06 February 2010

नानाची टांग

प्रिय नाना पाटेकर,
नमस्कार

आता पत्राची सुरुवात जय महाराष्ट्र म्हणून की जय भारत म्हणून करु,  असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे. खऱे तर कोणत्याही भाषणाचा समारोप हा कोणीही सर्वसामान्य मराठी व्यक्ती किंवा मान्यवर हे अगोदर जय महाराष्ट्र आणि नंतर जय भारत म्हणून करत असतात. आजपर्यंत आमच्या मनात तुमच्याबद्दल प्रखर मराठीप्रेमी आणि धर्माभिमानी अशी ओळख होती. सार्वजनिक क्षेत्रातील तुमचा वावर, प्रसार माध्यमातून तुमच्याविषयी आलेले लेख, प्रसिद्ध झालेल्या तुमच्या मुलाखती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आपल्याला असलेले प्रेम, आदर, मराठी असल्याचा अभिमान असे तुमची इमेज तयार झाली होती. मात्र आजच्या वृत्तपत्रातून पुण्यातील एका कार्यक्रमात तुम्ही केलेल्या भाषणाचा वृत्तान्त वाचला आणि धक्का बसला. नाना पाटेकर तुम्हसुद्धा...


साधना ट्रस्टने आयोजित केलेल्या एका कायर्क्रमात मी केवळ मराठीच कसा असा सवाल तुम्ही उपस्थित केला. मी देशातल्या इतर राज्यांचाही आहे व इतर राज्यातील मंडळीही माझीच आहेत. त्यामुळे मी केवळ मराठी किंवा महाराष्ट्रीयन माणूस कसा असू शकतो, असेही तुम्ही या वेळी बोललात. इलेक्ट्रॉनिक मिडियातूनही तुमचे हे वक्तव्य आम्ही पाहिले. तुमच्या या विधानाने समस्त मराठी समाज, तुमचे चाहते यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण तुम्ही राजकारणी नाही, राजकारण्यांसारखी गेंड्याची कातडी आणि प्रवृत्तीही तुमची नाही. तुम्ही एक संवेदनशील माणूस आणि अभिनेता म्हणून ओळखले जाता. समाजातील दुर्बल घटकांसाठी तुम्ही जी काही मदत करता, त्याची कधीही दवंडी पीटत नाहीत. तुम्ही जे करता, त्यात आत-बाहेर असे काहीही नसते. जे आहे ते रोखठोक. मग तुमच्या या स्वभावाला आत्ताच असे बोलून मुरड का घालाविशी वाटली. राजकारणात उतरायची किंवा शासकीय पुरस्कार मिळविण्यासाठीची तर ही पहिली पायरी नाही ना


बॉलिवूडमध्ये मराठीचा झेंडा अभिमानाने घेऊन फिरणारे, सर्वसामान्यांशी नाळ अजुनही न तोडलेले आणि कायम जमिनीवर राहणारे म्हणून आम्ही तुम्हाला ओळखत होतो. हिंदी चित्रपट करुन आणि येथील सर्वसामान्य प्रेक्षकांच्या प्रेमावर मोठे झालेले सर्व कलाकार हे बॉलिवूडच्या कोणत्याही जाहीर समारंभात, पुरस्कार प्रदान सोहळ्यात हिंदीला टांग मारून जणू काही हे कायर्क्रम भारतातील तोणत्याही शहरात नव्हे तर इंग्लंड, अमेरिकेतील प्रेक्षकांसमोर चालले आहेत, असे समजून सर्रास इंग्रजीत बोलत असतात. त्यात तुमचा अपवाद होता. अशा पुरस्कार वितरण सोहळ्यात किंवा कार्यक्रमात तुम्ही आवर्जून मराठी किंवा हिंदीतच बोलता, अशी तुमची प्रसिद्धी होती आणि आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत असल्याचेही तुम्हीच जाहीरपणे सांगितले होते. मग पुण्याच्या कार्यक्रमात असे अचानक काय झाले की तुम्हाला मी केवळ मराठीच कसा, असा प्रश्न पडला.


