09 February 2010

बोलणारी पुस्तके

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड अर्थात ‘नॅब’ या संस्थेने उपलब्ध करुन दिलेली ‘ऑडिओ बुक्स’ अंध व्यक्ती आणि विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरली आहेत. ऑडिओ बुक्समुळे सर्वसामान्यांप्रमाणेच अंधानाही वाचनाचा आनंद घेणे शक्य झाले आहे. कथा, कादंबरी, आत्मचरित्र या सारख्या ललित साहित्याबरोबरच पहिली ते पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीही अभ्यासाची पुस्तके ‘नॅब’ने ऑडिओ स्वरुपात उपलब्ध करुन दिली आहेत. ‘नॅब’च्या ग्रंथालयात पाच हजारांहून अधिक ऑडिओ बुक्स असून महाराष्ट्रासह देशभरातील अंध वाचक त्याचा लाभ घेत आहेत.


‘नॅब’कडे दोन हजारांहून अधिक मराठी भाषेतील ऑडिओ बुक्स असून हिंदी, इंग्रजी, गुजराथी व अन्य भाषेतील ऑडिओ बुक्सचाही त्यात समावेश आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच अंध विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी ‘नॅब’ने शालेय अभ्यासक्रमाची ऑडिओ बुक्स उपलब्ध करुन दिली आहेत. यात पहिली ते पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील पुस्तकांचा समावेश आहे. तसेच बी.एड, डी. एड आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी असलेली पुस्तकेही ‘नॅब’ने तयार केली आहेत. ललित साहित्य आणि क्रमिक पुस्तके अशा दोन स्तरावर ‘नॅब’तर्फे ऑडिओ बुक्स तयार केली जात असल्याची माहिती ‘नॅब’चे संचालक रमण शंकर यांनी दिली.


‘नॅब’च्या कार्यालयात येणारे अंध वाचक, आमची व्यवस्थापन समिती, अंध विद्यार्थी यांच्याकडून येणाऱ्या सूचना आणि शिफारसींनुसार आम्ही कोणती पुस्तके ‘ऑडिओ बुक्स’ म्हणून तयार करायची ते ठरवत असतो. क्रमिक पुस्तकांबरोबरच ललित साहित्यातील कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र या प्रकारातील पुस्तके आम्ही ऑडिओ बुक्स म्हणून तयार करतो. अंध विद्यार्थ्यांसह अंध गृहिणी, ज्येष्ठ नागरिक या पुस्तकांचा लाभ घेत असतात. मराठीतील पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, गो. नी. दांडेकर यांच्यासह मराठीतील अनेक लेखकांच्या पुस्तकांची ‘ऑडिओ बुक्स’ आमच्याकडे आहेत, अशी माहितीही रमण शंकर यांनी दिली.

आमची ही ‘ऑडिओ बुक्स’ बाहेर विक्रीसाठी नसतात. तर ती फक्त अंध व्यक्तींसाठीच आम्ही उपलब्ध करु देतो. ‘नॅब’चे स्वत:चे ऑडिओ बुक्सचे ग्रंथालय, स्वतंत्र स्टुडिओ आहे. आमच्या ग्रंथालयाचे जे सभासद आहेत, त्यानाच ही ऑडिओ पुस्तके आम्ही कुरिअरने घरपोच करतो. आता सीडी स्वरुपातील ही ऑडिओ पुस्तके उपलब्ध असून काही जण आपल्या मोबाईलवरही पुस्तके घेतात आणि ऐकतात. पुस्तके ऐकून झाल्यानंतर ती पुन्हा आमच्याकडे परत केली जातात. सभासदांसाठी वार्षिक पन्नास रुपये शुल्कात आम्ही ही ऑडिओ पुस्तके उपलब्ध करुन देतो. पुस्तकांचे ध्वनिमुद्रण करण्यापूर्वी संबंधित लेखक, प्रकाशक आणि संबंधितांची रितसर परवानगी घेण्यात येते. ही परवानगी देताना याचा उपयोग फक्त अंधांसाठीच केला जाईल, या अटीवरच आम्हाला परवानगी देण्यात येते. त्यामुळे अंधांखेरीज सर्वसाधारण लोकांसाठी आम्ही ही ऑडिओ बुक्स देऊ शकत नसल्याचे ते म्हणाले.

 
गेल्या चाळीस वर्षांपासून आमचा हा उपक्रम अव्याहतपणे सुरु असून आगामी काळातही जास्तीत जास्त पुस्तके ऑडिओ स्वरुपात तयार करुन अंधांना ती उपलब्ध करुन दिली जातील. या ऑडिओ बुक्ससाठी आवाज देण्याकरता व्यावसायिक निवेदकांबरोबरच हौशी निवेदकांचाही यात सहभाग असतो. आकाशवाणीचे निवृत्त निवेदक अनिल कीर, अभिनेते प्रसाद फणसे, प्रसाद पंडित आदी मंडळी आमच्याकडे पुस्तकांना नियमित आपला आवाज देत असतात. ‘ऑडिओ बुक्स’ तयार करण्याच्या या उपक्रमाचा वार्षिक खर्च सुमारे ३० लाख रुपये इतका आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून दरवर्षी सहा ते सात लाख रुपये इतके अनुदान मिळते. मात्र एकूण वार्षिक खर्चाच्या तुलनेने ते कमी आहे. त्यामुळे दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी आमच्या या उपक्रमास मदत करावी, असे आवाहनही रमण शंकर यांनी केले.
 
माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (६ फेब्रुवारी २०१०) पान एकवर प्रसिद्ध झाली असून त्याची लिंक
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=45567:2010-02-05-15-21-53&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81
 अशी आहे.
 
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड आणि अंध व्यक्ती व संस्थांबाबत अधिक माहिती खालील संकेतस्थळांवर मिळू शकेल.
१) http://www.nabindia.org/
२) http://www.senseintindia.org/htmls/nab_mumbai.html
३) http://www.disabled-world.com/artman/publish/famous-blind.shtml 

No comments:

Post a Comment