नमस्कार, मी शेखर जोशी. माझ्या पुन्हा एकदा जोशीपुराण या नव्या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत.दररोज नवीन लेखन करण्याचा किंवा वाचनात आलेली माहिती येथे देण्याचा माझा प्रयत्न असेल.आपल्याला ते आवडले किंवा आवडले नाही तरी आवर्जून कळवा.
30 November 2009
ऑफर्सच्या जाळ्यात ग्राहकांचा मामा
विविध वाहिन्यांवरुन सुरु असलेल्या रिअॅलिटी शो किंवा गाण्यांच्या स्पर्धेसाठी महाअंतिम फेरीतील विजेता निवडण्यासाठी एसएमएस मागवले जातात. या कार्यक्रमांचे लाखो प्रेक्षक आपल्या आवडत्या गायकासाठी एसएमएस पाठवतात. मात्र या सगळ्याचा ती वाहिनी आणि एसएएमएस कंपनी यांनाच प्रचंड फायदा होतो. स्पर्धा संपल्यानंतर जो निकाल लागतो, तो अगोदरच ठरवलेला असतो, हे ही आता सगळ्यांना माहिती झालेले आहे. मात्र तरीही सर्वसामान्य प्रेक्षक यात गुरफटत जातो. एसएमएस करुन आपले पैसे घालवतो आणि इतरांना फायदा करुन घेतो.
एका शर्टवर दोन शर्ट फ्री, एका पॅन्टवर दोन पॅन्ट फ्री किंवा अमूक एका वस्तूवर तमूक फ्री अशाही जाहिराती आपल्या वाचनात येतात. त्यालाही आपण बळी पडतो. कारण मूळातच एका शर्टाची किंमत वाढवून ठेवलेली असते. ते आपल्या लक्षात येत नाही. एकावर एक किंवा दोन फ्री मिळणार म्हणून आपण ते खरेदी करतो. बरे आपल्याला आत्ता खरोखऱच इतक्या शर्टची गरज आहे का, याचाही सारासार विचार आपण करत नाही. म्हणजे कधीकधी गरज नसतानाही ऑफर्स दिली आहे म्हणूनही खरेदी केली जाते.
अनेकवेळा स्टॉक क्लिअरिंग सेलच्या नावाखाली आकर्षक ऑफर्स देऊन जुना माल विकला जातो. काही जणांचा अपवाद वगळता अन्य ग्राहकांच्या पदरी निराशाच येते. कारण दुकानातून किंवा प्रदर्शनातून वस्तू किंवा कपडे घरी आणल्यानंतर त्या वस्तूतील किंवा कपड्यातील खोट लक्षात येते. पण तोपर्यंत आपण फसले गेलेलो असतो. एक महिन्यात/ वर्षात दुप्पट अशा पैशांच्या योजनांमधूनही सर्वसामान्य आणि सुशिक्षित लोकही पैसे गुंतवतात. काही जणांना सुरुवातीला आश्वासन दिलेली रक्कम मिळते. नंतर मात्र संबंधित कंपनीची लोक गाशा गुंडाळून पसार होतात आणि हजारो, लाखोंची रक्कम गुंतवलेल्या ग्राहकांना कंगाल व्हायची वेळ येते.
मेगा ऑफर, मास्टर-ब्लास्टर ऑफर, पुन्हा अशी संधी येणार नाही, आला नाहीत तर पस्तावाल असे शब्दांचे खेळ करुन ग्राहकांना भुलवले जाते. पर्यटन कंपन्याही यात मागे नाही. मुळात आपण जर आपले स्वताचे नियोजन करुन प्रवासाला गेलो तर पर्यटन कंपन्यांनी दिलेल्या ऑफरपेक्षाही स्वस्तात आपली ट्रीप पार पडते. पर्यटन कंपन्या ऑफर देताना अमूक एका तारखेपर्यंत नोंदणी केली तर इतक्या हजार रुपयांची सवलत, अशा जाहिराती करत असतात. म्हणजेच हजारो रुपयांची सवलत देऊनही कंपन्याना फायदा होणारच असतो. मग सवलत देण्यापूर्वीचे जे दर प्रवाशांना लावण्यात आले असतात तेव्हा या पर्यटन कंपन्यांनी ग्राहकांना किती लुबाडले असेल, याचा विचार आपण कधी करतो का.
असाच प्रकार सेलचाही असतो. मुळातच सेलमध्ये वस्तू, कपडे यांच्या किंमती वाढवून ठेवलेल्या असतात. सेलच्या किंवा आकर्षक ऑफर्सच्या नावाखाली संबंधित दुकानदार, सेलचे आयोजक ग्राहकांना लुबाडतच असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मंडळी धंदा करायलचा बसलेली आहेत. ते सर्व धंदेवाईक आणि व्यापारी असल्यामुळे ते आपले नुकसान कधीही करुन घेणार नाहीत. नुकसान सोसून एखाद्याला अव्वाच्या सव्वा द्यायला किंवा पैसे कमी करण्याच्या नावाखाली प्रवास घडवायला ती मंडळी साधूसंत किंवा धर्मादाय संस्था नाहीत. त्यामुळे अशा अशा कोणत्याही ऑफर्स म्हणजे ग्राहकांना लुटण्याचे आणि मामा करण्याचे नवनवे प्रयोग आहेत, ही खुणगाठ प्रत्येकानेच मनाशी बांधावी.
29 November 2009
राणे, राज आणि आता स्मिता...
शिवसेनाप्रमुख यांनी आपला राजकीय वारसा पुत्राकडे अर्थात उद्धव यांच्याकडे जेव्हा सोपवला तेव्हापासूनच शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरु झाली होती. केवळ पुत्रप्रेमापोटी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेतील अन्य नेते आणि राज यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केल्याचे तेव्हाही बोलले गेले होते. कारण तोपर्यंत शिवसेनेत भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी आपले बस्तान चांगल्यापैकी बसवले होते. अन्य ज्येष्ठ नेतेही कार्यकारी अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. शिवसेनेत राज आणि अन्य ज्येष्ठ नेते आंदोलने करतांना रस्त्यावर उतरत होते तेव्हा उद्धव हे फोटोग्राफी करण्यात मग्न होते. शिवसेना किंवा राजकारणाशी त्यांचा संबंध नव्हता. शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना वाढवली, जोपासली आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या नावाचा, कार्याचा दबदबा निर्माण केला. त्यांच्या शब्दाला संघटनेत मान आणि वजन होते. पक्षावर, पक्षातील नेत्यांवर आणि शिवसैनिकांवरही त्यांची पकड व जरब होती. उद्धव यांनी शिवसेनेत सक्रीय होऊन काही वर्षेच झाली होती. तरीही बाळासाहेब ठाकरे यांनी केवळ पुत्रप्रेमापोटी उद्धव यांच्या पारड्यात आपले वजन टाकले आणि तेथेच चुकले, असे आता उघडपणे बोलले जात आहे.
