24 November 2009

ऐलमा पैलमा मातोश्री देवा

महापौरपदाच्या सोडतीचे आरक्षण नुकतेच मंत्रालयात जाहीर झाले आणि बृहन्मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या तमाम महिला नगरसेविकांना महापौरपदाचा शालू आपल्यालाच मिळणार, अशी स्वप्ने पडायला लागली. अर्थात महापौरपदाची माळ एकाच महिला नगरसेविकेच्या गळ्यात पडणार असल्याने प्रत्येकीने आपापल्या परीने मार्चेबांधणी करायला सुरुवात केली. महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या चार ते पाच महिला नगरसेविकांची गुप्त बैठक नुकतीच झाली. त्या बैठकीत प्रत्येकीने आपल्यालाच हे पद का मिळाले पाहिजे ते ठासून सांगितले. त्या बैठकीचा गुप्त वृत्तान्त आमच्या सूत्रांकडून आम्हाला कळला. आज तो सादर करत आहोत.


बैठकीसाठी जमलेल्या सर्व महिला नगरसेविकांनी सगळ्यात पहिल्यांदा

ऐलमा पैलमा मातोश्री देवा

महापौरपद मलाच मिळू दे

करीन पक्षाची व जनतेची सेवा

असे गाणे म्हणत सामूहिक फेर धरला.  


त्यानंतर महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या क्रमांक एकने

मागे उभा मिलिंद

पुढे उभा मिलिंद

आपल्या सगळ्यांकडे

मिलिंद हा पाहतो आहे

असे गाणे म्हटले.

त्यावर इच्छुक क्रमांक दोनने आपल्या फटकळ आणि डॅशिंग स्वभावानुसार मोठ्या आवाजात

नाव गाव कशाला पुसता

मी असले जरी गुजराथी

मला हो म्हनत्यात लवंगी मिरची

असे गाण्यातूनच प्रत्युतर क्रमांक एकला दिले.


त्यावर इच्छुक क्रमांक एक म्हणाली, मी तर सगळ्यात ज्येष्ठ नगरसेविका. स्थायी समिती किंवा अन्य समित्यांचे सदस्यपद मला मिळाले असले तरी महापौरपद ते महापौरपद. त्याची शान, गाडी आणि  बंगला व रुबाब काही वेगळाच. माझ्याकडे अनुभव आणि मनोहर रुप आहे. तेव्हा हे पद मलाच मिळाले पाहिजे.


लगेच इच्छुक क्रमांक दोनने आवाज चढवत सांगितले की, अग नुसते मनोहर रुप असून चालत नाही. कामे करुन घेण्यासाठी माझ्यासारखा डॅशिंग स्वभावही लागतो. अग आपल्यापैकी जीची निवड होणार आहे, तिला फक्त सहा महिनेच मिळणार आहेत. त्यानंतर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे जनमानसावर शिवसेनेच्या कामाचा ठसा उमटविण्यासाठी मीच योग्य आहे. आणि हल्ली मातोश्रीचाही मनोहररुपावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे शिवसेनेतही माझेच नाव सगळ्यांना पटेल की नाही बघ.

आणखी थोडीशी फोडणी देत इच्छुक क्रमांक दोन म्हणाली, सध्या मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरु आहे. त्यामुळे जर मलाच हे पद मिळाले तर शिवसेना अमराठी माणसांच्या विरोधात नाही, असा संदेश सगळ्यांना मिळेल. हे म्हणणे खोडून काढताना इच्छुक क्रमांक तीन म्हणाली की, कसला योग्य संदेश जाईल, कप्पाळ. अग असे झाले तर राजकारण कसे वळण घेईल हे तुला माहिती नाही का, आपल्या शत्रू क्रमांक एकच्या हातात या निमित्ताने आपण आयते कोलीतच देऊ. शिवसेनेने मराठी माणसांचा मुद्दा कसा सोडला, मराठी माणसावर शिवसेना कसा अन्याय करत आहे, असे बोंबलायला ते मोकळे होतील, त्याचे काय. त्यामुळे या पदासाठी तू योग्य नाहीस.


इच्छुक क्रमांक चारने तिसरीला पाठिंबा दिला. ती म्हणाली, अग त्यातून तू पश्चिम उपनगरातली. आत्ताचे महापौरपदही पश्चिम उपनगरालाच मिळाले आहे आणि आता पुन्हा ते तुमच्याकडे का, पूर्व उपनगर किंवा शहर भागालाही ते मिळायला हवे, असे पेच तिने टाकला.


चौघींचेही आवाज वाढू लागले. प्रकरण हातघाईवर येते की काय, अशी शंका वाटू लागली. तेव्हा वयाने अनुभवी असलेली, आपल्या सध्याच्या कारकिर्दीत एकदा सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतलेली आणि महापौरपदाच्या स्पर्धेत असलेली इच्छुक क्रमांक पाच म्हणाली, धन्य आहे तुम्हा सगळ्यांची. आपापसात इथे भांडत काय बसलात, आपल्याकडे कोणत्याही पदासाठी पात्रता, अनुभव किंवा ज्येष्ठता हा निकष सध्या नसतो, हे काय माहिती नाही तुम्हाला. अग कोणतेही पद मिळविण्यासाठी सध्या  मिलिंद, वहिनीसाहेब, मातोश्रीच्या दरबारातील चौकडी आणि नंतर आपल्या कार्यकारी साहेबांचा आशीर्वाद असतो लागतो हे विसरलात का.


अग मोठ्या साहेबांचे दिवस आता संपले.  ही मंडळी सगळे ठरवून मग त्यांना नुसत मम म्हणायला लावतात. अग  आपण इथे भांडत बसू आणि महापौरपदाचा शालू दुसरीच कोणीतरी पटकावायची. आजवर आपल्याला आलेले अनुभव काही कमी आहेत का. आणि हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो राजसिंहही यंदाच्या वेळेस आपल्याकडून महापौरपद हिसकावून घ्यायला टपला आहे, हे विसरलात का. तेव्हा आपण भांडत न बसता आपल्यात एकमत करु या आणि वरपर्यंत एकीचेच नाव पोहोचवू या, काय माझे म्हणणे पटताय ना सगळ्याजणींना


वयाने ज्येष्ठ असलेल्या त्या नगरसेविकेच्या सल्ल्याने सगळ्यांजणीं भानावर आल्या आणि या गुप्त बैठकीचा समारोप झाला...

(गुप्त बैठकीच्या या वृत्तान्तातील  इच्छुक नगरसेविका आणि त्यांच्या  नामसाधर्म्याशी वास्तवाचा काहीही संबंध नाही , त्याची सर्वानी नोंद घ्यावी.  तरीही ते वर्णन कोणाला लागू पडत असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा.  )
              

2 comments: