14 May 2010

पुस्तकांची दुर्दशा

ग्रंथालय’ म्हणजे पुस्तकांचे माहेरघर. ग्रंथालयात आलेल्या पुस्तकांची योग्य प्रकारे काळजी आणि निगा राखली जावी, त्यांचे योग्य प्रकारे जतन आणि संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा साहित्यप्रेमींची असते. मात्र ग्रंथालयाकडूनच पुस्तकांची योग्य काळजी घेतली जात नसेल तर तेथील पुस्तकांना वाळवी लागून ती कुजायला आणि नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. मुंबईतील राज्य मध्यवर्ती ग्रंथसंग्रहालयाकडे आलेल्या लाखो पुस्तकांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्याने त्यांची अक्षरश: दूरवस्था झाली आहे. या पुस्तकांची अवस्था पाहिल्यानंतर साहित्यप्रेमी वाचकांच्या मनाला नक्कीच यातना होतील.


डेलिव्हरी बुक्स अ‍ॅक्ट १९५४ आणि प्रेस अ‍ॅण्ड रजिस्टेशन अ‍ॅक्ट १८६५ नुसार भारतात कोणत्याही भाषेत प्रकाशित झालेले वर्तमानपत्र, पुस्तक किंवा कोणतेही नियतकालिक भारतातील चार प्रमुख ग्रंथालयांना पाठवावे लागते. भारतात दिल्ली येथील सार्वजनिक वाचनालय, कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, चेन्नई येथील कॉनेमेरा लायब्ररी आणि मुंबईतील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय यांचा समावेश आहे. या चार ग्रंथालयांत पुस्तके, वर्तमानपत्रे दाखल केल्यानंतर त्यांचे जतन आणि संवर्धन केले गेले पाहिजे. मात्र राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात जतन आणि संवर्धनाऐवजी पुस्तकांची वाट कशी लागेल, ती नष्ट कशी होतील, त्याकडेच लक्ष दिले जात असल्याचे तेथील सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाकडे आलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके मुंबादेवी येथील महापालिका शाळेच्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आली आहेत. गेल्या दहा वर्षांपासून या शाळेत ग्रंथालयाकडे आलेली पुस्तके ठेवली जात आहेत. मात्र ही पुस्तके येथे ठेवली की टाकली जात आहेत, त्याची कल्पना बातमीतील छायाचित्रांवरुन कोणाही सुबुद्ध नागरिकांना येऊ शकेल.

पुस्तकांसाठी येथे रॅक आहेत, ठराविक काळानंतर जंतुनाशक फवारणीही येथे केली जाते. मात्र तरीही पुस्तकांची योग्य प्रकारे निगा राखली जात नाही. तसेच त्यांचे जतन आणि संवर्धनही काळजीपूर्वक केले जात नाही. त्यामुळे अनेक पुस्तके कुजली असून धूळ, कबुतरांची विष्ठा आणि अन्य काही कारणांमुळे वाया गेली आहेत. तर अनेक पुस्तके रॅकऐवजी जमिनीवर वाटेल तशी धूळ खात पडली आहेत. या ठिकाणी पुस्तकांची साफसफाई आणि देखभाल करण्यासाठी अवघे दोन-चार कर्मचारी आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांच्या संख्येत वाढ करण्यात आलेली नाही. पुस्तके खराब झाली, त्यांना वाळवी लागली की ती रद्दीच्या भावात विकली जातात, असेही ग्रंथालय सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात देशभरातून २२ भाषांमधील पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे येत असतात. मात्र या पुस्तकांची योग्य प्रकारे दखल न घेतल्याने हे साहित्य वैभव वाया चालले आहे.

मुंबादेवी प्रमाणेच मुलुंड (पश्चिम) येथे फिरोजशहा मेहता बिल्डिंग आणि जे. जे. रुग्णालयाच्या आवारातील महापालिका शाळेत अशीच हजारो पुस्तके पडून असून त्यांचीही दुरवस्था झाली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, यासंदर्भात राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाचे प्रभारी संचालक सनान्से यांच्याकडे विचारणा केली असता ‘मी आता दुसऱ्या दूरध्वनीवर बोलत आहे. मी तुमच्याशी थोडय़ा वेळाने संपर्क साधतो’ असे उत्तर त्यांनी दिले. मात्र त्यांनी संपर्क साधला नाही.
 
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त, पान क्रमांक १ वर १४ मे २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.) 