राणे यांच्यानंतर राज यांच्यारुपाने एक ठाकरे पक्षाबाहेर गेले. उद्धव यांना सर्व काही आयते मिळाले. वडिलांची पुण्याई त्यांना कामाला आली. मात्र राज ठाकरे यांनी स्वबळावर पक्षाला मतदारांमध्ये विशेष म्हणजे तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिलांमध्ये मनसेची क्रेझ निर्माण केली. पक्षातून बाहेर पडल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सात नगरसेवकही निवडून आणले. त्यानंतर मराठीचा मुद्दा हाती घेत प्रत्येक वेळी शिवसेनेला पर्यायाने उद्धव ठाकरे यांना नामोहरम करण्याची संधी सोडली नाही. त्यात ते यशस्वीही होत गेले. लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेची सर्व गणिते चुकत गेली. मात्र या पराभवानंतरही उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण न करता मराठी माणसालाच दोष दिला. नेमके काय करायचे ते कळत नसल्याने किंवा उद्धव व त्यांच्या सल्लागारांनी केलेली प्रत्येक खेळी चुकत गेली.
आता स्मिता ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबातील आणखी एक ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडत आहे. त्यांची ताकद किती, त्यामुळे शिवसेनेला किती फटका बसू शकेल, राज यांच्यामागे शिवसेनेतील काही मंडळी जशी गेली, तशी स्मिता ठाकरे यांच्या मागोमाग किती जण बाहेर पडतील याबाबत आत्ता काहीच सांगता येत नसले तरी शिवसेनेचे मुख्यत उद्धव यांचे विरोधक उद्धव यांच्याच नाकर्तेपणामुळे स्मिता यांनी शिवसेना सोडली किंवा त्यांना ती सोडायला भाग पाडण्यात आले, असा प्रचार करण्यासाठी आता आणखी कोलीत मिळेल. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून प्रगती होण्याऐवजी अधोगतीच होत चालली असल्याचे सर्वाना पाहायला मिळत आहे. प्रत्येकवेळी उद्धव यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच अवलंबून राहावे लागत आहे, उद्धव हे स्वतच्या ताकदीवर काहीही करु शकत नाही, शिवसेनेसारख्या संघटनेचे नेतेपद सांभाळण्याची त्यांची खरोखरच कुवत आहे की नाही, कोणताही निर्णय़ घेताना खुषमस्कऱया सल्लागारांचे किती काळ ऐकणार, शिवसेनाप्रमुखांनी कष्टाने उभी केलेली संघटना ते खरोखरच रसातळाला नेणार का, असे अनेक प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसला, मुंबईतही शिवसेनेला शह देत मनसेचे उमेदवार निवडून आले, विधानसभा आणि विधानपरिषदेतील संख्याबळ कमी झाल्याने शिवसेनेला दोन्ही ठिकाणच्या विरोधीपक्षनेतेपदावरही पाणी सोडावे लागले.
खरे म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव यांनी जनाची नाही किमान मनाची तरी लाज बाळगत आपण कार्यकारी अध्यक्ष झाल्यापासूनचा जमाखर्च एकदा मांडावा. जमा किती आणि खर्च किती याचा तसेच आपण खरोखरच ही जबाबदारी पेलायला समर्थ आहोत का त्याचाही गंभीरपणे विचार करावा. अन्यथा एक दिवस नारायण राणे म्हणाले त्याप्रमाणे शिवसेनेत फक्त उद्धव, त्यांची पत्नी रश्मी, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत आणि अन्य खुषमस्करेच राहतील. वेळीच सावध होऊन पावले उचलली नाहीत तर राणे यांचे भाकीत खरे व्हायला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कष्टाने उभी केलेली शिवसेना रसातळाला जायला आणि तिची शकले व्हायलाही फार वेळ लागणार नाही...
28 November 2009
सांगा कसं जगायचं
जावई विकत घेणे आहे या चित्रपटातील एक छान गाणे मला पटकन आठवले. शरद तळवलकर यांच्यावर ते चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचे सगळे शब्द मला मिळाले नाहीत. माझ्या आठवणीप्रमाणे सुधीर फडके यांचा आवाज या गाण्याला आहे.
हाती नाही येणे
हाती नाही जाणे
हसत जगावे, हसत मरावे
हे तर माझे गाणे
असे गाण्याचे ध्रुवपद आहे.
हे गाणे मला खूप आवडते. जणू काही जीवनाचे सर्व सार आणि जीवन कसे जगा, याचेच मार्मिक वर्णन यात केलेले आहे.
असेच आणखी एक गाणे पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातील तेही हे जीवन सुंदर आहे या विषयाशी निगडीत आहे. ते म्हणजे
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे,
जात पुढेच रहाणे.
माझे जीवनगाणे
मंगेश पाडगावकर यांचेच या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे गाणेही छान आहे. अरुण दाते यांचा स्वर या गाण्याला लाभला आहे.
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावरकर यांची याच विषयावरची आणखी एक कविता. अनेक सार्वजनिक कार्यक्रमातून पाडगावकर यांनी या कवितेचे वेळोवेळी वाचन केले आगे. सांगा कसं जगायचं ही ती कविता. ती मात्र मला मिळाली. आपल्या माहितीसाठी ती कविता...
सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!
डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!
कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!
पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!
पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!
सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!
-मंगेश पाडगावकर.
ज्येष्ठ कवी, गायक आणि संगीतकार यशवंत देव हे त्यांच्या कार्यक्रमातही ही कविता सादर करतात. देव यांनी गाण्याला सहज, सोपी चाल लावली आहे. त्यामुळे खुद्द पाडगावकर यांच्या आवाजात आणि देव यांच्याही आवाजात कवितेचे गाणे खूप छान वाटते. मनावर आलेली मरगळ, जीवनात आलेले नैराश्य या कवितेने दूर निघून जाते.
26 November 2009
मुंबईचा पाणीपुरवठाही अतिरेक्यांचे लक्ष्य ठरू शकतो..
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या सुरक्षिततेबाबत पालिका प्रशासनाने दावा केला असला तरीही दहशतवादी किंवा राष्ट्रद्रोही शक्तींकडून कधीही, केव्हाही आणि कसाही घातपात घडवून आणला जाऊ शकतो, अशी वस्तुस्थिती असल्याचे दिसून येत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना असणारा बेकायदा झोपडपट्टय़ांचा विळखा घातलेला भस्मासूर याला कारणीभूत ठरू शकतो. तसेच जलवाहिन्या असलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्ते नसणे, अपुरी टेहळणी पथके, सुरक्षा विभागातील रिक्त असलेल्या -जागा, झोपडय़ाबरोबरच अन्य अनधिकृत बांधकामांचा विळखा ही कारणेही असू शकतात.
मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणारे तानसा, मोडकसागर हे तलाव मुंबईबाहेर आहेत. त्या तलावांपासून जलवाहिन्यांद्वारे हे पाणी मुंबईत आणले जाते. पवई, भांडुप कॉम्प्लेक्स, भांडुपखिंडी पाडा आदी मार्गे ते मुंबईकरांना मिळते. ठाण्यातील काल्हेर चौक हे भिवंडी रस्त्यावर असून त्या समोरुन म्हणजे बाळकूम व कशेळी गावातून सुमारे १२० इंच व्यासाची मोठी जलवाहिनी जाते. काल्हेर चौकी ते कल्याण पूल व कल्याण पूल ते शांतीनगर येथे सुरक्षा व्यवस्था अपुरी आहे. भिवंडी परिसरातील शांतीनगर झोपडपट्टीतील नागरिक कल्याण पूल ते पोगाव जंक्शन या परिसरात आंघोळ आणि प्रश्नत:विधीसाठी याच जलवाहिनीच्या पाण्याचा वापर करतात. त्यांना अटकाव करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रकारही घडले आहेत.
जलवाहिन्यांना पडलेल्या बेकायदा झोपडपट्टय़ांची संख्या सुमारे तीस हजारांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येते. मुलुंड ते धारावी आणि शीव परिसरात हा विळखा जास्त प्रमाणात आहे. वांद्रे रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावरुन पूर्वेकडे जाताना जलवाहिन्यांना वेढलेल्या या झोपडय़ा अगदी सहज दृष्टीस पडतात. काही ठिकाणी तर बैठय़ा झोपडय़ांवर चक्क एक ते दोन मजलेही उभारण्यात आले आहेत. हा सगळा भाग बेहरामपाडा म्हणून ओळखला जातो. जलवाहिन्यांना असलेल्या या बेकायदा झोपडय़ांमुळे पाणीचोरी, पाणीगळती मोठय़ा प्रमाणात होत आहेच, पण त्यामुळे पालिकेच्या जलंभियंता खात्याच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन जलावाहिन्यांची देखभाल करणेही कठीण जात आहे.
पालिका प्रशासनानेच तयार केलल्या अहवालानुसार मुलुंड ते भांडुप संकुल, भांडुंप संकुल ते दिनशा ब्रिज, मरोशी ते अंधेरी-कुर्ला मार्ग, कुर्ला अंधेरी मार्ग ते सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ, साकीविहार भाग, घाटकोपर ते साकीनाका क्रॉस कनेक्शन, सहार एबी ते वांद्रे आणि माहीम परिसरात या झोपडय़ा आहेत.
या प्रश्नाकडे राजकीय किंवा जातीय भूमिकेतून न पाहता लाखो मुंबईकरांसाठी असलेला धोका म्हणून त्याकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती आणि धाडस दाखवत तेथे राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करत या झोपडय़ा जमिनदोस्त केल्या पाहिजेत. तसेच येथून पुढे जलवाहिन्यांच्या परिसरात किंवा जलवाहिन्यांवर एकही झोपडपट्टी होणार नाही, त्याची खबरदारी घेतली पाहिजे.
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त, २६ नोव्हेंबर २००९ पान क्रमांक एकवर प्रसिद्ध झालेली माझी बातमी)
25 November 2009
सुरक्षेतील क्षुल्लक ढिलाईही घातक
छत्रपती शिवाजी टर्मिनससमोर असलेली पालिका मुख्यालयाची इमारत पारंपरिक वारसा लाभलेली (हेरिटेज) वास्तू म्हणून ओळखली जाते. देशातील सर्वात श्रीमंत आणि सुमारे १८ ते २० हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली महापालिका अशीही तिची ओळख आहे. १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळीच महापालिका मुख्यालयावर हल्ला करण्यात येणार होता. मात्र सुदैवाने तो प्रयत्न फसला. त्यानंतर राज्य शासन, पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले. पण त्याची तीव्रता असा एखादा प्रसंग घडला की काही दिवसच राहते, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
२६/११ च्या हल्ल्यानंतर महापालिका मुख्यालयात प्रवेश करणाऱ्यांसाठी कठोर र्निबध घालण्यात आले होते. पालिकेचे मुख्यालय व त्याला लागूनच असलेल्या इमारतीमधून जाणारा रस्ता खासगी वाहने आणि लोकांसाठी बंद करण्यात आला. तेथे दोन्ही बाजूनी सुरक्षारक्षकांच्या चौक्या, महापालिका मुख्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार आणि अन्य ठिकाणी बंकर तयार करण्यात आले होते, त्यात पहारा देण्यासाठी जवान तैनात करण्यात आले होते, प्रवेशद्वारांवर स्कॅनर मशिन, मेटल डिटेक्टर लावण्यात आले होते, पालिका सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांखेरीज स्वतंत्र प्रशिक्षण दिलेले खास कमांडोही तैनात करण्यात आले होते, काही सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हातात हॅण्ड मेटल डिटेक्टर देण्यात आले.
मात्र हे सगळे झाले असले तरी तेथे काम करणारे कर्मचारी, अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, नगरसेवक यांची मानसिकता बदलली नाही, असे म्हणावे लागते. काही अपवाद वगळता सर्वाकडूनच सुरक्षिततेच्या बाबतीत ढिलाई दाखविण्यात येत आहे आणि तीच गोष्ट घातक ठरू शकते.
नगरसेवक, अन्य लोकप्रतिनिधी किंवा पक्षाचा कोणी पुढारी पालिकेत येताना आपल्याबरोबर वीस-पंचवीस कार्यकर्त्यांना घेऊन येतो. प्रवेशद्वारावर या सगळ्यांना अडवले तर लोकप्रतिनिधीची बोलणी सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना खावी लागतात. काही नगरसेवक तर आपल्याला सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ओळखले नाही म्हणजे आपला अपमान झाल्याच्या थाटात अरेरावीने वागतात. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडेही ओळखपत्र मागितले तर त्यांनाही तो अपमान वाटतो. अशा प्रकारांमुळे सुरक्षारक्षकांची कुचंबणा होत आहे.
काही वेळेस सुरक्षा अधिकारी/कर्मचारीही अयोग्य पद्धतीने वागतात. एखादा गरीब, अशिक्षित माणूस काही विचारायला आला की त्याला योग्य उत्तरे देत नाहीत आणि प्रवेशद्वारापाशी भपकेबाज कपडे घातलेला आणि महागडय़ा गाडीतून कोणी बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार उतरला की त्यांना काही विचारायचे भानही त्यांना राहात नाही. कधी विचारले तर का विचारले म्हणून नोकरी जाण्याची किंवा कारवाई होण्याची भीती असते. मात्र महापालिका मुख्यालयाची सुरक्षितता सांभाळणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
महापालिका मुख्यालय इमारत आणि बाजूच्या नवीन इमारतीचा पसारा अवाढव्य आहे. विविध खाती, विभागात काम करणारे कर्मचारी व अधिकारी, महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, पक्षकार्यालये अशा सर्व ठिकाणी दररोज अनेक माणसे येत असतात. सध्या असे चित्र पाहायला मिळते की महापालिकेची सर्वसाधारण सभा, स्थायी किंवा अन्य महत्त्वाच्या समितीच्या बैठका, एखादा विशेष कार्यक्रम असला की कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली जाते. अन्य दिवशी मात्र तुलनेत सुरक्षा व्यवस्था मंदावलेली दिसते.
