28 February 2010

धुळवड-मराठी संस्कृतीची आणि अस्मितेची

गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषा, अस्मिता आणि संस्कृतीचा मुद्दा प्रत्येक राजकीय पक्षाचा त्यातही विशेषत: आधी शिवसेना आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कळीचा मुद्दा ठरला आहे. हे दोन्ही पक्ष मराठीच्या मुद्यावरून कायमच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत आदळणारे प्ररप्रांतीयांचे जास्त करुन उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातून आदळणारे लोंढे, त्यामुळे मुंबईची लागलेली वाट, मराठी भाषा व संस्कृतीवर झालेले हिंदूीचे अतिक्रमण या सारखे विषय नेहमीच चर्चेला असतात. मात्र यात होळीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या धुळवडीच्या सणाकडे अद्याप शिवसेना किंवा मनसेचे लक्ष गेलेले दिसत नाही.


खरे तर धुळवड हा आपल्या मराठी संस्कृतीमधील सण नाही. रंगाची उधळण करणारा ‘रंगपंचमी’ हा मराठी संस्कृतीचा सण. पण गेल्या काही वर्षांपासून मुंबईत आपण होळीचा दुसरा दिवस रंगांची धुळवड करुन साजरा करत आहोत. ही धुळवड म्हणजे एकप्रकारे मराठी संस्कृती आणि उत्सवावर उत्तर भारतीयांचे झालेले अतिक्रमणच आहे. उत्तर प्रदेश, बिहार येथून तो सण आपल्याकडे आला आणि आपण आपली रंगपंचमी विसरुन गेलो.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने प्रकाशित केलेल्या विश्वकोशातील नोंदीनुसार रंगपंचमी म्हणजे, ‘फाल्गुन कृष्ण पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदोत्सव साजरा करतात. त्यामुळे याला रंगपंचमी असे नाव प्राप्त झाले. विविध रंगांची चूर्णे पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यांमधून एकमेकांच्या अंगावर उडविले जाते. रंग उडविण्याचा हा उत्सव महाराष्ट्रात फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जात असला तरी उत्तर भारतात अनेक ठिकाणी तो होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.’ तर धुळवड या सणाविषयी विश्वकोशातीलच नोंदीनुसार, ‘एक भारतीय लोकोत्सव. फाल्गुनातील पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा किंवा होलिकोत्सवाचा एक भाग म्हणून फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुळवड साजरी करतात. या दिवसापासून नवे वर्ष सुरु होते असे उत्तर भारतात (पूर्णिमान्त मास)म्हणतात. समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा हा दिवस आहे. उत्तर भारतात या दिवशी सर्व थरातील लोक एकमेकांवर रंग उडवितात. महाराष्ट्रात या दिवशी चिखल फेकण्याची पद्धत होती. होळीचे भस्म अंगाला लावणे यातून ही प्रथा आली असावी. परंतु कालांतराने अश्लील शब्द उच्चारून शंखध्वनी करणे या सारख्या विकृत गोष्टीही या उत्सवात शिरल्या. शिमगा किंवा होळी सणातच धुळवडीचा अंतर्भाव होतो. होळी पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत होळीचा सण मानला जातो.’


रंगपंचमी ही होळीनंतर पाच दिवसांनी येते. पण बॉलिवूडचे सेलिब्रेटिज् आणि आता गेल्या काही वर्षांत दूरचित्रवाहिन्यांनी ‘धुळवड’ उत्सवही आपल्याकडे खेचून घेतला असून त्याचाही या मंडळींनी इव्हेन्ट केला आहे. त्यामुळे आपणही आपला रंगपंचमी हा मूळ उत्सव किंवा परंपरा सोडून होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करायला लागलो आहोत आणि ती सुद्धा अत्यंत विकृत पद्धतीने. आपल्या पंचांगातही फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी असे म्हटले आहे. होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते ते धुलीवंदन. पूर्वी होळीचा अग्नी घरी आणून त्यावर पाणी तापवून त्या पाण्याने आंघोळ करण्याचीही प्रथा आपल्याकडे होती. आता अपवाद वगळता तीही आपल्याकडून कमी होत चालली आहे.


