शकते. तसेच एखाद्या व्यक्तीचे बाहेरगावी निधन झाले तरीही तेथील जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे त्या व्यक्तीचा मृतदेह दान करता येऊ शकतो.

दधिची देहदान मंडळाने या विषयावर ‘देहदान शंका आणि समाधान’ हे पुस्तकही प्रकाशित केले आहे. या पुस्तकात मंडळाचे कार्य, मरणोत्तर देहदान-गरज कायद्याची, नेत्रदान, महाराष्ट्रातील नेत्रपेढय़ा, देहदात्यांच्या वारसांकडून मंडळाची अपेक्षा, मरणोत्तर देहदानाबबात सर्वसामान्य लोकांच्या मनात असलेल्या विविध शंका, प्रश्न आणि त्यांची उत्तरे, अवयव दानाबाबत असलेले समज व गैरसमज, अवयवदान कायदा, मरणोत्तर देहदान चळवळ, या संदर्भातील आवश्यक ते अर्ज, महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालये, त्यांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक आदी माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

देहदान या विषयाबाबत अधिक माहितीसाठी दधिची देहदान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे संपर्क दूरध्वनी पुढीलप्रमाणे-

गुरुदास तांबे ०२५१-२४९०७४०/ विनायक जोशी ९३२४३२४१५७/ सुरेश तांबे ०२५१-२४५३२६६
देहदानासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयांचे दूरध्वनी
१) ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालय-मुंबई, शरीररचना शास्त्र विभाग

०२२-२३७३५५५५ (विस्तारित क्रमांक २३०२)

वेळ सायंकाळी ५ ते सकाळी ८ (निवासी डॉक्टर)

२) राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, कळवा

०२२-२५३४७७८४/८५/८६

शरीररचना शास्त्र विभाग (विस्तारित क्रमांक-३००, ३०१, ३०२, ३०४)

वेळ सायंकाळी ५ ते सकाळी ८ (निवासी डॉक्टर)

३) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्क, कोल्हापूर

४) पद्मश्री डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर

दूरध्वनी ०२३१-२६०१२३५/२६०१२३६.
 
(या विषयावर मी पूर्वी लिहिले होते की नाही ते आठवत नाही. त्यामुळे लेख देत आहे. लेखनाची द्विरुक्ती झाली असल्यास क्षमस्व)

No comments:

Post a Comment