पालिकेच्या सुरक्षिततेसाठी दररोज कडेकोट सुरक्षा व्यवस्था असली पाहिजे. प्रत्येक मजल्यावर दररोज अधूनमधून सुरक्षा अधिकाऱ्यांने गस्त घातली पाहिजे. त्यासाठी वेगळ्या माणसांची व्यवस्था करावी. स्फोटकांचा शोध घेणारे श्वान दररोज मुख्यालयातून फिरवण्यात आले पाहिजेत. अर्थात त्यासाठी लागणारे मनुष्यबळ राज्य शासन व पालिका प्रशासनाने उपलब्ध करुन दिले पाहिजे. पालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांनाही आपले ओळखपत्र दिसेल अशा पद्धतीने लावले पाहिजे, पालिका मुख्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नेत्यांनी सोबत दोन किंवा चार कार्यकर्त्यांना आणावे. प्रवेशद्वारावर सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता प्रत्येकाकडे ओळखपत्राची मागणी केली पाहिजे, तसेच तो अपमान न समजता सुरक्षारक्षकांना सहकार्य करावे.
अशी काही बंधने प्रत्येकाना पाळली पाहिजेत. तसे झाले तर महापालिका मुख्यालय असुरक्षित न राहता सुरक्षित होऊ शकेल.
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (२५ नोव्हेंबर २००९)पान क्रमांक एकवर प्रसिद्ध झालेली माझी बातमी)
24 November 2009
ऐलमा पैलमा मातोश्री देवा
बैठकीसाठी जमलेल्या सर्व महिला नगरसेविकांनी सगळ्यात पहिल्यांदा
ऐलमा पैलमा मातोश्री देवा
महापौरपद मलाच मिळू दे
करीन पक्षाची व जनतेची सेवा
असे गाणे म्हणत सामूहिक फेर धरला.
त्यानंतर महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या क्रमांक एकने
मागे उभा मिलिंद
पुढे उभा मिलिंद
आपल्या सगळ्यांकडे
मिलिंद हा पाहतो आहे
असे गाणे म्हटले.
त्यावर इच्छुक क्रमांक दोनने आपल्या फटकळ आणि डॅशिंग स्वभावानुसार मोठ्या आवाजात
नाव गाव कशाला पुसता
मी असले जरी गुजराथी
मला हो म्हनत्यात लवंगी मिरची
असे गाण्यातूनच प्रत्युतर क्रमांक एकला दिले.
त्यावर इच्छुक क्रमांक एक म्हणाली, मी तर सगळ्यात ज्येष्ठ नगरसेविका. स्थायी समिती किंवा अन्य समित्यांचे सदस्यपद मला मिळाले असले तरी महापौरपद ते महापौरपद. त्याची शान, गाडी आणि बंगला व रुबाब काही वेगळाच. माझ्याकडे अनुभव आणि मनोहर रुप आहे. तेव्हा हे पद मलाच मिळाले पाहिजे.
लगेच इच्छुक क्रमांक दोनने आवाज चढवत सांगितले की, अग नुसते मनोहर रुप असून चालत नाही. कामे करुन घेण्यासाठी माझ्यासारखा डॅशिंग स्वभावही लागतो. अग आपल्यापैकी जीची निवड होणार आहे, तिला फक्त सहा महिनेच मिळणार आहेत. त्यानंतर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे जनमानसावर शिवसेनेच्या कामाचा ठसा उमटविण्यासाठी मीच योग्य आहे. आणि हल्ली मातोश्रीचाही मनोहररुपावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे शिवसेनेतही माझेच नाव सगळ्यांना पटेल की नाही बघ.
आणखी थोडीशी फोडणी देत इच्छुक क्रमांक दोन म्हणाली, सध्या मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरु आहे. त्यामुळे जर मलाच हे पद मिळाले तर शिवसेना अमराठी माणसांच्या विरोधात नाही, असा संदेश सगळ्यांना मिळेल. हे म्हणणे खोडून काढताना इच्छुक क्रमांक तीन म्हणाली की, कसला योग्य संदेश जाईल, कप्पाळ. अग असे झाले तर राजकारण कसे वळण घेईल हे तुला माहिती नाही का, आपल्या शत्रू क्रमांक एकच्या हातात या निमित्ताने आपण आयते कोलीतच देऊ. शिवसेनेने मराठी माणसांचा मुद्दा कसा सोडला, मराठी माणसावर शिवसेना कसा अन्याय करत आहे, असे बोंबलायला ते मोकळे होतील, त्याचे काय. त्यामुळे या पदासाठी तू योग्य नाहीस.
इच्छुक क्रमांक चारने तिसरीला पाठिंबा दिला. ती म्हणाली, अग त्यातून तू पश्चिम उपनगरातली. आत्ताचे महापौरपदही पश्चिम उपनगरालाच मिळाले आहे आणि आता पुन्हा ते तुमच्याकडे का, पूर्व उपनगर किंवा शहर भागालाही ते मिळायला हवे, असे पेच तिने टाकला.
चौघींचेही आवाज वाढू लागले. प्रकरण हातघाईवर येते की काय, अशी शंका वाटू लागली. तेव्हा वयाने अनुभवी असलेली, आपल्या सध्याच्या कारकिर्दीत एकदा सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतलेली आणि महापौरपदाच्या स्पर्धेत असलेली इच्छुक क्रमांक पाच म्हणाली, धन्य आहे तुम्हा सगळ्यांची. आपापसात इथे भांडत काय बसलात, आपल्याकडे कोणत्याही पदासाठी पात्रता, अनुभव किंवा ज्येष्ठता हा निकष सध्या नसतो, हे काय माहिती नाही तुम्हाला. अग कोणतेही पद मिळविण्यासाठी सध्या मिलिंद, वहिनीसाहेब, मातोश्रीच्या दरबारातील चौकडी आणि नंतर आपल्या कार्यकारी साहेबांचा आशीर्वाद असतो लागतो हे विसरलात का.
अग मोठ्या साहेबांचे दिवस आता संपले. ही मंडळी सगळे ठरवून मग त्यांना नुसत मम म्हणायला लावतात. अग आपण इथे भांडत बसू आणि महापौरपदाचा शालू दुसरीच कोणीतरी पटकावायची. आजवर आपल्याला आलेले अनुभव काही कमी आहेत का. आणि हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो राजसिंहही यंदाच्या वेळेस आपल्याकडून महापौरपद हिसकावून घ्यायला टपला आहे, हे विसरलात का. तेव्हा आपण भांडत न बसता आपल्यात एकमत करु या आणि वरपर्यंत एकीचेच नाव पोहोचवू या, काय माझे म्हणणे पटताय ना सगळ्याजणींना
वयाने ज्येष्ठ असलेल्या त्या नगरसेविकेच्या सल्ल्याने सगळ्यांजणीं भानावर आल्या आणि या गुप्त बैठकीचा समारोप झाला...