मागे सचिन तेंडुलकर यानेही मुंबईबाबत असेच गुळमुळीत विधान केले होते. त्यावेळीही त्याने मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली, हे शहर बहुभाषिक असले तरी सगळ्यात पहिल्यांदा मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. आणि राज्याच्या राजधानीत मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे, मराठी भाषा व मराठी माणसांना डावलून चालणार नाही, असेही त्याने बोलायला हवे होते.  खरे तर मराठी सेलिब्रेटीजनी आपण मराठी असल्याचा आणि महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान बाळगला तर काय बिघडले, अन्य राज्यातील अभिनेते, क्रिकेटपटू, राजकीय नेते, सेलिब्रेटीज अभिमानाने आपल्या भाषेचा आणि त्या राज्याचा असल्याचे जाहीरपणे सांगत असतात. रजनीकांत हा मुळचा मराठी माणूस. शिवाजी गायकवाड हे त्यांचे मूळ नाव. पण आज ते तामिळ भाषेतील चित्रपटांचे सुपरस्टार आहेत. ते तामिळ भाषा आणि त्यांच्या हितासाठीच बोलतात. मग आपल्या मराठी सेलिब्रेटीजनीही कलावंत किंवा क्रिकेटपटू हे कोणत्या जातीचे, भाषेचे किंवा एखाद्या राज्याचे नसतात हे मान्य केले आणि तसे जाहीरपणे सांगितले तरी ते सांगून असे असले तरी मी सर्वप्रथम मराठी/महाराष्ट्रीयन असून मला त्याचा अभिमान आहे, असे सांगितले तर ते जास्त संयुक्तीक ठरले असते,   असे मला वाटते.


आपली भाषा, धर्म आणि संस्कृतीचा आपणच अभिमान बाळगायचा असतो. आपण आपले हे स्वत्व हरवले तर इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे. उलट तुमच्या साऱखे अनेक मान्यवर आणि सेलिब्रेटीज जेव्हा ठामपणे आणि जाहीरपणे वेळोवेळी मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे, असे सांगाल किंवा मराठी भाषा आणि संस्कृती व धर्माच्या होणाऱया गळचेपीबद्दल आवाज उठवाल, त्या त्या वेळी होणाऱया आंदोलनात रस्त्यावर उतरुन सहभागी व्हाल, तेव्हा त्या आंदोलनाला वेगळी धार येईल, हे तुम्ही मंडळी कसे विसरता.


पण खरे सांगू मी केवळ मराठीच कसा, या तुमच्या विधानाने तुमचे समस्त चाहते आणि मराठी समाजाला धक्का बसला आहे. त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तुमच्या आजपर्यंतच्या प्रतिमेच्या विपरित घडले आहे. तुम्ही मराठीपणाला, मराठी असण्याच्या अभिमानाला दिलेली टांग मन व्यथीत करणारी आहे. तुमचा एकूण स्वभाव पाहता, मी असे बोललेलोच नाही, प्रसारमाध्यमांनी माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला, असेही तुम्ही म्हणालात, तरी ते आम्हाला पटणार नाही. नाना, तुम्हाला तुम्ही कोणाचे, महाराष्ट्राचे की भारताचे, असेही कोणी विचारले नव्हते. मग असे बोलून नवा वाद का निर्माण केलात, जे बोललात, त्याला जोडूनच तुम्ही मात्र असे असले तरीही मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे, असे वाक्य म्हणाला असतात तर आमच्यासाठी ते अधिक आनंददायक ठरले असते.


मराठी नसलेल्या अन्य कलाकारांवरही आम्ही मराठी प्रेक्षक प्रेम करतो व आम्हाला ते आवडताततही. पण तुम्ही आपले म्हणून मराठी प्रेक्षक इतरांपेक्षा तुमच्यावर काकणभर जास्त प्रेम करतात.  असो.  आणखी काय लिहू. . 

कळावे,

आपला

शेखर जोशी                           

6 comments:

 1. खरंच या नानाने टांग दिली यावेळी.

  ReplyDelete
 2. मलापण तेच वाटत. नानानी टांग दाखविली.

  ReplyDelete
 3. हेरंब, एम. डी. रामटेके
  प्रतिक्रियेबद्दल आभार
  शेखर

  ReplyDelete
 4. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. .. असेच जर 'नाना'ला म्हणायचे असेल तर त्यात गैर ते काय !
  .. केवळ मराठीच कसा .. असचं तर 'नाना' म्हणाला ना ! मी मराठी नाही असे तर नाही म्हणाला ?

  ReplyDelete
 5. मराठी माणूस आजपर्यंत सर्वांना आपलं म्हणत आला आहे. पण आता त्याला त्याच्याच घरात येऊन तोंड वेंगाडून दाखवलं जात आहे. नेमक्या त्याच वेळी नानाने हे बोलायला नको होतं.

  ReplyDelete
 6. अनामिक
  मराठी भाषा आपण वळवू तशी वळते. नाना पाटेकर यांचे वक्तव्य त्यांच्या आजवरच्या प्रतिमेला छेद देणारे होते, असे मला वाटते. म्हणून मी मला जे वाटले ते लिहिले. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

  नरेंद्र प्रभू
  आपल्याही प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  शेखर

  ReplyDelete