13 May 2010

आता चातुर्मासातही विवाह मूहूर्त

आषाढ महिन्यापासून सुरू झालेल्या चातुर्मासाची समाप्ती झाली आणि कार्तिक महिन्यात तुळशी विवाहाला सुरुवात झाली की लग्नाच्या हंगामाला सुरुवात होते. चातुर्मासात विवाहाचे मुहूर्त नसल्याने हे संपूर्ण चार महिने लग्नासाठी वज्र्य असतात. त्यामुळे चातुर्मास सुरू होण्यापूर्वी लग्न उरकून घेतले जाते किंवा तो संपल्यानंतरचे मुहूर्त काढले जातात. मात्र काळानुरुप आता त्यात काही बदल करता येईल का, चातुर्मासातही विवाहाचे मुहूर्त देता येतील का, यावर आता विचार सुरू झाला आहे.


करवीर पीठाच्या शंकराचार्यानी येत्या २५ व २६ मे रोजी कोल्हापूर येथे महाराष्ट्रासह पंजाब, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील पंचांगकर्त्यांची बैठक बोलावली आहे. त्यात या विषयावर चर्चा होणार असून काही सकारात्मक निर्णय झाला तर पुढील वर्षांपासून पंचांगात चातुर्मासातही विवाहाचे मुहूर्त देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण हे बैठकीस उपस्थित राहणार आहेत. सोमण यांनीच ‘लोकसत्ता’शी बोलताना ही माहिती दिली. आतापर्यंत आपल्याकडे कधीही चातुर्मासात विवाह झालेले नाहीत. कारण पंचांगात या काळात विवाहाचे मुहूर्तच देण्यात आलेले नसतात. पूर्वीच्या काळी या दिवसात शेतीची कामे असायची, मोठय़ा प्रमाणात पाऊस पडायचा आणि आताएवढी वाहतुकीची साधने तेव्हा नव्हती. त्यामुळे साहजिकच प्रवास करणे आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यावरही बंधने व अडचणी होत्या. त्यामुळेच चातुर्मासाच्या काळात विवाह न करण्याची प्रथा किंवा पद्धत रूढ झाली असावी असे सांगून सोमण म्हणाले की, मात्र आता काळानुरुप त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. काळानुरुप आता शास्त्रात काही बदल करता येईल का, विवाह मुहूर्तासाठी कोणता धर्मग्रंथ प्रमाण मानावा त्याचीही चर्चा या बैठकीत होणार आहे. आपल्या मराठी संस्कृतीत आपण शक्यतो सकाळच्या वेळेतीलच मुहूर्त काढतो परंतु गोरज मुहूर्तावरही विवाह केले जातात. आजकाल गुजराती समाजात रात्रीचेही विवाह मुहूर्त असतात. नोकरी आणि व्यवसाय करुन आपली सर्व कामे पार पाडल्यानंतर ती मंडळी विवाहासाठी एकत्र येतात, असेही सोमण म्हणाले.
 
(माझी ही बातमी लोकसत्ता १२ मे २०१० च्या मुख्य अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे)

2 comments:

  1. प्रिय श्री. शेखर जोशी,
    स.न.वि.वि.
    आपला आजच्या ( १४ मे २०१०) लोकसत्ता मुंबई वृत्तांत मधील "वाळवीच वाचतेय, म. ग्रंथालयातील पुस्तके" हा वृत्तांतपर लेख वाचला. आपण एक अत्यंत महत्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयाकडे आमचे लक्ष वेधले आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
    मी आपले आणखी एका याच विषयाबाबत लक्ष वेधू इच्छितो. दादर (पूर्व) येथे शंभर वर्षाहून जुनी असलेली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची शाखा आहे. तेथे हा प्रकार नसावा. पण तेथे पुस्तके देण्याचा प्रकार कसा आहे, ते आपण पाहिले आहे काय ? आज लोकांची पुस्तक वाचनाची आवड, इच्छा, रस सारा आटला आहे. तो कसा पुनः आणावा याचा प्रयत्न आपणासारख्या तरुण पत्रकारांनी केला पाहिजे. आम्ही जुने जाणते आहोत आपल्याला मदत करायला. येताय का एकदा दादरला या वाचनालयात ?

    मंगेश नाबर

    ReplyDelete
  2. मंगेश नाबर,
    नमस्कार
    आपल्या प्रतिसादाबद्दल आभार. आपला मेल आयडी मला कळवा. मी त्यावर आपल्याशी संपर्क साधेन. माझा मोबाईल नंबर ९८२१२६७२४४ असा आहे. आपण त्यावरही संपर्क साधू शकता. आपण सांगितलेल्या विषयावर नक्की बोलू या.
    शेखर

    ReplyDelete