(गुप्त बैठकीच्या या वृत्तान्तातील इच्छुक नगरसेविका आणि त्यांच्या नामसाधर्म्याशी वास्तवाचा काहीही संबंध नाही , त्याची सर्वानी नोंद घ्यावी. तरीही ते वर्णन कोणाला लागू पडत असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा. )
23 November 2009
औषधाविना उपचार
या अंकातील अरविंद जोशी यांच्या निसर्गशक्ती आणि स्वयंचिकित्सा या लेखांची ओळख आज मी करुन देत आहे. अरविंद जोशी यांनी आपल्या लेखात मुळाक्षरे आणि आरोग्य, आरोग्यदायी रंगीत स्वस्तिके आणि भारतीय पुष्पौषधी याबाबत विवेचन केले आहे. या लेखात ते म्हणतात, आपल्या शरीरात सात चक्रे असून त्या चक्रांना वेगवेगळ्या संख्येच्या पाकळ्या आहेत. त्या पाकळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना जोडल्या असून प्रत्येक पाकळीला एक एक बीजाक्षर आहे. ही बीजाक्षरे म्हणजे मराठीतील एक एक मुळाक्षर आहेत. जर ही अक्षरे अनुस्वार देऊन म्हटली तर ती पाकळी कंप पावते आणि ती ज्या अवयवाला जोडली आहे तो अवयव नीट काम करु लागतो व आपले आरोग्य सुधारते.
जोशी यांनी याबाबत अभ्यास करून काही प्रयोग केले आणि त्याचे खूप चांगले अनुभव आले. त्याची माहितीही थोडक्यात त्यांनी लेखात दिली आहे. या विषयावर त्यांचे षटचक्र आणि आरोग्य हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.
लाल रंगाच्या स्वस्तिकामध्ये खूप शक्ती असते, हे जोशी यांच्या वाचनात आले. त्यावरुन कल्पना सुचून जोशी यांनी इंद्रधुष्याच्या सात रंगांची स्वस्तिके तयार केली आणि त्याचे काही प्रयोग केले. रंगकिरण चिकित्सा आणि रंगीत स्वस्तिके यांचे गुण सारखेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. छाती कफाने भरली असता लाल रंगाचे स्वस्तिक छातीवर ठेवले तर कफ कमी होतो. थंडीच्या दिवसात लाल रंगाच्या स्वस्तिकावर बसले असता थंडी वाजणे कमी होते. फिक्या निळ्या रंगाचे स्वस्तिक बेंबीवर लावले असता अॅसिडीटी व पित्त कमी होते, असे अनुभव जोशी यांनी दिले आहेत.
पुष्पौषधीचेही काही अनुभव जोशी यांनी दिले आहेत. ते सांगतात की, विशिष्ट फुले किंवा त्याच्या पाकळ्या रात्रभर (आठ तास) किंवा दिवसभर (२४ तास) भांडभर पाण्यात ठेवायच्या.नंतर ते पाणी गाळून घेऊन ४ ते ८ चमचे एका वेळी असे दिवसातून आवश्यकतेनुसार ३ ते ५ वेळा प्यायचे. झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांचे पाणी करावे. या पाण्याने खोकला कमी होतो, नव्हे जातो. गुलछडीच्या पाण्याने कोलायटीस कमी होते. बेकरीचे पदार्थ खाणाऱयांसाठी उपयुक्त, तसेच लघवी साफ होणे, बद्धकोष्ठता यावरही उपयोगी. लाल किंवा पांढऱया जास्वदांच्या फुलांचे पाणी कोलायटीस, मेंदूचे विकार, यकृताची सूज व हृदयाच्या आजारांवर उपयुक्त आहे. लाल कर्दळीच्या फुवाच्या पाण्याने घसा दुखणे, सुजणे थांबते. आंब्याच्या मोहोराचे केलेले पाणी निद्रानाश, रक्तीमुळव्य़ाध, अंगावर गाठी, उष्णतेचे रोग यावर काम करते. बेलाच्या पाण्याने शरीरातील हीट कमी होते. तसेच उच्च रक्तदाब व मधुमेहावर उपयुक्त आहे. जोशी यांनी लेखात ज्या फुलांची माहिती दिली आहे, त्यातील काही निवडक फुलांचे हे उपयोग.
आपल्या पूर्वजांनी निसर्गातील शक्तींचा अभ्यास करुन माणसाला निरोगी राहण्यासाठी सहज, सोपे उपचार (ज्यात डॉक्टरला वा वैद्याला पैसे मिळत नाहीत) दिले. आम्ही त्यांना जुनाट, अडाणी म्हणतो. देवाला वाहण्याची फुले चांगली उपयुक्त आहेत. म्हणजे देवावर अभिषेक केलेले पाणी, दूध. तीर्थ (फुलावरुन आलेले) किती उपयोगी आहे पाहा. आमच्या पूर्वजामनी तीर्थ पवित्र आहे ते घ्यावे अशी प्रथा पाडून समाजाच्या सहज आरोग्याचा विचार केला. त्याला अंधश्रद्धा म्हणायचे का, असा सवालही जोशी यांनी केला आहे.
अधिक माहितीसाठी जोशी यांचा संपर्क दूरध्वनी
०२०-२४४५०२७३ (रविवार खेरीज दररोज दुपारी ४ ते ६)
चैत्राली मासिकाचे संपादक रमेश पाटील यांचा संपर्क दूरध्वनी
०२०-३०२२२८१२
22 November 2009
शिवसेनेची गोची
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून त्याचे खापर सर्वसामान्य मराठी माणसांवरच फोडले गेले. मुळात निकाल लागल्यानंतर चार ते पाच दिवसांनी उद्धव ठाकरे हे प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. खऱे तर निकाल लागल्यानंतर लगेचच त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन झाले ते झाले, आमचे कुठे चुकले त्याचे आत्मपरिक्षण आम्ही करु आणि झालेल्या चुका सुधारु, असे जाहीर वक्तव्य करायला हवे होते. भाजपच्या मुंडे व गडकरी यांनी तसे वक्तव्य केले. निकाल लागल्यानंतर तुम्ही प्रसारमाध्यमांसमोर आला नाहीत, तेथेच पहिल्यांदा चुकले. त्यानंतर सामनामध्ये अग्रलेखाद्वारे मराठी माणसांनी पाठीत खंजीर खुपसला असे विधान करून समस्त मराठी माणसांची नाराजी ओढवून घेतली. त्या विधानावर गदारोळ झाल्यानंतही उद्धव ठाकरे यांनी त्याचे समर्थन केले होते. बरे सामान्य शिवसैनिक आणि मराठी माणसाला ते विधान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच केले असे वाटले. पण शिवसेनाभवनात बाळासाहेब ठाकरे यांनीच त्याचा खुलासा केला आणि मी असे बोललेलोच नाही, असे सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे, सामनाचे संपादक संजय राऊत उघडे पडले.
