03 December 2009

पंचाहत्तर लाखांचे पुस्तक

सचिन तेंडुलकर.  तमाम मराठी माणसांसाठी असलेले अभिमानाचे आणि गौरवाचे नाव. सचिनने मोठ्या मेहनतीने  आज स्वताचे आणि महाराष्ट्राचेही नाव मोठे केले आहे. सचिन नावाभोवतीच एक वलय निर्माण झाले आहे. सचिन हे एक चलनी नाणे झाले असून गोष्टीतील मिडास राजाप्रमाणे सचिन तेंडुलकर ही मुद्रा ज्या ज्या वस्तू किंवा उत्पादन कंपनीवर उमटली की सोन्यापेक्षाही जास्त किंमत आणि महत्व त्याला प्राप्त होते. आजच बहुतेक वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या सचिनबाबतच्या बातम्या वाचल्या तर मी काय म्हणतो ते लक्षात येईल. आता सचिन तेंडुलकर या विषयावर लवकरच  एक पुस्तक प्रकाशित होणार असून त्याची किंमत ७५ लाख रुपये असणार आहे.


आजवर प्रकाशित झालेल्या पुस्तकांमध्ये हे पुस्तक केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील सर्वात महागडे पुस्तक ठरणार आहे. या पुस्तकाचे वजनच ३० किलो राहणार असून पुस्तकाच्या पानांची संख्या ८०० असेल. भारतात किंवा जगभरातही आत्तापर्यंत अनेक  क्रिकेटपटूंवर मराठीसह इंग्रजी आणि अन्य भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मात्र सचिनला जे भाग्य लाभले आहे ते आजवर कोणत्याच क्रिकेटपटूला मिळाले नाही. सचिनने या बाबतीतही सर्व विक्रम मोडून स्वताचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. क्रिकेटमध्ये सचिनने केलेले  धावांचे विक्रम भविष्यात मोडलेही जातील पण या विक्रमी किंमतीच्या पुस्तकाचा विक्रम न भुतो न भविष्यती असाच राहण्याची शक्यता आहे, असे वाटते.


तेंडुलकर ओपस असे या पुस्तकाचे नाव असून लंडन येथील क्रॅकन ओपस या प्रकाशन संस्थेतर्फे ते प्रकाशित केले जाणार आहे. सचिनविषयी सर्व काही असे या पुस्तकाचे स्वरुप राहणार असून सचिनची आजवर कुठेही प्रकाशित न झालेली दुर्मिळ छायाचित्रेही यात असतील, असा दावा प्रकाशकांकडून करण्यात आला आहे. या पुस्तकाची खरेदी करणाऱया पहिल्या दहा ग्राहकांना पुस्तकाबरोबर सचिनच्या रक्ताचा थेंबही मिळणार असल्याचे या बातम्यांमध्ये म्हटले  आहे. 



जाहिरातदार कंपन्यांकडूनही आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी सचिनलाच अग्रक्रम दिला जातो. त्यासाठी सचिनला कोट्यवधी रुपयांचे मानधनही देण्याची त्यांची तयारी असते. आता वस्तू आणि  अन्य उत्पादनांबरोबरच सचिनने पुस्तकांचे क्षेत्रही काबीज केले आहे. पुस्तक खरेदी, विक्री आणि प्रकाशन क्षेत्रातही सचिन तेंडुलकर हा मोहोर उमटवली आहे. सर्वसामान्य माणूस आणि सचिनप्रेमी चाहते तर हे पुस्तक विकत घेऊन वाचू शकणार नाहीत. भारतातील बडे उद्योगपती, राजकारणीच हे पुस्तक विकत घेऊ शकतील. त्यांना केवळ प्रसारमाध्यमातून या पुस्तकाविषयी आलेल्या बातम्या वाचूनच समाधान मानावे लागणार आहे.


     

2 comments:

  1. tya sarva jahiratitach sachinche yash dadle ahe karan bhartat kriketpremin peksha kriketvede jast ahet he janlay bahurashtriya kampanyani, desh vikayla nighel tevha sudha sachincha desh mhanun shikka marun anandane vika !

    ReplyDelete
  2. शिरीष,
    नमस्कार
    आपले म्हणणे खरे आहे. आपण म्हणता तसे होईलही. तेव्हा सचिन काय करेल.
    आपल्या प्रतिसादाबद्दल आभार
    शेखर

    ReplyDelete