18 May 2010

पुन्हा एकदा दंतेवाडा

नक्षलवाद्यांनी छत्तीसगड जिल्ह्यातील दंतेवाडा येथे  पुन्हा एकदा हल्ला करुन पन्नास जणांचे बळी घेतले.

वृत्तपत्रातून आणि वृत्तवाहिन्यांवरुन पुन्हा एकदा या रक्तलांछीत कृत्याच्या बातम्या आणि दृश्ये दाखवली गेली.

नेहमीप्रमाणे केंद्र शासन, राज्य शासन आणि राजकीय नेत्यांनी पोपटपंची करून नक्षलवाद्यांचे आव्हान मोडून काढू, पुन्हा असे घडू देणार नाही, असे सांगितले.

सत्ताधारी, विरोधक, हा पक्ष आणि तो पक्ष यांनी एकमेकांवर तोंडसुख घेतले. नक्षलवाद आणि नक्षलवाद्यांचा पूर्णपणे बिमो़ड करण्याच्या बाता मारल्या.

यापूर्वीही दंतेवाड्यात असाच हल्ला झाला होता, १२ मार्च १९९३ मध्ये दहशतवाद्यांकडून मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले होते, त्यानंतरही मुंबई आणि देशभरात दहशतवाद्यांचे हल्ले झाले आणि त्यात निरपराध नागरिकांचे बळी गेले होते.

रेल्वेतीस बॉम्बस्फोट, २६/११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला, त्यापूर्वी संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला, इंदिरा गांधी, जनरल अरुणकुमार वैद्य, राजीव गांधी यांच्या हत्या झाल्या.

 तिकडे काश्मीरमध्ये आपल्या जवानांवर हल्ले होतच आहेत, त्यात आपलेच जवान मृत्युमुखी पडताहेत, कारगीलही झाले पण तरीही आपण शहाणे झालो नाही की त्यातून काही शिकलो नाही.

कंदहार झाले, पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांना आपण सोडून दिले. तरीही आपण काहीच करत नाही.

अरे काहीच कसे करत नाही, शब्दांचे बुडबुडे फोडतो ना, पाकिस्तानला पोकळ इशारे देतो ना, दहशतवाद मोडून काढण्याच्या गप्पा करतोच ना, दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना लाखो रुपयांची मदत करतो ना,

कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले जवान आणि पोलीस अधिकारी यांना मरणोत्तर पुरस्कार देतो ना, वर्षातून एक दिवस त्यांना श्रद्धांजली वाहतो ना, त्याचाही इव्हेंट साजरा करतो ना,

जो पर्यंत आपल्या देशात मुर्दाड, शिखंडी आणि कोणतीही ठोस कृती न करणारे सत्ताधारी आणि विरोधक आहेत, पोशाखी व निव्वळ पोपटपंची करणारे बोलघेवडे नेते आहेत, तोपर्यंत हे असेच होत राहणार, दंतेवाडाही घडणार आणि २६/११ ही होणार...

यात बदल घडणार नाही का, आपल्या देवांच्या हातात असलेली शस्त्रे देवानीही शोभेसाठी हातात धरलेली नाही, वेळ आल्यावर त्याचा वापर केलाच ना,

 शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलाच ना, श्रीकृष्णाने आपल्या मामाचा कंसाचा वध केलाच ना, रामाने रावणाला मारलेच ना, देवीने महिषासूर आणि अन्य राक्षसांना मारलेच ना...

मग आपणच इतके सर्व घडूनही गप्प का, आपल्यातील शौर्य संपले आहे की भारतातील लोकसंख्या या निमित्ताने आपोआपच कमी होत आहे, म्हणून सत्ताधारी आणि विरोधकही खुष आहेत,

सहिष्णू, सहिष्णू म्हणून किती काळ आपण आपलेच कौतूक करत राहणार, केलेल्या गुन्ह्यासाठी गुन्हेगाराला जोपर्यंत जरब बसेल अशी शिक्षा होत नाही, गुन्हेगाराला आपण केलेल्या कृत्यासाठी कठोर शासन भारतात होते, याची प्रचिती येत नाही, तोपर्यंत असेच होत राहणार...

 अफजल गुरू झाला आता कसाबलाही आपण पोसत राहणार आणि तरीही म्हणणार मेरा भारत महान...

    
  

4 comments:

 1. स्व आनी स्वपक्षाच्या हिता पुढे या सरकारला देशाचे काही घेणे देणे आहे कि नाही ते कळत नाहि... हुजरेगिरी आणि भ्रष्ट मंत्र्यांचे पथक घेवून मनमोहनशिंग भारतास कुठे घेवून चाललेत ते कळणे अवघड नाहि. मला प्रश्न पडतो वारंवार हे असले नमुने जनता निवडून देतेच कसे?.. तुम्ही रास्त लिहले आहे.. पटले..

  कोट्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा ह्या सरकारने पाघंरलेला आहे. धर्माच्या नावावे भेदाभेस टिकवून ठेवणारे हेच आहेत

  ReplyDelete
 2. रक्त थंडगार पडलंय.. कम्युनिस्टांच्यावर देशद्रोही म्हणून खटले का चालवले जाऊ नयेत? उघड उघड धमकी दिली होती त्यांनी !

  ReplyDelete
 3. साळसूद पाचोळा, महेंद्र
  आपल्या प्रतिसादाबद्दल आभार

  ReplyDelete
 4. नक्षलवाद्यांनी आपली माणसे राज्य पोलिसांत आणि राज्यशासनात पेरलेली आहेत. त्यामुळे अशा घटना होतात. दिग्विजय सिंगासारख्या माणसाला वेसण घालण्याचे अधिकार गृहमंत्रालयाला दिल्यासच हे प्रकार थांबतील.

  ReplyDelete