त्यानंतर मराठीतून शपथ घेण्याच्या मुद्यावरुनही मनसेने बाजी मारली. भर विधानसभेत अबू आझमी याला मनसेच्या आमदारांनी चोपले. तेव्हाही शिवसेनेला नेमकी काय भूमिका घ्यावी ते कळले नाही. मात्र त्यामुळे मनसेची भूमिका पुन्हा एकदा सर्वसामान्य मराठी मनापर्यंत पोहोचली. खरे तर हा मुद्दा सर्वप्रथम शिवसेनेला उचलून धरायला काहीच हरकत नव्हती. किंवा मनसेने तो लावून धरल्यानंतर किमान मराठीच्या मुद्दयावर तरी त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता. विधानसभेत अबूचा चोपले ते बरोबर की चूक हा वादाचा मुद्दा असू शकतो. पण मराठीतून शपथ घेणे या मुद्द्यावर तरी शिवसेनेने मनसेला जाहीरपणे समर्थन द्यायला हवे होते.
त्यानंतर सचिन तेंडुलकर याच्या विधानावरुन शिवसेना पुन्हा एकदा गोत्यात आली. मी मराठी असलो तरी पहिल्यांदा भारतीय आहे, असे विधान त्याने केले होते. त्यावर शिवसेनेने सामनामधून सचिनवर दुगाण्या झाडल्या. कदाचित हा मुद्दा मनसेने उचलला तर, या भीतीपोटी आपण पहिल्यांदा प्रतिक्रिया देऊ या, असे वाटून शिवसेनेने जाहीर भाष्य केले आणि देशभरातून तसेच महाराष्ट्रातूनही शिवसेनेवर जोरदार टिका करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेला अखेर नमते घ्यावे लागले आणि शिवसेनाप्रमुखांनी सचिनला वडिलकीच्या नात्याने हा सल्ला दिला अशी सारवासारव करावी लागली.
आणि आता नुकताच घडलेला आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीवरील हल्ल्याचा प्रकार. मुळात अशा प्रकारे हल्ला करणे आणि त्यानंतर त्याचे निर्लज्जपणे समर्थन करणे हे चुकीचे आहे. निखिल वागळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना उद्देशून जर काही अपशब्द वापरले असतील तर त्याचा तीव्र निषेध तुम्हाला तुमच्या सामना या मुखपत्रातून करता आला असता. सामना कोणी वाचत नाही , याची तुम्हाला खात्री वाटत होती तर तुमचे या बाबतीतील निवेदन जाहिरातीच्या स्वरुपात सर्वाधिक खप असलेल्या अन्य मराठी वृत्तपत्रातून द्यायला हवे होते. किंवा किमान तुमचा खुलासा व वागळे यांच्या वक्तव्यावर तुमचे म्हणणे आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीला पाठवून द्यायला हवा होता. पोलिसांकडे तक्रार दाखल करायला हवी होती ते करुनही वागळे यांनी दिलगिरी व्यक्त केली नसती तर या वाहिनीच्या कार्यालयासमोर शिवसैनीकांची शांततापूर्ण निदर्शने, काळ्या फिती लावून धरणे आंदोलन किंवा लाक्षणिक उपोषण करता आले असते, प्रेस कौन्सीलकडेही तक्रार करता आली असती.जेव्हा शिवसेनाप्रमुखांनी पत्रकारांना उद्देशून घुबड, कावळे असे अपशब्द वापरले होते, पु. ल. देशपांडे यांचाही अवमानकारक शब्दात अपमान करण्यात आला होता आणि वेळोवेळी शिवसेनेकडून किंवा त्यांच्या मुखपत्र असलेल्या सामनामधून इतरांवर अशी जहरी टीका करण्यात आली, तेव्हा संजय राऊत यांची लेखणी आणि तोंड का मूग गिळून बसले होते. म्हणजे आम्ही काहीही लिहू, कोणाच्या विरोधात काहीही बोलू, तुम्ही मात्र आमच्या विरोधात काहीही बोलायचे नाही, ही कोणती पद्धत झाली.
मात्र यापैकी कोणताही सनदशीर मार्ग न अवलंबता थेट कार्यालयावर हल्ला चढवणे, कार्यालयाची नासधूस कऱणे, कर्मचाऱयांना मारहाण करणे हे कोणत्या संस्कृतीत बसते. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील राडा संस्कृती संपवली, वेगळ्या वाटेने आणि विचारांने शिवसेनेला नेतृत्व दिले, उद्धव ठाकरे हे कसे सुसंस्कृत आहेत, म्हणून त्यांचे गोडवे गायले जात होते. मग शिवसेनेला पुन्हा राडा संस्कृतीकडे का वळावेसे वाटले, त्याचे उत्तर संजय राऊत देणार आहेत का, झाल्याप्रकाराबद्दल उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का, असे अनेक प्रश्न शिवसेना वर्तुळात उपिस्थत केले जात आहेत.
सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे हे सध्या भारताबाहेर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत असा हल्ला करण्याचा निर्णय कोणी घेतला, की त्यालाही उद्धव ठाकरे यांचे समर्थन घेतले होते. झाल्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले तोंड उघडलेले नाही. तसेच शिवसनेच्या अन्य नेत्यांनी किंवा प्रवक्त्यांनीही आपले मत जाहीरपणे व्यक्त केलेले नाही. एकटे संजय राऊत या हल्ल्याचे समर्थन करत आहेत. कदाचित त्यांचा भाऊ सुनील या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार असल्याने, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्याला उमेदवारी मिळवून देऊन त्याचा पराभव झाल्यामुळे काहीतरी करुन दाखविण्याच्या हेतूने सुनील राऊत यांनी हे कृत्य केले असावे किंवा तसे करण्यास त्यांना कोणी सल्ला दिला असावा. मात्र प्रत्यक्षात हे शिवसेनेला चांगलेच जड जाणार आहे. कदाचित सख्खा भाऊ यात गुंतल्यामुळे संजय राऊत यांना त्याची पाठराखण करणे भाग पडले असावे, असे वाटते.