7 comments:

 1. पंधरा वर्षांपूर्वी एका भाषणात विद्‌या बाळ म्हणाल्या की लोक बीअर-चिकन-साठी २००-३०० रुपये सहज़ उधळतात, पण शंभर रुपयाचं पुस्तक मात्र त्यांना महाग वाटतं. इंडियन लोकांना पुस्तकांबद्‌दल आस्थाच नाही, ही तक्रार मी सुनीताबाई देशपांड्यांच्या तोंडूनही ऐकली आहे. सुरवातीला अगदी पु लं च्याही पुस्तकांना तेवढा खप नव्हता. पुणे-दिल्ली इथे अगदी ब्रिटिश लायब्ररीतही १५ दिवसांआधीचा लंडन टाइम्स मागितला, तर त्यांच्या कपाळावर आठ्या येतात. उलट मी इंग्लंडमधे सप्टेंबरात एप्रिलचा अंक मागितला तर ती बाई म्हणाली : कुठल्या वर्षाचा? मी म्हटलं, (मनात: जास्त आगाउपणा करताय) प्रकट : किती आधीचा देऊ शकाल? तर म्हणे पाच वर्षांपर्यंत. मग मी हट्टानी त्या तारखेचे गेल्या तीन वर्षांचे पेपर मागितले आणि मला ते लगेच मिळालेही.

  भारतातल्या अनावस्थेचा नाबर साहेबांनी उल्लेख केला आहेच. याला आपण सगळेच ज़बाबदार आहोत. तुम्ही काही प्रयत्न करणार असाल तर तुम्हांला त्यात यश मिळो.

  ReplyDelete
 2. आमच्या घराजवळच्या रद्दीच्या दुकानात एका लायब्ररीचा शिक्का असलेली बरीच चांगली पुस्तकं ( त्या पैकी तर काही एकदम नवीन) पण विकायला ठेवलेली दिसतात. ग्रंथालयातले कर्मचारीच तर या पुस्तक विक्री मधे सहभागी नाहीत ??

  ReplyDelete
 3. पुर्वीच्या काळी दुसऱ्या राजवटीवर केलेल्या आक्रमणात त्यांची संमृद्ध ग्रंथसंपदा जाळुन टाकण्यात येण्याची अनेक उदाहरणे आहेत.

  काळ बदलला.

  अनावस्था तर आहेच पण त्याच बरोबर ज्यांना साहित्याबद्दल रुची, आवड नाही अश्याच माणसांकडुने हि दुरावस्था होवु शकते

  ReplyDelete
 4. हरेकृष्णजी : वाचनालयांची एकूणच अवस्था खराब आहे आणि ज़ुने अभ्यासपूर्ण ग्रंथ तर फारच कमी वाचले ज़ाताहेत. ज़ुन्या विद्‌वानांच्या मेहनतीचं मूल्यमापन करायची सुद्‌धा आपली लायकी नाही. रामदासांच्या, मोरोपन्तांच्या प्रतींचा शोध घेत ते लोक पदरचा पैसा वेचून महाराष्ट्रभर फिरले. आज़ वाचनालयांत सक्रीय असे बहुतेक लोक साठीचे, सत्तरीचे थकलेले आहेत पण तरीही ते ज़मेल तेवढं करताहेत. ते पन्नासखालच्या लोकांना शिव्या देतात आणि माझ्यासारखे निष्क्रिय लोक चूपचाप ऐकतात, कारण तो त्यांना अधिकारच आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ हवं आहे, पण लोक दंग आहेत सिनेमे आणि क्रिकेट पाहण्यात. 'माणसाचं हे चुकीचे दरवाज़े ठोठावणं थांबणार तरी कधी' असा रवीन्द्र पिंगे यांचा असल्याच एका संदर्भात फार छान लेख आहे.

  - नानिवडेकर

  ReplyDelete
 5. श्री.नानीवडेकर,महेंद्र आणि हरेकृष्णजी
  नमस्कार
  आपण व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे. पुस्तके आणि त्याविषयी मनापासुन आस्था व तळमळ असायला पाहिजे. मराठी पुस्तकांच्या किमती भरमसाठ असतात, असे म्हणणारी लोक हॉटेल, सिनेमा,कपड्यांची खरेदी यावर मात्र काचकूच न करता वारेमाप खर्च करतात. असो.
  आपण आवर्जून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार.
  शेखर

  ReplyDelete
 6. विज्ञानवाद्याने परंपरा मानू नयेत असे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगते. विज्ञानवादी बनण्याचा हा सोपा मार्ग का सोडावा याचे उत्तर आपण देऊ शकाल काय

  ReplyDelete
 7. यावर एकच उपाय आहे.तो म्हणजे आपण स्वतः जमतील तशी पुस्तके विकत घेणे.एक सांगा,बरीच वर्षे दुर्मिळ असलेले पुस्तक "महाराष्ट्राचे महामंथन" लेखक कै. लालजी पेंडसे आपण विकत घेतले काय ? सहज विचारले, रागावू नका. हे महापुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा तो जवळपास एकमेव वृत्तांत आहे.
  मंगेश नाबर

  ReplyDelete