23 May 2010

नियती आणि प्रारब्ध

काही वेळेस अशा काही घटना घडतात की माणूस पुन्हा एकदा नियती, प्रारब्ध यावर विचार करायला सुरुवात करतो. मृ्त्यू टाळता येत नाही, माणसाला तो आपल्याकडे खेचून घेतो असे म्हटले जाते. किंवा एखाद्याच्या आयुष्याची दोरीच बळकट असेल तर मृत्यूच्या तावडीतून तो सहीसलामत सुटतो, असेही दिसून येते. मंगलोर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला जो अपघात झाला, त्या निमित्ताने पुन्हा एकदा हे सर्व विचार मनात आले.

या भीषण अपघातामध्ये विमानातील १५८ प्रवासी ठार झाले. हे जे प्रवासी ठार झाले, त्यांच्या पत्रिकेत एकाच दिवशी मृत्यूयोग लिहिलेला होता का, तसेच जे प्रवासी याच विमानातून प्रवास करत होते, पण नशीब बलवत्तर म्हणून वाचले, त्यांच्या पत्रिकेत मृत्यूयोग नव्हता का, त्यांच्या बाबतीत देव तारी त्याला कोण मारी असे म्हणता येईल का, किंवा वृत्तपत्रातील बातम्यांवरुन असेही वाचायला मिळाले की काही प्रवासी याच वि्मानातून प्रवास करणार होते, पण काही कारणाने ते यात बसू शकले नाहीत आणि म्हणून ते वाचले. म्हणजे त्यांचे मरण आत्ता नव्हते म्हणून नियतीने, प्रारब्धाने किंवा देवाने त्यांचा या विमानातील प्रवास चुकवला का,

विमानाचा अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाले, ती तांत्रिक की वैमानीकाची चूक होती, अशा प्रकारच्या टेबलटॉप विमानतळांवर विमान उतरवताना जी खबरदारी घेणे आवश्यक असते, ती घेण्यात आली होती का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तपासाअंती मिळतील किंवा मिळणार नाहीत.

पाप-पुण्य, नशीब, दैव, प्रारब्ध अशा विषयांशी निगडीत एक गोष्ट आठवते. मला वाटते त्याच कथाबीजावर सुहास शिरवळकर यांनी एक कादंबरीही लिहिली होती. एका अरण्यातील एक शिवमंदिर. रात्रीची वेळ आणि बाहेर प्रचंड पाऊस कोसळत असतो. वीजांचा कडकडाटही सुरु. अशा वेळी त्या मंदिरात चार/पाच प्रवासी अडकलेले असतात. वीजा तर मोठ्या प्रमाणात चमकत असतात की कोणत्याही क्षणी या मंदिरावर वीज पडेल आणि आपल्या सर्वांचा मृत्यू त्यात ओढवेल, असे त्यांना वाटत असते. चर्चा करताना असे ठरते की आपल्यापैकी प्रत्येकाने या भर पावसात मंदिरातून बाहेर पडायचे आणि समोरील एका झाडाला हात लावून पुन्हा मंदिरात यायचे. आपल्यापैकी जो कोणी पापी असेल, तो बाहेर पडला की त्याच्या अंगावर वीज कोसळेल तो मरेल आणि आपण इतर सर्व वाचू. एकेक जण बाहेर जाऊन झाडाला हात लावून पुन्हा देवळात येतो. काहीच होत नाही. आता शेवटचा माणूस राहिलेला असतो. तो त्या मंदिरातून बाहेर पडतो  आणि त्याच क्षणी प्रचंड आवाज करत वीज देवळावर पडते.

बाहेर पडलेला माणूस वाचतो आणि आत असलेले सर्वजण मृत्यूमुखी पडतात. म्हणजे शेवटचा बाहेर पडलेला माणूस जो पर्यंत आत होता तोपर्यंत वीज मंदिरावर पडली नाही. सर्व जण सुरक्षित राहिले.  मग ती त्यांची पूण्याई. नशीब, दैव, प्रारब्ध किंवा आणखी काही. पण ज्या क्षणी शेवटचा माणूस मंदिरातून बाहेर पडला तेव्हाच वीज त्या मंदिरावर पडते. ही कथा आहे. पण प्रत्यक्षातही असे काही अनुभव अनेकांना आले असतील.

ज्योतिष, जन्मपत्रिका, मृत्यूयोग, प्रारब्ध, नियती यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जेव्हा असे अपघात घडून मोठ्या प्रमाणात सामुहीक मृत्यू घडतात, त्याला विज्ञानाच्या भाषेत काय उत्तर आहे, अशा प्रकारे अपघाती मृत्यू झालेल्या माणसांच्या पत्रिका मिळवून त्यावर काही संशोधन झाले आहे का, ज्योतिष्यांनी असा प्रयत्न केला आहे का,  ज्योतिष शास्त्र आहे की नाही अशी त्यावर टीका केली जाते. अशा प्रसंगातून मृत्युमुखी पडलेल्या आणि वाचलेल्या लोकांच्या पत्रिकांचा अभ्यास करून काही ठोकताळे, निष्कर्ष मांडता येतील का, त्याचा अभ्यास सगळ्यांसाठी जाहीर होईल का, 

ज्योतिषी किंवा अंधश्रद्धानिर्मूलनवाले यापैकी कोणाही एकाची बाजू घेण्याचा माझा प्रयत्न नाही. जे मनात आले ते लिहिले आहे. विमान, रेल्वे किंवा रस्ता अपघात हे काही सांगून होत नाही. योग्य ती काळजी आणि खबरदारी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. पण हे सर्व करुनही जेव्हा अशा घटना घडतात आणि मृत्यू होतात, तेव्हा काय म्हणायचे. नियती, दैव, प्रारब्ध हे खरे मानायचे का...  
         

4 comments:

 1. > अशा प्रसंगातून मृत्युमुखी पडलेल्या आणि वाचलेल्या लोकांच्या पत्रिकांचा अभ्यास करून काही ठोकताळे, निष्कर्ष मांडता येतील का, त्याचा अभ्यास सगळ्यांसाठी जाहीर होईल का?
  >----

  मी सहमत आहे. हा लेख खूप आवडला. इथे तर १००-१५० लोकच गेलेत. त्सुनामीच्या वेळी (२५०,०००) किंवा हिरोशिमा (ज़े काय ७०-८० हज़ार असतील) त्यांच्या हातावरच्या आयुष्यरेषेची लाम्बी वयाच्या प्रमाणातच असेल? अगदी २५% टक्के लोकांबद्‌दल ज़री ते निरिक्षण ज़मलं, तर आपण त्यामागे काही शास्त्र असू शकेल, हे स्वीकार करू? माझ्या पाहण्या-बोलण्या-वाचण्यात अनेक भाकितं अचंबा वाटेल अशी खरी ठरली आहेत, पण त्याच ज्योतिषांचे अनेक अंदाज़ चुकल्याचीही उदाहरणे आहेत.

  ReplyDelete
 2. श्री.नानीवडेकर,
  नमस्कार
  आपल्या प्रतिक्रिया नेहमीच मुद्देसुद असतात. आपण वेळोवेळी देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आभार.

  ReplyDelete
 3. गणिती तर्कशास्त्राचा वापर सर्वानाच करचा येत नाही. ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत असा प्रकार असणे संभवनीय आहे.

  ReplyDelete
 4. याबाबत आपण जरुर ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी प्रश्नोत्तरातुन सुसंवाद हे पुस्तक वाचावे उपक्रमावर उपलब्ध आहे.
  http://mr.upakram.org/node/1065

  ReplyDelete