एवढे सगळे घडून गेल्यानंतरी आता तरी उद्धव ठाकरे यांनी डोळे उघडावे. आपल्याभोवती जमलेल्या चौकडीकडून आपल्याला जो सल्ला दिला जातो, जी रणनिती आखण्यासाठी सांगितले जाते, ते साफ चुकीचे ठरत आहे. त्यामुळे आपल्याला आणि शिवसेनेनाही त्याचा कोणताच फायदा होत नाही तर उलट तोटाच होतो आहे. हे लक्षात घ्यावे. शिवसेनेतील जुने व ज्येष्ठ नेते आणि सर्वसामान्य शिवसैनिक यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी आपला संवाद वाढवावा. आपले नेमके कुठे चुकते आहे, ते प्राणाणिकपणे हीच मंडळी त्यांना सांगू शकतील. अजनुही वेळ गेलेली नाही. भोवती जमलेल्या तीन राऊत आणि एक नार्वेकर यांच्या तसेच चुकीचे सल्ले देऊन गोत्यात आणणाऱया खुषमस्कऱयांच्या तावडीतून वेळीच बाहेर पडावे अन्यथा जाग येईल तेव्हा खूप उशीर झालेला असेल...
21 November 2009
बृहन्मंबई महापालिकेत आत्तापर्यंत १२ अमराठी आयुक्त
याची सुरुवात बी. के. पटेल यांच्यापासून झाली. त्यानंतर अधूनमधून अमराठी अधिकारी आयुक्त म्हणून महापालिकेवर नियुक्त केले गेले. पटेल यांचा कालावधी २१ जानेवारी १९४६ ते २० सप्टेंबर १९५२ असा होता. त्यांच्यानंतर पी. आर. नायक यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. व्ही. एल. गिडवानी यांना अगोदर दीड महिन्याचा आणि नंतर १५ जुलै १९५७ ते २९ एप्रिल १९६० असा कार्यकाळ मिळाला होता.
२८ फेब्रुवारी १९६२ ते १५ एप्रिल १९६३ अशा काळात ए.यू. शेख हे आयुक्त झाले. ७ मे १९६९ ते २४ मार्च १९७० या कालावधीत जे. बी. डिसोझा हे आयुक्त होते. १९७५ ते १९८४ या कालावधीत भालचंद्र देशमुख, बी. के. चौगुले आणि द.म. सुखटणकर असे मराठी आयुक्त झाले. १२ नोव्हेंबर १९८४ ते २४ जुलै १९८६ अशी दोन वर्षे पुन्हा जे. के. कांगा हे अमराठी आयुक्त होऊन गेले.
त्यांच्यानंतर २४ जुलै १९८६ ते ३० एप्रिल १९९० या काळात सदाशिवराव तिनईकर हे आयुक्त झाले. तिनईकर यांच्यानंतर पुन्हा एकदा के. पद्मनाभय्या यांच्या रुपाने महापालिकेला अमराठी आयुक्त मिळाला. पद्मनाभय्या यांच्यानंतर शरद काळे (१६ नोव्हेंबर १९९१ ते १७ मे १९९५), जर्नादन जाधव (१७ मे १९९५ ते १० जून १९९६) आणि गिरीश गोखले (१० जून १९९६ ते ३१ मे १९९९) असे तीन मराठी आयुक्त झाले. यांच्यानंतर लागोपाठ पाच वर्षे पुन्हा महापालिकेला अमराठी आयुक्त मिळाले.
के. नलीनाक्षन, व्ही. रंगनाथन, रामानंद तिवारी, करुण श्रीवास्तव व जॉनी जोसेफ या अमराठी अधिकाऱ्यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. के. नलीनाक्षन यांची १ जून १९९९ रोजी आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. तर जॉनी जोसेफ हे १ मार्च २००४ ते १ मे २००७ या कालावधीत आयुक्त होते. जोसेफ यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पुन्हा एकदा डॉ. जयराज फाटक यांच्या रुपाने महापालिकेला मराठी आयुक्त मिळाला. डॉ. फाटक यांच्या बदलीनंतर आता पुन्हा एकदा या पदावर कोणाची नियुक्ती होणार त्याची चर्चा सुरु झाली आहे.
20 November 2009
मनाला भिडणारे लेखन आपल्या वाचनात येते. मग ते कधी एखाद्या पुस्तकातील, कादंबरीतील, मासिकातील कथा, कविता किंवा वृत्तपत्रातील लेखामधील असते. काही वेळेस असेही होते की कुठेतरी आपण एखादा चांगला उतारा, कविता वाचतो, पण ते लिहिणाऱयाचे नाव त्या खाली दिलेले नसते.
मात्र त्यातील आशय, शब्द आपल्या मनाला भावतात. मनात कुठेतरी घर करतात. असाच वाचनात आलेला एक परिच्छेद किंवा मुक्तछंदातील काव्य नुकतेच वाचनात आले. ते कोणाचे आहे, कोणी लिहिले आहे किंवा ते एखाद्या पुस्तकातील आहे का ते माहिती नाही.
सध्याच्या आपल्या बदलत्या जीवनशैलीचे समर्पक वर्णन त्यात केले आहे. जीवघेणी स्पर्धा आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपण कशाकशाला मुकलो आहोत, ते यात सांगितले आहे. तोच परिच्छेद सर्वांच्या माहितीसाठी. या मजकुराला जाणीव असे नाव देण्यात आले होते.
जाणीव
दिवाणखान्यात टी.व्ही आल्याने बोलणे विसरलो आहे
घरात गाडी आल्यापासून चालणे विसरलो आहे
खिशात कॅल्कुलेटर आल्यापासून पाढे विसरलो आहे
ऑफीसमध्ये एसीत बसून झाडाखालचा गारवा विसरलो आहे
रस्त्यावर डांबर आल्यापासून मातीचा वास विसरलो आहे
मनालाच इतके कष्ट होतात की शरीराचे कष्ट विसरलो आहे
कचकड्यांची नाती जपतांना प्रेम करायला विसरलो आहे
बॅंकांमधली खाती सांभाळतांना पैशांची किंमत विसरलो आहे
उत्तेजक चित्रांच्या बरबटीमुळे सौदर्य पाहणे विसरलो आहे
कृत्रिम सेंटच्या वासामुळे फुलांचा सुगंध विसरलो आहे
फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीची ढेकर विसरलो आहे
पॉप व रॉपच्या दणदणाटात संगीत समाधी विसरलो आहे
क्षणभंगूर मृगजळाच्या मागे धावतांना सत्कर्माला विसरलो आहे
माझीच तुंबडी भरतांना दुसऱयाचा विचार करणं विसरलो आहे
धावत धावत असतांना क्षणभर थांबणंही विसरलो आहो
जागेपणीचं सुख जाऊच द्या सुखाची झोपही विसरलो आहे
कृत्रिम व खोट्या विनोदामुळे खळखळून हसणं विसरलो आहे
आणि हसणं विसरल्याने जीवन जगणेच विसरलो आहे
खूप छान आणि मनाला भावणारे असे हे शब्द आहेत. हे ज्या लिहिले असतील, त्यांचे अभिनंदन.
19 November 2009
शिवप्रताप दिन
प्रतापगडाच्या युद्धात शिवाजी महाराज यांनी विजय संपादन करुन आणि अफजलखानाचा वध करुन बलाढ्य शत्रूला नेस्तनाबूत करण्याचा इतिहास घडवला. शिवाजी महाराज यांचे हे धाडस, चातुर्य, राजकारण, त्यांच्या मावळ्यांची कामगिरी हा सर्व इतिहास प्रत्येकालाच अभिमान वाटावा असा व प्रेरणादायी आहे. या दिवसाची आठवण म्हणून प्रतापगड उत्सव समितीने पंधरा वर्षांपूर्वी प्रतापगडाच्या परिसरात हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. अफजलखान वधाच्या ऐतिहासिक घटनेला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे समितीने ठरवले आहे.
शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेल्या प्रतापगडाच्या युद्धाचा दाखला जागतिक युद्धशास्त्रातही अभ्यासासाठी देण्यात येतो. आपण मात्र पाहिजे तितके या प्रकरणाकडे पाहात नाही. अफजलखान वध ही ऐतिहासिक सत्य घटना असली तरी त्याचा देखावा लावण्यास परवानगी न मिळणे, पाठ्यपुस्तकातून हा धडा किंवा चित्र वगळणे असे दुर्दैवी प्रकार आपल्याकडे मुस्लिमांच्या लांगुनचालनासाठी केले जात असतात.
प्रतापगड उत्सव समितीने या विषयावर व्यापक जनजागृती करण्याचे ठरवले आहे. सध्या आपल्या देशात दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांनी थैमान घातले आहे. या परिस्थितीत संपूर्ण देशाला आणि प्रत्येक राष्ट्राभिमानी नागरिकामध्ये लढाऊ वृत्ती निर्माण होण्याची गरज आहे. अफजलखानाच्या रुपाने शिलाजी महाराज यांनी महाराष्ट्रावर चाल करुन आलेल्या दहशतवादाचा समर्थपणे मुकाबला केला होता. त्यामुळे दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अफजलखान वधाचा हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असे समितीचे म्हणणे आहे.
हा शिवप्रताप दिन केवळ महाराष्ट्रातच साजरा न होता तो संपूर्ण देशभरात साजरा झाला पाहिजे. या घटनेकडे जातीय किंवा धार्मिक दृष्टीकोनातून न पाहता राष्ट्रहिताच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. प्रतापगड उत्सव समितीतर्फे येत्या २४ नोव्हेंबर रोजी वाई येथे शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम होणार आहे. या वेळी कर्नल संभाजी पाटील यांना वीरजीवा महाले तर शिवभक्त हरिदास पडळकर यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
२४ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी काही ना काही कार्यक्रम आयोजित केला जावा, असे आवाहनही या समितीने केले आहे.
प्रतापगड उत्सव समितीचे पदाधिकारी असे
विजयाताई भोसले-निमंत्रक, संजय भोसले-अध्यक्ष, मिलिंद एकबोटे- कार्याध्यक्ष, विनायक सणस-उपाध्यक्ष
अधिक माहितीसाठी संपर्क दूरध्वनी
मिलिंद एकबोटे-९४२३५७२३८०
अन्य क्रमांक-९८८१७३४२०३/९७६७७५५९९२/९९२२३४१३२२
18 November 2009
मुजोर रिक्षाचालक, ढिम्म लोकप्रतिनिधी आणि हतबल प्रवासी
17 November 2009
गोमूत्र एक वरदान
16 November 2009
हे जीवन सुंदर आहे
15 November 2009
नवा भस्मासूर
14 November 2009
डाऊझिंग पद्धतीने जमिनीखालील पाण्याचा शोधi
मुंबईत सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत असून पाणी वाचविण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नवीन विहिरी खोदणे, बोअरवेल किंवा रिंगवेल खणणे हे पर्याय असले तरी त्यामुळे पाणी लागेल की नाही आणि लागले तर ते गोडे असेल का, याची खात्री नसते. त्यामुळे जमिनीखालील गोडय़ा पाण्याचा शोध घेण्यासाठी महापालिका प्रशासन डाऊझिंग तज्ज्ञांची मदत घेण्याचा विचार करत आहे.
पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हल्ली सर्रास बोअरवेल किंवा रिंगवेलला प्राधान्य दिले जाते. बोअरवेल खणताना जमिनीत सुमारे सत्तर ते ऐशी फूट खोल जावे लागते. इतके खोल गेल्यानंतरही पाणी लागेल की नाही आणि लागले तर ते गोडे असेलच याची खात्री नसते. त्यामुळे जमिनीखाली नेमके कुठे पाणी लागेल, याचा शोध ज्या प्रक्रियेमार्फत घेतला जातो त्याला डाऊझिंग असे म्हणतात.
विशिष्ट झाडाची वाय आकाराची फांदी किंवा धातुची काटकोनातील काठी घेऊन जमिनीखालील पाण्याचा शोध घेण्यात येतो. खेडेगावात अशा पद्धतीने जमिनीखालील पाण्याचा शोध घेणाऱ्या माणसांना ‘पाणाडे’ असे म्हटले जाते. राज्याच्या अनेक भागात अशा प्रकारे पाण्याचा शोध या माणसांकडून घेण्यात येतो.दरम्यान पश्चिम उपनगरातील काही सहकारी गृहनिर्माण संस्थांनी डाऊझिंगच्या मदतीने बोअरवेल/रिंगवेल खणून घेतल्या असून त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
तांबे किंवा अन्य धातूची काठी काटकोनात धरुन डाऊझिंग तज्ज्ञ जमिनीवर पुढे पुढे चालत राहतो. ज्या ठिकाणी हमखास पाणी लागण्याची शक्यता असेल तेथे ती काठी जमिनीच्या दिशेने झुकते. हिटलरने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या पद्धतीचा वापर केला होता, अशी माहिती महापालिकेचे उपप्रमुख अभियंता (जल बांधकाम) मुकुंद पाठक यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
विहिर खणल्यानंतर त्याला पाणी लागणे किंवा न लागणे हे माणसाच्या नव्हे तर निसर्गाच्या हातात. आहे. जमिनीखाली न खोदता जर अगोदरच पाणी लागेल की नाही, ते गोडे असेल का हे कळले तर विहिर खणून पाणी लागले नाही किंवा खारे पाणी लागले तर होणारा खर्च वाया जाणार नाही आणि हेच या पद्धतीने शोधून काढता येते, असे डाऊझिंग पद्धतीचे अभ्यासक आणि पाणीसमस्येवर मात करण्यासाठी विविध प्रयोग करणारे तज्ज्ञ गोविंद पंडीत व अजय काळे यांनी सांगितले. जमीन न खणता या पद्धतीने काढलेले निष्कर्ष ९० टक्के बरोबर येतात, असा दावाही पंडीत यांनी केला.
13 November 2009
२९ वर्षात झाली ५१ वादळे
12 November 2009
चक्रीवादळाचा झंजावात
11 November 2009
अजून वेळ गेलेली नाही...