मराठी संस्कृती, सण उत्सव आणि परंपरेवर पाश्चात्यांच्या आक्रमणाबरोबरच काही प्रमाणात देशाच्या अन्य राज्यातील काही सणांचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे आपण आपले उत्सव आणि संस्कृती विसरत चाललो आहोत. हे कुठेतरी थांबून आपण आपली रंगपंचमी कधीपासून साजरी करणार?

7 comments:

 1. रंग्पंचमी असते हेच हल्ली कोणाला माहीत नाही. पण पुण्यात मी रंगपंचमी साजरी होत असलेली पाहिली आहे.नवरात्रात सुद्धा गर्ब्याचे महत्त्व जास्त आहे.आपले भोंडला वगैरे खेळ हे फार कमी खेळले जातात. तरी हल्ली ठाण्यात सार्वजनिक भोंडला खेळला जातो.

  ReplyDelete
 2. शेखरदादा,
  तू उपस्थित केलेली शंका खरोखर रास्त आहे. मनसे-शिवसेनेच्या नेत्यांनी याचा जरूर विचार करावा. पण मला वाटतं की धुळवड साजरी करण्यासाठी उत्तर भारतीयांच्या प्रभावापेक्षा सुट्टीचा संबंध अधिक आहे. माझ्या माहितीप्रमाणे पुण्यात अजूनही रंगपंचमीला सुट्टी असते (अगदी वर्तमानपत्रांनाही) आणि तिथे अजूनही रंगपंचमीलाच रंग खेळला जातो. मुंबई प्रामुख्यानं सु्ट्टी असल्यामुळे लोकांना रंग खेळणं सोयीचं होतं, इतकाच त्याचा अर्थ आहे, असं मला वाटतंय.
  बाकीच्या समाजाच्या वर्षानुवर्षांच्या चालीरिती बदलाव्यात इतका सामान्य कामगार उत्तरभारतीयाचा प्रभाव नसावा... उत्तर भारतीय बाबू लोकांनी अनेक वर्षांपूर्वी धुळवडीची सुट्टी पदरात पाडून घेतली. त्यामुळे आपला मराठी माणूसही मग याच दिवशी रंग खेळू लागला, इतकंच...

  ReplyDelete
 3. सीमा, अमोल
  नमस्कार. प्रतिसादाबद्दल आभार

  ReplyDelete
 4. मस्त सुंदर लेखआवडला महेश

  ReplyDelete
 5. लेख आवडला. संबंधित राजकीय पक्षांच्या यावर प्रतिक्रिया कळल्या तर बरे होईल.

  ReplyDelete
 6. उन्मेष
  आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete
 7. > फाल्गुनातील पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा किंवा होलिकोत्सवाचा एक भाग म्हणून फाल्गुन वद्य प्रतिपदेला धुळवड साजरी करतात. या दिवसापासून नवे वर्ष सुरु होते असे उत्तर भारतात (पूर्णिमान्त मास)म्हणतात.
  >----

  माझ्या एका व्यासंगी उत्तर भारतीय मित्रानी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा चैत्र (कृष्ण प्रतिपदेला) धूळवडीला सुरु होत असला तरी ते लोकही त्यानन्तर येणार्‍या शुक्ल प्रतिपदेलाच (गुढी पाडवा) नववर्षदिन मानतात. हिन्दु संस्कृतीची उत्तम माहिती असलेले काही गोरे म्हणतात की परस्परविरुद्‌ध गोष्टी दिसताच त्या सर्वच गोष्टींना आपल्यात सामावून घेण्यात हिन्दु धर्म वाकबगार आहे; त्यासाठी 'वर्षाचा सोळावा दिवस नववर्षदिन' असली तडज़ोडही हिन्दुंना चालते. याला काही लोक गोंधळ म्हणतात तर काही लोक सर्वसमावेशकता.

  ReplyDelete